Tuesday, July 27, 2010

‘कट्टा’ !!

ग्रंथ माझे गुरु, ग्रंथ मायबाप, निवविती ताप, हृदयाचा’ ... एका ओळीत वाचनसंस्कृतीचं माहात्म्य वर्णन करणारं हे वचन ग्रंथांचं महत्त्व सिद्ध करतं, तेव्हा ग्रंथप्रेमींना कृतकृत्य वाटत असेल. पुस्तकांच्या किंमतीचा विचारही न करता ती मिळवण्यासाठी वणवण करणारे पुस्तकभक्त पाहिले, की ‘वाचनापायी वाट्टेल ते’ करायची तयारी असलेल्या पुस्तकवेड्यांच्या वाचनभुकेला दाद द्यावीशी वाटते. एखाद्याकडे अमुक एक पुस्तक आहे, असं कळलं, की झपाटल्यासारखं होणारे पुस्तकप्रेमी पुस्तकविश्ववर दिसतात, तेव्हा वाचनसंस्कृतीच्या या पुजा-यांच्या पंक्तीत आपण खूप शेवटच्या पानावर आहोत, याची जाणीव होते. पण इथे वाचनभक्तीला आलेला महापूर पाहून ऊर भरून होते.. मग रिंगणात उतरावंसंही वाटू लागलं, आणि कदाचित, कळत नकळत खेचला गेलो. तरीही, पुस्तकांचा उभ्याउभ्या फडशा पाडावा, अशी मानसिकता कधी होईलसे मला वाटत नाही. पण कधी एखादे चांगले पुस्तक वाचावे, ते इतरांशी शेअर करावे, ही इथली कल्पना आणखी कशी विस्तारता येईल, यावर विचार व्हावासे वाटते. गावोगावी, वेगवेगळ्या शहरांत पसरलेल्या पुस्तकप्रेमींसाठी काही करता येईल का... संगणकाच्या पडद्यावर पुस्तक वाचण्यापेक्षा, हाताला होणारा पुस्तकांचा स्पर्श अधिक सुखावणारा असतो. तो अनुभव घेता यावा, असं काहीतरी इथे उभं राहावं, अशी अपेक्षा आहे. हाईड पार्कच्या धर्तीवर मुंबईत सुरु झालेल्या ‘अत्रे कट्ट्या’नं आता चांगलं मूळ धरलंय... नवनव्या विशयांवर चर्चा, भाषणं, वैचारिक देवाणघेवाण आणि कधी, पुस्तकं, संदर्भग्रंथांची देवाणघेवाणही होते. पुस्तकवेड्यांचा असा एखादा ‘कट्टा’ ठिकठिकाणी उभा राहिला तर?...
कल्पना कशी वाटते? कसा करता येईल हा कट्टा? काय असावं त्याचं स्वरूप? कोण चालवेल तो सातत्यानं? आपलं आणि कट्ट्याचं नातं काय असाव?...
चर्चा शक्य आहे. कदाचित आणखी एखादा चांगला उपक्रम उभा राहील.
... तुम्हाला काय वाटतं?

Friday, July 16, 2010

सेव्ह द बेबी गर्ल... आणि, सायलेंट ऑब्झर्व्हर!!

स्त्री भ्रूणहत्या ही एक चिंताजनक सामाजिक समस्या आहे. देशात अनेक राज्यांना या समस्येचा विळखा पडला आहे. समाजिक प्रतिष्टेच्या जुनाट कल्पना आता पुन्हा भीषणपणे डोके वर काढताहेत. `ऑनर किलिंग' ही त्यातूनच निर्माण झालेली एक नवी समस्या आहे. स्त्री भृणहत्या आणि ही नवी समस्या एकमेकांशी निगडीत आहेत. कारण, दोन्हींचे भविष्यातील परिणाम एकच आहेत. त्यामुळे, खरे तर, या दोन्ही समस्या एकाच वेळी डोळ्यासमोर ठेऊन हाताळायला हव्यात. उत्तरेकडचे ऑनर किलिंगचे लोण आता दक्शिणेतही पसरू लागले आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचा आपला अभिमान असला, तरी, इथेही अनेक समजुती, प्रथा-परंपरांची जुनाट मुळे खोलवर जिवंत आहेत. कदाचित, त्यातून, भविष्यात अशा काही नव्या समस्या इथेही निर्माण होऊ शकतात. स्त्री भ्रूणहत्या ही खरे तर राज्यात उघडपणे दिसणारी समस्या नाही. तरीपण, अनेक जिल्ह्यांत स्त्रियांचे घटते प्रमाण ही एक चिंतेची बाब आहेच. प्रगत आणि समृद्ध अशा कोल्हापुर जिल्ह्यात, मुलींचे दर हजारी प्रमाण ८३९ इतके आहे. ऐतिहासिक पन्हाळा तालुक्यात तर मुलींचे प्रमाण आठशेपेक्षा कमी होते. गर्भलिंगनिदानावर बंदी असली तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी ते केले जाते. तसेच स्त्रीभ्रृण हत्याही केली जाते. जिल्ह्यातील सर्व सोनोग्रफी केंद्रे हेच या समस्येचे मूळ आहे, हेही उघडकीस आले. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर स्वरूप धारण करत होती. कोल्हापुरच्या जिल्हा प्रशासनानेच हे खेदजनक वास्तव उघड केले आहे.
या समस्येला आळा घालण्यासाठी व स्त्रीभ्रृण हत्त्या रोखण्यासाठी कोल्हापूर प्रशासनाने `सेव्ह द बेबी गर्ल डॉट कॉम’ व `सायलेंट ऑब्झर्व्हर' हे उपक्रम सुरु केले आहेत. सेव्ह द बेबी गर्ल डॉट कॉम या वेबसाईटला ही सर्व सोनोग्राफी केंद्र जोडली आहेत. जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांना स्वतंत्र युजर नेम व पासवर्ड देण्यात आला आहे. सोनोग्राफी करण्यासाठी येणार्‍या प्रत्येक रुग्णाची माहिती दररोज वेबसाईटवर अपलोड करण्याची सक्ती सोनोग्राफी केंद्रांना करण्यात आली. त्यामुळे नियंत्रण कक्षाला दररोज जिल्ह्यात किती रुग्ण सोनोग्राफी करवून घेतात याची माहिती तर मिळू लागली, शिवाय किती गरोदर महिलांची सोनोग्राफी करण्यात आली याचीही माहिती नियंत्रण कक्षास कळत असल्यामुळे लिंग निदान करण्याचे धाडस कमी होऊ लागले आहे.
गेल्या काही महिन्यातच मुलींच्या जन्माचे प्रमाण सुधारत असल्याचे आढळून आले आहे. या उपक्रमाची दखल नॅसकॉम फौंडेशनने घेतली आहे. सेव्ह द बेबी गर्ल डॉट कॉम ही वेबसाईट देशात सर्वोत्कृष्ठ वेबसाईट ठरली आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी या उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक तर केलेच शिवाय हा उपक्रम देशभर राबविला जावा असे सांगितले. विधानपरिषदेमध्ये आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनीही या उपक्रमाचे कौतुक करुन राज्यस्तरावर हा उपक्रम राबविण्याचे सुतोवाच केले.
या उपक्रमाचाच पुढचा टप्पा म्हणजे सायलेंट ऑब्झर्व्हर... हा सायलेंट ऑब्झर्व्हर गर्भलिंग चिकित्सा करणार्‍या डॉक्टरांवर पाळत ठेवण्याबरोबरच त्यांच्या हातून नकळत जरी चोरी झाली तरी त्याची सचित्र नोंद आपल्या मेमरीमध्ये साठवून ठेवणार आहे.
सायलेंट ऑब्झर्व्हर एकदा सोनोग्राफी मशीनला जोडला की, या यंत्राचे काम सुरु होते. त्याचा मेंदू अगदी चोवीस तास सतर्क राहतो. डॉक्टराने सोनोग्राफी मशीन ऑन केल्यानंतर ते कसे वापरले, याच्या सर्व चलचित्रासह नोंदी सायलेंट ऑब्झर्व्हरमध्ये रेकॉर्ड होतात. मातेच्या गर्भातील मुलगा आहे की, मुलगी हे पाहण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याचे चलचित्र मेमरीत रेकॉर्ड होते. यामुळे कोणीही डॉक्टर कितीही मोठय़ा रकमेची ऑफर मिळाली तरी लिंग चिकीत्सा करण्याचे धाडस मात्र करु शकणार नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील २३२ सोनोग्राफी केंद्रांना सायलेंट ऑब्झर्व्हर हे यंत्र बसविण्यात येणार आहे. पन्हाळा तालुक्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांत सायलेंट ऑब्झर्व्हर कार्यान्वित झाले असून एव्हाना जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांमध्ये सायलेंट ऑब्झर्व्हर कार्यान्वित झालेली असतील. पुढील पाच वर्षात या उपक्रमामुळे मुलींचे प्रमाण नैसर्गिक पातळीवर येण्यास मदत होईल, असा जिल्हा प्रशासनाचा विश्वास आहे... महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या पोर्टलवर याची अधिक माहिती आहे.

Tuesday, July 13, 2010

बाहावा !!

.....शेकडो छटांनी खुललेली हिरवाई, ... एक हिरवाकंच बाहावा, आणि पोपटी, झुलता गुलमोहोर...
बाहाव्यावर पिवळ्याजर्द फुलांची चादर चढते, अन उन्हाच्या झळांनी सोन्याची झळाळी येते...
डोकावणारी शर्मिली हिरवाई, मागे फुललेला लालकेशरी, पिवळ्या ठिपक्यांचा झुबकेदार गुलमोहोर...
------- -- --
आज पाऊस कधीचा कोसळतोय...
हिरवा बाहावा ओलाव्यानं जडावलाय...
भारावलेल्या फांद्या, आळसावल्यागत सुस्तावल्यात...
एखादी झुळूक येते, नकोनकोसं होत त्या इकडेतिकडे करतात,
...आधीच पावसाचा मारा, त्यात तो लंपट वारा...
नकोनकोसं होऊन ती फांदी जमिनीकडं झुकते...
हिरव्यागार पानांच्या जडावलेल्या झुबक्यांवरल्या झुलत्या पाण्याच्या थेंबात घुसळणारी
काळोख्या उजेडाची तिरीप तोल सावरता सावरता घरंगळते...
एक चमकता मोतिया जमिनीवर टपकून वाहत्या पाण्यात विरघळतो,
आणि दिसेनासा होतो...
शोधूशोधू करत फांद्या उगीचच झुलतात... चारदोन पातळशी पानंही, पाठोपाठ जमिनीकडं झेपावतात,
थेंब कधीच हरवून गेलेला असतो... पानं, पाण्यावर झुलत, विरघळलेल्या थेंबाला शोधत भरकटतात...
जडावललेला बहावा, हरवलेली पानं शोधत बसतो...
उदास उदास होतो...
फांदीवरली चिंब पाखरं चिडीचूप्प होतात,
पंखात चोच खुपसून अंगाला झटका देतात...
पंखात मुरलेला इवलासा पाऊस पुन्हा पानांवर ठिबकतो...
वार्‍यानं पळवलेला तो मोती परत पानावर येतो...
पानं पुन्हा मोहोरतात, झुलतात... झुल्यावरल्या झोक्यातला मोती पुन्हा झरंगळतो,
... आणि बाहावा उदास होतो...
--------------------------------------------

Saturday, July 10, 2010

सहज...

सहज...
मला वाटलं, म्हणून हे लिहितोय.
कदाचित तो विषय अकारण वाटेल. पण असे काही विषयही, विचार करायला लावतात.
... काल अगदी सहजपणे कानावर पडलेले ते शब्द ऐकून मलाही धक्का बसला आणि मी चमकून त्यांच्याकडे बघितलं.
ट्रेनमध्ये समोरच्या बाकावर ते मस्त गप्पा मारत होते.
एक मध्यम वयाचा माणूस, आणि एक, पोरगेलासा, कॉलेजात जाणारा, नुकती मिसरूड उमटूउमटू लागलेला मुलगा. बहुतेक तो त्या माणसाचा मुलगा असावा. चेहेरेपट्टी बरीचशी मिळतीजुळती.
आणि, बहुधा ते गुजराती असावेत.
कारण, त्यांच्यात ‘बिझीनेस’च्या ‘वार्ता’ चालल्या होत्या.
बहुतेक तो माणूस भडकमकर रोडवर कॉम्पुटर पार्टसचं दुकान थाटून स्थिरावलेला असणार... बोलताबोलता तो ब्यागेतून कसलेकसले हार्डवेअर कोम्पोनन्टस काढून शर्टाच्या बाहीला पुसून पुन्हा ठेवत होता...
एकीकडे त्यांच्या गप्पा सुरू होत्या. माझे कान कुतूहलानं त्यात खुपसले गेले होते.
विषय, मुलानं बिझीनेस कोणता करावा, हा होता.
आणि त्यांच्या संभाषणातही, सेचुरेसन, केस, बेन्क असे शब्द येत होते म्हणून, ते गुजरातीच होते, हे नक्की होतं
आसपासच्या गर्दीतल्या मराठी गप्पांमध्येही मी बर्‍याचदा कान खुपसले आहेत. पण बिझिनेसच्या गोष्टी फारच कमी वेळा कानावर पडल्यात.
तर, `कोम्पुटर'च्या धंद्यात आता `सेचुरेसन’ झाल्यानं, मुलानं दुसरा काहीतरी बिझिनेस करावा, असं त्या पित्याचं म्हणणं होतं... आणि त्या दुसर्‍या धंद्यावर विचार सुरू होता.
त्याचं शिक्षण आणि त्यांच्या विचारविनिमयातून पुढे येणारे पर्याय यांचा एकमेकांशी संबंध नाही, हेही लगेच लक्षात येत होते.
‘तू काँडोमकी दुकान खोल’... अचानक, चुटकी वाजवत बापानं मुलाला सुचवलं.
... इथेच मी चमकलो, आणि थेट त्यांच्यात डोळेही खुपसले...
तो मुलगा मंद हसत होता...
`लेकिन चलेगी?'... त्यानं गंभीरपणे विचारलं...
म्हणजे, हा पर्याय विचार करण्यासारखा आहे, हे त्याला पटलं असावं, हे त्याच्या सुरावरून जाणवत होतं.
‘क्यू नही?... बंबईमे इतने सारे लोग है... सबको यूस तो करना पडता है’... बापानं ‘लोजिक’ सांगितलं...
‘सब तरहके, सब ब्रांडके कोंडोम बेचनेका... अलग अलह प्राईसका... हरेकको परवडना चाहिये’.. तो पुढे विस्तारानं `टिप्स' देऊ लागला...
`लेकिन'... मुलगा मात्र, अजून संभ्रमात दिसत होता... मध्येच त्यानं माझ्याकडे पाहिलं.
त्या बापाची आयडिया मला एकदम पसंत पडलीच होती... माझ्या डोळ्यातली ती पसंतीची पावती त्या मुलाला जाणवली.
`पापा, ऐसा करे?... साथमें ‘पिल्स’भी बेंचे?'... पोरगा बापाच्या पुढे जाऊन कल्पनाशक्ती लढवू लागला होता..
आता बापाचे डोळे चमकले. त्यानं मुलाच्या पाठीवर चक्क जोरदार थाप मारली होती...
बिझिनेसच्या गप्पांपुढे, ते दोघं बाप-मुलाचं नातं विसरून गेले, आणि त्यांचं ‘बिझिनेस प्लॆनिंग’ सुरू झालं...
माझं स्टेशन आल्यावर मी उतरून गेलो...
पण या गप्पा मात्र, कानात घुमत राहिल्या...
... आणखी दोनचार वर्षांत मुंबैत फक्त कॊंडॊमचं दुकान सुरू झालेलं असणार, अशी माझी खात्री झाली होती.
... सरकारी योजना, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे, या सर्वांनी प्रामाणिकपणे प्रसार केला, तर लोकसंख्येच्या विस्फोटाचे धोके समाजाने तोवर ओळखलेले असतील...
... म्हणजे, अशा दुकानाची गरज समाजालाच भासू लागलेली असेल.
त्या बापाच्या ‘द्रष्टे’पणाचे मला कौतुक वाटले...
बिझिनेसचे बाळकडू मिळवण्याचा जन्मसिद्ध हक्क त्यांनाच आहे, ह्याची मला खात्री पटली...
-------------
आणि, उद्याच ‘जागतिक लोकसंख्या दिन’ असल्यामुळे आजच हे नोंदवून ठेवावे, असं मला वाटलं...
उद्या कुठे असं दुकान दिसलंच, तर त्या ‘आयडिया’च्या जन्माचा मी एकमेव साक्षीदार होतो, हे तेव्हा सांगण्यात मजा नाही...
--------------
थोडे विषयांतर :
बिझीनेस हा मराठी माणसाचा पिंड नाही, हे एकदा माझा एक गुज्जू मित्र पटवून सांगण्याचा खूप प्रयत्न करत होता... मग, मी त्याला आठवतील तेवढी नावं सांगितली...
किर्लोस्कर, गरवारे, कल्याणी, पेंढारकर, जोग, अवर्सेकर, म्हैसकर...
आणि मग विचारांना खूप ताण देऊन एखाददुसरं नाव वाढवत राहिलो...
तरी तो त्याच्या म्हणण्यावर ठाम होता.
मग त्यानं मला एक किस्सा सांगितला.
तो खराच आहे, असा त्याचा दावा होता...
... एकदा एका मराठी माणसानं काहीतरी वेगळा बिझिनेस सुरू करायचं ठरवलं... बराच विचार केला, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केले... जगभरातल्या त्या धंद्यातल्यांच्या ‘यशोगाथां’चे पारायण केले, ‘सप्लायर्स’शी पत्रव्यवहार केला, आणि, फायद्याचे आडाखे जुळताच, ऒर्डर नोंदवली.
... कुठल्याशा वेस्टर्न कंट्रीमधून त्यानं हजारोंच्या संख्येनं ‘डिझायनर’ ब्रा मागवल्या होत्या.
काही दिवसांतच त्याची कन्साईनमेंट आली, आणि तो भविश्याची सुंदर स्वप्ने रंगवूही लागला...
पण अंदाज फसला... वेस्टर्न साईझमुळे, इथल्या मार्केट मध्ये माल खपलाच नाही.
मग त्यानं आपली ही कहाणी एका गुजू मित्राला सांगितली, आणि त्या मित्रानं तो सगळा माल विकत घेतला...
हा मराठी माणूस, स्वत: सुटल्याच्या आणि तो फसल्याच्या आनंदात पुढे काय होणार यावर लक्ष ठेवून होता.
काही दिवसांनी पुन्हा ते भेटले... गुजू मित्रानं ह्याच्या तोंडात पेढा कोंबला, आणि याचा आ तसाच राहिला...
मग त्या मित्रानं, आपलं बिझिनेस सिक्रेटही ओपन केलं...
त्यानं तो माल घेतल्यानंतर, कुठल्यातरी मार्केटमध्ये टोप्यांच्या गाड्या सुरू केल्या... एका ईदला जोरदार विक्री झाली, आणि एक पार्ट संपून गेला... त्यातच सगळा पैसा वसूल झाला. मग ते ‘इंम्पोर्टेड’ इलेस्टिक आणि हूक त्याच धंद्यातल्या एका लोकल उत्पादकाला विकले... ते त्याचे प्रॊफिट होते..
त्यावर त्यानं गाडी घेतेली होती...
--- ह्यातला विनोदाचा, असभ्यपणाचा भाग सोडला, तरी बिझिनेस आणि मराठी माणूस यांच्या नात्याविषयी ते काय विचार करतात, हे विचार करण्यासारखं आहे...
...काय?
----------------------------------