Wednesday, March 31, 2010

दरवळ !...

... कॉम्प्युटरमधला `ई-मेल'चा `इनबॉक्स' भरून वाहू लागला, की, नको असलेले काही ई-मेल `डिलीट' करून टाकावे लागतात. मग ते पुरते पुसले जातात. पुन्हा उघडू म्हटलं, तरी सापडत नाहीत. कालांतराने, मेलबॉक्स पुन्हा वाहू लागतो, आणि पुन्हा तेच करावं लागतं... नको असलेले मेल पुसून टाकणं ! जेव्हढं हवं, तेव्हढंच मेमरीमध्ये ‘सेव्ह’ करून ठेवायची सोय कॉम्प्युटरमध्ये करताना, माणसाचा मेंदूच विज्ञानाच्या डोळ्यासमोर असावा...
पण मेंदूची बातच अलग असते...
तिथल्या ‘आठवणींच्या कप्प्या’तली, कुठलीच गोष्ट ‘डिलीट’ होत नाही, आणि पुसलीही जात नाही... कितीही नव्या आठवणींची भर या ‘इनबॉक्स’मध्ये केली, तरी तो ’ओव्हरफ्लो’ होत नाही...
पण, आठवणीच्या त्या कप्प्यात, आपल्या नकळत ‘सेव्ह’ होऊन राहिलेलं, काहीतरी, कुठल्यातरी निमित्तानं असं एक्दम चमकून बाहेर येतं, आणि आपणच चमकून जातो...
`नॉस्टाल्जिया'!...
आठवणीतून पार पुसली गेलेली ती गोष्ट त्या कप्प्यात अजूनही जागी आहे, ही जाणीवच मग मन सुखावून टाकते...
नुसती जागी असते नव्हे, ती तितकीच ताजीतवानीही असते... पुन्हा ती समोर आली, की मगच हे लक्षात येतं...
... आणि, नकळत, सहजपणे आपण आठवणींमध्ये रमून जातो.
भूतकाळातलं, ते पुसलंपुसलं वाटणारं इतकं ताजंताजं असतं, की आपलं आपणच थक्क व्हावं...
मग त्याला जोडले गेलेले आठवणींचे बाकीचे पदरही हळूच उलगडत जातात...
... काळाचा पडदा आपोआपच बाजूला होत जातो.
आणि वर्तमानच विसरायला होतं!
... लहानपणी एखाद्या गावात आपण राहिलेलो असतो, मोठेपणी, खूप वर्षांनी कधीतरी तिथे जायचा योग येतो. तेव्हा मनाची मोहोरलेली अवस्था अनुभवली नाही, असा कुणी असेल?
तिथल्या गल्लीबोळांतून फिरताना, लहानपण पुन्हा जागं होतं.. एखाद्या गल्लीतला एखादा दगडही आपल्याशी ओळखीच्या खाणाखुणा जाग्या करतो... अगदी, रस्त्यावरून चालताना, तेव्हा, आपल्या लहानपणी असलेल्या एखाद्या खड्ड्याच्या त्या जागेवरून आजही, आपला पाय सहजपणे उचलला जातो, आणि आपण चमकून खाली पाहातो...
खरंच, तो खड्डादेखील तिथेच असतो... आपल्याशी नजरानजर होताच तोही ओळखीचं हसतो.
... आणि आपल्याला जाणवतं, अरे, हे आपल्या आठवणीत होत?... तितकंच ताजं?...
---- ---- -----
... आज मला पुन्हा हे सगळं लख्खपणे अनुभवायला मिळालं.
तुम्हालाही तो अनुभव यावा, म्हणून ते लगेच लिहायला घेतलं
... लहानपणी बाजारपेठा आजच्यासारख्या देशी-विदेशी `व्हरायटीज'नी अशा खचाखच भरलेल्या नसायच्या... अगदी काडेपेटीसुध्दा, फक्त ‘विमको’चीच असायची.
आणि, सिग्रेट, पिवळा हत्ती, चारमिनार...
... गावातल्या शाळेत एसएससी झालं, की, कॉलेजसाठी शहर गाठावं लागायचं.. तेव्हाची ती पत्र्याची ‘ट्रंक’... आज नसेल, पण अजूनही लख्ख आठवते ना?...
त्या ट्रंकेतल्या एका ‘अपरिहार्य’ वस्तूनंच आज मला ‘नॉस्टाल्जिक’ केलं...
आजचा पेपर चाळताना, डाव्या पानावर एका कोपर्‍यातल्या एका चौकटीकडे माझं लक्ष गेलं...
‘मीना खाकी फेस पावडर’चे संस्थापक, मोरेश्वरकाका पोतदार यांच्या निधनाची जाहिरात होती...
आणि खाकी पावडरचा तो ‘पुडा’ एकदम मेंदूतल्या आठवणींच्या कप्प्यातून बाहेर आला...
तितकाच ताजातवाना...
नाकात तो वासही क्षणभर दरवळून गेला... तितकाच फ्रेश ! त्या पुड्यातली चिमूटभर पावडर तळव्यावर घेऊन दोन्ही तळवे एकमेकांवर घासताना जाणवणारा तो थोडासा खरखरीतपणाही पुन्हा जाणवला.
...आणि, मी नकळत दोन्ही तळवे चेहेर्‍यावर घासले... खराखरा...
एक क्षणभर एकदम ‘फ्रेश’ वाटून गेले...
कप्प्यातल्या कोपर्‍यातल्या, त्या पुसल्यापुसल्या वाटणार्‍या, पण टवटवीत, ताज्याताज्या असलेल्या आठवणीसारखेच!
काका पोतदार नावाचा कुणी ती खाकी पावडर तयार करायचे, ते आज समजले...
आणि तिचा दरवळ पुन्हा घुमला...
----------------

Wednesday, March 10, 2010

सूर्याची सावली...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित प्रचारक, धुरंधर राजकारणी आणि ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी चित्रकूट येथे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या या महान आणि दुर्मिळ जीवनव्रतीचा कौटुंबिक जिव्हाळ्यातून उतरलेला एक सुंदर लेख 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झालाय. तो हा लेख :

सूर्याची सावली
गाढ झोपेत असतानाच अचानक फोन वाजला, आणि झोप चाळवली. इतक्या पहाटे किंवा रात्रीबेरात्री वाजणारे फोन घेणं अलीकडे मी टाळतो. पण त्या दिवशी फोन वाजताच मला जाग आली, आणि मी फोन कानाला लावला.
पलीकडे मुंबईहून माझा भाऊ होता...
'रमेश, नानाजी गेले'... एवढे तीनच शब्द तो बोलला, आणि दोन्ही बाजूंचं बोलणं जणू खुंटून गेलं. माझी झोप उडाली होती.
'काय?'... मी कसाबसा प्रश्न केला.
'आत्ता, तासाभरापूर्वी... मी आत्ताच चित्रकूटला फोनवर बोललो.' पलीकडून भाऊ म्हणाला, आणि फोन बंद झाला.
बरोब्बर पाच वर्षांपूर्वी, २००४ च्या जानेवारीत भारतात आलो असताना चित्रकूटला गेलो होतो. अमेरिकेत गेल्यापासून नानाजींशी फोनवर खूपदा बोलणं व्हायचं. त्यांचा स्वर, पूर्वीइतकाच टवटवीत वाटायचा... पण त्या प्रत्यक्ष भेटीत नानाजी थोडे थकलेले वाटले. त्याच्या आदल्या वर्षीही मुंबईला आल्यावर मी नानाजींच्या भेटीसाठी चित्रकूट गाठले होते. तेव्हा वयाच्या ८८ व्या वर्षीही ते उत्साही होते. चित्रकूटच्या आसपासच्या खेड्यांमध्ये सुरू असलेलं काम पाहायला मी निघालो, तेव्हा नानाजी दरवाजात उभे होते. वर उन्ह तळपत होतं. मी जीपमध्ये बसलो, आणि नानाजी अचानक म्हणाले, 'थांब, मीपण येतो तुझ्याबरोबर'...
मी काही म्हणेपर्यंत नानाजी गाडीतही बसले होते. चित्रकूटपासून २० किलोमीटरवरच्या एका गावातला प्रकल्प पाहताना नानाजींच्या डोळ्यातलं समाधान मला जाणवत होतं... पण त्याच्याच पुढच्या वर्षीच्या त्या भेटीत, नानाजींचं ८९ वर्षांचं शरीर फारशी साथ देत नसावं, असं मला उगीचच वाटून गेलं.
'नानाजी, तुम्ही थकलात'... मी अस्वस्थपणे बोलून गेलो.
गेल्या ३५ वर्षांतल्या थेट आणि अप्रत्यक्ष सहवासातली सगळी माया आपल्या संथ डोळ्यांनी पुन्हा माझ्यावर उधळली, आणि ते फक्त हसले.
'रमेश, आणखी पाच वर्षं मला काही होणार नाही... अजून दोन प्रकल्प पूर्ण व्हायचेत'... बसल्या जागेवरूनच दूरवर कुठेतरी पाहत नानाजी म्हणाले.
... आज नानाजी गेल्याच बातमी कळली, आणि मला नानाजींचं ते वाक्य स्पष्ट आठवलं.
मी सहज तारखेचा हिशेब केला. ...त्या संवादाला पाच वर्षं पूर्ण झाली होती.
...१९७७ सालच्या सत्तापरिवर्तनाच्या काळात अनपेक्षितपणे माझा नानाजींच्या विश्वात प्रवेश झाला. संगमनेरच्या कॉलेजातून बाहेर पडल्यानंतर मुंबईत दाखल होऊन इंडियन एक्स्प्रेसमध्ये रिपोर्टर म्हणून मी नोकरीला लागलो होतो. एका रात्रपाळीनंतर तिथल्याच टेबलावर झोपलो असताना कानाशेजारचा फोन वाजला, आणि बातमीदाराच्या 'पहिल्या व्रता'ची जाणीव होऊन मी तो उचलला.
'कोई रिपोर्टर है उधर?'... पलीकडून विचारलं गेलं.
मी त्रासलो होतो. पण उत्तर दिलं.
'हां, मै रिपोर्टर हूँ... आप कौन?'...
'मै रामनाथ गोयंका बोल रहा हूँ... उपर आओ. नानाजी देशमुख यहाँपर आये हुए है, उनका इंटरव्ह्यू करो'...
इंडियन एक्स्प्रेसच्या प्रत्यक्ष मालकाचाच आदेश ! पाचदहा मिनिटांतच मी तयार होऊन एक्स्प्रेस टॉवरच्या पेंट हाऊसमध्ये दाखल झालो.
आजपर्यंत केवळ बातमीत वाचलेले, फोटोत पाहिलेले नानाजी समोर बसलेले होते.
पुढच्या काही मिनिटांतच माझा नवखेपणा संपला. मुलाखत झाली, आणि दुसऱ्या दिवशीच्या इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्तामध्ये ती प्रसिद्ध झाली.
मी घरी अंक चाळले, तेव्हा उगीचच धडधड वाढली होती.
संध्याकाळी पुन्हा रात्रपाळीला आलो, तेव्हा टेबलावर माझ्यासाठी एक चिठ्ठी होती- 'मुलाखतीबद्दल धन्यवाद, नाना देशमुख'...
नंतर पुन्हा महिनाभरानंतर वीरेन शहा यांचा फोन आला. नानाजी त्यांच्या ऑफिसमध्ये आले होते. मी त्यांना भेटायला नरीमन पॉईंटच्या मुकंद आयर्नच्या ऑफिसमध्ये पोहोचलो.
...आणि एक नवं वळण मला नानाजींच्या जवळ घेऊन गेलं.
त्या दिवशी नानाजींनी मला त्यांच्याबरोबर काम करावं असं सुचवलं, आणि मी गडबडलो.
वीरेन शहांकडे पाहिलं. त्यांचे डोळे कौतुकानं भरले होते...
'अभी सोचो मत... नानाजी अगर मुझे ड्राईव्हर बनाकर ले जाते, तो भी मै तैयार हूं'... वीरेन शहा म्हणाले, आणि माझी तयारी झाली.
दुसऱ्याच दिवशी मी दिल्लीत, 'दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या भव्य इमारतीत सहाव्या मजल्यावर नानाजींच्या खोलीत भारतीय बैठकीवर त्यांच्यासोबत कामाची आखणी करत होतो.
त्या भेटीत नानाजी मला नीट उमगले. एक कौटुंबिक स्नेहाचा धागा तिथे सापडला, आणि आपण एका 'सूर्याच्या सावली'खाली आलो आहोत, या जाणिवेनं मला धन्य धन्य झालं... मी गोंडा जिल्ह्यातील नानाजींच्या प्रकल्पावर दाखल झालो. माझ्यासारखे आणखीही काही पदवीधर या प्रकल्पावर झोकून देऊन काम करत होते. प्रत्येकाला १५ लहान खेडी वाटून दिली होती. गांधीजींच्या स्वप्नातला स्वयंपूर्ण भारत निर्माण करण्याचा पहिला प्रयोग या खेड्यांमधून सुरू होणार होता.
नंतरच्या दिवसांत नानाजींची असंख्य रूपं मला फार जवळून पाहायला मिळाली.
चौधरी चरणसिंहांना सुनावणारे नानाजी, संस्थेच्या कामातले अडथळे केवळ एका फोनवर सहज दूर करणारे नानाजी, जेआरडी टाटांना आपल्या रचनात्मक कामाचं महत्त्व पटवून देणारे नानाजी, सत्तेतल्या भल्याभल्यांना खडे बोल सुनावून कापरं भरवणारे नानाजी, जयप्रकाशजींची सेवा करणारे नानाजी, राजकारणातले चाणक्य नानाजी, पोलादी पुरुष नानाजी, इंदिरा गांधींच्या नजरेतले खतरनाक नानाजी, संध्याकाळी प्रकल्पावरच्या एखाद्या गावातल्या शेतकऱ्याच्या घरात घोंगडीवर बसून स्नेहानं त्यांच्याशी गप्पा मारणारे नानाजी, आणि रात्री आपल्या खोलीत परतल्यावर जमिनीवरच्या लहानशा गादीवर पहुडताच निरागसतेने झोपी जाणारे नानाजी...
...एकदा नानाजी काही कामानिमित्त आठदहा दिवस बाहेर जाणार होते. त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मला बोलावलं.
'रमेश, एक महत्त्वाचं काम आहे. हे पत्र तातडीने रामनरेश यादवांना मिळायला हवं. तू स्वत: ते त्यांना नेऊन दे'... पत्राची घडी पाकिटात बंद करून ते माझ्या हातात देऊन नानाजींनी सांगितलं, आणि मी मान हलवली. दुसऱ्या दिवशी पहाटेच नानाजी प्रवासाला निघाले होते.
मी उठलो, आणि लखनऊला जाण्यासाठी रेल्वे तिकीट किंवा विमानाचं बुकिंग मिळतं का याची चौकशी सुरू केली. पण त्या दिवशी रेल्वेचं पहिल्या वर्गाचं तिकीट मिळालंच नाही. विमानाचं तिकीटही मिळालं नाही.
तो दिवस तसाच गेला. नानाजींनी दिलेलं ते पत्र खिशात व्यवस्थित आहे ना, हे मात्र मी वारंवार पाहत होतो. महत्त्वाचं पत्र आहे, असं त्यांनीच सांगितलं होतं.
दोन दिवसांनंतरचं रेल्वेचं पहिल्या वर्गाचं तिकीट मिळालं, आणि मी लखनऊला गेलो. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री रामनरेश यादव भेटलेच नाहीत. ते त्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाहेर कुठे होते.
मी पत्र तसंच सांभाळत परतलो.
नानाजींनी परत आल्यानंतर पहिला प्रश्न मला त्या पत्राविषयीच केला, आणि मी जसं घडलं, तसं सांगून टाकलं.
तेव्हाही आपल्या संथ नजरेनं, आणि संयत स्वरांत नानाजींनी मला कामाचं महत्त्व पटवून दिलं होतं.
'आपल्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडताना, पहिल्या वर्गाचा रेल्वे प्रवास किंवा विमानप्रवासाचा विचार करण्याऐवजी रेल्वेत उभ्याने प्रवास करून तू पोहोचला असतास, तर मला बरं वाटलं असतं.' एवढंच ते म्हणाले.
आणि तो प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला.
नानाजींच्या चित्रकूट प्रकल्पाची तेव्हा नुकतीच उभारणी सुरू होती.
पाच वर्षांपूर्वी मी तिथे गेलो, तेव्हा साहजिकच माझी नजर विस्फारली होती.
सकाळी चित्रकूटच्या रेल्वेस्थानकावर उतरलो. नानाजी नाश्त्याला माझी वाट पाहत थांबलेच होते.
जुन्या मंदिरालगतच्या एका जुन्याच घरात नानाजींचं कार्यालय आणि घर वसलं होतं. पाठीमागे मंदाकिनी नदीचा घाट आणि समोर गर्द पर्वतरांगा... आसपास मैलोन्मैल पसरलेला चित्रकूटचा हिरवागार चमत्कार... नानाजींच्या कर्तृत्वातून हे नंदनवन उभं राहिलं होतं. वास्तुकलेचा अप्रतिम नमुना ठरलेल्या देखण्या इमारती, हिरवाईनं तरारलेले बगीचे, संथ, आश्वस्त तलाव, कारंजी... नानाजींच्या कल्पकतेतून उभ्या राहिलेल्या या नंदनवनात नानाजींचं नाव, फोटो किंवा पुतळा कुठेही नव्हता...
एका बाजूला सुसज्ज असं आयुर्वेदिक आरोग्यधाम, दुसरीकडे विशाल भूभागावर उभं राहिलेलं उद्यमीता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाला, गुरुकुल, दंतचिकित्सा इस्पितळ, ग्रंथालय, मातृसदन, गोशाळा आणि आधुनिक शेतीचे असंख्य प्रयोग अनुभवणारी शेकडो एकर शेतजमीन, उद्याने, नौकाविहार आणि चित्रकुटाचा उद्धार करणाऱ्या प्रभू रामचंद्रांचं जीवनमूल्यदर्शन घडविणारं राम दर्शन...
शेकडो एकर जमिनीवरची ही निर्मिती सामान्य माणसाच्या जीवनाला स्पर्श करणारी आहे. दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानववाद आणि महात्मा गांधींचं अंत्योदयाचं स्वप्न इथे हातात हात घालून एकत्र नांदतं आहे.
३५ वर्षांपूर्वी नानाजींच्या डोळ्यात दिसणारं स्वप्न इथे अवतरलेलं मी अनुभवत होतो...
त्यांच्या अथक आत्मविश्वासातून एक दिव्य काम उभं राहिलं होतं, आणि त्याचा साक्षीदार व्हायचं भाग्य मला मिळालं होतं.
... माझं लग्न ठरलं, तेव्हा नानाजींनी पालकत्वाची जबाबदारी घेतली. निमंत्रणपत्तिकेवर 'आरएसव्हीपी' म्हणून नानाजींनी स्वत:चं नाव घातलं होतं, आणि माझ्या वडिलांच्या बरोबरीने लग्नाला येणाऱ्यांचं ते आतिथ्य करत होते...
नानाजींसारखा एक सूर्य माझ्यावर सावली धरून वावरतोय, याचा मला गेली ३५ वर्षं अभिमान वाटत राहिला..
परवा ती सावली संपली.

-रमेश गुणे
लॉस एन्जलिस, कॅलिफोर्निया.

http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/ManthanEdition-MainNews.php?articledate=2010-03-07