Sunday, June 15, 2014

मधुमालतीचा मांडव...

 
गेल्या महिन्यात आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचं पहिलं स्नेहसंमेलन झालं. 94 वर्षांचे गोपाळ केतकर मुद्दाम संमेलनाला हजर राहिले होते. म्हणजे, जवळपास सगळ्या माजी तुकड्यांचे प्रतिनिधी. सातआठशे जणांच्या, वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तुंग नाव कमावलेल्या या संमेलनात मी मुख्य वक्ता होतो.
सहाजिकच, शैक्षणिक दर्जातील कालांतर असा विषय डोळ्यासमोर ठेवून मी बोलत गेलो.
त्यासाठी फार नोंदी कराव्या लागत नाहीत.
आपली विद्यार्थीदशा आणि पालकदशा यांचा आढावा घेताना हा विषय सहज मांडता येणार होता.
त्याच ओघात, एका क्षणी मला वडिलांची असह्य आठवण आली.
माझे वडील याच शाळेत शिक्षक होते. आम्ही भावंडं, विद्यार्थी असताना!
त्यांचा संस्कृत चा व्यासंग दांडगा होता. मराठी भाषेचं सौंदर्य तर त्यांच्या लेखणी आणि वाणीलाही, अलंकारासारखं लगडलेलं असायचं. इंग्रजीवर त्यांचं असामान्य प्रभुत्व होतं. ते तीनही विषय तेच आम्हाला शिकवत असत.
.... म्हणून, शाळेच्या कार्यक्रमात बोलताना, शिक्षक म्हणून त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा उल्लेख अपरिहार्यच होता.
पण, वडील आणि शिक्षक या दोन भूमिकांची त्यांनी कधीच गल्लत केली नव्हती.
त्या दिवशी, भाषण करेपर्यंत मला ते जाणवलं नव्हतं. त्या दिवशी सहज ते लक्षात आलं!
म्हणजे, शाळेत ते कधीही वडिलांसारखे वागले नाहीत, आणि घरात ते कधीही शिक्षकासारखे वावरले नाहीत... तरीही, त्यांची ही दोन वेगळी रूपं आहेत, हे कधीही जाणवलं नव्हतं. परवा सहज बोलताना ते जाणवून गेलं, आणि क्षणभर मी गदगदलो.
बहुधा त्या क्षणाचे सावट समोरही दाटलं असावं!
... नंतरही बरेच दिवस वडिलांच्या आठवणींनी मी बेचैन होतो. सतत भूतकाळ धुंडाळत होतो, आणि आठवणींचे कप्पे विस्कटून पाहात होतो.
ते उत्तम गायचे.
शास्त्रीय संगीताचं फारसं शिक्षण नव्हतं, तरी कान आणि गळा कसलेला होता.
... त्या वेळी आमच्याकडे एक आरामखुर्ची होती. लोखंडी! झुलणारी!
संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर चहा वगैरे घेऊन, आरामखुर्ची घेऊन ते समोरच्या अंगणातल्या मधुमालतीच्या लालपांढऱ्या गुच्छांनी मढलेल्या मांडवाखाली बसायचे, आणि एक गुणगुणती लकेर मांडवाखाली घुमायची...
पाठोपाठ, मराठी नाट्यगीतांच्या लगडी उलगडत जायच्या... मला त्या वेळीची त्यांची तल्लीनता आजही डोळ्यासमोर स्पष्ट दिसतेय. आरामखुर्चीत रेलून, मान आणखी उजवीकडे वळवून, कपाऴावरून उजवीकडे घेतलेल्या डाव्या हाताची बोटं, खुर्चीच्या लोखंडी दांडीवर हलका ठेका धरायची...
हळुहळू बाहेर अंधारू लागायचं,आणि,
धीर धरी धीर धरी... ची शेवटची ओळ संपवून ते उठायचे.
बाहेरच्या रस्त्याकडेला कधीपासून आडव्या पडलेल्या फणसाच्या ओंडक्यावर बसलेली चारपाच माणसंही, उठून घरोघरी जायची...
त्यांच्या सुराला विलक्षण धार होती. पण गातानाची वेगळी, आणि आम्हाला समोर उभे केलेलं असतानाची वेगळी...
एखाद्या गाण्यातील टिपेची तान मृदु असायची, तर कधी संतापाच्या भरात आम्हाला म्हटलेल्या, भोसडीच्यांनो चा टिपेचा स्वर थरकापून टाकायचा...
पण दिवस मावळायचा मात्र, मस्त गाण्यांनी.
म्हणून, मला आजही, संतापणारे, रागाच्या भरात अस्सल कोल्हापुरी शिव्या देणारे वडील नाही आठवत.
संध्याकाळी मधुमालतीच्या मांडवाखाली नाट्यगीतांच्या लगडी उलगडणारे वडील मात्र, लख्ख आठवतात...
दहा वर्षांपूवी ते गेले. असंच, पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं आणि ते उठलेच नाहीत.
त्यांच्या अखेरच्या दिवशी, सकाळपासून ते ग्लानीतच होते. मी, माझा भाऊ, आई, माझी बायको आणि मुलीही आसपासच होतो.
त्याही स्थितीत ते काहीतरी बोलत होते. शब्द जड झाले होते, पण काहीतरी सांगत होते. मोठ्या प्रयत्नांनंतर कळलेले त्यांचे अखेरचे शब्दही मला सतत आठवत राहतात.
आपलं चुकलं, तर लहानापुढेही माफी मागावी!...
रात्री त्यांचा ताप पाहण्यासाठी मी त्यांच्या छातीवर हात ठेवला, आणि त्यांनी तो घट्ट पकडला.
तो कोमट स्पर्श, काही वेळ तसाच अनुभवत मी स्तब्ध होतो.
काही वेळानं ती पकड सैल झाली!!
आज मी मुद्दाम ते गाणं ऐकलं... खूप वर्षांनी!
.... धीर धरी, धीर धरी, जागृत गिरिधारी... भाविकास तारितसे तोच चक्रधारी!
मधुमालतीचा तो मांडव, आठवणीत पुन्हा टवटवीत होऊन बहरला!!


Saturday, June 14, 2014

त्या चंद्रभारल्या रात्री ...

  
आठवतंय ना तुला,
त्या चंद्रभारल्या रात्री
काठावरल्या चांदणशिंपणात
चिंब ओथंबलेला
तुझा कृष्ण कुंतलभार
निळ्या तळव्यावर सावरताना,
चांदण्याची कशी सैरभैर
घालमेल सुरू होती?
... थकलेला चंद्र ढगाआड दडला
आणि अंधाऱ्या रात्रीचे
उदासवाणे उसासे झेलताना
निष्पर्ण झाडांची वठलेली खोडं
वेडीपिशी होऊन जडावली...
आठवतंय ना तुला,
त्या चांदण्या रात्री
तळ्याकाठचा कोवळा रोमांच
लेऊन तू घरी परतलीस
आणि शिणलेल्या पापण्या
जडशीळ होऊन तुझ्या
गालावर विसावू लागल्या ,
अंगावरच्या सूर्याच्या तप्तकिरणांचा
स्वप्नाळ आभास अचानक
कसा लावून गेला पिसे...