Friday, May 28, 2010

चिंतू-३

संध्याकाळी अंधेरीच्या रेल्वे स्टेशनावर उतरून जिना चढणार्‍या गर्दीत जिन्याच्या पायर्‍या दिसेनाश्या होतात, आणि एकेका पायरीने वर चढणार्‍या त्या गर्दीची डोकी, खालून, काळ्या लाटांसारखी हिंदकळताना दिसतात...
... मध्येच एका पायरीवर मात्र, या लाटा भोवयासारख्या दुभंगतात...
घाईघाईने जिने चढणारी ती पावले, मधल्याच एका पायरीशी थबकतात, आणि बाजूला होऊन पुढे सरकतात.
आपोआपच, त्या पायरीवर एक पोकळी तयार होते.
आणि लाटेतले प्रत्येक डोके खाली वळते...
... त्याला मात्र, त्या गर्दीचे, तिच्या दुभंगण्याचे आणि पुढे सरकण्याचे काहीही भान नसते.
हाताच्या तळव्यावर मावतील, एवढ्या लहान, खेळण्यातल्या दोनचार मोटारी त्याच्या पायांच्या चपळ हालचालींनी मिळणार्‍या वेगामुळे त्या मोकळ्या जागेतून इकडून तिकडे सरसरत असतात...
... आणि तो, त्या खेळात मस्त दंगलेला असतो.
गर्दीची पावलं क्षणभरासाठी थबकतात. कारण, त्या गर्दीची माणुसकी पायाशी असलेल्या त्या लहानग्याची काळजी घेत असते.
कुणीतरी खिशात हात घालून, त्या घाईतही, एखादं नाणं त्याच्यासमोर टाकतो, आणि पुढ्यातली पळती गाडी झटक्यात पायात पकडून थांबवत तो खाली वाकून तोंडानं ते नाणं उचलतो... खिशात टाकतो...
पुन्हा पायात गाड्या पकडून त्यांना वेगानं पळवण्याचा त्याचा खेळ सुरू होतो.
आपल्या पुढ्यात नाणं टाकणार्‍याकडे मान वर करून पाहाण्याचंही भान त्याला नसतं.
कदाचित, मान वर करेपर्यंत, गर्दीची दुसरी लाट आलेली असते, हे त्याला अनुभवानं माहीत झालेलं असावं.
तो पुन्हा आपल्या पुढ्यातल्या त्या गाड्या पळवायच्या खेळात रंगून जातो.
... अलीकडे तो रोज दिसत नाही.
तो जेमतेम साताआठ वर्षांचा असेल.
त्याला हात, म्हणजे, दंड, मनगटं, आणि पंजे नाहीत.
त्याचे पायच त्याचे हात आहेत.
उत्सुकता वाटावी, इतक्या सफाईनं तो आपल्या पायाच्या इवल्या तळव्यांनी पुढ्यातल्या खेळण्यातल्या मोटारी हाकत असतो.
... शरीराचा एखादा अवयव दुबळा किंवा निकामी असेल, तर काम करण्यास सक्षम असलेला दुसरा अवयव आणखी कार्यक्षमतेने काम करतो आणि दुबळ्या अवयवाची क्षमतेची उणीव भरून काढतो, असे म्हणतात. अपंगांना त्यांच्या दुबळेपणावर मात करण्याची शक्ती मिळावी, म्हणून कदाचित निसर्गच ही योजना करत असावा...
पायात पेन पकडून परीक्षेचे पेपर लिहिणार्‍या, तोडात ब्रश पकडून निसर्गाचे सुंदर रंग कागदावर उमटविणार्‍या, प्रकाशाच्या किरणांचे सौंदर्य कधीच न पाहू शकणार्‍या अनेक अपंगांच्या कर्तबगारीचं कौतुक धडधाकटांच्या दुनियेत होत असतं. अशा कौतुकामुळे त्या अपंगत्वालाही, जगण्याची नवी उमेद मिळते...
... आणि अपंगत्वावर मात करून कुणी एखादा एव्हरेस्टदेखील सर करून जातो...
----- ---------- ---------
पण धडधाकट, शरीराचे सगळे अवयव मजबूतपणे काम करण्याइतके ठाकठीक असतानाही, कधीकधी आपण अपंग, दुबळे होऊन जातो, तेव्हा निसर्ग आपल्याला ती सवलत देत नाही!!
... मग आपण कृत्रिम मदतनीसांचा सहारा घेतो.
आपल्या दुबळेपणावर मात करण्यासाठी, आजूबाजूला यंत्रांची दुनिया उभी करतो. आणि, ही दुनिया आपल्या सेवेसाठी हात जोडून उभी रहिली, की आपण आणखी दुबळे, परावलंबी, अपंग होऊन जातो...
... दहाबारा वर्षांपूर्वी, जेव्हा मोबाईल फोन ही प्रत्येकाची गरज नव्हती, तेव्हा सगळे फोन नंबर पटापट आठवायचे. गरजेपुरती फोन डिरेक्टरी मेंदूत सहज स्टोअर झालेली असायची.
आता मोबाईलमुळे, मेंदूतल्या डिरेक्टरीची पानं पिवळी पडलीत...
मेंदू वापरायची सवय यंत्रांमुळे कमी झाली, आणि आपणच यंत्र झालो.
यंत्र हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग झालाय.
... माझा एक मित्र, समोर बसून अगदी सहज बोलू लागला, तरी त्याचा डावा तळवा नकळत डाव्या कानावर जातो...
मध्येच कधीतरी तो भानावर येतो, आणि आपण मोबाईलवर बोलत नाहीये, हे लक्षात येऊन ओशाळून जातो...
आपण `यंत्रावलंबी' झालोय.
म्हणजे, अपंग होतोय?
... आपल्याला निसर्गानं दिलेलं शरीर, आपल्या कामाच्या गरजा भागवण्याकरता अपुरं पडतंय?
... माणसाच्या उत्क्रांतीच्या काळात, नको असलेले, गरज नसलेले अवयव गळून पडत गेले, असं म्हणतात.
नाहीतर, आज आपल्यालाही शेपूट असती!!...
... आणि ज्या अवयवांची गरज वाढू लागली, ते आणखी ताकदवान होत गेले...
.. म्हणून माणसाचा मेंदू इतर प्राण्यांपेक्षा तल्लख होत गेला!!
... आता, पुढे काय होणार???...
आता मेंदूचा, हातांचा वापर कमी झालाय. यंत्रे आलीत...
शरीराकडून करून घ्याव्या लागणार्‍या अनेक कामांसाठी आपण यंत्रे तयार केलीत.
---- --------- --------
आत्ताच वाचलेल्या एका बातमीमुळे, हे सहज आठवून गेलं.
लंडनमधल्या, युनिवर्सिटी ऒफ रीडिंगमधल्या डॊ. मार्क गॆसन नावाच्या सायबरनेटिक्स एक्स्पर्टला कॊम्पुटर व्हायरसचा संसर्ग झालाय....!!!
संगणक विषाणूचा संसर्ग माणसाला होण्याचा जगातला हा पहिलाच प्रकार आहे! मार्क गॆसन हा संगणक विषाणूचा संसर्ग झालेला जगातला पहिला मानव ठरला आहे.
प्रयोगशाळेचे दरवाजे उघडण्याची सिक्युरिटी सिस्टीम असलेला प्रोग्राम सेट केलेली चिप मार्कने मनगटात बसवून घेतली होती. मोबाईल फोन त्याच्याव्यतिरिक्त दुसरा कुणीच चालू किंवा बंद करू शकणार नाही, असा प्रोग्रामही त्यात सेट केलेला होता.
एका नव्या प्रयोगाच्या हव्यासापोटी मार्कने म्हणे, या चिपमध्ये जाणूनबुजून व्हायरस घुसवला. नंतर त्यामुळे आपोआपच प्रयोगशाळेच्या सिक्युरिटी सिस्टीमवरही परिणाम झालाय.
कॊम्प्युटरच्या विषाणूचा संसर्ग माणसाला झाला...
(http://news.yahoo.com/s/livescience/20100526/sc_livescience/maninfectshimselfwithcomputervirus)
म्हणजे, कॊम्प्युटर हा माणसाच्या शरीराचा भाग होतोय??
बर्‍याच दिवसांनी,
.... पुन्हा ‘चिंतू’नं डोकं वर काढलंय...

---------------------------
http://zulelal.blogspot.com/search/?q=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%82
---------------------

Wednesday, May 19, 2010

मैत्र प्रकाशकाचे...

आमच्या एका मित्राने अशाच एका सोशल साईटवर प्रकाशकाचा अनुभव शेअर करून इतरांना शहाणे केल्याने, आपणही लिहावे असे मला वाटू लागले. मी ते अनुभव वाचत गेलो, तेव्हा नावे बदलून त्यानं माझाच अनुभव लिहिलाय असं मला वाटलं. मग स्वानुभव शेअर करावा, असं वाटलं, आणि लिहायला घेतलं.
खरं तर हा खाजगी अनुभव म्हणून आजवर मनात असूनही यावर चर्चा टाळली होती. पण समदु:खींनाही दिलासा म्हणूनही हे लिहावंसं वाटलं... दु:ख वाटून घेतल्यानं हलकं होतं म्हणतात...
आमच्या मुंबई-ठाण्यातला एकजण 'साहित्यसेवे'च्या ध्यासानं प्रकाशन व्यवसायात उतरला, अशा समजुतीने मला त्याच्याबद्दल प्रचंड आदर वाटत होता. त्याच्या 'स्ट्रगल'च्या काळात, जमेल तेव्हढी मदत करावी म्हणून मी तसे केलेही. पुढेही अनेकदा त्याने हक्काने `सहकार्य' घेतले. आमचे खूप चांगले संबंध तयार झाले. संपर्कही वाढला. अगदी एकमेकांचे `परम मित्र' झालो. काही काळानंतर, वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या माझ्या एका लेखावरून अशाच विषयावर पुस्तक प्रसिद्ध करायची कल्पना त्याने सुचविली, आणि आम्ही कामाला लागलो. प्रकाशक माझा परम मित्र असल्याने, करार वगैरे करायचे मनातही आले नाही. आणि, प्रत्येक साप्ताहिक सुट्टीत प्रवास, भेटीगाठी करून मी पुस्तक लिहिले... मीच प्रयत्न करून एका साहित्यप्रेमी राजकीय नेत्यास त्याच्या हस्ते प्रकाशन करण्याची गळ घातली, आणि माझ्या पुस्तकासोबत त्याच्या आणखीही काही पुस्तकांचे प्रकाशन आमच्या या परम मित्राने करून/उरकून घेतले. पत्रकारितेतील व्यक्तिगत संबंधांमुळे, त्या प्रकाशन कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धीही मिळाली. नंतर बाजारात पुस्तक आले, आवडल्याची पावतीही असंख्य वाचकांकडून मिळत गेली... त्याचे समाधान खुप मोठे होते.
प्रकाशनाला एक वर्ष उलटत असताना, सहज मीच आमच्या प्रकाशक मित्राकडे सहज म्हणून पुस्तक `व्यवहारा'विषयी चौकशी केली. तोवर, मानधन या विषयावर प्रकाशकाने चकार शब्दही काढला नव्हता. माझ्या चौकशीमुळे त्याने (नाईलाजाने) मला एकूणच प्रकाशन आणि पुस्तकाचा निर्मिती, विक्री खर्च,, प्रक्रिया यावर माहिती दिली. आणि हा धंदा कसा `आतबट्ट्या'चा असतो, हे `पटवून्'ही दिले.
तोवर याबद्दल मिळालेली माहिती आणि आमच्या या परम मित्राने दिलेली माहिती यात एव्हढी तफावत होती, की प्रकाशन व्यवसाय म्हणजे लष्कराच्या भाकर्‍या अशी माझी समजूत झाली, आणि मी मानधनाचा विचारच सोडून दिला. उलट त्या प्रकाशकाच्या नि:स्वार्थी साहित्यसेवेबद्दल माझा आदर द्विगुणित झाला.
नंतर कधीकधी या व्यवसायतल्या जाणकारांशी सहज होणार्‍या गप्पांमुळे, पुन्हा मी आमच्या प्रकाशकाजवळ आडूनाआडून विषय काडला, पण मानधनाची रक्कम मिळेल, असे त्यावरून अजिबात जाणवले नाहीच, उलट नको त्या चौकश्या करून आपणच चूक केली असं मला वाटत राहिलं. परदेशांत तर, प्रकाशकालाच पैसे देऊन पुस्तकं छापून घेतात वगैरे ऐकलं होतं... (आपल्याकडे लेखनावर उदरनिर्वाह करणारे लोक कसे जगत असतील, असा विचार मनात आल्यावर तर मानधनधनाची अपेक्षाच मनातून काढून टाकली- (प्रकाशक खुश)).
नंतर आमच्या त्या परम मित्राचा फोनवरचा संपर्कही हळूहळू रोडावत गेला.
त्याच्या कामासाठी मदत हवी असेल तर मात्र त्याचे फोन येत राहिले... मीही, मित्रत्वाच्या भावनेने शक्यतो सहकार्य करत राहिलो...
मानधन हा विषय संपला होता...
पण नंतर मला वेड्यात काढणारेही काहीजण भेटले.
शेवटी, निगरगट्टपणाने पुस्तकाच्या १०० प्रती मागून घेतल्या.
... निदान, कुणाकुणाला वेगवेगळ्या निमित्ताने कधीकधी द्याव्या लागणार्‍या भेटींसाठी तरी एक चांगली वस्तू झाली....!

Monday, May 17, 2010

धनाची पेटी.... ?

‘धवल क्रांती’ हा शब्द जिथे रूढ झाला, त्या गुजरातेच्या शेजारी, पंजाब, हरियाणामध्ये एक भीषण सामाजिक समस्या केव्हापासून थैमान घालते आहे. ती दूर करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि सामाजिक भान असलेल्या संघटना कधीपासून अक्षरश: झगडताहेत. पण होतेय उलटेच. या समस्येचे हातपाय देशभर पसरतायत. यातून एक भयावह भविष्य रुजते आहे, याची जाणीवही सगळ्यांना आहे. या समस्येवर पुरेशी जनजागृती झाली नाही, असेही नाही. कदाचित, ही समस्या इथे कधीतरी डोके वर काढणार, याची चाहूल आपल्या पूर्वजांनाही कित्येक वर्षांपूर्वी लागली असावी, म्हणूनच, तेव्हापासूनच या समस्येच्या जाणीव जागृतीला सुरुवात झाल्याचे पुरावे सापडतात. एकीकडे सामाजिक रूढींचा पगडा, आणि दुसरीकडे जाणीव जागृतीचे प्रयत्न... कदाचित, या संघर्षात, रूढी-विचारांनी प्रयत्नांवर मात केली, आणि अखेर, भूतकाळाने नोंदविलेली ही समस्या वर्तमानात जन्माला आलीच... आता भविष्यातही तिचे ओझे आपल्याला वाहावे लागणार आहे... कदाचित, ते इतके जड असेल, की आपल्याला ते पेलवणारदेखील नाही... आपण कोलमडून जाऊ... विस्कटून जाऊ, आणि नैराश्याचे भूत समाजाच्या मानगुटीवर बसेल...
... असे झाले, की एक स्थिती नक्की असते, हे इतिहासावरूनच वारंवार सिद्ध झाले आहे..
अराजक !...
... माणसांच्या मनावर जंगली, असंस्कृत, पाशवी वृत्तीचा पगडा, आणि, आत्मघात!!
झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं अवघड असतं, असं म्हणतात... इथे तसंच होतंय.
कित्येक वर्षांपासून ह्या भविष्याचे भान द्यायचा प्रयत्न सुरू आहे, तरीही आपण जागे होत नाही, म्हणजे, हे झोपेचं निव्वळ सोंग आहे...
+++ +++ +++
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले... देशभरात सगळ्याच राज्यांची विधिमंडळ अधिवेशनेही याच काळात ‘संपन्न’ झाली. देशाच्या संसदेचे अधिवेशनही नुकतेच संपले...
या दरम्यान, सगळीकडे या समस्येवर ‘सोपस्कारापुरती’ चिंताही व्यक्त झाली, आणि या समस्येचे वास्तव सामोरे आणणारी सरकारी आकडेवारीही जाहीर झाली...
... ह्या आकडेवारीतला तथ्यांश लक्षात घेतला, तर, आज दर हजार पुरुषांमागे जवळपास साडेआठशे स्त्रिया असे प्रमाण आहे.
म्हणजे, आपल्या ‘विवाहसंस्कृती’ला आव्हान देणारी धोक्याची घंटा अजून वाजतेच आहे...
‘माणुसकी’च्या व्याख्येला काळीमा लावणारा भविष्यकाळ यातून डोकावतोच आहे...
उद्याच्या अंधाराचे सावट दाट होते आहे...
... हीच ती समस्या आहे.
आता ही समस्या लपून राहिलेली नाही. तरीही, रूढी-परंपरांचा पगडा आपली मानगूट सोडत नाहीये.
... मेल्यानंतर मुलाने अग्नि दिला नाही, तर आत्म्याला शांति मिळत नाही, असे म्हणतात... आजवर याच समजूतीमुळे अनेक आत्म्यांना स्वर्गप्राप्ती झाली असेल...
पण अनेक घरांच्या ‘कुलदीपकां’नी ही समजूत खुंटीला टांगली आहे...
म्हणून दक्षिणेकडे, केरळसारख्या श्रीमंत, सुशिक्षित राज्यात, मुलाने ‘गल्फ’मधून पाठविलेल्या भक्कम पैशांच्या पुंजीवर पश्चिमेकडे झुकलेली असंख्य जोडपी चांगल्या अर्जाच्या वृद्धाश्रमांत दक्षिणेकडे डोळे लावून ‘बोलावण्या’ची वाट पाहात जगताहेत...
मुलगाच हवा, ह्या समजुतीत, तीन दशकांपूर्वीच्या कुटुंब कल्याणाच्या धडक मोहिमेची भर पडल्यानंतर स्त्री-पुरुष लोकसंख्येतील विषमतेची समस्या आता चटके देऊ लागली आहे.
चीनमध्ये, लोकसंख्या नियंत्रणाच्या अशाच धडक मोहिमांनंतर आता युवकांपेक्षा वृद्धांची संख्या तिथे वाढली आहे, असे तेथील आकडेवारी सांगते...
भारतात, या मोहिमेला समजूत, रूढींची जोड मिळाल्याने, मुलगा झाला, की कुटुंब परिपूर्ण झाल्याचे समाधान लाखो कुटुंबानी मिरविले...
आता तेच समाधान समस्येच्या रूपने थैमान घालू लागले आहे...
... पण, कोणत्याही चुकीची दुरुस्ती होऊ शकते, असे प्रगत विद्न्यान आज अस्तित्वात आहे.
म्हणजे, संगणकाच्या भाषेत, एखादी कृती ‘अन-डू’ केली, की त्याची दुरुस्ती होते.
मुलगा हवाच, अशी समजूत रूढ करणार्‍या आपल्या संस्कृतीलादेखील आपल्या या चुकीची जाणीव झाली होती.
म्हणूनच, `बेटी म्हणजे धनाची पेटी' असा समजही रूढ करण्याचा प्रयत्न संस्कृतीने केला असावा. पण तो रुळला नाही...
हे आपल्या संस्कृतीचे कदाचित अपयश असेल...
+++ +++ +++
दोन वर्षांपूर्वी, ८ मार्च २००८ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमिताने आखलेल्या एका सप्ताहाच्या समारोपाला, दिल्लीत महिला -बालकल्याण मंत्रालयाने स्त्री-भ्रूणहत्या या विषयावर एक परिषद आयोजित केली होती. स्त्री भ्रूणहत्येचे चिंताजनक वाढते प्रकार समाजाला कुठे घेऊन जातील, याचे एक भयंकर चित्र या परिषदेत पुन्हा मांडण्यात आले, आणि देशव्यापी जनजागृती करण्याचे पुन्हा एका ठरले. स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे, करमणूक क्षेत्र, धार्मिक-अध्यात्मिक गुरू, वैद्यकीय व्यावसायिक, सर्वांनी या मोहिमेत झोकून द्यावे, अशी गरज तेथे पुन्हा उच्चारली गेली...
+ ग्रामीण भागापेक्षा, शहरी, सुशिक्षित भागात गर्भलिंग चाचणीचे प्रकार अधिक असल्याचे या परिषदेत अधिकृतपणे स्पष्ट झाले...
+ पंजाब, हरियाणा, गुजरात आणि दिल्ली येथे स्त्री-पुरुष प्रमाणातील विषमता सर्वाधिक असल्याची माहितीही पुन्हा सामोरी आली...
+ अगोदर एक मुलगी असेल, तर दुसरी मुलगी होऊ देण्याची मानसिकता ४४ टक्के लोकांमध्ये नाही, हेही स्पष्ट झाले...
+ झपाट्याने घटत्या स्त्री-पुरुष प्रमाणातून, महिलांचा लैंगिक छळ, शोषण, अत्याचार, बलात्कार, छेडछाड, महिलांची तस्करी, आणि, महिलांना अनैतिक व्यवसायात ‘ढकलले’ जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली...
... या सर्वांतून, एक धोका पुन्हा समोर आला आहे.
समजा, देशात, दर एक हजार पुरुषांमागे सुमारे साडेआठशे स्त्रिया असे विषम प्रमाण राहिले, तर त्याचा अर्थ, दर एक हजार पुरुषांमागे, दीडशे पुरुषांना विवाह नाकारला जाईल...
... भारताची लोकसंख्या अब्जावधी असल्याने, विवाह नाकारल्या गेलेल्यांची संख्या काही कोटींमध्ये असेल...
कदाचित, या समस्येतून मानसिक आजार, विकार बळावतील, आणि संस्कृतीच्या चौकटीत त्यावर कोणताच उपाय नसेल... मग अनैतिकता हीच संस्कृती होईल...(?)
... या भविष्याची चाहूल आजच लागली आहे, तरीही आपण निर्धास्त आहोत..
का?
+++ +++ +++
... परवाच्या एका बातमीमुळे हे सगळं डोक्यात भिणभिणायला लागलं...
अहिंसेचे उपासक महात्मा गांधीजींच्या गुजरातेत, ‘धवल क्रांती’चा नारा घुमला, आणि दुग्धोत्पादनातून राज्याला समृद्धी येते, याचा सक्षात्कारही झाला. आता, दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी गुजरात झपाटले आहे...
त्यासाठी गायींची संख्या वाढविली पाहिजे... म्हणजे, गायींची पैदास वाढविली पाहिजे...
त्यावर सरकारने एक उपाय शोधलाय.
गायींची गर्भलिंग चाचणी करण्याचा!!
यापुढे, गायीच्या पोटात मादीचा गर्भ असेल, तरच तो गर्भ जन्म घेईल...
नाहीतर?...
.... मागे, निवडणुकीच्या निमित्ताने रिपोर्टींग करण्यासाठी मी विदर्भात खेडोपाडी फिरलो... आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांच्या व्यथा ऐकल्या, अनुभवल्या...
पंतप्रधान पॆकेजमधून गायींचे वाटप झाले, तेव्हा ‘यंत्रणे’ने कालवडी काढून घेतल्या, आणि नर जातीची वासरे दुभत्या गायींसोबत वाटली...
आपल्या पोटचा जीव पैशाच्या लोभापायी हिरावून घेतल्या गेलेल्या त्या गाय़ीनी परकी बाळे जवळ केलीच नाहीत, आणि दूध द्यायचे नाकारले...
यातून दोन संकटे ओढवली...
एक म्हणजे, आत्म्हत्याग्रस्तांची कुटुंबे उपाशीच राहिली,
दुसरे, कित्येक गायी आपल्या पोटच्या बछड्यांपासून दुरावल्या...
यातून दुसरे काय होणार?...
तर, मूळ मुद्दा, गुजरातेत आता गाय-बैलांच्या जन्मदरातही जाणीवपूर्वक विषमता आणण्याचा प्रयोग होणार आहे...
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याच राज्यात, माणसांच्या मुलींचा जन्म नाकारण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे...
इथे माणसाच्या मुलींना बंदी, आणि जनावरांच्या नरांना बंदी...
म्हणजे, जिथे गायी स्वीकरल्या, तिथे मुली मात्र नाकारल्या जातायत..
हा दुटप्पीपणा आला कुठून?
पैसा !!
माणसाने ‘बेटी ही धनाची पेटी’ हा समज माणसाच्या बाबतीत नाकारला, आणि जनावरांच्या बाबतीत स्वीकारला...
खरे?
---------------------------------------------------------
.

Saturday, May 15, 2010

कोकणातले ‘केरळ’...

मुंबईहून गोव्याकडे जाताना, संगमेश्वर ओलांडले, की एक मोठ्ठे वळण पार केल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला `ओझरखोल' नावाचे गाव दिसते. टेकडीएवढ्या हिरव्यागार डोंगरावर, शाळेची एक बैठी इमारत आणि झाडांमध्ये लपलेली कौलारू, केंबळी घरे, उजवीकडे एक रोडावलेली खाडी आणि लहानसा डांबरी रस्ता... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कै. माधवराव मुळ्ये यांचं हे गाव. इथल्या प्राथमिक शाळेला, माधवरावांचं नाव दिल्यामुळे अनेकांना हे माहीत झालंय. संगमेश्वरच्या अलीकडे गोळवलकर गुरुजींचं गोळवली, आणि पलीकडे माधवराव मुळ्यांचं ओझरखोल... गोळवलीत गुरुजींच्या वास्तूस्थानी काही विकास प्रकल्पही सुरू झालेत...
ओझरखोलातही, सहज उतरून थांबलं, की काहीतरी वेगळं सुरू झाल्याचा ‘वास’ येतो... मग वाटेवरच भेटणार्‍या कुणाशीही गप्पा मारतामारता त्या वेगळेपणाची ओळख होते, आणि हे आगळेपण बघितल्याशिवाय पुढे जायचं नाही, असं आपण आपोआपच ठरवूनही टाकतो.
अलीकडे गावागावांतल्या महिलांना स्वयंपूर्णतेचा आणि स्वयंसहाय्याचा एक नवा मंत्र मिळालाय. बचत गटांमुळे, महिलांचा आत्मविश्वासही वाढलाय. बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येऊन पापड, लोणची, शेवया असे पदार्थ बनवून त्यांची विक्री करणे, या नेहेमीच्या रुळलेल्या वाटेवरून चालण्यापेक्षा, काहीतरी वेगळं करावं, आणि आपल्या अंगीच्या कर्तृत्वालाही वाव द्यावा असं ओझरखोलातल्या महिला बचत गटानं ठरवलं, आणि खाडीकिनारीच्या या गावात एक नवी वाट रुळली... लौकिकार्थाच्या शिक्षणातूनच उत्कर्ष साधता येतो, या समजुतीमुळे घराबाहेर पडण्यासाठी बुजणार्‍या महिलांनी एक वेगळाच उद्योग सुरू केला, आणि ओझरखोलातल्या घरांना भक्कम आर्थिक आधार मिळाला... जिद्द, मेहनत व कल्पकतेच्या आधारे इथल्या महिला आता आपली नवी ओळख करुन देत आहेत. आजवर केवळ कौटुंबिक, धार्मिक कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार्‍या या महिला बचतगटाच्या माध्यमातून संघटित झाल्या आहेत, आणि त्यांच्या ‘काथ्या’ उद्योगाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जवळपास सात वर्षापूर्वी ओझरखोलच्या महालक्ष्मी महिला बचत गटाची स्थापना झाली, आणि जिल्हा उद्योग केंद्राकडून माहिती घेऊन या महिलांनी काथ्या उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. मग काही महिलांनी काथ्या उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. उद्योगासाठी अडीचतीन लाख रुपयांचे भांडवल आवश्यक होते. संगमेश्वरच्या बँक ऑफ इंडियाकडून दीड लाखाचे कर्ज व एक लाखाचे शासकीय अनुदान मिळवून ‘महालक्ष्मी’ने भांडवलाची उभारणी केली. महिलांच्या या आगळ्या धाडसाला दाद देण्यासाठी आणि, कौतुकापोटी, ओझरखोल ग्रामपंचायतीने वर्कशॉपची इमारत बांधून दिली, आणि कर्नाटकातील बंगळूरमधून काथ्या उद्योगासाठी लागणारी मशिनरी आणली गेली. ओझरखोलच्या आसपास काथ्या बनविण्यासाठी नारळाची सोडणे मुबलक प्रमाणात मिळतात. या नारळाच्या सोडणांपासून प्रथम काथ्या बनविला जातो. या काथ्यापासून सुंभ, पायपुसणी तयार केली जातात. या मालाला स्थानिक बाजारपेठेत चांगलीच मागणी आहे. तालुक्याच्या बाजारपेठेत ओझरखोलच्या महालक्ष्मी बचतगटाची पायपुसणी, सुंभ आणि ‘रश्शी’ येते, तेव्हा गिहाईकेदेखील, आवर्जून त्यांचीच खरेदी करतात. रत्नागिरीच्या बाजारातही, ओझरखोलची ही उत्पादने ‘फेमस’ झाली आहेत.
नारळाला ‘कल्पवृक्ष’ मानतात, हे कोकणी माणसाला पूर्वीपासून माहीत आहे. म्हणूनच, माजघर पडवीचं एखादं टुमदार दुपाखी चिरेबंदी घर बांधलं, की आंगणाच्या बाजूला, बेड्याशेजारी दोहोबाजूंना नारळाची रोपे लावली जातात... ‘परड्या’त आणखी जागा असली, तर दोनचार ‘कलमं’देखील लावली जातात, आणि ‘फळं’ येईपर्यंत कोकणातल्या त्या घरातला प्रत्येकजण झाडांची काळजी घेतो... केरळ, तामीळनाडूसारखा नारळाच्या बहुविध उपयोगांचा आजवर कोकणी माणसाने फारसा विचार केला नव्हता. आता मात्र, ‘मुंबैची मनिऒर्डर’ हेच आजवरचा जगण्याचे मुख्य साधन असल्याची मानसिकता कोकणातून पुसली जातेय. आता, मुंबईत शिकायला जाणाया मुलाबाळांना गावातून पैसे पाठवले जातायत... कोकण बदलतेय...
मेहनतीची किंमत कोकणाला उमगली आहे. म्हणूनच, केरळ, तामिळनाडूतला काथ्या उद्योगाने इथे मूळ धरले आहे... हा उद्योग नावारुपाला आणायचा, ही ओझरखोलच्या ‘महालक्ष्मी’ची जिद्द आहे.
-------------------------------------------------------

Sunday, May 9, 2010

'चटकदार' कोल्हापुरी चहा...

कोल्हापूर आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे नाते अतूट आहे. महाराजांनी त्या काळात कोल्हापूरच्या डोंगराळ भागात चहा, कॉफी, कोरुड, रेशीम किड्याचेही प्रयोग करुन पाहिले होते, असे म्हणतात..
महाराजांच्या याच जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यातील हुंबवली गावच्या सह्याद्रीच्या पठारावर श्री. टेकवडे नावाच्या एका प्रयोगशील शेतकर्‍याने ४० एकर जमिनीवर चहाचा मळा फुलविला आहे. महाराष्ट्रात चहा होऊ शकत नाही असा टी बोर्डाचा दावा होता. इथे तर चहाचा हिरवागार चहा मळा फुलला आहे, आणि उत्तरेकडील आसाम, दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडूची चहामधील मक्तेदारी टेकवडेंनी मोडून काढली आहे. श्री. टेकवडे यांनी २००२ मध्ये चहाची लागवड केली आणि आंतरपिके म्हणून ऑस्ट्रेलियन बोन्मामिन या झाडाची लागवड करुन भरघोस उत्पादन घेतले आहे.
कष्ट आणि शेतकर्‍यांची इच्छाशक्ती असेल, तर चहाची मक्तेदारी आपण महाराष्ट्रात मोडून काढू शकतो, असे टेकवडे म्हणतात. कोल्हापूर परिसरात पाण्याचा निचरा होणारी डोंगराळ जमीन भरपूर आहे. अशा ठिकाणी हा चहाचा प्रयोग करण्यासाठी शेतकर्‍यांनी पुढे यायला पाहिजे, असेही त्यांना वाटते.
निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थांनी युक्त, कॅल्शीयमचे प्रमाण कमी पण लोह आणि मॅगेनीज युक्त अशी जमीन असली तर चहाचे उत्पन्न चांगले येते. चहासाठी जमिनीतील जस्ताचे प्रमाणही महत्वाचे आहे. यासाठी मातीपरीक्षण होणे महत्वाचे आहे. झिंक सल्फेटच्या ४.४ किलो प्रती एकरच्या फवारणीमुळे जस्ताची कमतरता कमी करता येते.
जून-जुलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ३० बाय ४५ सें. मी. खड्यात चहाची लागवड केली जाते. १.२ मीटर बाय १.२ मीटर अंतरावर लागवड केल्यास प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रोपांची लागवड करता येते. चहाची लागवड एकदाच करावी लागते. या बागेची आयुमर्यादा साधारणपणे ५० वर्षे आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वारंवार करावा लागत नाही. चहाच्या बागेसाठी सुरुवातीला पहिल्या तीन वर्षासाठी साधारणत: ७३ हजार ८७६ रुपये खर्च येतो. मात्र पहिल्या तीन वर्षात उत्पादन मिळत नाही. चौथ्या वर्षापासून पुढे एकरी ८ हजार ते १६ हजार किलो कच्ची पाने इतके उत्पन्न मिळू शकते. आंतरपीक म्हणून बागेत काळी मिरी, वेलदोडे, काजू, सुपारी अशी पिके तर चहा रोपांना सावली मिळावी म्हणून सिल्व्हर ओक, खैर अशी झाडे लावून उत्पन्न घेता येते.
नवीन काहीतरी करण्याच्या उर्मीपोटी श्री. टेकवडे यांनी हा प्रयोग केला. चहा लागवड त्यांनी यशस्वी करुन दाखवल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना रोजगारही मिळाला आहे. आसपासच्या शेतकर्‍यांनाही ते चहा लागवडीसाठी मार्गदर्शन करीत असतात. आपल्या बागेतच त्यांनी चहा प्रोसेसिंग युनिट उभारले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडी, पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा या तालुक्यातही चहा होऊ शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी या क्षेत्रातही मुसंडी मारुन कोल्हापूरचे नाव चहा उत्पादनातही येईल या दृष्टीने प्रयत्न करावे अशी टेकावडेंची अपेक्षा आहे.
(सौजन्यः महान्यूज)

Thursday, May 6, 2010

'सामन्या'तून 'सामान्यां'कडे...

एक नवा विक्रम होतोय.
कारण, मास्टरब्लास्टर 'ट्विटर'वर आलाय.
काल सचिनने ट्विटिंग सुरू केले, आणि त्याच्या लाखो 'फॅन्स'मध्ये आनंदाच्या लाटा उसळल्या.
त्याच्या फॉलोअर्सचा क्षणाक्षणाला वाढत जाणारा आकडा न्याहाळणे, हेदेखील कालचे मोठ्ठे 'सुख' होते.

संध्याकाळपर्यंतच्या जेमतेम १८ तासांत सचिनच्या चाहत्यांची झुंबड गर्दी ट्विटरवर उसळली होती. रात्री जवळ्पास एक लाखांचा आकडा ओलांडला...
शिवाजी पार्कच्या मैदानावर, तिथल्या मातीत हुंदडून मोठा झालेल्या सचिनच्या चाहत्यांची एक विशाल सभा ट्विटरवर भरली, आणि प्रत्येकाने आपले मन मोकळे करीत सचिनला शुभेच्छा दिल्या.
एवढी मोठी सभा, पण, कसलाही गोंगाट नाही.
खरंच, 'ट्विटर' हा 'सायलेन्स झोन' आहे... तरीही इथे लाखोंची गर्दी होते, आणि सगळे काही सुरळीत, शिस्तीत, आखीवपणे पार पडते.
सुखवणारे!...
वेलकम सचिन... तुझ्या सामान्यांच्यात येण्यामुळे, असंख्यांच्या भावनांना शब्द फुटतील...

Sunday, May 2, 2010

आपलाआपला इतिहास...


महाराष्ट्राचा मंगल कलश आला, त्याला आज ५० वर्षे झाली. महाराष्ट्र ५० वर्षांचा झाला... व्यक्तीच्या आयुष्यात, ५० वर्षांचा काळ लोटला, की त्याच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा घ्यायची योग्य वेळ आली, असे समजतात. पन्नाशी उलटली, की आपण कुठे होतो, कुठे आलो, आणि कुठे पोहोचायचे याचे चिंतन आपोआपच सुरू होते. मागे वळून पाहिले जाते, आणि आपण स्वत:सोबत जोडल्या गेलेल्या भूतकाळाचे पदर उलगडू लागतो... ह्या आठवणीची साठवण, हा आपला ‘इतिहास’ असतो...
... प्रत्येकाच्याच वाटणीला त्याचात्याचा इतिहास आलेला असतो... एखाद्याच्या इतिहासाची पाने ‘सुवर्णाक्षरां’नी लिहिलेली असतात, तर काहीच्या पानांवर नुसतेच, ‘पांढ-यावर काळे’ झालेले असते... ती पाने उलगडताना कुणाला समाधान, आनंद मिळतो, तर कुणी खंतावून जातो... पण आपण कुठे होतो आणि कुठे आहोत, याचे भान मात्र हीच पाने देत असतात...
... महाराष्ट्र आज ५० वर्षांचा झाला... काही दशकांपूर्वी राजा बढे यांनी लिहिलेल्या ‘महाराष्ट्र गीता’चे सूर आज राज्याच्या प्रत्येक कोप-यात घुमताहेत...
‘गर्जा महाराष्ट्र माझा...’ अनेक वृत्तपत्रांचे मथळेही याच शब्दांनी सजले...
हुतात्मा चौकात, स्वातंत्र्यसैनिकांनी ‘मातीच्या घागरी’तून राज्यभरातील नद्यांचे ‘एकपणाचे पाणी’ आणून ते हुतात्म्यांच्या स्मृतीचरणी वाहिले...
राज्याच्या प्रगतीचे पोवाडे गाणा-या सरकारी जाहिरातींनी प्रसारमाध्यमांचा ‘सुवर्णदिन’ साजरा झाला... कधीकाळी गिरण्यांच्या भोंग्यांनी जागा होणारा गिरणी कामगार, सवयीप्रमाणे सकाळी उठला, आणि घरासाठी, वारसांच्या नोक-य़ाच्या लढ्यासाठी बाहेर पडण्याऐवजी, ‘कामगार दिन’ साजरा करण्यासाठी घराबाहेर पडला...
स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन असला, की ‘तिरंगे’ विकून चार पैशांची कमाई होते... आज ‘महाराष्ट्र दिनी’ झेंडे विकून पैसे मिळतील की नाही हे माहित नसल्याने, रस्त्यावरच्या पोरांनी सिग्नलवर नुसतीच भीक मागायला सुरुवात केली... पण, सुट्टी असल्यामुळे, बरेचसे सिग्नलही नुसतेच लुकलुकत होते... ‘रोजच्यासारखी’ कमाई झालीच नाही. फूटपाथवरच कुठेकुठे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘सत्यनारायणाच्या महापूजा’ साज-या झाल्या...
मराठी माणसानं आपापल्या घरातल्या ‘म्युझिक सिस्टीम’वर महाराष्ट्राचे पोवाडे वाजवले, आणि ‘सुवर्ण-महाराष्ट्रा’चा ‘लेझर-शो’ पाहाण्यासाठी उतावीळ होऊन संध्याकाळ्ची वाट पाहात घरी थांबला...
दुपारी घराघरातल्या टीव्हीवर, मराठी चित्रपटांचा आनंद अनेकांनी लुटला, तर काहींनी मराठी वर्तमानपत्रांच्या ‘महाराष्ट्रदिन विशेष’ पुरवण्या वाचून काढल्या... काहीनी, आवडलेल्या मजकूराची कात्रणे काढून, वहीत नीट चिकटवून ठेवली...
पुढेमागे, आपापल्या मुलांना, नातवंडांना महराष्ट्राचा इतिहास सांगताना, ‘रेफरन्स’ म्हणून उपयोगी पडतील, ह्या ‘दूरदृष्टी’ने !
... आज महाराष्ट्र ५० वर्षांचा झाला. राज्याच्या इतिहासाची ५० पाने आज सगळीकडे वाचली गेली...

ही पाने ‘सोनेरी’ आहेत, असं म्हणतात. १९६० पासून आजपर्यंत, महाराष्ट्रानं फक्त ‘सुवर्णकाळ’च पाहिला, असं आजच्या ‘सेलिब्रेशन’ वरून वाटतंय...
खरं म्हणजे, राज्याचा आयुष्यात ५० वर्षांचा काळ म्हणजे काही, ‘इतिहास’ ठरावा इतका जुना काळ नाही...गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्रानं, अनेक चढ-उतारही पाहिलेत... असंख्य संकटे झेललीत... असंख्य डोळ्यांचे अश्रू अजूनही खळलेले नाहीत... काही संकटे निसर्गाने लादली, तर काहीना आपणच निमंत्रण दिले...
महाराष्ट्रावर बॊम्बस्फोटाच्या जखमा आहेत, गिरणी संपात उध्वस्त झालेल्या लालबाग-परळच्या कुटुंबाच्या वाताहातीच्या कहाण्या आहेत, मराठी-अमराठी वादातून भडकलेल्या हिंसाचाराच्या खुणा आहेत, दलित-सवर्ण संघर्षातून उमटलेल्या वेदना आहेत...
आणि कर्जबाजारीपणामुळे आत्मह्त्या करणा-या शेतक-यांच्या घरातले अश्रू आहेत...
भूकंपानं झालेली हानी अजूनही भरून न निघाल्यानं बेघर जिणं जगणा-या कुटुंबाचे भेदक वास्तव आहे, तर जातीय दंगलीत होरपळलेल्यांचं भेदरलेलं अस्तित्व आहे... नोक-यांच्या कॊलकडे वर्षानुवर्षे लागून राहिलेले लाखो डोळेदेखील महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचं कौतुक न्याहाळतायत...
चहूबाजूनी घुमणा-या पोवाडे-तुता-यांच्या निनादात, आणि सुवर्ण-सोहळ्याच्या धामधुमीत, ह्या वेदना-व्यथांची अक्षरे अदृश्य झाली आहेत.
विजेअभावी ग्रामीण महाराष्ट्रात अंधार दाटून राहिला आहे, आणि शेताला पाणी नसल्याने पिके कोरडी पडली आहेत...
शिवाजी महाराज, द्न्यानेश्वर-तुकाराम, शाहू-फुले-आंबेडकरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाची पाने सोनेरी झाली आहेत... त्या चमकदार इतिहासामुळे, गेल्या ५० वर्षाच्या वाटचालीचे- ‘पांढ-यावरचे काळे’देखील झाकोळले, हे महाराष्ट्राचे सुदैव आहे...
... तरीही, ह्या संकटांच्या सावटातही, आपणच देशात सर्व आघाड्यांवर आघाडीवर आहोत...
कारण, बाकी सगळीकडे ह्यापेक्षाही मोठा ‘आनंदीआनंद’ भरून व्यापला आहे.
म्हणून महाराष्ट्राचं कौतुक केलंच पाहिजे.
महाराष्ट्राच्या मातीत दम आहे म्हणतात, ते उगीच नाही!!