Monday, January 25, 2010

‘बोध-कथा’

त्या दिवशी बसमध्ये घडलेल्या मिनिटभराच्या त्या प्रसंगानंतर रोज तिथून वळताना मी सिग्नलच्या खांबाकडे पाहातो.
‘सबसे प्रेम करो’ असा संदेश देणारा फलक हातात ऊंच धरून तो खांबाला टेकून उभा असतो. निर्विकारपणे.
बाजूने वाहात असलेल्या गर्दीशी आपल्याला काहीच देणेघेणे नाही, असे भाव चेहेर्‍यावर सांभाळत.
... त्या दिवशी पुन्हा मी सवयीनं तिथे पाहिलं.
तो तिथे नव्हता. त्याच्या हातात असणारा तो फलक मात्र, खांबाला टेकून व्यवस्थित ठेवलेला होता.
‘कंटाळला असणार’... मी मनाशी म्हटले. तरीदेखील, आजूबाजूला कुठे ‘तो’ दिसतो का, हे शोधत माझी नजर भिरभिरत होतीच.
तासाभरानंतर त्याच रस्त्यावरून परतताना मी पुन्हा तिथे पाहिले. फक्त फलकच तिथे होता.
दुसर्‍या दिवशीही मी पाहिले. फलकच होता...
... मग एकदा सिग्नलला थांबलेलो असताना, ट्रॅफिक पोलिसालाच विचारलं.
खांबाला टेकून असलेल्या फलकाकडे बघून तो हसला.
‘सकाळीच फलक उभा करून गेलाय’... तो म्हणाला.
म्हणजे, ‘सबसे प्रेम करो’ संदेशाचा फलक हातात धरून दिवसभर उभं राहाणं, हे त्याचं रोजगाराचं साधन असावं. मी तर्क केला.
... अलीकडे तो बर्‍याचदा ‘दांड्या’ मारतोय.
‘सबसे प्रेम करो’ संदेशाचा तो फलकही, एकाकी पडलाय.
पण, रस्त्यावरून वाहणार्‍या गर्दीला, त्या फलकाचंही कुतूहल असतं.
`आलिशान' गर्दीने वाहणार्‍या त्या रस्त्यावर जाहिरातींची स्पर्धा करणार्‍या आसपासच्या झगमगाटी होर्डिंग्जच्या गर्दीतही, खांबाला टेकून डिव्हायडरवर एकाकी पडलेल्या त्या फलकाकडे अजूनही सगळेच जण कुतुहलाने पाहातात...
‘अपने धर्म पर चलो... सबसे प्रेम करो’... तो मूक फलक बहुधा नंतर प्रत्येकाच्या मनात रुतून बसत असावा...
माझ्या मनात तरी त्यानं ‘घर’ केलंय.
म्हणूनच, कुठे प्रेमाचा ‘साक्षात्कार’ जाणवला, की माझी पावलं मंदावतात.
.... आणि, एक नवी ‘बोध-कथा’ मनात रुजते...
-------------- ----------- ------------
त्या दिवशी ऒफिसला निघण्यासाठी घरातून उतरलो.
दुपारची वेळ होती.
दोनतीन बिल्डिंग सोडून पलिकडच्या बिल्डिंगचा वॉचमन त्याच्या केबिनमधून बाहेर आला. त्याच्या हातात जेवणाचा छोटासा डबा होता.
रस्त्यावर इकडेतिकडे पाहातच, एखाद्या कुत्र्याला बोलावण्यासाठी त्यानं तोंडानं चुकचुक केलं... आणि पलीकडच्या बाजूला झाडाखाली मलूल वेटोळं करून बसलेलं एक कुत्रं शेपूट हलवतच उठलं. एकदा अंग ताणून त्यानं निवांत आळस दिला, आणि शेपूट हलवत ते वॉचमनच्या समोर येउन उभं राहिलं.
त्या माणसानंही, प्रेमानं त्या कुत्र्याच्या अंगावरून हात फिरवला...
आता ते कुत्रं शेपटाबरोबर अंगदेखील हलवत होतं.
त्या माणसाच्या मायाळूपणाची बहुधा त्याला खात्री पटली असावी.
ते शांतपणे त्याच्या बाजूला उभं होतं.
... सिग्नलजवळच्या खांबाला टेकून ठेवलेला `तो फलक' माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट झाला.
... मग त्या माणसानं हातातल्या डब्यातलं उरलेलं अन्न काढलं... आणि कुत्र्यासमोर ठेवलं.
कुत्रं लाचारपणानं शेपूट हलवतच होतं.
मग त्या माणसानं, त्याच्या अंगावरून हात फिरवतच, काढून ठेवलेल्या अन्नाकडे बोट दाखवलं, आणि आज्ञाधारकपणे ते कुत्रं तिकडे वळलं.
त्या माणसाच्या डोळ्यात प्रेम उमटलं होतं...
त्या कुत्र्यानं एकवार ते काढून ठेवेलेलं अन्न नाकानं हुंगलं, आणि ते पाऊलभर मागे झालं...
पुन्हा त्या माणसानं प्रेमानं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्या अन्नाकडे बोट दाखवलं.
पुन्हा त्या कुत्र्यानं ते हुंगलं, आणि ते मागं वळलं. बहुधा त्याला भूक नसावी.
हा माणूस त्याला बोलावत होता... पण आता ते कुत्रं लांब निघालं होतं.
मी हा प्रसंग पाहातोय, हे त्या माणसाच्या लक्षात आलं होतं.
तो काहीसा ओशाळला...
आणि दुसर्‍याच क्षणाला, बाजूचाच एक दगड घेऊन त्यानं कुत्र्यावर भिरकावला.
रागानं काहीतरी पुटपुटलादेखील...
... त्यानं भिरकावलेला दगड नेमका त्या कुत्र्याला लागला होता...
दुपारच्या त्या सामसूम वेळी, कुत्र्याची किंकाळी आसपास घुमली.
आता त्या माणसानं डब्यातलं आणखी उरलेलं अन्न रस्त्यावर फेकून दिलं, आणि तो आत वळला.
गेटाच्या आतल्या ‘केबिन’मध्ये जाऊन बसला...
... मला तो फलक आठवला.
पण त्याचा अर्थ मात्र समजत नाहीये...
.... क्षणापूर्वी, प्रेमानं त्या कुत्र्याला खाऊ घालणार्‍या त्या माणसाच्या हृदयातला माणूसकीचा, प्रेमाचा ओलावा खरा, की कुत्र्यानं पाठ फिरवताच त्यानं घेतलेलं रूप खरं?
-----------------------------

Sunday, January 24, 2010

कोणता झेंडा घेऊ हाती?....

राजभाषेचा साज असलेला मुकुट डोक्‍यावर लेऊन मंत्रालयासमोर ताटकळणाऱ्या माय मराठीचे गेल्या आठवड्यात चहूदिशांनी धिंडवडे निघाल्याने मराठीचा अवस्था आणखीनच केविलवाणी झाली आहे. शेकडो निरपराधांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी अजमल कसाब न्यायालयात मराठीतून बोलला, याचा अभिमान वाटावा, की महाराष्ट्राच्या राजधानीतदेखील मराठीचे केवळ कामचलाऊ ज्ञान पुरेसे आहे, असा घूमजाव पवित्रा घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांची कीव करावी, अशा दुहेरी संकटात महाराष्ट्राची माय मराठी सापडली आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा देणारे, सरकारी कामकाजात मराठीच्या वापराचे फतवे काढणारे आणि मराठीसाठी प्रमाणित लिपीचा स्वीकार करणारे राज्यसरकार मराठीचा अभिमान बाळगते, की मराठीची लक्तरे आणखीनच उघड्यावर आणते, अशा शंकेचे वादळ सध्या घोंघावते आहे. मराठी राजकारणाच्या कोंडाळ्यात सापडली आहे. वीस वर्षांपूर्वीच्याच कायद्याचे मळकटलेले कागद साफसूफ केल्यास "मराठीचा तारणहार' म्हणून मिरवणारे नवे अवतार निष्प्रभ होतील आणि महाराष्ट्रातील मराठीचा झेंडादेखील आपल्याच हाती राहील असा समज करून घेत राज्याबाहेरून येणाऱ्या अर्धशिक्षितांवर मराठीचा बडगा उचलू पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यानाच त्यांची ताकद कळून चुकली आणि "मराठी भाषा वाकवावी तशी वाकते', हे त्यांनीदेखील दाखवून दिले.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. महत्त्वाचे म्हणजे, या भाषेच्या आधारावरच ज्या राज्याची निर्मिती झाली, त्या महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव सध्या साजरा होत आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत टॅक्‍सी चालविणाऱ्यास मराठीत लिहिता वाचता आणि बोलता आलेच पाहिजे, ही अपेक्षा मंत्रिमंडळाने जाहीरपणे व्यक्त केली, तेव्हा महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचे सार्थक झाले, असे मराठमोळ्या जनतेला वाटून गेले. जेमतेम वीस पंचवीस हजार लोकांनाच या अपेक्षेची पूर्तता करावी लागणार होती. पण, महाराष्ट्रात पंधरा वर्षांचे वास्तव्य असतानादेखील, आपल्याला मराठीचे ज्ञान असावे ही माफक अपेक्षादेखील धुडकावून ज्यांनी आजवर मराठीला वाकविले, त्यांनीच पुन्हा या अपेक्षेचा गळा घोटला.
आता महाराष्ट्रात नेमकी उलटी स्थिती आहे. मुंबईत जायचे असेल, तर हिंदी किंवा इंग्रजीचे कामचलाऊ ज्ञान आवश्‍यक आहे, याची जाणीव महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सामान्य मराठी माणसाला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातला हा मराठमोळा माणूस आपले लहानमोठे काम घेऊन मंत्रालयाच्या दाराशी येतो, तेव्हा एसटीतून उतरल्यावर त्याची पहिली गाठ टॅक्‍सीचालकाशीच पडते आणि आपल्याला कामचलाऊदेखील हिंदी येत नाही, या जाणीवेने तो खंतावतो. मग मुंबईत वावरताना पावलोपावली याच जाणीवेने त्याचा न्यूनगंड वाढत जातो आणि आपण आपल्याच राज्यात आहोत, हेही तो विसरून जातो. मुंबईत काम करून घ्यायचे असेल, तर हिंदीचे कामचलाऊ ज्ञान असणे आवश्‍यक आहे, हे आता ग्रामीण महाराष्ट्राला समजून चुकले आहे. बिगरमराठी भाषकांनी आपले भाषिक वर्चस्व केव्हाच सिद्ध केल्याचा हा परिणाम आहे. मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठीतच असाव्यात, अशी सक्ती करून महापालिकेने आणि शिवसेना-मनसेने मध्यंतरी मोठी मोहीम उघडली, म्हणून जागोजागी मराठी पाट्या दिसू लागल्या. पण त्या पाट्यांमधूनही मराठीची लक्तरेच लोंबताना दिसतात. मराठीचे असे जाहीर धिंडवडे उडत असताना, माणसांची कत्तल करण्यासाठीच परदेशातून आलेल्या अजमल कसाब नावाच्या गुन्हेगाराला मात्र, महाराष्ट्रातील वर्षभराच्या तुरुंगवासातही मराठीची ओळख पटते आणि तोही मराठी बोलतो आणि दुसरीकडे, महाराष्ट्राच्या सर्वोच्च सदनातही मराठी बाणा पांगळा पडतो.
टॅक्‍सीवाल्यांना किमान मराठी आले पाहिजे, असा जुना निर्णय सरकारने केवळ खंबीरपणे पुढे आणला आणि मराठीचा झेंडा फडकतोय असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा मराठीची मान झुकली आहे... मुख्यमंत्र्यांनीच त्यासाठी हातभारदेखील लावला आहे... अशीच स्थिती राहिली, तर भविष्यात महाराष्ट्रासमोर एक प्रश्‍न नक्कीच उभा राहील... "कोणता झेंडा घेऊ हाती?'....

Tuesday, January 12, 2010

इज्जत!

पहिला पाऊस तिरप्या धारा
‘बेभान’लेला आडवा वारा
ओल्या मातीचा धुंद सुगंध,
..... आणि, एक लफ्फेदार सही
सगळ्यातच एक ‘लिज्जत’ असते...

विदेशातले साहित्य संमेलन
अध्यक्षाच्या पदाचा मान
सारस्वतांच्या ‘कवतिका’चं भान
... आणि एक ‘झालर’दार मंडप
ज्येष्ठत्वाला ‘इज्जत’ असते....
------------------

Saturday, January 9, 2010

‘शिक्षणाच्या आयचा ...

‘विठ्या, आरं माजी काठी खंयसर आसा?’... सकाळीसकाळी ‘मॊर्निंग वॊकाक’ निघालेल्या सदुनानानं मुलाला हाळी देत विचारलं आणि विठ्यानं हांतरुणातनंच ‘ऊं’ करत कूस बदलली.
विठ्या म्हन्जे, सदुनानाचं रत्नं... गाव त्याला ‘नानाची अवलाद‘ म्हणायला लागला, तेव्हापास्नं सदुनानाही त्याला ‘विठ्या’ म्हणायला लागला होता. मुलाला येताजाता हाक मारताना तरी तोंडात देवाचं नाव यावं, म्हणून सदुनानानं त्याचं नाव ‘विठ्ठल’ ठेवलं होतं...
तो लहान होता, तेव्हा त्याच्या मागनं पळताना सदुनानाची तारांबळ उडायची...
‘विठ्ठला, असं वागू नुको रे... विठ्ठला, शानपण कवा येनार रे माज्या सोन्या’... अशा काकुळतीच्या सुरात सुरुवातीला तो विठ्ठलाची विनवणी करायचा, पण आपलं चुकतंय, असं त्याला वाटायचं... विठ्ठलाला शानपना शिकवणारे आपण शाळेची पायरी पण चढलो नाही, हे नानाला माहीतच होतं.
‘शाळा शिकून कोन शाना झालाय?’ असा सवाल करून त्यानं आपल्या उमेदीच्या काळात भल्याभल्यांना गपगार केलं होतं.
सदुनानाला त्याच्या बापानं, तात्यानं बखोटीला धरून शाळेत नेऊन बसवलं, तो दिवस आजही सदुनानाला आठवतोय.
‘तात्यानु, सदुचं शिक्षनात ध्यान नाय, तुमी त्येका राजकारनात टाका’.... पहिल्याच दिवशी शाळा डोक्यावर घेणा-या सदुनानाकडे पाहून मास्तरांनी एक दिवस तात्याला सांगितलं होतं. पण आपल्या मुलानं शिकावं आणि मास्तर होऊन आणखी मुलांना ‘शानपन’ शिकवावं, अशी तात्याची इच्छा होती.
एक दिवस सदु शाळेतनं घरी आला, तोच जाम वैतागलेला...
‘शिरा पडली तुज्या तोंडार, काय करून इलास आज साळंत?’ कावलेल्या तात्यान आवाज चढवून विचारलं, पण तो जरासा धसकलेलाच होता...
‘तात्यानु, मी साळंत नाय जाऊचा’... सदु जोरात म्हणाला, आणि तात्याचा पारा चढला...
‘तुज्या मा...’ पुढचे शब्द गिळताना तोंडातली तंबाखूची पिंक तात्याच्या पोटात गेली, आणि तो तिरमिरला.
‘अगे माजी काठी खंय ग्येली?’... माजघराकडं पाहात तात्यानं विचारल, आणि सद्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले...
‘तात्यानु, ह्या शिक्शनाचा शोध कुनी लावलान?’ काप-या आवाजात, चड्डीचं ‘पोष्ट’ घट्ट पकडत धीर करून सद्यानं विचारलंन आनि तात्या चरकला...
‘का रं माज्या सोन्या?’... तात्यानं दुसरा आवंढा गिळत विचारलं. पण पोराच्या मनात काय आहे ते तो बोलला नाही तर आपल्याला कळणार नाही, हे तात्याला माहीत होतं... .
‘त्याचा मी मड्डर करीन’... मुठी आवळत आजूबाजूला पाहात त्वेषानं सदु म्हणाला, आणि तात्या चरकला...
आता पोराचं शिक्षण थांबवलंच पाहिजे, असा निर्णय त्याच क्षणी तात्यानं घेतला...
‘उगीच शाळेच्या धसक्यानं पोरानं काय बरवाईट केलं तर अंगाशी यायला नको... त्येच्यापक्शी पोर घरात, आपल्या नजरेसमोर र्‍हायलेला बरा...’ तात्यानं बायकोची समजूत काढली.
आणि सद्याची शाळा संपली.
‘माजा वाईच ऐका... झिलाक साळंत घाला पुन्ना... काय करूचा नाय तो मड्डरफिड्डर’... तात्याची बायको कधीमधी त्याला म्हणायची... पोरगं घरात र्‍हायला लागल्यापास्नं ती जाम कावली होती.
‘अगे, तां मड्डर नाय करनार... शिक्शनाचा शोद कुनी लावलान, ते मास्तराक पन ठावं नाय.. तो सद्याक कुटं गावनार? पन, माका वाटतां...’
बोलताबोलता तात्या गप्प व्हायचा..
‘काय? काय वाटता?’ धसकून तात्याची बायको विचारायची...
‘माकां वाटतां, शाळंच्या भयानं पोरान काय बरावायट करून घ्येतलान जिवाचं तर?’ तात्या भिंतीकडे पाहात बोलायचा, तेव्हा त्याच्या बायकोला आणखीनच भीती वाटायची...
‘मंग र्‍हवान दे... माजं काय हाल व्हत्याल, ते मी भोगतसा’... ती म्हणायची.
‘तू माजी काठी बगून ठेव’... तात्या दिलाश्याच्या सुरात म्हणायचा, आणि बाहेरून चोरून ऐकणारा सद्या चड्डी सावरत धूम पळायचा. संध्याकाळपर्यंत घरातच यायचा नाही.
संध्याकाळी दिवेलागणीला खाली मान घालून आलेल्या सद्याला बापानं फोकानं सोलून काढायचं, आणि सद्यानं ठोठो बोंबलायचं, हा आता नेम झाला होता...
‘शिरा पडली तुज्या तोंडार... शाळंत जावंक नुको काय... थांब तुजी साल्टीच काढतो’... तात्या किंचाळायचा, आणि पुन्हा बाहेर पळत दोन्ही हात उलटे करून तोंडवर मारत सद्या बोंबलायचा...
‘शिक्षणाच्या आयचा घो"...
संध्याकाळच्या त्या शांत वेळी, आसपासच्या घरात परवचा - पाढे घोकणार्‍य़ा मुलांना सद्याची ती आरोळी ऐकून अडखळायला व्हायचं...
पण हळूहळू सद्या शिक्शणविरोधी चळवळीचा हिरो बनत चालला होता...
त्याच्या पावलावर पाऊल टाकून गावातल्या कितीतरी मुलांनी शाळेला रामराम केला होता...
गावाची एक पिढी टपोरी होत होती, आणि तात्यासारखे कितीतरी बाप म्हातारपणाकडे झुकत चालले होते.
संध्याकाळी पारावर बसून सगळेजण आपापल्या पोरांच्या कागाळ्या करायचे, तेव्हा त्यांच्या कानाशी कुठून तरी आरोळी उठायची...
‘शिक्शणाच्या आयचा घो"
एकमेकांच्या आधारानं उठत ते सगळे निमूटपणे घराकडे चालू पडायचे...
------------- ------------ -----------
आज सकाळी काठी शोधताना सदुनानाला हे सगळे आठवले.
गावात उपद्रव वाढला, म्हणून तात्यानं सदुनानाला मुंबईला धाडलं होतं.
शिक्षणाच्या नावानं ठॊ, मग काय करणार...
सद्यानं इथेही आपले उद्योग सुरु केले...
पंचक्रोशीतलाच एक दोस्त त्याला इथे भेटला, आणि दोघांनी मिळून ‘धंदा’ सुरू केला...
सद्यापद्याचं नाव सगळीकडे झालं...
तेवढ्यात गावातल्याच एकाच्या ओळखीनं सद्याला नोकरी लागली... शिपाई तर शिपाई... पण आता सद्या सभ्य होणार होता...
अशातच एक दिवस त्याला साहेबांनी हेरलं...
‘हा पोरगा कामाचा आहे’... ते म्हणाले, आणि सद्या कुठून कुठे गेला...
सद्या आता बदलला होता...
‘शाळा शिकून कोण शाणा झालाय’, हे स्वत:चंच तत्वद्न्यान त्याला आता तंतोतंत पटलं होतं...
मधून मधून कुणीतरी त्याच्याकडे यायचा...
‘नाना, मुलाला ऎडमिशन मिळवून द्या’... तो काकुळतीला येऊन सांगायचा, अणि सद्या मास्तरांना चिठ्ठी द्यायचा...
सद्याचा एव्हाना सदुनाना झालेला होता...
सदुनानाची चिठ्ठी म्हणताच शाळेचे हेडमास्तर घामाघूम व्हायचे, आणि ऎडमिशन पक्की व्हायची...
सदुनाना आता सामाजिक कार्यकर्ता झाला होता.
साहेबांची त्याच्यावर मर्जी होती... तोही निष्टेने साहेबांची सेवा करत होता...
आपण शिकलो नाही, हे तो विसरला होता... सेवा केली, की शिक्शणाची उणीव भरून निघते, हे त्याला लक्षात आलं होतं...
मग तो स्वत:शीच कधीकधी आतल्या आत ओरडायचा...
‘शिक्षणाच्या आयचा घो’...
पण लगेच बापाच्या काठीचा फटका पाठीवर पडतोय, असं वाटून तो गप व्हायचा...
------ ----------- ------
सद्याचं लग्न झालं, आणि तो सुधारतोय असं तात्याला वाटलं... सद्याला पहिला मुलगा झाला... तात्या आता खूपच थकला होता...
त्यानं सदूला जवळ बोलावलं...
‘मुलाचं नाव काय ठेवतला?’ तात्यानं विचारलं...
‘तात्यानू, तुमीच सांगा’... सदुनाना हळुवारपणे म्हणाला, आणि तात्या सुखावला.
‘विठ्ठल ठेव... द्येवाचा नाव आसा. ता घेवन तरी आपल्याक पुन्य लागतला’... तो आकाशाकडे पाहात बोलला, आणि आयुष्यात पयल्यांदाच सदुनानाचे डोळे पाणावले...
‘तात्यानु, खरा आसा... चला विठ्ठलच ठिवूक सांगतो हिला’... तो म्हणाला.
... विठ्ठल मोठा होत होता, तसतसं सदुनानाला आपलं लहानपण पुन्हा बघतोय असं वाटू लागलं... अशा वेळी तात्या काय करायचा, हे त्याला माहीती होतं.
त्यानं पण घरात चिवारीचा दांडगा फोक आणून ठेवला.
पण विठ्ठल ऐकत नव्हता...
हळूहळू विठ्ठलाचा विठ्या झाला....
एक दिवस सद्याची काठीच घरातून गायब झाली...
संध्याकाळी विठ्या उशिरा घरी आला, तेव्हा त्याच्या हातात काठी होती....
.... आणि त्या काठीवर एक झेंडा होता...
सदुनाना काय ते समजला...
साहेबाचे सेवा केल्यावर आपल्याला सगळं मिळालं होतं...विठ्याच्या हातातल्या काठीला आता दुसरा झेंडा होता... पण तो कुणाच्या तरी सेवेत दाखल झालाय, हे सदुनानाला कळून चुकलं होतं...
तो स्वत:शीच हसला.
‘शिक्षणाच्या आयचा घो’... तो मनातल्या मनात मोठ्यानं ओरडला...
दुस-या दिवशी त्यानं दुसरी काठी आणली होती....
विठ्याच्या झेंड्याची काठी वापस घ्यायची नाही, असं त्यानं ठरवलं होतं.
नवी काठी घेऊन तो आता मॊर्निंग वॊकाक जायला लागला...
विठ्या मोठा होत होता... त्याचंही नाव होत होतं...
रात्री घरी आला, की त्याच्या हातात तो झेंडा दिसायचा, आणि सदुनाना खुश व्हायचा...
आपण अजून काही एव्ह्ढे म्हातारे नाही झालोय.. असं वाटून त्याचं रक्त सळसळायचं..
पण आता साहेब थकले होते... त्यांची सेवा करण्यात अर्त नाही, हे सदुनं ओळखलं होतं...
झेंडा बदलला पाहिजे, असं त्याला वाटत होतं...
त्यानं विठ्यालाच विचारायचं ठरवलं...
‘मोनिंग वॊकाक जावन आल्यार आपल्या काठियेक नवा झेंडा लावूचा’... असा विचार करून सदुनाना काठी शोढत होता...
विठ्या मात्र अजून आराडूर झोपला होता...
सदुनानाचा निर्णय होत नव्हता...
विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ?... झोपलेल्या विठ्याकडे पाहात सदुनाना स्वत:शीच पुटपुटला, आणि काठीदेखील न घेता ‘वॊकाक’ घराबाहेर पडला...
आज बर्‍याच वर्षांनी सदुनानाच्या तोंडात देवाचं नाव आलं होतं...
---------------------------------------
http://72.78.249.125/Sakal/9Jan2010/Normal/PuneCity/page8.htm

Thursday, January 7, 2010

सबसे प्रेम करो’...

‘हात मत लगाना’... पुढच्या बाकावरचा तो माणूस अचानक किंचाळल्यासारखा ओरडला.
काहीसं ओशाळत शेजारच्या माणसानं त्याच्याकडे बघितलं.
‘अरे भैया, मै तो सिर्फ आपको तिकिट लेनेको बोल रहा हू’... तो समजावणीच्या सुरात म्हणाला, आणि शेजारच्या त्या संतापलेल्या माणसानं आणखीनच रागानं त्याच्याकडे बघितलं.
‘मै आगे यहीपें उतर रहा हूं ’... तो गुर्मीत म्हणाला.
‘फिर भी टिकट ले लो, और जहां चाहिये घूम लो’... शेजारचा माणूस समजावणीच्या सुरात सांगत होता, पण आता त्याच्या आवाजात काहीशी जरबही आली होती.
हे काय चाललंय याची एव्हाना आसपासच्या लोकांना कल्पना आली होती.
तो माणूस रागानं नुसता धुसफुसत होता.
पण आता आपल्याला तिकीट काढावंच लागणार, हे त्याला उमजून चुकलं होतं...
तो उठला, आणि मागे जाऊन त्यानं कंडक्टरकडून तिकिट घेतलं.
एव्हाना बस सिग्नलपर्यत येऊन थांबली होती.
झटक्यात तो मागच्याच दरवाजातून उतरला, आणि बसच्या बाजूनेच पुढे येत त्याने रस्ता ओलांडला.
जाताना खिडकीशी बसलेल्या आपल्या बसमधल्या शेजार्‍याकडे एक जळजळीत कटाक्षही त्याने फेकला...
बसमधला तो माणूस स्वत:शीच हसला.
‘अभी ये आदमी सबको प्रेम का संदेश देनेके लिये खडा रहेगा’... तो कुत्सित स्वरात काहीसं मोठ्यानं बोलला, आणि मी चमकलो.
सिग्नल मिळाला आणि गाडी चालू झाली.
वळताना सहज बाहेर लक्ष गेलं.
डिव्हायडरवरच सिग्नलच्या खांबाला टेकून उंचावलेल्या हातात फलक घरून तो उभा होता...

त्याच्या चेहेर्‍यावर एक निरागस, प्रेमळ हसू झळकत होतं.
रस्त्यावरून वाहणार्‍या गर्दीकडे पाहात असतानाही, तो सगळ्यापसून ‘तटस्थ’ वाटत होता.
... गेले अनेक दिवस तो इथे उभा असतो. भर दुपारच्या तळपत्या उन्हातही, उंचावलेल्या हातातला त्याचा फलक कधी खाली आलेला नसतो.
चेहेर्‍यावरचे ते हास्यही कायम असते...
त्याच्या या अजब ‘व्रता’चं मला कुतूहल आणि कौतुकही वाटायचं.
.... आज बसमध्ये शेजार्‍यानं तिकिट काढायला लावलं, म्हणून संतापलेला तो हाच असेल, असं तेव्हा लक्षातच आलं नव्हतं.
लहानमोठ्या कारणांवरून अनेकदा प्रवाशांमध्ये असे प्रसंग झडतात.
काही जण फुकटेगिरीही करतात.
काही अगदी नियमावर बोट ठेवणारेही असतात.
आपण काटेकोर वागतो, दुसयानंही तसं वागलंच पाहिजे, असा अनेकांचा आग्रह असतो.
त्यासाठी प्रसंगी ते हुज्जतही घालतात.
... आपल्या शेजारचा हा प्रवासी तिकिट न घेताच उतरायच्या तयारीत आहे, हे लक्षात आल्यावर या प्रवाशानंही, तेच केलं, आणि त्याला तिकिट घेऊनच उतरायला भाग पाडलं.
... क्षणभराचा हा प्रसंग संपला होता.
तो माणूस तिकिट घेऊन उतरला होता.
आपण एका ‘फुकट्या’ला रोखलं, याचं समाधान बसमधल्या त्या प्रवाशाच्या चेहेर्‍यावर उमटलं होतं.
आजूबाजूच्या प्रवाशांमध्यीही, या ‘विजया’बद्दलचा आदर दिसत होता.
उतरलेला तो माणूसही आपल्या ‘जागे’वर जाऊन उभा होता.
तो तिथं जाऊन उभा राहिला, तेव्हा तो `तोच' आहे, हे माझ्या लक्षात आलं.
त्याच्या चेहेर्‍यावर नेहेमीसारखंच निरागस हास्य उमटलेलं होतं.
आपण एका `दिव्य' कार्यासाठी वाहून घेतलंय, असे काहीसे भाव त्याच्या डोळ्यात दिसत होते...
पण आज त्याच्या उंचावलेल्या हातातल्या फलकावरची अक्षरे आपल्याला बोचतायत, असं मला उगीचच वाटलं.
रस्त्यावरची अवघी गर्दी तो ‘संदेश’ वाचूनच पुढेपुढे सरकत होती.
... बसमधल्या त्या प्रसंगाचे मात्र, काही मोजकेच साक्षीदार होते.
तरीही, मी नेहेमीच्या सवयीनं तो फलक वाचला.
‘अपने धर्म पर चलो... सबसे प्रेम करो’...
-----------------