Tuesday, September 3, 2013

आपली माणसं...

आपली माणसं... ‘नहीं, मुझे बोलना नहीं आता.. हम इन्सान जिस भगवान की पूजा करते है, उसको कभी देखा नहीं. लेकिन आज मैंने भगवान को देखा है.. इन्सान के रूप में.. वो सामने है.. उसके सामने मैं क्या बोलू?.. बस, यही से मैं उसको प्रणाम करता हूँ’.. असे म्हणत गरीबुल्लाहने डोळे पुसले आणि बसल्या जागेवरूनच समोरच्या व्यासपीठावर बसलेल्यांकडे पाहत नमस्कार केला. नंतर काही मिनिटे तो केवळ स्तब्ध, स्तब्ध होता. शेजारी बसलेल्या आपल्या मुलाच्या पाठीवर त्याचा हात आसुसल्या मायेनं फिरत होता आणि पाणावलेली नजरसमोर, व्यासपीठाकडे लागली होती. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांचं भाषण सुरू होतं. ते तो एकाग्रतेनं ऐकत होता. मधेच मान हलवून दुजोरा देत होता.. मध्येच हाताचं एकच बोट हलवून वक्त्याच्या वाक्याशी सहमती दर्शवत होता..
मी गरीबुल्लाच्या त्या हालचाली पाहत बाजूच्याच खुर्चीत होतो. या कार्यक्रमात व्यासपीठावर जाऊन, माईक हातात धरून बोलायचं धाडस त्याला होत नव्हतं. पण त्याच्या मनात खूप काही साठून राहिलं होतं, आणि ते त्याला व्यक्तदेखील करायचं होतं. समोरच्या वक्त्याच्या वाक्यावाक्यातून आपलंच मन मोकळं होतंय, असं त्याला वाटत असावं, हे त्याच्या हालचालींवरून मला स्पष्ट जाणवत होतं. वक्त्याचं भाषण संपलं आणि गरीबुल्लाहनं माझ्याकडे बघितलं. तो रडक्या चेहऱ्यानंच कसंबसं हसत होता. पाणावलेले डोळे उलटय़ा मनगटानं पुसत त्यानं तोच ओला हात पांढऱ्या, अस्ताव्यस्त दाढीवरून फिरविला आणि त्यानं पुन्हा हात उंचावून नमस्कार केला.. शेजारी बसलेला त्याचा मुलगा, बापाच्या कुशीत शिरून बिलगला होता. त्यालाही हुंदके फुटत होते..
गरीबुल्लाह हा पन्नाशीच्या आसपासचा इसम.. पण कष्टानं रापल्यामुळे त्याचा चेहरा वयापेक्षा मोठा वाटत होता. उत्तर प्रदेशातल्या महू जिल्ह्यातल्या एका छोटय़ाशा गावात पाव, बिस्किटं विकून कुटुंब चालवणारा गरीब मुसलमान. आजवर क्वचितच मुंबईत पाऊल ठेवलेलं. तशी कधी गरजच नव्हती. पण मुंबईहून एक पत्र आलं आणि गरीबुल्लाहनं डोक्यावर टोपी चढवली, पिशवीत एक कुडता, लुंगी कोंबली आणि घरात साठवलेले पैसे खिशात कोंबून त्यानं मुंबई गाठली.. घरातून पळून गेलेला त्याचा पंधरा वर्षांचा मुलगा आज त्याला भेटणार होता आणि मुलाला घेऊन तो घरी परतणार होता. अशा अनेक मुलांना आपले घर आज परत मिळणार होते. मायेच्या माणसांच्या पुनर्भेटीचा सोहळा साजरा होत होता..
..गोरेगावच्या बांगूरनगरातील सभागृहात कार्यक्रम सुरू झाला, तेव्हा गरीबुल्लाह माझ्या शेजारीच बसला होता. त्याची नजर अस्वस्थ होती. खुर्चीत अस्वस्थपणे बसलेला गरीबुल्लाह सारखा मागे-पुढे पाहत होता. त्याचे डोळे भिरभिरत होते.
सभागृहाच्या प्रवेशद्वारातून वीस-पंचवीस गणवेशातील मुलं एका रांगेत, पुढे सरकू लागली आणि गरीबुल्लाह उतावीळ झाला.. प्रत्येक मुलाचा चेहरा निरखून पाहताना नकळत तो खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि नजर एका मुलावर स्थिरावताच गरीबुल्लाहचे डोळे वाहू लागले.. त्याला रडू आवरत नव्हते. खांद्यावरच्या एका रुमालानं त्यानं डोळे टिपले, आणि रडतच त्यानं माझ्याकडे पाहत माझा हात हातात घेतला.. त्याची-माझी आधी साधी ओळखही नव्हती. खरं म्हणजे, मी त्या कार्यक्रमासाठी हजर असलेला एक साधा प्रेक्षक होतो. पण गरीबुल्लाहच्या भावना न्याहाळतानाच माझा त्रयस्थपणा संपला. मी त्याच्या हातावर थोपटलं आणि आसपास बघितलं.. मागच्याच खुच्र्याच्या रांगेतही, भावनांचा बांध फुटला होता. कुणा मुलाची आई, मामा, वडील, काका.. सगळेच डोळे वाहू लागले होते. व्यासपीठावर कार्यक्रम सुरूच होता.
व्यसनी बापाचा जाच, गरिबी, मुंबईची भुरळ, आईबापांच्या रागाची धास्ती, शिक्षणाचा कंटाळा आणि कधी त्याहूनही क्षुल्लक कारणावरून घरातून पळालेली मुलं आपल्या गावाकडच्या रेल्वे स्टेशनावर समोर दिसेल ती ट्रेन पकडतात आणि भटकत, भरकटत मुंबईत येतात. छत्रपती शिवाजी टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, दादर, कुर्ला अशा कुठल्या तरी स्टेशनवर गाडी थांबली, की ही मुलं मुंबईत पहिलं पाऊल ठेवतात आणि तेव्हापासून त्यांचं जगणं दिशाहीन होऊन जातं. भूक लागली की पोटासाठी कधी चोरी करायची, पकडला गेला की मार खायचा, कधी काहीच हाती लागलं नाही, तर नशापाणी करून फलाटाच्या कोपऱ्यात अंग मुडपून झोपून जायचं, नाहीतर मध्यरात्रीच्या वेळी रस्त्यावरच्याच कुणाची तरी वखवख शमविण्यासाठी निमूटपणे सोसायचं..
मुंबईत दररोज अशी सरासरी २०० मुलं गावाकडून भरकटून दाखल होतात. नशीब चांगलं नसेल, तर तेच त्यांचं आयुष्य बनतं, आणि रेल्वे स्टेशन हेच घर बनतं. अशा टोळ्या तयार होतात आणि माणुसकीपासून दुरावलेली ही मुलं समाजाचा शत्रू बनून समाजाचा तिरस्कारही करू लागतात.. शिस्तीच्या आणि घडय़ाळ्याच्या काटय़ानं बांधलेल्या मुंबईकराच्या आयुष्याशी या मुलांचं कोणतंच नातं नसतं. जगण्यासाठीच्या त्यांच्या संघर्षांला सुसंस्कृत समाजानं दिलेलं ‘गुन्हेगारी’ हे नावही या मुलांना मान्यच नव्हे, माहीतही नसतं. त्यांच्यासाठी तेच जगणं असतं..
अशी अनेक मुलं समाजापासून दुरावताना दिसल्यानं, विजय जाधव नावाच्या तरुणानं त्यांना दिशा देण्यासाठी चळवळ सुरू केली. समता, ममता, तोहफा आणि लगाव-प्रेम.. अशी चतु:सूत्री डोळ्यांसमोर ठेवून ‘समतोल’ नावाची संस्था स्थापन केली आणि भरकटलेल्या अशा मुलांचं आयुष्य पुन्हा त्यांच्या मूळ रुळांवर आणण्याचं काम सुरू केलं. आजवर अशी तीन हजारांहून अधिक मुलं ‘समोतल’मुळे पुन्हा आपल्या आईबापांच्या छत्राखाली दाखल झालीत.
..गोरेगावच्या त्या कार्यक्रमातदेखील, अशाच मुलांना आपले आईबाप, दुरावलेली कुटुंबं पुन्हा भेटणार होती. घरच्यांवर रागावून घराबाहेर पडलेली ती मुलं, समतोलच्या शिबिरातील दीड महिन्यांच्या ‘मनपरिवर्तन’ संस्कारामुळे घराच्या ओढीनं आतुरली होती.
सगळी मुलं समोर बसली आणि तो ‘पाणावलेला सोहळा’ सुरू झाला.
इतका वेळ केवळ भिरभिरत आपल्या मुलांना शोधणाऱ्या आया, मामा, बापांचे डोळे वाहत होते, मुलं समोर बसली तेव्हा त्यांचीही तीच अवस्था झाली.
त्यांच्या नजरा भिरभिरत गर्दीतली ‘आपली माणसं’ शोधू लागल्या आणि नजरानजर होताच भावनांचे बांध फुटले..
मग एकेका मुलाचं नावं उच्चारलं जाऊ लागलं आणि त्याला पुन्हा आपल्या घरी न्यायला आलेल्या आईबापांचा तो विरहानंतरचा पुनर्भेट सोहळा व्यासपीठावरच सुरू झाला. त्या क्षणी सभागृह भारावून गेलं.
टाळ्यांचा कडकडाट आणि डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा, विरह संपल्याच्या समाधानाचं हासू आणि विरहाच्या आठवणींनी दाटलेले आसू असं संपूर्ण संमिश्रण सभागृहात दाटलं..
प्रमुख वक्त्यांनाही बोलताना भावना अनावर झाल्या..
गरीबुल्लाहनं व्यासपीठावर जाऊन आपल्या तेरा-चौदा वर्षांच्या मुलाला मिठी घातली, विजय जाधवच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि मुलाला कुरवाळत, पाणावलेल्या डोळ्यांनिशी तो पुन्हा माझ्या शेजारच्या त्याच्या खुर्चीत बसला.
आता त्याच्याबरोबर त्याचा मुलगाही रडत होता.
मग, मुलांच्या पालकांपैकी कुणीतरी बोलावं, असं कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी सुचवलं, पण कुणीच उठलं नाही.
मी गरीबुल्लाहला खुणेनंच ‘बोला’, असं सांगितलं. पण त्यानं मान हलवून नकार दिला.
आणि व्यासपीठावर जाऊन बोलण्याऐवजी, माझ्या कानाशी तो बोलू लागला. मीही त्याच्या अगदी तोंडाजवळ कान नेला आणि गरीबुल्लाहला जे व्यासपीठावर बोलता येणार नव्हतं, ते त्यानं माझ्या कानाशी मोकळं केलं.
तो थांबला आणि मी मान मागे घेतली, तेव्हा गरीबुल्लाहच्या डोळ्यांतून टपकलेल्या पाण्यानं माझा शर्ट खांद्यावर भिजला होता..

No comments: