Friday, July 3, 2009

'संस्कृतीरंगां'ची उधळण...

मुंबई - फिलाडेल्फियातील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात 'मराठमोळ्या' अमेरिकावासीयांच्या वेशभूषेतूनही मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब उमटणार आहे. महाराष्ट्राचे पारंपरिक वेगळेपण ठसविणाऱ्या या महोत्सवात कोल्हापुरी, पेशवाई आणि नागपुरी मेजवानीचा थाट आणि शालू-पैठणी, नथ, कोल्हापुरी साज आणि 'इरकली' साड्यांनी 'मराठी संस्कृतीरंगां'ची उधळण फिलाडेल्फियाच्या कन्व्हेन्शन सेंटरला सुखावून टाकणार आहे. मराठमोळ्या वेशभूषेची माहिती देणारा असाच एक 'ई-मेल' 'इनबॉक्‍स'मध्ये थडकताच अधिवेशनाच्या हजेरीसाठी आसुसलेल्या 'सगळ्या जणीं'ची साड्या खरेदीसाठी धावपळ सुरू झाली...

अमेरिकेच्या संस्कृतीशी एकरूप होतानादेखील मराठीप्रेमाचा धागा कायम राहावा म्हणून अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे होणाऱ्या या अधिवेशनाकडे जगभरातील मराठीजनांचे डोळे लागलेले असतात. गेल्या अनेक महिन्यांपासून माहिती महाजालावरील 'मायबोली डॉट कॉम' नावाच्या 'मायबोलीशी नाते सांगणाऱ्या पाऊलखुणां'मधील फिलाडेल्फिया अधिवेशनाचा कप्पा उत्साहाने ओसंडून वाहतोय. अधिवेशनाची आखणी सुरू झाली आणि अमेरिकेतील या 'मायबोलीकरां'च्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले. अधिवेशनाचा दिवस जवळ येत चालला, तसा हा धागा संवादाची गुंफण करत आणखी घट्ट होत चालला. कोण कुठून येणार, कुणी कुठे भेटायचे, कुणाला कोणत्या कार्यक्रमात पाहायचे, याची आखणी सुरू झाली... कुणाची राहण्याची सोय नव्हती, तर कुणाला सोबत नसल्याने हजर राहता येणार नव्हते. ऐनवेळी नोंदणी मिळेल की नाही, या चिंतेने कुणी हुरहुरत होते, तर कुणाला आशा भोसलेंचे गाणे 'जवळून' ऐकण्याची ओढ लागली होती. जेवणाच्या पंक्ती बसणार, की उभ्याउभ्याच जेवायचे, अशा शंकाही कुणाच्या मनात उमटत होत्या, तर काहींनी पहिल्याच दिवशी जेवणाच्या टेबलावरच 'गेट टुगेदर' करण्याची टूम काढली होती. कुणी सीएटलच्या अधिवेशनातील चवदार जेवणाच्या आठवणीत रमले होते, तर फिलाडेल्फियात 'चायनीज' किंवा 'सॅन्डविच'चा नाश्‍ता असेल तर... या शंकेने कुणी उगीचच हुरहुरत होते... शुक्रवारी, 3 जुलैच्या 'पेशवाई' जेवणासाठी पैठणी साडी, नथ, आणि साजेसे दागिने, नऊवारी असा मराठमोळा साज असेल, तर रात्रीच्या 'कोल्हापुरी' जेवणाच्या वेळी काठपदराची हिरवी इरकली साडी, कोल्हापुरी साज असा थाट असेल... लग्नातला शालू नंतर फारसा वापरला जात नाही म्हणून शनिवारच्या 'नागपुरी' जेवणाच्या पंक्तींना 'शालू'चा झगमगाट असेल... कोल्हापुरी साज मिळवण्यासाठी अनेकींनी महाराष्ट्रातल्या आपल्या नातेवाइकांच्या 'मेलबॉक्‍स'चा आधार घेतलाय...

अमेरिकेतील मराठी मने मराठी मातीत गुरफटलेलीच असतात... कधीतरी गावाची, मातीची ओढ त्यांनाही अनावर करते आणि गावाकडच्या आठवणींचे काहूर मनात माजते... मग ही माणसे एकमेकांच्या अधिक जवळ येतात, आणि मराठी संस्कृतीचा प्रत्येक सोहळा मनापासून साजरा करतात... मराठमोळेपण जपतानादेखील, अमेरिकेच्या मातीने दिलेले मोठेपण ही मराठी मने विसरत नाहीत... 4 जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन. त्यामुळे त्या रात्रीच्या 'मालवणी' जेवणाच्या वेळी, वेशभूषेतून अमेरिका आणि भारताच्या राष्ट्रध्वजांच्या रंगांचा सुंदर मिलाफ घडविण्याचाही आयोजकांचा मनोदय 'कानोकानी' होत सर्वत्र पोचला आहे...

http://beta.esakal.com/2009/07/02223240/maharashtra-mumbai-marathi-phi.html

No comments: