Sunday, May 31, 2009

प्रस्ताव.."त्यांनी प्रस्ताव आणलाय... माझ्या जिवाला धोका आहे.' त्याच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती.
गडचिरोलीच्या जंगलात बांबू तोडायला गेलेला तो कुणा नातेवाइकाच्या सांगण्यावरून नक्षलवादी टोळीत दाखल झाला आणि तिथल्या वास्तवाचे चटके नंतर त्याला असह्य होऊ लागले.
पण, परतीचे दोर कापले गेले होते. तो नक्षलवादी चळवळीत गुरफटला होता.
उदरनिर्वाहाचं काहीच साधन हातात नव्हतं. खस्ता खातच बायकोनं कधीतरी अंथरूण धरलं आणि खंगत जग सोडलं.
""दोन मुलांना मागं ठेवून ती निघून गेली. मुलं भुकेनं केविलवाणी झाली, की डोकं भणभणून जायचं आणि मुलांना उपाशी झोपवून मी घराबाहेर पडायचो... जंगलातून बांबू आणायचो आणि विकून कधीतरी हातात पडणाऱ्या पैशातून उपाशी मुलांची भूक भागवायचो... सात वर्षं झाली त्याला. एकदा असाच जंगलात बांबू तोडत होतो आणि अचानक ते माझ्याभोवती उभे राहिले. मी घाबरलो. तेवढ्यात एक जण पुढे आला. मी निरखून पाहिलं.
तो माझाच एक नातेवाईक होता. आम्ही झाडाखालीच गप्पा मारत बसलो. "मजेत आहे,' असं तो सांगत होता आणि माझ्या डोळ्यांसमोर घरातलं दारिद्य्र, भुकेली मुलं दिसत होती.''
गडचिरोलीजवळच्या एका गावात, फारशी वर्दळ नसलेल्या रस्त्याकडेच्या पानाच्या ठेल्याचा तो पोरगेलासा मालक माझ्यासमोर त्याच्या आयुष्यातील एक भयानक वळण उलगडत होता. मी थिजल्यासारखा त्याच्या डोळ्यांत पाहत ऐकत होतो.
आत्मसमर्पण केल्यानंतर सरकारी पुनर्वसन योजनेतून त्याला ते दुकान मिळालं होतं. घरकुल योजनेतून घरही मिळालं होतं. त्यानं पुन्हा लग्नही केलं होतं. त्याच्या पहिल्या दोन मुलांना आणखी एक भावंड मिळालं होतं. नक्षलवाद्यांच्या टोळीत वावरताना हरवलेला आनंद तो पुन्हा अनुभवत होता.
पण, मधूनच बोलताना त्याची नजर आसपास भिरभिरत होती आणि त्यानं आसपास पाहिलं, की मला त्याचं ते वाक्žय आठवत होतं,
"त्यांनी प्रस्ताव आणलाय...'
गडचिरोली मतदारसंघातल्या निवडणुकीच्या वाऱ्यांचा अंदाज घ्यायला मी त्या दिवशी शहरात फिरत होतो. फिरत-फिरत जिल्हाधिकारी कार्यालयात पोचलो.
निवडणुकीच्या दृष्टीनं हा जिल्हा खूपच संवेदनशील. छत्तीसगडच्या निवडणुकीत गेल्या वर्षी नक्षलवाद्यांनी घातलेल्या धुमाकुळानंतर गडचिरोलीचं प्रशासन सावध झालंय. सीमेवरच्या प्रत्येक मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी आणि काही घातपात झालाच, तर वेळच्या वेळी उपचार मिळावेत म्हणून एक व्यापक आरोग्य आराखडाही तयार आहे. अगदी ऑक्žसिजनच्या सिलिंडरपासून रक्žतगटाच्या यादीपर्यंतची सर्व तयारी प्रत्येक केंद्रावर राहणार आहे. नक्षलवादी कारवायांच्या धोक्žयाला तोंड द्यायची जय्यत तयारी सुरू आहे. निवडणुकीवर बहिष्कार घालायचं आवाहन करणारी नक्षलवाद्यांची पत्रकं सापडल्यानं, तयारीत कोणतीही कसूर करायची नाही, असं जिल्हा प्रशासनानं ठरवलंय.
जिल्हाधिकारी कार्यालयातला एक अधिकारी मला ही माहिती देत असतानाच मला मात्र आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याला भेटायची इच्छा अनावर होत होती. तिथून बाहेर पडलो आणि कर्मचाऱ्याला गाठलं.
""सरेंडर झालेल्या एकाला तरी भेटायचंच आहे मला,'' मी त्याला विश्žवासात घेऊन बोललो आणि तो राजी झाला. त्यानं एका कागदावर नकाशा काढून दिला आणि त्याचा ठावठिकाणी सांगून तो घाईघाईनं खोलीत परतला.
मी बाहेर पडून रस्ता धरला. बऱ्याच प्रवासानंतर मी त्यानं सांगितलेल्या खाणाखुणांशी पोचलो. रस्त्याकडेच्या पानाच्या ठेल्याशी उभा राहिलो. तो आसपासच होता. दोन-चार मिनिटांनंतर तो आला आणि वाकून आत शिरत दुकानाच्या फळकुटावर बसला.
मी त्याला माझी ओळख करून दिली. तो सरेंडर झालेला नक्षलवादी आहे, हे मला माहीत आहे, हे सांगितलं. मला ते कसं कुठून कळलं, तेही त्याला सांगितलं आणि त्यानं विश्žवासानं माझ्याकडे बघितलं.
""कसा गेलास तू त्यांच्यात?'' मी त्याला थेट विचारलं आणि तो बोलता झाला...
""जंगलात बांबू तोडायला गेल्यावर पहिल्यांदा भेटलेला तो नंतरही काही वेळा भेटला. इथं खूप चांगलं आहे, असं नेहमी सांगायचा. मलाही चल म्हणायचा. हळूहळू मलाही तसं वाटू लागलं; पण मुलांची काळजी होती. त्यांना शाळेत घालायचं होतं. त्यांच्या पोटापाण्याची काळजी घेणारं कुणीच नव्हतं. ते त्याला सांगितलं, तेव्हा "आम्ही ते सगळं करू,' असं तो म्हणाला.''
""असं जवळपास दोन वर्षं सुरू होतं. माझा निर्णय होत नव्हता. एकदा मुलं उपाशी होती. त्या दिवशी मी जंगलात गेलो आणि सरळ त्यांच्यात सामील झालो. आपण नक्षलवादी झालो आहोत, हे मला माहीत होतं; पण ते मुलांसाठी..'' भिरभिरत्या नजरेनं इकडे तिकडे पाहत तो बोलत होता.
""नंतर मात्र त्यांनी मुलांकडे बघितलंच नाही. पैसेही दिले नाहीत. मला मुलांची काळजी वाटत होती. मी नेहमी कमांडरला विचारत होतो. पैसे पाठवायची आठवण करत होतो. आमची वादावादी व्हायची. मुलांना मदत करणार नसाल, तर मी परत जातो, असंही सांगून बघितलं; पण मला ते सोडणार नव्हते. उलट माझ्यावर पाळत सुरू झाली. मारून टाकायची धमकीही दिली. दलातून बाहेर पडणाऱ्यांचं काय होतं, ते तोपर्यंत मलाही माहीत झालं होतं. मी पुरता कोंडीत सापडलो होतो,'' त्याचे शब्द थरथरत होते.
""त्या दिवशीही बाचाबाची झाली आणि त्यानं एकदम बंदूकच उगारली. माझ्या डोक्žयावर नेम धरला. मी लाथ मारून त्याला पाडलं. झटापटीत त्याची बंदूक माझ्या हातात आली. अचानक गोळी सुटली आणि त्याच्या काखेखाली घुसली. तो पडला होता. मी पळालो आणि जंगलातून निसटून थेट पोलिसांकडे आलो. आत्मसमर्पण केलं. दुसऱ्या दिवशी पोलिसांना घेऊन गेलो आणि सगळे अड्डेही दाखवले. आता मी पुन्हा माणसांत आलोय; पण ते मला शोधतायत. त्यांच्या कमांडरला मी ठार मारलं, म्हणून मला मारायचा प्रस्ताव त्यांनी ठेवलाय. कुणीही कुठूनही येतील आणि मला मारतील.'' पुन्हा त्याच्या डोळ्यांत भीतीची रेषा चमकली.
""साहेब माझं नाव टाकू नका,'' काकुळतीनं तो म्हणाला. मी त्याच्या हातावर थोपटलं.
""मी फिरू शकत नाही, मजुरीही करू शकत नाही. आता मला "सर्व्हिस पोलिस'मध्ये घेणार आहेत. म्हणजे मी वाचेन आणि पगारही मिळेल. मुलांना शाळेत जाता येईल.'' कधीपासून उराशी जपलेलं स्वप्न त्यानं अजूनही जिवंत ठेवलंय.

No comments: