Sunday, October 25, 2009

नव्या इतिहासाची नांदी?

महाराष्ट्रासमोर असंख्य समस्या आ वासून उभ्या असताना त्या मुद्‌द्‌यांवर प्रचाराची राळ उठविण्याऐवजी राज ठाकरे यांना "टार्गेट' करून विधानसभा निवडणुका जिंकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न बूमरॅंगसारखा उलटल्याने "युती'ची वाताहात झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पहिला ठोसा लगावून शिवसेनेला घायाळ करणाऱ्या "मनसे'चा "दुसरा ठोसा' विधानसभेच्या निवडणुकीत बसल्याने शिवसेना-भाजप युती जायबंदी झाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत आणि मुख्यालय असलेल्या दादर माहीम मतदारसंघावर "मनसे'चा झेंडा फडकावून, "विधानसभेवर भगवा' फडकावण्याच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाला मनसेच्या इंजिनाने धडक दिली आहे. राज्याची सत्ता तर दूरच, पण येत्या काही वर्षांत होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेवरचा "भगवा' तरी शाबूत राहणार की नाही याची चिंता करण्याची वेळ निवडणुकीच्या ताज्या निकालांनी "युती'वर आणली आहे. दादर-माहीममधून " सुसाट सुटलेले' मनसेचे इंजिन आता महापालिका मुख्यालयाकडे वळणार आणि युतीच्या या सत्तास्थानास धडक देणार, हे स्वच्छ भविष्य आहे. त्यामुळे "युती'ची फेरबांधणी करावी की तिचे अस्तित्व टिकविण्याची धडपड करावी असा पेच युतीच्या, विशेषतःशिवसेनेच्या नेत्यांसमोर उभा राहणार आहे. राज ठाकरे यांच्याविषयी शिवसेनेतील अनेकांच्या मनात आजही असलेली सहानुभूती आता उफाळून आली, तर सेनेसमोर नव्या समस्या उभ्या राहणार आहेत. त्या समस्या ऊग्र होण्याआधी काळाची पावले ओळखली नाहीत तर शिवसेना हा एक राजकीय इतिहास होईल, आणि बालेकिल्ल्याचे काही ढासळलेले बुरूज भविष्यात महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची साक्ष देत राहतील...
मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसमोरील मनसेचे आव्हान उघड झाले होते. राज ठाकरे यांनी इन्कार केला तरी मनसेमुळे सेना-भाजप युतीची मोठी पडझड झाली, हे मतांच्या आकडेवारीवरून सिद्ध झालेले आहे. "मनसे'च्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला नसला, तरी युतीच्या पराभवात त्यांचा हातभार होता, हे मनसे आणि युतीमधील मतविभागणीवरून उघडही झाले आहे. या मतविभागणीमुळेच मुंबईत युतीला विधानसभेतदेखील याच आव्हानास सामोरे जावे लागेल, हे स्पष्ट दिसत होते. तरीही सेनेच्या नेतृत्वाला जनमानसाचा अंदाज आला नाही. "मनसे'ला मत देण्याने कॉंग्रेसचा लाभ होतो, हे मतदारांच्या लक्षात आलेले असल्याने लोकसभेत केलेली चूक मतदार पुन्हा करणार नाहीत, अशा भ्रमातून सेना नेतृत्वाने राज ठाकरे आणि "मनसे'वरील टीकेचा एककलमी कार्यक्रम राबविला तेव्हा भाजप मात्र एकमार्गीपणाने प्रचाराचे गाडे महागाईच्या मुद्‌द्‌यावर आणण्याचा अपयशी प्रयत्न करीत होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची गाडी एका रुळावरून धावलीच नाही, आणि मनसेचे इंजिन शिवसेनेची फरफट करीत आहे, असे एक "करमणूकप्रधान' दृश्‍य प्रचाराच्या काळात जनतेला पाहायला मिळाले.

शिवसेनेच्या जन्मापासून अगदी कालपर्यंत मुंबई आणि शिवसेना हे एकमेकांचा आधार असल्याचे चित्र होते. छगन भुजबळ, गणेश नाईक, रमेश प्रभू आदी मोहरे बाहेर गेल्यानंतरदेखील बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा हीच शिवसेनेची शक्ती होती. उद्धव ठाकरे यांच्या हातात सेनेची सूत्रे आल्यानंतर नारायण राणे आणि त्यापाठोपाठ राज ठाकरेंनी सेनेला सोडचिठ्ठी देत सेनेसमोर आव्हाने उभी केली. या काळात सेनेची पडझड सुरू झाल्यानंतर मात्र, मुंबई आणि शिवसेनेचे नाते हा एक "इतिहास' झाला. गेल्या पाच वर्षांत राणे आणि राज यांनी शिवसेनेला असंख्य धक्के दिले. आता विधानसभेच्या निवडणुकीतून शिवसेनेच्या शक्तीचा उतरता आलेख आणखी ठळक झाला आहे. "मनसे'मुळे शिवसेनेला मोठा फटका बसला हेच याही वेळचे वास्तव आहे. मुंबईतील वडाळा, भायखळा, मुंबादेवी, मालाड (प.), वर्सोवा, अंधेरी (प.), चांदिवली, धारावी आणि वांद्रे (प.) या नऊ मतदारसंघांत कॉंग्रेस आघाडीने स्वबळावर वर्चस्व सिद्ध केले आहे. यापैकी धारावी, वांद्रे (प.), वर्सोवा आणि मुंबादेवी या चार मतदारसंघांत "मनसे' नसतानाही युतीला कॉंग्रेस आघाडीकडून पराभव पत्करावा लागला, तर मनसे आणि युती अशा लढतीत शिवडी आणि घाटकोपर (प.) या दोन जागा मनसेने युतीकडून काबीज केल्या. शीव कोळीवाडा, कुलाबा, दिंडोशी, कांदिवली (पूर्व), अंधेरी (पूर्व), विलेपार्ले, वरळी, अणुशक्तीनगर आणि कुर्ला या नऊ मतदारसंघांत मनसे आणि युतीच्या मतविभागणीमुळे कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार विजयी झाले. या सर्व मतदारसंघांत मनसे तिसऱ्या क्रमांकावर होती. बोरीवली आणि मुलुंडमध्ये मनसेशी थेट टक्कर देऊन युतीमधील भाजपने या जागा जिंकल्या. विशेष म्हणजे, मनसेमुळे फायदा झालेल्या कॉंग्रेस आघाडीसही माहीम, मागठाणे, विक्रोळी आणि भांडुपमध्ये "मनसे'ची धडक बसलीच आहे. या चार जागा मनसेने कॉंग्रेसशी थेट लढत देऊन जिंकल्या आहेत, तर चेंबूर आणि कालिना या दोन मतदारसंघांत मनसे आणि कॉंग्रेस अशी लढत होऊनदेखील युतीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे मनसेला फटका बसला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, मनसे रिंगणात असूनदेखील वांद्रे (पूर्व), दहिसर, गोरेगाव, जोगेश्‍वरी (पूर्व), चारकोप, घाटकोपर (पू.), आणि मलबार हिल या सात मतदारसंघांत युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या मतदारसंघांत मनसेचा युतीच्या विजयावर परिणाम झालेला नाही.
मुंबईतील निकालावरील "मनसे फॅक्‍टर'चा प्रभाव या निकालातून स्पष्ट दिसतो. शिवसेनेच्या पडझडीतून जन्मलेल्या "मनसे'मुळे सेनेच्या सहानुभूतीदारांना "हवा असलेला पर्याय' मिळाला आणि त्यांची मते मनसेकडे वळली, हाच याचा अर्थ आहे. शिवसेनेची एक भक्कम "मतपेढी' आता फुटली आहे, हे स्पष्ट झाले आहे. मनसेला तरुण मतदारांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचे दिसते. त्याबरोबरच, मुंबईत "मनसे'ला सहा जागांवर मिळालेल्या विजयास शिवसेनेच्या जुन्या मतदारांचाही हातभार आहे, हेही स्पष्ट आहे. वाढती ताकद घेऊन नव्या रिंगणात उतरण्याची तयारी करणाऱ्या "मनसे'मुळे प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेची ताकद क्षीण होत गेल्याचे मनसेच्या स्थापनेनंतरच्या दोनच निवडणुकांत उघड झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या भक्कम निकालांमुळे मनसेचे मनोबल वाढले आहे. आता त्यांच्या तंबूत मुंबई महापालिकेसाठी "तिसऱ्या लढाई'ची तयारी सुरू झाली आहे. "दोन ठोशां'मुळे क्षीण झालेली शिवसेना तिसऱ्या निवडणुकीतील मनसेचे आव्हान कसे पेलणार, यावर "भविष्य' आणि "इतिहास' यांतील संघर्षाचा फैसला अवलंबून राहणार आहे.
(सकाळ, शनिवार २४ ऒक्टो. ०९)

No comments: