Sunday, October 3, 2010

पुण्य की प्रायश्चित्त?...

'आणखी काही वर्षांनी, आपली सगळ्यात मोठी गरज कोणती असेल?'...
... ट्रेनमधून उतरून आम्ही दोघही एकाच बस स्टॊपवर आलो, आणि रांगेत उभं राहाताना त्यानं मला विचारलं. आमची नुस्ती तोडओळख होती. पण आज तो मला भेटताच बोलू लागला...
आजूबाजूची गर्दी, बसची वाट पाहात लांब होत जाणार्‍या रांगा, हे सगळं न्याहाळत मी त्याला हवं असलेलं उत्तर शोधायचा प्रयत्न करू लागलो.
पण त्यानं माझा हा प्रयत्न ओळखला असावा. मानेनंच नकार देत त्यानं माझा प्रयत्नच थांबवला.
’वृद्धाश्रम’... माझ्याकडे रोखून पाहात, उगीचच आणखी न ताणता त्यानंच उत्तर देऊन टाकलं. आणि माझा चेहेरा प्रश्नचिन्हांकित झाला.
हातातल्या वर्तमानपत्राची घडी उलगडून त्यातल्या एका पानावरच्या फोटोवर बोट ठेवत त्यानं तो पेपर जोरजोरात हलवला. मग मीच ते पान पकडलं, आणि नीट तो फोटो न्याहाळला.
... जागतिक वरिष्ठ नागरिक दिनानिमित्त शंभरीच्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराचा फोटो होता.
’बघितलंत?...’ पुन्हा त्या फोटोवर बोट ठेऊन ते पान जोरजोरात हलवत त्यानं विचारलं.
मी फक्त होकार दिला. पण त्याचा तो प्रश्न आणि त्यानंच देऊन टाकलेलं ते उत्तर यांचा या फोटोशी काय संबंध ते मला कळलं नव्हतं.
... माझ्या तोंडावर उमटलेलं ते प्रश्नचिन्ह तसंच होतं.
’तुम्हाला सांगतो, आत्ताच मी एका वृद्धाश्रमात जाऊन आलो... माझं कुणीच नाहीये तिथे. पण’...
बोलतबोलता तो थांबला. रस्त्यावरून वाहाणार्‍या गर्दीकडे पाहात क्षणभर कुठेतरी हरवल्यासारखा गप्प झाला...
’अहो, खूप गर्दी झालीय तिथे. अ‍ॅडमिशनसाठी वेटिंगलिस्ट आहे...’ तो अस्वस्थ होता. मला ते जाणवू लागलं होतं.
मी काही न बोलता त्याचं बोलणं ऐकत होतो.
’... मला सांगा, वृद्धाश्रम चालवणं हे चांगलं काम, की वाईट?’... अचानक माझ्या डोळ्यात नजर खुपसून त्यानं विचारलं.
’ नक्कीच चांगलं’... मी लगेच उत्तरलो.
पण त्यानं नकारार्थी मान हलवली.
’नाही... अजिब्बात नाही.’ तो ठामपणे म्हणाला.
... ’अहो, तुमच्यासारखंच उत्तर मीही त्याला दिलं. माझीही अशीच समजूत होती. हे एक पुण्यकर्म आहे, असं माझं मत होतं. पण त्यान पार बदलून टाकलं ते...’
पुन्हा गर्दीकडे पाहात हरवलेल्या डोळ्यांनी तो काहीतरी टिपून घेत होता.
’तो म्हणाला, आम्ही काही पुण्य करत नाहीये... हे तर कुठल्यातरी पापाचं प्रायश्चित्त आहे...’ पुन्हा माझ्याकडे आरपार पाहात तो बोलला.
त्याचा अस्वस्थपणा सर्रकन माझ्या मेंदूत भिणभिणला... मी गोठल्यासारखा त्याच्या डोळ्यात पाहू लागलो.
तितक्यात बस आली. पण आम्ही दोघंही स्तब्ध, तिथेच उभे होतो. पाठीमागून आवाज यायला लागल्यावर मी त्याचा हात पकडला, आणि रांगेतून बाहेर पडलो. स्टॉपच्याच मागच्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं. तिथल्या एका रिकाम्या टेबलवर जाऊन बसलो.

’काय झालं... कसलं पाप, काय म्हणाला तो... कोण होता तो...’ मी आडवेतिडवे प्रश्न विचारून टाकले, आणि त्यानं समोरच्या ग्लासातल्या पाण्याचा मोठ्ठा घोट घेतला.
... ’अहो, आज सुट्टी होती, म्हणून मी सहज जरा मुंबईबाहेर कुठेतरी जायचं ठरवलं. कुणीतरी त्या वृद्धाश्रमाबद्दल मागे सांगितलं होतं. मस्त स्पॉट आहे, छान निसर्ग आहे, असं कळलं, म्हणून तिकडे गेलो...’ तो आता शांतपणे सांगत होता. पण नजरेतली अस्वस्थता संपली नव्हती.
मी खुणेनंच चहाची ऑर्डर दिली, आणि पुढं झुकून त्याचं बोलणं ऐकू लागलो.
’सकाळी हा पेपर घेतला, आणि हा फोटो बघितला. म्हणूनच तिकडे जायचं नक्की केल... माणसं कशाला म्हातारी होईपर्यंत जगतात हो?’ पुन्हा त्यानं अस्वस्थ नजरेनं मला विचारलं.
मी काहीच बोलत नव्हतो. त्यालाही तशी काही अपेक्षा नव्हती.
’साठसत्तर म्हातारे आहेत तिथे... असेच, मुलांनी आणून सोडलेले... एका म्हातारीला तर, अक्कलकोटला नेतो असं सांगून मुलानं इथे आणून सोडलंय... बिचारी रोज वाट बघतेय. मुलगा येईल न्यायला म्हणून...’
’मी गेलो, तेव्हा ती हातात कपड्यांची पिशवी घट्ट पकडून उन्हात बाहेरच बसली होती... मला विचारलं, राजन आला का रे... मला काहीच कळलं नाही, म्हणून मी मॅनेजरला विचारलं आणि तिची हकीगत समजली...’ तो संथपणे बोलत होता.
आता मला त्याच्या अस्वस्थपणाचं मूळ सापडत होतं.
’राजन म्हणजे, त्या म्हातारीचा मुलगा... तिकडे विरारला मोठ्ठा बंगला आहे त्याचा. त्याचे वडील वारल्यावर ह्या बाइनं नोकरी करून मुलांना वाढवलं. मुलींना डोक्टर केलं, मुलाचं शिक्षण झाल्यावर बिझिनेस सुरू झाला, तरी ही नोकरी करतच राहिली. रिटायर झाली. पाचसहा हजारांची पेन्शन आहे. अक्कलकोट स्वामींची भक्त. परवा मुलगा म्हणाला, तुला अक्कलकोटला नेऊन आणतो, तर बिचारीनं हौसेनं कपडे भरले. आणि लहान मुलासारखी मुलाच्या गाडीत जाऊन बसली. मग मुलानं थेट इथे आणून सोडलं तिला’...
... सांगतासांगता त्याच्या आवाजातच पाणी दाटलंय असं मला वाटायला लागलं.
मी डोळे मिटले. छाती भरून आल्यासारखं झालं.
एक मोठ्ठा श्वास भरून घेतला, आणि त्याच्याकडे बघितलं.
’... अहो, जाताना त्यानं आईच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातली माळही काढून घेतली हो..’ तो कळवळला.
’बिचारी दोन दिवसांपासून वाट पाहातेय मुलाची... आपल्याला त्यानं फसवलं हेही तिला कळत नाहीये. नव्वदीच्या त्या बाईला काय कळणार म्हणा... ’
... समोरचा चहा थंड झाला होता.
’मी तिच्याशी गप्पा मारल्या. मॅनेजर बाजूलाच होता. तेवढ्यात तिथे आणखीही दोनचारजणं आले. सगळ्यांशी बोललो. सगळ्यांच्याच अशाच कथा... म्हणून निघताना मॆनेजरच्या पाठीवर कौतुकानं हात फिरवला. म्हणालो, खुप चांगलं काम करताय तुम्ही... नाहीतर ह्यांचं काय झालं असतं कुणास ठाऊक... तर त्याच्या उत्तरानं मी आणखीनच हैराण झालो...’ तो माझ्याकडे अपेक्शेनं पाहात बोलला.
मी भुवया वर करून खुणेनंच त्याला ’काय’ म्हणून विचारलं.
’तो म्हणाला, कुणास ठाऊक.. आम्ही पुण्य करतोय, की कधी कुठल्या जन्मी केलेल्या अशाच पापाचं प्रायश्चित्त भोगतोय...’
..... माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता. नकळत मी दोन्ही हातांनी डोकं गच्च पकडलं.
’हेच केलं मीपण.. त्याचं हे वाक्य ऐकल्यावर’... माझ्याकडे पाहात पुन्हा कळवळल्या स्वरात तो म्हणाला.
चहा तसाच टाकून आम्ही दोघही उठलो... पुन्हा स्टॊपवर आलो...
हातातली पेपराची घडी त्यानं घट्ट पकड्डली होती.
...’ आजच मी वाचलं, की शतायु लोकांची जगातली संख्या २०५० मधे १४ पट वाढणारे. म्हणजे, आज जगात दोन लाख पासष्ट हजार आहेत. ५० साली, सदतीस लाख होतील... भारतातही साठीच्या वरच्या लोकांची संख्या वाढतेय... आज आठ कोटी आहेत, आणखी १५ वर्षांनी १५ कोटी असणारेत... ’ बोलताबोलता तो थांबला.
... ’मग वृद्धाश्रमाची गरज वाढणार नाही का? 'तिथून निघालो, तेव्हा दोनचार जणं बाहेर थांबले होते... कुणाच्या बापाला आणायचं होतं, कुणी इथे बायकांची सोय आहे का म्हणून चौकशी करत होता...'
- तो म्हणाला, आणि मान फिरवून त्यानं डोळे पुसले!

----------------------------------------------------

1 comment:

Santosh said...

Lekh khupach chhan. Pan kadhi kadhi nailaj hi asato. Kahi naveen pidhishi na jamavata swatantryacha heka dharatat.