Friday, January 9, 2009

कुत्र्यांचे घर!

माणसांच्या संगतीत, कुटुंबाच्या जिव्हाळ्यात आणि कोडकौतुकात वाढलेल्या पाळीव कुत्र्याला कधीकधी इतकं "माणसाळलेपण' येतं, की आपण कुत्रे आहोत, हेच तो विसरून जातो. तो माणसासारखाच वागतो आणि बाकीच्या कुत्र्यांना "कुत्र्यासारखं' वागवतो. त्याला आपल्या "समाजा'ची समज यावी, म्हणजे, आपल्या पाळीव कुत्र्यानं थोडं "सोशल' व्हावं, म्हणून अनेक "मालक' उपाय शोधत असतात. घड्याळाच्या काट्यासोबत धावणाऱ्या कुटुंबांच्या घरातल्या पाळीव कुत्र्याला त्यासाठी चार भिंतींआडून बाहेर काढले, तरी ठेवायचे कोठे, हीदेखील एक समस्याच असल्याने, अनेक कुटुंबांना आपल्या कुत्र्याची "घुसमट' समजूनदेखील उपाय सापडत नव्हता. नेमकी हीच बाब ठाण्याच्या सनील आणि अपर्णा कदम या जोडप्यानं हेरली. कुत्र्यांचा लळा, कुत्र्यांची जोपासना हा आपला "छंद' कायमस्वरूपी "व्यवसाया'त बदलण्याचे ठरवून दहा वर्षांपूर्वी त्यांनी आपला मुक्काम कल्याण भिवंडी रस्त्यावरील चाफ्याचा वाडा जवळील भवाले गावात हलविला, आणि तिथल्या एकरभर जागेचा कायापालट झाला. या जागेवर एक सुसज्ज असे "डॉग रिसॉर्ट' आणि कुत्र्यांसाठीचे "लॉजिंग' उभे राहिले आहे. वेगवेगळ्या जातींची, जन्माची आणि वंशांची जवळपास साठ "सुंसंस्कृत' कुत्री या रिसॉर्टमध्ये आनंदाने बागडताहेत आणि आपल्या कुत्र्यांना कुटुंबाचा एक घटक समजून वागविणाऱ्या अनेक कुटुंबांची मोठी समस्या मार्गी लागली आहे.

सनील आणि अपर्णा कदम यांच्या "अपसान रिसॉर्ट'मध्ये या कुत्र्यांसाठी वातानुकूलित "रूम्स'देखील आहेत. इथे मुक्कामाला येणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला "सोशल लाईफ'चा आनंद देण्यासाठी सनील आणि अपर्णा धडपडत असतात. हिरवळीवरचं बागडणं, दर्जेदार खाणं, आणि नवे "मित्र' जोडून माणसांच्या चार भिंतीआडच्या जगातून बाहेर पडून आपल्या विश्‍वात रमणं हा इथे मुक्कामाला येणाऱ्या सर्व कुत्र्यांचा "हक्क' त्यांना मिळावा, यासाठी हे जोडपं आपल्या आनंदावरही कधीकधी पाणी सोडते. "व्यवसाय' म्हणून स्वीकारलेल्या या "उद्योगा'त रमण्यासाठी मनही "मोठं' करावं लागतं, आणि माणुसकीचा झरा जिवंत ठेवावा लागतो, हे या जोडप्याकडे येणाऱ्या प्रत्येक "क्‍लायंट'लाही शिकायला मिळतं, ते त्यामुळेच! घरातल्या कुणाची तरी, विशेषतः मुलांची हौस म्हणून एखादं चांगल्या पैदाशीचं गोंडस पिल्लू घरी आणलं जातं, आणि त्याच्या कोडकौतुकात काही दिवस आख्खं कुटुंब हरवून जातं. सुट्टीच्या दिवसात या पिल्लांशी खेळणं हा घरातल्या लहानग्यांचा विरंगुळाच होऊन जातो. पण, पिल्लं मोठी होतात, तेव्हा त्यांच्याही "गरजा' असतात, याचे शिक्षण अनेक कुटुंबांना नसते. आणि घरातला हा घटक एकलकोंडा होतो. त्याला सुट्टीची, विरंगुळ्याची गरज भासू लागते. ही गरज "अपसान'मध्ये पूर्ण होते. "कुत्रा पाळणे' आणि कुत्र्याचे "संगोपन' या गोष्टी सहजसोप्या नाहीत, याची जाणीव इथे आल्यानंतर मालकांनाही होते, आणि इथला मुक्काम हलवून "घरी' परतणाऱ्या प्रत्येक कुत्र्याबरोबर मालकालाही एक नवे प्रशिक्षण सहजपणे मिळून जाते.

सनील आणि अपर्णा यांनी या कामात स्वतःला इतके गाडून घेतले आहे, की गेल्या दहा वर्षांत हे जोडपे स्वतःची सुट्टी घालविण्यासाठी कोठेही बाहेर गेलेले नाहीत. काही कुत्री तर त्यांच्या लॉजिंगमध्ये गेल्या दोन अडीच वर्षांपासून मुक्कामाला आहेत. त्यांचे मालक कधीतरी "वीकएन्ड'ला इथे येतात, आपल्या कुत्र्यासोबत दोनचार तास आनंदात घालवतात, त्यांच्याशी खेळतात, त्याचे कोडकौतुक करतात आणि पुन्हा मुंबईच्या धावपळीत परततात. तो कुत्रा पुन्हा आपल्या शेजाऱ्यांसोबत इथल्या हिरवळीत रमतो, आणि सनील-अपर्णा दिसताच, त्यांच्याशी लडिवाळपणा करतो. पण आपण या कुत्र्याचे "मालक' नाही, तर केवळ "व्यवस्थापक' आहोत, या जाणीवेनं सनील आणि अपर्णा आपल्या घरच्या या "पाहुण्यां'शी तसेच "अंतर' ठेवूनच वावरतात. कारण, कुत्र्याच्या जातीला कधीकधी माणसापेक्षाही जास्त "समज' असते, हे त्यांना अनुभवावरून माहीत आहे. आपल्याकडे आलेला कुत्रा हा दुसऱ्या "कुटंबा'चा घटक आहे, याची जाणीव ठेवूनच, ते आपल्या "पाहुण्यां'चा पाहुणचार करतात. यातूनही या पाहुण्यांना प्रेम मिळते, आणि आपल्या मुक्कामात हे पाहुणे ते सातत्याने व्यक्त करतात.

"कुत्रा पाळणे' या संकल्पनेचा विस्तार होत असताना, आजकाल अनेक कुटुंबांमध्ये कुत्र्यांमधील उच्च नीचतेच्या कल्पना हद्दपार होत आहेत, असे सनील कदम यांना वाटते. एकेकाळी विदेशी जातीची, देखणी आणि आपल्या घरात, दिवाणखान्यात शोभतील, अशी कुत्री पाळली जात असत. आता मात्र, अनेक कुटुंबांनी "माणुसकी'ला जागून रस्त्यावरच्या भटक्‍या कुत्र्यांनादेखील "आपले' केले आहे, असा सनील कदम यांचा अनुभव आहे. "रस्त्यावरची' म्हणून हटकल्या जाणाऱ्या कुत्र्यांनादेखील खूपच चांगली समज असते, आणि आपल्या मालकाच्या कुटुंबातील संस्कार ही कुत्रीदेखील सहज आत्मसात करतात, असा त्यांचा अनुभव आहे. सनील आणि अपर्णा कदम हे दोघेही चांगले "ट्रेनर' आहेत. विदेशी कुटुंबांकडील "देशी' कुत्र्यांनादेखील त्यांच्या "केनेल'मध्ये सन्मानाने वागविले जाते. विदेशी कुटुंबांमध्ये अलीकडे रस्त्यांवरच्या कुत्र्यांचे संगोपन करण्याचा कल वाढत आहे आणि देशी कुटुंबेही या कुत्र्यांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करू लागली आहेत. "भटकी कुत्री' म्हणून संभावना होत असलेल्या या समजूतदार प्राण्यांना आता अनेक उच्चभ्रू कुटुंबांचे प्रेम मिळू लागले आहे. इतर श्‍वानप्रेमींनीदेखील सामाजिक बांधीलकी आणि माणुसकी म्हणून याचे अनुकरण करावे, यासाठीही सनील आणि अपर्णा कदम यांनी असंख्य कुटुंबांचे मन वळविले आहे. त्यांच्या "व्यावसायिकते'मधून "माणुसकी'चे प्रतिबिंब ओसंडत असते, आणि प्रभावी "सिक्‍स्थ सेन्स' असलेल्या कुत्र्यांना ते माणसाआधी कळते, म्हणूनच त्यांच्या "लॉजिंग'वर येणारा प्रत्येक पाहुणा आनंदी असतो...

1 comment:

Anonymous said...

हा लेख माहितीपूर्ण आणि माणुसकीपू्र्ण वाटला. चांगला दृष्टिकोन.