Sunday, February 27, 2011

कवडीचे मोल !...

शंख आणि कवड्या-शिंपल्या म्हणजे दळभदद्रीपणाची लक्षणे, हा जुना समज आता इतिहासात गडप झालाय. कारण, कधीकाळी कवडीचेसुद्धा मोल नसलेल्या या वस्तूना आता अमोल भाव येतोय... सिंधुदुर्गच्या समुद्र किनारी भागात सापडणार्‍या शंख-शिंपल्यांसारख्या समुद्री वस्तूंनी पर्यटकांना भुरळ घातली आहे. किनारी भागातील शेकडो कुटुंबांच्या हातात या वस्तूंमुळे पैसा खेळू लागला आहे. यामुळेच, गोड्या पाण्यात मोत्यांचे भौतिक संवर्धन करण्याच्या नव्या व्यवसायाची स्वप्ने श्रमाचं मोल ओळखलेल्या सिंधुदुर्गाला पडतायत...

अथांग निळ्या खार्‍या पाण्याखालचा खजिना, हे सामान्यांसाठी सततचे गूढ आहे. अलीकडे मात्र यावर अनेक संशोधने सुरू असून, कोकणाच्या समुद्रात जैविक संपत्तीची खाण आहे, हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. कोकणाच्या समुद्र किनार्‍यावर राहणार्‍या प्रत्येकाचे या नीलसंस्कृतीशी समरस नाते जडलेले आहे. हजारो संसार तर याच संस्कृतीने जपले आहेत. पण आता केवळ मासेमारी उद्योग एवढीच या संस्कृतीची मर्यादा उरलेली नाही. समुद्रात आणि काठावरल्या वाळूतही सापडणारे शंख, शिंपले, तसेच समुद्री शेवाळ, आणि वेगवेगळ्या दगडांनाही व्यावसायिकदृष्टय़ा मोठी किंमत येत आहे.

पर्यटनभूमी म्हणून मान्यता मिळत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रातून मिळणार्‍या शोभिवंत वस्तूना मागणी वाढू लागली आहे. पूर्वी कवडीमोलाचे मानले जाणार्‍या शंख, शिंपल्यांवर कलात्मक साज चढवून त्या वस्तू विक्रीचा व्यवसाय जिल्ह्यातील तरुणांच्या रोजगाराचे साधन बनला आहे. मालवणात तर अशा वस्तू बनविणारे दोन कारखाने उभे राहिले आहेत.

जगभरात मोत्याला मागणी वाढत आहे. नैसर्गिक मोत्याचे उत्पादन ही मागणी पुरवायला कमी पडते यामुळे कल्चर्ड व कृत्रिम मोत्याची संकल्पना समोर आली. याचबरोबर गोडय़ा पाण्यातील मोत्याची शेती पध्दतीही विकसित झाली. सध्या बाजारात कल्चर्ड मोतीच मोठय़ा प्रमाणावर मिळतात. भारत मोठय़ा प्रमाणात संस्करीत मोत्यांची आयात करतो. सेंट्रल इन्सिटय़ुट ऑफ फ्रेश वॉटर ऍग्रीकल्चर, भुवनेश्वर या संस्थेने साध्या गोडय़ा पाण्यातील शिंपल्यांपासून मोती मिळविण्याचे तंत्र विकसित केले आहे. काही कीटक चुकून शिंपल्यात घुसतात आणि ते बाहेर येऊ शकले नाहीच तर हाच शिंपला त्यावर विशिष्ट थर जमा करतो आणि त्याचा मोती तयार होतो. याच साध्या सोप्या तत्वाचा वापर करुन मोत्याच्या शेतीची पध्दती विकसित केली आहे. तलाव, नद्या यासारख्या गोडय़ा पाण्याच्या स्त्रोतामधून शिंपले गोळा केले जातात. त्याच्यावर नंतर शस्त्रक्रिया करुन त्याच्यात विशिष्ट किटक किंवा किटकाचा अवयव किंवा एखादा मणी सोडला जातो. यानंतर शिंपला त्यावर थर जमवू लागतो. शस्त्रक्रिया केलेले हे शिंपले तलावात सोडले जातात. या तलावात कायम देखरेख ठेवली जाते. मोती बनण्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर शिंपले गोळा करुन मोती निवडले जाते.

मोत्याची शेती करण्याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण सेंट्रल इन्स्टिटय़ुट ऑफ फिशरीज, एज्युकेशन मुंबई, सेंट्रल इन्स्टिटय़ुट ऑफ फ्रेश वॉटर ऍक्वाकल्चर भुवनेश्वर, सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुट एर्नाकुलम, कोची, भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली या शासनमान्य संस्थांमधून दिले जाते. पर्यटनातून आर्थिक विकास साधणार्‍या सिंधुदुर्गाला असे मोत्याचे प्रशिक्षण मिळाले तर `ग्लोबलायझेशन'ची स्वप्ने पाहणार्‍या कोकणी पाण्याला आणखीनच तजेला येईल...
('महान्यूज'च्या सौजन्याने...)
-------------------

No comments: