Wednesday, December 11, 2013

गुजरा हुआ जमाना...

'गुजर म्हणजे तुमची जात कोणती?... ' ऐशीच्या घरातल्या आप्पांनी मला विचारलं आणि मी गांगरलो.. गुजर आडनावाची जात कोणती असते मला खरंच माहीत नव्हतं. 'नाही... म्हणजे आमची जातच गुजर '... मी ठोकून दिलं. आप्पा दोन पावलं मागं सरकले! 'मग उद्यापासून तुमचं जेवणाचं पान तिकडे'... मागीलदारी बोट दाखवत आप्पा म्हणाले आणि मी चरफडत मान हलवली.. माझ्या बरोबरचा चंदू मान खाली घालून फिदीफीदी हसत होता. त्यानं जोग आडनाव घेतलं होतं, म्हणून तो आप्पांच्या पंगतीला असायचा. अशात महिनाभर गेला. मी जेवण झाल्यावर केऴीचं पान गोठ्यात नेऊन म्हशीला घालायचो आणि जेवल्या जागेवर शेण फिरवून लांब, पडवीत बसायचो... गायीला ते उष्टं पान द्यायचं नाही, असा बहुधा त्यांचा सूर असावा... जेवण झाल्यावर चंदू मात्र, आप्पांच्या शेजारी झोपाळ्यावर बसून पानसुपारी खात असायचा.. आडनावावरनं जात ओळखता येत नाही म्हणून मी चरफडत पडवीच्या कोपर्यात बसायचो. गुजर आडनाव घेऊन वावरायची कुठली दुर्बुद्धी झाली म्हणून स्वत:वरच चिडायचो. पण त्या माणसाच्या मनात माया आणि ह्रदयात राष्ट्रनिष्ठेचा विचार मात्र ठासून भरलेला होता... म्हणूनच, त्या परिस्थितीचा राग आलाच नाही... जुने विचार आहेत, असतात एखाद्याचे... गावातल्या लोकांची त्यांच्याकडे वर्दळ असायची... कुणीही गरजेला आप्पांकडे आला आणि रिकाम्या हातानं परतला असं आम्हाला कधीच जाणवलं नाही... आणि आपण इथं आहोत हे पोलिसांना कळेल अशी भीतीही वाटली नाही. ...कारण आप्पांनी तसा शब्द दिला होता! .... ते आणीबाणीचे दिवस होते. मिसाचं वॉरंट आणि पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी मी माझ्या एका सहकाऱ्यासोबत नामांतर आणि वेषांतर करून भूमिगत झालो होतो. कोकणातल्या एका दुर्गम खेड्यात, कर्मठ व़त्तीच्या आप्पा आंबेकरांनी त्यांच्या घरातली एक खोली आम्हाला दिली होती. दिवसभर या खोलीत कोडून घेऊन आम्ही आणीबाणीविरोधातली जहाल पत्रकं सायक्लोस्टाईल करायचो. मी जहाल भाषेत मजकूर लिहायचो, स्टेन्सिलवर उतरवायचो, आणि चंदू जोशी -म्हणजे जोग - त्याच्या प्रती काढायचा. मग त्याचे गठ्ठे बांधून, गावाची नावं टाकून अंधार पडल्यावर आम्ही दोघं बाहेर पडायचो लांबवरच्या गावात गोवा हायवेवर एस्टी थांबली की हळूच कंडक्टरच्या सीटवर तो गट्ठा ठेवून सटकायचो. दुसऱ्या दिवशी अनेक गावांमध्ये खळबळ उडालेली असायची... (क्रमश:)

Saturday, December 7, 2013

फोकनाड !!

फोकनाड! एका सायंदैनिकात मंत्रालयातील पब्लिसिटी खात्याचा एक अधिकारी पार्टटाईम बातमीदारी करायचा. एकदा तो एक फालतू बातमी घेऊन आला. साहेबाच्या हातात त्याने तो कागद दिला. साहेबांचा नजर हातातल्या कागदावरच्या बातमीवरून फिरत होती आणि हा समोर बसून साहेबाच्या चेहर्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियेचा अंदाज घेत होता... साहेबानी बातमी वाचून संपवली. कागद बाजूला ठेवला... याला साहेबाच्या प्रतिक्रियेचा काहीच अंदाज येत नव्हता... शेवटी न राहवून त्याने विचारले, 'साहेब कशीय बातमी?'... 'एकदम फोकनाड'... हसतहसत साहेब म्हणाले. याला अर्थ कळला नाही, पण साहेब हसत होते, म्हणजे चांगली असणार असे समजून तो आनंदला. 'येतो साहेब.. थँक्यू!'... असं म्हणून तो बाहेर पडला. दोनतीन दिवस गेले. पुन्हा तो आला तेव्हा स्वतं:वरच जाम खुश दिसत होता... दरवाजातूनच हातातला बातमी लिहिलेला कागद उंचावत तो आनंदानं ओरडला, 'साहेब, आज आणखी एक 'फोकनाड' बातमी आणलीय!'...

वीकेन्ड !!

वीकेन्ड!! शनिवारचे काम संपवून ते ऑफिसबाहेर पडले आणि वीकेन्डचा प्लॆन सुरू झाला... स्टेशनकडे येतानाच वाटेत चर्चगेट रेस्टॉरंट होते. ती सगळ्यांची आवडती हक्काची जागा. एक किंगफिशर पिचर, तिथली स्पेशल चायनीज भेल मागवून गप्पांचा मस्त अड्डा जमवला, की अनेकांचा वीकेन्ड दणक्यात साजरा व्हायचा. अलीकडे ते रेस्टॉरंट दिसत नाहीये.. तर, त्या दिवशी रेस्टॉरंटसमोर येताच सगळ्यांचेच डोळे चमकले. 'इथेच बसूया मस्तपैकी... ' एकजण म्हणाला आणि मनातलं बोलल्याचं ओळखून लगेचच सगळ्यांचीच पावलं आत वळली. तो मात्र मागेच रेंगाळत होता! 'काय रे, काय झालं?' एकानं पाठीत धपाटा घालत त्याला विचारलं. 'नाही रे, आज लवकर घरी जायला पाहिजे... बायकोला कबूल केलंय सकाळीच,...' तो म्हणाला. 'काय प्लॆन? ' डोळे मिचकावत मित्रानं त्याला विचारलं, आणि हा उगीचच भेदरला.. 'अरे तसलं काहीच नाही रे, पण आज जमणार नाही. जायलाच हवं घरी! ' तो कसंबसं म्हणाला. आता मित्रानं त्याचा हात घट्ट पकडला होता. 'आम्हाला पटेल असं कारण सांगितल्याशिवाय जाता येणार नाही ' मित्रानं ठणकावलं. 'अरे खूप कपडे काढून ठेवलेत बायकोनं ' बोलावं की नाही असा विचार करत तो पुटपुटला आणि मित्र अक्षरश: 'फुटला '... 'ऐका रे, हा घरी जायचं म्हणतोय... आणि कारण काय, तर बायकोनं... ' आपलं बोलणं अर्धवट राहिल्यानं झालेला गोंधळ उमगून हा ओशाळून गेला. 'अरे, कपड्यांचा ढीग काढलाय... धुवायला... आणि तिला मदत करायला घरी लवकर येतो असं कबूल केलंय मी.. ' एका दमात तो बोलून गेला... आता सगळेच फिदीफिदी हसत होते. याला राग येऊ लागला होता... 'काय झालं, हसायला? ' यानं रागानं विचारलं. 'बायकोला कपडे धुवायला मदत करणार? ' एकानं फिसकन हसत विचारलं आणि हा भडकला! 'का?.. ती नाही मला भांडी घासायला मदत करत? ' त्यानं विचारलं, आणि तो स्टेशनकडे चालू लागला!

Saturday, September 28, 2013

स्तब्ध शब्द...

`भाषा कधी मरत नाही... ती मारली जाते’... भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांचं हे वाक्य. खूप दिवस मनाच्या गाभ्यात घुमत राहील, असं... आजवर अनेक भाषा अशाच मारल्या गेल्या. काही अजूनही तरल्या आहेत. कारण भाषेचं मरण असं, अचानक होत नसतं. ते मरण पर्वतासारखं, हळूहळू असतं. आधी आजूबाजूचे दगडधोंडे अदृश्य होतात, मग माती दूर होऊ लागते.. असं दीर्घकाळ चालतं, आणि ते इतकं सवयीचं होऊन जातं, की डोळ्यादेखत एखादा पर्वत नष्ट झाला तरी ते लक्षातही येत नाही. हे झालं नैसर्गिक प्रक्रियेच्या बाबतीत! पण काही वेळा, कृत्रिमरीत्याही हे घडवलं जातं. डॉ. देवी यांचं भाषामरणाचं विश्लेषण वाचतानाही, पर्वताच्या मृत्यूपर्वाची कल्पना डोळ्यासमोर तरळू लागते. मुंबईच्या आसपास पर्वताच्या काही लहानमोठ्या रांगा बघितल्याचं अनेकांना आठवत असेल. त्यावर अनेकांनी आपल्या बालपणातलं एखादं पिकनिकदेखील केलं असेल. त्या वाटेवरून आज जाताना, सहज नजर त्या ठिकाणी गेली, तर काहीतरी चुकल्यासारखंही वाटतं. अशा काही रांगा, डोळ्यादेखत नष्ट झाल्यात... त्या डोंगरांतल्या जंगलात पूर्वी जंगली प्राणीही आढळायचे. वांद्र्याच्या कुठल्याश्या डोंगरावरची कोल्हेकुई म्हणे, संध्याकाळच्या नीरव वेळी खालच्या वस्तीत स्पष्ट ऐकू यायची. आता हे सारं काल्पनिक वाटतं, कारण ते सारं स्पष्ट अनुभवलेली एक डोंगराएवढी पिढीही आता त्या काळाआड गेलेल्या डोंगरांसारखीच होत चालली आहे... पवईच्या तलावात आपलं प्रतिबिंब पाहणाऱ्या डोंगररांगा अगदी कालपरवापर्यंत अनेकांना आठवत असतील... आता तिथून जातायेताना, कधीतरी त्यांची आठवण आली, की तिथल्या भरभराटी नागरीकरणाचं कौतुक करावं, की भुईसपाट झालेल्या त्या रांगांसाठी डोळ्याच्या कडा ओल्या करून घ्याव्यात, हेच समजत नाही... ... मग, पर्वताचा मृत्यूदेखील जिथे नैसर्गिक राहिलेला नाही, तिथे भाषांच्या आयुष्याचा भरवसा कोण देणार, असं उगीचच वाटत राहातं. ... दिल्लीत गेल्या १६ डिसेंबरला झालेल्या बलात्काराच्या निर्दयी घटनेनंतर देशात संतापाचा उद्रेक झाला. गेल्या पंधरवड्यात त्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली, तेव्हा, असे गुन्हे करण्याची आता कुणाची हिंमत होणार नाही अशी स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली. पण त्यानंतरही सामूहिक बलात्काराच्या बातम्या सुन्न करतच आहेत. असं जेव्हा होतं, तेव्हा या प्रकारांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त व्हायला, शब्द सापडत नाहीत. शब्द अपुरे पडतात... ... अशा वेळी भाषेच्या भविष्याची उगीचच चिंताही वाटू लागते. अशा घटनांचा आणि भाषेच्या भविष्याचा तसा काहीच संबंध नसला, तरी! व्यक्त व्हायला, शब्द शोधावे लागणं, हे भाषेच्या समृद्धीला ओहोटी लागण्यासारखंच आहे, असं वाटू लागतं... ... हा विचार मनात आला, तेव्हा मला एक जुना किस्सा आठवला. गावाकडच्या एका वकिलाचा. त्यांचं ऑफिस घरातच होतं. कोर्ट, चालत जायच्या अंतरावर... वकील सज्जन, आणि संस्कृतीची शिकवण पाळणारे. आपलं पाऊल कधी वेडंवाकडं पडू नये, याची काळजी घेणारे. त्यामुळे, आपल्या व्यवसायाचीही कधीकधी त्यांना चीड येतच असे. घराबाहेर पडून कोर्टात जाईपर्यंतचा रस्ता, आडव्यातिडव्या वळणावळणांचा... पण वकील महाशयांनी मात्र, आपल्या सोयीचा एक मार्ग निवडलेला. त्या रस्त्यावरचं कुठलंही डावीकडचं वळण घ्यायला लागू नये, म्हणून... फक्त, कोर्टाच्या प्रवेशद्वारातून आत शिरताना त्यांना डावीकडे वळावंच लागायचं. पण ते त्यांनी स्वतःहून स्वीकारलेलं होतं. या साऱ्यामागचं कारण, सरसकटपणे समजणारं नव्हतंच. जवळचा रस्ता सोडून, वेड्यावाकड्या रस्त्यानं ते कोर्टात का जातात, हे त्यांच्या अशीलांनाही कोडं असायचं. एकदा त्यांनी कुणाला तरी हे कारण सांगितलं. रस्त्यावरच्या कुठल्याही वळणावर, डावीकडे वळायची वेळ येऊ नये, म्हणून आपण हा रस्ता निवडला, असं ते म्हणाले. कारण, त्यांच्या डोक्यात, वाममार्गाची कल्पना घट्ट रुतलेली होती. वाममार्गाला जायचं नाही, असं त्यांनी पक्कं ठरवलं होतं. त्या निश्चयाची आठवण रहावी, म्हणून त्यांनी उजव्या वळणांचा रस्ता स्वीकारला होता... हे वास्तविक जगणं, आणि तसं करणं म्हणजे सदाचरी वागणं नव्हे, हे त्यांनाही माहीत होतं, पण यामुळे आपल्याला आपल्या विचारांशी नातं राखता येतं, अशी त्यांची समजूत होती. मग, कोर्टाच्या प्रवेशद्वारावरचं ते डावीकडचं वळण?... तेही त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलेलं होतं. कारण तो व्यवसाय त्या मार्गाशीच जुळणारा होता, तिथं डावंउजवं करावंच लागतं, असं त्यांचंच मत होतं. ... ही आठवण झाली, आणि मला तो शब्द छळू लागला. `वाममार्ग !’ आणि, अलीकडे अनेक वर्षांत हा शब्दच आपण कुठे वाचलेला, ऐकलेलाही नाही, असं जाणवू लागलं. कुठे गेला हा शब्द? अचानक गायब झाला, की त्या, नष्ट होणाऱ्या पर्वताशेजारच्या अगोदर गायब होणाऱ्या दगडधोंड्यांसारखा, नकळत अदृश्य झाला? अचानक समोर आलेल्या अशा एखाद्या, जुन्या शब्दाच्या आठवणीनं उगीचच बेचैनी येऊ लागते. खरं म्हणजे, चारदोन अक्षरं एकत्र येऊन तयार झालेला एखादा शब्द असतो. तो असला किंवा नसला, तरी आपल्या व्यवहारांचं काही फारसं अडत नसतं. वाममार्ग हा शब्द ज्या भाषेतच नसेल, ती भाषा बोलणारी माणसं सदाचारी नसतील असं थोडंच असतं? पण आपल्या भाषेशी नातं सांगणारा हा चार अक्षरी शब्द, केवळ भाषेपुरता नसतो, तर त्याचं नातं थेट जीवनशैलीशी जोडलं गेलेलं असतं. या शब्दाला जीवनशैलीचे संस्कार जोडलेले असतात. म्हणून हा शब्द अदृश्य झाल्याची खंत आणखीनच बेचैन करू लागते. खरं म्हणजे, असा एखादा शब्द नष्ट झालेला नसतो. त्याचा वापर मात्र खूपच कमी झालेला असतो. म्हणजे, त्या शब्दाला `स्थगिती’ दिली गेलेली असते?... की तो शब्दच स्वतःहून `स्तब्ध’ झालेला असतो?... असं जर होत असेल, एखादा शब्दच स्वतःहून भाषेच्या वापरातून स्तब्ध होत असेल, तर त्याचा परिणाम जीवनशैलीवर होऊ शकत असेल? असा शब्द स्तब्ध झाला असेल, तर वाममार्गाची संकल्पनादेखील विरत चालली असेल? असे विचार डोक्यात घोळू लागले, की शब्दांची गरज लक्षात येऊ लागते. आपल्या भावना व्यक्त करायला शब्द सापडत नाहीत, अशी अवस्था होते... शब्दांचं नातं जीवनशैलीशी असेल, तर असे शब्द जपलेच पाहिजेत...

Friday, September 13, 2013

बिझिनेसचे बाळकडू...

बिझिनेसचे बाळकडू... उपनगरी गाडीतला तास-दीड तासाचा प्रवास म्हणजे, लोकशिक्षणाचे अगदी एकमेव उत्तम साधन आहे, असं माझं ठाम मत आहे. पण, शिक्षण घ्यायचं ठरवलं, तर अभ्यास करावा लागतो. इथेही, अभ्यासाच्या तयारीनं उतरायचं ठरवलं, तर किती वेगळ्या प्रकाराचं शिक्षण मिळतं, हे मला पटलंय. अजकाल, शाळाबाह्य शिक्षणाची खूप चर्चा होत असते. शाळाबाह्य शिक्षण म्हणजे, चार भिंतींच्या बाहेरचं शिक्षण. समाजात वावरण्याचं, जगण्याचं आणि खऱ्या अर्थानं यशस्वी होण्याचं शिक्षण... ते अनुभवातून, व्यवहारातूनच मिळतं. म्हणजे, एखादा अर्धशिक्षित, जेमतेम सहीपुरती अक्षरओळख आणि आकडेमोड करू शकणारा भाजीवाला, सदतीस रुपये किलोवाल्या भाजीचे साडेचारशे ग्रॅमचे पैसे जितक्या पटकन सांगेल, आणि जो हिशेब करण्यासाठी आपल्याला कॅलक्युलेटर घ्यावा लागेल, ते शिक्षण... तर, प्रवास हे अशा व्यावहारिक शिक्षणाचं सर्वात सुदृढ साधन असतं. या प्रवासात भेटणारी वेगवेगळी माणसं, त्यांच्यासोबत होणाऱ्या गप्पा, चर्चा यांतूनही आपली माहिती भक्कम होत असते. पण, शेजारी बसलेल्या, आपली तोंडओळखदेखील नसलेल्या प्रवाशांच्या गप्पा नुसत्या एकल्या, तरीही आपल्या माहितीत चांगली भर पडते. कित्येकदा, अशा गप्पांमधून मिळालेली माहिती, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ठळक बातमी म्हणून वाचायला मिळते... तर, कान आणि डोळे उघडे ठेवले, तर असह्य गर्दीतला प्रवासही सुखाचा होतो, असा अनेकांचा अनुभव असतोच... म्हणून, मीदेखील अगदी लहानशा प्रवासातही, कान आणि डोळे उघडे ठेवायचा प्रयत्न करतो. कानाला इयरफोन लावून तेच तेच, स्टोअर केलेले काहीतरी एकण्याएवजी, तो बाजूला ठेवला तर प्रत्येक वेळी नवे काहीतरी एकायला मिळते, म्हणून... त्या दिवशीही मी गाडी फलाटावर थांबायच्या आधीच गाडी पकडली. सवयीनं. मग बसायला खिडकीची सीटही मिळाली. कधीकधी, नुसती खिडकीची सीट मिळण्यात मजा नसते. ती हवी तशी असली की प्रवासाला मजा येते. म्हणजे, अगदी टेकून बसल्यानंतरही सहजपणे बाहेर पाहाता येईल अशी खडकी... तर त्या दिवशी अगदी तशीच सीट मिळाली, आणि मी रेलून बसलो. पुढची दोनतीन स्टेशनं गेल्यावर गाडी पुरती भरली होती. माझ्या शेजारीच दोघंजण माझ्यासारखेच, पळती गाडी पकडून चढलेले, बसले होते. एखादा धान्याचा डबा भरल्यानंतर तो गदागदा हलवून पुरेपूर, व्यवस्थित बसवावा, तसं झालं आणि त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या... मग माझे कान तिकडे लागले. वाईट खोड की चांगली सवय, मला माहीत नाही! एक मध्यम वयाचा माणूस, आणि एक, पोरगेलासा, कॉलेजात जाणारा, नुकती मिसरूड उमटूउमटू लागलेला मुलगा. बहुतेक तो त्या माणसाचा मुलगा असावा. चेहेरेपट्टी बरीचशी मिळतीजुळती. आणि, बहुधा ते गुजराती असावेत. कारण, त्यांच्यात ‘बिझीनेस’च्या ‘वार्ता’ चालल्या होत्या. बहुतेक तो माणूस भडकमकर रोडवर कॉम्पुटर पार्टसचं दुकान थाटून स्थिरावलेला असणार... बोलताबोलता तो बॅगेतले कसलेकसले हार्डवेअर कॉम्पोनन्टस काढून शर्टाच्या बाहीला पुसून साफसूफ करत होता. एकीकडे त्यांच्या गप्पा सुरू होत्याच. माझे कान कुतूहलानं त्यात खुपसले गेलेच... विषय, मुलानं बिझीनेस कोणता करावा, हा होता. आणि त्यांच्या संभाषणातही, सेचुरेसन, केस, बेन्क असे शब्द येत होते. म्हणजे, ते गुजराती होते. लोकल ट्रेनमध्ये आजकाल गप्पांचे आवाज कमी वेळा घुमतात. पाऊल ठेवण्यापुरती जागा मिळाली, की पाठीवरची सॅक रॅकवर अडकवून प्रत्येकजण खिशातला इयरफोन काढून कानाला लावतो, आणि गाणीबिणी एकत, मोबाईलवर चॅट सुरू करतो. मूक संवाद... जिथे गप्पांना आवाजही नसतो. अशा गप्पा मारणाऱ्यांना न्याहाळणं, हा एक मस्त टाईमपास असतो. त्यांच्या चेहऱ्यांवर उमटणारे भाव पाहूनच, ते कुणाशी चॅट करत असावेत, याचा अंदाज येतो. पहिली गोष्ट म्हणजे, ते आईवडिलांशी किंवा भावंडांशी नक्कीच बोलत नसतात... पण समोर बसलेले ते दोघं, थेट परस्परांशी गप्पा मारत होते. मुलगा आणि वडील. मस्त, खेळीमेळीत. ते दुर्मिळ दृश्य असल्यामुळेच, माझे डोळे आणि कानही, तिकडे, साहजिकच लागले. तर, `कोम्पुटर'च्या धंद्यात आता `सेचुरेसन’ झाल्यानं, मुलानं दुसरा काहीतरी बिझिनेस करावा, असं त्या पित्याचं म्हणणं होतं... आणि त्या दुसऱ्या धंद्यावर विचार सुरू होता . त्याचं शिक्षण आणि त्यांच्या विचारविनिमयातून पुढे येणारे पर्याय यांचा एकमेकांशी संबंध नाही, हेही लगेच लक्षात येत होते. ‘तू काँडोमकी दुकान खोल’... अचानक, चुटकी वाजवत बापानं मुलाला सुचवलं. ... मी चमकलो, आणि थेट त्यांच्यात डोळेही खुपसले... `लेकिन चलेगी?'... त्यानं गंभीरपणे विचारलं... म्हणजे, हा पर्याय विचार करण्यासारखा आहे, हे त्याला पटलं असावं, हे त्याच्या सुरावरून जाणवत होतं. ‘क्यू नही?... बंबईमे इतने सारे लोग है... सबको यूस तो करना पडता है’... बापानं ‘लोजिक’ सांगितलं... ‘सब तरहके, सब ब्रांडके कोंडोम बेचनेका... अलग अलह प्राईसका... हरेकको परवडना चाहिये’.. तो पुढे विस्तारानं `टिप्स' देऊ लागला... `लेकिन'... मुलगा मात्र, अजून संभ्रमात दिसत होता... मध्येच त्यानं माझ्याकडे पाहिलं. त्या बापाची आयडिया मला एकदम पसंत पडलीच होती... `पापा, ऐसा करे?... साथमें ‘पिल्स’भी बेंचे?'... पोरगा बापाच्या पुढे जाऊन कल्पनाशक्ती लढवू लागला होता.. आता बापाचे डोळे चमकले. त्यानं मुलाच्या पाठीवर चक्क जोरदार थाप मारली होती... बिझिनेसच्या गप्पांपुढे, ते दोघं बाप-मुलाचं नातं विसरून गेले, आणि त्यांचं ‘बिझिनेस प्लॆनिंग’ सुरू झालं... माझं स्टेशन आल्यावर मी उतरून गेलो... पण या गप्पा मात्र, कानात घुमत राहिल्या... ... आणखी दोनचार वर्षांत मुंबैत फक्त कॊंडॊमचं दुकान सुरू झालेलं असणार, अशी माझी खात्री झाली होती. ... सरकारी योजना, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे, या सर्वांनी प्रामाणिकपणे प्रसार केला, तर लोकसंख्येच्या विस्फोटाचे धोके समाजाने तोवर ओळखलेले असतील... ... म्हणजे, अशा दुकानाची गरज समाजालाच भासू लागलेली असेल. त्या बापाच्या ‘द्रष्टे’पणाचे मला कौतुक वाटले... बिझिनेसचे बाळकडू मिळवण्याचा जन्मसिद्ध हक्क त्यांनाच आहे, ह्याची मला खात्री पटली... ------------- लोकप्रभा, झीरो अवर, २० सप्टेंबर २०१३

Tuesday, September 10, 2013

समाधान...

एखादं द़श्य आपण पाहतो, त्या वेळी त्यात वेगळं काही वाटत नाही, इतकं ते सहज असतं. काही क्षणांत ते मनावरून पुसलंही जातं. आज सकाळी असंच काहीतरी मला दिसलं. आत्ता खूप वेळानंतर ते पुन्हा आठवलं. म्हणजे, ते मनावरून पुसलं गेलं नव्हतं... प्रसंग अगदी साधा! म्युनिसिपालिटीची कचऱ्याची गाडी रस्त्यावर उभी होती. सगळा कचरा, घाण, दुर्गंध खचाखच भरलेली! ... आणि गाडीवरचा एक कर्मचारी, एक कपडा हातात घेऊन उतरला. बाजूच्या एका खड्ड्यातलं पाणी बऱ्यापैकी नितळ होतं. त्यात त्यानं तो कपडा भिजवला, घट्ट पिळला, आणि गाडीचा समोरचा भाग स्वच्छ पुसून काढला. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या एका वेलावर टवटवीत निळी फुलं फुलली होती. त्यानं ती सगळी तोडली आणि समोर काचेभोवती अडकवली. नंतर तो थोडा मागे गेला... दोन्ही बाजूंना मान थोडी तिरपी करून त्यानं गाडीकडे बघितलं... त्याच्या नजरेतलं समाधान स्पष्टपणे चमकत होतं. मिनिटभरानं गाडी निघून गेली. कचऱ्याचा नकोसा दुर्गंध मागे दरवळत होता! ... मागे एकदा पाहिलेलं आणखी एक द़श्य मला आठवलं. मळानं काळेकुट्ट झालेले फाटके कपडे घातलेल्या, अंगावर मळाचे थर साचलेल्या एका भिकाऱ्यानं, रस्त्याकडेला फूटपाथवर बसण्याआधी खांद्यावरच्या फाटक्या कापडानं झाडून जागा साफसूफ केली, तेव्हाही त्याच्या डोळ्यात असंच समाधान दिसलं होतं!... Like · · Promote ·

Tuesday, September 3, 2013

आपली माणसं...

आपली माणसं... ‘नहीं, मुझे बोलना नहीं आता.. हम इन्सान जिस भगवान की पूजा करते है, उसको कभी देखा नहीं. लेकिन आज मैंने भगवान को देखा है.. इन्सान के रूप में.. वो सामने है.. उसके सामने मैं क्या बोलू?.. बस, यही से मैं उसको प्रणाम करता हूँ’.. असे म्हणत गरीबुल्लाहने डोळे पुसले आणि बसल्या जागेवरूनच समोरच्या व्यासपीठावर बसलेल्यांकडे पाहत नमस्कार केला. नंतर काही मिनिटे तो केवळ स्तब्ध, स्तब्ध होता. शेजारी बसलेल्या आपल्या मुलाच्या पाठीवर त्याचा हात आसुसल्या मायेनं फिरत होता आणि पाणावलेली नजरसमोर, व्यासपीठाकडे लागली होती. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांचं भाषण सुरू होतं. ते तो एकाग्रतेनं ऐकत होता. मधेच मान हलवून दुजोरा देत होता.. मध्येच हाताचं एकच बोट हलवून वक्त्याच्या वाक्याशी सहमती दर्शवत होता..
मी गरीबुल्लाच्या त्या हालचाली पाहत बाजूच्याच खुर्चीत होतो. या कार्यक्रमात व्यासपीठावर जाऊन, माईक हातात धरून बोलायचं धाडस त्याला होत नव्हतं. पण त्याच्या मनात खूप काही साठून राहिलं होतं, आणि ते त्याला व्यक्तदेखील करायचं होतं. समोरच्या वक्त्याच्या वाक्यावाक्यातून आपलंच मन मोकळं होतंय, असं त्याला वाटत असावं, हे त्याच्या हालचालींवरून मला स्पष्ट जाणवत होतं. वक्त्याचं भाषण संपलं आणि गरीबुल्लाहनं माझ्याकडे बघितलं. तो रडक्या चेहऱ्यानंच कसंबसं हसत होता. पाणावलेले डोळे उलटय़ा मनगटानं पुसत त्यानं तोच ओला हात पांढऱ्या, अस्ताव्यस्त दाढीवरून फिरविला आणि त्यानं पुन्हा हात उंचावून नमस्कार केला.. शेजारी बसलेला त्याचा मुलगा, बापाच्या कुशीत शिरून बिलगला होता. त्यालाही हुंदके फुटत होते..
गरीबुल्लाह हा पन्नाशीच्या आसपासचा इसम.. पण कष्टानं रापल्यामुळे त्याचा चेहरा वयापेक्षा मोठा वाटत होता. उत्तर प्रदेशातल्या महू जिल्ह्यातल्या एका छोटय़ाशा गावात पाव, बिस्किटं विकून कुटुंब चालवणारा गरीब मुसलमान. आजवर क्वचितच मुंबईत पाऊल ठेवलेलं. तशी कधी गरजच नव्हती. पण मुंबईहून एक पत्र आलं आणि गरीबुल्लाहनं डोक्यावर टोपी चढवली, पिशवीत एक कुडता, लुंगी कोंबली आणि घरात साठवलेले पैसे खिशात कोंबून त्यानं मुंबई गाठली.. घरातून पळून गेलेला त्याचा पंधरा वर्षांचा मुलगा आज त्याला भेटणार होता आणि मुलाला घेऊन तो घरी परतणार होता. अशा अनेक मुलांना आपले घर आज परत मिळणार होते. मायेच्या माणसांच्या पुनर्भेटीचा सोहळा साजरा होत होता..
..गोरेगावच्या बांगूरनगरातील सभागृहात कार्यक्रम सुरू झाला, तेव्हा गरीबुल्लाह माझ्या शेजारीच बसला होता. त्याची नजर अस्वस्थ होती. खुर्चीत अस्वस्थपणे बसलेला गरीबुल्लाह सारखा मागे-पुढे पाहत होता. त्याचे डोळे भिरभिरत होते.
सभागृहाच्या प्रवेशद्वारातून वीस-पंचवीस गणवेशातील मुलं एका रांगेत, पुढे सरकू लागली आणि गरीबुल्लाह उतावीळ झाला.. प्रत्येक मुलाचा चेहरा निरखून पाहताना नकळत तो खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि नजर एका मुलावर स्थिरावताच गरीबुल्लाहचे डोळे वाहू लागले.. त्याला रडू आवरत नव्हते. खांद्यावरच्या एका रुमालानं त्यानं डोळे टिपले, आणि रडतच त्यानं माझ्याकडे पाहत माझा हात हातात घेतला.. त्याची-माझी आधी साधी ओळखही नव्हती. खरं म्हणजे, मी त्या कार्यक्रमासाठी हजर असलेला एक साधा प्रेक्षक होतो. पण गरीबुल्लाहच्या भावना न्याहाळतानाच माझा त्रयस्थपणा संपला. मी त्याच्या हातावर थोपटलं आणि आसपास बघितलं.. मागच्याच खुच्र्याच्या रांगेतही, भावनांचा बांध फुटला होता. कुणा मुलाची आई, मामा, वडील, काका.. सगळेच डोळे वाहू लागले होते. व्यासपीठावर कार्यक्रम सुरूच होता.
व्यसनी बापाचा जाच, गरिबी, मुंबईची भुरळ, आईबापांच्या रागाची धास्ती, शिक्षणाचा कंटाळा आणि कधी त्याहूनही क्षुल्लक कारणावरून घरातून पळालेली मुलं आपल्या गावाकडच्या रेल्वे स्टेशनावर समोर दिसेल ती ट्रेन पकडतात आणि भटकत, भरकटत मुंबईत येतात. छत्रपती शिवाजी टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, दादर, कुर्ला अशा कुठल्या तरी स्टेशनवर गाडी थांबली, की ही मुलं मुंबईत पहिलं पाऊल ठेवतात आणि तेव्हापासून त्यांचं जगणं दिशाहीन होऊन जातं. भूक लागली की पोटासाठी कधी चोरी करायची, पकडला गेला की मार खायचा, कधी काहीच हाती लागलं नाही, तर नशापाणी करून फलाटाच्या कोपऱ्यात अंग मुडपून झोपून जायचं, नाहीतर मध्यरात्रीच्या वेळी रस्त्यावरच्याच कुणाची तरी वखवख शमविण्यासाठी निमूटपणे सोसायचं..
मुंबईत दररोज अशी सरासरी २०० मुलं गावाकडून भरकटून दाखल होतात. नशीब चांगलं नसेल, तर तेच त्यांचं आयुष्य बनतं, आणि रेल्वे स्टेशन हेच घर बनतं. अशा टोळ्या तयार होतात आणि माणुसकीपासून दुरावलेली ही मुलं समाजाचा शत्रू बनून समाजाचा तिरस्कारही करू लागतात.. शिस्तीच्या आणि घडय़ाळ्याच्या काटय़ानं बांधलेल्या मुंबईकराच्या आयुष्याशी या मुलांचं कोणतंच नातं नसतं. जगण्यासाठीच्या त्यांच्या संघर्षांला सुसंस्कृत समाजानं दिलेलं ‘गुन्हेगारी’ हे नावही या मुलांना मान्यच नव्हे, माहीतही नसतं. त्यांच्यासाठी तेच जगणं असतं..
अशी अनेक मुलं समाजापासून दुरावताना दिसल्यानं, विजय जाधव नावाच्या तरुणानं त्यांना दिशा देण्यासाठी चळवळ सुरू केली. समता, ममता, तोहफा आणि लगाव-प्रेम.. अशी चतु:सूत्री डोळ्यांसमोर ठेवून ‘समतोल’ नावाची संस्था स्थापन केली आणि भरकटलेल्या अशा मुलांचं आयुष्य पुन्हा त्यांच्या मूळ रुळांवर आणण्याचं काम सुरू केलं. आजवर अशी तीन हजारांहून अधिक मुलं ‘समोतल’मुळे पुन्हा आपल्या आईबापांच्या छत्राखाली दाखल झालीत.
..गोरेगावच्या त्या कार्यक्रमातदेखील, अशाच मुलांना आपले आईबाप, दुरावलेली कुटुंबं पुन्हा भेटणार होती. घरच्यांवर रागावून घराबाहेर पडलेली ती मुलं, समतोलच्या शिबिरातील दीड महिन्यांच्या ‘मनपरिवर्तन’ संस्कारामुळे घराच्या ओढीनं आतुरली होती.
सगळी मुलं समोर बसली आणि तो ‘पाणावलेला सोहळा’ सुरू झाला.
इतका वेळ केवळ भिरभिरत आपल्या मुलांना शोधणाऱ्या आया, मामा, बापांचे डोळे वाहत होते, मुलं समोर बसली तेव्हा त्यांचीही तीच अवस्था झाली.
त्यांच्या नजरा भिरभिरत गर्दीतली ‘आपली माणसं’ शोधू लागल्या आणि नजरानजर होताच भावनांचे बांध फुटले..
मग एकेका मुलाचं नावं उच्चारलं जाऊ लागलं आणि त्याला पुन्हा आपल्या घरी न्यायला आलेल्या आईबापांचा तो विरहानंतरचा पुनर्भेट सोहळा व्यासपीठावरच सुरू झाला. त्या क्षणी सभागृह भारावून गेलं.
टाळ्यांचा कडकडाट आणि डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा, विरह संपल्याच्या समाधानाचं हासू आणि विरहाच्या आठवणींनी दाटलेले आसू असं संपूर्ण संमिश्रण सभागृहात दाटलं..
प्रमुख वक्त्यांनाही बोलताना भावना अनावर झाल्या..
गरीबुल्लाहनं व्यासपीठावर जाऊन आपल्या तेरा-चौदा वर्षांच्या मुलाला मिठी घातली, विजय जाधवच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि मुलाला कुरवाळत, पाणावलेल्या डोळ्यांनिशी तो पुन्हा माझ्या शेजारच्या त्याच्या खुर्चीत बसला.
आता त्याच्याबरोबर त्याचा मुलगाही रडत होता.
मग, मुलांच्या पालकांपैकी कुणीतरी बोलावं, असं कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी सुचवलं, पण कुणीच उठलं नाही.
मी गरीबुल्लाहला खुणेनंच ‘बोला’, असं सांगितलं. पण त्यानं मान हलवून नकार दिला.
आणि व्यासपीठावर जाऊन बोलण्याऐवजी, माझ्या कानाशी तो बोलू लागला. मीही त्याच्या अगदी तोंडाजवळ कान नेला आणि गरीबुल्लाहला जे व्यासपीठावर बोलता येणार नव्हतं, ते त्यानं माझ्या कानाशी मोकळं केलं.
तो थांबला आणि मी मान मागे घेतली, तेव्हा गरीबुल्लाहच्या डोळ्यांतून टपकलेल्या पाण्यानं माझा शर्ट खांद्यावर भिजला होता..

Monday, September 2, 2013

गणपती इलो रे...

पावसाची सणसणीत सर नुकतीच कोसळून गेलेली असते. उगवत्या उन्हात तिळाची पिवळीधम्मक फुले पावसाचे थेंब पाकळ्यांवर घट्ट पकडून आणखीनच सोनेरीसोनेरी होऊन चमकत असतात. सगळ्या हिरवाईवर फुलांचा सुंदर साज चढलेला असतो आणि पोटरीला आलेल्या भाताच्या लोंब्यांचा धुंद सुगंध सगळ्या परिसरात घुमत असतो.. क्षणापूर्वी कोसळून गेलेल्या पावसानंतर आकाशातले ढगही पांगलेले असतात, आणि लांबवरच्या डोंगरकडय़ातून अधीरपणे जमिनीकडे झेपावत कोसळणाऱ्या धबधब्याच्या दुधाळ धारेचे वळसे स्पष्ट दिसू लागतात. पायथ्याच्या रानातला पक्ष्यांचा किलबिलाट घंटानादासारखा घुमत असतो. मधूनच एखाद्या मोराची लांबलचक आरोळी त्या किलबिलाटाला संगीत देते आणि अवघं रान मोहरून डोलू लागतं..
गावाबाहेर असा ‘मोहोर’ फुललेला असतानाच गावातल्या तांबडय़ाभडक मातीच्या रस्त्यांकडेची हिरवी झाडंही आसुसल्या नजरेनं रस्त्याकडे नजरा खिळवून बसलेली असतात. सकाळच्या पावसानं रस्ता कसा धुवून निघालेला असतो. उन्हं पडू लागतात आणि गावात लांबवरच्या रस्त्यापलीकडे ताशाचा तडतडाट ऐकू येतो. घराघरात पहाटेपासून सुरू झालेली लगबग रस्त्यावर दिसू लागते. देवघरात पूजाअर्चा आटोपल्यानंतर घुमणारा घंटांचा किणकिणाट आणि अगरबत्त्या, धूप आणि वळसेदार चंदनी गंधाचा वास घराचे उंबरठे ओलांडून बाहेर पडतो. झांजा खणखणू लागतात आणि ज्यासाठी आसुसलेपणानं रस्त्यांनी आपल्या नजरा खिळवलेल्या असतात ते दृश्य जिवंत होऊन उमटू लागते..
‘कारखान्या’बाहेर लाल रंगात रंगविलेल्या पाटांची रांग लागलेली असते. आंघोळी उरकून, नवे कपडे घालून आणि डोक्यावर टोप्या चढवून बच्चेकंपनीला बरोबर घेऊन आलेली वडीलधाऱ्यांची गर्दी कारखाना उघडायची वाट पाहत थांबलेली असते.
खरं म्हणजे, कारखाना बंद झालेलाच नसतो. फळ्यांच्या दरवाज्याआड रात्रंदिवस तो सुरूच असतो. आदल्या रात्री जेवणखाण उरकून आतमध्ये बसलेली कारागिरांची टोळकी, आपल्यासमोरच्या मूर्तीला ताजा जिवंतपणा देण्यात दंगलेली असतात.
..लावणीची कामं आटपत आली की ज्येष्ठ-आषाढात कारखान्यांची धामधूम सुरू व्हायची. एकेक सुबक गणेशमूर्ती जोडून झाली की त्याला श्रावणातलं कोवळं उन्ह दाखवायचं आणि पांढऱ्या शाडू मातीच्या त्या मूर्तीवर पहिली सफेदी द्यायची.. मग कारखान्यातल्या फळ्यांच्या मांडणीवर रांगेने देखण्या मूर्ती विराजमान व्हायच्या. आमच्यासारखी पोरं शाळेत येता-जाताना कारखान्यासमोर घुटमळायची. मांडणीवरच्या रांगेतलीच एखादी पांढरीशुभ्र मूर्ती तयार होत असतानाच मनात भरलेली असायची. त्या मूर्तीला प्रत्येक नव्या दिवशी नवा साज चढलेला असायचा. श्रावण संपत आला की प्रत्येक मूर्ती रंगांनी सजून जायची आणि डोक्यावरच्या मुकुटांना, गळ्यातल्या आणि दंडावरच्या दागिन्यांना सोनेरी रंग चढायचा. मागचे केस काळे व्हायचे आणि ‘आता घरात गणपती येणार’, अशी एक अधीर जाणीव येणारा प्रत्येक दिवस मोजू लागायची..
गोकुळाष्टमीनंतर कारखान्यातल्या गणपतींची ‘रेखणी’ सुरू व्हायची. मूर्तीचे डोळे रंगविणे हे सर्वात कौशल्याचं काम. बाकीच्या रंगकामासाठी फावल्या वेळात कुणीही कारखान्यात जाऊन मदत करत असे. अवघं गाव गणपतीच्या आगमनाच्या तयारीसाठी आपापल्या परीनं मदत करत असायचं. रेखणीचं काम सुरू झालं की गावातल्या मोजक्या कलावंतांची मागणी वाढू लागायची. प्रत्येक कारखान्यात आळीपाळीनं जाऊन गणपतींचे डोळे रंगवण्याचं काम ते करायचे.
..बशीत तयार केलेला काळा रंग डाव्या हाताच्या मनगटावर घेऊन त्यामध्ये ब्रशचे असंख्य वळसे फिरवत ब्रशला टोक आणून नंतर त्या कालाकाराचा उजव्या हातातला ब्रश मूर्तीच्या भुवईकडे गेला की पाठीमागे उभे राहून दोन्ही गुडघ्यांवर हात घेऊन ओणव्यानं ही कलाकारी न्याहाळणाऱ्या आम्हा पोराटोरांचा श्वास अक्षरश: रोधला जायचा. तो कारागीरही क्षणभर स्वस्थ व्हायचा, आणि श्वास जणू छातीत भरून घेऊन ब्रश हळुवारपणे मूर्तीच्या कपाळाकडे न्यायचा. जिभेचं टोक बाहेर काढून, डोळे बारीक करून, मान किंचितशी तिरपी करून आणि मागे झुकून गणपतीच्या रेखाटलेल्या भुवयांचा अंदाज घ्यायचा, आणि आमची चलबिचल सुरू व्हायची. आता त्या डोळ्यांमध्ये काळी बुबुळं उतरली की गणेशाची मूर्ती पूर्ण तयार होणार असायची. रेखणी करणारा तो कलाकार हळूच आमच्या डोळ्यातही पाहतोय, असा भास आम्हाला व्हायचा. आमचे डोळे गणपतीच्या रंगवून झालेल्या भुवयांवर खिळलेले असायचे. आमच्या नजरेतल्या भावातूनच तो भुवयांचं काम नीट झालंय की नाही याचा अंदाज घ्यायचा, आणि पुन्हा डाव्या मनगटावरल्या काळ्या रंगात ब्रश फिरवून तो डोळे रंगवायला घ्यायचा.. आमच्या छातीत उगीचच धडधडल्यासारखं काहीतरी सुरू झालेलं असायचं. दोन्ही डोळ्यांची बुबुळं प्रमाणशीर झाली नाहीत तर परिश्रमानं घडविलेली आणि रंगानं मढलेली ती गणेशमूर्ती अचानक वेगळीच वाटू लागायची. असं होऊ नये म्हणून आम्ही मनातल्या मनात गणपतीचीच प्रार्थना करायचो, आणि मनातच हात जोडायचो. कारण आमचे हात गुडघ्यांवर असायचे.. ते काढले तर मूर्तीपासून नजर लांब जाणार. ओणवं राहून तासन्तास मूर्तिकाम न्याहाळण्याचा वेगळाच छंद त्या दिवसांत आम्हा शाळकरी मुलांना लागलेला असायचा.
रेखणीकारानं डोळे रंगवले की पुन्हा थोडं मागं झुकून बसल्याबसल्याच तो मूर्ती न्याहाळायचा. मनासारखं काम झाल्यानं मान हलवायचा आणि त्या मूर्तीला जिवंतपणा यायचा. काही वेळाआधीपर्यंतची मूर्ती अधिकच वेगळी वाटू लागायची. एखाद्या मूर्तीच्या नजरेत खटय़ाळ हास्य भरलंय, असा भास व्हायचा, तर एखादी मूर्ती उगीचच, गंभीरगंभीर वाटू लागायची. एखाद्या मूर्तीच्या नजरेत आईच्या मायेचा भास व्हायचा, तर एखादी मूर्ती वडिलांसारखी कडक, कठोर वाटू लागायची. एखादी मूर्ती अगोदरपासूनच कुठेतरी बघितल्यासारखी ओळखीओळखीची वाटू लागायची..
संध्याकाळ झाली, अंधार पडू लागला की घराकडे परतताना, आपल्या घरात दुसऱ्या दिवशी कोणता गणपती आणायचा हे मनात पक्कं ठरलेलं असायचं..
..म्हणून चतुर्थीला कारखान्याबाहेरच्या वडीलधाऱ्यांच्या गर्दीत, आमचीही लुडबुड सुरू असायची. हातातल्या झांजांची उगीचच खणखण करत आम्ही कारखान्याच्या फळ्यांच्या फटीतून आत नजरा लावायचो, आणि काल नक्की केलेला गणपती मांडणीवर कुठे आहे, याचा अंदाज घ्यायचो. पण आज सगळ्याच मूर्ती सारख्याच आहेत, असंच वाटायचं.
कारखान्याच्या फळ्या काढल्या जायच्या. कारखान्याचे मालक, आंघोळ करून, नवे कपडे घालून, डोक्यावर टोपी घालून गल्ल्यावर बसलेले असायचे. त्यांच्या कपाळावर कुंकवाची लालभडक लांबलचक रेषा असायची. वर्षभर दररोज भेटणारा हा माणूस त्या दिवशी काहीतरी वेगळाच, अनोळखी वाटायचा, आणि आपल्या घरचा गणपती याच्या हातून घडलाय हे नकळतपणे जाणवून त्याच्याबद्दल अपार आदर वाटू लागायचा. नंबर आला की आम्ही पुढे व्हायचो. मग मांडणीवरची मूर्ती घेऊन एखादा कामगार आमच्या घरून नेलेल्या पाटावर आणून ठेवायचा, आणि लगेचच त्या मूर्तीसमोर उदबत्त्या ओवाळल्या जायच्या. गणपतीच्या अंगावर रेशमी वस्त्र पांघरले जायचे. समोर सव्वा रुपया ठेवून आम्ही सगळे त्या मूर्तीला नमस्कार करायचो, आणि सगळी गर्दी गजर करायची..
‘गणपती बाप्पा मोरया’..
झांजांचा किणकिणाट एव्हाना रस्तोरस्ती सगळीकडेच घुमू लागलेला असायचा. कारखान्याच्या मालकाच्या हातात गणपतीची किंमत, नारळ देऊन त्याला वाकून नमस्कार करून गणपतीचा पाट उचलला जायचा आणि गणपती आमच्या घराच्या दिशेने निघायचा. वेगळ्याच आनंदात बेहोश होऊन प्रत्येकजण गणपती बाप्पाचा गजर करत असायचा. रस्त्यावर पाहावे तिकडे, घरोघरी निघालेल्या गणेशमूर्ती आणि मोरयाचा गजर..
अचानक एकाच गल्लीत जाणारी पाचदहा कुटुंबं रस्त्यावरच एकत्र यायची, आणि गणपतीबाप्पांची भव्य मिरवणूकच सुरू व्हायची. झांजांचा आवाजही दहापटीनं वाढलेला असायचा, आणि बाप्पाचा गजरही जोशात सुरू व्हायचा. एवढी गर्दी झाली की अचानक ताशेवाले कुठून तरी उपटायचे, आणि मिरवणुकीसमोर न सांगताच ताशांचा तडतडाट सुरू व्हायचा.
दरवाजाशी आलेल्या मूर्तीला ओवाळून तिचं स्वागत व्हायचं, आणि अगोदर तयार असलेल्या मखराशेजारी गणपतीची देखणी मूर्ती विराजमान व्हायची.
मग घराघरांत पूजेची धांदल सुरू व्हायची. स्वयंपाकघरात मोदकांची तयारी सकाळपासून सुरू झालेली असायची. काही वेळातच घरोघरी आरत्यांचे सूर घुमू लागायचे, आणि अवघं गाव धूप, अगरबत्त्यांच्या वासानं घमघमून जायचं.
सणाचं एक वेगळं, पारदर्शक असं रूप गावावर दाटलेलं असायचं.
त्या काळात गावात मुद्दाम सनईवाले यायचे. घरोघरी जाऊन सनईचौघडय़ाची सेवा देणारे हे गट त्या चार दिवसांत कुठल्यातरी एखाद्या घरात हक्कानं मुक्काम ठोकायचे. मग त्या घरात संध्याकाळीही सनईचौघडा घुमायचा. त्यांची ती एकसुरी पेटी वाजवायला मिळावी, म्हणून आम्ही पोरं त्या घरात नेहमीच घुटमळत राहायचो. उत्सवकाळात एकदा तरी ती पेटी वाजवायला मिळावीच, म्हणून!
चतुर्थीच्याच दिवशी अनेक घरांत सहस्रावर्तनं व्हायची. गावातली तरुण मुलं, गट तयार करायची आणि घरोघरी जाऊन सहस्रावर्तनं म्हणायची. पूजेनंतर दुपारच्या नैवेद्याआधी निम्म्या गावातील घरांमध्ये सहस्रावर्तनांचे पाठ झालेले असायचे. मग मोदकांच्या पंक्ती झोडून ही तरणी मुलं दुपारच्या वेळी घरात ताणून द्यायची.. गणेशोत्सवाचा घराघरातला सण पहिल्याच दिवशी अशा तऱ्हेने सगळ्या गावाचा सण बनून जायचा..
गावातल्या मंदिरातही सार्वजनिक गणेशोत्सव असायचा. रात्री घरोघरी आरत्यांची जणू चढाओढ लागायची. दिवेलागणीच्या वेळी अवघं गाव आरत्यांच्या सुरात न्हाऊन निघालेलं असायचं. गल्लीतली सगळी गर्दी आरतीसाठी घरं घेत हिंडायची, आणि टिपेच्या आवाजात आरत्या गाताना गावात भक्तिरसाचा जणू महापूर लोटायचा. आरत्यांपाठोपाठ वाटला जाणारा प्रसाद त्या काळात घरीच तयार व्हायचा. तळव्यावर मावणार नाही एवढा प्रसाद घराघरातून पोटात रिचवल्यावर, रात्रीच्या घरच्या जेवणासाठी पंगती तयार व्हायच्या तोवर देवळात शंखनाद सुरू झालेला असायचा. सार्वजनिक गणपतीची आरती हा एक सुंदर सोहळा असायचा. तिला हजेरी लावण्याच्या घाईत कसंतरी रात्रीचं जेवण उरकलं जायचं आणि पळापळ करत माणसं देवळात हजर व्हायची. देवळातली मुख्य घंटा वाजवणारा कुणी जणू मानक ऱ्यासारखा ठरलेला असायचा. आरतीला ताल असला पाहिजे, उगीच बेंबीच्या देठापासून बेसूरपणे कुठलीही ओळ जाऊ नये यासाठी काही जाणकार माणसं गर्दीवर नजरेनंच जरब ठेवत असत.
काही मिनिटं नुसताच घंटानाद झाल्यावर गंभीर शंखनाद घुमायचा आणि तबला-ढोलकीबरोबर झांजांचा तालबद्ध किणकिणाट सुरू व्हायचा.. एकापाठोपाठ एक आरत्यांची चवड उलगडली जायची आणि सुरांच्या लगडीवर स्वार होत रात्र पवित्र होऊन जायची.. ‘येई हो विठ्ठले’.. म्हणणारा एकच कुणी गावात असायचा. ‘निढळावरी कर’.. म्हणणारा त्याचा आर्त स्वर विशिष्ट जागेवर टिपेला गेला की होणारा झांजांचा किणकिणाट, घंटानाद आणि ढोलकीचा ताल यांचा सुंदर मिलाफ आरत्यांच्या वातावरणातला सर्वात आनंददायी, शब्दांत न सापडणारा असा आगळा क्षण ठरायचा..
सगळा गाव जणू त्या क्षणात वेढून जायचा.
असं तब्बल दहा दिवस चालायचं. दुसऱ्या दिवशीपासून गणेशदर्शनासाठी घराघरांत गर्दी सुरू व्हायची आणि प्रसादाची ताटं रिकामी व्हायची. सगळ्या गावावर उत्सवाचं एक सोज्ज्वळ, उत्सवी रूप चढलेलं दिसायचं.
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी, गावातल्या गणपतीसमोरच्या आराशीत झाडंपानं, फुलं, वेलींचाच मोठा भरणा असायचा. गावागावांत वीज आली आणि मुंबईहून गणपतीसाठी गावाला येणाऱ्या चाकरमान्याच्या सामानात इलेक्ट्रिकच्या माळाही दिसू लागल्या. फुलं-पानांच्या सजावटींची जागा नंतर लायटिंगनं घेतली. घरी बनणाऱ्या प्रसादाची जागा, मुंबईतून येणाऱ्या माव्याच्या मोदकांनी घेतली, आणि सकाळी लवकर घरच्या गणपतीची पूजा आटोपण्याच्या घाईत भटजीची वाट पाहायला नको म्हणून मुंबईवरनं येणारा चाकरमानी आपल्यासोबतच पूजेची कॅसेट किंवा डीव्हीडी आणू लागला. गावाबाहेरच्या रानात फुलणारी सुगंधी फुलं बाजारातल्या नकली फुलांच्या झगमगाटात लाजल्यासारखी दिसू लागली, आणि सहस्रावर्तनांच्या सुरात घुमणाऱ्या अनेक घरांत दिवसभर अथर्वशीर्षांची कॅसेट उलगडत राहिली.. उकडीच्या मोदकांचा घाट घालण्याच्या घाईत सकाळपासून लगबगलेली स्वयंपाकघरं ऑर्डरच्या मोदकांच्या भरवशावर निवांत दिसू लागली.
गावाचं जुनं रूप पालटून शहरीपणाचं पाणी गावावर चढू लागलं, तसतसा गणोशोत्सवाचा कौटुंबिक ग्रामसोहळाही संकुचित होत गेला. आता गावात गल्लीतली माणसं एकमेकांना फारसं ओळखत नाहीत. गणेशोत्सव अजूनही साजरा होतो. सनईवाल्यांच्या नव्या पिढीनं तो धंदा बंद केलाय. सार्वजनिक देवळातल्या उत्सवासाठी कीर्तनकार मिळणंही मुश्कील झालं, म्हणून कधी जादूचे प्रयोग, नकला आणि मिमिक्री करून उत्सव साजरा होतो. ‘येई हो विठ्ठले’ म्हणताना, स्वरानंदात गुंगणारा तो स्वरही आता थकला आहे. आणि तस्साच खणखणीत नवा स्वर गावाला सापडलेला नाही. देवळातली आरतीही लवकरच संपते. शंख वाजवायला कुणी पुढेच येत नाही, आणि तो शंखनादही अलीकडे कमीच घुमतो. गावात गाडय़ा, रिक्षांची वर्दळ वाढली. त्यामुळे देवळातला घंटानाद अलीकडे घराघरांपर्यंत ऐकूच येत नाही.
..मुख्य म्हणजे, जुने गणपतीचे कारखानेही आता कमी झालेत. नवे मूर्तिकार भव्य मूर्ती बनवतात. गावात सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या वाढलीये. गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्रीपासूनच गणपतीच्या मिरवणुका सुरू झालेल्या असतात..
पण गणेशोत्सव साजरा होतोच. भक्तीनं, प्रेमानं आणि तितक्याच उत्साहानं!!

Sunday, June 16, 2013

तुम्हाला काय वाटतं?

फेम.. स्टारडम.. सेलिब्रिटी स्टेटस.. हे सगळं मिळावं, आपल्या मुलाभोवती सतत कॅमेऱ्याचा लखलखाट असावा, खोटय़ाखोटय़ा अभिनयात हरवलेली त्याची कोवळी, निरागस छबी दररोज कुठे ना कुठे झळकलीच पाहिजे, असं तुम्हाला वाटतं?


हे सगळं मिळविण्यासाठी तुमचं मूल सज्ज आहे?.. म्हणजे, हे सगळं मिळावं यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला तसं घडवत आहात?

मग वाट पाहू नका.. तुमच्या मुलासाठी या सगळ्या संधी अगदी दरवाज्याशी येऊन खोळंबल्या आहेत. फक्त एक करा. बालकांमधील तारे-तारका शोधणाऱ्या स्पर्धेत तुमच्याही मुलाचं नाव घाला आणि निकालाकडे लक्ष द्या.. कदाचित ती सुवर्णमाळ तुमच्याच मुलाच्या गळ्यात पडेल’..

हे जणू ठरलेलंच आहे!

..खेळण्याच्या, बागडण्याच्या आणि भरपूर अभ्यास करून भविष्यातील आयुष्य घडविण्याच्या आपल्या चिमुकल्याच्या बालपणातच सेलिब्रिटी घडविण्यासाठी धडपडणाऱ्या आणि पैशाच्या राशींची स्वप्ने पाहणाऱ्या आईबापांना भुरळ घालणारं एक ताजंताजं स्वप्न अलीकडेच अवतरलं आहे.. एका बडय़ा व्यापारसमूहाच्या जाहिरातीतून हे स्वप्न घरोघर पोहोचलं आहे. नव्या ‘लाइफस्टाइल’ची ‘माया’नगरी या स्वप्नातून आईबापांना खुणावू लागली आहे.

आता आपल्या निरागस मुलाचा, कोवळ्या चिमुरडीचा फोटो जाहिरातीत झळकणार अशी स्वप्ने असंख्य आईबापांना एव्हाना पडू लागली असतील.

इतक्या लहानपणीच प्रसिद्धी, स्टारडम आणि सेलिब्रिटी स्टेटस मिळवून देणाऱ्या या स्पर्धेत आपलं मूल मागे पडू नये, म्हणून अनेक आईबापांची धडपड सुरूदेखील झाली असेल. या स्पर्धेत आपलं मूल निवडलं जावं, यासाठी येत्या तीन आठवडय़ांत स्पर्धेच्या संयोजकांकडे मुलांच्या छायाचित्रांचा पाऊस पडेल.. आणि आशाळभूत आईबापांचे स्वप्नाळू डोळे स्पर्धेच्या निकालाकडे लागतील.

आपलं इवलंस, निरागस हसणारं, जगाची पुरती ओळखदेखील न झालेलं आणि व्यवहाराशी काहीही देणंघेणं नसलेलं, जगण्यासाठी केवळ आईबापांच्या आधारावर विश्वस्त असलेलं मूल, आता सेलिब्रिटी झालंच, या समजुतीचे पंख लावून हे आईबाप स्वप्नांच्या दुनियेत भराऱ्या मारू लागतील.

मग स्पर्धेचा निकाल जाहीर होईल. पाऊसभर छायाचित्रांतून मोजक्या मुलांची निवड होईल. स्पर्धेत निवड न झालेल्या आईबापांना नैराश्य येईल. आपलं मूल स्टार झालेलं पाहायचं त्यांचं स्वप्न विस्कटून जाईल. कदाचित, मुलाची निवड न झाल्याचा राग ते मुलावरच काढत राहतील..

आणि कदाचित, अशा मुलांना आईबाबांच्या रोषाच्या सावटाखालीच पुढचं आयुष्य ढकलावं लागेल!.. कदाचित, अशा परिस्थितीमुळे आणि आयुष्याचा अर्थ समजण्याआधीच्याच पहिल्याच स्पर्धेत मिळालेल्या अपयशामुळे त्या मुलांचा आत्मविश्वासदेखील हरवून जाईल. आयुष्यातील भविष्याची आव्हानं पेलण्याची उमेदही ते हरवून बसतील..

..जिया खान नावाच्या एका अभिनेत्रीनं, आपला पहिला चित्रपट सुपरस्टार अमिताभ बच्चनसोबत केला आणि लागोपाठ आमीर खानसोबत. अमिताभ आणि आमीरसोबत काम करणारी अभिनेत्री नंतर किती मोठी सेलिब्रिटी व्हायला हवी, याचे तिचे आडाखे मात्र चुकले. अमिताभ बच्चन, आमीर खान यांना एका भूमिकेतच सेलिब्रिटी स्टेटस, स्टारडम मिळाले नाही, हे समजून घेण्याची उमेदच निराश आयुष्यातून हद्दपार झाली आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षीच, आयुष्याची आव्हानं पेलण्याआधीच अपयशाच्या भावनेनं ती खचून गेली.

जगण्याच्या आव्हानांना घाबरून मरणाला मात्र निर्भयपणे सामोरी जाणारी अनेक कोवळी मुलं अशाच अपयशाच्या, नैराश्याच्या भावनेनं जीवन संपवून टाकताहेत. यश, सेलिब्रिटी स्टेटस, प्रसिद्धी, स्टारडम हे सारं मिळविण्यासाठी स्ट्रगल करावं लागतं, तीव्र स्पर्धाना सामोरं जाऊन स्वत:चं अस्तित्व सिद्ध करावं लागतं, आणि त्यासाठी मनातली ईष्र्या जिवंत ठेवावी लागते, याची जाणीवच त्यांच्या आयुष्यातून पुसली गेली असावी. अशी ती एकटी नव्हती. याआधी अनेकांनी आपले आयुष्य अशाच नैराश्यातून या जगातून पुसून टाकली होती. अगदी सहजपणे. असं का घडतं?

आपल्या मनाची घुसमट एका क्षणात संपविण्याचा हाच एकमेव मार्ग आता शिल्लक आहे? एसएमएस, व्हॉटसअप किंवा फेसबुकवर स्टेटस अपडेट सोडले, तर मन मोकळं करण्याचा, संवादाचे सगळे मार्ग संपून गेले आहेत? भांडणं आणि प्रेम, लोभ आणि तिरस्कार, माया-ममता, सारं काही ऑनलाइन झाल्याचा हा परिणाम असेल? जियाच्या आत्महत्येच्या काही दिवस अगोदर एका तरुणानं आत्महत्येआधी जगाचा निरोप घेणारं स्टेटस फेसबुकवर अपडेट केलं.

त्याच दरम्यान, नवरा-बायकोचं ऑनलाइन भांडण सुरू असताना, पलीकडे वेबकॅमवरून पाहणाऱ्या नवऱ्यादेखत एका नैराश्यग्रस्त तरुणीनं आपल्या घरी आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं.. या आत्महत्यांनंतर पुन्हा मनोवैज्ञानिक विश्लेषण झाले. संवाद हरवलाय, हाच अंतिम निष्कर्ष ठरला.

अपयश हा जीवनाचा शेवट नाही, हे मुलांच्या मनावर बिंबविणे हाच अशा घटना टाळण्याचा मार्ग आहे, यावरही एकमत झालं. दीर्घकाळ साचलेल्या नैराश्यातून अखेर आत्महत्येचा मार्ग कवटाळला जातो, असा जागतिक पाहणीचा एक निष्कर्ष आहे. अशा नैराश्यग्रस्तांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळतच असतात आणि एखाद्या आत्महत्येची बातमी कानावर पडली, की हा विचार अधिक वेगाने उसळी मारून प्रबळ होतो, असंही या पाहणीत आढळलंय.

अशा क्षणी, विश्वास देणारं, दिलासा देणारं आणि सावरणारं, जवळचं कुणीतरी असावं, या निष्कर्षांसाठी जागतिक पाहणीची गरज नसते. मन मोकळं केलं, की हलकं वाटतं, हा अनुभवसिद्ध उपाय आहे. पण मन मोकळं करण्याच्या वाटाच खुंटल्या असतील तर? ज्यांच्यापाशी हक्कानं, जवळिकीनं मन मोकळं करायचं असतं, त्यांच्याच भयानं नैराश्य वाढत असेल तर?

मग असं टोकाचं पाऊल उचलण्याच्या कृतीला कुणाचा अविचार जबाबदार धरायचा? हातावरली भविष्यरेषा उमटण्याआधीच मुलांचं सेलिब्रिटी भविष्य ठरविण्यासाठी धडपडणाऱ्या, मुलाला फेम आणि स्टारडमच्या झगमगाटात चमकलेलं पाहण्याची स्वप्नं गोंजारणाऱ्यांनी याचा विचार करायला हवा.

तुम्हाला काय वाटतं?

http://www.lokprabha.com/20130621/zero-hour.htm

Saturday, April 6, 2013

भक्ती : सक्तीची आणि भपक्याची!

होळीच्या दिवशी बाहेरही पडणं अशक्य असल्यानं वेळ घालवण्यासाठी काही ना काही ठरवावंच लागलं असेल. टीव्हीवरचे कार्यक्रम पाहात कुणी सुट्टी ‘विनाकारणी’ लावली असेल, तर कुणी गप्पाटप्पा करत वेळ घालवला असेल.. त्या दिवशी आदल्या दिवशीचं एक वर्तमानपत्र चाळताना दोन बातम्या पुन्हा डोळ्यासमोर नाचू लागल्या. एका बातमीत होळीच्या भक्तिरंगांची भपकेबाज उधळण होती, तर दुसरीत, ‘सक्तीच्या भक्ती’चे रंग विखुरले होते..


धर्माचे राजकारण आणि सणांचे ‘कॉर्पोरेटायझेशन’ सुरू झाले आणि देशात अचानक सणांचे महत्त्व वाढू लागले. सण हा बाजारपेठांच्या उभारीचा हुकमी एक्का ठरल्याचे सिद्ध झाले. दृक्श्राव्य माध्यमे आणि वर्तमानपत्रांतील जाहिरातींवरून सध्या कोणता सीझन आहे, हे ओळखायची सवय नकळत आपण जडवून घेतली. बाजारपेठांच्या गल्लाभरू युक्तीने त्याहीपुढे मजल मारली आणि सणांचाही बाजार सुरू केला. दसरा हा ‘विजयादशमी’चा सण राहिला नाही, आणि पाडवा हा ‘गुढीपाडवा’ राहिला नाही. दसरा-पाडवा हा केवळ सोने खरेदीचा सण म्हणून रूढ झाला आणि होळी हा रंगांचा, धुंदीचा उत्सव झाला. दिवाळी तर मौजमजेच्या आणि पैशाच्या उधळणीच्या असंख्य रंगांनी उजळून गेली. गणेशोत्सवासारखे सणही जाहिरातबाजीच्या कचाटय़ातून सुटले नाहीत. सणांच्या दिवसांनी बाजारपेठांचे खऱ्या अर्थाने सोने केले..

मग परंपरांचा विसर पडू लागला. श्रीमंतीच्या प्रदर्शनाचे दिवस म्हणजे सण असा पायंडा रूढ झाला. अशा परिस्थितीत, सामान्य स्थितीतील कुटुंबांचा मात्र कोंडमारा होत राहिला. प्रदर्शनाच्या या स्पर्धेत उतरवतही नाही आणि त्यातून बाजूलाही होणं शक्य नाही अशा विचित्र स्थितीत सापडली. सणांना, भक्ती नव्हे, तर सक्ती आणि भपक्याचे रंग चढू लागले..

दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात, पारंपरिक महत्त्व ओळखून सणापुरती होळी साजरी करण्याचे भान सामान्य कुटुंबे दाखवत होती, तेव्हा दुसरीकडे मात्र भक्तीच्या नावाखाली भपक्याचे ओंगळवाणे प्रदर्शन सुरू होते. आसाराम बापू नावाच्या एका तथाकथित संताने भक्तांवर रंगांची आणि वारेमाप पाण्याची मनसोक्त उधळण केली आणि ‘संताघरी सुकाळ-दुष्काळ सारखेच’, असा जणू संतापजनक संदेश दिला. आसारामाच्या अंगणात होळीच्या रंगांची मुक्त उधळण होत असताना, अनेक कुटुंबे आपापल्या गावात हंडाभर पाण्यासाठी ताटकळत, टँकरकडे डोळे लावून बसली होती. आसारामाचे हजारो भक्त मात्र, जगाची दु:ख विसरून पाण्याचे फवारे झेलत धन्य होत होते.

..ही बातमी वाचताना, माझ्या डोळ्यासमोर आसारामबापूंचा ‘कृष्णावतारी’ फोटो उभा राहिला. बापूंच्या ‘सत्संगा’चे भपकेबाज सोहळे आठवू लागले, या सोहळ्यांच्या भव्य मंडपांची बापूंच्या कृष्णावतारी फोटोंच्या कमानींनी सजलेली प्रवेशद्वारे नजरेसमोर नाचू लागली. डोक्यावरच्या भरजरी पागोटय़ात मोरपीस खोवून मिश्कील डोळ्यांनी हसणारा तो चेहरा, ‘कृष्णावतार’ भासवण्याचा सक्तीचा प्रयत्न किळसवाणा वाटू लागला. मी वर्तमानपत्राचं पान उलटलं आणि लगेचच, ती विषण्ण बातमी पुन्हा डोळ्यासमोर आली. मी बापूंचा भपका विसरलो. नजर शून्य झाली आणि एका वेबसाइटवर कधीतरी बघितलेली असंख्य छायाचित्रं, जिवंत होऊन करुणपणे डोळ्यासमोरून सरकू लागली..

उत्तर प्रदेशातल्या वृंदावनात त्याच दिवशी होळीचा आगळा सण साजरा होत होता. वृंदावन म्हणजे, गोपाळकृष्णाचं गाव. इथे असंख्य भाविक भक्तिभावानं येत असतात. वृंदावनातील देवळांना भेटी देतात, भगवान कृष्णापुढे भक्तिभावाने मस्तक झुकवितात, आणि पुण्य गाठीशी बांधण्यासाठी दानधर्मही करतात. इथे वावरताना, आजूबाजूला कृष्णभक्तीच्या भजनांचे मंजूळ सूर सतत कानावर पडत असतात. आसपासच्या आश्रमांमधून ओघळणाऱ्या या सुरामध्ये भक्तिभाव असतोच, पण कान देऊन ऐकलं, तर त्या सुरांमधून कारुण्याचे झरेही झरझरत असतात. बाहेरगावांतून वृंदावनात येणारे भाविक भक्तीनं भारलेल्या या वातावरणामुळे धन्य समजून पुण्य पदरात पडल्याचं समाधान साधतात.

या सुरांच्या कारुण्याची कहाणी काही दिवसांपूर्वी मी लोकसभेच्या कामकाजाच्या तपशिलात पाहिली होती. महिला आयोगानं या कारुण्याचा व्यापक शोध घेतला होता आणि न्यायालयानंही त्याची गंभीर दखल घेतली होती. हे सूर केवळ भक्तीच्या भावनेतून पाझरणारे सूर नाहीत, तर पोटाची खळगी भरण्याच्या आणि आला दिवस तगण्याच्या नाइलाजातून निघणारे ‘सक्तीच्या भक्ती’चे सूर आहेत, हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं. पतीच्या निधनानंतर वैधव्य आलेल्या आणि कुटुंबात नकोशा होणाऱ्या असंख्य महिला निराधार अवस्थेत घराबाहेर पडतात आणि जगण्याची वाट शोधत वृंदावनात दाखल होतात. अशा विधवांना आश्रय देणारे अनेक आश्रम वृंदावनात आहेत. रक्ताच्या नात्यांनी नाकारलेल्या या महिलांना इथे आश्रय मिळतो आणि आपलं उरलेलं एकाकी आयुष्य ढकलत त्या या आश्रमांच्या िभतीआड दिवस मोजू लागतात. बाहेर ऐकू येत असतात, ते आयुष्याचं कारुण्य लपेटलेले त्यांचे केविलवाणे सूर. या विधवांना इथे केवळ ठाकूरजीची, म्हणजे कृष्णाची सेवा करावी लागते. मंदिरांच्या वाटेवर भजने आळवली, की हाती पडणाऱ्या कूपनमुळे त्यांना जेवण मिळतं. अशा शेकडो महिला वंृदावनात आश्रमांमध्ये ठाकूरजींच्या सेवेत स्वत्व हरवून राहात आहेत. त्यांना सामाजिक अस्तित्व नाही. ओळखही नाही. या महिलांना माताजी म्हणतात, पण कुटुंबांतील मातेचं स्थान नशिबानं केव्हाच हिरावलेलं असतं..

आसारामबापू जेव्हा रंगांची उधळण करून भक्तांना भपक्याच्या रंगात न्हाऊमाखू घालत होते, त्याच काळात, आश्रमांच्या िभतीआड राहून केवळ भक्तिरसाने ओथंबलेली कृष्णगीते गाणाऱ्या या महिलांसाठी कित्येक वर्षांनंतर एक वेगळा दिवस उजाडला होता. या महिलांनाही होळीच्या रंगात रंगविण्याची एक कल्पना पुढे आली आणि त्या नीरस, हरवलेल्या आयुष्यांवर काही क्षणांच्या खुशीचे रंग उमटले. उपेक्षित, वंचित आणि दुर्लक्षित विधवांनी परस्परांवर रंगीबेरंगी फुले उधळत मुक्तपणे होळी साजरी केली होती..

होळीच्या रंगांची उधळण आता संपली आहे. आता कदाचित त्या विधवा पुन्हा आश्रमांच्या भिंतीआड जाऊन, कृष्णगीतांची उधळण भाविकांवर करत असतील. आयुष्यात अचानक, अनपेक्षितपणे उगवलेल्या त्या रंगोत्सवाच्या आठवणींची एक शिळी शिदोरी आता त्यांच्यासोबत असेल..

http://www.lokprabha.com/20130412/zero.htm

Friday, March 29, 2013

‘ब्रेकिंग न्यूज’...

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता मिळाली किंवा मिळाली नाही, तरीही पक्ष संघटनेत प्रचंड फेरबदल करण्याचा निर्णय काँग्रेस महासमितीच्या काही गुप्त बैठकांमध्ये झाला असून निवडणुकीनंतर राजसंन्यास घेण्याचे विद्यमान गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मनसुबे पक्षातूनच उधळून लावले जाणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. शिंदे यांच्यावर सोपविल्या जाणाऱ्या एका अतिमहत्त्वाच्या जबाबदारीपूर्वी या जबाबदारीस ते पात्र आहेत किंवा नाहीत याची पडताळणी गेल्या काही महिन्यांपासून पक्षाचे अतिवरिष्ठ नेते अत्यंत गुप्तपणे करीत आहेत.
काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच याची सूत्रबद्ध पूर्वतयारी सुरू असली तरी अद्याप खुद्द शिंदे यांना मात्र त्याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नसल्याची पक्षाच्या वरिष्ठ आणि ‘जनपथप्रिय’ सूत्रांकडून समजते. निवडणुकीनंतरच्या राजकीय परिस्थितीवर शिंदे यांच्या गृहखात्याचे बारीक लक्ष असून आगामी निवडणुकीनंतर काँग्रेसप्रणीत आघाडीला सरकारस्थापनेची संधी मिळण्याची शक्यता धूसरच असल्याचा गृहखात्याच्या काही यंत्रणांचा अंदाज आहे. अर्थात, निवडणुकीस अद्याप बराच कालावधी असल्याने मधल्या काळात विरोधी पक्षांच्या बदनामीची आणि शकले उडविण्याची अनेक षड्यंत्रे आखली जात असून त्याचा फायदा पक्षाला उठविता येईल, असाही अहवाल या यंत्रणांनी दिल्याचे समजते. त्यासाठीही शिंदे यांचीच मदत घेण्याची शिफारस पक्षश्रेष्ठींच्या सल्लागारांनी केली आहे.

देशात अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक समस्येवर सरकार आणि जनताही हवालदिल असते, विरोधी पक्षांनी हत्यारे परजून सरकारला धारेवर धरण्याची तयारी केलेली असते, तेव्हा संकटमोचकाची भूमिका पक्षातील ज्येष्ठ ‘गांधी’वादी नेते दिग्विजय सिंह हे बजावत असतात. पण आता त्यांच्या वक्तव्याची आणि विधानांचीच खिल्ली उडविली जात असल्याने त्यावर वादच निर्माण होत नसल्याचे स्पष्ट झाले आणि पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात चिंता पसरली. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यातून निर्माण होणाऱ्या वादंगामुळे विरोधक दिग्विजय सिंह यांनाच लक्ष्य करतात आणि मूळ प्रश्नापासून सुटका होते हे लक्षात आल्यापासून पक्षश्रेष्ठींनी दिग्विजय सिंह यांना आपले विचारधन मुक्तपणे उधळण्याची मुभा दिली होती, पण दिग्विजय सिंह यांच्या मुक्ताफळ माऱ्यांचा प्रभाव ओसरत चालला आहे. नव्याने उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या राहुल गांधी यांच्या युवा वर्तुळात काही दिवसांपूर्वी यावर सखोल खल झाला. दिग्विजय सिंह यांना बाजूला करण्याची वेळ आल्याचे मत अनेक युवा नेत्यांनी व्यक्त केल्यामुळे तोंडाला कुलूप घालण्याचे आदेश दिग्विजय सिंह यांना देण्यात आले.
राहुल ब्रिगेडमधील युवा वर्तुळाच्या या कारनाम्यांमुळे काँग्रेसमधील ज्येष्ठांमध्ये मात्र तीव्र अस्वस्थता पसरली होती. दिग्विजय सिंह यांची उपयुक्तता आणि विरोधकांसाठी असलेले उपद्रवमूल्य या दोन्ही बाबी पटवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी थेट सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर राहुल ब्रिगेडच्या निर्णयावर फेरविचार होणार अशा अपेक्षा उंचावल्या होत्या. तेवढय़ात आगामी निवडणूक न लढविण्याचा व राजकारणातून निवृत्ती घेऊन सोलापूरच्या फार्म हाउसवर साहित्यिकांशी गप्पाटप्पा करण्याचा राहून गेलेला आनंद पुन्हा मिळविण्याचा मनोदय सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले व पक्षश्रेष्ठींनी दिग्विजय सिंह यांच्या पुनर्वसनाचा निर्णय बदलला, अशी माहिती मिळते.
निवडणुकीनंतरच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या काही विधानांमुळेच, त्यांच्यावर निवृत्तीनंतरची नवी जबाबदारी देण्याचा पक्षश्रेष्ठींचा ठाम निर्णय झाल्याची माहिती या सूत्रांनी दिली. येत्या लोकसभा निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूरच्या फार्म हाऊसवर निवांतपणा न देता, दिल्लीतच आणावे असे ठरले असून दिग्विजय सिंह यांचे स्थान त्यांना बहाल करण्यात येणार आहे.

..राजधानीतील बडय़ा राजकीय नेत्यांच्या एका बैठकीत या संदर्भात गांभीर्याने झालेल्या चर्चेचा तपशील ‘लोकप्रभा’च्या हाती आला आहे. त्या बैठकीतील चर्चेची टिपणे असलेली फाइलच हाती आली असून, आगामी काळात शिंदे बजावणार असलेल्या भूमिकेबद्दलच्या या बैठकीतील उलटसुलट चर्चेचा तपशीलही त्यामध्ये उपलब्ध आहे.

राज्यसभेतील गंभीर विषयावरील चर्चेच्या वेळी सुशीलकुमार शिंदे यांनी खासदार जया बच्चन यांना तंबी देऊन गंभीर विषयाची आठवण करून दिल्याने चर्चेला मिळालेले वेगळे वळण, खतरनाक अतिरेकी हाफीज सईद याचा श्रीयुत सईद असा केलेला उल्लेख, लोकांची स्मरणशक्ती कमी असते याबद्दलचा त्यांचा ठाम विश्वास, कोळसा खाण घोटाळा जनता विसरेल असा खात्रीपूर्वक दावा करून व त्याला बोफोर्सचा संदर्भ जोडून शिंदे यांनी माजविलेल्या वादळामुळे त्या वेळच्या ताज्या प्रश्नांवरून होणारी सरकारची घुमसट थांबल्याबद्दल शिंदे यांना कोणत्या स्वरूपात बक्षिसी द्यावयाची याचाही विचार पक्षश्रेष्ठींकडून सुरू होता. विशेषत: जयपूरच्या काँग्रेस महासमिती शिबिरातील शिंदे यांच्या वक्तव्याने संघ परिवार आणि काँग्रेसचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपची तर पुरती त्रेधा उडाली होती. या वक्तव्याशी पक्ष सहमत नाही, अशी सारवासारव करून काँग्रेसने त्या वेळी शिंदे यांच्या वक्तव्याची जबाबदारी झटकली असली तरी त्यातून निर्माण झालेले वादळ देशासमोरील अन्य अनेक प्रश्नांना बगल देत घोंघावत राहणार व सतावणाऱ्या अनेक वादळांतून सरकार तरणार याची पुरेपूर खात्री मात्र पक्षश्रेष्ठींना होती. यामुळेच आगामी निवडणुकीनंतर शिंदे यांना स्वस्थ बसू द्यायचे नाही यावर पक्षात एकमत झाल्याचे या सूत्रांनी सांगितले.
संघ-भाजपच्या शिबिरात दहशतवादी प्रशिक्षण दिले जाते, हिंदू आतंकवादाचे काही पुरावेही आपल्याकडे आहेत, असे सांगत शिंदे यांनी संघ-भाजपला जी धडकी भरविली त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या. दिग्विजय सिंह यांनीही संघ-भाजपला संशयाच्या घेऱ्यात खेचणारी अनेक विधाने यापूर्वी अनेकदा केली होती. अतिरेकी हफीझ सईदला त्यांनीही आदराने संबोधले होते. अमेरिकेवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा उल्लेखही दिग्विजय सिंह यांनी ओसामा साहब असा आदरार्थी केला होता. ओसामाच्या अंत्यविधीबाबतही त्यांनी आंतरराष्ट्रीय मतप्रदर्शन केले होते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर संघ-भाजपकडे संशयाची सुई वळविण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता, पण त्याचे अपेक्षित वादळ माजले नव्हते. उलट अशी वक्तव्ये केल्याबद्दल दिग्विजय सिंह यांचीच खिल्ली उडविली जाऊ लागली.
या पाश्र्वभूमीवर शिंदे यांची वादग्रस्त विधाने प्रभावी ठरत असल्याचा अनुभव पक्षाला वारंवार येऊ लागल्याने आगामी काळात दिग्विजय सिंह यांच्यावरील जबाबदारी शिंदे यांच्या खांद्यावर टाकून दिग्विजय सिंह यांची उचलबांगडी करण्याचे पक्षाने ठरविले आहे.

सोलापूरच्या फार्म हाउसवर साहित्यिकांच्या गराडय़ातील गप्पांच्या मैफलीत देशाच्या माजी गृहमंत्र्याने कितीही वादग्रस्त विधाने कितीही गांभीर्याने केली, तर साहित्यिक टोळकी त्यावर एकमेकांना टाळ्या देत खदाखदा हसतील, कुणी साहित्यिक आपल्या वर्तमानपत्रीय रकान्याच्या रतीबात त्याचा गमतीने उल्लेख करेल किंवा एखादा स्थानिक वार्ताहर आपल्या वर्तमानपत्रातून शिंदे यांच्या भाकिताची बातमी प्रसिद्ध करेल, पण विनोदापलीकडे फारसे स्थान त्याला मिळणार नाही. मुळातच, विनोद हाच शिंदे यांच्या स्वभावाचा स्थायिभाव असल्यामुळे आणि कितीही गंभीर विधान हसतहसतच करण्याची त्यांची सवयच असल्यामुळे त्यांची वक्तव्ये केवळ हसण्यावारी नेली जातील, पण हीच विधाने त्यांनी, अगदी हसतहसत, दिल्लीत पत्रकारांसमोर किंवा दूरचित्रवाणी माध्यमांसमोर केली, तरी त्यातले गांभीर्य ओळखण्याइतका मूर्ख सुज्ञपणा अनेक संबंधितांकडे असल्याने त्यावर वादळे माजतील याची पक्षश्रेष्ठींना पक्की खात्री आहे, अशी माहिती ही फाइल ‘लोकप्रभा’कडे सोपविणाऱ्या या सूत्रांनी वर्तविली.
(टीप- फाइलमध्ये असलेल्या टिपणीतही तशीच नोंद आढळत असल्याने, या माहितीची शहानिशा करण्याची गरज भासलेली नाही..)

याच फाइलमधील अन्य काही कागदपत्रांतून मिळणारी माहिती आणखीनच स्फोटक आहे. सुशीलकुमार शिंदे यांना वादग्रस्त विधाने करण्यासाठी आवश्यक असलेला स्फोटक मसाला पुरविण्यासाठी काही जाणकार व तज्ज्ञ मंडळींचे सल्लागार मंडळ नेमण्याचाही विचार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. येत्या वर्षभरात, निवडणुकीअगोदरच, असे सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या कालावधीतही शिंदे यांना मुक्त वक्तव्यांची मुभा देण्यात येणार असून शिंदे यांची विधाने विनोदाने घेतली जाणार नाहीत याची खबरदारी हे सल्लागार मंडळ घेणार आहे.
(टिपणी - काँग्रेसचा हा प्रयोग यशस्वी ठरला, तर आगामी काळात अशा सल्लागारांची सर्वच राजकीय पक्षांना कमीअधिक प्रमाणात गरज भासेल व राजकारणबाह्य़ रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असेही राहुल ब्रिगेडमधील शिक्षणतज्ज्ञ तरुणांचे मत आहे. त्यामुळे, अशा प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्याचाही काँग्रेसचा विचार सुरू आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अशा लोकसेवांच्या धर्तीवरच ‘इंडियन रूमर्स सव्‍‌र्हिस’ (आयआरएस) नावाची नवी पदनिर्मितीही करण्यात येणार असून त्यासाठी स्पर्धापरीक्षांची आखणी करण्याचेही घाटत आहे. ही पदे केवळ राजधानीतच राहणार असल्यामुळे कोणत्याही स्थानिक भाषेतून याची परीक्षा होणार नाही, असेही सध्याच्या नियमावलीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, असे या फायलीतील एका टिपणीत म्हटले आहे. अथात, त्यामुळे मराठी उमेदवार या परीक्षेसाठी साहजिकच बाद ठरणार आहेत.)
००००
या फाइलमधील कागदपत्रांत आणखीही काही नोंदी आढळतात. काही नोंदी महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने व इतर वृत्तपत्रांत येण्याआधी ‘ब्रेक’ करणे आवश्यक वाटत असल्याने त्यांचाही उल्लेख येथेच करणे आवश्यक आहे.
शहरांमधील वाढत्या साथीच्या रोगांवरून विधिमंडळाच्या विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक सरकारला धारेवर धरणार, अशी माहिती राज्याच्या गुप्तवार्ता विभागाने मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सह्य़ाद्री अतिथीगृहात महत्त्वाच्या मंत्र्यांची, वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची आणि महापालिकांच्या आयुक्तांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्र्यांनी या समस्येवरील उपाययोजना सुचविल्या. गेल्याच महिन्यात याच मुद्दय़ावर बिहारच्या विधानसभेतही गरमगरम चर्चा झाली होती. (गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र सरकार बिहारमधील अनेक घडामोडींचा सातत्याने मागोवा घेत असून बिहारच्या पावलावर पाऊल ठेवण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्याच्या गुप्त सूचनाही संबंधितांना देण्यात आल्याचे याच टिप्पणीत म्हटले आहे.) बिहार विधानसभेत या मुद्दय़ावरील चर्चेदरम्यान एका आमदारांनी सुचविलेल्या उपायावर सह्य़ाद्रीवरील बैठकीत ‘आम सहमती’ झाल्याचे या टिपणीवरून समजते.
येत्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांतील साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात येणार असून या योजनेचे नाव ठरविण्यासाठी एक समितीही नियुक्त करण्यात आली आहे. (या समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कमी प्रतिनिधित्व मिळाल्याबद्दल पक्षात नाराजी व्यक्त होत असल्याचा इशाराही या टिप्पणीतूनच देण्यात आला आहे. शिवाय, विविध योजना जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि महात्मा गांधी किंवा आझाद यांच्या नावाने सुरू असतानाही, नव्या योजनेलाही याच नेत्यांपैकी कुणाचे तरी नाव देऊन राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याच्या हालचालीही सुरू असल्याची नोंद या कागदपत्रांत सापडते.)
साथीचे आजार फैलावण्याचे मुख्य कारण डासांचा प्रादुर्भाव हेच असल्याने डासांचा नायनाट करणे हे या मोहिमेचे अंतिम उद्दिष्ट राहणार आहे. बिहार विधानसभेतील चर्चेदरम्यान, ‘डासांचे निर्बीजीकरण’ करण्याचा उपाय एका आमदाराने सुचविल्याची माहिती सह्य़ाद्रीवरील बैठकीत एका सनदी अधिकाऱ्याने दिली होती. या उपायाचाच या मोहिमेत अंतर्भाव करण्याचे ठरले आहे. हे काम जिकिरीचे असल्याने त्यासाठी प्रचंड मोठा कर्मचारी वर्ग व निधी आवश्यक असल्याचेही या अधिकाऱ्याने बैठकीत स्पष्ट केल्यानंतर कोणत्याही महत्त्वाकांक्षी मोहिमांसाठी राज्य सरकार कधीही निधीची कमतरता पडू देणार नाही, प्रसंगी त्यासाठी कर्ज घेण्याचीही सरकारची तयारी आहे, असे नि:संदिग्ध आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची नोंद या फाइलमध्ये दिसते. आता राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये डासांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेण्यात येणार असून विधिमंडळात हा विषय पटलावर येईल तेव्हा तशी घोषणा करून विरोधकांची हवा काढून घेण्याचे डावपेच सत्ताधारी पक्षाने आखले आहेत.
शिवसेनेत ‘टाळीबंदी’
राज्यात नव्याने निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबतची काही टिपणेही या फायलीत आहेत. शिवसेना-मनसेची दिलजमाई, भाजपमधील गडकरी-मुंडे वादावरही त्यामध्ये निसटते भाष्य आढळते. शिवसेनेने सध्या पक्षात ‘टाळीबंदी’ जारी केली असून वरिष्ठ नेत्यांनी घराच्या व कार्यालयांच्या तसेच शाखांच्या खिडक्याही बंद ठेवाव्यात असे आदेश उद्धवजींनी दिल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ‘टाळी देणे’ अथवा ‘टाळी घेणे’ हा पक्षांतर्गत ‘राजकीय गुन्हा’ समजला जाणार असून असे करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेतेही घराच्या, कार्यालयाच्या किंवा शाखेच्या खिडकीतून ‘डोळे मारतात’ आणि सोबत येण्याच्या खाणाखुणा करतात त्यामुळे राजकीय अस्वस्थता अधिक वाढते अशा तक्रारी मनसेचे नेते व कार्यकर्ते जाहीरपणे करू लागल्याने खिडक्या कायमच्या बंद करण्याचा आदेश जारी झाला आहे. मुंबईतील सर्व शाखांच्या खिडक्या सीलबंद करण्याची मोहीमच लवकरच हाती घेण्यात येणार असून, पालिकेने उतरविलेली होर्डिग्ज व फलक भिंतीच्या आतील बाजूंना उभे करून खिडक्या बंद करण्यात येणार आहेत. टाळीचे अधिकार केवळ उद्धवजींना देण्याबाबतचा एक ठरावही येत्या काही दिवसांत होणाऱ्या आमदारांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमत केला जाणार आहे. मात्र, टाळी ‘देण्याचे’ अधिकार, की टाळी ‘घेण्याचे’ अधिकार याबाबत अद्याप पक्षातच संभ्रम असल्याने, भाजपचे गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत चर्चा करून हा संभ्रम दूर करण्यात येणार आहे. मनोहर जोशी आणि मुंडे यांचे सख्य लक्षात घेऊन मुंडे यांच्याशी चर्चा करण्याकरिता मनोहर जोशी यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे. यामुळे राऊत समर्थकांत काहीशी नाराजी असली तरी त्यांची समजूत काढण्याचे काम नार्वेकर करणार आहेत.
भाजपमध्ये दिलजमाई
शिवसेना आणि मनसे यांनी महायुतीत एकत्र यावे व महायुतीची शक्ती वाढावी यासाठी प्रयत्न करणारे गोपीनाथ मुंडे यांची शक्ती मात्र पक्षातच कमी होत असल्याने, राज-उद्धव यांच्या ऐक्याबरोबरच मुंडे-गडकरी ऐक्य व्हावे यासाठी पक्षांतर्गत प्रयत्नांना यश येणार असे दिसत आहे. यासाठी खुद्द विनोद तावडे यांनीच पुढाकार घेतला आहे. गोपीनाथ मुंडे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, याचा पुनरुच्चार गडकरी यांनी करावा व उभयतांमधील वाद मिटवावा असे तावडे गटाचे प्रयत्न असले, तरी गडकरी गट त्यावर समाधानी नाही. गडकरी हे संघटनात्मक राजकारणात आहेत आणि आपण संसदीय राजकारण करत असल्याने वादाचा प्रश्नच नाही, असे मुंडे यांनीच जाहीर केले होते. याची आठवण करून देत, संघटनात्मक बाबीत मुंडे ढवळाढवळ करणार नसतील तरच ऐक्य शक्य होईल, असा पवित्रा गडकरी गटाने घेतला आहे. विशेष म्हणजे, गडकरी हे आता माजी राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने, त्यांचे वजन दिल्लीत वाढलेले असतानाच, शरद पवार यांनीही आपले वजन गडकरींच्या पारडय़ात टाकले आहे. पूर्ती प्रकरणानंतरच्या वादात शरद पवार व अजित पवार यांनी एकमुखाने गडकरींची स्तुती करून मुंडे यांनाच शह दिला होता. बीडमधील घरफोडीच्या प्रकरणानंतर मुंडे व अजितदादा यांच्यात भडकलेल्या वादामुळेच पवार कुटुंब मुंडे यांच्या विरोधात गडकरींच्या पाठीशी उभे असले तरी दिल्लीत भाजपमध्ये पवार यांच्याविषयी ‘आशादायक ’ आदराची भावना असल्याने गडकरींना त्याचाही लाभ मिळेल व मुंडेंना माघारच घ्यावी लागेल, मगच दिलजमाई होईल अशी शक्यताही या कागदांवरून व्यक्त होते.
००००
या फायलीतील आणखीही कागदपत्रे चाळली असता स्फोटक बातम्यांचा खजिनाच हाती सापडत गेल्याने कुतूहलापोटी शेवटच्या पानापर्यंत चाळणी केली असता, फाइलच्या अखेरच्या पानावरील नोंदही येथे नमूद करणे आवश्यक वाटते. या नोंदीनुसार, ‘सनसनी’ नावाने वृत्तप्रसारण करणाऱ्या एका वाहिनीच्या होळीनिमित्तच्या प्रसारणासाठी तयार करण्यात आलेल्या नोंदींची ही फाइल असल्याचे दिसते; तथापि होळीच्या दिवशी त्या वाहिनीवर अशा प्रकारच्या कोणत्याच बातम्या न झळकल्याने आमच्या प्रतिनिधीने मिळविलेल्या माहितीनुसार, या फाइलची एकमेव प्रत गहाळ झाल्याने त्या दिवशीचे हे सनसनी वृत्तप्रसारणच रद्द करण्यात आले. अशा बातम्या पुरविणाऱ्या सूत्रांचे जाहीर आभार मानण्याची प्रथा प्रसार माध्यमांत नाही; परंतु एका वृत्तवाहिनीवर कुरघोडी करून एप्रिलच्या पहिल्याच दिवशी ‘ब्रेकिंग न्यूज’ची ती संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही या सूत्रांचे शतश: आभारी आहोत.

http://www.lokprabha.com/20130405/cover.htm

Wednesday, March 27, 2013

होळीच्या ओळी...

होळीच्या ओळी...

अंतर्मन शहाणं असतं,
गप म्हटलं, की गप्प बसतं...

मला सारखं बजावत होतं,
दुष्काळ आहे, पाणी जपून वापर.
म्हटलं, नासाडीचं नको
डोक्यावर खापर...

... सकाळी मनसुबे रचले खूप
होळीची शाम रंगीन बनवू ...
रंगासोबत नशा जमवू

पण अंतर्मन आडवंच आलं,
बाहेरच्या मनाला पुरतं घेरलं...
 'होली है, अल्कोहोली नही' म्हणत,
मनसुब्यावर पाणीच फेरलं!

मी त्यालाच दरडावलं...
जपून वापर, दुष्काळ आहे...
मनसुब्यांवर पाणी फेरणे
दुष्काळात गैर आहे...

अंतर्मन शहाणं असतं..
आता ते गप्पच बसतं
........

Friday, March 22, 2013

वेताळ आणि वेताळ !

‘आपल्या देशाच्या वाटचालीची दिशा योग्य आहे?.. तुम्हाला काय वाटतं?’.. असा प्रश्न अचानक कुणी तुम्हाला केला तर? तुम्ही लगेचच, क्षणाचाही विलंब न लावता, विश्वासानं उत्तर देऊ शकाल? की हा प्रश्न तुमचं डोकं पोखरून उत्तर शोधू लागेल?.. बराच प्रयत्न करून एखादं उत्तर सापडलंच, तर ते बरोबर असेल की चूक, या संभ्रमाचा भुंगा तुमच्या डोक्यात गुणगुणू लागेल.. आणि अखेर, तुम्ही उत्तर राखून ठेवाल. मग ज्याच्याशी तुम्ही विश्वासानं विचार शेअर करता, त्याला हा प्रश्न विचाराल. कदाचित, त्याचीही तुमच्यासारखीच अवस्था होईल, आणि या प्रश्नाची परिक्रमा सुरू होईल.. परवा कुठल्या तरी ‘न्यूज पोर्टल’वर हा प्रश्न मला दिसला. असे प्रश्न एकदा मनाला चिकटले की विक्रमादित्याच्या मानगुटीवर बसलेल्या वेताळासारखे चिवटपणे मनात रुतून राहातात. उत्तर मिळेपर्यंत हटत नाहीत. मग मी उत्तराच्या मागे लागलो. आणि पंतप्रधानांची आश्वासनं आठवली. अर्थमंत्र्यांनी दिलेली विकासदराची ग्वाही आठवली.. आणखी काही वर्षांनी देश महासत्तांच्या रांगेत जाणार, या घोषणा कानाशी दुमदुमू लागल्या. अमेरिकेसारख्या प्रगत देशांत भारतीय बुद्धीने मारलेल्या भराऱ्या आठवल्या.. सारे जग जेव्हा मंदीच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात होतं, तेव्हा भारत सहजपणे मंदीचा महापूर तरला, ते आठवलं आणि उत्तर ठरलं. ‘हो.. आपला देश भविष्याच्या योग्य वाटेवरूनच पुढे चालला आहे!’ असं उत्तर मिळालं की मानगुटीवर बसलेला विचाराच्या वेताळाचा विळखा सोडविण्याची घाई होते. आपण उत्तर देऊन टाकतो. उत्तर चुकीचं ठरलं तर आपल्याच डोक्याची शंभर शकलं होतील, या इशाऱ्याचं भानच राहात नाही. तसंच झालं. आणि आपलं उत्तर काहीतरी चुकतंय, असं उगीचच वाटू लागलं. मानगुटीवरचा प्रश्नाचा वेताळ आपली पकड आणखीनच घट्ट करतोय, असं वाटू लागलं. मग बेचैनी.. अस्वस्थता! अशा वेळी कुणालाही, कुणाचा तरी आधार लागतो. मीही उत्तराच्या शोधात भटकू लागलो आणि आसपासच्याच अनेक घटनांतून, अगोदर मनात आलेल्या सगळ्या सकारात्मक उत्तरांना छेद मिळू लागला. .. ट्रेनमध्ये खिडकी मिळाल्यावर निवांतपणे कानाच्या हेडफोनमधून गाण्याची आवडती धून ऐकत बसलेलो असतानाच, कुणीतरी हलक्या हाताने पायावर थोपटल्याचं मला जाणवलं आणि मी चमकून समोर बघितलं. केसांचं अस्ताव्यस्त जंजाळ पसरलेली, नजरेतलं केविलवाणेपण जाणीवपूर्वक माझ्या डोळ्यात घुसवत चिमुकल्या पंजाची बोटं एकत्र करून तोंडाजवळ नेणारी पाच सहा वर्षांची एक मुलगी भीक मागत समोर उभी होती. पुन्हा बाहेर बघत मी हातानंच नकार दिला. तरीही तिचं केविलवाणं हात पसरणं सुरूच होतं. तिनं चक्क पायावर डोकं ठेवलं आणि मला अवघडल्यासारखं झालं. खिशात हात घालून मी एक नाणं तिच्या हातावर ठेवलं. तिनं ते बघितलं, केविलवाणे डोळे क्षणार्धासाठी आनंदानं चमकले. तिनं ते नाणं मुठीत घट्ट धरलं. एका स्टेशनवर गाडी थांबत असतानाच धावत्या गाडीतून फलाटावर उडी घेतली आणि माझ्यासकट डब्यातल्या सगळ्यांचा श्वास क्षणासाठी रोखला गेला. दरवाज्याशी उभे असलेल्यांच्या नजरा, मागे जाणाऱ्या फलाटावर वळल्या. ती मुलगी धडपडत उठली होती. तिनं स्वतला सावरलं आणि शांतपणे, जणू काहीच झालं नाही अशा आविर्भावात ती बाकडय़ाकडे वळली. मग तिनं ती मूठ उघडली.. एव्हाना गाडीनं वेग घेतला होता. पण तिच्या मुठीतलं ते नाणं सुरक्षित आहे, हे जाणवल्यावर तिचे डोळे नक्कीच चमकले असणार, असं मला मनोमन वाटून गेलं. कोण असेल ती मुलगी? तिचे आईबाप, भावंडं, घर कुठे असेल?.. तिचं भवितव्य काय असेल?.. अशीच, फलाटावर आणि धावत्या गाडीत भीक मागतच तिचं आयुष्य संपेल?.. बंद मुठीतलं नाणं सांभाळत धावत्या गाडीतून उडी मारताना तिला काही झालं तर?.. असे असंख्य प्रश्न समोर उभे राहिले. आणि ‘त्या’ प्रश्नाला थेट जाऊन भिडले. मी अस्वस्थ! घरी पोहोचल्यावर सवयीप्रमाणे कॉम्प्युटर काढला आणि लक्षात आलं.. तो ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’चा दिवस होता. उगीचच, सवयीप्रमाणे, इकडच्या तिकडच्या बातम्या धुंडाळत बसलो आणि एका साईटवर स्थिरावल्यावर पुन्हा तो प्रश्न समोर उभा राहिला. लोकसभेत अनाथ, निराधार मुलांसंदर्भात एक चर्चा त्याच दिवशी झाली होती. कुणा खासदारानं युनिसेफच्या अहवालाचा हवाला देत देशातील अशा मुलांच्या भवितव्यावरचे प्रश्नचिन्ह सभागृहात उभे करण्याचा प्रयत्न केला होता. देशभरातील अनाथ, निराधार मुलांपैकी ८९ टक्के मुलगे आणि ११ टक्के मुली आहेत. ४९ टक्के मुलं ११ ते १५ वयोगटातली आहेत, चार टक्क्य़ांना आपलं नावसुद्धा माहीत नसतं, आणि ९२ टक्के मुलं, दारू आणि नशिल्या पदार्थाच्या आहारी जाऊन माणसांच्या जगापासून स्वतला वेगळं करून घेतात.. देशभरातील सरकारी बालगृहांमध्ये अशी तब्बल ७५ हजार मुलं दाखल आहेत.. हे त्यावर मंत्र्यांनी दिलेलं उत्तर. ही आकडेवारी फक्त अधिकृत बालगृहांमधली. रस्त्यावर भटकणारी, आकाशाच्या छपराखाली एकाकीपणे भटकणारी, आणखी किती असतील?.. डोक्याची शंभर शकलं पुन्हा समोर लोंबतायत, असं मला वाटू लागलं. मी कॉम्प्युटर बंद केला. आणि ‘त्या’ प्रश्नाचं खरं उत्तर काय असेल, या प्रश्नाचा भुंगा पुन्हा डोक्यात भणभणू लागला. ..दादर स्टेशनवर एक महिन्याच्या एका बाळाला कुणीतरी चोरून नेलं आणि चोराचा शोध जारी आहे, अशी बातमी नंतर काही दिवसांनी पुन्हा छळू लागली. .. रेल्वे स्टेशनांच्या फलाटांवर, रस्त्याकडेच्या फूटपाथवर, कचराकुंडय़ांच्या आसपास, कधी कुणी लहान मुलं दिसली की पुन्हा हा प्रश्न डोक्यातून बाहेर येतो. ‘खरंच, आपल्या देशाच्या भविष्याची वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे?’ http://www.lokprabha.com/20130329/sunya.htm

Thursday, March 14, 2013

दोन बातम्या...

दोन बातम्या... एखादा दिवस निवांत असतो. ठरवलेलंही काहीच नसतं. मग वेळ रेंगाळत राहतो, आणि कंटाळवाणेपण येतं.. हा प्रत्येकाचाच अनुभव असतो. असं कंटाळवाणेपण घालवण्यासाठी प्रत्येकजण आपलीआपली युक्ती शोधतं. अशाच एका कंटाळवाण्या वेळात एकदा कॉम्प्युटरवर निरपेक्ष धांडोळा घेताना, मी मेलबॉक्स उघडला. बरेच मेल डिलीट करायचेच राहून गेलेले. रिकामपण असलं, की असा भरगच्च मेलबॉक्स उघडून जुने मेल वाचायला मजा येते, हे मला जाणवलं. पूर्वी आमच्या घरी एक हुकाच्या आकाराची तार होती. त्याला खाली एक लाल, लाकडी चकती होती. त्यामध्ये जुनी पत्रं लटकलेली असायची. वेळ जाईनासा झाला, की मी ती जुनी पत्रं पुन्हापुन्हा वाचायचो. प्रत्येक वेळी काही ना काही खजिना हाती आल्याचा आनंद व्हायचाच. प्रत्येक पत्रातला माणूस, आपल्याशी पुन्हा बोलतोय, असा जिवंत भास व्हायचा. पुढे ती तार गेली. .. आता इंटरनेटची सवय वाढल्यावर, पत्रांच्या त्या तारेऐवजी, मेलबॉक्स उघडायला आवडू लागलं. अनुभव मात्र, तोच. जुनाच! त्या दिवशी अशाच अनुभवाच्या अपेक्षेने मी मेलबॉक्स उघडला. एकदम मागे गेलो, आणि एका जुन्या ई-मेलवर क्लिक केलं. एक लिंक समोर आली. मी त्या लिंकवर क्लिक केलं, आणि एक पान उघडलं गेलं. एक बातमी होती. जुनी.. साठवलेली. मग आठवलं, आपणच ती जपून ठेवली होती. कधीतरी, कशाच्या तरी संदर्भात वापरता येईल म्हणून.. आज ती बातमी समोर उघडली, आणि आजच वाचलेली एक ताजी बातमी लगेचच समोर पुन्हा उभी राहिली. दोन्ही बातम्यांचा एकमेकांशी खरं तर काहीच संबंध नव्हता. .. असं काही झालं, की रिकामपणामुळे शिणलेलं डोकंदेखील नव्या कामाला लागतं. ती जुनी बातमी एव्हाना मी पुन्हा वाचून काढली होती. गुजरातमधली बातमी होती. ऑगस्ट २०११ मधली. मेहसाणा जिल्ह्यच्या वडगाम नावाच्या गावात, एका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यानं आत्महत्या केली होती. खरं तर आत्महत्या, बलात्काराच्या घटना जवळपास रोजच घडत असतात. पण ही बातमी वेगळी होती. मरणाचा, मरणानंतर काय असतं, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या कुतूहलातून त्यानं आत्महत्या केली होती. ही माझी आत्महत्या नाही, तर मरण समजून घेण्याचा आणि त्याच्या अनुभवाचा शोध आहे, असं त्या प्राचार्यानं मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. त्याच्या त्या मृत्यूपूर्व नोंदीचा पूर्ण तपशील त्या बातमीत होता. पण मला तो पुन्हा वाचवेना. मी बातमी बंद केली. उदासउदास झालं. असा अनुभवही कधीकधी प्रत्येकालाच येत असतो. डोक्यात भणभणणारी ती बातमी झटकण्याचा मी प्रयत्न करू लागलो. .. आणि अचानक ती, ताजीताजी वाचलेली बातमी आठवली. मग शिणवटा गेला. मरणाला कवटाळणाऱ्या त्या माणसाचं जगणंही कदाचित उदास असेल. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नच त्यानं कधी केला नसेल. कदाचित, बाहेर पडण्याच्या वाटा शोधण्याची त्याची इच्छादेखील नसेल. तसं असतं, तर मरणामागचं गूढ शोधण्याऐवजी, जगण्यातला आनंद शोधण्यात त्यानं आयुष्य वेचलं असतं. त्या शोधात त्याला कदाचित, उणंपुरं आयुष्यही कमी वाटलं असतं.. ..त्या दुसऱ्या बातमीमुळे हा विचार माझ्या मनात आला. ती दुसरी बातमी अमेरिकेतली होती. अमेरिकेतल्या ओहियोत रेबा विलियम्स नावाच्या एका वृद्धेनं, ८७ वर्षांंपूर्वी अर्धवट राहिलेलं शालेय शिक्षण तिनं १०६ व्या वर्षी पूर्ण केलं होतं. शाळा सुटल्यानंतर पुढे तिचं लग्न झालं, मुलंबाळं झाली, आणि त्यांचा छोटासा कौटुंबिक व्यवसायही बहरला. मग आपलं राहून गेलेलं शिक्षण पूर्ण करण्याचा तिला ध्यास लागला. तिनं त्याचा पिच्छा पुरवला, आणि ओहियोच्या स्कूल बोर्डानं अलीकडेच तिला शिक्षण पूर्ण केल्याचा दाखला दिला.. .. अति वृद्धत्वामुळे अंथरुणाला खिळलेल्या त्या वृद्धेच्या डोळ्यात ही बातमी ऐकल्यानंतर जी चमक उमटली असेल, त्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही, हे मला जाणवलं. त्या ध्यासापोटी तिनं आपलं वृद्ध आयुष्य पणाला लावलं होतं. त्यासाठीच जणू ती जगली असेल. त्या जगण्यातच तिनं आपला आनंद शोधला असेल. शारीरिक वृद्धत्वातही तिचं मन मात्र, उमेदीनं भारलेलंच असेल. गुजरातेतल्या त्या प्राचार्याच्या मरणाच्या शोधाची बातमी वाचल्यानंतर बरोब्बर एक वर्षांनंतर वाचलेली आणखी एक बातमी मला आठवली. १०६ वर्षांंच्या रेबाच्या बातमीत त्या बातमीचेच प्रतिबिंब आहे. ऑगस्ट २०१२ मध्ये, ओहियोमधीलच अ‍ॅन कोलगिओव्हनी नावाच्या ९७ वर्षांंच्या वृद्धेनं आपलं पदवीचं स्वप्न पूर्ण केलं. त्याच दिवशी तिचा नातूदेखील पदवी घेऊन बाहेर पडला होता. शिकण्याच्या वयातच, मंदीचा विळखा पडला आणि अ‍ॅनला वडिलांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी शिक्षण अध्र्यावरच सोडून द्यावं लागलं. पदवीदान समारंभातून बाहेर पडताना अ‍ॅनच्या थकलेल्या डोळ्यातून तिच्या सुरकुतलेल्या गालांवर अश्रू ओघळत होते, पण ती रडत नव्हती. ‘येस.. आय अ‍ॅम ग्रॅज्युएट नाऊ’ असं म्हणत तिनं डोळे पुसले, आणि नातवासोबत थरथरती पावलं पुढे टाकत ती पदवीदान सभागृहातून बाहेर पडली, तेव्हा सभागृहातील साऱ्या नजरा वृद्धत्वानं वाकलेल्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात आदरानं झुकल्या होत्या.. .. ऐन उमेदीत मरणाचा अनुभव शोधणं, आणि मरणाच्या उंबरठय़ावर असतानाही, उमेदीनं जगण्यातला आनंद शोधणं, यातलं अंतर या बातम्यांनी दाखवून दिलं होतं. अशा वेळी, कितीही रिकामा वेळ असला, तरी तो पुरेनासा होतो, हेच खरं! http://www.lokprabha.com/20130315/shunya-prahar.htm

Friday, February 22, 2013

पैसा आणि पोट

रात्र चढलेली. मुंबई परतीच्या प्रवासाला लागलेली. सकाळी रेल्वेतून उतरणाऱ्या गर्दीचे लोंढे आता रेल्वेत चढण्यासाठी जीवघेण्या स्पर्धेच्या तयारीत. मीही याच गर्दीतला एक. रांगेतून चालणाऱ्या, पुढच्याच्या पावलावर पाऊल टाकत चालणाऱ्या मुंगीसारखा. पुढचा थबकला तर थबकायचं. नाही तर चालत राहायचं. आसपास काही वेगळं जाणवलं, तरी तिकडे बघायचं नाही.. कारण, वेळ नसतो. गाडी चुकली, तर पुढे बस चुकते. मग स्टॉपवर रखडावं लागतं. सगळंच वेळापत्रक कोलमडतं. त्यापेक्षा, आसपास न बघितलेलंच बरं. त्या दिवशी मी गाडी पकडायच्या गडबडीत घाईनं चालत होतो, आणि अचानक एक केविलवाणा हात समोर पसरला गेला. मी थोडंसं चिडूनच, चमकून वर बघितलं. एक मध्यमवयीन स्त्री समोर उभी होती. कडेवर एक लहान मूल, हाताशी दोन मुलं. भांबावल्यागत भिरभिरत्या डोळ्यांची. विस्कटलेल्या केसांची, मळकटलेल्या फाटक्या कपडय़ांत गुंडाळून घेतलेली.. त्या बाईच्या डोळ्यातही केविलवाणेपण ठासून भरलेलं. माझे पाय थबकले. ‘भाऊ, दुष्काळानं सगळं धुतलं. आम्ही शेतीवाडीवाली माणसं. पण हाती काही नाही राह्य़लं. वडापाव खायला घाला. पोरं लई भुकेली हाईत’.. त्या केविलवाण्या आवाजानं मन फाटलं. पण नेहमीसारखीच कुणीतरी भिकारीण असेल, असं समजून चालू लागलो. ती माझ्या मागोमागच हात पसरून चालत होती. शेवटी, मी बाजूच्या स्टॉलवर गेलो आणि चार वडापावची ऑर्डर दिली. मग तिनं माझ्यासमोर पसरलेला हात झटक्यात मागे घेतला. ‘भाऊ, वडापाव नका देऊ.. पैसे द्या. पंचवीस-तीस रुपये. उद्याला व्हतील!’ तिनं आर्जवी स्वरात विनवलं. मग मी खिशात हात घातला. वीस रुपये काढून तिच्या हातावर दिले. तिनं मला नमस्कार केला आणि ती निघून गेली. मी गाडीत चढलो. गाडीतली माणसं, आपापल्या हातातल्या मोबाइलवर काही ना काही करत होती. प्रत्येकजण समोरच्या मोबाइलमध्ये रमलेला. सगळे जणू आत्ममग्न! आपल्याआपल्या जगण्याच्या आनंदात जगाचा विसर पडल्यासारखं.. गाडी सुरू झाली आणि माझा ‘शून्य प्रहर’ सुरू झाला. नजर आसपास भिरभिरू लागली.. आणि बाजूच्याच एका प्रवाशावर स्थिरावली. गाडीनं वेग घेतल्यावर तो उठला. रॅकवरची बॅग काढली. चेन उघडून आतली पेपरची घडी काढली. बॅग पुन्हा वर टाकली आणि तो ऐसपैस बसला. त्याच्या हातातला पेपर जुनाच होता. त्यानं खिशाचं मार्कर पेन काढलं. वाचता वाचता तो कुठल्या तरी मजकुरावर खुणाही करत होता. मग मी त्याच्या पेपरात मान खुपसली. त्याच्या ते लक्षात आलं. माझ्याकडे बघून तो हसला. त्याच्या हातातला पेपर मराठी होता. त्यानं खुणा केलेल्या बातम्या माझ्यासमोर धरल्या. एक बातमी दुष्काळाची होती. मराठवाडय़ात पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू आहे. आताच अनेक गावांना पाणीटंचाईचे चटके बसताहेत. कधीतरी एखादा टँकर गावात येतो, आणि माणसांची झुंबड उडते. मग भांडणं, मारामाऱ्या.. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्यानं केंद्राकडे पैसे मागितले आहेत! दुसऱ्या बातमीत, जनावरांच्या छावण्यांच्या भ्रष्टाचाराचा मजकूर होता. दुष्काळाचा ‘धंदा’ सुरू झाल्याचा सूर त्या बातमीत स्पष्ट उमटला होता! आणि तिसरी बातमी, मुंबईची होती. महापालिकेच्या अर्थसंकल्पाचं आयुक्तांचं भलंमोठं भाषण. त्यातली एक ओळ त्यानं मार्करनं लाल केली होती. तेवढीच त्यानं माझ्यासमोर धरली. मुंबईला रोज होणाऱ्या पाणीपुरवठय़ापैकी, जवळपास ३० टक्के पाणी वाया जातं, असं काहीतरी त्यात म्हटलं होतं. वाया जाण्याचं हे प्रमाण चारपाच टक्क्य़ांनी कमी करायचा संकल्प आयुक्तांनी सोडला होता. त्यासाठी पैशांची गरज असल्याचं काहीतरी म्हटलेलं. .. ‘सगळ्यांना पैसे हवेत.’अचानक तो म्हणाला, आणि गूढपणे हसला. मी चमकून त्याच्या तोंडाकडे बघितलं. ‘अहो, तिकडे माणसं पाण्यासाठी पायपीट करतायत आणि इकडे, दुष्काळाच्या नावानं राजकारण सुरू झालंय. पैसे हवेत सगळ्यांना. कशाला?’ असं म्हणत त्यानं उजव्या हाताची सगळी बोटं एकत्र केली, आणि तोंडाजवळ नेत तो हसला. ‘काय, बरोबर ना?’ त्यानं विचारलं. उत्तराची वाट न बघता बोलू लागला. ‘आपण मुंबईकर म्हणजे ना, पाण्याची किंमत आपल्याला नाहीये. कितीतरी पाणी आपण विनाकारण वाया घालवतो. आपल्याकडे पैसा पण पाण्यासारखा वाहातोय. जरा इकडे बघा म्हणावं..’ वर्तमानपत्रातल्या दुष्काळाच्या बातमीवर बोट आपटत तो तिडिकीनं बोलला. ‘वाया जाणारं पाणी वाचवलं, तर चार गावांची तहान भागेल. पण यांना काही करायचंच नाहीये. तसं केलं, तर पैशाचे प्रवाह बंद होतील ना..’ त्याच्या डोळ्यातही संताप संताप दिसत होता. मग त्यानं तिरिमिरीतच तो पेपर गुंडाळला. रॅकवरची बॅग काढली. दुसरा पेपर काढला आणि घडी उलगडत पुन्हा त्यानं मार्कर पेन सरसावलं. त्याचे डोळे चमकले आणि त्यानं सगळी बातमीच रंगवून टाकली. एका राज्यमंत्र्याच्या घरातल्या लग्नाची चमचमीत बातमी होती. शाही जेवण, शाही वरात आणि जखमेवर मीठ म्हणजे, लग्नाच्या मेजवानीचा शाही मेनू बनवण्यासाठी दुष्काळग्रस्त भागातून माणसं आणलेली.. ती बातमी वाचता वाचता तो अक्षरश शहारला. ‘इथे मेजवान्या झडतायत आणि तिकडे माणसं, जनावरं उपाशी मरतायत. जेवण बनवायला आणलेल्या त्या लोकांच्या घशाखाली घास उतरला असेल त्या मेजवानीतला?.. हा मंत्री, आमच्या कोकणातला. हा काही पिढीजात श्रीमंत नाही. मग एवढा पैसा आला कुठून त्याच्याकडे..त्याचे साहेब म्हणे, चिडले त्याच्यावर. तिकडे दुष्काळ असताना संपत्तीचं असं प्रदर्शन करतो म्हणून.. पण मी म्हणतो, एवढा पैसा आला कसा त्याची चौकशी करा ना..’ तिरीमिरीत त्यानं तोही पेपर गुंडाळला. काही क्षण तसाच बसून राहिला. पण अस्वस्थतेची रेषा त्याच्या चेहऱ्यावरून पुसलीच जात नव्हती. .. माझ्या डोळ्यासमोर, वाटेत भेटलेली ती केविलवाणी, हात पसरून भीक मागणारी, तीन मुलांची आई दिसू लागली.. अचानक तो पुन्हा जागेवरून उठला. रॅकवरची बॅग काढली. चेन उघडली, आणि गुंडाळलेला हेडफोन काढला. खिशातून मोबाइल काढून त्यानं हेडफोन जोडला, आणि कानाला लावला.. आता त्यानं डोळे मिटले होते. त्याच्या चेहऱ्यावरची ती अस्वस्थ, संतापाची रेषा पुसट होत चालली होती. मधूनच तो कानात घुमणाऱ्या सुरांना दाद देत होता. आसपासच्या गर्दीप्रमाणेच, तोही आता मोबाइलमधल्या गाण्यात गुंगला होता. आपआपल्या जगण्याच्या आनंदात जगाचा विसर पडल्यासारखा! मधूनच त्यानं डोळे उघडले. केविलवाणा हसला. ‘खूप त्रास होतो हो, पेपर वाचून. त्यापेक्षा, हे कानाशी असलं की जगणं तरी सुसह्य़ होतं.’ तो ओशाळवाण्या सुरात म्हणाला, आणि पुन्हा त्याचं मन कानातल्या सुरात रमलं. .. मोबाइलमुळे क्रांती झाली म्हणतात, ते काही खोटं नाही! http://www.lokprabha.com/20130301/citi.htm

Friday, February 15, 2013

मनाचा पिसारा..!

आज नाथाला नेहमीपेक्षा लवकरच जाग आली. आळोखेपिळोखे देत तो बेडवरून उतरला आणि ब्रश करून गॅलरीत जाऊन उभा राहिला. ही त्याची नेहमीची सवय. नाथानं बाहेर बघितलं. रोजचचं दृश्य. समोरच्या बदामाच्या झाडावर कावळ्यांचे थवे कलकलाट करत होते. नाथाची नजर बदामाच्या झाडावर स्थिरावली. आणि त्याला धक्का बसला. .. .. हे झाडसुद्धा नाथाच्या डोळ्यादेखतच लहानाचं मोठं झालं होतं.. त्याच्यावर लगडलेली बदामाची फळं मटकावायला पोपटांचे थवे दिवसभर मुक्काम ठोकून असायचे. 'आपल्याला हे आजच का आठवलं?' नाथा बुचकळ्यात पडला. त्यानं नीट झाडाकडे बघितलं. आत्ता बदामाचा सीझन असायला हवा होता, असं त्याला वाटून गेलं. मग त्याला आणखी एक गोष्ट जाणवली, आणि तो बेचैन झाला. बदामाच्या झाडाची पानं लालसर व्हायला लागली होती. पानं पिकली होती. त्यानं जमिनीवर बघितलं. गुलाबी, सुकल्या पानांचा खच पडला होता. वाऱ्याचा एक झोत आला, आणि झाड शहारलं.. झाडावरची उरलीसुरली गुलाबी पानं जमिनीवर झेपावली. नाथानं आणखी निरखून झाडाकडे बघितलं. फांदीच्या टोकाला कोवळे, हिरवे कोंब फुटलेले दिसत होते. 'म्हणजे, झाड पुन्हा बहरणार'.. नाथा स्वतशीच म्हणाला.. तेवढय़ात मागे टेबलावर कपबशीचा खण्णकन आवाज झाला. नाथा दचकून मागे वळला. त्याला हसू आलं. चहाचा घोट घेत त्यानं समोरचा पेपर उघडला. पहिल्याच पानावरचा गुलाबी रंगातला भलामोठ्ठा बदाम पाहून नाथाला आठवलं. आज व्हॅलेंटाईन डे!!..नाथानं पुन्हा बदामाच्या झाडाकडे बघितलं. मघाशी केविलवाणं दिसणारं ते झाड नाथाला आता वेगळंच वाटलं. त्यानं स्वयंपाकघरात बघितलं. बायको चोरून आपल्याकडेच पाहातेय, असं त्याला वाटलं. मग चहाचा कप हातात घेऊन तोच आत गेला, तेव्हा नाथाच्या नजरेत खूप जुना, 'तेव्हा'चा खटय़ाळपणा उमटला होता. नाथाला आठवलं.. सकाळी ऑफिसला जाताना ती नेहमी स्टॉपवर दिसायची. बसची वाट पाहात. एकदा आपल्यालाच खूप उशीर झाला, तेव्हाही ती बसची वाट पाहातच होती. आपण शेजारून गेलो, तेव्हा तिनंच शेवटी अंगठा वर केला. मग आपण स्कूटर थांबवली, आणि ती मागं बसली. नेमंकं वाटेतच पेट्रोल संपलं. थोडं ढकलत गाडी पंपापर्यंत नेली. पंपावर जाईपर्यंत आपण घामाघूम झालो होतो. गाडी स्टँडला लावली, आणि हेल्मेट काढून टकलावरचा घाम पुसत आपण तिच्याकडे पाहिलं. ..तिचे डोळे आपल्या टकलाकडे लागले होते. रांगेत उभं राहून बराच वेळ गेला. ती अस्वस्थ.. शेवटी, घडय़ाळाकडे पाहात ती म्हणाली, 'अंकल, मी जाते.. थँक्यू, पण उशीर होतोय खूप.'तिच्या खळाळत्या सुरात खटय़ाळपणा भरला होता. ओशाळून आपण पटकन हेल्मेट डोक्यावर घातलं, पण सगळं संपलं, असं तेव्हा वाटलंच होतं.. .. हे सारं आठवून नाथानं बायकोकडे बघितलं, आणि टकलावरून हात फिरवत तो हसला. बायकोनंही त्याच्याकडे बघितलं, आणि ती खुशीत हसली.. 'अंकल, उठा.. आज सुट्टी नाहीये'.. ती म्हणाली. नाथाला खटय़ाळपणाची चांगलीच लहर आली होती. पण त्यानं मन आवरलं. .. कारण तिथे पिसारा फुलला होता!! http://www.loksatta.com/vruthanta-news/heart-feathers-61075/