Wednesday, May 19, 2010

मैत्र प्रकाशकाचे...

आमच्या एका मित्राने अशाच एका सोशल साईटवर प्रकाशकाचा अनुभव शेअर करून इतरांना शहाणे केल्याने, आपणही लिहावे असे मला वाटू लागले. मी ते अनुभव वाचत गेलो, तेव्हा नावे बदलून त्यानं माझाच अनुभव लिहिलाय असं मला वाटलं. मग स्वानुभव शेअर करावा, असं वाटलं, आणि लिहायला घेतलं.
खरं तर हा खाजगी अनुभव म्हणून आजवर मनात असूनही यावर चर्चा टाळली होती. पण समदु:खींनाही दिलासा म्हणूनही हे लिहावंसं वाटलं... दु:ख वाटून घेतल्यानं हलकं होतं म्हणतात...
आमच्या मुंबई-ठाण्यातला एकजण 'साहित्यसेवे'च्या ध्यासानं प्रकाशन व्यवसायात उतरला, अशा समजुतीने मला त्याच्याबद्दल प्रचंड आदर वाटत होता. त्याच्या 'स्ट्रगल'च्या काळात, जमेल तेव्हढी मदत करावी म्हणून मी तसे केलेही. पुढेही अनेकदा त्याने हक्काने `सहकार्य' घेतले. आमचे खूप चांगले संबंध तयार झाले. संपर्कही वाढला. अगदी एकमेकांचे `परम मित्र' झालो. काही काळानंतर, वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या माझ्या एका लेखावरून अशाच विषयावर पुस्तक प्रसिद्ध करायची कल्पना त्याने सुचविली, आणि आम्ही कामाला लागलो. प्रकाशक माझा परम मित्र असल्याने, करार वगैरे करायचे मनातही आले नाही. आणि, प्रत्येक साप्ताहिक सुट्टीत प्रवास, भेटीगाठी करून मी पुस्तक लिहिले... मीच प्रयत्न करून एका साहित्यप्रेमी राजकीय नेत्यास त्याच्या हस्ते प्रकाशन करण्याची गळ घातली, आणि माझ्या पुस्तकासोबत त्याच्या आणखीही काही पुस्तकांचे प्रकाशन आमच्या या परम मित्राने करून/उरकून घेतले. पत्रकारितेतील व्यक्तिगत संबंधांमुळे, त्या प्रकाशन कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धीही मिळाली. नंतर बाजारात पुस्तक आले, आवडल्याची पावतीही असंख्य वाचकांकडून मिळत गेली... त्याचे समाधान खुप मोठे होते.
प्रकाशनाला एक वर्ष उलटत असताना, सहज मीच आमच्या प्रकाशक मित्राकडे सहज म्हणून पुस्तक `व्यवहारा'विषयी चौकशी केली. तोवर, मानधन या विषयावर प्रकाशकाने चकार शब्दही काढला नव्हता. माझ्या चौकशीमुळे त्याने (नाईलाजाने) मला एकूणच प्रकाशन आणि पुस्तकाचा निर्मिती, विक्री खर्च,, प्रक्रिया यावर माहिती दिली. आणि हा धंदा कसा `आतबट्ट्या'चा असतो, हे `पटवून्'ही दिले.
तोवर याबद्दल मिळालेली माहिती आणि आमच्या या परम मित्राने दिलेली माहिती यात एव्हढी तफावत होती, की प्रकाशन व्यवसाय म्हणजे लष्कराच्या भाकर्‍या अशी माझी समजूत झाली, आणि मी मानधनाचा विचारच सोडून दिला. उलट त्या प्रकाशकाच्या नि:स्वार्थी साहित्यसेवेबद्दल माझा आदर द्विगुणित झाला.
नंतर कधीकधी या व्यवसायतल्या जाणकारांशी सहज होणार्‍या गप्पांमुळे, पुन्हा मी आमच्या प्रकाशकाजवळ आडूनाआडून विषय काडला, पण मानधनाची रक्कम मिळेल, असे त्यावरून अजिबात जाणवले नाहीच, उलट नको त्या चौकश्या करून आपणच चूक केली असं मला वाटत राहिलं. परदेशांत तर, प्रकाशकालाच पैसे देऊन पुस्तकं छापून घेतात वगैरे ऐकलं होतं... (आपल्याकडे लेखनावर उदरनिर्वाह करणारे लोक कसे जगत असतील, असा विचार मनात आल्यावर तर मानधनधनाची अपेक्षाच मनातून काढून टाकली- (प्रकाशक खुश)).
नंतर आमच्या त्या परम मित्राचा फोनवरचा संपर्कही हळूहळू रोडावत गेला.
त्याच्या कामासाठी मदत हवी असेल तर मात्र त्याचे फोन येत राहिले... मीही, मित्रत्वाच्या भावनेने शक्यतो सहकार्य करत राहिलो...
मानधन हा विषय संपला होता...
पण नंतर मला वेड्यात काढणारेही काहीजण भेटले.
शेवटी, निगरगट्टपणाने पुस्तकाच्या १०० प्रती मागून घेतल्या.
... निदान, कुणाकुणाला वेगवेगळ्या निमित्ताने कधीकधी द्याव्या लागणार्‍या भेटींसाठी तरी एक चांगली वस्तू झाली....!

3 comments:

साधक said...

अनुभव छान पण अजूनही भूमिका तेवढी कठोर नाही. फसवले जात असूनही गप्प रहता राव.

Naniwadekar said...

'साधक' यांनी म्हटल्याप्रमाणे तुम्ही इतके गप्प का राहिले? काही लोकांच्या (उदा. हॅन्सि क्रॉन्‌ये) चेहर्‍यावरून ते कधी कुणाला फसवतील असं वाटत नाही. पण एकदा का त्या व्यक्तीनी संशयास्पद वागणूक सुरु केली की त्याबद्‌दल शक्य ते उपाय करायला लोक खूप उशीर का करतात?

- नानिवडेकर

बापू आत्रंगे said...

रा. रा. दिनेशराव, अनुभव सार्वत्रिक आहे!
आम्ही हा अनुभव कळते-समजतेच्या वाचकांबरोबर शेअर करू इच्छितो.
तुम्हांस ठेच लागली, मागचे तरी शहाणे होतील, ही भावना.
- बापू