Wednesday, December 11, 2013

गुजरा हुआ जमाना...

'गुजर म्हणजे तुमची जात कोणती?... ' ऐशीच्या घरातल्या आप्पांनी मला विचारलं आणि मी गांगरलो.. गुजर आडनावाची जात कोणती असते मला खरंच माहीत नव्हतं. 'नाही... म्हणजे आमची जातच गुजर '... मी ठोकून दिलं. आप्पा दोन पावलं मागं सरकले! 'मग उद्यापासून तुमचं जेवणाचं पान तिकडे'... मागीलदारी बोट दाखवत आप्पा म्हणाले आणि मी चरफडत मान हलवली.. माझ्या बरोबरचा चंदू मान खाली घालून फिदीफीदी हसत होता. त्यानं जोग आडनाव घेतलं होतं, म्हणून तो आप्पांच्या पंगतीला असायचा. अशात महिनाभर गेला. मी जेवण झाल्यावर केऴीचं पान गोठ्यात नेऊन म्हशीला घालायचो आणि जेवल्या जागेवर शेण फिरवून लांब, पडवीत बसायचो... गायीला ते उष्टं पान द्यायचं नाही, असा बहुधा त्यांचा सूर असावा... जेवण झाल्यावर चंदू मात्र, आप्पांच्या शेजारी झोपाळ्यावर बसून पानसुपारी खात असायचा.. आडनावावरनं जात ओळखता येत नाही म्हणून मी चरफडत पडवीच्या कोपर्यात बसायचो. गुजर आडनाव घेऊन वावरायची कुठली दुर्बुद्धी झाली म्हणून स्वत:वरच चिडायचो. पण त्या माणसाच्या मनात माया आणि ह्रदयात राष्ट्रनिष्ठेचा विचार मात्र ठासून भरलेला होता... म्हणूनच, त्या परिस्थितीचा राग आलाच नाही... जुने विचार आहेत, असतात एखाद्याचे... गावातल्या लोकांची त्यांच्याकडे वर्दळ असायची... कुणीही गरजेला आप्पांकडे आला आणि रिकाम्या हातानं परतला असं आम्हाला कधीच जाणवलं नाही... आणि आपण इथं आहोत हे पोलिसांना कळेल अशी भीतीही वाटली नाही. ...कारण आप्पांनी तसा शब्द दिला होता! .... ते आणीबाणीचे दिवस होते. मिसाचं वॉरंट आणि पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी मी माझ्या एका सहकाऱ्यासोबत नामांतर आणि वेषांतर करून भूमिगत झालो होतो. कोकणातल्या एका दुर्गम खेड्यात, कर्मठ व़त्तीच्या आप्पा आंबेकरांनी त्यांच्या घरातली एक खोली आम्हाला दिली होती. दिवसभर या खोलीत कोडून घेऊन आम्ही आणीबाणीविरोधातली जहाल पत्रकं सायक्लोस्टाईल करायचो. मी जहाल भाषेत मजकूर लिहायचो, स्टेन्सिलवर उतरवायचो, आणि चंदू जोशी -म्हणजे जोग - त्याच्या प्रती काढायचा. मग त्याचे गठ्ठे बांधून, गावाची नावं टाकून अंधार पडल्यावर आम्ही दोघं बाहेर पडायचो लांबवरच्या गावात गोवा हायवेवर एस्टी थांबली की हळूच कंडक्टरच्या सीटवर तो गट्ठा ठेवून सटकायचो. दुसऱ्या दिवशी अनेक गावांमध्ये खळबळ उडालेली असायची... (क्रमश:)

Saturday, December 7, 2013

फोकनाड !!

फोकनाड! एका सायंदैनिकात मंत्रालयातील पब्लिसिटी खात्याचा एक अधिकारी पार्टटाईम बातमीदारी करायचा. एकदा तो एक फालतू बातमी घेऊन आला. साहेबाच्या हातात त्याने तो कागद दिला. साहेबांचा नजर हातातल्या कागदावरच्या बातमीवरून फिरत होती आणि हा समोर बसून साहेबाच्या चेहर्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियेचा अंदाज घेत होता... साहेबानी बातमी वाचून संपवली. कागद बाजूला ठेवला... याला साहेबाच्या प्रतिक्रियेचा काहीच अंदाज येत नव्हता... शेवटी न राहवून त्याने विचारले, 'साहेब कशीय बातमी?'... 'एकदम फोकनाड'... हसतहसत साहेब म्हणाले. याला अर्थ कळला नाही, पण साहेब हसत होते, म्हणजे चांगली असणार असे समजून तो आनंदला. 'येतो साहेब.. थँक्यू!'... असं म्हणून तो बाहेर पडला. दोनतीन दिवस गेले. पुन्हा तो आला तेव्हा स्वतं:वरच जाम खुश दिसत होता... दरवाजातूनच हातातला बातमी लिहिलेला कागद उंचावत तो आनंदानं ओरडला, 'साहेब, आज आणखी एक 'फोकनाड' बातमी आणलीय!'...

वीकेन्ड !!

वीकेन्ड!! शनिवारचे काम संपवून ते ऑफिसबाहेर पडले आणि वीकेन्डचा प्लॆन सुरू झाला... स्टेशनकडे येतानाच वाटेत चर्चगेट रेस्टॉरंट होते. ती सगळ्यांची आवडती हक्काची जागा. एक किंगफिशर पिचर, तिथली स्पेशल चायनीज भेल मागवून गप्पांचा मस्त अड्डा जमवला, की अनेकांचा वीकेन्ड दणक्यात साजरा व्हायचा. अलीकडे ते रेस्टॉरंट दिसत नाहीये.. तर, त्या दिवशी रेस्टॉरंटसमोर येताच सगळ्यांचेच डोळे चमकले. 'इथेच बसूया मस्तपैकी... ' एकजण म्हणाला आणि मनातलं बोलल्याचं ओळखून लगेचच सगळ्यांचीच पावलं आत वळली. तो मात्र मागेच रेंगाळत होता! 'काय रे, काय झालं?' एकानं पाठीत धपाटा घालत त्याला विचारलं. 'नाही रे, आज लवकर घरी जायला पाहिजे... बायकोला कबूल केलंय सकाळीच,...' तो म्हणाला. 'काय प्लॆन? ' डोळे मिचकावत मित्रानं त्याला विचारलं, आणि हा उगीचच भेदरला.. 'अरे तसलं काहीच नाही रे, पण आज जमणार नाही. जायलाच हवं घरी! ' तो कसंबसं म्हणाला. आता मित्रानं त्याचा हात घट्ट पकडला होता. 'आम्हाला पटेल असं कारण सांगितल्याशिवाय जाता येणार नाही ' मित्रानं ठणकावलं. 'अरे खूप कपडे काढून ठेवलेत बायकोनं ' बोलावं की नाही असा विचार करत तो पुटपुटला आणि मित्र अक्षरश: 'फुटला '... 'ऐका रे, हा घरी जायचं म्हणतोय... आणि कारण काय, तर बायकोनं... ' आपलं बोलणं अर्धवट राहिल्यानं झालेला गोंधळ उमगून हा ओशाळून गेला. 'अरे, कपड्यांचा ढीग काढलाय... धुवायला... आणि तिला मदत करायला घरी लवकर येतो असं कबूल केलंय मी.. ' एका दमात तो बोलून गेला... आता सगळेच फिदीफिदी हसत होते. याला राग येऊ लागला होता... 'काय झालं, हसायला? ' यानं रागानं विचारलं. 'बायकोला कपडे धुवायला मदत करणार? ' एकानं फिसकन हसत विचारलं आणि हा भडकला! 'का?.. ती नाही मला भांडी घासायला मदत करत? ' त्यानं विचारलं, आणि तो स्टेशनकडे चालू लागला!