Sunday, January 30, 2011

नात्याचा धागा...

लातूर जिल्ह्यातल्या भीषण भूकंपाने हजारो संसार उद्ध्वस्त केले. शेकडो बालके अनाथ झाली आणि असंख्य कुटुंबांच्या डोक्यावरची छपरे नष्ट झाली. या भूकंपाने देश हादरला. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो हात सरसावले. सोलापूरच्या एका शाळेतील काही शिक्षकांनीही भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. अजित जोशी नावाचा मुलगा तेव्हा दहावीत होता. त्याचे वडील सोलापुरात शिक्षक होते. त्या मदतकार्यात तेही सामील झाले. हजारो हात मानवतेच्या जाणीवेतून एकत्र आले, तर उद्ध्वस्त संसारांना पुन्हा उभारी मिळते, हे त्या दुर्घटनेनंतर अजित जोशीच्या मनावर कायमचे कोरले गेले, आणि वंचितांच्या मदतीसाठी आपला हात कायमचा पुढे राहिला पाहिजे, असे त्याने तेव्हाच ठरवले...
महाराष्ट्राच्या मातीत मनाची मशागत झालेला अजित जोशी २००३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाला, आणि त्याची नेमणूक हरियाणात झाली. २००८ मध्ये हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यात कलेक्टर म्हणून रुजू होताच त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचे एक नवे मॉडेल आखले आणि निर्धाराने काम सुरू केले... इथे पानिपतचे पुन्हा महाराष्ट्राशी नाते जडले. त्याआधी २००५ मध्ये, गोहाणा येथे दलित-सवर्ण संघर्षाच्या भडक्यात दलितांची घरे पेटवून दिली गेली होती... ५२ कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली, आणि अजित जोशींनी त्यांच्या पुनर्वसनाचे आव्हान स्वीकारले. फक्त साडेतीन महिन्यांत त्यांच्यासाठी नवी घरे उभी राहिली, आणि या कुटुंबांना नवे, आश्वस्त छप्पर मिळाले...
महाराष्ट्रातील अनेक दुष्काळी जिल्ह्यांत शेकडो कुटुंबे उदरनिर्वाहासाठी कुटुंबकबिल्यासह गावोगावी हिंडत असतात, हे लहानपणापासूनच पाहिलेले असल्याने, आपण जिथे प्रशासकीय अधिकारी आहोत तेथील कुटुंबांवर अशी वेळ येऊ नये असे त्यांनी तेव्हाच ठरविले आणि या तरुण जिल्हाधिकार्‍याने सोनिपतमध्ये काम सुरू केले. महाराष्ट्रात ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी `साखर शाळां’चा प्रयोग यशस्वी झाला आहे. हरियाणामध्ये वीटभट्ट्यांवर काम करणारी कुटुंबेही राज्यात स्थलांतर करीत असतात. या कुटुंबांमधील मुलांसाठी साखर शाळांच्या धर्तीवर शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव अजित जोशी यांनी हरियाणा सरकारसमोर ठेवला आणि तात्काळ त्याला मान्यताही मिळाली. या प्रकल्पाने आज राज्यात एक नवा आदर्श उभा केला आहे. वीटभट्टी कामगारांच्या मुलांकरिता हरियाणामध्ये आज अडीच हजार शाळा सुरू आहेत. ‘युनेस्को’च्या ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता पुरस्कारा’साठी या प्रकल्पाची निवडही झाली. हरियाणाच्या विकासाचा आलेख मांडताना आज अभिमानाने या प्रकल्पाचा उल्लेख केला जातो. हरियाणातील वंचितांसाठी सुरू झालेल्या या प्रकल्पामागे महाराष्ट्राचीच प्रेरणा आहे, असे अजित जोशी अभिमानाने नमूद करतात...... अजित जोशींच्या कलेक्टर बंगल्यामागच्या जागेतील त्यांनी स्वत: मशागत करून जोपासलेल्या हिरव्यागार शेतांच्या काठांवर पहाटे मोर बागडू लागतात, पक्ष्यांच्या किलबिलाटाने गावाला जाग येते, आणि सोनिपतचा हा तरुण जिल्हाधिकारी सकाळच्या फेरफटक्यासाठी मोटरसायकल घेऊन बाहेर पडतो. ही एक प्रभात फेरीच असते. या वेळी गावातील शेकडो रहिवासी आपल्या समस्या, गा-हाणी घेऊन एकत्र येतात आणि गावातल्याच एखाद्या मैदानावर, शाळेच्या ओट्यावर ‘कलेक्टर’चा ‘जनता दरबार’ भरतो... तिथल्या तिथे गावकèयांच्या समस्या जाणून घेतल्या जातात, आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिका-यांना सूचनाही दिल्या जातात... उगवत्या सूर्याबरोबर जिल्हाधिकारी अजित जोशींचे ‘फिरते कार्यालय’ सुरू होते... वर्षानुवर्षांपासून दररोज सकाळचा हा उपक्रम आजही नेमाने सुरू आहे. ‘सरकारी वेळे’नुसार ते आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होतात, तेव्हाही नागरिकांची रीघ लागलेलीच असते. भेट मिळाली नाही म्हणून पुन्हा यावे लागले, असा अनुभव कुणालाही कधीच येत नाही. सकाळच्या फेरफटक्यातून जनतेसोबत मिसळून जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविणारा अजित जोशी हा बहुधा एकमेव जिल्हाधिकारी असावा. यामुळेच, प्रशासन आणि जनता यांच्यात एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आणि हरियाणा सरकारनेदेखील या नात्याची दखल घेतली. अजित जोशींचे सर्व प्रस्ताव सरकारकडून विनाविलंब संमत होतात, आणि जनता सरकारला दुवा देते. अजित जोशी हा सरकार आणि जनता यांच्यातील अदृश्य दुवा असतो...
दोन वर्षांपूर्वी, २००८ मध्ये बिहारमध्ये कोसी नदीला महापूर आला आणि हाहाःकार माजला. हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अजित जोशींनी हरियाणा सरकारला प्रस्ताव दिला. एका उद्ध्वस्त गावाचे पुनर्वसन करायचे ठरले, आणि हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्याने बिहारमधील मुसहारी नावाचे एक गाव पुनर्वसनासाठी दत्तक घेतले. एक वेळचे जेवण कमी करून त्याचे पैसे पूरग्रस्तांसाठी द्या, असे आवाहन अजित जोशी यांनी जिल्ह्यातील जनतेला केले, आणि सोनिपतच्या गावक-यांनी लोकवर्गणीतून एक कोटी ४३ लाखांचा निधी अजित जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. त्या निधीतून सोनिपतने बिहारमध्ये उभे केलेले मुसहारी गाव आज आनंदाने नांदते आहे... २२३ घरे उभी राहिली, एक समाजमंदिर आणि एक शाळाही बांधून झाली... ५० शौचालये, ३२ हातपंप आणि गाव हायवेला जोदणारा एक भक्कम रस्ता निर्माण झाला... महाराष्ट्रातील लातूरच्या भूकंपानंतर मदतीसाठी पुढे आलेल्या हजारो हातांनी आखून दिलेल्या आदर्शाची त्यामागे प्रेरणा आहे. अजित जोशी यांनी हा प्रकल्प मोठ्या जिद्दीने पूर्ण केला आहे.
`पेपरलेस इलेक्शन' हा जेव्हा एक `विचार' होता, तेव्हा अजित जोशींनी `एस्क्यूएल२०००' नावाचे एक सॉफ्टवेअर विकसित केले... आता त्या जिल्ह्यात होणार्‍या कोणत्याही निवडणुकीसाठी मतदार याद्यांची पुनर्रचना करण्याकरिता, नवे सायास करावे लागत नाहीत... अजित जोशींनी हरियाणात केलेल्या वेगवेगळ्या विधायक कामांतून आपले नाव कोरले आहे... म्हणूनच, हरियाणातले प्रशासकीय अधिकारी अजित जोशी यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करतात, तेव्हा त्यांच्या ‘मराठी माणूस’पणाचा उल्लेख आवर्जून केला जातो...
म्हणूनच, अजित जोशी हा महाराष्ट्र, पानिपत आणि बिहार यांचे तिहेरी नाते जोडणारा धागा ठरला आहे.
------------------

Friday, January 28, 2011

स्वातंत्र्य !!

...`गेली सहा दशके आपण स्वातंत्र्याचा आनंद अनुभवतो आहोत. आपली पिढी धन्य आहे, कारण आपण स्वतंत्र देशात जन्माला आलो... आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, आपण त्या सर्वांचे स्मरण करू या, आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची होळी केली, त्यांना वंदन करू या... त्या पिढीच्या त्यागामुळेच आपण मुक्ततेचा आनंद मिळवला आहे'...
... प्रजासत्ताक दिनानिमित्त आखलेल्या झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर झालेल्या छोटेखानी सभेत एक वक्ता भारावून भाषण करत होता. त्याच्या वाक्यावाक्यातून स्वातंत्र्याच्या आनंदाची कारंजी फुलत होती, आणि श्रोतेही माना डोलावून त्याला सहमती देत होते... बाजूच्या स्तंभावर, नुकताच आरूढ झालेला तिरंगाही वार्‍याच्या मंद झुळुकेबरोबर हलका झुलत होता... ध्वजस्तंभाच्या अवतीभवती पसरलेल्या झेंडूच्या पिवळ्याधमक पाकळ्यांवर पसरलेल्या सकाळच्या सूर्यकिरणांनी पाकळ्या सोनेरी केल्या होत्या... वातावरण अवघे भारून उठले होते... त्या लहानश्या सभागृहात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा होत होता, आणि त्या भारलेल्या वातावरणात घुमणारे ते राष्ट्रभक्तीने भारलेले शब्द मला मात्र उगीचच बोचत होते... माझ्या डोळ्यांसमोर वेगळेच काहीकाही नाचत होते... मी त्या शब्दाशब्दागणिक अस्वस्थ होत होतो...
सकाळी त्या कार्यक्रमाला निघण्यासाठी मी घराबाहेर पडलो, तेव्हा नुकतीच वर्तमानपत्रं येऊन पडली होती. निघतानिघता मी सहज सवयीप्रमाणे एकदोन पेपरांचे पहिले पान चाळले. प्रजासत्ताक दिनाच्या त्या दिवशीच्या वर्तमानपत्रांचा पहिला मथळा वाचताच, खरं तर, घराबाहेर पडायचा आणि अगदी खरं सांगायचं तर, झेंडावंदन करायचाही उबग आला... डोकं भण्ण झालं... आजचा आपला दिवस अस्वस्थ, बचैन जाणार याची खात्री पटली, तरीही मी बाहेर पडलोच...
... घरून निघाल्यावर मी ज्या रस्त्यावरून नेहेमी जातो, तिथे एका फूटपाथवर उभ्याआडव्या पत्र्यांनी रचलेली एक झोपडी आहे. पाचसहा फूट रुंद, आणि चांगली बारातेरा फूट लांब... आतमध्ये टीव्ही, फ्रीज, कपाट.. सगळं बाहेरून जाताना सहज दिसतं... झोपडीच्या बाहेर, दोनतीन स्कूटर आणि एक कार पार्क केलेली असते. आत कुणी दोनचारजणं मस्त निवांत लोळत टीव्ही पाहाताना दिसतातच... केव्हाही!
खरं म्हणजे, ह्यात सांगण्यासारखं काहीही नाही... मुंबईत अनेक ठिकाणी अनेकांना असं कुठे ना कुठे पाहायला मिळत असेलच. मुद्दाम सांगण्यासारखं म्हणजे, त्या झोपडीतल्या पसार्‍यात, मुक्तपणे वावरणारे, प्राणी आणि पक्षी! केव्हाही तिथून जाताना मी मुद्दाम त्या झोपडीत पाहातोच, ते त्यांच्यासाठी! पाचसहा गलेलठ्ठ पोपट आणि साताआठ मांजरं, सुस्तपणे त्या पसार्‍यात बसलेली असतात. त्यांच्या मालकासारखीच! एखादा पोपट टीव्हीवर, एकदोघं खुर्चीच्या पाठीवर, कुणी चटईवर, तर कुणी चक्क एखाद्या मस्तवाल बोक्याच्या पाठीवर... मला ह्या `सहजीवना'ची नेहेमीच भुरळ पडलेली असते...
... आज घराबाहेर पडल्यावर तिथून जाताना मी सवयीनुसार झोपडीकडे मान वळवली... तेच दृश्य पुन्हा पाहिलं.
पण आज मला भुरळ पडलीच नाही. गंमतही वाटली नाही.ते सुस्तपणे फिरणारे पोपट, मधेमधे लुडबुडणारी गलेलठ्ठ मांजरं, आणि पसार्‍यात लोळणारा मालक... सगळं बघताना मला जाम किळस आली...
हे असं होणारच हे कदाचित घराबाहेर निघतानाच ठरलेलं असावं...
कारण, बाहेर पडतापडता वाचलेल्या वर्तमानपत्रांनी माझ्या मनातल्या प्रजासत्ताक दिनाच्या वातावरणावर पाणी फेरले होते... मनमाडजवळ यशवंत सोनावणे नावाच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्‍याचा तो रॉकेल माफियांनी जिवंत जाळलेला देह, डोळ्यांसमोर येत होता... आज त्यांच्या घरी कसे असेल, या चिंतेनं मी उगीचच व्याकुळ होत होतो...
आता यापुढचा प्रत्येक प्रजासत्ताक दिन, त्यांच्या घरी, असाच, काळा असणार!
... विचारांनी डोकं भणभणत असतानाच मी झेंडावंदनाच्या त्या कार्यक्रमाला हजेरी लावली, झेंडावंदन केलं, आणि यंत्रासारखा नंतरच्या सभेला श्रोत्यांमध्ये जाऊन बसलो...
त्या वक्त्याचं भाषण संपताच सण्णकन मला ती झोपडी आठवली... ते मनसोक्तपणे हिंडणारे हिरवेगार, गलेलठ्ठ पोपट डोळ्यासमोर दिसू लागले...
आणि मी बैचैन झालो...
डोक्यात विचारांचं थैमान माजलं...
एक गोष्ट मला पहिल्यांदाच, नव्यानं जाणवली...
त्या पोपटांना कधीही पिंजर्‍यात बंद केलेलं मी पहिलं नव्हतं...
ते त्या दहा बाय बाराच्या झोपडीत मुक्तपणे, निर्भयपणे संचार करत होते.
... आज मनात आलं,
.. म्हणजे ते पोपट स्वतंत्र, मुक्त आहेत?
त्यांच्याभोवती पिंजरा नाही. ते निर्भय, आश्वस्तही आहेत...
पण ते स्वतंत्र आहेत?
मग ते उडत का नाहीत?... बाहेरच्या, मोकळ्या आकाशात भरारी का मारत नाहीत?
आपल्या मुक्तपणाला ते ‘स्वातंत्र्य’ मानत असतील?
मी उत्तरं शोधू लागलो. मनाशीच...
आणि एकेक धागा नकळत जुळत गेला...
आपणही स्वतंत्र आहोत. आपल्याभोवती आता पारतंत्र्याचा पिंजरा कुठाय?...
... म्हणजे, आपली अवस्था त्या पोपटांसारखी तर नाही?... मुक्त, असूनही कुठेतरी जखडल्यासारखी?...
आपल्याभोवती दीडशे वर्ष असलेला पिंजरा त्यांनी कादून बाजूला केला...
... पण आपण उडू कुठे शकतोय?
... सभा संपली तरी माझं डोकं भण्ण होतं.. तसाच मी बाहेर पडलो, आणि घराकडे येऊ लागलो...
वाटेत एक तरुण दिसला... खिशाला टाचणीनं एक कागदी तिरंगा टोचलेला... हातात एक कागदाची घडी.. इकडेतिकडे पाहात चाललेला...
काहीतरी शोधत असल्यासारखा...
मला पाहाताच समोर आला, आणि हातातला कागद माझ्यापुढे करत त्यावरचा पत्ता मला विचारला...
तिथल्या झेंडावंदनाच्याच कार्यक्रमासाठी तो मुद्दाम कुठून आला होता.
मी घड्याळाकडे पाहिलं.
दहा वगैरे वाजत आले होते.
त्यानं ओळखलं...
‘कार्यक्रम उशीराच आहे... मुदामच उशिरा ठेवलाय.. सुट्टी आहे ना... मग लोकं लवकर उठत नाहीत... म्हणून’... तो म्हणाला.
मग मी त्याला पत्ता सांगितला.. माझ्या वाटेवरच होता. आम्ही सोबतच चालू लागलो...
वाटेत एका ठिकाणी मी त्याला बोटानं ती जागा दाखवली...
लाऊडस्पीकरवर लता मंगेशकरांचं ते, ऐ मेरे वतन के लोगो... वाजत होतं.
आणि सातआठ कार्यकर्ते खोळंबल्यासारखे येऊन थांबले होते...
गर्दीची वाट बघत.
स्तंभावरचा तिरंगाही घडीतच थांबला होता... ताटकळत.
-------------------------------------

Friday, January 21, 2011

नवी दिशा...

`येस... आय अ‍ॅम लुकिंग फॊर अ जॉब चेंज'... ट्रेनमध्ये समोरच्या बाकड्यावर बसलेला तो, एव्हढ्या जोरात ओरडला, म्हणून माझं लक्ष त्याच्याकडे गेलं...
एका कंपनीचा लोगो शर्टच्या खिशावर मिरवणारे ते दोघं बाकड्यावर बसल्यापासून एकमेकांशी मस्त गप्पा मारत होते. सहकारी असावेत. कंपनीतल्या कामाला बहुधा दोघंही कंटाळले असावेत.
म्हणूनच, अचानक त्याचं हे वाक्य ऐकून माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याला तेवढ्यात फोन आला होता.
अलीकडे, प्लेसमेंट कंपन्यांमध्ये नाव नोंदवणार्‍यांच्या मागे नोकर्‍या धावून येत नसल्या, तरी कंपनीचून येणारा फोन कॊल्सचा ससेमिरा मात्र मागे लागलेला असतो. मुंबईत लोकलमधून प्रवास करणार्‍या एखाद्या तरी प्रवाशाला असा अनवाँटेड कॊल येतोच, हे मला निरीक्षणावरून पक्कं माहीत होतं.
आत्ताचा त्याला आलेला फोनही तसाच असेल, असं मला वाटलं होतं. बहुधा त्यालाही तसंच वाटलं असावं. कारण, त्याच्या सुरात नोकरीच्या गरजेचं आर्जव अजिबात नव्हतं... कदाचित असे फोन घेऊनघेऊन तो वैतागला असावा. त्याच्या ओरडण्यावरून मला तसंच वाटलं.
... पण पुढच्या वाक्याला त्याचा तो आवाज एकदम बदलला...
`येस सर... आय अ‍ॅम लुकिंग फॊर चेंज’.. तेच वाक्य त्यानं पुन्हा, अजीजीनं उच्चारलं.
आणि पुढे त्यांचं संभाषण सुरू झालं... त्याचा आवाज एकदम मऊ, मृदु झाला होता..
बहुधा फोनवरच इंटरव्ह्यु सुरू होता... मी उगीचच कान लावले. पलीकडचा कुणी त्याच्याशी काय बोलतोय, हे ऐकू येणं शक्यच नव्हतं. मग मी तर्क लढवायला सुरुवात केली.
साऊथ इंडियन शैलीतल्या इंग्रजीतून तो पलीकडच्याशी बोलत होता.
`थ्री इयर्स..' तो नम्रपणानं म्हणाला...
बहुधा, पलीकडून, त्याच्या वर्क एक्स्पिरियन्सची विचारणा झाली असावी.
`सिक्स्टीन'... पलीकऊन आलेल्या पुढच्या एका प्रश्नाला त्यानं त्रोटक उत्तर दिलं... बहुधा, आत्ता त्याला मिळणार्‍या पगाराचा तो आकडा असावा.
`ट्वेंटी टु ट्वेंटी टू...' त्यानं आणखी एक उत्तर दिलं... बहुधा, अपेक्षित पगाराचा आकडा असावा.
आता त्याचं लक्षं, फक्त, पलीकडून कानात घुमणार्‍या आवाजावर केंद्रित झालं होतं.
`फिफ्टीन डेज'... असं तो म्हणाला, तेव्हा त्याचा चेहेरा कमालीचा उजळला होता... शेजारी बसलेला त्याचा सहकारी अचंबितपणे, उतरल्या नजरेनं त्याच्या तोंडाकडे पाहात ते संभाषण ऐकत होता...
बहुधा, माझ्यासारखेच संभाषणाचे तर्कही लढवत होता...
`नो सर... टुडे नॉट पॉसिबल... डे आफ्टर टुमॉरो ओके?' त्यानं अजीजीनं विचारलं, आणि क्षणभर तो थांबला.
त्या क्षणी त्याच्या डोळ्यात मनावरचा प्रचंड तणाव स्पष्ट दिसत होता...
`थॆंक यू सर' असं म्हणून त्यानं फोन बंद केला, तेव्हा तो तणाव मावळून तिथे आनंद उतरला होता...
आता तो खिडकीबाहेर पाहात होता... त्याचे डोळे काहीतरी पाहात, कसल्यातरी स्वप्नात रंगले होते, हे स्पष्ट दिसत होतं...
अचानक तो भानावर आला. आपला एक सहकारी सोबत बसलाय, हे त्याच्या लक्षात आलं, आणि मान वळवून त्यानं त्याच्याकडे पाहिलं.
तो सहकारी, हिरमुसल्या नजरेनं त्याच्याकडे पाहातच होता.
`किसका फोन था?' त्यानं हताश आवाजात विचारलं, आणि याचे डोळे चमकले.
`नही यार, कुछ नही...' त्यानं उडतउडत उत्तर दिलं, आणि तो पुन्हा खिडकीतून बाहेर बघू लागला...
तो सहकारी गप्पच होता.
मग ह्यालाच कसंतरी झालं...
`मंडेको सब बताऊंगा'... त्याचा हात हातात घेत हा म्हणाला, पण सहकार्‍यानं ते न ऐकल्यासारखंच केलं...
`यार, मेरे लिये भी कुछ होगा तो बताऒ'... तो कसनुसं बोलला... ह्याचं लक्ष नव्हतं. पण त्यानं उगीचच मान हलवली...
तोवर काही स्टेशनं मागे गेली होती.
अचानक ह्याचा तो हिरमुसला सहकारी उठला, आणि त्याचा निरोप घेऊन, घड्याळाकडे पाहात घाईघाईनं उतरायच्या तयारीला लागला...
`अरे यार, साथ मे आनेवाला था ना?' यानं त्याला विचारलं. पण त्यात फारसा आग्रह नव्हताच.
`नही.. तू जा आगे... मुझे यहीपे उतरना पडेगा'... तुटकपणे तो उत्तरला, आणि स्टेशन येताच उतरूनही गेला...
ह्यानं हळूच खिशातला मोबाईल काढला, आणि, तो आलेल्या कॉलचा नंबर डोळ्यात साठवत बसला...
मी त्याच्याकडे पाहातोय, हे त्याच्या आत्ता लक्षात आलं होतं.
नंबर सेव्ह करताकरता त्यानंही माझ्याकडे पाहिलं, आणि तो मस्त हसला...
हळूच त्यानं नकळत मोबाईल कुरवाळला... आणि समाधानानं खिशात ठेवला...
... त्या एका फोन कॉलनं त्याच्या भविष्याला नवी दिशा मिळाली होती.
मला ते त्याच्या डोळ्यात स्पष्ट जाणवलं!
--------------------------------------

Thursday, January 6, 2011

अपेक्षांच्या पालखीचे ८४ फेरे

जागतिकीकरणाच्या 'रेट्या'ची चर्चा फार; पण प्रत्यक्षात
मराठी साहित्य मात्र या 'रेट्या'ने ढिम्मदेखील हललेले नाही,
या वास्तवाची कबुली खुद्द संमेलनाध्यक्षांनीच दिली;
ते एक बरे झाले !
अपेक्षांच्या पालखीचे ८४ फेरे
जागतिकीकरणासोबत 'माणूस' पुढे जात राहिला,
मराठी 'साहित्य' मात्र तिथेच राहिले.
----- ---- ------

परीक्षेची सगळी प्रश्नपत्तिका अगोदरपासूनच समोर आहे, परीक्षेच्या तयारीलाही भरपूर वेळ मिळालेला आहे, तरीदेखील पेपर सोडवायची वेळ झाली, की कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनासारखी अवस्था व्हावी, हातपाय थरथरू लागावेत, शरीराला कंप सुटावा, तोंडाला कोरड पडावी आणि सगळे शरीर शक्तिहीन होऊन जावे, अशी अवस्था यंदादेखील ठाण्यात भरलेल्या ८४ व्या साहित्य संमेलनाच्या भव्य मंडपांनी अनुभवली. प्रश्नांची उत्तरे तर मिळाली नाहीतच, उलट तेच प्रश्न आणि नव्या अपेक्षांचे नवे ओझे सोबत वागवत ८५ व्या साहित्य संमेलनाची वाटचाल सुरू करावी लागणार आहे. आता पुढच्या संमेलनाच्या मंचावर तेच प्रश्न गंभीरपणे चर्चिले जातील. उत्तरे शोधण्यासाठी परिसंवादांच्या नव्या फैरी झडतील आणि प्रश्नांचा क्रूस खांद्यावर घेऊन साहित्य संमेलन ८६ व्या वर्षाची वाट तुडवू लागेल. साहित्यशारदेच्या उत्सवातील तीन दिवसांच्या वरवर दिसणाऱ्या झगमगाटात रसिकांचे मन आणि डोळे दिपून जातील, आणि मराठीच्या अभिमानगीताच्या तालावर ठेका धरत मराठी साहित्यरसिक मात्र, पुढच्या संमेलनाची प्रतीक्षा करीत राहील...
गेल्या कित्येक वर्षांपासून साहित्य संमेलने एका क्रूसाचे ओझे वाहात आहेत. प्रत्येकाने आपापल्या समस्यांचा क्रूस आपणच वहावयाचा असतो, अशा आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. साहित्य संमेलनाचे तसे नसते. प्रत्येक संमेलनाच्या नव्या अध्यक्षाने तो पहिल्याकडून खांद्यावर घ्यावा आणि आपल्या वारसाच्या हाती सोपविण्याची वाटचाल सुरू करावी, तशी साहित्य संमेलनांची अवस्था झाली आहे. ८४ व्या साहित्य संमेलनानेदेखील हेच केले. पूर्वीपासून माहिती असलेले सर्व प्रश्नच यादेखील साहित्य संमेलनासमोर उभे ठाकले आणि अगोदरचीच प्रश्नपत्तिका सोडविण्याऐवजी, नव्या प्रश्नांची भर घालत, खांद्यावरचे ओझे वाढवून साहित्य संमेलनाचे सूप वाजले. ८४ व्या साहित्य संमेलनात मराठी साहित्य, मराठी कविता, लोकजीवन, संस्कृती आणि मराठी भाषा या सर्वांसमोर आव्हाने बनून उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उकल तर केली गेली नाहीच, पण हेच, जुनेच प्रश्न आणखी नव्या झालरी लावून सजविले गेले, आणि उत्तरे शोधण्याचे काम नव्या वर्षावर सोपवून संमेलनाचे सूप वाजले.
संमेलनाची सुरुवात आणि समारोप याकडे तमाम मराठी माणसाचे लक्ष लागून राहिलेले असते. मराठी माध्यमांनी हेच ओळखून संमेलनाच्या सुरुवातीचा भफदार सोहळा घराघरापर्यंत पोहोचविला, आणि सामान्य मराठी माणसाला नव्या चितांनी ग्रासले. मराठीच्या अभिमानगीताने संमेलनाची सुरुवात झाली, पण लगेचच अध्यक्षीय भाषणाला निराशेची किनार पाहून मराठी माणूस हबकून गेला. आपल्यापुढील उत्तरांची शोधयात्रा संपलेली नाही, तर नव्या प्रश्नांची त्यामध्ये भर पडली आहे, या वास्तवाची जाणीव संमेलनाध्यक्षांच्या भाषणातून सामान्यांना झाली.

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रक्रियेत मराठीने महाराष्ट्र प्रांताच्या सीमा ओलांडल्या, संगणकयुगाचे बोट धरून मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली, तरी जागतिकी-करणाने दिलेल्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या आश्वासनाचे काय झाले, याचा शोध घेण्याची जबाबदारीही आता साहित्य-सृष्टीवरच येऊन पडली आहे. याच जागतिकीकरणाच्या वेगाशी स्पर्धा करत धावणाऱ्या, यंत्रमानवासारख्या संवेदनाशून्य झालेल्या माणसाचा शोध घेण्यात मराठी साहित्य अपयशी ठरत आहे, याचीही जाणीव झाली. जागतिकीकरणाचा 'रेटा' असा शब्दप्रयोग केला जात असला, तरी मराठी साहित्य या रेट्यात 'ढिम्म'देखील हलले नाही, या वास्तवाची कबुली खुद्द संमेलनाध्यक्षांनीच दिली. साहित्य तिथेच राहिले, आणि जागतिकीकरणासोबत माणूसच पुढे जात राहिला. या युगातील माणसाच्या जगण्याची प्रक्रिया समजून घेण्यातदेखील साहित्य कमकुवतच ठरले आणि त्यामुळे मराठीचे नुकसानच झाले, अशीही कबुली साहित्य संमेलनाध्यक्षांनी दिली. माणसांच्या लढायांचे प्रतिबिब साहित्यात नाही, या वास्तवावरही त्यांनी नेमके बोट ठेवले, आणि समाजजीवनापासून साहित्य दुरावत चालले आहे, याची खंतदेखील व्यक्त केली. संमेलनाध्यक्षांचे भाषण म्हणजे जुन्या समस्यांचा नव्याने वाचलेला 'सातबारा' ठरले...
मराठी साहित्यशारदेच्या या दरबाराला ८४ वर्षे झाली असली, तरी प्रत्यक्षात साहित्य संमेलन या संकल्पनेचा जन्म १८८५ मध्ये, तब्बल १२५ वर्षांपूर्वीच झाला, तेव्हादेखील मराठी भाषेच्या भवितव्याची चिता हेच यामागचे कारण होते. आज १२५ वर्षांनंतर आणि संमेलनांच्या ८४ फेऱ्यानंतरही तोच प्रश्न आपल्याला छळतो आहे. प्रश्नांच्या मिती बदलल्या, नव्या आव्हानांनी या प्रश्नाला घेरले, आणि नव्या गरजा अधोरेखित झाल्या, एवढेच साहित्य संमेलनांच्या ८४ फेऱ्यांचे फलित म्हणावे का, असा प्रश्न सामान्य मराठी माणसाला पडला आहे. मराठी भाषेचा कैवार घेऊन संमेलनाच्या ८३ दिड्या निघाल्या, ठाण्याला निघालेली ८४ वी दिडी होती आणि पुढे याच दिडीतील पालखीत तेच प्रश्न मिरवत ८५ व्या दिडीची वाटचाल सुरू झाली आहे.
यामुळेच, साहित्य संमेलनांनी मराठीला काय दिले, हा नवा प्रश्नदेखील सामान्य मराठी माणूस कधीतरी विचारणार आहे. प्रत्येक साहित्य संमेलनांत मराठीच्या संवर्धनाची आणि जोपासनेसाठी सरकारी कुबड्यांची अपेक्षा केली जाते. सरकारी आर्थिक आधाराशिवाय जणू भाषेचे जतन, संगोपन आणि संवर्धन होऊच शकत नाही असे एक नकारात्मक मानसिकतेचे चित्र यातून विनाकारण उभे राहात आहे, हे न समजण्याएवढी मराठी साहित्यसृष्टी अपरिपक्व नाही. मराठी साहित्यसृष्टीला जनमानसाचा भक्कम आधार हवा, हेच मराठी साहित्याच्या संगोपनाचे आणि संवर्धनाचे मूळ आहे. केवळ 'सरकारी जीआर' काढून आणि दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्याची सक्ती करून मराठीचे संवर्धन होणार नाही, असा एक शाब्दिक 'आसूड' मुख्यमंत्र्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरूनच साहित्यिकांवर ओढला आहे. मराठी साहित्याने वैश्विक प्रतिष्ठा प्राप्त केली पाहिजे, त्यासाठी साहित्याला तेवढा दर्जा प्राप्त झाला पाहिजे, आणि तशा दर्जाचे साहित्य मराठीत जन्माला घातले गेले पाहिजे, याचा सोयीस्कर विसर पाडून घेत, मराठीसाठी सरकारसमोर झोळ्या पसरण्याची हक्काची जागा म्हणून साहित्य संमेलने साजरी केली जात असतील, तर ते मराठीच्या अभिमानगीतालादेखील झोंबणारे ठरेल.
मराठीचे कैवारी आणि मारेकरी कोण या विषयावर एक चितनात्मक कार्यक्रम अभिरूप न्यायालयाच्या रूपाने ठाण्याच्या साहित्य संमेलनात रंगला, आणि आरोप-प्रत्योरापांच्या फैरींनंतर, मराठीच्या ऱ्हासाला सारेच जबाबदार आहेत, असा निर्वाळा न्यायाधीशांनी दिला. यातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. साहित्यशारदेच्या उत्सवातच, मराठीचा ऱ्हास झाल्याची स्पष्ट कबुली सामोरी आली, आणि आपण सारेच यासाठी कारणीभूत आहोत, हेही स्पष्ट झाले. मराठी साहित्यसृष्टीच्या खांद्यावरील क्रूस या नव्या निष्कर्षाने आणखी जडावणार आहे. हे वास्तव असतानाही, साहित्य संमेलनाचे व्यासपीठ मात्र त्याच त्याच अपेक्षांचे तुणतुणे वाजवत सरकारदरबारी हात पसरत आहे, हे सामान्य मराठी माणसाला सहन होणारे नाही. कायदे करून किवा कायद्यांत दुरुस्ती करून मराठीच्या काटेकोर वापराची सक्ती करण्याची मागणी सरकारकडे करण्यापेक्षा, मराठीत दर्जेदार, पुलित्झर, बुकर पुरस्कारांचे मानकरी ठरणारे साहित्य निर्माण करण्याची उत्तुंग उमेद या व्यासपीठावरून फुलविली गेली तर ते मराठीच्या अभिमानगीतास साजेसे हाईल.
मराठीतील वाङ्मयीन नियतकालिके आणि अनियतकालिकांपुढे उपजीविकेची समस्या निर्माण झाली आहे, हे या संमेलनाच्या निमित्ताने सामोरे आलेले एक विदारक वास्तव! ही उपजीविका त्यातील साहित्यकृतींच्या दर्जेदारपणावर नव्हे, तर सरकारी उपाययोजनांवरच अवलंबून आहे, याची अप्रत्यक्ष जाणीवदेखील साहित्यसृष्टीने सामान्य वाचकाला करून दिली आहे. ग्रंथालयांकरिता सरकारी अनुदान हवे, या मागणीचादेखील साहित्यविश्वाने सरकारसमोर पुनरुच्चार केला आहे. साहित्य व सांस्कृतिक कार्यविषयक सरकारी समित्यांवर साहित्य महामंडळाचा एक प्रतिनिधी असावा अशी अपेक्षाही साहित्यिकांच्या वार्षिकोत्सवात व्यक्त झाली, आणि महामंडळाचे वार्षिक सरकारी अनुदान तुटपुंजे असल्याचे गाऱ्हाणेही सरकारसमोर मांडले गेले. साहित्यसृष्टीला सरकारच्या आधाराची किती गरज आहे, हे संमेलनाने पुन्हा एकदा अधोरेखित केले...
साहित्य संमेलन हा मराठी साहित्यसृष्टीचा आगळा आणि अनोखा उत्सव मानला जातो. ज्ञानेश्वरापासून नायगावकरांपर्यंतच्या सर्व साहित्यिकांविषयी मराठी साहित्यरसिकाची आदरभावना या उत्सवात व्यक्त होत असते. मराठी साहित्यरसिक अमाप भक्तिभावाने या उत्सवात साथ देत असतो. साहित्यविश्व मात्र, सरकारच्या मदतीकडे डोळे लावून उत्सवाचा समारोप करते. ८४ व्या संमेलनात असेच काहीसे चित्र दिसले. संमेलनाच्या सुरुवातीलाच मराठी साहित्यसृष्टीचे तोकडेपण संमेलनाध्यक्षांनी स्पष्ट केले, पुन्हा एकदा नव्या-जुन्या समस्यांची जाणीव करून दिली, तर समारोपाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मराठी साहित्यसृष्टीच्या दुबळेपणावर बोट ठेवले.
पुढच्या वर्षी पुन्हा साहित्य संमेलन भरेल. पुन्हा एकदा मराठीच्या भविष्याची चिता व्यक्त होईल, आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न एकमेकांना विचारला जाईल. ८४ व्या संमेलनाने याची अंशत: जबाबदारी वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणीवर ढकलून टाकली आहे. मराठीचे मराठीपण हरवत असल्याचा ठपका साहित्य संमेलनाने दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वर्तमानपत्रांवर ठेवला आहे. १२५ वर्षांपूर्वीच्या चितेचे उत्तर अनायासे सापडावे, असा चमत्कार या संमेलनात झाला आहे. पण त्यामुळे साहित्यविश्वाची जबाबदारी कमी होत नाही. मुख्यमंत्र्यांनी आता अपेक्षांचे आव्हान मराठी साहित्यविश्वासमोर उभे केले आहे. प्रश्नांचा क्रूस वाहताना, अपेक्षांचे ओझेही मराठी साहित्यसृष्टीला पेलावे लागणार आहे. प्रश्नांची माहिती असतानाही उत्तरे मिळत नसतील, तर तो कमकुवतपणा ठरेल...

- http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/ManthanEdition-MainNews.php?articledate=2011-01-02