Friday, June 26, 2009

अण्णांचा आशीर्वाद

शिर्डीहून संगमनेरकडे परतताना निमगाव जाळीजवळ आमच्या लाल-पिवळ्या मारुती ओम्नीनं झटका घेतला आणि मी एकदम जागा झालो. गाडी पट्टी सोडून रस्त्याच्या कडेला आली होती. ड्रायव्हर भेदरलेला दिसत होता. थोडेसे सैलावलेले दहा-बारा प्रवासीही झटक्‍यात जागे झाले होते.
एक अवजड ट्रक आम्हाला हूल देऊन भन्नाट वेगानं पुढे गेला होता... ड्रायव्हरने त्याच्या भाषेत त्या ट्रकला शेलकी विशेषणं वापरली आणि पुढे पळणाऱ्या ट्रककडे बघून तो उपहासाने हसला.
"काय झालं...?' मी विचारलं.
त्यानं डोळ्यांनीच ट्रकच्या पाठीवर लिहिलेली अक्षरं मला दाखवली..."अण्णांचा आशीर्वाद'
"आजकाल कुणीही उठतंय आणि अण्णांचा आशीर्वाद मिळाल्यावर कसं पन वागायला लागतंय...' तो बोलून गेला आणि माझं कुतूहल चाळवलं. हा कुठल्या अण्णांबद्दल बोलतोय, हे मला समजत नव्हतं.
तोवर आमच्या गाडीचा ड्रायव्हर आणि माझ्यासकट सगळी गर्दी सावरली होती. त्याच्या या वाक्‍यावर बाकीचे सगळे समजल्यागत हसले. मी मात्र कोराच होतो. त्यानं हे ओळखलं असावं.
"अहो, आमच्याकडले सगळे उमेदवार ऊठसूट पारनेरला चाललेत. अण्णांना भेटून येत्यात आणि जनतेला सांगतात, अण्णांनी आशीर्वाद दिलाय म्हणून... अण्णांचा आशीर्वाद म्हणजे विजयाची खात्री...' तो म्हणाला आणि मी समजून गेलो.
अण्णा म्हणजे अण्णा हजारे... तो नगर मतदारसंघातल्या उमेदवारांबद्दल बोलत होता. हूल मारून पळून जाणाऱ्या त्या ट्रकच्या पाठीवरल्या अक्षरामुळे अण्णा हजारेंच्या आशीर्वादाचं प्रचारासाठी भांडवल करणाऱ्या उमेदवारांबद्दलची त्याची भावना जागी झाली होती.
संगमनेरला पोचलो. अण्णा हजारेंच्या कार्यालयात फोन लावला. अनिल शर्मांशी बोलणं झालं आणि कोडं आणखी उलगडत गेलं.
निवडणुकीच्या प्रचाराला रंग भरू लागल्यापासून नगर जिल्ह्यातल्या सगळ्या उमेदवारांची अण्णांच्या दर्शनासाठी रीघ लागली होती.
अण्णांचे आशीर्वाद घेऊन परतलेले हे उमेदवार मग प्रचारातही त्याचा वापर करीत होते, हे लक्षात आल्यावर अण्णांना त्याचा इन्कार करावा लागला होता.
माझे आशीर्वाद म्हणजे पाठिंबा नव्हे, हे स्पष्ट करून अण्णांनी मतदार जागृतीची एक मोहीमच सुरू केली. सत्कर्म करणारा, जनतेचे प्रश्‍न सोडवणारा आणि जनतेच्या समस्यांची जाण असणाऱ्या उमेदवारालाच मत द्या... असं आवाहन करणारी पत्रकं मग अण्णांनी राज्यात जिल्ह्याजिल्ह्यात पाठवली.
नगर मतदारसंघातले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिवाजीराव कर्डिले, कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार राजीव राजळे आणि भाजपचे दिलीप गांधी या सर्वांनीच अण्णांचे आशीर्वाद घेतले होते; पण अण्णांचा पाठिंबा मात्र मिळाला नाही. परंतु यामुळे अण्णांची मोहीम राज्यभर पसरली.
मात्र, या निकषात बसणारे उमेदवार बहुधा त्यांनाही मिळाले नाहीत.
संपूर्ण राज्यात अण्णांनी फक्त तीन मतदारसंघांमधल्या तीन उमेदवारांची शिफारस केली होती...
लोकांचे प्रश्‍न सोडवणारे, अन्यायाला वाचा फोडणारे आणि जनतेच्या प्रश्‍नावर आंदोलनं करणारे तीन उमेदवार लोकसभेत जावेत, अशी अण्णांची इच्छा होती.
महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये बहुधा सर्वत्र बहुरंगी लढती ल्हाल्या. राजकीय पक्षांचा, आघाड्यांचा आणि युतीचा पाठिंबा असलेले अनेक नामांकित उमेदवार रिंगणात उतरले होते.
नगर जिल्ह्यातल्या उमेदवारांनी केलेली अण्णांची दर्शनवारी फारशी फलद्रूप ठरली नाही. "अण्णांचा आशीर्वाद' प्रचारात आणण्याचे प्रयत्न फुसके ठरल्यावर मग नेहमीचीच प्रचारनीती सुरू झाली. लालकृष्ण अडवानी दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा, काळा पैसा अशा विषयांवर बोलून गेले. शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि स्थानिक प्रश्‍नांना हात घातला.
नगरचे कॉंग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे राज्यातल्या कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार समितीचे नेतृत्व असल्यामुळे ते नगरमध्ये फारसे नसतात, असं लोक म्हणतात. राजळे म्हणजे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे. त्यांनी बंडखोरी केली असली, तरी थोरातांनी आघाडीचा धर्म पाळायचं ठरवलेलं. दिलीप गांधींच्या प्रचारात "युती' दिसत नाही, असं काहींचं म्हणणं...
नगरमध्ये कोण निवडून येईल, ते सांगता येत नाही, असंच उत्तर कोणीही देत होतं.
निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसा कुणातरी एकाचा विजय निश्‍चित होईल, असं म्हटलं जायचं...
...आणि निवडणुका पार पडेतोवर अण्णांच्या आशीर्वादाचं प्रकरणही फारसं ताजं राहिलेलं नव्हतंच!

No comments: