Sunday, September 20, 2009

एनर्जी आणि टॉनिक!

हेलिकॉप्टरने हवेत झेप घेतली आणि काळी पट्टी डोळ्यावर बांधून साहेब सीटवर मागे रेलून बसले. बाजूलाच बसलेल्या कार्यकर्त्याने डोळ्यांनीच खूण केली आणि हेलिकॉप्टरमधल्या तीन-चार जणांनी खिडकीतून बाहेर नजर लावली. आता पुढच्या गावात पोहोचेपर्यंत साहेब आराम करणार होते.

... अर्ध्या- पाऊण तासातच खालून धूर दिसू लागला आणि हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले. सभेचे गाव खाली दिसत होते. एका मैदानावर जमलेली गर्दी हळूहळू ठळक होत होती. कार्यकर्त्याने हळूच साहेबांना स्पर्श केला आणि क्षणात साहेब जागे झाले. डोळ्यावरची पट्टी बाजूला करून खाली डोकावत ते स्वतःशीच हसले. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरले होते. पंख्यांचा वेग कमी कमी होत स्थिरावला आणि साहेब बाहेर पडले. त्यांचा चेहरा टवटवीत दिसत होता. हेलिकॉप्टरभोवती गराडा पडला होता. लांबवर एका टोकाला ढोल-ताशे वाजत होते. फटाक्‍यांची लांबलचक माळही तडतडू लागली आणि साहेबांच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला... साहेबांच्या चेहऱ्यावर खुशीची झाकही पसरली. नमस्कारासाठी त्यांचे हात छातीशी आले. चेहऱ्यावरही उत्साहाची रेषा उमटली. नमस्कार करून ते गर्दीसमोर किंचितसे झुकले. तेवढ्यात, टवटवीत फुलांचा एक हार त्यांच्या गळ्यात पडला. पुन्हा घोषणा दुमदुमल्या. साहेबांचा शीण कुठल्या कुठे पळाला होता. झपाझप चालत ते स्टेजजवळ आले. स्टेजवर बसलेले नेते आणि कार्यकर्ते अदबीने उठले. सगळ्यांचे हात साहेबांच्या दिशेने जोडले गेले. चेहऱ्यावर काहीसे लाचार, नम्र हास्य आणत सर्वांनी साहेबांना नमस्कार केला. हसतमुखाने त्याचा स्वीकार करत साहेब रांगेतल्या मधल्या खुर्चीत बसले, आणि पुन्हा मंडपाबाहेर ढोल-ताशांचा जोरदार तडतडाट झाला...

... हे सारे आपल्यासाठी आहे, याची जाणीव साहेबांच्या स्मितरेषेत स्पष्ट उमटली होती.

सभेला सुरवात झाली. पहिल्या वक्‍त्याने साहेबांचे नाव घेताच गर्दीतून टाळ्या, शिट्ट्या आणि साहेबांच्या नावाचा जयजयकार घुमला... साहेबांनी हवेतच हात उंचावून गर्दीला अभिवादन केले आणि शेजारी बसलेल्या नेत्याकडे त्यांनी मान वळविली. त्याच्या चेहऱ्यावरच्या धन्यतेच्या भावनेने साहेब सुखावून गेले होते... हातातल्या कागदांवरच्या कुठल्या तरी मजकुराकडे बोट दाखवत साहेब त्याच्याशी काही तरी बोलेले. त्यांनी दुसऱ्या दिशेला बसलेल्या नेत्याकडे मान वळविली. समोर छायाचित्रकारांच्या गर्दीतून फ्लॅश दणादण चमकत होते. साहेबांच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा अधिकाधिक ठळक होत होती...

बाजूच्या माईकसमोर वक्‍त्यांची भाषणं सुरूच होती. साहेबांनी समोर, गर्दीकडे चोहोबाजूंनी नजर फिरवली. त्या भाषणांकडे गर्दीचंही लक्ष नव्हतं. सगळे कान जणू साहेबांचे शब्द साठवायला आतूर झाले होते. मधूनच गर्दीतून टाळ्यांचा कडकडाट झाला... कुणी तरी जिवाच्या आकांताने जयजयकार केला. तो इशारा समजून वक्‍त्याने आपले भाषणही आवरते घेतले. तो जागेवर बसला. साहेबांकडे पाहात त्यानं ओशाळा नमस्कारही केला. साहेबांनी मान हलकेच झुकवून त्याचा स्वीकार केला. टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता...

... आणि सूत्रसंचालकाने साहेबांना भाषण सुरू करण्याची विनंती केली.

गर्दीला नमस्कार करीतच साहेब खुर्चीतून उठले. पुन्हा टाळ्या, शिट्ट्या आणि जयजयकार दुमदुमले. गर्दीच्या कोपऱ्यातून कुणी तरी ठेवणीतल्या आवाजात लांबलचक घोषणा देत होता. साहेब शांतपणे माईकसमोर उभे होते. घोषणा आणि टाळ्यांचा गजर हळूहळू कमी होत असतानाच साहेबांनी हात उंचावून गर्दीला शांत होण्याची खूण केली आणि क्षणात सगळे आवाज थांबले... हे सगळे आपल्या एका इशाऱ्याने होते, हा अनुभव साहेबांना नवा नव्हता. ते पुन्हा सुखावले. गर्दीकडे पाहात त्यांनी आपली नेहमीची, ठेवणीतली साद घातली. आतापर्यंत हेच शब्द कानात साठवण्यासाठी जणू आतुरलेल्या गर्दीने साहेबांचे शब्द कानावर पडताच बेभानपणे टाळ्यांचा कडकडाट केला. साहेब काही मिनिटे पुन्हा शांतपणे गर्दीकडे पाहात थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडत होते. पुढे तासभर गर्दीतला प्रत्येक कान साहेबांचे शब्द स्तब्धपणे साठवून घेत होता... सभा आटोपली, लगबगीने गर्दीला नमस्कार करत साहेब स्टेजवरून खाली उतरले. माईकसमोरचा सूत्रसंचालक गर्दी आवरण्यासाठी प्रयत्न करत होता; पण एव्हाना साहेबांभोवती गर्दीचा गराडा पडला होता. पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसी शिट्ट्या घुमू लागल्या... कार्यकर्त्यांनी भोवती केलेल्या साखळीतून पुढे सरकतच साहेब गर्दीतल्या कुणाचा पुढे आलेला हात हातात घेत होते, कुणाला नमस्कार करत होते... गर्दी त्यांच्यासोबत पुढे सरकतच होती. साहेब हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि गर्दी हळूहळू मागे होत गेली... हेलिकॉप्टरने पुढच्या प्रवासासाठी हवेत झेप घेतली, तेव्हा साहेबांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. सोबतच्या पत्रकारांकडे पाहून त्यांनी हलकेच हास्य केले आणि गप्पा सुरू झाल्या... या सभेनंतर विजयाची गणिते आपल्याच पक्षाच्या बाजूने झुकणार असा विश्‍वास त्यांच्या बोलण्यातून डोकावत होता. त्याच उत्साहात हेलिकॉप्टर पुढच्या गावात प

ोहोचले... तिथेही तोच अनुभव. तेच फटाके, घोषणा, हार, फुले, टाळ्या, शिट्ट्या आणि जयजयकार... साहेब पुन्हा ताजेतवाने झाले. जोरदार भाषण करून सभा जिंकत पुन्हा पुढच्या प्रवासासाठी ते तयार झाले. आणखी एका गावातली तशीच, सळसळती सभा आटोपलेली असते. उन्हं तळपू लागलेली असतात. सोबतच्या कार्यकर्त्यांच्या खिशातून कागदाची एक घडी बाहेर येते. या वेळी साहेबांना कोणतं औषध, कोणतं खाणं द्यायचं, त्याचं टिपण त्या कागदावर असतं. हेलिकॉप्टरमध्ये गप्पा सुरू असतानाच साहेब यांत्रिकपणे औषधाच्या गोळ्या घेत असतात. दुसरा कार्यकर्ता ताजी फळं कापून साहेबांसमोर ठेवत असतो. प्रवासातच नाश्‍ता सुरू होतो. सकाळच्या वेळी कोणतेही तेलकट, मसालेदार पदार्थ खायचे नाहीत, हे ठरलेले असते. सभा होणाऱ्या प्रत्येक गावात तसा निरोप अगोदरच गेलेला असतो आणि प्रत्येक गावात ताज्या, टवटवीत फळांची; पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था झालेली असते. पुढच्या प्रवासाला निघण्याआधी पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये फळे, पाणी ठेवले जाते...

टळटळीत दुपार सुरू होते, तेव्हा ज्या गावात सभा असते, त्या गावातल्याच एका नामांकित नेत्याच्या घरी नंतर जेवणाचा बेत असतो. घरात कार्यकर्त्यांची गर्दी असते. सभा संपून साहेब इथे येतात आणि ताटकळत थांबलेल्या कार्यकर्त्यांची चौकशी सुरू होते. कुणाच्या पाठीवरून हात फिरतो, कुणी साहेबांच्या पायाला हात लावण्यासाठी वाकलेला असतो... कुणी हातातला कागद हळूच साहेबांच्या हातात कोंबतो. साहेब त्यावर सराईत नजर फिरवून तो सोबतच्या कार्यकर्त्याकडे देतात. तो कागद फाईलमध्ये गेला, हे दिसताच समाधानाने तो कार्यकर्ता बाजूला होतो.

दुपारच्या जेवणाचा बेत अगदी साधा असतो. मसालेदार आणि चमचमीत पदार्थ ताटात नसतात. चपाती आणि भाजी, दही-ताक असा हलकासा आहार घेऊन साहेब उठतात. बाहेर कार्यकर्ते असतात. मोजक्‍याच वेळात एक बैठक होते. वातावरणाची चर्चा होते. कुणाला कुठला निरोप द्यायचा असतो, कुठे कशाची तरी व्यवस्था करायची असते. भराभर सूचना करून साहेब एकीकडे वर्तमानपत्रं चाळत असतात... थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा पुढच्या सभेसाठी निघायचं असतं.... गर्दीचं कोंडाळं मात्र भोवती घोटाळतच असतं... साहेब समाधानानं गर्दीत रमत असतात... अशाच सभांचा आणि गर्दीचा माहोल दिवसभर असतो. सभांचा उत्स्फूर्त प्रतिसाद साहेबांना सुखावत असतो. कार्यकर्ते अवतीभोवती वावरत असतात. रात्री उशिरा जाहीर सभांची वेळ संपते. शेवटच्या सभेच्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी मुक्कामाची सोय असते. रात्रीची जेवणं आटोपल्यानंतर मुंबईला फोनाफोनी आणि त्या मतदारसंघातल्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू होते. व्यूहरचनेची आखणी होते. एखाद्या प्रतिस्पर्धी पक्षातील मातब्बरासोबतची बैठकही आटोपायची असते. हे संपेतोवर मध्यरात्र उलटून गेलेली असते. गर्दी घरोघरी परतते आणि साहेब झोपी जातात...

दुसऱ्या दिवशी पुढच्या गावांमधील सभांची माहिती घेतली जाते आणि नवा दिवस सुरू होतो. साहेबांच्या परीटघडीच्या इस्त्रीच्या कपड्यांची एक बॅग अगोदरच गावात दाखल झालेली असते. कडक इस्त्रीचे खादीचे कपडे घालून साहेब नव्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी उत्साहाने तयार होतात. पुढच्या गावात जाण्यासाठी निघतात. निरोप द्यायला गावातल्या कार्यकर्त्यांची फौज कधीपासून आलेलीच असते. पुन्हा गर्दी दिसताच साहेब टवटवीत होतात...

सोबतचे पत्रकार मात्र अजूनही मरगळलेलेच असतात... कसे तरी आटोपून घाईघाईनं ते हेलिकॉप्टरमध्ये येऊन बसतात आणि गप्पा सुरू होतात...

रटाळ चेहऱ्यानं एखादा कुणी तरी साहेबांना विचारतो, "साहेब, तुम्हाला कालच्या दिवसभराच्या या हेक्‍टिक धावपळीनं थकवा आला नाही?' साहेब मंद हसतात. बाहेर गर्दी हात हलवत निरोप देत असते... तिकडे एक नजर टाकून साहेब उत्तरतात, "हे माझं टॉनिक आहे... आणि कार्यकर्ते ही माझी एनर्जी... मग थकवा कसा येईल?'

पत्रकार आपल्या डायरीत साहेबांचं हे वाक्‍य टिपून घेतो... दुसऱ्या दिवशीच्या बातमीचा मथळा ठरलेला असतो... "कार्यकर्ता ही एनर्जी, गर्दी हे टॉनिक!'...

(http://beta.esakal.com/2009/09/19162913/Featuers-saptarang-on-one-day.html)

Saturday, September 19, 2009

आजारी कोण, ‘टॉनिक’ कुणाला...

हाराष्ट्र हे संपन्न राज्य आहे. मुंबईसारख्या महानगरांनी तर प्रगतीच्या जागतिक स्पर्धेत उडी घेतली आहे. औद्योगिक क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीचा ओघ सुरू आहे. नजीकच्या भविष्यकाळात महाराष्ट्र जगाच्या औद्योगिक नकाशावरदेखील अव्वल स्थान मिळवील आणि देशाचे औद्योगिक नेतृत्व करील, असे अभिमानाने सांगितले जाते.

... पण "सार्वजनिक आरोग्या'वर या संपन्नतेच्या खाणाखुणा दिसत नसल्याने राज्याचे सार्वजनिक आरोग्य मात्र "खुरटलेले'च आहे. मुंबईसारख्या महानगरांवर संपन्नतेची सूज चढत असतानाच, मेळघाटातल्या आदिवासींची मुले मात्र कुपोषणाने मृत्यूला कवटाळत आहेत. मुंबईच्या आसपासच्या आदिवासी पाड्यांतील कुपोषणामुळे आरोग्य सेवेपुढे आव्हान उभेआहे. पाच वर्षांखालील पाच मुलांमागे किमान दोन मुले खुरटलेली असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात (एनएफएचएस-३) निष्पन्न झाले आहे. नव्या आजारांचे आणि साथींचे विळखे सोडवताना, आरोग्य-सेवा हतबल झाली आहे.

हिवताप, हत्तीरोग, मेंदूज्वर, डेंग्यू, चिकनगुनिया अशा कीटकजन्य साथींनी विदर्भ-मराठवाड्याबरोबरच अगदी ठाणे, सोलापुरातदेखील ठाण मांडले आहे; आणि आता स्वाईन फ्लूच्या साथीने राज्य हादरून गेले आहे. गेल्या दोन वर्षांत साडेआठ हजार व्यक्तींना हत्तीरोगाने गाठले; तर एक लाख १५ हजारांना हिवतापाची लागण झाली. या साथीने जवळपास ३०० जणांचा बळी घेतला; तर डेंग्यूने साडेसहा हजार रुग्णांपैकी ४४ जण दगावले. एडस्‌ग्रस्तांची संख्या नियंत्रणात येत असल्याचा दावा केला जात असला, तरी एडस्‌च्या बळींची संख्या आता वाढू लागली आहे. राज्यात २००४ मध्ये ४८७ ; तर २००८ मध्ये ८८६ व्यक्ती दगावल्या. अतिजोखीम गटातील एडस्‌ग्रस्तांची संख्यादेखील वाढते आहे. महाराष्ट्रातील दर एक हजार व्यक्तींमागे ५७ व्यक्ती अतिजोखीम गटातील एडस्‌ग्रस्त असाव्यात, असा एक भयावह अंदाज केंद्र सरकारी यंत्रणांनी गेल्या वर्षी वर्तविला आहे. गेल्या वर्षाअखेर राज्यात दहा हजारांच्या आसपास एडस्‌ग्रस्त असावेत, असाही या यंत्रणांचा अंदाज आहे.

राज्यात आरोग्य सेवेसाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ, आरोग्य सेवा संचालनालय अशा सरकारी यंत्रणादेखील अद्ययावत सामग्रीने सज्ज आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची येथे वानवा नाही; आणि भक्कम आरोग्य सेवांसाठी केंद्र सरकारमार्फत जागतिक बॅंकेचा निधीही राज्य सरकारच्या तिजोरीत आला आहे. असे असतानादेखील साथीचे आजार नियंत्रणात येऊ शकलेले नाहीत. वैद्यकीय क्षेत्रातील "व्यावसायिकता' हे यामागचे महत्त्वाचे कारण आहे. पैसा खर्चण्याची क्षमता असलेल्यांना सर्वोत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा सहजपणे उपलब्ध होऊ शकतात; पण दुर्गम, ग्रामीण भागातील गरिबांसाठीच्या आरोग्यदायी योजनांचा निधी कुठे झिरपतो, हे कोडे उलगडतच नाही. म्हणूनच, आजार एकाला आणि "टॉनिक' चाखणारे मात्र दुसरेच, अशी स्थिती राज्याच्या आरोग्य सेवेत दिसते.

शहरी भागांत पावलोपावली असलेले डॉक्‍टर ग्रामीण भागाकडे फिरकण्यास राजी नसल्यामुळे, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धूळ खात पडल्या आहेत. १९८६ मध्ये एक हजार ५३६ प्राथमिक आरोग्य केंद्रे होती. गेल्या वर्षीपर्यंत त्यांत केवळ ४०० आरोग्य केंद्रांची भर पडली. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, दोन वर्षांपूर्वी राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी एक हजार आठशे डॉक्‍टरांची गरज होती; पण त्यांपैकी तब्बल ३३ टक्के, म्हणजे ६०९ जागा रिकाम्याच होत्या. परिचारिकांच्या संदर्भात तर ही स्थिती आणखी बिकट होती. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये परिचारिकांच्या एक हजार ६२८ जागा होत्या; परंतु त्यांपैकी केवळ ४२८ जागा भरलेल्या होत्या. म्हणजे, राज्यातील एक हजार ६६९ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी एक हजार २४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये परिचारिकाच नव्हत्या. आरोग्य सेवेच्या संदर्भात पाहता, डिसेंबर २००८ अखेर तीन हजार ९२० वैद्यक पदवीधरांनी रोजगारासाठी नावनोंदणी केली होती. एका बाजूला प्राथमिक आरोग्य केंद्रामंध्ये डॉक्‍टरांचा तुटवडा आणि दुसरीकडे रोजगारासाठी सरकारी यंत्रणेकडे डोळे लावून बसलेले वैद्यकीय पदवीधारक हे चित्र असूनही, तुटवड्याचे गणित सरकार का सोडवू शकले नाही हे अनाकलनीय आहे.

आरोग्य सेवेच्या या आलेखावरून महाराष्ट्राच्या आरोग्याची स्थिती चिंताजनक असल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो; पण त्याहूनही चिंताजनक परिस्थिती भविष्यात उद्‌भवणार आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संस्थेच्या तिसऱ्या सर्वेक्षणानुसार, पुढारलेल्या आणि शिक्षणाचा प्रसार झालेल्या या राज्यात पहिल्या अपत्याच्या जन्माच्या वेळी स्त्रीचे सरासरी वय १९ वर्षे आणि नऊ महिने इतके होते. वाजवीपेक्षा कमी वजन असलेल्या मुलांची संख्या सुमारे ४० टक्के होती, आणि राज्यातील ४९ टक्के विवाहित महिला "ऍनिमियाग्रस्त' होत्या. ५७.८० टक्के गर्भवतींनादेखील "ऍनिमिया'ने गाठले होते.

...या मातांच्या पोटी जन्माला येणाऱ्या भावी पिढीचे आरोग्य महाराष्ट्राचे संपन्न वैभव कसे जपतील, हे एक अस्वस्थ प्रश्‍नचिन्ह या चित्रातून उमटले आहे.

Wednesday, September 16, 2009

'मागच्या बाका'वरची दुर्लक्षित पोरं !

वर्गात मागच्या बाकावर बसणाऱ्या मुलांकडे शिक्षकांचेही दुर्लक्ष होते, तशी आज काही सरकारी खात्यांची स्थिती आहे. हजारो कोटी रुपये खर्चून पायाभूत विकासाला वेग देणाऱ्या आणि मुंबईसह अवघ्या महाराष्ट्राच्या नागरीकरणाची स्वप्ने पाहणाऱ्या राज्य शासनाने सामान्य माणसाची जबाबदारी असलेली अनेक खाती ‘मागच्या बाका’वर बसविल्याने एकीकडे करोडोंची खैरात; तर दुसरीकडे निधीची प्रतीक्षा असे विसंगत चित्र आहे. नगरविकास, गृह, वित्त, उद्योग, गृहनिर्माण आदी खात्यांना पहिल्या बाकावरचे स्थान मिळाले आहे; तर समाजकल्याण, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महिला-बालकल्याण, रोजगारासारखी सामाजिक हिताची कामे पाहणारी खाती मात्र मागच्या बाकावर बसूनच शाळेचा ‘आनंद’ लुटत आहेत... शिक्षकांचे लक्ष नाही याची खात्री झाली, की मागची मुले उनाडक्‍या करू लागतात. समाजकल्याण खात्याची स्थितीदेखील तशीच झाली आहे.
जवळपास दहा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रातील ५८ टक्के लोकसंख्येचे वास्तव्य राज्यातील ४१ हजार खेड्यांमध्ये आहे; तर ४२ टक्के लोकसंख्या ३७८ शहरांमध्ये राहते. मात्र, नागरी विकासाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनता मात्र किरकोळ प्राथमिक सुविधांपासूनदेखील वंचित असल्याचे विसंगत चित्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीतदेखील पुसले गेलेले नाही. राज्यातील अनुसूचित जातीजमातींची संख्या सुमारे एक कोटी ९० लाख आहे. यापैकी मोठा वर्ग आजही ग्रामीण भागांत विखुरलेला असल्यामुळे साहजिकच सामान्य सुविधांच्या अभावाचा पहिला फटका या वर्गालाच बसला आहे. अनुसूचित जातींमधील ५९ टक्के; तर अनुसूचित जमातींपैकी ५४ टक्के लोकांना रोजगाराची साधनेदेखील नाहीत. त्यामुळे अनुसूचित जातींची ग्रामीण महाराष्ट्रातील ४५ टक्के कुटुंबे दारिद्रयरेषेखालील जिणे जगताहेत. अशी कुटुंबे मग रोजगाराच्या शोधात शहरांचा रस्ता धरतात; परंतु शहरी भागातदेखील या जातींचे नशीब फारसे उजळलेले नाही. शहरी भागातील अनुसूचित जातींची ४३.२० टक्के कुटुंबे दारिद्रयरेषेखालीच आहेत.
या वर्गाच्या उन्नतीसाठी प्राधान्याने शैक्षणिक सुविधा मिळाव्यात याकरिता केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या; परंतु त्यांचा संपूर्ण लाभ मात्र या समाजापर्यंत झिरपलाच नाही. समाजकल्याण खाते हे तर भ्रष्टाचाराचे कुरणफ म्हणूनच कुप्रसिद्ध आहे. मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठीच्या काही योजनांना केंद्राचेही अर्थसाह्य मिळते. महाराष्ट्रात या वर्गासाठी अनेक योजना जाहीर झाल्या. केंद्र सरकार या योजनांसाठी निधी घेऊनच बसले होते; पण अनुसूचित जाती आणि अन्य मागासवर्गीयांसाठी राज्य सरकारने २००४ ते २००६ या तीन वर्षांत केंद्र सरकारकडे निधीची साधी मागणीदेखील केली नव्हती, हे लोकसभेच्या २००६ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनातच उघडकीस आले होते. समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध योजनांकरिता राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रस्ताव पाठविणे आवश्‍यक असते. राज्य सरकारने २००६ पूर्वी तब्बल तीन वर्षे असा प्रस्तावदेखील केंद्राकडे पाठविला नव्हता. दुर्बल घटकांच्या कल्याणाची जबाबदारी असलेल्या या खात्याच्या उदासीनतेचे हे उदाहरण.
सफाई कामगार हा आणखी एक उपेक्षित सामाजिक घटक. या वर्गाच्या कल्याणाकरितादेखील केंद्राच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाकडून निधी उपलब्ध होतो. २००७-०८ या वर्षात सहा कोटी ३२ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मिळाला; पण त्यापैकी तब्बल चार कोटींचा निधी वापरलाच गेला नव्हता. २००८-०९ मध्ये पाच कोटी ५२ लाख ४६ हजार रुपयांचा निधी मिळाला. त्यापैकी तीन कोटी ८५ लाखांचा निधी वापरला गेला. याचा अर्थ, दोन वर्षांत मिळालेल्या निधीतील जेमतेम ५० टक्के रक्कम या वर्गाच्या कल्याणासाठी वापरली गेली. महाराष्ट्रातील ३०.७० टक्के म्हणजे जवळजवळ एकतृतीयांश लोकसंख्या दारिद्रयाशी झगडत असून, हे प्रमाण देशाच्या एकत्रित प्रमाणापेक्षा तीन टक्‍क्‍यांनी अधिक आहे. १९९३-९४ मध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू आणि पश्‍चिम बंगालमधील दारिद्रयाची पातळी जवळपास सारखीच होती; पण २००४-०५ मध्ये पश्‍चिम बंगाल आणि तमिळनाडूतील दारिद्रयाचे प्रमाण खूपच कमी झाले, महाराष्ट्रात मात्र दारिद्रयरेषेखालील लोकसंख्येत १२ लाख २० हजारांची वाढ झाली. महाराष्ट्रात दारिद्रयरेषेखालील ३० टक्के लोकांपर्यंत विकासाचे वारे पोचलेले नाही. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वर्षात राज्यात एक लाख मोटारी होत्या. आज मोटारींची संख्या एक कोटी ४२ लाख आहे. दारिद्रयरेषेच्या वर असलेल्या ६९ टक्के लोकसंख्येकडे दर चार माणसांमागे एक मोटार आहे. या विषमतेमुळेच, समाजकल्याण खात्याचे मागील बाकडे बदलून त्याला पहिल्या बाकावर आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
http://beta.esakal.com/2009/09/12000241/randhumali-election-education.html

Sunday, September 6, 2009

मठ-मंदिरांच्या दारी, इच्छुकांची वारी...

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण आणि अध्यात्म यांच्यातील आणखी घट्ट होत आहे. उमेदवारी मिळावी, नंतर विजय मिळावा व पुढे भलेभलेच होत जावे, यासाठी अध्यात्मिक गुरू, मठ-मंदिरे, बुवा-बाबांच्या दारी आता गर्दी सुरू होईल...
महाराष्ट्राला लाभलेल्या अध्यात्मिक परंपरेमुळे राज्यात अनेक आध्यात्मिक गुरूंचे वास्तव्य आहे. त्यांचा भक्तगण मोठा आहे. तोही मतदार आहे. त्यामुळे राजकीय यशासाठी गुरुचरणी डोके ठेवून भाविकांची मने जिंकणे ही अनेकदा "राजकीय गरज' ठरते. आता विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्याने ही गरज आणखी वाढेल. कोल्हापूर, सांगलीतील इच्छुकांच्या गाड्यांची वर्दळ बाहुबली, नरसिंहवाडीस सुरू होईल, तर औरंगाबाद, नाशिक, नगरचे इच्छुक दिंडोरी, त्र्यंबकेश्‍वरला धाव घेतील. कोकण आणि मराठवाड्यातील काहींना रत्नागिरीजवळच्या नरेंद्र महाराजांची वेळ मागून घ्यावी लागेल, तर राजकीय वजन आणि वलय लाभलेल्या कुणा "देवी'च्या आशीर्वादाने "सहज'पणे उमेदवारी साध्य व्हावी म्हणून काहींची मोर्चेबांधणी सुरू होईल.
विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक वजनदार नेत्यांनी भय्यू महाराजांना गुरुस्थानी मानले आहे. काहींनी त्यांचे शिष्यत्व पत्करले आहे. नाशिकच्या शांतिगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीत स्वतःच रिंगणात उडी घेतली होती. त्यामुळे त्यांचे कट्टर अनुयायी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्यापुढे राजकीय आणि आध्यात्मिक पेच उभा राहिला; पण आता सारे सुरळीत झाले आहे. शांतिगिरींच्या मठात पुन्हा पहिल्यासारखीच वर्दळ सुरू होणार आहे... नाशिक परिसरातले "फरशीवाले बाबा' वादग्रस्त ठरले होते. मात्र, राजकीय मंडळींची त्यांच्याकडची ऊठबस अजूनही कायम असल्याचे बोलले जाते. कोल्हापूरच्या शहाजी कॉलनीतील एक महाराजही असेच वादग्रस्त ठरले; पण पहाटेपूर्वीच त्यांच्या दर्शनासाठी राजकीय मंडळींची वर्दळ सुरू होते, अशी चर्चा आहे. रत्नागिरीजवळ नाणीज येथील नरेंद्र महाराजांच्या मठात लागणारी या भाविकांची रीघ लक्षात घेऊन तेथे नियोजन सुरू असल्याचे समजते.
औरंगाबाद, नगर, कोपरगावातील काही मुरब्बी राजकारणी वैजापूर तालुक्‍यातील मठाधिपतींच्या दर्शनासाठी धाव घेतात, असे सांगण्यात येते. काही जण वेरूळच्या वाटेवरील भांगशीमाता गडावरील परमानंदगिरींच्या आश्रमाची वाट धरतात. औरंगाबाद जिल्ह्यातच सिल्लोड तालुक्‍यात अल्पसंख्य समाजाच्या बड्या नेत्याने अलीकडेच पावसासाठी केलेल्या "पर्जन्ययागा'चे गोडवे अजूनही भाविकांमध्ये गायले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या काळात वाशीम मतदारसंघातील एक उमेदवार पहाटे प्रथम भेटणाऱ्याची शाल-श्रीफळ देऊन पूजा करून त्याच्याकडून "यशस्वी भव' असा आशीर्वाद `घेत' असे. हे "व्रत' फळाला आले असते, तर विधानसभेसाठी अनेकांनी या व्रताचे पालन करण्याचे ठरविले होते; पण तो उमेदवारच पराभूत झाल्याने आशीर्वाद "घेण्याची' कल्पना बारगळली, असे बोलले जाते. सांगलीच्या कॉंग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी अकलूजच्या एका हितचिंतकाने संग्रामनगरातल्या साईबाबांना नवस केला आणि त्यांचा विजय झाला. या युवा खासदाराला मंत्रिपदही मिळाले. नंतर त्यांनी या दैवताचे दर्शन घेऊन भाविकांना तीनशे नारळांचे वाटप केले होते. आता येथे दर्शनासाठी राजकारण्यांची हमखास गर्दी होईल, अशी चर्चा आहे. औरंगाबादजवळ हातमळी नावाच्या खेड्यातील "मामा-भाचे मारुती'ही नवसाला पावतात, अशी श्रद्धा आहे. या मंदिरात मारुतीच्या दोन मूर्ती असल्याने मामा-भाच्यांनी एकत्र येऊन नवस केला, तर फळ मिळते, असे म्हणतात. लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यावर भाजपच्या एका उमेदवाराने हा नवस फेडला आणि 101 नारळ अर्पण केले. या मंदिरालाही आता "राजकीय महत्त्व' प्राप्त होणार आहे. कुणी विजयासाठी तुळजापूरच्या भवानीला "तलवारी'चा नवस बोलेल, तर कुणी परभणीच्या पिराला कंदुरी करून मन्नत मागण्यासाठी धाव घेईल. कुणी मारुती मंदिरांसमोर घंटा बांधेल, तर कुणी शंकराला त्रिशूळ अर्पण करून विजयासाठी साकडे घालेल.
महाराष्ट्राची राजधानी आणि राज्याचे सत्ताकेंद्र मुंबईत तर निवडणुकीच्या मोसमात भाविकतेचा महापूरच येण्याची चिन्हे आहेत. ऐन गणेशोत्सवाचा मोका साधून भाविकांना शुभेच्छा देणारे "इच्छुकां'चे जागोजागी लागलेले फलक निवडणूक आयोगाने हद्दपार केले आहेत. त्यामुळे भाविकतेचा नवा मार्ग येत्या काही दिवसांत मुंबईत बांधला जाईल. प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाची आरती करून आणि दर्शन घेऊनच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रथाच पडलेली असल्याने येत्या काही दिवसांत सिद्धिविनायक मंदिरातील "व्हीआयपी' रांगांचीच लांबी वाढलेली दिसेल.
वशीकरण, हमखास यश, जादूटोणा अशा कलांमध्ये प्रसिद्ध असलेले बंगाली व हैदराबादी बाबाही राजकारणी मासे "गळाला' लावण्याच्या खेळात हिरिरीने उतरतील.
...निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे आध्यात्मिक क्षेत्रही राजकारणाच्या रंगात न्हाऊन निघेल.

Thursday, September 3, 2009

आज महाजन असते तर?

आणीबाणी संपली आणि महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पहिले बिगर कॉंग्रेस सरकार सत्तेवर आले. आणीबाणीआधीचा जनसंघ भाजपच्या रूपाने नव्या दमासह राजकारणात उतरला होता. पंचवीस वर्षे सत्तेच्या जवळपासदेखील नसलेला हा पक्ष केंद्रातील जनता सरकारमध्ये आणि महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये सहज सामावून गेला. दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्‌द्‌यावरून उठलेल्या वादळात, संघ परिवाराशी असलेले नाते जपत सत्तेवरून पायउतारही झाला. त्याच काळात भाजपच्या आणि राष्ट्रीय राजकारणात प्रमोद महाजन नावाच्या एका उमद्या नेतृत्वाचा उदय होत होता. डॉ. विश्‍वनाथप्रताप सिंह हे आमचे नेते आहेत, असे निःसंदिग्धपणे सांगत महाजनांनी देशाच्या सत्ताकारणात पक्ष रुजवायला सुरवात केली, तेव्हा वीस वर्षांनंतरचे भविष्य त्यांच्या मनात डोकावत असेल, याचा अंदाज फारच थोड्यांना आला असावा.

...मुंबईत नायगावच्या "चंचल स्मृती'मध्ये तेव्हा भाजपचे कार्यालय होते. वसंतराव भागवतांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा मुंबईतील मुक्काम याच कार्यालयात असायचा. महाजनदेखील अनेकदा येथे असत. राजकारणातील भविष्याची स्वप्ने पाहणारा हा तरुण तेव्हा पक्षाचे नेतृत्व करण्याचा आत्मविश्‍वास उराशी बाळगूनच वावरायचा. केंद्रीय राजकारणाशी फारशी जवळीक नसली, तरी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांच्याबद्दल त्यांच्या मनात अपार आदर होता. तो त्या वेळी त्यांच्या वाक्‍यावाक्‍यातून प्रकट व्हायचा. वाजपेयींच्या वक्तृत्वाची मोहिनी महाजनांच्या मनावर अंतर्बाह्य पसरलेली होती. वाजपेयी यांच्या अमोघ वक्तृत्वशैलीमुळेच त्यांनी देशवासीयांच्या मनात स्थान मिळविले आहे, हेही त्यांनी हेरले होते.

आणि म्हणूनच महाजनांनी राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करण्याआधी वक्तृत्वशैली विकसित करण्याचा ध्यास घेतला. त्यात ते कमालीचे यशस्वी झाले आणि त्यांच्या यशाची कमान चढत गेली. १९९५ पासून भाजप आणि महाजन राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. जेव्हा मोबाईल ही सर्वसामान्यांसाठी "जादुई' चीज होती, त्या काळात महाजनांच्या हातात मोबाईल आला. तिथूनच भाजपला "पंचतारांकित संस्कृती'ची बाधा झाल्याची ओरड सुरू झाली. संघ परिवारातील अनेकांनीही या कुजबुजीत भाग घेतला होता; पण काळाची पुढची पावले ओळखणाऱ्या महाजनांनी आपल्या हातातला मोबाईल प्रत्येक नागरिकाच्या हातात यावा, यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मात्र फारसे कौतुक झाले नाही. आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे गोडवे गातो. या क्रांतीच्या शिल्पकारांच्या मालिकेत महाजनांचे नाव वरचे होते, तरी खुद्द महाजनांनी मात्र दिलखुलासपणे या क्रांतीचे सारे श्रेय राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांना दिले होते. कारण राजकारणात राहूनदेखील मध्यमवर्गीय मनमोकळेपणा त्यांच्या स्वभावात दडलेला होताच. म्हणूनच श्रेयासाठी कधीही धडपड त्यांनी केली नाही. त्या त्या क्षणीचे नेमके आडाखे महाजनांकडे पक्के बांधलेले होते. म्हणूनच तणावाच्या असंख्य प्रसंगांनंतरही शिवसेनेसोबतची युती टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यांनाही काही कटू अनुभवांना सामोरे जावे लागले; पण ते अनुभव मनाच्या एका कप्प्यात कुलूपबंद करून "युतीचा धर्म' ते जपत राहिले.

म्हणूनच बाळासाहेब ठाकरेंनी महाजनांवर प्रेम केले. म्हणूनच, युतीमधील कटुता संपुष्टात आणण्यासाठी बाळासाहेब आणि लालकृष्ण अडवानी हे दिग्गज नेते केवळ महाजनांच्या शब्दाखातर समोरासमोर बसले. म्हणूनच कटुता असतानाही युतीचे सरकारही एकसंध राहिले.

महाजनांच्या वैशिष्ट्यांची जाणीव त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला होती. म्हणूनच प्रसंगी कठोर आणि अनाकलनीय वाटणारे महाजनांच्या स्वभावातले अवघड कंगोरेदेखील अनेकांनी पचविले; त्याकडे दुर्लक्ष केले. महाजन नावाच्या एका वादळी व्यक्तिमत्त्वाचा दुर्दैवी शेवट झाला आणि पोकळीचे विज्ञान राजकारणातही लागू होते, याचे प्रत्यंतर सध्या भाजपला येत आहे. २००४ मधील निवडणुकांमध्ये भाजपची प्रचाराची रणनीती आखण्यात महाजनांचा सिंहाचा वाटा होता; पण त्यांची "इंडिया शायनिंग' योजना सपशेल फसली. त्या पराभवाची जबाबदारी दिलखुलासपणे स्वीकारणारे ते पहिले होते.

... महाजन गेले आणि भाजपमध्ये वादळे घोंघावू लागली. कदाचित पोकळीच्या विज्ञानाचाच हा परिणाम असावा.
लोकसभेत दारुण पराभव झाला. निवडणूक रणनीती आखण्यापासूनच्या टप्प्यावरच पक्ष भरकटल्याचे जनतेलाही जाणवत होते. पराभवाचे सावट मात्र कोणालाच दिसले नव्हते. महाजन असते तर अगोदरच्या निवडणुकीतील पराभवाचा धडा ते विसरलेच नसते. पराभवाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, हा तर त्यांचा बाणा होता. पराभवानंतर भाजपने बांधलेली "रालोआ'ची मोटदेखील खिळखिळी होऊ लागली. पुन्हा "एकला चलो रे' सुरू होणार, अशी चिन्हे दिसू लागली. हिंदुत्व हा भाजपला संघ परिवाराशी जोडून ठेवणारा दुवा होता. महाजनांनी मोठ्या कसरतीने संघ परिवारासोबतचे नाते जपत राजकारणही केले होते. अलीकडे मात्र "हिंदुत्व' हाच भाजपच्या वैचारिक संभ्रमाचा मुद्दा झाला.

पक्षाच्या- अगदी जनसंघाच्या स्थापनेपासून- सत्तेचे वारेदेखील जवळपास फिरकत नव्हते, तेव्हापासून पक्षाच्या राजकीय वाटचालीचे पाईक असलेल्या अडवानी आणि वाजपेयी यांच्याबद्दल महाजनांच्या मनात अतीव आदर होता. कारण ते सत्तेच्या राजकारणासाठी पक्षकार्यात उतरलेले नेते नव्हते.
अडवानींच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासातील बराच मोठा काळ तर ते सत्तेबाहेरच होते. म्हणूनच, अडवानींच्या निरपेक्ष पक्षसेवेबद्दल प्रमोद महाजनांच्या मनात आदर होता.

... आज अडवानींच्या नेतृत्वगुणांवरूनही भाजपमध्ये वादळे उठली आहेत. अशा वेळी पक्षाला सावरण्याची कसरत करणारा मात्र कुणीही पक्षात दिसत नाही. कदाचित संघाच्या पडद्यामागच्या मार्गदर्शनातून भाजपमधील वादळे शमविली जातीलदेखील, पण महाजनांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या पोकळीमुळेच ही वादळे उमटली आहेत, हे आता सर्वांनाच जाणवत असेल. म्हणूनच, "आज महाजन असते तर?' असा प्रश्‍न सर्वसामान्य कार्यकर्त्याला केला तर क्षणभर तो अंतर्मुख होतोच.

आज महाजन असते तर पक्षाची आणि "रालोआ'ची ही स्थिती झाली असती?

म्हणूनच, "आज महाजन असते तर?' हा प्रश्‍न त्याला छळतो आहे...

(http://beta.esakal.com/2009/09/02151214/featured-article-maharshtra-pr.html)