Thursday, June 4, 2009

आचारसंहिता

सातत्याने हाल सहन करावे लागले, की ती जणू जीवनशैलीच होऊन जाते. असं जगण म्हणजेच आयुष्य असं वाटायला लागतं. विनोबांच्या वर्ध्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहतायत. आत्महत्यांमुळे वर्धा जिल्हा जगाला माहीत झाला. इथल्या प्रचारातही मदतीचे पॅकेज हाच मुख्य मुद्दा आहे.
`तरीही इथल्या समस्या संपलेल्या नाहीत.' वर्ध्यात एका चहाच्या टपरीवर ओळख झालेल्या एकाशी गप्पा मारताना मी तसं म्हणालो आणि तोही हसला.
`का हसलात?' ... मी विचारलं.
`तुम्हा पुण्या - मुंबईकडच्यांना हे सगळं वेगळंच वाटणार... आम्हाला यात नवीन काहीच नाही.' तो म्हणाला.
`विदर्भातल्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. अनेक जण पोरके झाले. सरकारनं त्यांच्यासाठी हजारो कोटींचं पॅकेज जाहीर केलं. पुढे काय झालं? त्यानं मला उलटा प्रश्žन केला.
...`अशी अनेक कुटुंबं आजही वाऱ्यावरच आहेत. कोट्यवधींचा निधी कुठे गेला? मदत म्हणून आलेल्या गाई-म्हशी कुठे गेल्या? ' तो एकामागोमाग एक प्रश्žन विचारत होता.
`इथे दुभत्या गाई वाटताना, त्यांच्या कालवडींना त्यांच्यापासून तोडलं... कालवडी ठेवून घेतल्या आणि गाईंसोबत दुसऱ्याच गायांचे गोऱ्हे जोड्या करून वाटले. कसं देतील त्या दूध?' ...त्याच्या सुरात कडवटपणा भरला होता.
`आमच्या जिल्ह्यात मदतीचा ओघ आला; पण आत्महत्याग्रस्त कुटुंबांनाच डावललं गेलंय. पवनारला हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्žया आत्महत्या झाल्या असतील; पण लाभार्थी तब्बल 38. त्यांना विहिरी खोदण्यासाठी लाखांचं अनुदान मंजूर झालंय. आणि अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विहिरी नाहीत. काही जण आता कोर्टात गेलेत. रंजना देशमुखपण वादी आहे.' तो म्हणाला आणि मला रंजना देशमुख आठवली.
पतीनं आत्महत्या केल्यानंतर सोनिया गांधी सांत्वनासाठी तिच्या घरी गेल्या होत्या. वर्ध्यापासून दहा- पंधरा किलोमीटरवरच्या तळेगावातल्या रंजनाच्या घरी तेव्हा प्रसारमाध्यमांची रीघ लागली होती...
`विहिरीचं अनुदान मिळावं म्हणून रंजना अजूनही वणवण करतेय... त्याच गावातल्या एकाच्या नावावर सातबारापण नाही, आणि त्याला मात्र विहीर मंजूर झालीय... आता ती खोदायची कुठं हा प्रश्žन त्याला पडला असेल..' म्हणूनच म्हणतो, आम्हाला हे रोजचंच झालंय...' अचानक त्यानं बोलणं थांबवलं.
`रंजना देशमुखला भेटता येईल का?' मी त्याला विचारलं.
`तिचं गाव इथून अर्ध्या तासाच्या अंतरावरच आहे.' तो म्हणाला. लगेचच त्यालाच बरोबर घेऊन मी तळेगावकडे निघालो.
रंजना देशमुखच्या घरी पोचलो, तेव्हा अंधारत होतं... रंजनाबाई घरातच होत्या. मी ओळख करून दिली आणि आम्ही आत गेलो.
घरात समोरच्या भिंतीवर रंजनाबाईंचं सांत्वन करताना सोनिया गांधींचा फ्रेम केलेला फोटो लटकावला होता. सुशीलकुमार शिंदे आणखी काही नेतेही त्यात दिसत होते.
`नंतर कुणीच आलं नाही. विहीरपण मिळाली नाही.' रंजनाबाईंनीच बोलायला सुरवात केली.
`सोनिया गांधींच्या हातानं एक लाखाचा चेक मिळाला. त्यातले 30 हजार आतापर्यंत संपलेत. 70 हजारांची पावती केलीये... 25 हजारांची शेतीची औजारं मिळाली. पण ती आमच्याकडे आधीपास्नंच होती. आमची जमीन कोरडवाहू आहे. खरं तर विहिरीसाठी अनुदान मिळायला हवं. मी खूप प्रयत्न केले. पण काहीच उपयोग नाही...' रंजनाबाईंच्या आवाजात खंबीरपणा होता.`पण तुम्हाला गाई मिळाल्या असतील ना. मी विचारलं.
`मिळाल्या पण त्या दूध देत नव्हत्या. विकल्या. सहा हजारांचा तोटा झाला माझा त्यात... गाईसाठी अर्ध अनुदान होतं. आणि अर्धे पैसे शेतकऱ्यानं भरायचे होते. मला 16 हजारांची एक गाय, अशा दोन गाई मिळाल्या. मी सोळा हजार भरले. नंतर दहा हजारांत दोन्ही गाई विकल्या. सहा हजार गेले. गाईपण गेल्या. आता विहिरीसाठी अर्जविनंत्या केल्यात. रोज कलेक्žटरपासून सगळ्यांना भेटते. पण... आता निवडणुकीची आचारसंहिता आहे. आचारसंहिता संपेपर्यंत काही होणार नाही म्हणतात ते...' रंजनाबाई म्हणाल्या.
आचारसंहिता संपल्यावर शेतात विहीर होईल, अशी त्यांना आशा आहे.
रंजनाबाईंची समस्या अजूनही संपलेली नाही.
`...म्हणूनच म्हणतो, आम्हाला हे नेहमीचंच आहे.' ...रंजनाबाईंच्या घरातून बाहेर पडल्याक्षणी तो पुन्हा म्हणाला.
...गावात अंधार गडद झाला होता. मिणमिणते दिवे केविलवाणे दिसत होते.

2 comments:

Anonymous said...

सही!
आचारसंहितेचा बडगा म्हणतात, तो सामान्य माणसालाच सोसावा लागतो. यंत्रणा मात्र कठोरच असतात.

Anonymous said...

इथे दुभत्या गाई वाटताना, त्यांच्या कालवडींना त्यांच्यापासून तोडलं... कालवडी ठेवून घेतल्या आणि गाईंसोबत दुसऱ्याच गायांचे गोऱ्हे जोड्या करून वाटले. कसं देतील त्या दूध?'
- भयानक आहे.