Wednesday, April 23, 2014

माझ्या मना...

माझ्या मना हास जरा 
कालच्यापेक्षा आज बरा 
हाही दिवस संपून जाईल 
नवा उद्या घेऊन येईल 
आठवणींचे डोस कडू 
गिळत कुढत नको रडू 
नवा दिवस साजरा कर 
आयुष्यात आनंद भर 
डोळे उघड पहा नीट 
झटकून टाक सगळा वीट 
पुसून टाक रात्रीचे भास
मोकळा कर दबलेला श्वास
कानावरचे काढ हात
आतल्या सुराला दे साथ
आतला आवाज हाच खरा
माझ्या मना हास जरा
ऐक आता गाणीच गाणी
गालावरचे पूस पाणी
अन्यायाची सारी भुते
जातील पळून कुठल्या कुठे
नवी वेळ अशी येईल
खतातून सोने होईल
या उद्याचा विचार करा
माझ्या मना हास जरा.

No comments: