Tuesday, June 9, 2009

तिसरा सामना

नंदुरबारकडे जाताना रस्त्याच्या डावीकडे रनाळे आणि वावद अशी दोन लहानशी गावं लगटून वसलीत. रस्त्याकडे पाठ करून असलेली इथली घरं उगीचच आपली उत्सुकता वाढवतात. रस्त्याच्या दुसऱ्या अंगाला, नुसतं मोकळं मैदान लांबवर पसरलेलं....
नंदुरबारकडे जाताना मी रस्त्याच्या दोन्ही बाजू सहज न्याहाळत होतो.
आणि माझी नजर त्या मैदानावर खिळली. हे दृश्‍य आपण कुठंतरी पाहिलंय, असं उगीचच वाटत राहिलं. आणि "लगान'ची आठवण झाली.
त्या मैदानावर, भर दुपारच्या रणरणत्या उन्हात, क्रिकेटचा सामना सुरू होता...अगदी "लगान'मधलं दृश्‍य.मग मी तिथंच उतरलो. रस्त्याकडेच्या झाडाखाली एक टीम सावलीत बसली होती. त्यांचे दोन खेळाडू बॅटिंगला गेले होते. मीही त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. सहज एक फोटो काढला.
मग ओळख करून दिली आणि गप्पा सुरू झाल्या.
विशी-पंचविशीतली पंधरावीस मुलं सकाळपासून क्रिकेट खेळत होती. मी तिथं गेलो, तेव्हा त्यांचा दुसरा सामना सुरू झाला होता.
त्यांच्यातले बरेचजण आदिवासी समाजातले होते.
मी निवडणुकीचा विषय काढला आणि सगळ्यांनी माना फिरवल्या. कुणी बोलायलाच तयार नव्हतं. मी मात्र त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करतच होतो.
अखेर नाइलाज झाल्यासारखा एकजण बोलायला लागला.
हा त्या घोळक्‍यातला सगळ्यात जास्त शिकलेला तरुण . तो डी.एड. करत होता. सुट्टीला गावी आला होता. बाकीचे सगळे सातवी-आठवीनंतर शाळेला रामराम ठोकलेले.
"पेपर वाचता की नाही?'...माझ्या या प्रश्‍नावर कुणीच उत्तर दिलं नाही.
"कोण निवडून येणार?' मी पुढचा प्रश्‍न विचारला.
"आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही'.....एक जण तुटकपणानं बोलू लागला. "निवडणुकीचे आठपंधरा दिवस सगळेच दारू, चिकनमध्ये अटकलेत. मजा करतायत....नंतर पुन्हा तेच....आमच्या गावात गेली 18 वर्ष प्यायला पाणी नाही. भरपूर मोर्चे काढले; पण उपयोग झाला नाही. सरपंचाकडं तक्रार केली, तर "मुतून प्या' म्हणून सल्ला देतो'...दुसरा एक जण कडवटपणानं म्हणाला...
मग मी निवडणुकीचा विषय काढलाच नाही.
"काय करता तुम्ही सगळे?'....मी विचारलं.
"काही नाही...दिवस उजाडला, की एकत्र जमतो...इथं क्रिकेट खेळतो.'...डी.एड. करणाऱ्या त्या तरुणानं उत्तर दिलं.
"मग आता कामधंदे, शाळा-कॉलेज काही नाही?'...मी विचारलं.
"काहीजण करतात की. नंदुरबारला जातात. मजुरीनं काम करतात. कुणी बांधकामावर जातात...पण सध्या सगळे घरीच आहेत. काही जणांनी नोकरीचे फॉर्म भरलेत. निवडणुका झाल्या, की शिपायाच्या नोकऱ्या मिळणार असं सांगितलंय आम्हाला...निवडणुका संपायची वाट बघतोय. तो बॅटिंग करतोय, तो डिप्लोमा इंजिनिअर आहे. जागतिक मंदीमुळे त्याची नोकरी गेली. मंदी संपली की पुन्हा घेणारेत त्याला कामावर....तस मालकानं सांगितलंय'....तो म्हणाला.
"सुट्टीत काय करणार?'....मी आणखी एक खडा टाकला.
"क्रिकेट खेळणार. रोज तीन मॅच....12 घंटे लोडशेडिंग असतं. घरात बसून काय करणार?'....तो सहजपणे उत्तरला.
मी पुन्हा मुद्द्यावर आलो....निवडणुकीचा विषय ओघानं आलाच होता.
"तुम्ही ज्यांना निवडून देता, त्यानं तुमची काम केलीत?'....मी विचारलं आणि त्यानं होकार देत मान हलवली.
"आमच्या गावात गरिबांना ढोरं, बकऱ्या, अनाज भेटतंय....विधवांना पैसे मिळालेत.'....तो म्हणाला.
"मग मतदान कुणाला करणार?'....माझ्या या प्रश्‍नावर त्यानं हातातल्या घड्याळाकडे बघितलं. दुपार टळटळीत झाली होती.
"आमच्या भागात घड्याळच चालू आहे.'....तो उत्तरला.
नंदुरबारमध्ये कॉंग्रेसचा पंजा, भाजपचं कमळ आणि राष्ट्रवादीचा बंडखोर असा तिरंगी सामना आहे. डॉ. विजय गावितांचा भाऊ, राष्ट्रवादीच्या शरद गावितांनी कॉंग्रेसच्या माणिकराव गावितांच्या विरोधात समाजवादी पक्ष ाच्या तिकिटावर उभं राहून बंडखोरी केलीय. "भाऊ आपलं ऐकतच नाही,' असं विजयकुमार गावित सांगतात. ते राज्याचे मंत्री आहेत. शरद गावितांनी निवडणुकीआधीपासून खूप तयारी सुरू केली होती, असं इथले लोक सांगतात. तरीही उमेदवारी मिळाली नाही, म्हणून बंडखोरी केलीय.
नंदुरबार जिल्ह्यात "रीड इंडिया मिशन'चा प्रसार जोरात सुरू आहे. जागोजागी "वाचणारा नंदुरबार' अशा घोषणा रंगवलेल्या दिसतात.
इथला आदिवासी मतदार मात्र, "चिन्हा'ला मतदान करणार आहे.
...पण त्यांच्या घराघरात पोचलेलं चिन्ह. मतदान यंत्रावर दिसणारच नाहीये...

No comments: