Thursday, October 16, 2014

 गुर्जी: बंड्या, सांग. मोठेपणी तू कोण होणार? 
बंड्या:  गुर्जी, मला ना, पंतप्रधान व्हायचंय! 
गुर्जी:  अरे वा:!  बघा रे मुलानो. अशी मोठी स्वप्नं पाहिली पाहिजेत. बरं, बंड्या, सांग पाहू...  का वाटतं तुला असं? 
बंड्या:  गुर्जी, मला ना, इतिहास खूप आवडतो. मला शिवाजी महाराज माहीती आहेत, बाजीप्रभू का कोण, तेही माहिती आहेत, आणि सय्यद बंडापण माहिती आहे. मला पण बाबा कधीकधी बंडा असंच म्हणतात. आणि गुर्जी, ते वेडात दौडले वीर मराठे सात गाणंपण मी ऐकलंय. म्हणून मला पंतप्रधानच व्हायचंय गुर्जी! 
गुर्जी:  हं...  पण वेड्या ते अवघड दिसतंय रे... 
बंड्या:  का, गुर्जी? 
गुर्जी:  हे बघ बंड्या, एवढ्या भांडवलावर फार तर, मला मुख्यमंत्री व्हायचंय असं तू म्हणू शकतोस. 
बंड्या:  पण का गुर्जी?  पंतप्रधान का नाही? 
गुर्जी:  अरे, त्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रश्न, आर्थिक नीती, सामाजिक समस्या आणि सर्व समाजाचं नेत्ऱत्व करण्याची इच्छा असं बरंच काहीतरी लागतं! 
बंड्या: बरं मग गुर्जी. मी आता असंच सांगेन सगळ्यांना, की, 'मला ना, मुख्यमंत्री व्हायचंय!'

Sunday, August 10, 2014

किस्सा किस्मत का....


आज अचानक एक जुनाच किस्सा लख्ख आठवला. 
एक निर्माता, एका शूर इतिहासपुरुषाच्या जीवनावर चित्रपट काढायचं ठरवतो. 
प्रमुख भूमिकेसाठी एका नामवंत अभिनेत्याला भरपूर पैसे देऊन करारबद्ध करतो. 
मग त्या अभिनेत्याच्या पसंतीनुसार इतर पात्रांची निवड होते. 
सारी तयारी झाल्यावर, वेगवेगळी लोकेशन्स नक्की केली जातात. आता शूटिंग सुरू होणार असतं. 
दणक्यात चित्रपटाची जाहिरातही सुरू होते, आणि प्रमुख अभिनेता आणखीनच फेमस होतो!
कोकणात, डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या एका गावात, एका किल्ल्याच्या पायथ्यीशी घनघोर युद्धाचा सीनचे चित्रीकरण करायचं असतं.
सगळी टीम तयारीनिशी गावात पोहोचते.
युद्धासाठी लागणारं सैन्य आजूबाजूच्या गावातील तरुणांनाच गोळा करून जमवायचं असतं. सरपंच, पोलीस पाटील या सगळ्यांशी तसं तोडपाणी झालेलं असतं.
.... ठरल्याप्रमाणे, जमवाजमव होते. एक दिवसाच्या मजुरीच्या बोलीवर शे दीडशे तरुण जमा होतात. सर्वांना सैनिकांचा वेश चढवला जातो. हातात तलवार, पाठीशी ढाल बांधून हे सारे सैनिक मैदानात उभे राहातात.
लढाईचा सीनचे शूटिंग सुरु करण्याआधी दिग्दर्शक या गर्दीतून एक फेरफटका मारतो.
सैनिकांनी सज्ज अवस्थेत कसं उभं राहायचं, तेही अगोदरच सांगून ठेवलेलं असतं.
अचानक दिग्दर्शकाची नजर एका सैनिकावर पडते.
खांदे पाडून, छाती आत ओढून पोक काढत उभा असलेेला तो सैनिक पाहून दिग्दर्शक वैतागतो. पण राग आवरतो. त्याच्या समोर उभा राहातो, आणि म्हणतो,
'अरे, या मर्द राजाचा शूर शिपाई आहेस ना तू?... मग असा पोक काढून उभा का?... चांगलं छाती पुढे काढून ताठ मानेनं उभं रहायचं. समजलं? '...
तो सैनिक दिग्दर्शकाकडे पाहात नुसती नकारार्थी मान हलवतो.
दिग्दर्शकाला राग येत असतो पण तो सावरतो. नजरेनंच सैनिकाला का, म्हणून विचारतो.
...'दीडशे रुपयात एवढीच छाती पुढे येणार साहेब! ' तो तरुण करारीपणानं उत्तरतो.
दिग्दर्शक क्षणात वरमतो.
मग आणखी शंभर रुपये वाढवून द्यायचॆ ठरतं.
... आणि सगळे सैनिक ताठ मानेनं, छाती पुढे काढून युद्धाला सज्ज होतात!

..... अलीकडे अनेकजण मान पाडून, छाती आत घेऊन का वावरताना दिसतात, त्याचाही उलगडा झाला!!!

फ्रेडशिप डे' चा विजय sss सो!
गण्या, माझा लंगोटी यार!! 

यंदा दहा दिवस अगोदर मला गण्याची आठवण आली... 
नक्की आठवत नाहीये, पण गेली जवळपास 40 वर्षं, मला या वेळी नेहमी गण्याची आठवण येतेच! 
निमित्त असतं, 15 ऑगस्टचं! 
.... गण्या त्या वेळी माझा सख्खा मित्र होता. 
कोकणात कायमचं राहण्यासाठी देवरूखला पहिलं पाऊल ठेवलं, त्या दिवशी पाऊस कोसळत होता. असा पाऊस आमच्या गावाला पडायचाच नाही 
म्हणून मला तो आवडला. एस्टी बसस्टँडवर थांबली, तेव्हा तो कोसळत होता. मी गाडीतून उतरलो अन स्टँडच्या शेडमध्ये धावत शिरलो, तोवर पुरता भिजलो. अंगातली मस्त शिरशिरी त्या दिवशी पहिल्यांदा अनुभवली!
... ती अजूनही, इतक्या वर्षांनंतरही आठवतेय!
पाऊस ओसरला की मग घरी जाऊ असं ठरवून आम्ही कितीतरी वेळ शेडमध्येच उभे होतो. शेवटी निघालो... भिजतच!
घरी पोचलो तेव्हा चिंबचिंब होतो. मस्त वाटलं. कोकणातला पहिला पाऊस मी भरभरून अंगावर घेतला होता. तरी समाधान नव्हतं.
आई स्वैपाकघरात गेली, आणि मी खिडकीतून हात बाहेर काढून पागोळ्या झेलत बसलो.
असा पाऊस मी पहिल्यांदाच पाहिला होता...
तळव्यावर पडणाऱ्या पागोळ्यांचा तो पहिलावहिला गुदगुल्या स्पर्श अजूनही मी मनात जपून ठेवलाय...
कोकणातल्या पावसाशी त्या दिवशी पहिली ओळख झाली!
रात्री झोपलो, तरीही कानाशी पाऊसझडींचा तो ताशा तडतडतच होता. मस्तपैकी!
सकाळी उठलो, तेव्हा आई मागीलदारी कुणाशी तरी बोलत होती.
बहुधा, धुणंभांडीवाली बाई!
मी उठून मागे गेलो.
त्या बाईचं बोट धरून एक मुलगा उभा होता.
मी तिथं गेलो, अन तो माझ्याकडे बघून हसला. मस्त वाटलं.
मीपण हसलो, आणि एकमेकांचं नाव कळायच्या आधीच आमची दोस्ती झाली!!
... तोच हा गण्या!
कोकणातल्या गावात गेल्यानंतर झालेला माझा पहिला मित्र!
आमच्याकडे धुणंभांडी करणाऱ्या राधेचा मुलगा!
...मग माझं नाव शाळेत घातलं.
शाळेतला पहिला दिवस!
मी घाबरतच वर्गात शिरलो, आणि समोर बघितलं.
माझी भीती पळाली!
एका रांगेत मला गण्या दिसला.
माझ्याकडे बघून, मस्त हसला.
मी लगेचच त्याच्या रांगेत घुसलो.
गण्यानं मागच्या मुलाला दटावलं, मागे व्हायला सांगितल, तेव्हा त्याच्या आवाजातली जरब मलाही जाणवली.
ते पोरगं निमूटपणे बाजूला झालं होतं...
गण्या आमच्या वर्गातला दादा आहे, हे मला लगेचच जाणवलं होतं.
मी जवळ जाताच गण्या उठला! खाली अंथरलेलं गोणपाट त्यानं आणखी उलगडून मोठं केलं, आणि मला बसायची खूण करून तो मस्तपैकी हसला.
माझं दडपण एव्हाना पळालं होतं.
गण्या माझा मित्र झाला होता.
आमच्या घरी काम करणाऱ्या राधेचा गण्या..
मला सांभाळायची सारी जबाबदारी आपल्यावर आहे, असं समजून त्या दिवशीपासून गण्या मला जपू लागला.
सावलीसारखा सोबत राहू लागला!
शनिवारी आम्हाला वर्ग सारवायला लागायचा.
शाळेत गेलं की लगेच बादल्या घेऊन शेण गोळा करायला मुलं बाहेर पडायची.
मी अर्थातच, गण्याबरोबर असायचो.
गण्यानं मला कधीच शेणात हात घालू दिलाच नाही!
... आमच्या गल्लीतल्या, आमच्या वयाच्या मुलांमध्ये गण्या दादा होता, हे मला लक्षात आलं आणि मी बिन्धास्त झालो...
चौथीत असताना गण्याच्या दप्तरात तंबाखूची पुडी असायची.
मी दामटलं म्हणून एकदोन दिवस गण्यानं तंबाखू सोडला.
पुन्हा पुडी दिसली, तेव्हा त्यानं केविलवाण्या नजरेनं माझ्याकडे बघितलं, आणि मी पाघळून त्याला माफ केलं.
गण्याचा नेम अफलातून होता.
पावसाळ्यात, रस्त्याकडेच्या डबक्यात, पिवळेजर्द भादूर, -बेडूक - डरावडराव करायचे. ते 'डबल डेकर' बेडूक बरोब्बर हेरून गण्या त्यांचा कोथळा काढायचा.... एका दगडात!
.... गण्याच्या बापाचं पानाचं दुकान होतं.
पानाची गादी!
खूपदा त्याला गादीवर बसायला लागायचं. कधीतरी मी तिथं जायचो.
पानं मोजताना नाच करणारी गण्याची बोटं बघताना खूप मजा वाटायची.
गण्या पानं मोजतमोजत माझ्या डोळ्यात पाहात हसत असायचा!
दरोज एकत्र शाळेत जायचा आमचा नेम होता. गण्या जणू माझा शाळेतला रक्षक होता. कुणाची वाकड्या नजरेनं बघायची हिंमत नसायची.
गण्याला कळलं तर खरं नाही ही भीती प्रत्येकाला असायची.
...
असेच दिवस जात होते.
गण्या आणि माझी मैत्री, शब्दांच्या पलीकडली घट्टघट्ट होती.
... त्या 15 ऑगस्टला प्रभातफेरीसाठी आलंच पाहिजे असा फतवा हेडमास्तरांनी काढला होता.
मी तयारी केली. कपडे धुवून ठेवलेलेच होते.
सकाळी आवरून मी बाहेर पडलो.
गण्या नेहमी मला बोलवायला यायचा.
त्या दिवशी तो आलाच नाही.
मग मीच त्याला बोलवायला गेलो.
गण्या आंघोळ करून बसला होता.... पण प्रभातफेरीला येणार नव्हता.
मी कारण विचारलं.
त्याच्याकडे पांढरा शर्ट नव्हता.
आतून राधेनं, त्याच्या आईनं मला सांगितलं...
मी सुन्न!
अचानक माझ्या डोक्यात कल्पना चमकली.
दप्तरातली रेनकोटची घडी विस्कटून मी रेनकोट गण्याच्या अंगावर घातला, आणि चल म्हणालो...
गण्या जाम खुश होता!
रेनकोटच्या आत उघडा असलेला गण्या, स्वातंत्र्य दिनाचा विजयसो... जोषात घोषणा देत होता...
... तेव्हापासून दर वर्षी, 15 ऑगस्टला मला गण्याची आठवण येते.
नंतर गण्यानं शाळा सोडली.
त्याचा बाप दारूत बुडून मेला.
गण्या पानाच्या गादीवर बसू लागला
राधा, त्याची आई, धुणीभांडी करतच होती.
पुढे गण्यालाही दारूचं व्यसन लागलं.
मी कधी गावाला गेलो, की मुद्दाम गण्याच्या गादीवर जायचो. पण गण्या बोलत नसे. तोंडाला वास यायचा म्हणून!
नंतर कधीतरी कळलं, गण्या गेला.
दारू पिऊन पिऊन, खंगून मेला...
मला मात्र, दर वर्शी तो आठवतो.
अगदी शोजारी असल्यासारखा!
आम्ही शाळेत असताना एक गोणपाटाची बैठक शेअर करायचो ना!...

Sunday, June 15, 2014

मधुमालतीचा मांडव...

 
गेल्या महिन्यात आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचं पहिलं स्नेहसंमेलन झालं. 94 वर्षांचे गोपाळ केतकर मुद्दाम संमेलनाला हजर राहिले होते. म्हणजे, जवळपास सगळ्या माजी तुकड्यांचे प्रतिनिधी. सातआठशे जणांच्या, वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तुंग नाव कमावलेल्या या संमेलनात मी मुख्य वक्ता होतो.
सहाजिकच, शैक्षणिक दर्जातील कालांतर असा विषय डोळ्यासमोर ठेवून मी बोलत गेलो.
त्यासाठी फार नोंदी कराव्या लागत नाहीत.
आपली विद्यार्थीदशा आणि पालकदशा यांचा आढावा घेताना हा विषय सहज मांडता येणार होता.
त्याच ओघात, एका क्षणी मला वडिलांची असह्य आठवण आली.
माझे वडील याच शाळेत शिक्षक होते. आम्ही भावंडं, विद्यार्थी असताना!
त्यांचा संस्कृत चा व्यासंग दांडगा होता. मराठी भाषेचं सौंदर्य तर त्यांच्या लेखणी आणि वाणीलाही, अलंकारासारखं लगडलेलं असायचं. इंग्रजीवर त्यांचं असामान्य प्रभुत्व होतं. ते तीनही विषय तेच आम्हाला शिकवत असत.
.... म्हणून, शाळेच्या कार्यक्रमात बोलताना, शिक्षक म्हणून त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा उल्लेख अपरिहार्यच होता.
पण, वडील आणि शिक्षक या दोन भूमिकांची त्यांनी कधीच गल्लत केली नव्हती.
त्या दिवशी, भाषण करेपर्यंत मला ते जाणवलं नव्हतं. त्या दिवशी सहज ते लक्षात आलं!
म्हणजे, शाळेत ते कधीही वडिलांसारखे वागले नाहीत, आणि घरात ते कधीही शिक्षकासारखे वावरले नाहीत... तरीही, त्यांची ही दोन वेगळी रूपं आहेत, हे कधीही जाणवलं नव्हतं. परवा सहज बोलताना ते जाणवून गेलं, आणि क्षणभर मी गदगदलो.
बहुधा त्या क्षणाचे सावट समोरही दाटलं असावं!
... नंतरही बरेच दिवस वडिलांच्या आठवणींनी मी बेचैन होतो. सतत भूतकाळ धुंडाळत होतो, आणि आठवणींचे कप्पे विस्कटून पाहात होतो.
ते उत्तम गायचे.
शास्त्रीय संगीताचं फारसं शिक्षण नव्हतं, तरी कान आणि गळा कसलेला होता.
... त्या वेळी आमच्याकडे एक आरामखुर्ची होती. लोखंडी! झुलणारी!
संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर चहा वगैरे घेऊन, आरामखुर्ची घेऊन ते समोरच्या अंगणातल्या मधुमालतीच्या लालपांढऱ्या गुच्छांनी मढलेल्या मांडवाखाली बसायचे, आणि एक गुणगुणती लकेर मांडवाखाली घुमायची...
पाठोपाठ, मराठी नाट्यगीतांच्या लगडी उलगडत जायच्या... मला त्या वेळीची त्यांची तल्लीनता आजही डोळ्यासमोर स्पष्ट दिसतेय. आरामखुर्चीत रेलून, मान आणखी उजवीकडे वळवून, कपाऴावरून उजवीकडे घेतलेल्या डाव्या हाताची बोटं, खुर्चीच्या लोखंडी दांडीवर हलका ठेका धरायची...
हळुहळू बाहेर अंधारू लागायचं,आणि,
धीर धरी धीर धरी... ची शेवटची ओळ संपवून ते उठायचे.
बाहेरच्या रस्त्याकडेला कधीपासून आडव्या पडलेल्या फणसाच्या ओंडक्यावर बसलेली चारपाच माणसंही, उठून घरोघरी जायची...
त्यांच्या सुराला विलक्षण धार होती. पण गातानाची वेगळी, आणि आम्हाला समोर उभे केलेलं असतानाची वेगळी...
एखाद्या गाण्यातील टिपेची तान मृदु असायची, तर कधी संतापाच्या भरात आम्हाला म्हटलेल्या, भोसडीच्यांनो चा टिपेचा स्वर थरकापून टाकायचा...
पण दिवस मावळायचा मात्र, मस्त गाण्यांनी.
म्हणून, मला आजही, संतापणारे, रागाच्या भरात अस्सल कोल्हापुरी शिव्या देणारे वडील नाही आठवत.
संध्याकाळी मधुमालतीच्या मांडवाखाली नाट्यगीतांच्या लगडी उलगडणारे वडील मात्र, लख्ख आठवतात...
दहा वर्षांपूवी ते गेले. असंच, पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं आणि ते उठलेच नाहीत.
त्यांच्या अखेरच्या दिवशी, सकाळपासून ते ग्लानीतच होते. मी, माझा भाऊ, आई, माझी बायको आणि मुलीही आसपासच होतो.
त्याही स्थितीत ते काहीतरी बोलत होते. शब्द जड झाले होते, पण काहीतरी सांगत होते. मोठ्या प्रयत्नांनंतर कळलेले त्यांचे अखेरचे शब्दही मला सतत आठवत राहतात.
आपलं चुकलं, तर लहानापुढेही माफी मागावी!...
रात्री त्यांचा ताप पाहण्यासाठी मी त्यांच्या छातीवर हात ठेवला, आणि त्यांनी तो घट्ट पकडला.
तो कोमट स्पर्श, काही वेळ तसाच अनुभवत मी स्तब्ध होतो.
काही वेळानं ती पकड सैल झाली!!
आज मी मुद्दाम ते गाणं ऐकलं... खूप वर्षांनी!
.... धीर धरी, धीर धरी, जागृत गिरिधारी... भाविकास तारितसे तोच चक्रधारी!
मधुमालतीचा तो मांडव, आठवणीत पुन्हा टवटवीत होऊन बहरला!!


Saturday, June 14, 2014

त्या चंद्रभारल्या रात्री ...

  
आठवतंय ना तुला,
त्या चंद्रभारल्या रात्री
काठावरल्या चांदणशिंपणात
चिंब ओथंबलेला
तुझा कृष्ण कुंतलभार
निळ्या तळव्यावर सावरताना,
चांदण्याची कशी सैरभैर
घालमेल सुरू होती?
... थकलेला चंद्र ढगाआड दडला
आणि अंधाऱ्या रात्रीचे
उदासवाणे उसासे झेलताना
निष्पर्ण झाडांची वठलेली खोडं
वेडीपिशी होऊन जडावली...
आठवतंय ना तुला,
त्या चांदण्या रात्री
तळ्याकाठचा कोवळा रोमांच
लेऊन तू घरी परतलीस
आणि शिणलेल्या पापण्या
जडशीळ होऊन तुझ्या
गालावर विसावू लागल्या ,
अंगावरच्या सूर्याच्या तप्तकिरणांचा
स्वप्नाळ आभास अचानक
कसा लावून गेला पिसे...

Wednesday, April 23, 2014

हायकू


दूर डोंगराच्या माथी 
आले उतरू आभाळ 
... झाडावर पानगळ

दूर क्षितिजरेषेला 
फुटे प्रकाशाचा पंख 
.... मनावर काळा डंख

निळ्याशार तळ्याकाठी
गूज प्रेमाचे वाजते
चैत्रचांदणी लाजते...

झुंजूमुंजू पहाटेला
किरणाचा सूर्यरंग
... ओथंबले ओले अंग

प्रासंगिका...

 


1- 

माझे मला कळेना
मी काय पुण्य केले
नशिबात आज माझ्या
हे शब्दभोग आले

खोलात मी कशाच्या
मज तोलवीत नाही
व्याजात खोट आहे
मुदलास भीत नाही!

------------------
2-
आनंदाच्या खांद्यावर 
डोकं ठेवून मी 
समाधानानं डोळे मिटले 
.... अन दु:खाला वाचा फुटली!!

------------------
3-

हे शब्द असे 
ओघळले... 
कधी गळले 
मज ना कळले!!
-------------------
4-
पाहून त्या कवीला
कविताच लुब्ध झाली
अन शब्द शोधताना
प्रतिभाच स्तब्ध झाली
--------------------------------
5-
मद्याच्या प्याल्यामध्ये 
मिसळावी कविता थोडी... 
अन धुंद मैफिलीची 
चाखावी न्यारी गोडी...
-------------------------
6-
घेऊनिया शब्द 
उसने उधार 
काढुनिया धार 
काव्यात कोंबतो... 
शब्दाशी झोंबतो... 
शोधतो आरपार 
मनावर भार 
उगी माझ्या!!
------------------------
7-
समजेना मजला काही 
ते शब्द हरवले कोठे... 
आता तर मिनिटाआधी 
पेनाला लटकत होते!!
-----------------------
8-
सूर्याच्या बेंबीतून निथळणाऱ्या 
पाण्याच्या थेंबावर पोसलेल्या 
कवितेचे चार चतकोर तुकडे जोडून 
मी बनविला आख्खा चंद्र पौर्णिमेचा !!
-----------------------------
9-
एका हिरव्या गाण्याच्या गांडीला 
सकाळी सकाळी सुटली खाज..
लोटा घेऊन पळत सुटले 
शुष्क झाडाच्या आडोशाला बसले...
खाज काही शमेना 
सावलीत मन रमेना 
लोटा होता गळका 
कावळ्याला आला पुळका 
फांदीवरून बघताना 
त्यानं फेकला एक दगड 
ओरडून म्हणाला,
हा घे गांड रगड!!
दगडाला होती चांगली धार
गांडीची साले गेली फार
घरी जाऊन लावले मलम
हिरवे गाणे पडले नरम!!

गेयतेच्या बैलाला ढोल!!
-----------------------------------

माझ्या मना...

माझ्या मना हास जरा 
कालच्यापेक्षा आज बरा 
हाही दिवस संपून जाईल 
नवा उद्या घेऊन येईल 
आठवणींचे डोस कडू 
गिळत कुढत नको रडू 
नवा दिवस साजरा कर 
आयुष्यात आनंद भर 
डोळे उघड पहा नीट 
झटकून टाक सगळा वीट 
पुसून टाक रात्रीचे भास
मोकळा कर दबलेला श्वास
कानावरचे काढ हात
आतल्या सुराला दे साथ
आतला आवाज हाच खरा
माझ्या मना हास जरा
ऐक आता गाणीच गाणी
गालावरचे पूस पाणी
अन्यायाची सारी भुते
जातील पळून कुठल्या कुठे
नवी वेळ अशी येईल
खतातून सोने होईल
या उद्याचा विचार करा
माझ्या मना हास जरा.