Monday, July 14, 2008

‘यू टर्न’

‘यू टर्न’

काल मला एक माणूस भेटला... ह्यात सांगण्यासारखं काहीच नाही. पण त्याच्यामुळे, मी ‘समाधानाची चव’ चाखलेल्या एका सुखी माणसाला पाहिलं. कदाचित, हे त्याला स्वत:लापण माहीत नसेल, पण तो समाधानी आहे. त्याच्या मनाच्या कोप-यातला समाधानाचा कप्पा आजही, इतक्या वर्षांनंतर्ही, तितकाच भरलेला आहे. त्या कप्प्यात मी डोकावून आलोय...
समाधानाचं शिखर गाठलेली माणसं आजूबाजूला चिकार आहेत. मी ज्याच्याबद्दल सांगतोय, हा माणूस मात्र फाटकाच आहे. त्या माणसाचं नाव विचारावं, असंदेखील मला त्याच्याबरोबरच्या त्या पाचसात मिनिटांच्या भेटीत वाटलं नाही... कदाचित, आज मी त्याला विसरूनसुद्धा गेलो असतो.. पण, सहज घरात इकडच्यातिकडच्या गप्पा मारताना आज मी सहज म्हणून त्याची हकीकत सांगायला लागलो, आणि, त्या माणसाच्या वेगळेपणाची जाणीव मला स्पर्श करून गेली.... हा माणूस समाधानाच्या शिखरावर पोहोचलेला नाही, पण त्या शिखरापर्यंत जाऊन आलाय, त्या शिखराला नकळत स्पर्श करून आलाय, असं मला वाटलं. आणि, माझ्यासाठी, हेच त्याचं त्याचं वेगळेपण ठरलं. त्याच्या समाधानाचं ते शिखरही, अगदी खडतर वाटचालीचं नाही. अनपेक्षितपणानंच कधीतरी एकदा ते शिखर त्याला सापडलं, आणि तो तिथं पोहोचला. आपण तिथवर पोहोचून आलोय, हे त्याला माहीतही नाही. त्याच्या दृष्टीनं ती फक्तं एक आठवण आहे. मलाच त्यात काहीतरी वेगळं वाटतंय... कारण, तिथं जाऊन तो परत त्याच्या आधीच्या जगात परत आलाय....

‘मुम्बईवरनं आलात?’ लॊन्ड्रीवाला लगेच ईस्त्री करून देतो म्हणाला, म्हणून मी उभा होतो, तेव्हा टपरीतच कडेला एका स्टुलावर बसलेल्या त्या माणसानं माझ्याकडे थेट पहात विचारलं. साठीच्या आसपास झुकलेला तो माणूस, कामधंदा नसल्यानं वेळ घालवायला तिथं बसला होता, हे त्याच्याकडं पाहाताच लक्षात येत होतं. मी त्याचा प्रश्न ऐकल्या न ऐकल्यासारखं केलं आणि रस्त्याकडं बघत उभा राहिलो.
‘नेने वकिलांकडं आलायत?’ पुन्हा त्यानं विचारलं.
मी त्याच्याकडं न पाहाता नकारार्थी मान हलवली.
‘मग, काळ्यांकडं?’ त्यानं पुढचा खडा टाकला, आणि पुन्हा मी मान हलवून नाही म्हटलं.
‘तुम्ही ब्यांकेत काम करता?’ त्याच्या चौकशा सुरूच होत्या, आणि मी फक्त मान हलवत नाही म्हणून खुणेच्याच भाषेत बोलत होतो.
‘आम्च्या रत्नांग्रीसारखी म्हागाई जगात कुठे सापडायची नाय...’ माझी माहिती काढायचा नाद अखेर सोडून देऊन त्यानं नवा मुद्दा घेतला.
कदाचित, नुस्तं बसल्यावर येणारा कंटाळा घालवण्यासाठी कुणाशीतरी, किवा कुणीतरी, आपल्याशी चार शब्द बोलावं, एवढीच त्याची माफक अपेक्षा असावी.
मी रस्त्यावरची नजर हटवून त्याच्याकडे पाहिलं.
जोरजोरात मान हलवत आणि खाली सोडलेले पाय एवढ्याशा स्टुलावर ओढून गुडघे छातीशी घेत पुन्हा त्यानं तेच वाक्य उच्चारलं.
‘आता तुमीच बगा, एका कपड्याच्या इस्तरीला तीन रुप्पय घेतात... साकर, ईस रुपय किलो... भाजी तं चालीस नि पन्नास रुप्पय किलो... छ्या., लय म्हाग रत्नांग्री’ तो पुट्पुटला.
‘अहो, सगळीकडंच, आमच्या मंबईतपण अशीच महागाई आहे’ त्याच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरासकट मी त्याच्याशी बोललो.
‘तरीपन, हितल्यासारकी म्हागाई कुटंच न्हाई’ तो हेका सोडायला तयार नव्हता.
‘हल्लीच वाडली इतकी... पयले न्हवती’...
वय झालेली माणसं जुन्या आठवणीत रमतात. श्रोता मिळाला, की त्या आठवणींचे कप्पे उघडतात. आता तो असंच काहीतरी सांगायला सुरुवात करणार, हे मी ओळखलं...

‘तुमाला सांगतो, मागं, मी आसंन पंचविशीचा... आमच्या परड्यातली चार कलमं त्या साली चांगली धरली व्हती. ह्या असलं येकेक फळ व्हतं...’ हाताची पाचही बोटं ताणून पंजा ताठ करत त्यानं मला दाखवला.
‘पाच पेट्या भरल्या, नि त्या घेऊन मी मुम्बईला गेलो... पन नेमका त्याच दिवशी न्हेरू वारले... सगळीकडं शुकशुकाट.. खेप फुकट जानार, आसं वाटलं... नशीबच न्हाई, आसं म्हनत मी धक्क्यावर बसलो व्हतो. बाजारात पेट्या घेऊन जान्यात अर्थ न्हाई, आता वापस रत्नांग्रीला जायाचं, आसा ईचार करत व्हतो... ईतक्यात, दोनचार फॊरिनर तितं आले..’
...त्याच्या बोलण्याकडे माझं फारसं लक्षं नव्हतं, पण मी ऐकत होतो.
‘खुणेनंच त्यांनी विच्यारल्यानी, काय हाय म्हणून... मी सांगितलं, हाप्पूस... अस्सल आंबा... लगेच एक आंबा काडला, नि कापून त्यांच्या हातावर ठेवला... आनि माजं नशीब पालटलं’
... आता मी फक्त त्याचंच बोलणं ऐकत होतो.
‘त्यांनी आंबा खाल्ला, आनि विचारलं, कसा दिला म्हणून... मला इंग्लिश आकडे म्हाईत नव्हतं, म्हणून, तीन बोटं दाखवली...आनि, दीड हज्जार रुपय माज्या हातावर देवून पेट्या उचलल्या..’
त्या क्षणाला तेव्हा त्याला काय वाटलं असेल, हे त्याच्या सुरावरून सहज समजत होतं...
‘तीस रुपयांची माझी पेटी, तीनशे रुपयाला गेली व्हती... येवडा पैसा मी कदीच बघितला न्हवता... मी घाबरलो. एवडं पैसं घेऊन जायाची भीती वाटायला लागली. आनि गिरगावातल्या आमच्या गाववाल्या बामनाची मला आटवन झाली. मी सीधा त्याच्याकडं गेलो, नि सगळी हकीगत सांगून टाकली...’
त्याचा स्वर उत्साही झाला होता, आणि मीही कान देऊन ऐकत होतो.
‘बामनानं त्यातले दीडशे रुपये माज्याकडं दिलेन, आनि ‘चल’ म्हनाला... मी आपला त्याच्या पाटोपाठ गेलो.. एका सराफाच्या पेढीवर... वीस तोळ्याचे दागिने घेऊन बामनानं माज्या हातात दिलेन, आनि ते घेवन मी लगेच हितं आलो... त्यो एकच दिवस, माजं नशीब बदलून ग्येलं... पुन्हा मी हाये तितंच हाये... पन त्या आंब्याच्या पाच पेट्यांनी माज्या बायकोला सोन्यान मढवलानी....’

बोलायचं थांबून तो माझ्याकडं पाहात होता... प्रतिक्रियेच्या अपेक्षेनं!
नुसती मान हलवून मी हलकसं हसून त्याला माफक प्रतिसाद दिला, आणि कपडे घेऊन तिथून निघालो.
तेव्हा मला काहीच विशेष वाटलं नव्हतं.
पण आज, बोलताबोलता, त्याचं ते वाक्य मला आठवलं... ‘त्यो एकच दिवस, माजं नशीब बदलून ग्येलं... पुन्हा मी हाये तितंच हाये...’
आणि मी विचार करायला लागलो.
आयुष्याच्या एका ‘टर्निंग पॊईंट’ला हात लावून तो परतला होता...
पण तो फक्त ‘यू टर्न’ होता...
तो क्षण त्यानं अजूनही, जिवापाड जपून ठेवलाय.
तो क्षण अनपेक्षित होता, हे त्याला आजही माहीत आहे...
नंतर आजवर तसा क्षण पुन्हा त्याला सापडला नव्हता... कदाचित म्हणूनच, तो क्षण त्यानं घट्ट पकडून ठेवलाय.
त्याच्या कल्पनेतल्या ‘समाधाना’च्या शिखराला हात लावून तो परत आलाय. त्या समाधानाच्या सुखाची चव त्यानं चाखलीये... ती चव हरवू नये, म्हणून तो धडपडतोय.
माझ्याशी पाच मिन्टं बोलल्यामुळे त्याला ती चव पुन्हा अनुभवता आली, ह्या जाणीवेनं मी एका आगळ्या समाधानात डुंबतोय...
ते ‘शेअर’ करावं, म्हणून तुम्हाला सांगितलं!