Friday, September 13, 2013

बिझिनेसचे बाळकडू...

बिझिनेसचे बाळकडू... उपनगरी गाडीतला तास-दीड तासाचा प्रवास म्हणजे, लोकशिक्षणाचे अगदी एकमेव उत्तम साधन आहे, असं माझं ठाम मत आहे. पण, शिक्षण घ्यायचं ठरवलं, तर अभ्यास करावा लागतो. इथेही, अभ्यासाच्या तयारीनं उतरायचं ठरवलं, तर किती वेगळ्या प्रकाराचं शिक्षण मिळतं, हे मला पटलंय. अजकाल, शाळाबाह्य शिक्षणाची खूप चर्चा होत असते. शाळाबाह्य शिक्षण म्हणजे, चार भिंतींच्या बाहेरचं शिक्षण. समाजात वावरण्याचं, जगण्याचं आणि खऱ्या अर्थानं यशस्वी होण्याचं शिक्षण... ते अनुभवातून, व्यवहारातूनच मिळतं. म्हणजे, एखादा अर्धशिक्षित, जेमतेम सहीपुरती अक्षरओळख आणि आकडेमोड करू शकणारा भाजीवाला, सदतीस रुपये किलोवाल्या भाजीचे साडेचारशे ग्रॅमचे पैसे जितक्या पटकन सांगेल, आणि जो हिशेब करण्यासाठी आपल्याला कॅलक्युलेटर घ्यावा लागेल, ते शिक्षण... तर, प्रवास हे अशा व्यावहारिक शिक्षणाचं सर्वात सुदृढ साधन असतं. या प्रवासात भेटणारी वेगवेगळी माणसं, त्यांच्यासोबत होणाऱ्या गप्पा, चर्चा यांतूनही आपली माहिती भक्कम होत असते. पण, शेजारी बसलेल्या, आपली तोंडओळखदेखील नसलेल्या प्रवाशांच्या गप्पा नुसत्या एकल्या, तरीही आपल्या माहितीत चांगली भर पडते. कित्येकदा, अशा गप्पांमधून मिळालेली माहिती, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ठळक बातमी म्हणून वाचायला मिळते... तर, कान आणि डोळे उघडे ठेवले, तर असह्य गर्दीतला प्रवासही सुखाचा होतो, असा अनेकांचा अनुभव असतोच... म्हणून, मीदेखील अगदी लहानशा प्रवासातही, कान आणि डोळे उघडे ठेवायचा प्रयत्न करतो. कानाला इयरफोन लावून तेच तेच, स्टोअर केलेले काहीतरी एकण्याएवजी, तो बाजूला ठेवला तर प्रत्येक वेळी नवे काहीतरी एकायला मिळते, म्हणून... त्या दिवशीही मी गाडी फलाटावर थांबायच्या आधीच गाडी पकडली. सवयीनं. मग बसायला खिडकीची सीटही मिळाली. कधीकधी, नुसती खिडकीची सीट मिळण्यात मजा नसते. ती हवी तशी असली की प्रवासाला मजा येते. म्हणजे, अगदी टेकून बसल्यानंतरही सहजपणे बाहेर पाहाता येईल अशी खडकी... तर त्या दिवशी अगदी तशीच सीट मिळाली, आणि मी रेलून बसलो. पुढची दोनतीन स्टेशनं गेल्यावर गाडी पुरती भरली होती. माझ्या शेजारीच दोघंजण माझ्यासारखेच, पळती गाडी पकडून चढलेले, बसले होते. एखादा धान्याचा डबा भरल्यानंतर तो गदागदा हलवून पुरेपूर, व्यवस्थित बसवावा, तसं झालं आणि त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या... मग माझे कान तिकडे लागले. वाईट खोड की चांगली सवय, मला माहीत नाही! एक मध्यम वयाचा माणूस, आणि एक, पोरगेलासा, कॉलेजात जाणारा, नुकती मिसरूड उमटूउमटू लागलेला मुलगा. बहुतेक तो त्या माणसाचा मुलगा असावा. चेहेरेपट्टी बरीचशी मिळतीजुळती. आणि, बहुधा ते गुजराती असावेत. कारण, त्यांच्यात ‘बिझीनेस’च्या ‘वार्ता’ चालल्या होत्या. बहुतेक तो माणूस भडकमकर रोडवर कॉम्पुटर पार्टसचं दुकान थाटून स्थिरावलेला असणार... बोलताबोलता तो बॅगेतले कसलेकसले हार्डवेअर कॉम्पोनन्टस काढून शर्टाच्या बाहीला पुसून साफसूफ करत होता. एकीकडे त्यांच्या गप्पा सुरू होत्याच. माझे कान कुतूहलानं त्यात खुपसले गेलेच... विषय, मुलानं बिझीनेस कोणता करावा, हा होता. आणि त्यांच्या संभाषणातही, सेचुरेसन, केस, बेन्क असे शब्द येत होते. म्हणजे, ते गुजराती होते. लोकल ट्रेनमध्ये आजकाल गप्पांचे आवाज कमी वेळा घुमतात. पाऊल ठेवण्यापुरती जागा मिळाली, की पाठीवरची सॅक रॅकवर अडकवून प्रत्येकजण खिशातला इयरफोन काढून कानाला लावतो, आणि गाणीबिणी एकत, मोबाईलवर चॅट सुरू करतो. मूक संवाद... जिथे गप्पांना आवाजही नसतो. अशा गप्पा मारणाऱ्यांना न्याहाळणं, हा एक मस्त टाईमपास असतो. त्यांच्या चेहऱ्यांवर उमटणारे भाव पाहूनच, ते कुणाशी चॅट करत असावेत, याचा अंदाज येतो. पहिली गोष्ट म्हणजे, ते आईवडिलांशी किंवा भावंडांशी नक्कीच बोलत नसतात... पण समोर बसलेले ते दोघं, थेट परस्परांशी गप्पा मारत होते. मुलगा आणि वडील. मस्त, खेळीमेळीत. ते दुर्मिळ दृश्य असल्यामुळेच, माझे डोळे आणि कानही, तिकडे, साहजिकच लागले. तर, `कोम्पुटर'च्या धंद्यात आता `सेचुरेसन’ झाल्यानं, मुलानं दुसरा काहीतरी बिझिनेस करावा, असं त्या पित्याचं म्हणणं होतं... आणि त्या दुसऱ्या धंद्यावर विचार सुरू होता . त्याचं शिक्षण आणि त्यांच्या विचारविनिमयातून पुढे येणारे पर्याय यांचा एकमेकांशी संबंध नाही, हेही लगेच लक्षात येत होते. ‘तू काँडोमकी दुकान खोल’... अचानक, चुटकी वाजवत बापानं मुलाला सुचवलं. ... मी चमकलो, आणि थेट त्यांच्यात डोळेही खुपसले... `लेकिन चलेगी?'... त्यानं गंभीरपणे विचारलं... म्हणजे, हा पर्याय विचार करण्यासारखा आहे, हे त्याला पटलं असावं, हे त्याच्या सुरावरून जाणवत होतं. ‘क्यू नही?... बंबईमे इतने सारे लोग है... सबको यूस तो करना पडता है’... बापानं ‘लोजिक’ सांगितलं... ‘सब तरहके, सब ब्रांडके कोंडोम बेचनेका... अलग अलह प्राईसका... हरेकको परवडना चाहिये’.. तो पुढे विस्तारानं `टिप्स' देऊ लागला... `लेकिन'... मुलगा मात्र, अजून संभ्रमात दिसत होता... मध्येच त्यानं माझ्याकडे पाहिलं. त्या बापाची आयडिया मला एकदम पसंत पडलीच होती... `पापा, ऐसा करे?... साथमें ‘पिल्स’भी बेंचे?'... पोरगा बापाच्या पुढे जाऊन कल्पनाशक्ती लढवू लागला होता.. आता बापाचे डोळे चमकले. त्यानं मुलाच्या पाठीवर चक्क जोरदार थाप मारली होती... बिझिनेसच्या गप्पांपुढे, ते दोघं बाप-मुलाचं नातं विसरून गेले, आणि त्यांचं ‘बिझिनेस प्लॆनिंग’ सुरू झालं... माझं स्टेशन आल्यावर मी उतरून गेलो... पण या गप्पा मात्र, कानात घुमत राहिल्या... ... आणखी दोनचार वर्षांत मुंबैत फक्त कॊंडॊमचं दुकान सुरू झालेलं असणार, अशी माझी खात्री झाली होती. ... सरकारी योजना, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे, या सर्वांनी प्रामाणिकपणे प्रसार केला, तर लोकसंख्येच्या विस्फोटाचे धोके समाजाने तोवर ओळखलेले असतील... ... म्हणजे, अशा दुकानाची गरज समाजालाच भासू लागलेली असेल. त्या बापाच्या ‘द्रष्टे’पणाचे मला कौतुक वाटले... बिझिनेसचे बाळकडू मिळवण्याचा जन्मसिद्ध हक्क त्यांनाच आहे, ह्याची मला खात्री पटली... ------------- लोकप्रभा, झीरो अवर, २० सप्टेंबर २०१३

No comments: