Saturday, November 20, 2010

आपणच नालायक आहोत!!

’होऊन जाईल तुमचं काम... साडेआठ हजारात. पण कॅश द्या. चेक नको. परवाची वेळ घेऊन टाकतो. तासाभरात काम होऊन तुम्ही मोकळे’...
त्या ’एजंटा’नं समोर बसलेल्या जोडप्याला सांगितलं, आणि त्यातल्या नवर्‍याचा चेहेरा खुलला.
’म्हणजे रजा घ्यायला नको’... तो आनंदानं पुटपुटला.
दोघंही उठले, आणि बाहेर पडले. एजंटानं ड्रावर उघडून फ़ाईल बाहेर काढली आणि कॅलक्युलेटर काढून भरभरा काहीतरी आकडेमोड केली. दोन मिनिटांनी फाईल पुन्हा ठेवताना त्याच्या डोळ्यात समाधान साचले होते...
दोन दिवसांनंतर ठरल्याप्रमाणे ते जोडपं सकाळीच त्या ऒफिसात येऊन हजर झालं. बाहेरच्या खुर्च्या-बाकड्यांवर दाटीवाटीनं आधीच येउन बसलेली माणसं बघून त्यांनी एकमेकांकडे बघितलं. आपलं काम खरंच तासाभरात आटोपेल का अशी शंका दोघांनाही एकमेकांच्या डोळ्यात स्पष्ट दिसली. पण ती झटक्यात पुसून टाकून दोघं जागा शोधू लागली. आणि दोन कोपरे रिकामे दिसले. दोघं बसली. एकमेकांपासून लांब... काहीच बोलताही येत नव्हतं.
असाच बराच वेळ गेला. अजून तो एजंट आलाच नव्हता... लांबूनच अस्वस्थ नजरेनं बायकोकडे पाहात नवरा मनगटावरच्या घड्याळात नजर टाकत होता. एकदोनदा त्यानं एजंटाचा मोबाइल नंबर फिरवला. आऊट ऑफ कव्हरेज एरिया... टेप संपायच्या आधीच त्यानं नंबर डिसकनेक्ट केला...
तासभर उलटून गेला. आता गर्दी आणखी वाढली होती... प्रत्येकासोबत एकेक एजंट दिसत होता. त्या एजंटांची आतबाहेर धावपळ सुरू झाली होती. काळ्या कागदांनी झाकलेल्या काचेच्या बंद दरवाजाआडच्या केबिनमध्ये तिथला ’साहेब’ बसला होता... पांढर्‍याशुभ्र कपड्यातला, पांढर्‍या बुटातला, गॉगल लावलेला, सोन्यानं मढलेला कुणीतरी धाडकन आत गेला आणि बाहेरची धावपळ थंडावली...
पाचेक मिनिटांत कुठल्यातरी हॉटेलचा पोर्‍या वर्तमानपत्राच्या कागदानं झाकलेला ट्रे घेऊन आत गेला.
’आत साहेब नाश्ता करतायत... वेळ लागणार’.... कुणीतरी एजंट त्याच्या शेजारी बसलेल्या अशाच एका ’ताटकळलेल्या’च्या कानाशी बोलला, आणि याचा चेहेरा पडला.
अजून याचा एजंट आलाच नव्हता... आता ऒफिसात फोन करून रजा टाकावी असं त्यानं ठरवलं.
सगळ्यांचं लक्ष त्या काळ्या कागदानं झाकलेल्या काचेच्या दरवाज्याकडे लागलं होतं... सगळं कसं शांतशांत, ठप्प होतं...
गर्दीही वाढतच होती... आता घामाच्या धारा पुसत तो बसल्या जागी चुळबुळत होता. मधुनच बाहेरच्या दरवाज्याकडे बघत होता. बायको लांब, समोरच्या कोपर्‍यातल्या एका बाकड्याच्या कोपर्‍यावर अंग चोरुन कशीबशी बसली होती. तिचं त्याच्याकडे लक्षही नव्हतं...
अचानक तो एजंट त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. यानं काही न बोलता हातावरल्या घड्याळात बघितलं...
'सॊरी... ट्रॆफिकमधे अडकलो...’
यानं वर न बघताच मान हलवली. मुंबईत उशिरानं येणारा प्रत्येकजण हेच कारण सांगतो, हे त्याला माहित होतं.
मग एजंटानंही काळ्या कागदानं झाकलेल्या त्या काचेच्या दरवाजाकडे बघितलं... तेव्हढ्यात हॉटेलवाला पोर्‍या चहाची किटली घेऊन तिथून आत घुसला.
'आता साहेब नाश्ता करतायत... म्हणजे टाईम लागणार’... एजंट याच्या कानाशी पुटपुटला. त्याला हे मघाशीच माहीत झालं होतं. हा काहीच बोलला नाही.
... अर्ध्यापाऊण तासानंतर काळ्या कागदानं झाकलेल्या काचेचा दरवाजा उघडला, आणि तो पांढर्‍या कपड्यांतला, पांढरे बूट घातलेला, गॉगलवाला खिदळत बाहेर आला...
'संध्याकाळपर्यंत लाखभर तरी जमायला हवेत’...
- अर्धवट उघडलेल्या त्या दरवाजातून आलेले शब्द याच्या कानांनी टिपले, आणि तो चरफडला...
'सालं आपणच गांडू, नालायक आहोत...’ तो स्वत:शीच म्हणाला, आणि घाबरून त्यानं आजूबाजूला बघितलं... कुणी आपलं बोलणं ऐकलं नाही, हे लक्षात आल्यावर तो सावरला...
एजंटानं आपल्याकडून साडेआठ घेतलेत. त्यातले स्टॆम्पड्युटीचे शे-सवाशे गेले, एजंटाचं हजार दोन हजार कमिशन गेलं... बाकीचे पैसे?... कुठे जाणार?... पहिल्यांदाच त्याला हा प्रश्न पडला...
तो आणखीनच अस्वस्थ झाला.
'च्यायला, एवढे पैसे देऊनही आपल्याल्या ताटकळतच ठेवलंय... बाकीचे सगळेही पैसे मोजूनच ताटकळतायत. तरी सगळ्यांचे चेहरे लाचार... कसला स्वाभिमान.. कसली लोकशाही'... तो चरफडत होता..
ताडकन उठून तो येरझारा घालू लागला... मधेच एकदा काळ्या कागदानं झाकलेल्या काचेच्या दरवाजाजवळही गेला. एका लहानश्या फटीतून आत डोकावण्याचाही त्यानं प्रयत्न केला...
पण तेवढ्यात तिथल्या स्टुलावर बसलेल्या शिपायानं शुकशुक केलं, आणि ओशाळल्यासारखा हा मागे फिरला...
त्याचा एजंट कुठल्यातरी टेबलाशी जाऊन तिथल्या ’साहेबा’शी काहीतरी बोलत होता.
बायको बसली होती तिथल्या कोपर्‍यात जाऊन हा उभा राहिला.
एजंट त्याच्याजवळ गेला.
'बस, आता तासाभरात होऊनच जाईल आपलं काम... आता आपलाच नंबर.’ एजंट म्हणाला, आणि यानं उगीचच हातातल्या प्लास्टिकच्या पिशवीतली कागदपत्रं चाचपली...
इतका वेळ खोळंबूनही साडेआठ हजार?’... पुन्हा हा प्रश्न याच्या डोक्यात सण्णकन शिरला, आणि त्यानं एजंटाला खुणेनंच बाहेर यायला सांगितलं.
दोघंही बाहेर आले.
'काय हो... एवढ्याशा कामासाठी तुम्ही साडेआठ हजार घेतलेत?’ त्यानं ताडकन विचारलं..
काय करणार, आतल्या साहेबाला, बाहेरच्या क्लार्कला, आणि त्या प्यूनला द्यायला लागतात...’ एजंटानं सहजपणे उत्तर दिलं...
'नाही द्यायचे त्यांना पैसे... त्यांचं कामच आहे ते...’ तो त्वेषानं म्हणाला.
'ठीक आहे... मग चला, निघुया’... एजंट शांतपणे म्हणाला.
'कुठे? आणि काम?’ ह्यानं विचारलं.
'आहो, पैसे द्यायचे नाहीत ना? मग काम कसं होणार? आज नाही आणि कधीच नाही'... एजंटानं ठामपणे सांगितलं...
'बघा... तुम्ही पैसे देणार नसाल, तर हे लोकं तुम्हाला उद्या यायला सांगतील... उद्या पुन्हा तुमचा वेळ जाणार. मग कागापत्रं तपासतील... काहीतरी कमी असेल. ते घेऊन पुन्हा दुस-या दिवशी बोलावतील... मग एखादी सही नसेल.. पुन्हा तुम्हाला परत पाठवतील... तिस-या दिवशी आणखी काहीतरी कमी काढतील.. पुन्हा खेपा... तुमच्याकडे किती रजा शिल्लक आहे?’ एजंटानं थेट याला विचारलं, आणि हा घाबरला...
अगतिकासारखा एजंटाकडे बघु लागला...
'त्यापेक्षा पैसे द्या... आजचा दिवसात काम होऊन जाईल... रजा वाया घालवून काम होईलच याची खात्री नाहीच... चला आत...’ हुकुम सोडल्यासारखा एजंट त्याला म्हणाला, आणि आत वळला.
ह्याची पावलंही त्याच्यापाठोपाठ आत वळली...
एखादा कोपरा बसण्यासाठी शोधू लागली.
आणि कोपरा मिळाला...
शेजारचा माणूस सरावल्यासारख्या शांतपणे पेपर वाचत होता...
यानं खुणेनंच त्याच्या मांडीवरचा दुसरा पेपर मागितला, आणि घडी उलगडली..
’स्वच्छ प्रशासनाची नव्या नेत्यांची ग्वाही...’
मोठ्या अक्षरांतला तो मथळा आपल्याकडे बघून खदाखदा हसतोय असा भास त्याला झाला.
त्यानं पेपर मिटला, आणि त्याची नजर वळली...
... काळ्या कागदांनी झाकलेल्या काचेच्या दरवाज्याकडे!!!
--------------------------------------------