Friday, October 16, 2009

सदुभाऊ...

"राजकारण असंच असत... माणसांचा वापर करून घेणारेच इथे जास्त. हे माहित असूनही मी हे करतोय.. खाज म्हणा हवं तर... काय मिळतं म्हणाल, तर... समाधान... ते सगळ्यात मोठंय्‌' ... सदुभाऊ बोलत होते, आणि आतून त्यांची बायको कुत्सित हुंकार देत होती...
"कसलं समाधान?... घरचं खाऊन लष्कारच्या भाकऱ्या भाजायचे नस्ते उद्योग!' ती आतूनच म्हणाली, आणि सदुभाऊंनी मला जोरदार टाळी दिली.
"वयनी.. पण तुम्हाला नवऱ्याचा अभिमानच वाटत असणार'... मी मुद्दामच म्हणालो...
"अज्जिबात नाही.. मी खमकी आहे, म्हणून चाल्लयं... काही नाही अभिमान-बिभिमान' ती पुन्हा म्हणाली, पण त्या शब्दातलं कौतुक स्पष्ट जाणवतं होतं.
...रत्नागिरीत त्या दिवशी भाजपाचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारासाठी विनोद तावडेंची सभा सुरू होती... सभागृह खच्चून भरलं होतं... तावडेंचं भाषणही ताडाखेबंद होत होतं... टाळ्या, घोषणांचा पाऊस पडत होता, आणि स्टेजच्या एका कोपऱ्यात प्रचाराचा फलक घेऊन एक माणूस पुतळ्यासारखा उभा होता. माझं लक्ष त्या माणसाकडेच होतं. श्रोते आणि नेते आरामात बसलेले असताना फलक हातात धरून निष्टेनं उभा राहीलेल्या या माणसाची मला कीव येत होती. सगळे त्याला मूर्ख समजत असतील, असंही मला राहूनराहून वाटत होतं. पण त्यानं माझ लक्ष वेधलं होतं.... सभा संपल्यानंतर त्याला भेटायचंच असं मी ठरवलं....
गर्दी ओसरताच मी त्याला शोधू लागलो.. पण तो गायब झाला होता... रत्नागिरीच्या बाबा परुळेकर वकिलांना फोन केला. त्यां माणसाचा पत्ता मला शोधायचाच होता.
`अरे, तो सदुभाऊ... कशाला भेटणारेस त्याला? काहीतरी लिहू नकोस हो त्याच्याबदल. एकदम चांगला, सज्जन माणूस आहे तो'... बाबानं फोनवरच मला सांगितलं, आणि मीही त्याला अगदी `वचन` दिलं... तसं माझ्या मनातच नव्हतं...
नंतर काही वेळातच मी बाबाबरोबर समोरच्या सदुभाऊंच्या घरी होतो...
`कुठेतरी पावसेकडे गेलेत प्रचाराला'... बाजूच्या दुकानात गिर्‍हाईकाला काहीतरी बांधून देत सदुभाऊंची पत्नी तिकडूनच म्हणाली, आणि बाबानं माझ्याकडे बघितलं..
`ठीक आहे... तो येईपर्यंत तू वयनींशी बोल... त्यांच्यामुळेच सदुभाऊंना मोकळेपणा मिळतोय' बाबा मुद्दामच मोठ्यानं म्हणाला, आणि अपेक्षेप्रमाणे वयनींनी तिकडूनच पुन्हा `हूं...' केलं... मिनिटभरानं वयनी दुकानातून घरी आल्या, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या... वयनींच्या नापसंतीच्या सुरातही, नवर्‍याचा अभिमान डोकावतोय, असं मला जाणवत होतं...
पाचदहा मिनिटांतच सदुभाऊ आले... बाबानं बहुतेक त्याला फोन केला होता.
`स्वामी समर्थ'... हातातला फलक भिंतीशी कोपर्‍यात उभा करून ठेवत सदुभाऊंनी नमस्कार केला, आणि डोक्यावरची `कमळवाली कॅप' काढून गुडघ्यावर ठेवत ते समोरच्या खुर्चीत बसले...
`हं बोला तुम्ही'... म्हणत बाबा घरी गेला, आणि आम्ही बोलू लागलो...

... त्याचं नाव सदुभाऊ जोशी. गेल्या काही महिन्यांपासून, लोकजागृतीसाठी वेगवेगळ्या विषयांवरचे फलक हाती घेऊन हा एकांडा शिलेदार, जमेल तिथं प्रवास करणारा एक नवा आवलिया रत्नागिरीत अवतरलायं... असेच फलक घेऊन रस्तोरस्ती फिरणाऱ्या सदुभाऊ पाटणकरांची तब्बेत सध्या बरी नाही... सदुभाऊ जोशींनी त्यांचा वारसा चालवलाय...
मी त्यांच्या घरी त्यांच्याशी बोलत असतांना पंधरावीस माणसं तेवढ्या वेळात सदुभाऊंना हाक मारून गेली, आणि या आवलियाचा लोकसंग्रह मी डोळ्यांनी अनुभवला... मागे एकदा नगरपालिकेच्या निवडणूकीत सदुभाऊ भाजपाच्या तिकीटावर उभे राहीले, आणि सगळ्यांचा धुव्वा उडवला.. नंतर पक्षांनं उमेदवारी नाकारली, तेव्हा अपक्ष उभे राहिले, आणि दणकून आपटले.. म्हणूनच, `माणासापेक्षा पक्ष मोठा असतो', यावर त्यांची श्रद्धा... आता भाजपाच्या प्रचारासाठी सदुभाऊ हिंडतायत. ब्लड प्रेशर, डायबेटीजसारखे आजार सोबत घेऊन, स्वत:च्या खर्चानं. रिक्षा भाड्यानं घेऊन हातात प्रचाराचा फलक घेऊन ते गावोगाव फिरतायत. भाषण नाही, घोषणा नाहीत, आणि संवादही नाही... हातातला फलक एवढंच त्यांच्या प्रचाराच साधन.
स्वाईन फ्लूची साथ आली, तेव्हा सावधगिरीच्या सूचना देणारा फलक घेऊन सदूभाऊ चिपळूणपासून राजापूरापर्यंत स्वखर्चानं हिंडले... कधी लोकांनी चेष्टा केली, कधी आपुलकलीनं विचारपूरस केली... पण "खाज'!... ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही...
सामाजिक जाणीवेतून एक दुर्लक्षित आयुष्य फुलविण्याच्या उभेदीतून दत्तक घेतलेला चार महिन्यांचा मुलगा आज एकवीस वर्षांचा झालायं... वेदशाळेत शिकतोय... "आपण एका आयुष्याला आकार देण्यात यशस्वी ठरलो', एवढंच सदूभाऊ अभिमानानं सांगतात...
+++ +++ +++
`ही नवी खाज कधीपासूनची?'... बराच वेळ गप्पा मारल्यावर, हा माणूस मोकळाढाकळा आहे, अशी खात्री झल्यानं मी मध्येच एकदा सदुभाऊंना विचारल...
झाला दीडदोन महिने... मागे सावर्ड्यातल्या एका मुलाला स्वाईन फ्लुच्या उपचारासाठी `रत्नारी'त आणलं होतं.. त्याला बघायला हॉस्पिटलात गेलो, तेव्हा वाटलं, हे प्रकरण साधं नाही... आपण काहीतरी केलं पाहिजे... आणि मी विचार करायला लागलो... एकदम सदुभाऊंचीच आठवण झाली... आपले सदुभाऊ पाटणकर- अलीकडे आजारी आहेत... मग मी ठरवलं... लोक्जागृती करायची... करून घेतला एक मोट्ठा फलक... चांगला साताठशे रुपयांचा... आणि फिरलो राजापुरापास्नं खेडापोवत'... कोपर्‍यातल्या एका मोठ्या फलकाकडे बोट दाखवत सदुभाऊ म्हणाले...
`उचलून बघा... एका हाताला झेपणारा नाही'... खुर्चीतून उठत त्यांनी तो फलकच माझ्यासमोर धरला... `काय करावे, काय करू नये', याची लांबलचक यादी त्यावर होती...
मी सदुभाऊनाच हो फलक हातात धरायला सांगितलं, आणि घरातच त्यांचा एक फोटो घेतला...
पुन्हा गप्पा सुरू झाल्या...
तेव्हढ्यात वयनींनी दोनचार आल्बम समोर आणले होते... मुलाचे फोटो!
`चार महिन्यांचा असताना ह्याला घरी आणून हितं सुपात ठेवला...' दरवाज्याच्या उंबरठ्याकडे बोट दाखवत सदुभाऊ सांगू लागले...
`आई होती तेव्हा... ती पुढे आली, वाकून त्या एवढ्याश्या जिवाकडं बघितलंन, आणि `हुं' करून आत गेली... तिला आवडलं न्हवतं हे दत्तक प्रकरण'... हसतहसत सदुभाऊ म्हणाले.
`तिचा बिचारीचा काही दोष नाही... जुन्या वळणाची होती' भिंतीवरल्या आईच्या फोटोकडे पाहून नमस्कार करत सदुभाऊ म्हणाले.
`पण आम्हाला मूल हवं होतं... लग्नानंतर बरीच वर्षं मूल नव्हतं... मग नंदूच्या आग्रहावरून तपासणी करून घेतली, आणि लगेच ठरवलं... आपल्या बायकोचं आईचं सुख हिरावून घ्याचं नाही... तिला मुलाची माया मिळवून द्यायचीच'... सदुभाऊंच्या सुरात स्वभावातला सगळा प्रांजळपणा उतरला होता...
मग मी आल्बम उलगडू लागलो...
एकेका फोटोवर बोट ठेवत सदुभाऊ मुलाचं कौतुक सांगत होते...
तेव्हढ्या वेळात घरात आणखी सातआठजण येऊन बसले होते... सगळ्यांना हे माहीत होते, हे त्यांच्या चेहेर्‍यावरच दिसत होतं. तरीपण सगळेजण कान लावून ऐकत होते.
तासाभरानंतर सदुभाऊंच्या बायकोनं ट्रे भरून चहा आणला... सगळ्यांच्या हातात कप देतादेता तीही या कौतुकसोहळ्यात सामील झाली होती...
`वयनी, कश्याला केलात एवढ्या सगळ्यांना चहा?' मी उगीचच म्हणालो... पण तोवर सदुभाऊंनी मस्त फुरका मारला होता...
`घ्या हो... हे रोजचंच आहे आमच्याकडे'... समाधानानं बायकोकडे पाहात सदुभाऊ म्हणाले, आणि तिनंही प्रेमळ हसून त्यांना दाद दिली...
`पण फक्त, चहा डायबेटीसवाल्यांचा आहे'... पुन्हा खट्याळपणे माझ्याकडे पाहात डोळे मिचकावत सदुभाऊ म्हणाले, आणि त्यांनी टाळीसाठी हात समोर केला...
पुन्हा एक `हू' ऐकू आलं...
चहा संपवून सदुभाऊ उठले, आणि कोपर्‍यातला फलक त्यांनी उचलला... माझा हात हातात घेत निरोप घेतला, आणि ते रस्त्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या भाड्याच्या रिक्षात बसले...
मीही बाहेर आलो... सदुभाऊंना हात हलवून निरोप दिला.

No comments: