Sunday, December 5, 2010

लोककलेचा गारुडी...

... ‘जांभूळ आख्यानमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेले, आपल्या अस्सल मराठमोळ्या शाहिरी बाजाच्या कलाकारीतून लोकसंगीताचा सुगंध देशभर पसरविणारे आणि ‘लोकसंगीताचे चालतेबोलते विद्यापीठ' म्हणून उभ्या महाराष्ट्राच्या आदराचे स्थान असलेले लोकशाहीर विठ्ठल गंगाराम उमप गेले...
क्लावंतांचं आयुष्यच खडतर असतं... वर्षानुवर्षे घरासाठी वणवण करणाèया या लोककलेच्या उपासकाला महाराष्ट्रात वयाच्या ८० व्या वर्षानंतर घर मिळाले, पण त्या घराचं सुख फार काळ त्यांना उपभोगता आलं नाही. १९३१ मध्ये मुंबईच्या एका चाळीत जन्मलेल्या, वयाच्या आठव्या वर्षीपासून कलागुण सादर करणाèया विठ्ठल उमप यांना कलेच्या उपासनेत कधी प्रोत्साहन मिळालं नाही.

‘नाचण्यापेक्षा शाळा शिक' हा वडिलांचा आग्रह मोडून त्यांना आपल्यातील कलाकार जोपासला आणि अथक परिश्रमाने जिवंतही ठेवला. म्हणूनच त्यांच्या ‘जांभूळ आख्यान'नं उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं. लडिवाळ, मोहक हावभाव, नाजूक नेत्रकटाक्ष आणि देहभान हरपून द्रौपदीच्या मनाचं हळुवार स्पंदन रसिकांसमोर मांडणारे ‘जांभूळ आख्यान’ असो, ‘माझी मैना गावाकडं राहिलीङ्क म्हणणारा ठसकेबाज ‘छक्कड’ असो, ’तुमडी’ असो, ’नाखवा’ असो, नाही तर एका हाती तलवार आणि दुस-या हाती ढाल घेऊन बहिर्जी नाईक याचा मावळ्यांना दिलेला सांकेतिक संदेश असो... शाहीर उमप यांनी प्रत्येक क्षण जिवंतपणे रसिकांसमोर उभा केला...
राज्याच्या ग्रामीण भागातील लोककला आपल्या एकपात्री अभिनयाने जिवंत करणा-या लोकशाहीर उमप यांनी या जांभूळ आख्यानाचे ५०० हून अधिक प्रयोग केले, भारुड लोकप्रिय केले, आणि आपल्या ‘बोली’ आणि ‘देहबोली’तून लोककलेचा अस्सल बाज रसिकांना सादर केला. त्यांच्या मोजक्याच गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. पण प्रत्येक ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय ठरली. ‘फू बाई फू, ये दादा आवार ये, बाजीराव नाना हो बाजीराव नाना, फाटकी नोट मना घेवाची नाय, ही गाणी ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रत्येक सभा, समारंभास शोभा आणणारी ठरली...
महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवण्यासाठी राज्यभर दौ-यामागून दौरे करणा-या शाहीर उमप यांनी एक हजारांहून जास्त गाणी गायली आणि अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्येही भूमिका केल्या. खंडोबाचं लगीन, गाढवाचं लगीन या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. ‘टिंग्या’ या चित्रपटातील उल्लेखनीय भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला होता. आयर्लंडमधील कॉर्क येथील आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवातील पहिला पुरस्कार, श्याम बेनेगल यांची भारत एक खोज, जब्बार पटेल यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या. १९८९ मध्ये राजीव गांधी यांच्या ‘अपना उत्सव’मध्ये ‘महाराष्ट्र शाहीर’ पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले. देश विदेशात त्यांनी विविध कलाविष्कार सादर केले. सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आणि नियोजन आयोगाच्या सांस्कृतिक व्यवहार विभागाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. लोककला जिवंत रहावी यासाठी तरुणांनी या परंपरेचा अभ्यास करावा असे आवाहन ते सातत्याने करीत राहिले. बदलत्या जगात जनतेच्या आवडी बदलत आहेत, आणि लोककलेची उपेक्षा होत आहे, ही त्यांची खंत होती. ही कला जिवंत राहावी, ही तळमळ लोकशाहीर उमप यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपली, आणि कलेची उपासना करतच शेवटचा श्वास घेतला.

1 comment:

Anonymous said...

> १९३१ मध्ये मुंबईच्या एका चाळीत जन्मलेल्या ... या लोककलेच्या उपासकाला महाराष्ट्रात वयाच्या ८० व्या वर्षानंतर घर मिळाले, पण त्या घराचं सुख फार काळ त्यांना उपभोगता आलं नाही.
>----

दिनेश गुणे साहेब : विठ्ठल उमप यांची ओळख करून दिल्याबद्‌दल धन्यवाद. तुमच्या ब्लॉगवर नेहमीच चांगली माहिती वाचायला मिळते.

मात्र माझा एक आक्षेप आहे. उमपांचा जन्म १९३१-चा आणि मृत्यु २०१०. म्हणजे ते गेले तेव्हा ७८ किंवा ७९ वर्षांचे होते. असे दिसते आहे की ते ७९ वर्षांचे होते, म्हणजेच त्यांना ८०-वे वर्ष सुरू होते. तेव्हा 'ऐंशीवे वर्ष लागल्यावर' म्हणता येईल, पण '८० व्या वर्षानन्तर'? कलाकारानी पंच्याहत्तराव्या वर्षांत प्रवेश केल्यावर त्याची पंचाहत्तरी साज़री करायची एक चक्रम परंपरा महाराष्ट्रात आहे. (इतर भारताची मला नक्की कल्पना नाही, पण तिथेही तसाच प्रकार आढळला आहे.) वर्षभर चालणारा समारंभसा करायलाही हरकत नाही. पण पुढची पायरी म्हणजे ७९ पूर्ण झाले की '८०-व्या वर्षात प्रवेश केला' याचा भलताच अर्थ काढून 'आठ दशके पूर्ण केली', 'नवव्या दशकात प्रवेश' असली भाषा लोक सर्रास वापरतात. तो मूर्खपणाचा भाग आहे. तेव्हा ८०-व्या वर्षात प्रवेश करणे आणि ८० पूर्ण करणे यातला फरकच इंडियन लोकांना कळत नाही, हे सरळ आहे. माणसाच्या आयुष्यातला पहिला पावसाळा वा पहिली दिवाळी तो एक पूर्ण होण्याआधी येते, हे मान्य. त्यात अमान्य करण्यासारखे काही नाहीच. पण पहिले सुरू असणारे कार्टे एक-पूर्णचे नसते. आणि १०० सुरू असलेले म्हातारबाबा शतक पूर्ण केलेले नसतात.

देवे गौडा पन्तप्रधान झाले तेव्हा गुलज़ारीलाल नन्दांना धरून त्यांचा क्रमांक काढला. त्याच सुमारास संजीव रेड्डी वारले, त्यांना मात्र जत्ती यांना वगळून सहावे राष्ट्रपती ठरवण्यात आले. बी डी जत्ती तर तब्बल ५-६ महिने हंगामी राष्ट्रपती होते. तेव्हा राष्ट्रपती-पंतप्रधान पातळीवरही इंडियन लोकांज़वळ एकसूत्र नियम नाहीत. ब्रिटिश लोकांबद्‌दल बोटे मोडणे सोपे आहे, पण ते राणीचा क्रमांक चाळीसचा वारसदार सुद्‌धा सांगू शकतात. त्यांनीही अमेरिकेची चाटूगिरी करत १ जानेवारी २००० लाच नवीन शतकाचे स्वागत केले. पण एके काळी त्या देशात उत्तम परंपरा, विद्‌वत्तेची उपासना आणि सन्मान होता. भारतात तसे कधी होणार हे त्या प्रभू रामचन्द्रालाच ठाऊक.

तुम्ही वेळोवेळी पुरवत असलेल्या माहितीत एक मोठी तूट राहू नये, म्हणून हा लेखनप्रपंच.

- नानिवडेकर