Sunday, June 27, 2010

कदाचित...

... भारत भिका सावकार नावाच्या कुणीतरी परवा कधीतरी आत्महत्या केली.
दारूच्या नशेतच त्यानं स्वत:ला संपवलं, असं त्या बातमीत म्हटलं होतं. काय कारण असेल त्याच्या आत्महत्येमागचं?
कर्जबाजारीपणा?... बेकारी?... कौटुंबिक कलह?... की नुसती व्यसनाधीनता?...
... भारत भिका सावकार हा त्या दिवशी आत्महत्या करणारा एकटा नव्हता.
त्याच्या आधीच्या आठवड्यात, विदर्भात एका दिवशी, जवळपास दर तासाला एक आत्महत्या झाली होती...
तरीही, एकाच वर्तमानपत्राच्या डाव्या पानावर, एका न दिसणा-या कोपर्‍यात, भारत भिका सावकारच्या आत्महत्येची बातमी छापून आली होती...
भारत भिका सावकार हा कुणी प्रसिद्ध, नामवंत माणूस नसेल.
राज्याच्या एका कुठल्यातरी कोपर्‍यातल्या कुठल्याशा खेड्यातला एक दारुडा, व्यसनी तरूण असावा...
तरीही, त्यानं आत्महत्या केली, ही बातमी त्याच्या नावामुळे लक्षात राहिली...
... अलीकडे, वर्तमानपत्र उघडल्यावर, प्रत्येक पानावर आत्महत्येच्या बातम्या दिसतातच. कुणी कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:ला संपवलेलं असतं, कुणी छळाला कंटाळून अखेर करून घेतलेली असते, तर कुणी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केलेली असते... कुणाचा प्रेमभंग, कुणाला धंद्यात खोट, कुणी वैफल्यग्रस्त, कुणी निराशेनं पछाडलेला, तर कुणामागे कसल्या तरी चिंतेचा, भीतीचा ससेमिरा...
दोनतीन महिन्यांपूर्वी, गोव्यात शंभर वर्षांच्या एका वॄद्धानं जगण्याला कंटाळून आत्महत्या केली...
एकीकडे, मृत्यूशी सेकंदासेकंदाचा झगडा देत जगण्याची धडपड सुरू, तर एखादा कुणी, जगण्याला कंटाळून मृत्यूला कवटाळतो...
कदाचित, शंभर वर्षांच्या आयुष्यातही, हाताला काहीच लागलं नसल्यानं तो निराश झाला असावा...
... किंवा, जगण्याची उमेद रहावी, असं काही आसपास नसतानाही, केवळ मरण येत नाही, म्हणून नाईलाजानं तो जगत असावा. आणि असह्य झाल्यावर, मरणाची वाट पाहून कंटाळल्यावर, त्यानं स्वत:च मरणाला जवळ केलं असाव.
... पण, शंभराव्या वर्षी, आत्महत्या करून मराव लागणं, हे त्याचं दुर्दैवच असणार.
भारत भिका सावकारला दारूचं व्यसन होतं, असं त्या बातमीत म्ह्टलं होतं...
... का लागलं असेल भारत भिका सावकारला दारूचं व्यसन?
त्याला आपल्या नावाची तर लाज वाटत नसेल?
आपला देश आर्थिक महासत्ता होतोय. भारताचं नाव जगाच्या नकाशावर दिवसागणिक ठळक होतंय...
आणि, त्या महान देशाचं नाव मिरवणारा तो भारत मात्र, केविलवाणं जिणं जगतोय...
त्याची खंत त्याला वाटली असेल?
की वडिलांच्या नावाची चीड त्याला पोखरत असेल?...
भिका सावकार!...
आपल्या नावापुढे बापानं एवढं विचित्र, भयाण वास्तव स्वत:च्या नाव आणि आडनावामुळे जोडून ठेवलंय, असं काहीतरी त्याला छळत असेल?...
भिका सावकारानं, त्याच्या बापानं तरी, त्याचं नाव ‘भारत’ का ठेवलं असेल?...
कदाचित आपल्या नावातला विरोधाभास आपला पोरगा पुसून टाकेल, असं त्याला वाटलं असेल?...
भिका सावकार कोण, तो काय करतो, हे काहीच त्या बातमीत नव्हतं...
पण भारत हा त्या भिका सावकाराचा मुलगा होता....
‘भिका’ आणि ‘सावकार’... भारतच्या नावापुढे लागलेली जणू दोन विशेषणं...
भारतच्या आत्महत्येमागे काय कारण असेल, ते माहीत नाही... त्याच्या व्यसनाधीनतेचं कारणही स्पष्ट नाही...
कदाचित, गरीबी हेच सगळ्याचं कारण असेल... त्या वेदनांतूनच त्याला नैराश्य आलं असेल... त्यातून आर्थिक विवंचना जन्माला आल्या असतील... मग तो आणखीनच वैफल्यग्रस्त झाला असेल...
... मग, कदाचित, कौटुंबिक कलहदेखील सुरू झाले असतील...
जगण्याच्या चिंतेनं कदाचित त्याला छळलं असेल...
... आणि तो व्यसनात बुडाला असेल.
कधीतरी, सगळंच असह्य होऊन त्यानं मरणाला कवटाळलं असेल...
----------- ------------- ------------
या जगात, दररोज तीन हजार व्यक्ती आत्महत्या करून जीवन संपवतात.
आणि, आत्महत्या करणारी प्रत्येक एक व्यक्ती, तशाच समस्येनं ग्रासलेल्या किमान २० जणांच्या मनात आत्मह्त्येचे विचार रुजवून जातो... म्हणजे, किमान २० जण त्यापाठोपाठ आत्महत्येचा प्रयत्न करतात.
वर्षागणिक दहा लाख लोक आत्महत्या करतात, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे.
दर एक लाख माणसांमागे, १६ जण आत्महत्या करतात...
... म्हणजे, या जगात, दर ४० सेकंदांनी एक आत्मह्त्या होते!!
गेल्या ५० वर्षांत, जगभरातील आत्महत्येचे प्रमाण, ६० टक्क्यांनी वाढल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष आहे.
काही देशांत, आत्महत्या हे १५ ते ४४ वयोगटांतील मृत्यूचे एक प्रमुख कारण ठरले आहे. १० ते २४ वयोगटांतील मृत्यूंमागेदेखील, आत्मह्त्या हे ठळक कारण होऊ पाहाते आहे, असा जागतिक आरोग्य संघटनेचा एक निष्कर्ष आहे.
... हे आत्महत्यांमुळे होणार्‍या मृत्यूंचे विष्लेषण झाले.
आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यांची, परंतु मरण न येणार्‍यांची संख्या या आकडेवारीच्या २० पट जास्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
सन २००७ मध्ये, भारतातील एक लाख २२ हजार ६२७ लोकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. १९९७ ते २००७ या दहा वर्षांत, देशातील आत्महत्या २८ टक्क्यांनी वाढल्याचा राष्ट्रीय गुन्हे संशोधन संस्थेचा रिपोर्ट सांगतो. १९९७ मध्ये ९५ हजार ८२९ आत्महत्या झाल्या होत्या.
नंतरच्या दहा वर्षांत, लोकसंख्या १९ टक्क्यांनी वाढली, तर आत्महत्या आठ टक्क्यांनी वाढल्या...
सन २००७ च्या एका वर्षात, महाराष्ट्रात देशात सर्वाधिक, म्हणजे, १५ हजार १८४ आत्महत्या नोंदल्या गेल्या. २००५ ते २००७ या काळात, महाराष्ट्र हे आत्महत्याग्रस्तांच्या संख्येत पहिल्या क्रमांकाचे राज्य राहिले.
देशातील या वाढत्या आत्महत्यांमागे, २३.८ टक्के आत्महत्यांचे कारण कौटुंबिक समस्या हे होते, तर २२.३ टक्के आत्महत्या आजारपणाला कंटाळून झाल्या होत्या, असे हा अहवाल सांगतो. २.८ टक्क्यानी प्रेमप्रकरणांतून आयुष्य संपविले, तर २.७ टक्क्यांनी दिवाळखोरीमुळे आत्महत्या केल्या. २.६ टक्के आत्महत्या, हुंड्याच्या वादातून झाल्या.
गरीबी, व्यसनाधीनता, व्यावसायिक किंवा करियरमधील समस्यांमुळे होणार्‍या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे...
मात्र, सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागेल, या भीतीने आत्मह्त्या करण्याचे प्रमाण कमी होत आहे...
---- ---- -----
... भारत भिका सावकार यापैकी कुठल्या कारणाचा बळी ठरला असेल?
------------------------

1 comment:

Anonymous said...

मीडियाला काय फरक पडतोय? तिकडे विदर्भात दिवसागणिक एक आत्महत्या होते, त्याची बातमी चुकून कुठेतरी एखाद्या कोप-यात येते. आणि विवेका बाबाजीच्या आत्महत्येच्या बातमीला पेपरांचे रकाने अपुरे पडतात.