Saturday, November 26, 2011

ऐका, पुढल्या हाका..

घरातील स्थान, आर्थिक स्थैर्य, जीवनशैली आणि कुटुंबातील सदस्यांशी, विशेषत मुलांशी असलेले नाते या असंख्य विषयांभोवती स्त्रियांच्या समस्या वर्षांनुवर्षे गुरफटून राहिल्या. चारपाच दशकांपूर्वीपर्यंत, जेव्हा कौटुंबिक रूढींचा प्रभाव स्त्रीवर सर्वाधिक होता, तेव्हाची स्त्री म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीने रंगविलेले केवळ एक सुबक चित्र होते. म्हणजे, स्त्रीचे रूप, शालीनता, प्रेमळपणा, वात्सल्य आणि स्वयंपाकघरातील जबाबदारी पार पाडण्यातील समर्थपणा किंवा खंबीरपणा या गुणांच्या रंगांनीच स्त्रीचे हे चित्र रंगविले जात असे. पत्नी, आई, सासू, सून, जाऊ-नणंद अशा वेगवेगळ्या कौटुंबिक भूमिकांमध्ये वावरतानाची तिची वागणूक हाच स्त्रीच्या गुणवत्तेचा कस ठरविण्याचा निकष होता. काळ बदलत चालला, स्त्रियांनादेखील शिक्षणाच्या आणि करियरच्या संधींची क्षितिजे खुणावू लागली, तेव्हा स्त्रियांचे उंबरठय़ाआड अडकलेले विश्व मोकळे झाले. कुटुंबातील प्रथांच्या पलीकडे जाऊन ‘ब्र’देखील काढण्याची हिंमत नसलेल्या स्त्रिया ‘बोलत्या’ झाल्या, आणि समाजात वर्षांनुवर्षे दबून राहिलेल्या महिलावर्गाला आवाज आहे, याची जाणीव समाजाला होऊ लागली. स्त्रिया केवळ बोलू लागल्या एवढेच नव्हे, तर न पटणाऱ्या बाबींवर ठाम मतप्रदर्शन करून प्रसंगी एकजुटीने संघर्षांसही सिद्ध झाल्या. कुटुंबाचा गाडा हाकणे ही सामूहिक जबाबदारी आहे, आणि पतीइतकाच पत्नीचादेखील या जबाबदारीतील प्रत्येक पावलावर समान वाटा आहे, हे प्रसंगी पुकारलेल्या लढय़ातून किंवा सिद्ध केलेल्या कर्तबगारीतून स्त्रियांनी दाखवून दिले. या परिवर्तनासाठी स्त्रियांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची आहे.
व्यापक सामाजव्यवस्थेत हा बदल प्रकर्षांने जाणवत असला तरी सामान्य मराठी कुटुंबांमधील ‘आई’ अजूनही या परिवर्तनाच्या प्रवासात स्वतला सामावून घेण्याचा अडखळता प्रयत्न करीत आहे. अजूनही कुटुंबव्यवस्थेच्या जुन्या रूढींविषयीची आत्मीयता तिच्यात डोकावते. संध्याकाळी कामावरून घरी परततानाचा प्रवास सुरू करण्याआधी भाजी खरेदी करून, रेल्वेत किंवा बसमध्ये बसायला जागा मिळाली तर प्रवासात शेंगा, पालेभाज्या निवडणारी स्त्री अजूनही दिसते. कारण, कुटुंबात परतताना आपली घरातली भूमिका निभावण्याची तिची मानसिकता पूर्वीइतकीच जिवंत आहे. घराबाहेर पडल्यानंतर ही स्त्री हक्कांसाठी कणखरपणे लढू शकते, संघटितपणाने संघर्ष करण्याची तयारीही दाखविते, आणि न पटणाऱ्या बाबींवर परखडपणे मतप्रदर्शनही करते. पण संध्याकाळी घरी परतते, तेव्हा मात्र, ती आई, पत्नी आणि गृहिणी असते. संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर, दिवसभराच्या कामाचा शीण घालविणाऱ्या विरंगुळ्याचे क्षण तिचे तिनेच शोधलेले असतात. त्या क्षणांमध्ये रमल्यानंतर ती आपल्या घरातल्या भूमिकेत शिरते, हे चित्र अजूनही कित्येक घरांमध्ये दिसते.
पुरुषांच्या बरोबरीने नोकरी-व्यवसायाच्या विश्वात वावरणारी प्रत्येक नोकरदार स्त्री केवळ बदलत्या समाजव्यवस्थेतून आलेल्या आत्मविश्वासाचा किंवा मिळालेल्या हक्कांचा वाटा उचलण्याच्या मानसिकतेतच असते असे दिसत नाही. वाढती महागाई, बदलती जीवनशैली, आणि त्यामुळे कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्यासाठी करावा लागणारा संघर्ष ही आजही मध्यमवर्गीय कुटुंबाची अपरिहार्यताच आहे. अनेक पाहण्यांतून निष्पन्न झालेल्या निष्कर्षांनुसार, शहरी भागांतील २७ टक्के महिला नोकरीसाठी सकाळी घराबाहेर पडतात. म्हणजे, साधारणपणे, शहरांत राहणाऱ्या प्रत्येक चार कुटुंबांपैकी एका कुटुंबातील स्त्री नोकरदार असते. अशा वेळी, कुटुंबाचे दररोजचे व्यवस्थान आणि मुलाबाळांची देखभाल हे मोठे आव्हान त्या स्त्रीच्या कुटुंबासमोर असते. या नोकरदार महिलांपैकी सर्वच महिला उच्चपदस्थ नोकरी किंवा उज्ज्वल भविष्यातील संधींची आव्हाने पेलण्यासाठी सरसावलेल्या, उच्चशिक्षित आणि गलेलठ्ठ पगार मिळवणाऱ्या नवश्रीमंत वर्गातीलच आहेत, असे नाही. रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या बसच्या थांब्यावर सकाळच्या वेळी लागणाऱ्या रांगा पाहिल्या, की नोकरदार महिलांचे वेगवेगळ्या आर्थिक स्तरांचे चित्र न सांगतादेखील स्पष्ट होऊ शकते. काखोटीला एक साधी पर्स असतानादेखील, हातात एखादी प्लॅस्टिकची पिशवी सांभाळत रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यातील गर्दीत स्वतला झोकून देताना जिवावरची कसरत पार पाडत कामाच्या ठिकाणी पोहोचणाऱ्या महिलांचा वर्गदेखील नोकरदार महिलांमध्येच मोडतो. नोकरी ही या महिलांची कोटुंबिक अपरिहार्यता असते. आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी घरातील पुरुषाच्या कमाईला जमेल तसा हातभार लावून कुटुंब चालविणे हाच या महिलांच्या ‘नोकरदारी’चा अर्थ असतो.
अशा महिलांना आपल्या घराची घडी विस्कटू न देण्याचेही आव्हान पेलायचेच असते. नोकरी करणाऱ्या या वर्गातील महिलांची आपली कौटुंबिक जबाबदारी झटकण्याची इच्छा नसते, किंवा नवऱ्याच्या बरोबरीने काम करत असल्याने घरातील जबाबदारीचा वाटा नाकारण्याची तिची मानसिकता नसते. सामान्यपणे प्रत्येकालाच, आपण जगतो ते जीवन सामान्य वाटत असते. भोवतालच्या श्रीमंतीच्या प्रदर्शनामुळे, दूरचित्रवाणीवर दिसणाऱ्या मालिकांनी रंगविलेल्या कुटुंबजीवनाच्या भपकेबाज चित्रांमुळे आदर्श जीवनाच्या वेगळ्याच कल्पना अनेकांच्या मनात घोळत असतात. स्त्रिया त्याला अपवाद नसतात. त्यातच सकाळी घराबाहेर पडून, सामान्य कमाईसाठी दिवसभर राबणाऱ्या नोकरदार महिला आणि त्यांच्याच आसपास वावरणाऱ्या उच्चभ्रू, उच्चशिक्षित आणि अधिकारामुळे प्राप्त झालेला आत्मविश्वास मिरविणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या महिला असे तट नोकरदार महिलांमध्ये आपोआप तयार झालेले असतात. रेल्वेच्या पहिल्या वर्गातून प्रवास करणारी नोकरदार महिला, सेकंड क्लासच्या गर्दीतून लोंबकळत कार्यालय आणि परत घर गाठणारी महिला, भपकेबाज, शोफर ड्रिव्हन कारमधून प्रवास करणारी नोकरदार महिला असे अनेक वर्ग नोकरदार महिलांच्या दुनियेत असल्यामुळे यातील प्रत्येक वर्गाच्या समस्या आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या हाताळण्याचा दृष्टिकोनही वेगवेगळाच असतो. तरीदेखील, सामान्य कुटुंबातील महिलेसाठी नोकरी हा जगण्याच्या संघर्षांचा अपरिहार्य भाग असल्यामुळे कुटुंबातील जबाबदाऱ्यांचे स्थान इच्छा नसतानासुद्धा दुय्यम ठेवावे लागते. ही खंत अनेक नोकरदार महिलांना सतावतानादेखील दिसते. कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक ताण आणि नोकरीनिमित्त घराबाहेर राहावे लागल्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य कौटुंबिक समस्यांची चिंता यांमुळे अनेक नोकरदार महिलांना रक्तदाब, हृदयदौर्बल्यासारखे विकार जडत असल्याचेही काही पाहणी अहवालांचे निष्कर्ष आहेत. नोकरी ही ज्या स्त्रियांच्या कुटुंबांची गरज असते, त्यांच्या कौटुंबिक आणि आरोग्यविषयक समस्याही वाढत जातात.
अशा समस्यांना एकटी नोकरदार स्त्रीच जबाबदार असते का, नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या पतीचीही समान जबाबदारी असते किंवा नाही, हा अलीकडे एक वादविषय होऊ पाहात आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या कुटुंबांतील मुलांचे पोषण नीट होत नाही, त्यांच्या आहाराच्या सवयी बदलतात आणि घरातील एकटेपणा घालविण्यासाठी मुलांनी शोधलेल्या बैठय़ा पर्यायांमुळे स्थूलपणासारखे विकारही बळावतात, असे ‘असोचेम’च्या एका पाहणीत अलीकडेच आढळून आले आहे. आर्थिक गरजा भागविण्यासाठी नोकरी करणाऱ्या आणि शैक्षणिक दर्जा उंचावल्यामुळे करिअर म्हणून नोकरी-व्यवसाय करणाऱ्या, अशा दोन्ही गटांतील स्त्रियांच्या मुलांमध्ये असे विकार वाढत असल्याचा या पाहणीचा निष्कर्ष आहे. नोकरदार महिलांचे घराकडे पुरेसे लक्ष नसल्यामुळे मुलांमधील हे विकार वाढतात, असे या पाहणी अहवालाचे मत आहे. पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलांच्या तुलनेत, अर्धवेळ काम करणाऱ्या महिलांच्या मुलांमध्ये या विकारांचे प्रमाण कमी असते, तर पूर्णवेळ घरात असलेल्या महिलांच्या मुलांमध्ये ते आणखीनच कमी असते, असे आढळल्यानंतर, नोकरदार महिलांच्या मुलांमध्ये आरोग्याच्या तक्रारी अधिक असल्याचा निष्कर्ष या पाहणीतून काढण्यात आला.
या अहवालावर संमिश्र प्रतिक्रियाही उमटू लागल्या. मुलांच्या आरोग्याची जबाबदारी एकटय़ा स्त्रीची- म्हणजे आईची- का? वडिलांचीही तितकीच जबाबदारी असायला हवी, असा सूरही उमटू लागला. परंतु, मुलांच्या आरोग्याची जबाबदारी कुणाची असावी हा या पाहणीमागील महत्त्वाचा मुद्दाच नव्हता. महिलांनी नोकरीचे क्षेत्र निवडल्यानंतर त्या कुटुंबाच्या आरोग्याची घडी कुठेतरी विस्कटते आहे, हे या पाहणीतून सामोरे आलेले वास्तव विचारात घेणे आवश्यक आहे. मुलांच्या आरोग्याची जबाबदारी केवळ आईचीच का, असा सवाल पुढे येऊ लागल्यानंतर, अशा जबाबदारीतील वडिलांचा वाटा हा चर्चेचा स्वतंत्र मुद्दा होऊ शकतो. मुलांचे आरोग्य, शाळा, खाण्यापिण्याच्या सवयी, दैनंदिन जीवनशैली यांबाबतच्या सवयींवर पारंपरिक कुटुंबव्यवस्थेच्या संकल्पनेत आईचा प्रभाव असल्यामुळे या पाहणीची दिशा अशी ठरली असावी, आणि त्यामुळे कदाचित असा निष्कर्ष काढला गेला असावा. तरीदेखील, या जबाबदाऱ्या केवळ आईच्या किंवा केवळ वडिलांच्या या वादाला तात्पुरते बाजूला ठेवून या समस्येवर विचार करणे अधिक गरजेचे आहे, हे या पाहणीमुळे अधोरेखित झाले आहे. कारण, आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेली पुढची पिढी मोठेपणी त्यासाठी नेमके कुणाला जबाबदार धरणार आहे, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. ‘नोकरदारी’ हे या समस्येचे मूळ असेल, तर त्यावरचा तोडगा काय, याचाही विचार आवश्यक आहे. आर्थिक गरजा भागविण्याची निकड आणि कौटुंबिक आरोग्य यापैकी कोणत्या बाबीला प्राधान्य हवे, हेही या निमित्ताने ठरले पाहिजे. नाही तर, जबाबदारीच्या वादात पुढच्या पिढीचे आरोग्य पणाला लागलेले असेल..

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=195879:2011-11-25-12-14-34&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194

Tuesday, November 15, 2011

त्यांचा बालदिन कधीच साजरा झाला..

जवळपास दीड वर्षांपूर्वी आनंदकुमारने आपलं बिहारमधलं घर सोडलं, आणि तो पळून मुंबईत आला. तेव्हापासून तो रस्त्यावरचं आयुष्य जगत राहिला, आणि तिकडे बिहारमध्ये, आनंदकुमारचं सुखवस्तू कुटुंब त्याच्या काळजीनं दिवसागणिक खंगत राहिलं. त्याच्या डॉक्टर वडिलांनी दीड वर्ष त्याचा शोध घेण्यासाठी जंगजंग पछाडलं, आणि मुलगा सापडत नाही असं निश्चित झाल्यावर, आपला मुलगा या जगात राहिला नाही, अशी समजूत करून घेतली.. त्या कुटुंबाचं जगणंही या समजुतीबरोबर दिवसागणिक जळत राहिलं..
.. आठदहा दिवसांपूर्वी अचानक त्या घरात एक पत्र पडलं. डॉक्टरांनी ते फोडलं, आणि वाचतावाचताच त्यांचे डोळे वाहू लागले. आपला मुलगा जिवंत आहे, आणि सुखरूपदेखील आहे, लवकरच तो आपल्याला भेटणारही आहे, या जाणीवेनं त्यांना आकाश ठेंगणं झालं. त्यांनी ही बातमी घरात सांगितली, आणि आनंदकुमारच्या घरातली कोमेजलेली दिवाळी पुन्हा उजळली. घरात रोषणाई झाली, आणि फटाक्यांचीही आतषबाजी झाली.. लगोलग ५ नोव्हेंबरला त्याचे आईवडील मुंबईत दाखल झाले.
गेल्या आठवड्यात, ठाण्याला एका कार्यक्रमात अखेर आनंदकुमार आणि त्याच्या आईवडिलांची भेट झाली. तब्बल दीड वर्षांची ताटातूट संपविणारा तो क्षण अनुभवताना कार्यक्रमाला हजर असलेले दोनशे ठाणे-मुंबईकर अक्षरश भारावून गेले, आणि सभागृहात अश्रूंची फुले ओसंडून वाहू लागली. कुठल्यातरी क्षुल्लक कारणावरून घरातून पळालेल्या आनंदकुमारचं मन परिवर्तन झालं होतं, आणि आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी, आईच्या कुशीत शिरण्यासाठी तोही आसुसला होता. कार्यक्रम सुरू झाला, आणि अचानक आनंदकुमारला समोरच्या गर्दीत आपले आईवडील दिसले.. त्याच्या आईलाही मुलाचा चेहरा दिसला, आणि तो क्षण अक्षरश थिजला. दोन हुंदके सभागृहात अनावरपणे घुमले, आणि नंतर सारे सभागृहच अश्रूधारांनी चिंब झाले..
बालदिनाचा एक अभूतपूर्व सोहळा एक आठवड्याआधीच ठाण्यात साजरा झाला..
मुंबई-ठाण्याच्या रेल्वे स्थानकांवर दररोज घरातून पळून आलेली असंख्य मुले उतरत असतात. मुंबईला उतरल्यावर इथल्या जगण्याचा संघर्ष त्यांनाही छळू लागतो, आणि घरातल्या सुखी जगण्याची सवय लागलेली ही मुलं पहिल्यांदा गर्दीसमोर हात पसरतात. दिवसभर केविलवाण्या चेहऱ्यानं भीक मागूनही पोटाची भूक भागविण्यापुरेसा पसा मिळाला नाही, तर अन्न खाण्याऐवजी अंमली पदार्थ खातात, पितात, किंवा हुंगतात, आणि पोटाशी गुडघे घेऊन नशेत कुठेतरी फलाटाच्या कोपऱ्यावर झोपून जातात. या मुलांना समाजकंटकांपासून वाचविण्याचं, त्यांना आपली चूक उमगावी यासाठी प्रयत्न करण्याचं आणि पुन्हा आपल्या घरट्याकडे आईच्या सावलीत पाठविण्याचं काम करणाऱ्या समतोल फाऊंडेशननं आतापर्यंत अशी अनेक चुकलेली पाखरं पुन्हा घरट्यात परत पाठवली आहेत.
गेल्या आठवड्यात अशीच ४० मुलं आपापल्या आईवडिलांकडे परत गेली. ठाण्यात झालेल्या या कार्यक्रमाचे साक्षीदार बनलेल्या प्रेक्षकांना या सोहळ्याने एका सामाजिक समस्येचे भीषण रूप समोर उभे केले, आणि आईवडिलांचे, कुटुंबांचे छत्र पुन्हा सापडलेल्या त्या ४० जणांनी त्याच दिवशी बालदिन साजरा केला.. बिहारच्या आनंदकुमारप्रमाणेच, काही मुलांचे आईवडील, नातेवाईक अमरावती, भोपाळ, राजस्थानातूनही आले होते. गुजरातमधला राकेश सहा महिन्यांपूर्वी मुंबईत आला, आणि त्याच्या काळजीनं खंगत खंगत त्याच्या वडिलांनी तिकडे जगाचाच निरोप घेतला. समतोलच्या मनपरिवर्तन शिबिरामुळे राकेशच्या मनात घराची ओढ पुन्हा जागी झाली, पण तो घरी परतला, तेव्हा त्याला प्रेमानं कुरवाळायला त्याचे वडील तिथे नव्हते..
राकेश मुंबईला समतोलच्या शिबिरात आहे, आणि त्याला घरी यायचंय, असं पत्र त्याच्या घरी पोहोचलं, तेव्हा त्याच्या वडिलांच्या मृत्यूनं खरं तर त्याचं घर काळवंडलं होतं. हे पत्र मिळताच, त्या दुखालाही आनंदाचे धुमारे फुटले आणि राकेशच्या घरातल्या काहीजणांना सोबत घेऊन गावातली १५ माणसं खास जीप भाड्याने घेऊन ठाण्याला दाखल झाली. त्या सोहळ्यात त्यांना राकेश भेटला, तेव्हा बालदिनाचा सोहळा हाच असला पाहिजे, याची खात्री उपस्थितांनाही पटली..
समतोल फाऊंडेशनच्या कल्याणजवळील मामनोली येथील मनपरिवर्तन शिबिरात अशा रस्त्यावरच्या अनेक मुलांना मायेची पाखर मिळते, प्रेमाची ऊब मिळते आणि मुख्य म्हणजे, डोक्यावर सावली देणारं छफ्पर मिळतं. फलाटावरच्या आयुष्याची चटक लागलेली काही मुलं कधी लगेचच माणसात यायला राजी होत नाहीत. मग समतोलचे कार्यकत्रे त्यांचे आईवडील, भाऊ-बहीण होतात, आणि त्यांना माणसाची माया लावतात. मग ही मुलं हळवी होतात. असा एखादा क्षण पकडून हे कार्यकत्रे त्याच्या घराच्या आठवणी जाग्या करतात, आणि ते मूल घराच्या ओढीनं आसुसतं. कधी एकदा आईवडिलांना, दुरावलेल्या भावंडाना, आणि गावातल्या हुंदडणाऱ्या मित्रांना भेटतो, असं त्याला होऊन जातं. नेमकी ही स्थिती आली, की समतोलचं पत्र त्यांच्या घरी थडकतं, आणि मुलांना आईवडिलांकडे सोपविण्याचा आनंद सोहळा साजरा होतो.
.. समतोलमध्ये उद्याचा बालदिन कसा साजरा होणार, या उत्सुकतेपोटी संस्थेच्या विजय जाधव यांना फोन केला, तेव्हा तसं काहीच ठरलं नाही असे ते म्हणाले. कदाचित, उद्या, नेहमीप्रमाणे संस्थेचे कार्यकत्रे रेल्वे स्थानकांवरच्या मुलांना एकत्र करतील, त्यांच्याशी गफ्पा मारतील,त्यांच्या वेदना जाणून घेतील, आणि जमलं, तर त्या हलक्या करण्यासाठी हात देतील.. पण हा तर नेहमीचाच कार्यक्रम असतो. त्यामुळे आमच्याकडे नेहमीच बालदिन साजरा होतो, असे विजय जाधव म्हणाले. ..

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=193519:2011-11-13-19-04-50&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104#JOSC_TOP

Sunday, August 21, 2011

माणसाशी नातं जोडणारी मूर्ती!

सुमारे ३० वर्षांपूर्वी, १९८१ मध्ये, मुंबईतील एका लहानशा अपार्टमेंटमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू होती. भविष्याचा वेध घेतला गेला, आणि, आपल्या कामाची जगानं नोंद घेतली पाहिजे यावर एकमत झाले. त्यासाठी आपली कंपनी पूर्णपणे व्यावसायिकरीत्या चालविली पाहिजे, असे ठरले, आणि ‘इन्फोसिस’ने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या जागतिक बाजारात पदार्पण केले. केवळ ‘गुणवत्ता’ हाच कंपनीतील अधिकारपदाचा निकष निश्चित झाला. नातेवाईकांचा गोतावळा, कुटुंबाचे वर्चस्व अशा गोष्टींना कंपनीच्या व्यवस्थापनात अवास्तव थारा द्यायचा नाही या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. जेमतेम दहा हजार रुपयांच्या ‘उसनवारी’वर सुरू झालेल्या ‘इन्फोसिस’ने कारभार सुरू केला.तीन दशकांपूर्वी सुरू झालेल्या या वाटचालीने आज यशाचे शिखर गाठले आहे.


आज या कळसाध्यायाची आणखी एक ओवी लिहिली जाणार आहे. ज्या व्यक्तीच्या निरपेक्षभावाचा आदर्श आणि यशाच्या स्वप्नाची कास धरून ‘इन्फोसिस’ने वाटचाल केली, ते एन. आर. नारायणमूर्ती उद्या, २० ऑगस्टला ६५ वर्षांचे होत आहेत. कॉर्पोरेट जगतात हे वय निवृत्तीचे नसते. पण नैतिक मूल्ये जपणारे नारायण मूर्ती मात्र, इन्फोसिसच्या कारभारातून उद्यापासून अलिप्त होत आहेत. आज इन्फोसिसच्या बंगलोरमधील संकुलात नारायणमूर्तीच्या ‘इन्फोसिस कुटुंबा’ने त्यांना आदराने निरोप दिला. हा कार्यक्रम प्रसार माध्यमांसाठी खुला नव्हता. नारायण मूर्तीचे कुटुंबीय, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काही दिग्गज, इन्फोसिसचे आजी-माजी सहसंस्थापक आणि कंपनीच्या यशस्वी वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यात मोलाचा वाटा उचलणारे अधिकारी अशा मोजक्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कर्नाटकमध्ये २० ऑगस्ट १९४६ रोजी जन्मलेल्या नारायणमूर्ती यांच्या आयुष्याचा प्रवास अद्भुतांनी भारलेला आहे. इन्फोसिसचा जन्म आणि वाटचाल हे यातील सर्वात अचंबित करणारे टप्पे ठरले. १९६७ मध्ये म्हैसूरला अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर कानपूर आयआयटीमधून ‘एम. टेक’ झालेल्या नारायणमूर्तीनी त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून दहा हजार रुपये उसने घेतले, आणि पुणे येथून इन्फोसिसचा प्राथमिक प्रवास सुरू झाला. आज या कंपनीची उलाढाल २७ हजार कोटी रुपयांच्या वर पोहोचली आहे. १९९३ मध्ये इन्फोसिसची भारतीय शेअरबाजारात नोंदणी झाली, आणि पुढे सहा वर्षांत, १९९९ मध्ये इन्फोसिस ही अमेरिकेच्या ‘नॅसडॅक’मध्ये नोंदणी झालेली पहिली भारतीय कंपनी ठरली. जागतिक बाजारपेठेत दमदार पदार्पण केलेल्या या कंपनीने आपल्या भरभराटीच्या प्रत्येक पावलासोबत चालणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि हजारो गुंतवणुकदारांना संपत्तीची दालने खुली केली. इन्फोसिस हा भारतात जन्मलेला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील चमत्कार ठरला, आणि नारायण मूर्ती या चमत्काराचे शिल्पकार, प्रेरणास्थान ठरले..व्यावसायिक द्रष्टेपणाला माणुसकीची जोड देत कंपनीचे बळ वाढविणाऱ्या नारायणमूर्तीनी कंपनीच्या विकासात कोणतीही तडजोड केली नाही. नोकरीतील आरक्षणासारख्या भावनिक मुद्दय़ाला महत्त्व न देता, गुणवत्ता हा एकमेव निकष निश्चित केला. मात्र, भरभराटीच्या वाटचालीतदेखील, सामान्य जनतेशी असलेली नाळ तुटू दिली नाही. सामान्य जनतेच्या जगण्याशी नाते जोडायचे असेल, तर सामान्यांसारखेच राहिले पाहिजे, या तत्वाशी बांधील राहिले. म्हणूनच समाजासोबतचे अंतर वाढविणे अमान्य असणारी ही मूर्ती कॉर्पोरेट विश्वाचा आगळा आदर्श ठरली..
नारायण मूर्तीनी १९८१ ते २००२ या काळात इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. २००२ ते २००६ या काळात संचालक मंडळाचे अध्यक्षपदही सांभाळले. ऑगस्ट २००६ मध्ये त्यांनी कार्यकारी जबाबदारीतून निवृत्ती घेतली, आणि पुढे कंपनीचे केवळ अ-कार्यकारी अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत राहिले. देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा पाया रचणाऱ्या इन्फोसिसच्या या शिल्पकारास २००८ मध्ये पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले. आता देशभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी ही मूर्ती आपले ज्ञान वाटत सुटणार आहे. पश्चिम बंगालच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची नवी वाट आता नारायणमूर्ती आखणार आहेत
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=177683:2011-08-19-18-31-13&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104

Friday, July 29, 2011

गुरू बोले तो..

मास्तर घराबाहेर पडले आणि शाळेच्या वाटेवरल्या गणपतीच्या देवळात जाऊन बसले. इथे आल्यावर मास्तरांचं मन टवटवीत होऊन जायचं. गणपतीच्या मूर्तीकडे एकटक पाहताना मास्तरांची तंद्री लागायची. मन विचारात गुरफटून जायचं. आपण परमनंट झालोय, आणि कंत्राटी ’शिक्षणसेवका’ऐवजी ’फुलटाईम’ मास्तर झालोय, असं त्यांना दिसायचं.. ते बाहेर पडायचे. चपला अडकवून शाळेचा रस्ता धरायचे..
या गावात नेमणूक झाल्यापासून मास्तरांचा तो नेमच झाला होता. ‘गाव लई इरसाल हाये’, असं त्यांना अगोदरच जाणकार मास्तरांनी सांगून ठेवलं होतं. गावाचं इरसालपण त्यांना शाळेतच लक्षात आलं होतं. शिस्तीत वागणारं, एक पोरगं वर्गात दिसत नव्हतं. शिस्तीसाठी काय करावं, या विचारानं मास्तरांचं मस्तक पोखरून जायचं. मुलांना निबंध लिहायला सांग, कुठे चित्र काढून आणायला सांग, एखादं रोपटं रुजवून ते वाढवायची सवय लाव, असले वेगवेगळे प्रयोग मास्तर शाळेत करत होते पण त्यातूनही काही निष्पन्न व्हायचंच नाही. मग मास्तर स्वत:वरच वैतागायचे. पण, आपण ‘शिक्षणसेवक’ आहोत, याचं भानही लगेच यायचं..
त्या दिवशीही असाच विचार करताना, गुरुपौर्णिमा जवळ आलीय, हे त्यांना आठवलं, आणि मुलांना ’गुरू’वर निबंध लिहून आणायला सांगायचं ठरवून ते शाळेत पोहोचले. पोरांचा गलका सुरूच होता. मास्तरांनी फळ्यावर दोनतीन गणितं लिहिली, आणि स्वत:शीच मोठय़ानं बोलत ती सोडवली.. मग व्याकरणाचं पुस्तक काढलं, आणि स्वत:शीच मोठय़ानं वाचलं. एक कविताही मोठय़ानं घोकली.. विज्ञानाचा एक पाठही मोठय़ानं वाचून झाला.. मग त्यांनी टेबलावर जोरात छडी आपटली. पण मास्तर आपल्याला छडीनं मारू शकत नाहीत, हे माहीत असल्यानं पोरांनी तिकडे लक्षच दिलं नाही.. संध्याकाळ झाली. पोरांचा गलका आता वाढला होता.. मास्तरांनी जिवाच्या आकांतानं ओरडून पोरांना गप्प केलं, आणि निबंधाचा गृहपाठ पोरांना सांगितला.. ’शनिवारी निबंध तयार पाहिजेत ’.. मास्तर ओरडले, तोवर पोरं पाठीला दप्तर अडकवून पळत सुटली होती. मास्तरांनी स्वत:ला सावरलं. आपण शिक्षणसेवक आहोत असं बजावत तेही बाहेर पडले.
शनिवार आला. मास्तरांनी पोरांना निबंधाबद्दल विचारलं, आणि काही पोरांनी पटापट दप्तरातून वह्य़ा काढून मास्तरांच्या हातात दिल्या. मास्तरांनी डोळे मिटून गणपतीला मनातल्या मनात नमस्कार केला. वह्य़ा पिशवीत नीट ठेवल्या. घरी जाऊन निवांतपणे सगळे निबंध वाचायचे असं त्यांनी ठरवलं.. अध्र्या दिवसानं शाळा सुटली, तेव्हा मास्तरांनी जाताजाता पुन्हा देवळात जाऊन गणपतीच्या पायावर डोकं ठेवलं. गणपती मिस्किल हसतोय असा भास मास्तरांना झाला. आपण ’शिक्षणसेवक’ आहोत, याचा त्यांना अभिमान वाटला. ते घरी आले.
. आज रविवार असल्यानं मास्तर निवांत उठले. चहापाणी झालं आणि मास्तरांनी पिशवीतल्या निबंधाच्या वह्य़ा बाहेर काढल्या. आजच गुरुपौर्णिमा आहे, हे त्यांना माहीत होतं. आपणही मास्तर, म्हणजे ’गुरू’ आहोत, हे त्यांच्या लक्षात आलं, आणि त्यांचा ऊर अभिमानानं भरून आला. क्षणभरानंतर, आपण ‘शिक्षणसेवक’ आहोत, हेही आठवलं, आणि मास्तर हिरमुसले. एक वही काढून उघडली. मुलाचं नाव बघितलं. सरपंचाचं पोर होतं. सरपंच म्हणजे वजनदार असामी.. राजकारणातला बाप माणूस.. घरावर भगवा झेंडा फडकायचा.. मास्तर मनातल्या मनात घाबरले. तांबडी पेन्सिल त्यांनी ब्यागेत ठेवून दिली, आणि ते निबंध वाचू लागले..
..‘‘त्यो काँगरेसवाल्यांचा जावाय हाये.. पाच वरसं झाली तरी बी आजून सरकार तेला फासावल लटकावंना झालंय. का, तर म्हनं अल्पसंख्याकांच्या भावना दुकत्यात.. दयेचा आरजं बी दाबून टाकल्याला हाय. जनतेला म्हाईत हाय, की ह्य़े समदं राजकारन हाय. पन गुरूला फासावर द्यायलाच लागंल"..
मास्तरांनी डोळे मिटले. वही बंद करून त्यांनी दुसरी वही काढली. नाव बघितलं. फौजदाराच्या पोराची वही. मास्तर पुन्हा घाबरले. आता तांबडी पेन्सिल काढायचीच नाही असं ठरवलं, आणि वही उघडून ते निबंध वाचायला लागले..
.. ‘‘मुंबईतली हाजी मस्तान, युसूफ पटेल, करीमलालाची वट खतम झाली आणि दाऊद, गवळी, अमर नाईक, छोटा राजन, अशा भाई लोकांचा बोलबाला सुरू झाला. त्यांच्यातलाच गुरू हा पन एक.. गुरू लई टेरर हाये.. आजूनबी पोलिसांच्या हाताला लागल्याला न्हाई. गुरू साटमचं नाव निगालं तरी बी वेपारी, दुकानदार टराकत्यात "..
मास्तरांनी पुन्हा डोळे बंद करून वही मिटली. आपणच सांगितलेलं असल्यामुळे, सगळ्या वह्य़ा वाचायलाच हव्यात, हे स्वत:ला बजावलं. त्यांनी पुढची वही उघडली.. गावातल्या तंबू थेटराच्या मालकाचं पोरगं. वहीत काय असेल, याचा तर्क करतच त्यांनी निबंध वाचायला सुरुवात केली. आपला अंदाज बरोबर येतोय, या जाणिवेनं ते सुखावले होते..
.. ‘‘गुरूमधे अभिषेक बच्चम आणि ऐश्वर्या रायनं येकदम भारी एन्ट्री मारली हाय. त्यो मल्लिका शेरावतचा डान्स तर येकदम फाकडू. विद्या बालन खुर्चीत बसल्याली आसती, पन काय दिसतीय म्हंताना बोलून सोय न्हाई. गुरू म्या केबलवर बघिटला. लई भारी पिक्चर.. आनखी एक लव्ह गुरू बी हाय. पन त्यो आपाटला दनकून’’..
मास्तरांचा अंदाज एकदम बरोबर होता. आता त्यांना गंमत वाटू लागली होती. चारपाचच वह्य़ा शिल्लक होत्या. त्या वाचायच्याच, असं त्यांनी ठरवलं, आणि पुढची वही काढून उघडली. नाम्या शेळक्याचं पोरगं. गरीब, हुशार आणि म्हेन्ती.. मास्तरांना बरं वाटलं. त्यांनी निबंध वाचायला सुरुवात केली. आषाढीची वारी संपवून नाम्या अलीकडं काही दिवसांसाठी गावी आला होता. मग पुना मुंबईला जाणार होता. तो मुंबईत डबे पोचवतो, हे मास्तरांना माहीत होतं.
..‘‘मुंबईत येकच गुरू हाय. त्येला समदं मानत्यात. कुटंकुटं भाषान बी करायला समदं बोलावत्यात. मागं येकडाव ब्रिटनलाबी बोलावलं व्हतं त्या राजाच्या लग्नाला. म्यानेजमेटं गुरू म्हन्त्यात समदं आता. आता त्यो सादासुदा डबंवाला ऱ्हायला नाय’’..
मास्तरांनी वहीवरनं आदरानं हात फिरवला, आणि वही मिटली. पुढची वही काढली. नाव बघितलं.. पुजाऱ्याचं पोरगं. मास्तरांच्या आशा पालवल्या. त्यांनी वही उघडली, आणि तांबडी पेन्सिल हातात धरून ते वाचू लागले.
..‘‘दाणोलीचे साटम महाराज आमचे गुरू. जंगलात फिरायचे, गोठय़ात ऱ्हायचे. भक्तांवर त्यांची खूप माया व्हती. कदी हाताला गावंल ते फेकून मारायचे, पन आमी कवा घाबारलीलं नाय. परसादी म्हनू मार खायाचे.. शेवटी गुरू तो गुरू. एकदम द्य्वमानूस.’’
मास्तरांनी डोळे मिटून नमस्कार केला. लगेचच ते घाबरले. त्यांनी फौजदाराच्या पोराची वही पुन्हा उघडली.. तो गुरू साटम वेगळा.. खात्री झाल्यावर मास्तरांनी पुजाऱ्याच्या पोराची वही बंद केली.. आणि शेवटची वही उघडली. नाव बघितलं, आणि ते आश्चर्यचकित झाले. त्यांच्याच मुलाची वही होती. मास्तरांचा ऊर भरून आला. ते वाचू लागले..
..‘‘पूर्वी मास्तरांना गुरू मानायचे. त्यांना नमस्कार करायचे. गावात त्यांना मान होता. आता सरपंचाच्या घरची कामं करायला लागतात. जनगणना करावी लागते. मतदारयाद्यांची कामही मास्तरच करतात. शिक्षणसेवक असले, तरी आख्ख्या गावाची सेवा मास्तरांना करावी लागते. मास्तर आता गुरू राहिले नाहीत. गुरासारखं वागवतात त्यांना सगळे’’..
.. पोरगा रागावून आपल्याकडे बघतोय, असं मास्तरांना वाटलं.. त्यांनी डोळे पुसले, आणि वही मिटून ठेवली. पुढच्या वह्य़ा वाचायच्या नाहीत, असं त्यांनी ठरवलं.
.. आणि हातावर डोकं टेकून ‘शिक्षणसेवक’ तिथंच आडवा झाला. क्षणातच त्याला झोप लागली.

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=172197:2011-07-22-19-33-47&catid=155:2009-08-10-09-09-46&Itemid=168

Sunday, February 27, 2011

कवडीचे मोल !...

शंख आणि कवड्या-शिंपल्या म्हणजे दळभदद्रीपणाची लक्षणे, हा जुना समज आता इतिहासात गडप झालाय. कारण, कधीकाळी कवडीचेसुद्धा मोल नसलेल्या या वस्तूना आता अमोल भाव येतोय... सिंधुदुर्गच्या समुद्र किनारी भागात सापडणार्‍या शंख-शिंपल्यांसारख्या समुद्री वस्तूंनी पर्यटकांना भुरळ घातली आहे. किनारी भागातील शेकडो कुटुंबांच्या हातात या वस्तूंमुळे पैसा खेळू लागला आहे. यामुळेच, गोड्या पाण्यात मोत्यांचे भौतिक संवर्धन करण्याच्या नव्या व्यवसायाची स्वप्ने श्रमाचं मोल ओळखलेल्या सिंधुदुर्गाला पडतायत...

अथांग निळ्या खार्‍या पाण्याखालचा खजिना, हे सामान्यांसाठी सततचे गूढ आहे. अलीकडे मात्र यावर अनेक संशोधने सुरू असून, कोकणाच्या समुद्रात जैविक संपत्तीची खाण आहे, हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. कोकणाच्या समुद्र किनार्‍यावर राहणार्‍या प्रत्येकाचे या नीलसंस्कृतीशी समरस नाते जडलेले आहे. हजारो संसार तर याच संस्कृतीने जपले आहेत. पण आता केवळ मासेमारी उद्योग एवढीच या संस्कृतीची मर्यादा उरलेली नाही. समुद्रात आणि काठावरल्या वाळूतही सापडणारे शंख, शिंपले, तसेच समुद्री शेवाळ, आणि वेगवेगळ्या दगडांनाही व्यावसायिकदृष्टय़ा मोठी किंमत येत आहे.

पर्यटनभूमी म्हणून मान्यता मिळत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रातून मिळणार्‍या शोभिवंत वस्तूना मागणी वाढू लागली आहे. पूर्वी कवडीमोलाचे मानले जाणार्‍या शंख, शिंपल्यांवर कलात्मक साज चढवून त्या वस्तू विक्रीचा व्यवसाय जिल्ह्यातील तरुणांच्या रोजगाराचे साधन बनला आहे. मालवणात तर अशा वस्तू बनविणारे दोन कारखाने उभे राहिले आहेत.

जगभरात मोत्याला मागणी वाढत आहे. नैसर्गिक मोत्याचे उत्पादन ही मागणी पुरवायला कमी पडते यामुळे कल्चर्ड व कृत्रिम मोत्याची संकल्पना समोर आली. याचबरोबर गोडय़ा पाण्यातील मोत्याची शेती पध्दतीही विकसित झाली. सध्या बाजारात कल्चर्ड मोतीच मोठय़ा प्रमाणावर मिळतात. भारत मोठय़ा प्रमाणात संस्करीत मोत्यांची आयात करतो. सेंट्रल इन्सिटय़ुट ऑफ फ्रेश वॉटर ऍग्रीकल्चर, भुवनेश्वर या संस्थेने साध्या गोडय़ा पाण्यातील शिंपल्यांपासून मोती मिळविण्याचे तंत्र विकसित केले आहे. काही कीटक चुकून शिंपल्यात घुसतात आणि ते बाहेर येऊ शकले नाहीच तर हाच शिंपला त्यावर विशिष्ट थर जमा करतो आणि त्याचा मोती तयार होतो. याच साध्या सोप्या तत्वाचा वापर करुन मोत्याच्या शेतीची पध्दती विकसित केली आहे. तलाव, नद्या यासारख्या गोडय़ा पाण्याच्या स्त्रोतामधून शिंपले गोळा केले जातात. त्याच्यावर नंतर शस्त्रक्रिया करुन त्याच्यात विशिष्ट किटक किंवा किटकाचा अवयव किंवा एखादा मणी सोडला जातो. यानंतर शिंपला त्यावर थर जमवू लागतो. शस्त्रक्रिया केलेले हे शिंपले तलावात सोडले जातात. या तलावात कायम देखरेख ठेवली जाते. मोती बनण्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर शिंपले गोळा करुन मोती निवडले जाते.

मोत्याची शेती करण्याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण सेंट्रल इन्स्टिटय़ुट ऑफ फिशरीज, एज्युकेशन मुंबई, सेंट्रल इन्स्टिटय़ुट ऑफ फ्रेश वॉटर ऍक्वाकल्चर भुवनेश्वर, सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुट एर्नाकुलम, कोची, भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली या शासनमान्य संस्थांमधून दिले जाते. पर्यटनातून आर्थिक विकास साधणार्‍या सिंधुदुर्गाला असे मोत्याचे प्रशिक्षण मिळाले तर `ग्लोबलायझेशन'ची स्वप्ने पाहणार्‍या कोकणी पाण्याला आणखीनच तजेला येईल...
('महान्यूज'च्या सौजन्याने...)
-------------------

Monday, February 14, 2011

'कळी' खुलली !...

सकाळची उन्हं भंवतालच्या हिरवाईवर पसरली, तरी उमलूउमलू म्हणत गुलाबाच्या लालसर फांद्यांच्या टोकांवर झुलत राहिलेल्या कळ्या काल पाकळ्या मुडपून गुपचूप बसूनच होत्या... `फुलण्या'चं सार्थक व्हावं, म्हणून हुरहूरत होत्या... कळीत दडलेली पाकळीपाकळी मोहरली होती, पुरतं उमलून आपल्या देखण्या तारुण्याची भुरळ जगाला घालण्यासाठी उतावळी होती... त्यातच, तो काटेरी गुलाब, कळीआड दडलेल्या प्रत्येक पाकळीला दटावत होता.
... ‘एक दिवस थांबा... आजचा सूर्य मावळू द्या, उद्याचा सूर्य उगवेल, त्याची किरणं सोनेरी नसतील.. त्या किरणांचा स्पर्श झाला, की तुमची `कळी' आपोआपच खुलेल, पाकळीपाकळी मोहरून उठेल... कारण, उद्याची किरणं गुलाबी असतील.. सारा दिवसच गुलाबी असेल. उद्याच्या वार्‍यांना प्रेमाचा गुलाबी गंध असेल, या गंधाने आसमंत धुंद असेल... कळीच्या पाकळीपाकळीवर आपल्या हळुवार झुळुकेने हा वारा गंधाचा शिडकावा करेल आणि पाकळ्यांचे भान हरपेल.
आपण जन्माला येतो, उमलतो आणि फुलतो, तेच मुळी झोकून देण्यासाठी!... उमलल्यानंतर कोमेजून जाईपर्यंतचं आपलं जगणं झाडाच्या काट्यांशी खेळत संपून जावं, असं कुठे आपलं स्वप्न असतं? ...भुरळल्या नजरेनं कुणीतरी पाहावं, नाजूक हातांनी हळुवार कुरवाळावं, आणि प्रेमभरल्या स्पर्शानं आपल्याला खुडावं... आपल्या सौंदर्याशी, रंगाशी स्पर्धा करणार्‍या मुसमुसल्या हातांमध्ये सोपवावं... आणि आपण, त्या क्षणी परस्परांच्या डोळ्यात उमटणार्‍या हळुवार, स्वर्गीय प्रेमभावनांचे साक्षीदार होताना देठाशी होणारी ठुसठुस विसरून समरसून त्या क्षणाचं सौंदर्य खुलवावं... मग आपल्या फुलण्याचं सार्थक झालं...

... कारण, असं झोकून देण्याचं भाग्य फक्त आपल्याच नशीबी असतं. या झोकून देण्यालाच, प्रेम म्हणत असतील, तर आपण तर त्या प्रेमाचं खरंखुरं प्रतीक आहोत'...
... ‘फुलण्या'साठी कधी तो ‘उद्या' उजाडतो, या प्रतीक्षेत पेंगुळलेली कळी काटेरी गुलाबातून उमटणारे ते शब्द कानात साठवत होती...
... आणि त्या शब्दांनी कळीतली एक पाकळी मोहरली... हा असा काटेरी, तरी इतका हळुवार?... हा तर आपल्याला ‘फुलासारखं' जपतोय... आपण कळीत ‘साठलो' तेव्हापासूनचा हा आपला अनुभव... त्या दिवशी, आपण पहिल्यांदाच काट्यांची नजर चुकवूनच कळीतून बाहेर डोकावलो... ती पहाट अनुभवली, सूर्याची ती कोवळी किरणंही अंगावर झेलली, तेव्हा ‘मोहरलेपणा'ची पहिली प्रचीती घेतलीच होती... आज या काट्यातून पाझरणारं हे हळुवारपण पुन्हा त्याचाच अनुभव देतंय... त्या दिवशी आपलं पहिलं गुलाबी रूप या काटेरी फांदीनं न्याहाळलं, तेव्हा त्याच्या डोळ्यात साठलेलं प्रेम आपण अनुभवलंच होतं.
आता उद्याच उमलायचं... उद्याची गुलाबी किरणं, फक्त एकदाच अनुभवायची...
झोकूनच द्यायचं, तर तो क्षणही असा, गुलाबी, मोहरलेला आणि स्वर्गीय असलाच पाहिजे... म्हणजे त्या उमलण्यालाही अर्थ असेल...
... पेंगुळलेपण विसरून पाकळीनं शेजारच्या पाकळीच्या कानात हे गुपित सांगितलं, आणि उमलूउमलू पाहणारी शेजारची पाकळीही पुन्हा कळीत मुडपून गेली... उद्याच उमलायचं ठरवून !
काल गुलाब फुललाच नाही... काटेरी फांदीफांदीवर सगळ्याच कळ्या होत्या...
त्यांना उमलायचं आहे, पण त्यांना `उद्या'ची आस आहे !
... आज गुलाब फुलला आहे !!

Sunday, January 30, 2011

नात्याचा धागा...

लातूर जिल्ह्यातल्या भीषण भूकंपाने हजारो संसार उद्ध्वस्त केले. शेकडो बालके अनाथ झाली आणि असंख्य कुटुंबांच्या डोक्यावरची छपरे नष्ट झाली. या भूकंपाने देश हादरला. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो हात सरसावले. सोलापूरच्या एका शाळेतील काही शिक्षकांनीही भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. अजित जोशी नावाचा मुलगा तेव्हा दहावीत होता. त्याचे वडील सोलापुरात शिक्षक होते. त्या मदतकार्यात तेही सामील झाले. हजारो हात मानवतेच्या जाणीवेतून एकत्र आले, तर उद्ध्वस्त संसारांना पुन्हा उभारी मिळते, हे त्या दुर्घटनेनंतर अजित जोशीच्या मनावर कायमचे कोरले गेले, आणि वंचितांच्या मदतीसाठी आपला हात कायमचा पुढे राहिला पाहिजे, असे त्याने तेव्हाच ठरवले...
महाराष्ट्राच्या मातीत मनाची मशागत झालेला अजित जोशी २००३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाला, आणि त्याची नेमणूक हरियाणात झाली. २००८ मध्ये हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यात कलेक्टर म्हणून रुजू होताच त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचे एक नवे मॉडेल आखले आणि निर्धाराने काम सुरू केले... इथे पानिपतचे पुन्हा महाराष्ट्राशी नाते जडले. त्याआधी २००५ मध्ये, गोहाणा येथे दलित-सवर्ण संघर्षाच्या भडक्यात दलितांची घरे पेटवून दिली गेली होती... ५२ कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली, आणि अजित जोशींनी त्यांच्या पुनर्वसनाचे आव्हान स्वीकारले. फक्त साडेतीन महिन्यांत त्यांच्यासाठी नवी घरे उभी राहिली, आणि या कुटुंबांना नवे, आश्वस्त छप्पर मिळाले...
महाराष्ट्रातील अनेक दुष्काळी जिल्ह्यांत शेकडो कुटुंबे उदरनिर्वाहासाठी कुटुंबकबिल्यासह गावोगावी हिंडत असतात, हे लहानपणापासूनच पाहिलेले असल्याने, आपण जिथे प्रशासकीय अधिकारी आहोत तेथील कुटुंबांवर अशी वेळ येऊ नये असे त्यांनी तेव्हाच ठरविले आणि या तरुण जिल्हाधिकार्‍याने सोनिपतमध्ये काम सुरू केले. महाराष्ट्रात ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी `साखर शाळां’चा प्रयोग यशस्वी झाला आहे. हरियाणामध्ये वीटभट्ट्यांवर काम करणारी कुटुंबेही राज्यात स्थलांतर करीत असतात. या कुटुंबांमधील मुलांसाठी साखर शाळांच्या धर्तीवर शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव अजित जोशी यांनी हरियाणा सरकारसमोर ठेवला आणि तात्काळ त्याला मान्यताही मिळाली. या प्रकल्पाने आज राज्यात एक नवा आदर्श उभा केला आहे. वीटभट्टी कामगारांच्या मुलांकरिता हरियाणामध्ये आज अडीच हजार शाळा सुरू आहेत. ‘युनेस्को’च्या ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता पुरस्कारा’साठी या प्रकल्पाची निवडही झाली. हरियाणाच्या विकासाचा आलेख मांडताना आज अभिमानाने या प्रकल्पाचा उल्लेख केला जातो. हरियाणातील वंचितांसाठी सुरू झालेल्या या प्रकल्पामागे महाराष्ट्राचीच प्रेरणा आहे, असे अजित जोशी अभिमानाने नमूद करतात...... अजित जोशींच्या कलेक्टर बंगल्यामागच्या जागेतील त्यांनी स्वत: मशागत करून जोपासलेल्या हिरव्यागार शेतांच्या काठांवर पहाटे मोर बागडू लागतात, पक्ष्यांच्या किलबिलाटाने गावाला जाग येते, आणि सोनिपतचा हा तरुण जिल्हाधिकारी सकाळच्या फेरफटक्यासाठी मोटरसायकल घेऊन बाहेर पडतो. ही एक प्रभात फेरीच असते. या वेळी गावातील शेकडो रहिवासी आपल्या समस्या, गा-हाणी घेऊन एकत्र येतात आणि गावातल्याच एखाद्या मैदानावर, शाळेच्या ओट्यावर ‘कलेक्टर’चा ‘जनता दरबार’ भरतो... तिथल्या तिथे गावकèयांच्या समस्या जाणून घेतल्या जातात, आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिका-यांना सूचनाही दिल्या जातात... उगवत्या सूर्याबरोबर जिल्हाधिकारी अजित जोशींचे ‘फिरते कार्यालय’ सुरू होते... वर्षानुवर्षांपासून दररोज सकाळचा हा उपक्रम आजही नेमाने सुरू आहे. ‘सरकारी वेळे’नुसार ते आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होतात, तेव्हाही नागरिकांची रीघ लागलेलीच असते. भेट मिळाली नाही म्हणून पुन्हा यावे लागले, असा अनुभव कुणालाही कधीच येत नाही. सकाळच्या फेरफटक्यातून जनतेसोबत मिसळून जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविणारा अजित जोशी हा बहुधा एकमेव जिल्हाधिकारी असावा. यामुळेच, प्रशासन आणि जनता यांच्यात एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आणि हरियाणा सरकारनेदेखील या नात्याची दखल घेतली. अजित जोशींचे सर्व प्रस्ताव सरकारकडून विनाविलंब संमत होतात, आणि जनता सरकारला दुवा देते. अजित जोशी हा सरकार आणि जनता यांच्यातील अदृश्य दुवा असतो...
दोन वर्षांपूर्वी, २००८ मध्ये बिहारमध्ये कोसी नदीला महापूर आला आणि हाहाःकार माजला. हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अजित जोशींनी हरियाणा सरकारला प्रस्ताव दिला. एका उद्ध्वस्त गावाचे पुनर्वसन करायचे ठरले, आणि हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्याने बिहारमधील मुसहारी नावाचे एक गाव पुनर्वसनासाठी दत्तक घेतले. एक वेळचे जेवण कमी करून त्याचे पैसे पूरग्रस्तांसाठी द्या, असे आवाहन अजित जोशी यांनी जिल्ह्यातील जनतेला केले, आणि सोनिपतच्या गावक-यांनी लोकवर्गणीतून एक कोटी ४३ लाखांचा निधी अजित जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. त्या निधीतून सोनिपतने बिहारमध्ये उभे केलेले मुसहारी गाव आज आनंदाने नांदते आहे... २२३ घरे उभी राहिली, एक समाजमंदिर आणि एक शाळाही बांधून झाली... ५० शौचालये, ३२ हातपंप आणि गाव हायवेला जोदणारा एक भक्कम रस्ता निर्माण झाला... महाराष्ट्रातील लातूरच्या भूकंपानंतर मदतीसाठी पुढे आलेल्या हजारो हातांनी आखून दिलेल्या आदर्शाची त्यामागे प्रेरणा आहे. अजित जोशी यांनी हा प्रकल्प मोठ्या जिद्दीने पूर्ण केला आहे.
`पेपरलेस इलेक्शन' हा जेव्हा एक `विचार' होता, तेव्हा अजित जोशींनी `एस्क्यूएल२०००' नावाचे एक सॉफ्टवेअर विकसित केले... आता त्या जिल्ह्यात होणार्‍या कोणत्याही निवडणुकीसाठी मतदार याद्यांची पुनर्रचना करण्याकरिता, नवे सायास करावे लागत नाहीत... अजित जोशींनी हरियाणात केलेल्या वेगवेगळ्या विधायक कामांतून आपले नाव कोरले आहे... म्हणूनच, हरियाणातले प्रशासकीय अधिकारी अजित जोशी यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करतात, तेव्हा त्यांच्या ‘मराठी माणूस’पणाचा उल्लेख आवर्जून केला जातो...
म्हणूनच, अजित जोशी हा महाराष्ट्र, पानिपत आणि बिहार यांचे तिहेरी नाते जोडणारा धागा ठरला आहे.
------------------

Friday, January 28, 2011

स्वातंत्र्य !!

...`गेली सहा दशके आपण स्वातंत्र्याचा आनंद अनुभवतो आहोत. आपली पिढी धन्य आहे, कारण आपण स्वतंत्र देशात जन्माला आलो... आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, आपण त्या सर्वांचे स्मरण करू या, आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची होळी केली, त्यांना वंदन करू या... त्या पिढीच्या त्यागामुळेच आपण मुक्ततेचा आनंद मिळवला आहे'...
... प्रजासत्ताक दिनानिमित्त आखलेल्या झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर झालेल्या छोटेखानी सभेत एक वक्ता भारावून भाषण करत होता. त्याच्या वाक्यावाक्यातून स्वातंत्र्याच्या आनंदाची कारंजी फुलत होती, आणि श्रोतेही माना डोलावून त्याला सहमती देत होते... बाजूच्या स्तंभावर, नुकताच आरूढ झालेला तिरंगाही वार्‍याच्या मंद झुळुकेबरोबर हलका झुलत होता... ध्वजस्तंभाच्या अवतीभवती पसरलेल्या झेंडूच्या पिवळ्याधमक पाकळ्यांवर पसरलेल्या सकाळच्या सूर्यकिरणांनी पाकळ्या सोनेरी केल्या होत्या... वातावरण अवघे भारून उठले होते... त्या लहानश्या सभागृहात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा होत होता, आणि त्या भारलेल्या वातावरणात घुमणारे ते राष्ट्रभक्तीने भारलेले शब्द मला मात्र उगीचच बोचत होते... माझ्या डोळ्यांसमोर वेगळेच काहीकाही नाचत होते... मी त्या शब्दाशब्दागणिक अस्वस्थ होत होतो...
सकाळी त्या कार्यक्रमाला निघण्यासाठी मी घराबाहेर पडलो, तेव्हा नुकतीच वर्तमानपत्रं येऊन पडली होती. निघतानिघता मी सहज सवयीप्रमाणे एकदोन पेपरांचे पहिले पान चाळले. प्रजासत्ताक दिनाच्या त्या दिवशीच्या वर्तमानपत्रांचा पहिला मथळा वाचताच, खरं तर, घराबाहेर पडायचा आणि अगदी खरं सांगायचं तर, झेंडावंदन करायचाही उबग आला... डोकं भण्ण झालं... आजचा आपला दिवस अस्वस्थ, बचैन जाणार याची खात्री पटली, तरीही मी बाहेर पडलोच...
... घरून निघाल्यावर मी ज्या रस्त्यावरून नेहेमी जातो, तिथे एका फूटपाथवर उभ्याआडव्या पत्र्यांनी रचलेली एक झोपडी आहे. पाचसहा फूट रुंद, आणि चांगली बारातेरा फूट लांब... आतमध्ये टीव्ही, फ्रीज, कपाट.. सगळं बाहेरून जाताना सहज दिसतं... झोपडीच्या बाहेर, दोनतीन स्कूटर आणि एक कार पार्क केलेली असते. आत कुणी दोनचारजणं मस्त निवांत लोळत टीव्ही पाहाताना दिसतातच... केव्हाही!
खरं म्हणजे, ह्यात सांगण्यासारखं काहीही नाही... मुंबईत अनेक ठिकाणी अनेकांना असं कुठे ना कुठे पाहायला मिळत असेलच. मुद्दाम सांगण्यासारखं म्हणजे, त्या झोपडीतल्या पसार्‍यात, मुक्तपणे वावरणारे, प्राणी आणि पक्षी! केव्हाही तिथून जाताना मी मुद्दाम त्या झोपडीत पाहातोच, ते त्यांच्यासाठी! पाचसहा गलेलठ्ठ पोपट आणि साताआठ मांजरं, सुस्तपणे त्या पसार्‍यात बसलेली असतात. त्यांच्या मालकासारखीच! एखादा पोपट टीव्हीवर, एकदोघं खुर्चीच्या पाठीवर, कुणी चटईवर, तर कुणी चक्क एखाद्या मस्तवाल बोक्याच्या पाठीवर... मला ह्या `सहजीवना'ची नेहेमीच भुरळ पडलेली असते...
... आज घराबाहेर पडल्यावर तिथून जाताना मी सवयीनुसार झोपडीकडे मान वळवली... तेच दृश्य पुन्हा पाहिलं.
पण आज मला भुरळ पडलीच नाही. गंमतही वाटली नाही.ते सुस्तपणे फिरणारे पोपट, मधेमधे लुडबुडणारी गलेलठ्ठ मांजरं, आणि पसार्‍यात लोळणारा मालक... सगळं बघताना मला जाम किळस आली...
हे असं होणारच हे कदाचित घराबाहेर निघतानाच ठरलेलं असावं...
कारण, बाहेर पडतापडता वाचलेल्या वर्तमानपत्रांनी माझ्या मनातल्या प्रजासत्ताक दिनाच्या वातावरणावर पाणी फेरले होते... मनमाडजवळ यशवंत सोनावणे नावाच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्‍याचा तो रॉकेल माफियांनी जिवंत जाळलेला देह, डोळ्यांसमोर येत होता... आज त्यांच्या घरी कसे असेल, या चिंतेनं मी उगीचच व्याकुळ होत होतो...
आता यापुढचा प्रत्येक प्रजासत्ताक दिन, त्यांच्या घरी, असाच, काळा असणार!
... विचारांनी डोकं भणभणत असतानाच मी झेंडावंदनाच्या त्या कार्यक्रमाला हजेरी लावली, झेंडावंदन केलं, आणि यंत्रासारखा नंतरच्या सभेला श्रोत्यांमध्ये जाऊन बसलो...
त्या वक्त्याचं भाषण संपताच सण्णकन मला ती झोपडी आठवली... ते मनसोक्तपणे हिंडणारे हिरवेगार, गलेलठ्ठ पोपट डोळ्यासमोर दिसू लागले...
आणि मी बैचैन झालो...
डोक्यात विचारांचं थैमान माजलं...
एक गोष्ट मला पहिल्यांदाच, नव्यानं जाणवली...
त्या पोपटांना कधीही पिंजर्‍यात बंद केलेलं मी पहिलं नव्हतं...
ते त्या दहा बाय बाराच्या झोपडीत मुक्तपणे, निर्भयपणे संचार करत होते.
... आज मनात आलं,
.. म्हणजे ते पोपट स्वतंत्र, मुक्त आहेत?
त्यांच्याभोवती पिंजरा नाही. ते निर्भय, आश्वस्तही आहेत...
पण ते स्वतंत्र आहेत?
मग ते उडत का नाहीत?... बाहेरच्या, मोकळ्या आकाशात भरारी का मारत नाहीत?
आपल्या मुक्तपणाला ते ‘स्वातंत्र्य’ मानत असतील?
मी उत्तरं शोधू लागलो. मनाशीच...
आणि एकेक धागा नकळत जुळत गेला...
आपणही स्वतंत्र आहोत. आपल्याभोवती आता पारतंत्र्याचा पिंजरा कुठाय?...
... म्हणजे, आपली अवस्था त्या पोपटांसारखी तर नाही?... मुक्त, असूनही कुठेतरी जखडल्यासारखी?...
आपल्याभोवती दीडशे वर्ष असलेला पिंजरा त्यांनी कादून बाजूला केला...
... पण आपण उडू कुठे शकतोय?
... सभा संपली तरी माझं डोकं भण्ण होतं.. तसाच मी बाहेर पडलो, आणि घराकडे येऊ लागलो...
वाटेत एक तरुण दिसला... खिशाला टाचणीनं एक कागदी तिरंगा टोचलेला... हातात एक कागदाची घडी.. इकडेतिकडे पाहात चाललेला...
काहीतरी शोधत असल्यासारखा...
मला पाहाताच समोर आला, आणि हातातला कागद माझ्यापुढे करत त्यावरचा पत्ता मला विचारला...
तिथल्या झेंडावंदनाच्याच कार्यक्रमासाठी तो मुद्दाम कुठून आला होता.
मी घड्याळाकडे पाहिलं.
दहा वगैरे वाजत आले होते.
त्यानं ओळखलं...
‘कार्यक्रम उशीराच आहे... मुदामच उशिरा ठेवलाय.. सुट्टी आहे ना... मग लोकं लवकर उठत नाहीत... म्हणून’... तो म्हणाला.
मग मी त्याला पत्ता सांगितला.. माझ्या वाटेवरच होता. आम्ही सोबतच चालू लागलो...
वाटेत एका ठिकाणी मी त्याला बोटानं ती जागा दाखवली...
लाऊडस्पीकरवर लता मंगेशकरांचं ते, ऐ मेरे वतन के लोगो... वाजत होतं.
आणि सातआठ कार्यकर्ते खोळंबल्यासारखे येऊन थांबले होते...
गर्दीची वाट बघत.
स्तंभावरचा तिरंगाही घडीतच थांबला होता... ताटकळत.
-------------------------------------

Friday, January 21, 2011

नवी दिशा...

`येस... आय अ‍ॅम लुकिंग फॊर अ जॉब चेंज'... ट्रेनमध्ये समोरच्या बाकड्यावर बसलेला तो, एव्हढ्या जोरात ओरडला, म्हणून माझं लक्ष त्याच्याकडे गेलं...
एका कंपनीचा लोगो शर्टच्या खिशावर मिरवणारे ते दोघं बाकड्यावर बसल्यापासून एकमेकांशी मस्त गप्पा मारत होते. सहकारी असावेत. कंपनीतल्या कामाला बहुधा दोघंही कंटाळले असावेत.
म्हणूनच, अचानक त्याचं हे वाक्य ऐकून माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याला तेवढ्यात फोन आला होता.
अलीकडे, प्लेसमेंट कंपन्यांमध्ये नाव नोंदवणार्‍यांच्या मागे नोकर्‍या धावून येत नसल्या, तरी कंपनीचून येणारा फोन कॊल्सचा ससेमिरा मात्र मागे लागलेला असतो. मुंबईत लोकलमधून प्रवास करणार्‍या एखाद्या तरी प्रवाशाला असा अनवाँटेड कॊल येतोच, हे मला निरीक्षणावरून पक्कं माहीत होतं.
आत्ताचा त्याला आलेला फोनही तसाच असेल, असं मला वाटलं होतं. बहुधा त्यालाही तसंच वाटलं असावं. कारण, त्याच्या सुरात नोकरीच्या गरजेचं आर्जव अजिबात नव्हतं... कदाचित असे फोन घेऊनघेऊन तो वैतागला असावा. त्याच्या ओरडण्यावरून मला तसंच वाटलं.
... पण पुढच्या वाक्याला त्याचा तो आवाज एकदम बदलला...
`येस सर... आय अ‍ॅम लुकिंग फॊर चेंज’.. तेच वाक्य त्यानं पुन्हा, अजीजीनं उच्चारलं.
आणि पुढे त्यांचं संभाषण सुरू झालं... त्याचा आवाज एकदम मऊ, मृदु झाला होता..
बहुधा फोनवरच इंटरव्ह्यु सुरू होता... मी उगीचच कान लावले. पलीकडचा कुणी त्याच्याशी काय बोलतोय, हे ऐकू येणं शक्यच नव्हतं. मग मी तर्क लढवायला सुरुवात केली.
साऊथ इंडियन शैलीतल्या इंग्रजीतून तो पलीकडच्याशी बोलत होता.
`थ्री इयर्स..' तो नम्रपणानं म्हणाला...
बहुधा, पलीकडून, त्याच्या वर्क एक्स्पिरियन्सची विचारणा झाली असावी.
`सिक्स्टीन'... पलीकऊन आलेल्या पुढच्या एका प्रश्नाला त्यानं त्रोटक उत्तर दिलं... बहुधा, आत्ता त्याला मिळणार्‍या पगाराचा तो आकडा असावा.
`ट्वेंटी टु ट्वेंटी टू...' त्यानं आणखी एक उत्तर दिलं... बहुधा, अपेक्षित पगाराचा आकडा असावा.
आता त्याचं लक्षं, फक्त, पलीकडून कानात घुमणार्‍या आवाजावर केंद्रित झालं होतं.
`फिफ्टीन डेज'... असं तो म्हणाला, तेव्हा त्याचा चेहेरा कमालीचा उजळला होता... शेजारी बसलेला त्याचा सहकारी अचंबितपणे, उतरल्या नजरेनं त्याच्या तोंडाकडे पाहात ते संभाषण ऐकत होता...
बहुधा, माझ्यासारखेच संभाषणाचे तर्कही लढवत होता...
`नो सर... टुडे नॉट पॉसिबल... डे आफ्टर टुमॉरो ओके?' त्यानं अजीजीनं विचारलं, आणि क्षणभर तो थांबला.
त्या क्षणी त्याच्या डोळ्यात मनावरचा प्रचंड तणाव स्पष्ट दिसत होता...
`थॆंक यू सर' असं म्हणून त्यानं फोन बंद केला, तेव्हा तो तणाव मावळून तिथे आनंद उतरला होता...
आता तो खिडकीबाहेर पाहात होता... त्याचे डोळे काहीतरी पाहात, कसल्यातरी स्वप्नात रंगले होते, हे स्पष्ट दिसत होतं...
अचानक तो भानावर आला. आपला एक सहकारी सोबत बसलाय, हे त्याच्या लक्षात आलं, आणि मान वळवून त्यानं त्याच्याकडे पाहिलं.
तो सहकारी, हिरमुसल्या नजरेनं त्याच्याकडे पाहातच होता.
`किसका फोन था?' त्यानं हताश आवाजात विचारलं, आणि याचे डोळे चमकले.
`नही यार, कुछ नही...' त्यानं उडतउडत उत्तर दिलं, आणि तो पुन्हा खिडकीतून बाहेर बघू लागला...
तो सहकारी गप्पच होता.
मग ह्यालाच कसंतरी झालं...
`मंडेको सब बताऊंगा'... त्याचा हात हातात घेत हा म्हणाला, पण सहकार्‍यानं ते न ऐकल्यासारखंच केलं...
`यार, मेरे लिये भी कुछ होगा तो बताऒ'... तो कसनुसं बोलला... ह्याचं लक्ष नव्हतं. पण त्यानं उगीचच मान हलवली...
तोवर काही स्टेशनं मागे गेली होती.
अचानक ह्याचा तो हिरमुसला सहकारी उठला, आणि त्याचा निरोप घेऊन, घड्याळाकडे पाहात घाईघाईनं उतरायच्या तयारीला लागला...
`अरे यार, साथ मे आनेवाला था ना?' यानं त्याला विचारलं. पण त्यात फारसा आग्रह नव्हताच.
`नही.. तू जा आगे... मुझे यहीपे उतरना पडेगा'... तुटकपणे तो उत्तरला, आणि स्टेशन येताच उतरूनही गेला...
ह्यानं हळूच खिशातला मोबाईल काढला, आणि, तो आलेल्या कॉलचा नंबर डोळ्यात साठवत बसला...
मी त्याच्याकडे पाहातोय, हे त्याच्या आत्ता लक्षात आलं होतं.
नंबर सेव्ह करताकरता त्यानंही माझ्याकडे पाहिलं, आणि तो मस्त हसला...
हळूच त्यानं नकळत मोबाईल कुरवाळला... आणि समाधानानं खिशात ठेवला...
... त्या एका फोन कॉलनं त्याच्या भविष्याला नवी दिशा मिळाली होती.
मला ते त्याच्या डोळ्यात स्पष्ट जाणवलं!
--------------------------------------

Thursday, January 6, 2011

अपेक्षांच्या पालखीचे ८४ फेरे

जागतिकीकरणाच्या 'रेट्या'ची चर्चा फार; पण प्रत्यक्षात
मराठी साहित्य मात्र या 'रेट्या'ने ढिम्मदेखील हललेले नाही,
या वास्तवाची कबुली खुद्द संमेलनाध्यक्षांनीच दिली;
ते एक बरे झाले !
अपेक्षांच्या पालखीचे ८४ फेरे
जागतिकीकरणासोबत 'माणूस' पुढे जात राहिला,
मराठी 'साहित्य' मात्र तिथेच राहिले.
----- ---- ------

परीक्षेची सगळी प्रश्नपत्तिका अगोदरपासूनच समोर आहे, परीक्षेच्या तयारीलाही भरपूर वेळ मिळालेला आहे, तरीदेखील पेपर सोडवायची वेळ झाली, की कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनासारखी अवस्था व्हावी, हातपाय थरथरू लागावेत, शरीराला कंप सुटावा, तोंडाला कोरड पडावी आणि सगळे शरीर शक्तिहीन होऊन जावे, अशी अवस्था यंदादेखील ठाण्यात भरलेल्या ८४ व्या साहित्य संमेलनाच्या भव्य मंडपांनी अनुभवली. प्रश्नांची उत्तरे तर मिळाली नाहीतच, उलट तेच प्रश्न आणि नव्या अपेक्षांचे नवे ओझे सोबत वागवत ८५ व्या साहित्य संमेलनाची वाटचाल सुरू करावी लागणार आहे. आता पुढच्या संमेलनाच्या मंचावर तेच प्रश्न गंभीरपणे चर्चिले जातील. उत्तरे शोधण्यासाठी परिसंवादांच्या नव्या फैरी झडतील आणि प्रश्नांचा क्रूस खांद्यावर घेऊन साहित्य संमेलन ८६ व्या वर्षाची वाट तुडवू लागेल. साहित्यशारदेच्या उत्सवातील तीन दिवसांच्या वरवर दिसणाऱ्या झगमगाटात रसिकांचे मन आणि डोळे दिपून जातील, आणि मराठीच्या अभिमानगीताच्या तालावर ठेका धरत मराठी साहित्यरसिक मात्र, पुढच्या संमेलनाची प्रतीक्षा करीत राहील...
गेल्या कित्येक वर्षांपासून साहित्य संमेलने एका क्रूसाचे ओझे वाहात आहेत. प्रत्येकाने आपापल्या समस्यांचा क्रूस आपणच वहावयाचा असतो, अशा आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. साहित्य संमेलनाचे तसे नसते. प्रत्येक संमेलनाच्या नव्या अध्यक्षाने तो पहिल्याकडून खांद्यावर घ्यावा आणि आपल्या वारसाच्या हाती सोपविण्याची वाटचाल सुरू करावी, तशी साहित्य संमेलनांची अवस्था झाली आहे. ८४ व्या साहित्य संमेलनानेदेखील हेच केले. पूर्वीपासून माहिती असलेले सर्व प्रश्नच यादेखील साहित्य संमेलनासमोर उभे ठाकले आणि अगोदरचीच प्रश्नपत्तिका सोडविण्याऐवजी, नव्या प्रश्नांची भर घालत, खांद्यावरचे ओझे वाढवून साहित्य संमेलनाचे सूप वाजले. ८४ व्या साहित्य संमेलनात मराठी साहित्य, मराठी कविता, लोकजीवन, संस्कृती आणि मराठी भाषा या सर्वांसमोर आव्हाने बनून उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उकल तर केली गेली नाहीच, पण हेच, जुनेच प्रश्न आणखी नव्या झालरी लावून सजविले गेले, आणि उत्तरे शोधण्याचे काम नव्या वर्षावर सोपवून संमेलनाचे सूप वाजले.
संमेलनाची सुरुवात आणि समारोप याकडे तमाम मराठी माणसाचे लक्ष लागून राहिलेले असते. मराठी माध्यमांनी हेच ओळखून संमेलनाच्या सुरुवातीचा भफदार सोहळा घराघरापर्यंत पोहोचविला, आणि सामान्य मराठी माणसाला नव्या चितांनी ग्रासले. मराठीच्या अभिमानगीताने संमेलनाची सुरुवात झाली, पण लगेचच अध्यक्षीय भाषणाला निराशेची किनार पाहून मराठी माणूस हबकून गेला. आपल्यापुढील उत्तरांची शोधयात्रा संपलेली नाही, तर नव्या प्रश्नांची त्यामध्ये भर पडली आहे, या वास्तवाची जाणीव संमेलनाध्यक्षांच्या भाषणातून सामान्यांना झाली.

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रक्रियेत मराठीने महाराष्ट्र प्रांताच्या सीमा ओलांडल्या, संगणकयुगाचे बोट धरून मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली, तरी जागतिकी-करणाने दिलेल्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या आश्वासनाचे काय झाले, याचा शोध घेण्याची जबाबदारीही आता साहित्य-सृष्टीवरच येऊन पडली आहे. याच जागतिकीकरणाच्या वेगाशी स्पर्धा करत धावणाऱ्या, यंत्रमानवासारख्या संवेदनाशून्य झालेल्या माणसाचा शोध घेण्यात मराठी साहित्य अपयशी ठरत आहे, याचीही जाणीव झाली. जागतिकीकरणाचा 'रेटा' असा शब्दप्रयोग केला जात असला, तरी मराठी साहित्य या रेट्यात 'ढिम्म'देखील हलले नाही, या वास्तवाची कबुली खुद्द संमेलनाध्यक्षांनीच दिली. साहित्य तिथेच राहिले, आणि जागतिकीकरणासोबत माणूसच पुढे जात राहिला. या युगातील माणसाच्या जगण्याची प्रक्रिया समजून घेण्यातदेखील साहित्य कमकुवतच ठरले आणि त्यामुळे मराठीचे नुकसानच झाले, अशीही कबुली साहित्य संमेलनाध्यक्षांनी दिली. माणसांच्या लढायांचे प्रतिबिब साहित्यात नाही, या वास्तवावरही त्यांनी नेमके बोट ठेवले, आणि समाजजीवनापासून साहित्य दुरावत चालले आहे, याची खंतदेखील व्यक्त केली. संमेलनाध्यक्षांचे भाषण म्हणजे जुन्या समस्यांचा नव्याने वाचलेला 'सातबारा' ठरले...
मराठी साहित्यशारदेच्या या दरबाराला ८४ वर्षे झाली असली, तरी प्रत्यक्षात साहित्य संमेलन या संकल्पनेचा जन्म १८८५ मध्ये, तब्बल १२५ वर्षांपूर्वीच झाला, तेव्हादेखील मराठी भाषेच्या भवितव्याची चिता हेच यामागचे कारण होते. आज १२५ वर्षांनंतर आणि संमेलनांच्या ८४ फेऱ्यानंतरही तोच प्रश्न आपल्याला छळतो आहे. प्रश्नांच्या मिती बदलल्या, नव्या आव्हानांनी या प्रश्नाला घेरले, आणि नव्या गरजा अधोरेखित झाल्या, एवढेच साहित्य संमेलनांच्या ८४ फेऱ्यांचे फलित म्हणावे का, असा प्रश्न सामान्य मराठी माणसाला पडला आहे. मराठी भाषेचा कैवार घेऊन संमेलनाच्या ८३ दिड्या निघाल्या, ठाण्याला निघालेली ८४ वी दिडी होती आणि पुढे याच दिडीतील पालखीत तेच प्रश्न मिरवत ८५ व्या दिडीची वाटचाल सुरू झाली आहे.
यामुळेच, साहित्य संमेलनांनी मराठीला काय दिले, हा नवा प्रश्नदेखील सामान्य मराठी माणूस कधीतरी विचारणार आहे. प्रत्येक साहित्य संमेलनांत मराठीच्या संवर्धनाची आणि जोपासनेसाठी सरकारी कुबड्यांची अपेक्षा केली जाते. सरकारी आर्थिक आधाराशिवाय जणू भाषेचे जतन, संगोपन आणि संवर्धन होऊच शकत नाही असे एक नकारात्मक मानसिकतेचे चित्र यातून विनाकारण उभे राहात आहे, हे न समजण्याएवढी मराठी साहित्यसृष्टी अपरिपक्व नाही. मराठी साहित्यसृष्टीला जनमानसाचा भक्कम आधार हवा, हेच मराठी साहित्याच्या संगोपनाचे आणि संवर्धनाचे मूळ आहे. केवळ 'सरकारी जीआर' काढून आणि दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्याची सक्ती करून मराठीचे संवर्धन होणार नाही, असा एक शाब्दिक 'आसूड' मुख्यमंत्र्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरूनच साहित्यिकांवर ओढला आहे. मराठी साहित्याने वैश्विक प्रतिष्ठा प्राप्त केली पाहिजे, त्यासाठी साहित्याला तेवढा दर्जा प्राप्त झाला पाहिजे, आणि तशा दर्जाचे साहित्य मराठीत जन्माला घातले गेले पाहिजे, याचा सोयीस्कर विसर पाडून घेत, मराठीसाठी सरकारसमोर झोळ्या पसरण्याची हक्काची जागा म्हणून साहित्य संमेलने साजरी केली जात असतील, तर ते मराठीच्या अभिमानगीतालादेखील झोंबणारे ठरेल.
मराठीचे कैवारी आणि मारेकरी कोण या विषयावर एक चितनात्मक कार्यक्रम अभिरूप न्यायालयाच्या रूपाने ठाण्याच्या साहित्य संमेलनात रंगला, आणि आरोप-प्रत्योरापांच्या फैरींनंतर, मराठीच्या ऱ्हासाला सारेच जबाबदार आहेत, असा निर्वाळा न्यायाधीशांनी दिला. यातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. साहित्यशारदेच्या उत्सवातच, मराठीचा ऱ्हास झाल्याची स्पष्ट कबुली सामोरी आली, आणि आपण सारेच यासाठी कारणीभूत आहोत, हेही स्पष्ट झाले. मराठी साहित्यसृष्टीच्या खांद्यावरील क्रूस या नव्या निष्कर्षाने आणखी जडावणार आहे. हे वास्तव असतानाही, साहित्य संमेलनाचे व्यासपीठ मात्र त्याच त्याच अपेक्षांचे तुणतुणे वाजवत सरकारदरबारी हात पसरत आहे, हे सामान्य मराठी माणसाला सहन होणारे नाही. कायदे करून किवा कायद्यांत दुरुस्ती करून मराठीच्या काटेकोर वापराची सक्ती करण्याची मागणी सरकारकडे करण्यापेक्षा, मराठीत दर्जेदार, पुलित्झर, बुकर पुरस्कारांचे मानकरी ठरणारे साहित्य निर्माण करण्याची उत्तुंग उमेद या व्यासपीठावरून फुलविली गेली तर ते मराठीच्या अभिमानगीतास साजेसे हाईल.
मराठीतील वाङ्मयीन नियतकालिके आणि अनियतकालिकांपुढे उपजीविकेची समस्या निर्माण झाली आहे, हे या संमेलनाच्या निमित्ताने सामोरे आलेले एक विदारक वास्तव! ही उपजीविका त्यातील साहित्यकृतींच्या दर्जेदारपणावर नव्हे, तर सरकारी उपाययोजनांवरच अवलंबून आहे, याची अप्रत्यक्ष जाणीवदेखील साहित्यसृष्टीने सामान्य वाचकाला करून दिली आहे. ग्रंथालयांकरिता सरकारी अनुदान हवे, या मागणीचादेखील साहित्यविश्वाने सरकारसमोर पुनरुच्चार केला आहे. साहित्य व सांस्कृतिक कार्यविषयक सरकारी समित्यांवर साहित्य महामंडळाचा एक प्रतिनिधी असावा अशी अपेक्षाही साहित्यिकांच्या वार्षिकोत्सवात व्यक्त झाली, आणि महामंडळाचे वार्षिक सरकारी अनुदान तुटपुंजे असल्याचे गाऱ्हाणेही सरकारसमोर मांडले गेले. साहित्यसृष्टीला सरकारच्या आधाराची किती गरज आहे, हे संमेलनाने पुन्हा एकदा अधोरेखित केले...
साहित्य संमेलन हा मराठी साहित्यसृष्टीचा आगळा आणि अनोखा उत्सव मानला जातो. ज्ञानेश्वरापासून नायगावकरांपर्यंतच्या सर्व साहित्यिकांविषयी मराठी साहित्यरसिकाची आदरभावना या उत्सवात व्यक्त होत असते. मराठी साहित्यरसिक अमाप भक्तिभावाने या उत्सवात साथ देत असतो. साहित्यविश्व मात्र, सरकारच्या मदतीकडे डोळे लावून उत्सवाचा समारोप करते. ८४ व्या संमेलनात असेच काहीसे चित्र दिसले. संमेलनाच्या सुरुवातीलाच मराठी साहित्यसृष्टीचे तोकडेपण संमेलनाध्यक्षांनी स्पष्ट केले, पुन्हा एकदा नव्या-जुन्या समस्यांची जाणीव करून दिली, तर समारोपाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मराठी साहित्यसृष्टीच्या दुबळेपणावर बोट ठेवले.
पुढच्या वर्षी पुन्हा साहित्य संमेलन भरेल. पुन्हा एकदा मराठीच्या भविष्याची चिता व्यक्त होईल, आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न एकमेकांना विचारला जाईल. ८४ व्या संमेलनाने याची अंशत: जबाबदारी वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणीवर ढकलून टाकली आहे. मराठीचे मराठीपण हरवत असल्याचा ठपका साहित्य संमेलनाने दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वर्तमानपत्रांवर ठेवला आहे. १२५ वर्षांपूर्वीच्या चितेचे उत्तर अनायासे सापडावे, असा चमत्कार या संमेलनात झाला आहे. पण त्यामुळे साहित्यविश्वाची जबाबदारी कमी होत नाही. मुख्यमंत्र्यांनी आता अपेक्षांचे आव्हान मराठी साहित्यविश्वासमोर उभे केले आहे. प्रश्नांचा क्रूस वाहताना, अपेक्षांचे ओझेही मराठी साहित्यसृष्टीला पेलावे लागणार आहे. प्रश्नांची माहिती असतानाही उत्तरे मिळत नसतील, तर तो कमकुवतपणा ठरेल...

- http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/ManthanEdition-MainNews.php?articledate=2011-01-02