Saturday, July 26, 2008

प्रेरणादायक

प्रेरणादायक

काकांनी केलेल्या एका आवाहनाचा परिणाम होऊन अमेरिकेत असलेल्या एका तरुणाचे हृदय हेलावले. त्याच्या वडिलांचा आजार आणि आईने खाल्लेल्या खस्ता त्याच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. त्यानंतर सुरू झाला भारतातील गरीब रुग्णांसाठी मदतीचा ओघ.

"ज्या देशात तू जन्मलास, त्या देशातील हजारो गरजूंना तुमच्या मदतीची गरज आहे. या देशात अनेक रुग्ण केवळ औषधोपचाराचा खर्च पेलवू शकत नसल्यामुळे मृत्यूला सामोरे जातात. "तुमच्या मदतीतून या देशातील अशा असंख्य गरिबांना नवे जीवन मिळेल,' या एका आवाहनानंतर अमेरिकेतल्या त्या तरुणाचा अवघा जीवनक्रमच बदलून गेला. 1960 च्या दरम्यान मुंबईचे महापौर असलेल्या विष्णुप्रसाद देसाई यांनी अमेरिकेत स्थिरावलेल्या आपल्या पुतण्यास, जयदेव देसाई यांना 1975 मध्ये एक पत्र लिहून मुंबईतल्या गरीब रुग्णांना आर्थिक मदत पाठविण्याचे कळकळीचे आवाहन केले. ते पत्र वाचत असतानाच जयदेव देसाई यांच्या डोळ्यासमोरून आपल्या बालपणीचे, गुजरातेतील अहमदाबादेतले दिवस चित्रपटासारखे सरकत होते. नऊ वर्षांचा असताना वडिलांवर ओढवलेला जीवघेणा आजार, केवळ "चमत्कारा'ने बऱ्या झालेल्या वडिलांना नंतर आलेल्या अंधत्व व बहिरेपणामुळे आईने कष्टाने ओढलेला संसाराचा गाडा, शिक्षणासाठीची आर्थिक ओढाताण आणि त्याही परिस्थितीत इतरांच्यासाठी आईने काडी काडी जमवून केलेली मदत... सारे जयदेवभाईंच्या नजरेसमोर उभे राहिले. विष्णुप्रसादांची गरिबांविषयीची प्रामाणिक तळमळ ओळखून आपल्या कमाईतून त्यांनी मुंबईतील सांताक्रूजच्या "बीसीजे हॉस्पिटल'च्या (आजकाल या हॉस्पिटलला "आशा पारेख हॉस्पिटल' म्हणूनही ओळखतात) मदतीसाठी पहिला, तीनशे डॉलरचा चेक पाठविला.
तेव्हापासून आपल्या जन्मभूमीतील गरिबांचे दुःख `वाटून घेण्याची' कळकळ सुरू झाली आणि एका अनोख्या पद्धतीने अमेरिकेतून भारतातील असंख्य संस्था, व्यक्तींकडे मदतीचा ओघ सुरू झाला. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ हा ओघ सातत्याने वाहतो आहे. जयदेव देसाई नावाच्या या "कटिबद्ध' भारतीयाने आजवर भारतातील 200 हून अधिक संस्थांना, अमेरिकेतील "इंडिया अब्रॉड फाउंडेशन'मार्फत लाखो डॉलरची आगळी आर्थिक मदत रवाना केली आहे. त्यातून खेडोपाड्यांतील हजारो गरीब, गरजूंना नवे जीवन मिळाले आहे. जयदेवभाईंच्या जन्मगावातील, अहमदाबादेतील शाळा- इस्पितळांबरोबरच मुंबईतील आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील दोनशेहून अधिक इस्पितळे आणि संस्थांच्या कामाला या मदतीमुळे नवी उभारी मिळाली आहे.
गुजरातेतील अनेक संस्था, शाळा, इस्पितळे, मुंबईतील कूपर रुग्णालय, भगवती हॉस्पिटल, भाभा हॉस्पिटल, शिशुकल्याण केंद्र, मिरजेतील सिद्धिविनायक गणपती हॉस्पिटल, पुण्यातील रुबी एज्युकेशन अकादमी, सोलापुरातील मतिमंदांसाठीची "जिव्हाळा' संस्था, यांसारख्या अनेक संस्था आणि पंजाब, पश्‍चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तमिळनाडूतील अनेक शैक्षणिक-सामाजिक संस्थांना गेल्या चार दशकांमध्ये लाखो डॉलरची मदत करणाऱ्या जयदेव देसाईंना आता मदत गोळा करण्याचे "व्यसन' लागले आहे. "वर्षातील प्रत्येक दिवशी या कामासाठी वेळ काढून आम्ही एका आगळ्या समाधानाचा आनंद उपभोगतो आहोत,' असे जयदेवभाई म्हणतात. प्रत्येक वर्षी ऑक्‍टोबर ते जानेवारी या काळात जयदेवभाईंच्या निधिसंकलन मोहिमेला वेग येतो आणि त्या चार महिन्यांत त्यांचे अवघे कुटुंब या कामात स्वतःला वाहून घेते. 1975 मध्ये सुरू झालेली मदत निधिसंकलनाची ही आगळी संकल्पना आज अमेरिकेतील अनेक भारतीयांनी अक्षरशः उचलून धरली असून, भारताच्या मातीशी नाते असलेल्या- आणि नसलेल्याही- हजारो हातांचा आणि माणुसकीने भारलेल्या मनांचा आधार या मोहिमेला लागला आहे.
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणे हे सामान्य घरांचे "स्वप्नरंजन' असायचे, त्या काळात- 1964 च्या सुमारास- गुजरातमध्ये इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या जयदेव देसाईंनी मोठ्या जिद्दीने अमेरिका गाठली आणि मेक्‍सिको स्टेट युनिव्हर्सिटीतून इंजिनिअरिंगची पदव्युत्तर पदवी संपादन केली. ते अमेरिकेत स्थिरावले. मानवतेच्या जाणिवांना देश-विदेशांच्या भौगोलिक सीमा नसतात, तरीही आपल्या देशातील गरिबांसाठी अमेरिकेसारख्या देशात मदतीकरिता हात पसरले किंवा अगदी हक्काने, मित्रांच्या खिशात वारंवार हात घालत राहिलो, तर कालांतराने मित्रही आपल्याला टाळतील, या शंकेतून काही वर्षांनी- 2001 च्या सुमारास- "गिफ्ट सर्टिफिकेटस्‌'ची आगळी "आयडिया' जन्माला आली. 10, 20 आणि 50 डॉलर किमतीची "गिफ्ट सर्टिफिकेट्‌स' विकून त्यातून मिळणाऱ्या कमिशनची रक्कम मदतीच्या रूपाने भारतात पाठविण्यास सुरवात झाली. अमेरिकेतील काही बड्या व्यापाऱ्यांकडून माणुसकीचा प्रतिसाद मिळाला, आणि त्यांनी गिऱ्हाइकांकडून रोकड किंवा क्रेडिट कार्डांऐवजी जयदेवभाईंची सर्टिफिकेट्‌स स्वीकारण्याची तयारी दर्शविली. सर्टिफिकेट्‌सची ही योजना जयदेवभाईंनी अमेरिकेतील आपल्या मित्रांना सांगितली आणि कानोकानी होत अनेक जणांनी त्यांच्याकडून ही सर्टिफिकेट्‌स खरेदी केली. या सर्टिफिकेट्‌सवर त्यांनी केलेल्या प्रत्येक खरेदीच्या किमतीतील पाच टक्के रक्कम दुकानदारांकडून थेट जयदेवभाईंना मिळणार होती. "दात्या'च्या "खिशा'त हात न घालताही, दात्याला "मदतीचे समाधान' मिळवून देणारा आगळा मार्ग जयदेवभाईंच्या तळमळीतून जन्माला आला आणि कमिशनच्या रूपाने गोळा होत गेलेल्या लाखो डॉलरचा ओघ भारताकडे सुरू झाला. ""आजवर 50 हजार डॉलरहून अधिक किमतीची कुपन्स मी विकली आहेत. त्यातून मदतीच्या या प्रवाहातील सातत्यपूर्ण सहभागाचा आनंद अनेकांना सहजपणे मिळत गेला आहे,'' असे जयदेवभाई सांगतात. ""जोपर्यंत शक्‍य आहे आणि जगातली माणुसकी "जिवंत' असल्याची आपली खात्री आहे, तोपर्यंत आपण याच योजनेतून मदत गोळा करत राहणार आहोत. भारतातल्या आपल्या बांधवांचे दुःख वाटून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण करतो आहोत. "दुःख वाटून घेण्यात'ही एक आगळा आनंद आपण अनुभवत आहोत,'' असेही ते उत्कटपणे नमूद करतात. आता भारतातील आणि विशेषतः मुंबईतील इस्पितळांमध्ये काम करणाऱ्या "वॉर्डबॉय' आणि "वॉर्डगर्ल'ना रुग्णशुश्रूषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेत घेऊन जाण्याचा जयदेवभाईंचा मानस आहे.

Sunday, July 20, 2008

माझ्या आईच्या कविता

ध्यास

इट्ट्ल इट्टल म्हनता, मन पार येडं झालं
ध्यास लागला नामाचा, मन खुळावून ग्येलं
हितं तितं सारीकडं, दिसे इट्टल सावळा
झाडा पाना फुलामंदी मज भासाया लागला

वाटे साजिरी फुलांनी, करू पूजा या द्येवाची
परीे गोंधळ्ले मन, हितंतिथं दिसे तोचि
त्येच्या आंघुळीला वाटे, आणू वाईच गं पानी
पान्यातच उभा व्हता, सावळा गं चक्रपाणि

गंध उगाळाया हाती, घेतली ग मी सहाण
तिच्यामंदी श्रीखंड्याचे, देखिले गं म्या ध्यान
निवदासी आणाया, दूध ग्येले मी घरात
सोता गोकुळीचा कान्हा, उबा माज्या गोकुळात

कशी करू याची पूजा, मज इच्यार पडला
असा द्येव हा इट्टल, आसंल संतांनी पूजिला
नको आंगुळीला पानी, नको त्याला पानं फुलं
ध्यान निरखता निसते, मन भक्तिसंगं झुलं

काय करू रे इट्टला, डोकं झालं सैरभैर
सुचला उपाय मनात, करू सदा नमस्कार
द्येव भावाचा भुकेला, नको उपचार तयाला
माजा सगळाचि भाव, तया चरणी अर्पियला

Tuesday, July 15, 2008

प्रासंगिक!

बातमीदारीच्या स्पर्धेमुळे बातमीमागे पळताना बातमीच्या विश्‍वासार्हतेला प्रश्‍नचिन्ह लागते आणि नवनव्या चॅनेल्समधील चढाओढीमुळे मीडियाचीच विश्‍वासार्हता संपुष्टात आल्याची भावना समाजात व्यक्त होते, हे खरे असले, तरी काहीसे खेदजनक आहे. वृत्तपत्रे किंवा प्रसारमाध्यमे हा समाजमनाचा आरसा आहे. साहजिकच, समाजातील घडामोडींचेच प्रतिबिंब त्यात अपरिहार्य आहे. असे असले तरी, फक्त चांगलेचांगले तेवढे त्यामध्ये उमटत राहावे, आणि "विदारक' मात्र समाजासमोर येऊ नये, अशी सर्वसाधारण धारणा दिसते. पण समाजातील अशा घटनांना प्रसारमाध्यमांत स्थान मिळणे ही एक गरज आहे, म्हणून एक स्वानुभव मुद्दाम नमूद करावासा वाटतो.
"चॉकलेटचे आमीष दाखवून बालिकेवर बलात्कार' अशी बातमी एकदा प्रसिद्ध झाली, आणि नेहमी आपल्या सांस्कृतिक उपक्रमांना प्रसिद्धी मिळावी यासाठी प्रामाणिक धडपड करणारे एक मित्र तातडीने त्या वृत्तपत्राच्या कार्यालयातील माझ्या टेबलसमोर येऊन थडकले. त्या अंकाची त्या बातमीचे पान सहज दिसेल अशी घडी माझ्यासमोर आदळून काही न बोलता ते माझ्याकडे पाहात होते. त्यांच्या डोळ्यात उमटलेली रागाची छटा स्पष्ट दिसत होती.
मिनिटभर काहीच न बोलता मी त्यांना स्वस्थ होऊ दिले, आणि बाजूचीच एक खुर्ची ओढून त्यांना बसावयास सांगत "काय झाले' असे विचारले.
"हे काय आहे?'... आपल्या आवाजातला राग अजिबात न आवरता बातमीवर जोरजोरात बोट आदळत त्यांनी मला विचारलं. मी शांतच.
'अशा बातम्या छापायला तुमच्याकडे जागा असते. आणि आमच्या, विधायक, समाजाला काही विचार देणाऱ्या, समाजात चांगुलपणा पेरणाऱ्या बातम्या छापायला तुमच्याकडे जागा नसते. त्यांच्याकडे बघायलाही वेळ नसतो...' रागारागाने ते बोलत होते.
त्यांचं बोलणं संपलं, आणि मी त्यांच्यासाठी चहा मागवला. त्यांचा राग रास्त होता, हे मलाही पटलं होतं. वेगवेगळ्या विषयांवर विचार व्यक्त करण्यासाठी "हाईड पार्क'च्या धर्तीवर मुंबईत ठिकठिकाणी "कट्टा' सुरू करणाऱ्या या "साहित्यिक चळवळ्या'विषयी आम्हाला कौतुक होतं. त्याच्या उपक्रमांमधला तोचतोचपणा लक्षात घेऊनही, ती चळवळ सर्वत्र पसरावी यासाठी आम्ही सहकार्यही करत होतो. पण आजच्या "त्या' बातमीएवढी जागा आपल्या उपक्रमाला कधीच मिळाली नाही, अशी त्याची तक्रार मात्र मला पटली नाही.
या एका बातमीमुळे, आपल्या लहानग्यांना अनोळखी माणसाबरोबर घराबाहेर पाठवू नये, अशा एखाद्या व्यक्तीने दिलेला खाऊ घेऊ नये, हा "धडा' आईबापांना मिळाला असेल. अंगावर शहारे आणणाऱ्या गुन्हेगारीच्या असंख्य बातम्या वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांना जागा मिळाली नाही, आणि फक्त विधायक बातम्यांना प्रसिद्धी मिळाली, तर अशा घटनांविषयी समाज अनभिज्ञच राहील, आणि ‘सारे काही छान आहे’, अशीच समजूत समाजात फोफावेल, असे सांगून मी त्याला त्या भडक बातमीमागची वृत्तपत्रीय भावना समजावण्याचा प्रयत्न करत होतो.
चहा संपवून तो ऊठला, तेव्हा त्याने हातातल्या घडीवरची ती बातमी पुन्हा वाचून काढली होती. माझ्याकडे बघून त्यानं मान डोलावली, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या...
त्या चळवळ्या मित्राचा राग केव्हाच निवळला होता.
या बातम्या लोकजागृतीच करतात, आणि ही जागृतीच आजच्या काळात आवश्‍यक आहे, यावर आमचे एकमत झाले होते.

Monday, July 14, 2008

‘यू टर्न’

‘यू टर्न’

काल मला एक माणूस भेटला... ह्यात सांगण्यासारखं काहीच नाही. पण त्याच्यामुळे, मी ‘समाधानाची चव’ चाखलेल्या एका सुखी माणसाला पाहिलं. कदाचित, हे त्याला स्वत:लापण माहीत नसेल, पण तो समाधानी आहे. त्याच्या मनाच्या कोप-यातला समाधानाचा कप्पा आजही, इतक्या वर्षांनंतर्ही, तितकाच भरलेला आहे. त्या कप्प्यात मी डोकावून आलोय...
समाधानाचं शिखर गाठलेली माणसं आजूबाजूला चिकार आहेत. मी ज्याच्याबद्दल सांगतोय, हा माणूस मात्र फाटकाच आहे. त्या माणसाचं नाव विचारावं, असंदेखील मला त्याच्याबरोबरच्या त्या पाचसात मिनिटांच्या भेटीत वाटलं नाही... कदाचित, आज मी त्याला विसरूनसुद्धा गेलो असतो.. पण, सहज घरात इकडच्यातिकडच्या गप्पा मारताना आज मी सहज म्हणून त्याची हकीकत सांगायला लागलो, आणि, त्या माणसाच्या वेगळेपणाची जाणीव मला स्पर्श करून गेली.... हा माणूस समाधानाच्या शिखरावर पोहोचलेला नाही, पण त्या शिखरापर्यंत जाऊन आलाय, त्या शिखराला नकळत स्पर्श करून आलाय, असं मला वाटलं. आणि, माझ्यासाठी, हेच त्याचं त्याचं वेगळेपण ठरलं. त्याच्या समाधानाचं ते शिखरही, अगदी खडतर वाटचालीचं नाही. अनपेक्षितपणानंच कधीतरी एकदा ते शिखर त्याला सापडलं, आणि तो तिथं पोहोचला. आपण तिथवर पोहोचून आलोय, हे त्याला माहीतही नाही. त्याच्या दृष्टीनं ती फक्तं एक आठवण आहे. मलाच त्यात काहीतरी वेगळं वाटतंय... कारण, तिथं जाऊन तो परत त्याच्या आधीच्या जगात परत आलाय....

‘मुम्बईवरनं आलात?’ लॊन्ड्रीवाला लगेच ईस्त्री करून देतो म्हणाला, म्हणून मी उभा होतो, तेव्हा टपरीतच कडेला एका स्टुलावर बसलेल्या त्या माणसानं माझ्याकडे थेट पहात विचारलं. साठीच्या आसपास झुकलेला तो माणूस, कामधंदा नसल्यानं वेळ घालवायला तिथं बसला होता, हे त्याच्याकडं पाहाताच लक्षात येत होतं. मी त्याचा प्रश्न ऐकल्या न ऐकल्यासारखं केलं आणि रस्त्याकडं बघत उभा राहिलो.
‘नेने वकिलांकडं आलायत?’ पुन्हा त्यानं विचारलं.
मी त्याच्याकडं न पाहाता नकारार्थी मान हलवली.
‘मग, काळ्यांकडं?’ त्यानं पुढचा खडा टाकला, आणि पुन्हा मी मान हलवून नाही म्हटलं.
‘तुम्ही ब्यांकेत काम करता?’ त्याच्या चौकशा सुरूच होत्या, आणि मी फक्त मान हलवत नाही म्हणून खुणेच्याच भाषेत बोलत होतो.
‘आम्च्या रत्नांग्रीसारखी म्हागाई जगात कुठे सापडायची नाय...’ माझी माहिती काढायचा नाद अखेर सोडून देऊन त्यानं नवा मुद्दा घेतला.
कदाचित, नुस्तं बसल्यावर येणारा कंटाळा घालवण्यासाठी कुणाशीतरी, किवा कुणीतरी, आपल्याशी चार शब्द बोलावं, एवढीच त्याची माफक अपेक्षा असावी.
मी रस्त्यावरची नजर हटवून त्याच्याकडे पाहिलं.
जोरजोरात मान हलवत आणि खाली सोडलेले पाय एवढ्याशा स्टुलावर ओढून गुडघे छातीशी घेत पुन्हा त्यानं तेच वाक्य उच्चारलं.
‘आता तुमीच बगा, एका कपड्याच्या इस्तरीला तीन रुप्पय घेतात... साकर, ईस रुपय किलो... भाजी तं चालीस नि पन्नास रुप्पय किलो... छ्या., लय म्हाग रत्नांग्री’ तो पुट्पुटला.
‘अहो, सगळीकडंच, आमच्या मंबईतपण अशीच महागाई आहे’ त्याच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरासकट मी त्याच्याशी बोललो.
‘तरीपन, हितल्यासारकी म्हागाई कुटंच न्हाई’ तो हेका सोडायला तयार नव्हता.
‘हल्लीच वाडली इतकी... पयले न्हवती’...
वय झालेली माणसं जुन्या आठवणीत रमतात. श्रोता मिळाला, की त्या आठवणींचे कप्पे उघडतात. आता तो असंच काहीतरी सांगायला सुरुवात करणार, हे मी ओळखलं...

‘तुमाला सांगतो, मागं, मी आसंन पंचविशीचा... आमच्या परड्यातली चार कलमं त्या साली चांगली धरली व्हती. ह्या असलं येकेक फळ व्हतं...’ हाताची पाचही बोटं ताणून पंजा ताठ करत त्यानं मला दाखवला.
‘पाच पेट्या भरल्या, नि त्या घेऊन मी मुम्बईला गेलो... पन नेमका त्याच दिवशी न्हेरू वारले... सगळीकडं शुकशुकाट.. खेप फुकट जानार, आसं वाटलं... नशीबच न्हाई, आसं म्हनत मी धक्क्यावर बसलो व्हतो. बाजारात पेट्या घेऊन जान्यात अर्थ न्हाई, आता वापस रत्नांग्रीला जायाचं, आसा ईचार करत व्हतो... ईतक्यात, दोनचार फॊरिनर तितं आले..’
...त्याच्या बोलण्याकडे माझं फारसं लक्षं नव्हतं, पण मी ऐकत होतो.
‘खुणेनंच त्यांनी विच्यारल्यानी, काय हाय म्हणून... मी सांगितलं, हाप्पूस... अस्सल आंबा... लगेच एक आंबा काडला, नि कापून त्यांच्या हातावर ठेवला... आनि माजं नशीब पालटलं’
... आता मी फक्त त्याचंच बोलणं ऐकत होतो.
‘त्यांनी आंबा खाल्ला, आनि विचारलं, कसा दिला म्हणून... मला इंग्लिश आकडे म्हाईत नव्हतं, म्हणून, तीन बोटं दाखवली...आनि, दीड हज्जार रुपय माज्या हातावर देवून पेट्या उचलल्या..’
त्या क्षणाला तेव्हा त्याला काय वाटलं असेल, हे त्याच्या सुरावरून सहज समजत होतं...
‘तीस रुपयांची माझी पेटी, तीनशे रुपयाला गेली व्हती... येवडा पैसा मी कदीच बघितला न्हवता... मी घाबरलो. एवडं पैसं घेऊन जायाची भीती वाटायला लागली. आनि गिरगावातल्या आमच्या गाववाल्या बामनाची मला आटवन झाली. मी सीधा त्याच्याकडं गेलो, नि सगळी हकीगत सांगून टाकली...’
त्याचा स्वर उत्साही झाला होता, आणि मीही कान देऊन ऐकत होतो.
‘बामनानं त्यातले दीडशे रुपये माज्याकडं दिलेन, आनि ‘चल’ म्हनाला... मी आपला त्याच्या पाटोपाठ गेलो.. एका सराफाच्या पेढीवर... वीस तोळ्याचे दागिने घेऊन बामनानं माज्या हातात दिलेन, आनि ते घेवन मी लगेच हितं आलो... त्यो एकच दिवस, माजं नशीब बदलून ग्येलं... पुन्हा मी हाये तितंच हाये... पन त्या आंब्याच्या पाच पेट्यांनी माज्या बायकोला सोन्यान मढवलानी....’

बोलायचं थांबून तो माझ्याकडं पाहात होता... प्रतिक्रियेच्या अपेक्षेनं!
नुसती मान हलवून मी हलकसं हसून त्याला माफक प्रतिसाद दिला, आणि कपडे घेऊन तिथून निघालो.
तेव्हा मला काहीच विशेष वाटलं नव्हतं.
पण आज, बोलताबोलता, त्याचं ते वाक्य मला आठवलं... ‘त्यो एकच दिवस, माजं नशीब बदलून ग्येलं... पुन्हा मी हाये तितंच हाये...’
आणि मी विचार करायला लागलो.
आयुष्याच्या एका ‘टर्निंग पॊईंट’ला हात लावून तो परतला होता...
पण तो फक्त ‘यू टर्न’ होता...
तो क्षण त्यानं अजूनही, जिवापाड जपून ठेवलाय.
तो क्षण अनपेक्षित होता, हे त्याला आजही माहीत आहे...
नंतर आजवर तसा क्षण पुन्हा त्याला सापडला नव्हता... कदाचित म्हणूनच, तो क्षण त्यानं घट्ट पकडून ठेवलाय.
त्याच्या कल्पनेतल्या ‘समाधाना’च्या शिखराला हात लावून तो परत आलाय. त्या समाधानाच्या सुखाची चव त्यानं चाखलीये... ती चव हरवू नये, म्हणून तो धडपडतोय.
माझ्याशी पाच मिन्टं बोलल्यामुळे त्याला ती चव पुन्हा अनुभवता आली, ह्या जाणीवेनं मी एका आगळ्या समाधानात डुंबतोय...
ते ‘शेअर’ करावं, म्हणून तुम्हाला सांगितलं!

Wednesday, July 9, 2008

क्या पांचवी पास `इतने' तेज है?

हा काथ्याकूट नाही... कथा, ललित, किंवा त्यातलं काहीच नाही... पण योग्य पर्याय न सापडल्यानं, `ललित'चा टिळा लावलाय... एक अचानकपणे ठुसठुसणारं, जनातलं, आणि मनातलं, काहीतरी सांगण्याचा एक घाईघाईचा प्रयत्न...

काही लिहावं असं आज खरं तर अजिबात मनात नव्हतं. टीव्हीवर बराच वेळ सर्फिंग केल्यावर झी वर निरागस सुरांचं सारेगमप पाहिल. ईश्वरानं गळ्यात मध ओतून जन्माला घातलेल्या त्या मुलांचं सुरांवरचं प्रेम मनात पाझरत असतानाच कार्यक्रम संपला. सुरेशच्या `सुरमयी श्याम'चे सूर मंचावर घुमत असतानाच चुकून रिमोट दाबला गेला, आणि डोकं भणभणून गेलं... सुन्न झालं... बालपण हे निरगसतेचं दुसरं नाव असल्याची साक्ष देणारे हे गोड, मधाळ सूर कानात घुमत असतानाच, अवधूतचं एक वाक्यही मनावर कोरलं जात होतं... त्या वाक्यात काव्य नव्हतं, पण कवितेचा गोडवा होता. हे गोड सूर कानात घुमतच राहाणार, असा विचार करत असतानाच अवधूत त्या `लिटल चाम्प’ला म्हणाला, `आता घरी गेल्यावर झोपण्याआधी जर कान धुतले नाहीत, तर कानांना मुंग्या येतील'...या एका वाक्याला दाद देत मी चॅनेल बदललं, आणि सगळा मूड किर्किरा झाला...

त्या दुसर्‍या चॅनेलनं माझ्या मनातल्या बालपणाच्या निरगसतेचं वास्तवात विसर्जन केलंय. बालपणाची जगभरातली असंख्य रूपं टेलिव्हिजनमुळे आजकाल आपल्याला अवतीभवती दिसतात. परवा एका रिऍलिटी शोच्या निमित्तानं एक रूप आपल्याला अस्वस्थ करून गेलं. शाहरूखच्या `क्या आप पांचवी पास से तेज है?' शो मधून निरगस बालपणाचं दुसरं रूप डोकावत असावं... झी वरच्या `सारेगमप'मधले कोवळे, निष्पाप सूर कानात घुमत असतानाच इंडिया टीव्हीवर एक सनसनीखेज रिपोर्ट पेश होत होता, आणि या रिपोर्टनं निरागसतेचं बालपणाशी जोडलेलं नातं ताडकन तोडलं. `पाचवी पास प्रेग्नंट' असा काहीतरी मथळा असलेला हा `स्पेशल रिपोर्ट' इंडिया टीव्हीच्या ख्यातीला साजेसाच असेल असं आधी वाटलं, पण जोडीला काही मुलाखतीही दिसत होत्या... तेरा ते अठरा वरषाच्या मुलींमध्ये `प्रेग्नन्सी'चं प्रमाण वाढतंय, आणि, या `टीनएजर्स्'मध्ये गर्भपाताचं प्रमाण्ही वाधतंय, असा निष्कर्ष काढणारा हा रिपोर्ट काही वेळापूर्वी इंडिया टीव्हीवर अनेकांनी पाहिला असेल... या वयोगटातल्या मुली, आपल्या बॊयफ्रेंड्च्या बरोबर बिन्दिक्कत डोक्टरकडे जाऊन आपली `समस्या' सहजपणे माडतात, आणि त्यातून सोडवणूक करून घेतात, असं हा रिपोर्ट सांगतो. मुम्बई, लखनऊ आणि काही मोठ्या शहरांत केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणाचा हवाला या रिपोर्टमध्ये दिला जात होता... लक्ष्मिपुत्रांच्या घरांत हे प्रमाण मोठं असल्याचा या सर्वेक्षणाचा दुसर निष्कर्श आहे, असं या रेपोर्टवरून वाटलं, आणि सुन्नसुन्न व्हायला झालं.

आपल्या देशातल्या `बालपणा'च्या अल्लड, लडिवाळ छटा आता `टीनएजर' पिढीमुळे अस्ताला चालल्यात... गर्भपातांचं प्रमाण अशा पिढीत वाढत असेल, तर त्याची नुसती चिंता करत बसणे पुरेसे आहे का, हे ठरवलं पाहिजे...स्त्री भ्रूणहत्या हा देशातला एक चिंतेचा विषय आहे. विवाहाचं कायदेशीर वय कमी करायला न्यायालयं अनुकूल असल्याच्या बातम्यांमुळे एक देशात मध्यंतरी एक वैचारिक मंथन झालं. आजही, मुलगी `वयात'- म्हणजे कायद्याच्या द्रुर्ष्टीनं विवाहयोग्य व्हायच्या आधीच,- आली, की लग्नं करून एका मोठ्ठ्या जबाबदारीतून मोकळं होण्याची मानसिकता अनेक आईबापांमध्ये दिसते. मात्र, समाजातल्या `कायद्याच्या बबतीत जागरूक असलेल्या' शहरी संस्क्रुतीतल्या धुमाकुळाचा नक्शा या सर्वेक्षणानं पार उतरवून टाकलाय...

समाजात काही चांगुलपणाची चिन्हं दिसताहेत, तोवर अशा समस्यांवर तोडगा निघू शकेल, असं मला वाटतं... या लेखनावर त्याच्या साहित्यिक गुणावगुणांची चर्चा होऊ नये. उलट, कदाचित, घाईघाईनं, एक `सणकी'मुळे लिहायला घेतल्यानं या समस्येचं भीषण रूप मांडण्यात मी कमीच पडलो असेन, असं मला वाटतय... महाजालाच्या रूपानं आपल्यासमोर आज वैश्विक व्यासपीठ तयार झालंय... थोडा वेळ अशा समस्या जगासमोर आणण्यासाठीही द्यावा, या भावनेतून हा प्रपंच!

Monday, July 7, 2008

मी लेलेंना शोधतोय....

त्यांचं आडनाव लेले नाही. म्हणजे, लेलेच आहे, की नाही, ते मला नक्की माहीत नाही. त्यांचा नक्की पत्ता मला माहीत नाही. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ कुठेतरी ते राहातात. एवढंच मला माहीत आहे. म्हणजे, माझ्या सहकार्‍यानं मला त्यांच्याबद्दल सांगितलं, तेव्हा ते तिथं कुठतरी राहातात, एव्हढच मला कळलं होतं. तेव्हापासून, सिद्धिविनायकासमोरून येताजाताना मी त्या दिशेनं भक्तिभावानं हात जोडतो. अर्धा सिद्धिविनायकाला, आणि अर्धा त्या लेले, की कुणी, त्यांना... सिद्धिविनायकाच्या शेजार्‍याला...
... त्या लेलेंची- आपण त्यांना लेले म्हणू- गोष्ट मला अरूणनं - माझ्या सहकार्‍यानं - सांगितली, त्याला आता पाचसहा वर्षं उल्टून गेलीत... पण तेव्हापासून ते माझ्या मनात घर करून राहिलेत... मला त्यांना भेटायचंय... सिद्धिविनायकाचा हा शेजारी, मलाही बघायचायचाय...
मी लेलेंना शोधतोय...
मी आणि अरूण- माझा समव्यवसायी- आणि शेजारी- नेहेमीप्रमाणे ट्रेनमधे खिडक्या पकडून समोरासमोर बसलो, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या... नेहेमीप्रमाणेच... आज कुणाची प्रेस कॊन्फरन्स, मंत्रालयात कुठे काय, राजकारण कुठे चाललंय, जगात कुठे काय आणि अरूणचा अभ्यासाचा विषय... संरक्षण खातं- त्यावर त्यानं नुकतीच डॉक्टरेट मिळवलेली... मी त्याचा हक्काचा आणि मन लावून ऐकणारा श्रोता... जॊर्ज फर्नांडिस तेव्हा संरक्षणमंत्री होते, आणि शवपेट्यांचा वाद देशभर गाजत होता... बोलताबोलता गप्पांचा ओघ `माणुसकी'वर येऊन थांबला, नेमके तेव्हाच आमच्यासमोर एक दीनवाणा भिकारी, पाठीवरचं ओझं सांभाळत उभा होता... त्याच्या पाठीवर एक जर्जर, खंगलेला, म्हातारा अर्धमेल्या डोळ्यांची क्षीण उघडझाप करत केविलवाणेपणानं गाडीतल्या गर्दीकडे पाहात होता. कुणाचाही हात खिशात जावा, असंच द्रुश्य होतं... मी आणि अरूणनंही तेच केलं, आणि गप्पा लेलेंच्यापर्यंत आल्या...
असंच कधीतरी अरूण त्या लेलेंना प्रत्यक्ष भेटलेला... त्यांची कथा त्यानं ज्याच्याकडून ऐकली, त्याला घेऊनच अरूण लेलेंकडे गेलेला.
--------- -------------- -------------
सकाळचे साडेआठ-नऊ वाजलेले... अरूण आणि तो- दोघं सिद्धिविनायकाच्या शेजारच्या इमारतीतल्या एका फ्लटसमोर उभे राहिले, आणि त्यानं अरूणला खूण केली... अरूणनं दरवाज्यावरची बेल वाजवली, तेव्हा त्याचा ताणून धरलेला सगळा अधीरपणा त्या बेलच्या बटणातून आतल्या घरात घुमला होता... दरवाजा उघडण्यासाठी लागलेला मिनिटभराचा वेळदेखील अरूणला सोसवत नव्हता. म्हणजे, मला ते सांगतानाचा अरूणचा सूरच तसा होता... मी तेव्हाची त्याची मानसिकता समजू शकत होतो... अरूण बोलत होता, आणि तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जिवंत होत होता...
- दरवाजा उघडला, तेव्हा, बाहेर जायच्या तयारीत असलेला एक मध्यमवयीन माणूस आत उभा होता... बाहेरच्या दोघाही अनोळखींना पाहून त्यानं नमस्कार केला, आणि कोण, कुठले, वगैरे कोणतीही चौकशी न करता त्यांना आत यायची खूण केली... हातातली पिशवी बाजूच्या टेबलावर ठेवून तेही टेबलजवळ्च्या खुर्चीत बसले, आणि अरूणनं व्हिजिटिग कार्ड त्यांच्यासमोर धरलं...
‘प्रेसवाल्यांशी बोलण्यासारखं माझ्याकडं काही नाही... काही काम असलं, तर सांगा...’ झटकून आणि काहीसं फटकूनच बोलत लांबूनच ते कार्ड त्यांनी पाहिलं, आणि अरुण अवघडला...
`मला तुमच्यावर लिहायचंय'... अडखळत तो म्हणाला, आणि त्या माणसानं- लेलेंनी- टेबलावरची पिशवी उचलून उठत नमस्कार करून पायात चपला अडकवल्या...
`जाऊ दे... नाही लिहित... पण आपण गप्पा तर मारू या'... आगांतुकासारखा त्यांच्या घरात घुसूनही, अरूण त्यांना सोडायला तयार नव्हता...
`ठीक आहे.. पण मला जास्त वेळ नाही’- मनगटावरल्या घड्याळाकडे पाहात ते पुन्हा खुर्चीत बसले.
`नाही, सहज इकडे आलो होतो सिद्धिविनायकाला, तर तुम्हाला भेटावसं वाटलं, आणि न विचारताच आलो'... अरूण त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करत होता. आणि ते -लेले- निर्विकारपणे अरूणकडे पाहत होते.
‘मला समजलं, तुम्ही व्हीआरएस घेतली म्हणून...’ अरूणनं आणखी एक खडा टाकला.
‘हो.. अलीकडेच...’ लेले तुटकपणानं का होईना, बोलले.
`हे बघा, मी काहीही छापणार नाही. फक्त मला ऐकायचंय... तुमचा टर्निंग पॉईंट’... अरूणनं पुन्हा दामटलं.
`नाही हो, कुणी काही छापावं, माझं कौतुक करावं, असं मी काही करत नाही... मी जे करतो, ते माझ्या समाधानासाठी... मला रात्री घरी आल्यावर शांत झोप लागते... बस्स... मी खूप समाधानी आहे'... लेले म्हणाले...
‘पण कधीपासून?'- अरूण म्हणाला, आणि लेलेही जरासे सैलावले.
अरूणशी बोलायला, गप्पा मरायला काही हरकत नाही, असा त्यांना विश्वास वाटला असावा...

‘त्या दिवशी शनिवार होता... बैंक अर्धा दिवस होती, म्हणून मी आणि माझा सहकारी दुपारीच बाहेर पडलो... कोपर्‍यावरच्या टपरीवर चहा घेताना माझा तो सहकारी मला म्हणाला, लेल्या, येतोस माझ्याबरोबर? वाटेतच जरा हॊस्पिटलमध्ये जाऊन येऊ... आमचे शेजारचे काका, त्यांना अडमिट केलंय.. जरा भेटून येऊ’
`हॉस्पिटलचा वाससुद्धा मला सहन होत नव्हता तेव्हा... पण ‘लगेच निघायचं' असं ठरवून आम्ही ट्क्सीत बसलो, आणि केईएमला पोहोचलो...
त्या वॊर्डात माझा सहकारी काकांशी बोलत होता, तेव्हा मी सहज आजूबाजूला पाहत होतो... सरकारी हॊस्पिटलात मी तोपर्यंत कधी गेलोच नव्हतो’... लेले सांगत होते... ‘बाजूच्याच बेडवर एक काकांसारखाच म्हातारा, एकटाच भिंतीकडे नजर लावून बसला होता... काकांशी बोलणाया माझ्या सहकार्‍याकडे कौतुकानं पाहात होता... अचानक त्यानं एक लांब सुस्कार सोडला, आणि पुन्हा त्याची नजर छताकडे वळली... मी त्याच्याकडेच पाहात होतो... त्याचे, म्हातारे, खोलगट डोळे पाण्यानं भरलेले मला दिसले... एकदम त्यानं माझ्याकडं बघितलं, आणि मान फिरवून त्यानं डोळे पुसले... मला कसंतरीच वाटत होतं...’
लेले बोलत होते.
‘न राहवून मी त्याच्या जवळ गेलो, आणि नकळत त्याचा बेडवर बसलो... पाण्यानं भरलेले म्हातारे डोळे न पुसता तो माझ्याकडे बघत होता.... अविश्वासाच्या नजरेनं... मी त्याच्या पायांवर थोपटल्यासारखं केलं, आणि तुम्हाला सांगतो, त्याचा बांध फुटला... ’
.... बोलताबोलता लेलेंच्या डोळ्यातही पाणी जमा झालं होतं...
‘त्याच्या मुलानं ते आजारी पडताच इथे आणून अडमिट केलं होतं, आणि मग घरच्या सगळ्यांनीच जणू पाठच फिरवली होती... तेव्हापासून, शेजारच्या बेडवरच्या एखाद्या पेशंटला पाहायला कुणी आलं, प्रेमानं कुणी पेशंटची विचारपूस करताना दिसलं, की त्यांचा भावनावेग अनावर व्हायचा...
‘कधीपासून डॊक्टरांनी औषधं लिहून दिली होती, पण आणायला सांगायलाच कुणी नाही’, तो म्हतारा थरथरत म्हणाला, आणि मी पुढे झालो... माझा सहकारी निघायच्या तयारीत होता.
`तू पुढे हो, मी आलोच, असं सांगून मी प्रिस्क्रिप्शन्चा कागद घेतला, आणि खाली उतरलो... ’
`तुम्हाला सांगतो, खालचं ते द्रुष्य मी केधीच पाहीलं नव्हतं... माणसाची इतकी केविलवाणी अवस्था होते, यावर माझा त्याआधी विश्वासच नव्हता’... लेले म्हणाले.
‘मी औषधं घेतली, आणि वर येउन त्या म्हातार्‍या पेशंटच्या उशाशी ठेवून कशी घ्यायची ते सांगून तिथून निघालो... पण त्या रात्री मला झोप लागली नाही... ’
‘मधे एक आठवडा गेला, आणि पुन्हा शनिवारी ऒफिसातून सुटल्यावर मी अगदी नकळत तिथे पोहोचलो... मला पाहाताच त्या म्हातार्‍या रुग्णानं अंथरुणातूनच हात उंचावला, आणि त्याच्या सुरकुतलेल्या चेहेर्‍यावर हलकंसं हासू उमटलं... तो क्षण माझं आयुष्य बदलणारा होता...’ बोलताबोलता लेलेंच्या नजरेत वेगळीच चमक दिसत होती.
‘त्यांच्याजवळ थोडा वेळ बसून मी निघालो, तेव्हा माझ्या मनात वेगळेच विचार सुरू होते... असे कितीजण वेगवेगळ्या इस्पितळांमधे असतील, त्यांना मदतीची, मायेची गरज असेल... कदाचीत त्यांच्या मायेची माणसं असतीलही, पण वेळ नसेल... कुणी असाच एकाकीपणे आजारपणाच्या यातना सोसत असेल''
... `आणि मी ठरवलं...’ लेले म्हणाले, ‘ यापुढं शनिवार-रविवारच्या सुट्टीत, जमेल तशी, अशा लोकांना मदत करायची... मग सगळे शनिवार-रविवार वेगवेगळ्या हॉस्पिटलांत चकरा सुरु केल्या... तेव्हा जाणवलं, एकाच हॊस्पिटलात तो एकच म्हातारा नाही... असे अनेक उपेक्षित, दुर्लक्षित रुग्ण मायेचा हात पाठीवरून फिरावा, म्हणून आसुसलेले आहेत.. कुणाला विचारपूस करणारंच कुणी नसतं, तर कुणाचं विचारपूस करायला कुणी फिरकतच नसतं... उपचाराचा खर्च परवडत नाही, म्हणून कुणी नंतर रुग्णाकडे फिरकत नाहीत, तर कुणी घरात ब्याद नको, म्हणून इथे आणून टाकलेला असतो'...
अशा सगळ्यांना भेटण सुरू झालं... कधी कुणाला औषधं आणून दे, कधी कुणाशी गप्पा मार, कुणाशी चेस खेळ, असं करत रविवारचा दिवस पुरेनासा झाला... मग घेतली व्हीआरएस...’

...लेले सहजपणे बोलून गेले, आणि घद्याळाकडे पाहात उठलेदेखील...
--------- -------- ------------
‘तुमचं नाव सांगा ना... भारावल्या अवस्थेत मी लेलेंना म्हणालो, आणि लेलेंनी धारदार डोळ्यांनी माझ्याकडे बघितलं...’
...अरूण बोलत होता, तेव्हा आपण लेलेंच्या समोरच उभे आहोत, आणि स्वत: लेलेंना ‘अनुभवतो आहोत, असं मला वाटत होतं...
मी पटकन सावरलो, आणि अरूणकडे बघितलं...
सह्जपणे तो बोलतच होता, तरी त्याचा आवाजही मला भारावल्यासारखा वाटला.
‘हे छापण्यासाठी नाही, हे आपलं आधीच ठरलंय’ लेलेंनी आठवण करून दिली, आणि ते उठलेच.
`मीदेखील जोरजोरात मान हलवून हो म्हटलं, आणि पाठोपाठ उठलो'... अरूण म्हणाला.
‘सिद्धिविनायकाचा शेजारी म्हणा मला हवं तर’... लेलेंनी बाहेर पडतापडता मागे न बघताच सांगितलं, आणि ते झपाझप चालू लागले...
`त्यांचं नाव लेलेच असावं’ अरूण म्हणाला.
`आपण जाऊ या एकदा त्यांच्याकडे'... न राहवून मी अरूणला म्हणालो, आणि त्यानं होकारर्थी मान हलवली....
काही दिवसांनी मी दुसरीकडे रहायला गेलो... माझा आणि अरूणचा सोबतचा प्रवास संपला...
ते लेले मात्र तेव्हापासून मनात घर करून र्‍हायलेत...
कधी एखाद्या प्रेस कॊन्फरन्सला अरूण भेटला, की मी त्याला आठवण करतो, लेलेंना भेटायची...
तोही हो म्हणतो, पण अजून जमलं नाहीये...
म्हणून सिद्धिविनायकाजवळून जाताना, मी फक्त नमस्कार करतो...
--------------------------

Friday, July 4, 2008

अनुदिनी अनुतापे...

माय मराठीच्या जगभर उमटलेल्या पाऊलखुणा संगणकाच्या पडद्यावर पाहाताना येणाया आनंदाच्या भरात मीही एकदा मराठीच्या जागतिकीकरणात आपलाही हातभार लावावा, म्हणून ‘अनुदिनी’ सुरु केली. आनंदाचं ते भरतं ओसरायच्या आत दोनचार लेखही पाडून अनुदिनीवर डकवले. तेव्हापासून रोज त्यावरच्या हिट्स मोजल्याशिवाय मला झोप येईनाशी झाली. दिवसातून दहापंधरा वेळा तरी आपली अनुदिनी उघडावी, आणि जगभरातल्या किती मराठीप्रेमींनी आपल्या ‘वैश्विक साहित्या’चा आस्वाद घेतला, ते पाहात आनंदून जावे, हा छंद मला जडला. प्रत्येक वेळी उघडलेल्या अनुदिनीच्या ‘हिट काऊंटर’वर एकएका आकड्याची भर पडताना पाहून माझ्या आनंदाला अक्षरश: उधाण यायचे, आणि साहित्यनिर्मितीच्या उर्मी उरात उचंबळायला लागायच्या. रात्ररात्र जागून मग मी साहित्याच्या लगडी उलगडून अनुदिनीवर पसरायचो,आणि लगेचच, हिट्स मोजायाची सुरुवात व्हायची...
... दिवसामागून दिवस जात राहिले. माझ्या अनुदिनीवर्ल्या हिट्स कितीने वाढल्या, ते मी न चुकता, दिवसातून जमेल तितक्यांदा पाहात होतो. प्रत्येक वेळी वाढणारा आकडा पाहून येणार्या त्या आनंदाच्या उधाणात डुंबत असताना, कॊमेंटसच्या रिकाम्या रकान्याकडे माझं लक्षच जात नव्हतं.
... आणि एका दिवशी, माझ्या मित्राला अनुदिनी उघडून दाखवली. संगणकाच्या पडद्यावरल्या माझ्या अक्षर साहित्याचे शब्द ताठ मानेनं जग पाहातायत, या जाणीवेनं मी मोहरून गेलो, आणि अनुदिनी बंद केली. पण त्यानं मला ती पुन्हा उघडायला लावली, आणि मी हिट काऊंटरकडे पाहिलं... एका क्षणात तिथला आकडा एकाने पुढे सरकला होता... आपल्या साहित्यावर जग फिदा झालंय अशी माझी खात्रीच झाली. आता एखाद्या ऒनलाईन अंकाचं संपादक वगैरे होण्यासाठी चाचपणी वगैरे करायला काहीच हरकत नाही, असा एक विचारही मनात विजेसारखा चमकून गेला, आणि क्षणाचाही विलंब न लावता तो तोंडातून बाहेरही पडला... शून्यात पाहाताना, जगाच्या कुठल्यातरी कोपर्यातला, मायभूमीच्या ओढीने अस्वस्थ झालेला आणि मराठीला मुकलेला, मराठीसाठी भुकेला माझा मराठी बांधव आपल्या अनुदिनीचा आस्वाद घेत आपली भूक भागवतोय, असं चित्र माझ्या डोळ्यांसमोर तरळत होतं. माझा तो मित्र, माझ्या अनुदिनीची उघडझाप करत होता, आणि ...हिटस वाढतच होत्या... आणि माझ्या डोक्यात लक्कन वीज चमकली. हिट्सचा आकडा आपल्या क्लिकबरोबरच वाढत नसेल ना, या शंकेनं मी कावराबावरा झालो, आणि पुन्हा ती शंका तोंडातून बाहेर पडली. वास्तवाला सामोरं जायचा क्षण जवळ आला होता, हे मी ओळखलं, आणि ओशाळून अनुदिनी बंद केली...
... आता कधीमधी मी ती उघडतो, तेव्हा हिट्स काऊंटर एका आकड्याची भर घालून शून्याएवढे डोळे वटारून माझ्याकडे पहात हसताहसता जिवंतपणाची साक्ष देत असतो... प्रतिक्रीयांचा रकाना मात्र एकलकोंड्यासारखा तळाशी कुठेतरी लपलेला असतो...

Wednesday, July 2, 2008

अध्यक्षपदाची फिल्डिंग!

मराठी साहित्य संमेलन सान फ्रान्सिस्कोमधे होणार की नाही, हे अजून नक्की होत नसल्यानं भल्याभल्या कवी-साहित्यिकांच्या डोळ्याला डोळा नाही. महामंडळाचे पदाधिकारी- म्हण्जे कौतिकराव- गेल्या काही दिवसांपास्नं सदस्यांची यादी खिशात घेऊनच फिरतायत. ५१ जणांची नावं फायनल करून निमंत्रणाचा कागद त्यांच्याकडे पोहोचेपर्यंत कौतिकराव कुणालाच भेटणार नाहीत, असं महामंडळाचे भालदार-चोपदार सांगत सुटल्यानं साहित्यिक वर्तुळात खळबळ उडालीय. एक बरे झालेय. आम्च्या रत्नांग्रीकरांनी हा विशय लावून धरला, हे आम्हाला एकदम आवडले.

संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी मंडळी नकोत, असा मातब्बर साहित्यिकांचा जुना आग्रह होता. सान्फ्रान्सिस्कोत संमेलन भरले, तर कदाचित आता त्यांना बरे वाटेल. पण हे विषयांतर झाले. संमेलनाच्या निमित्ताने आपली बाजू कुठेतरी झुकती हवी, म्हणून आम्ही आतापासूनच कानोसा घ्यायला सुरुवात केलीये. सान्फ्रान्सिस्को संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कुणीच उभे राहू नये, असाही एक नवा सूर ऐकू येतोय. परवा, अमेरीकन एम्बसीच्या बाहेरच्या रांगेत पहाटेपहाटेपास्नं थांबलेल्यांकडे मी संशयानं पाहात होतो. काहीजण अगदी साळसूद्पणानं हातातल्या प्लास्टिकच्या पिशव्या सांभाळत आपल्याला कुणी पाहात तर नाही ना, अशा भीतीनं माना वळवून ताटकळत उभे होते. एका अनिरुद्धबापूंसारख्या मिश्या असलेल्या कवीनं मला बघून मान फिरवली, तेव्हा सान्फ्रान्सिस्कोला जाण्यासाठीची पूर्वतयारी का,असं मी ओरडून विचारल्यावर कसचंकसचं म्हणत त्यानं विषय बदलला आणि तुम्ही इकडं कुठं म्हणत मलाच गुगली टाकल्यावर मलाही काही सुचेच ना. कुणीच अध्यक्षपदाला उभं राहात नसेल, तर आपला फॊर्म भरून टाकायला काय हरकत आहे, असा विचार आल्यावर मी पण आधी व्हिसाची तयारी करू या म्हणून धावाधाव सुरु केली होती. हो, नाहीतर, अध्यक्षपदावर बीनविरोध निवड झाली, तरी व्हिसा नाकारला गेला, तर खाली मान घालून रत्नांग्रीला जायची पाळी यायची. तसे नको म्हणून, आधी व्हिसाची तयारी करा, असं बायकोनं सांगितल्यावर मी तिच्यावर भलाताच खूश झालो होतो. पण अध्यक्ष व्हायचं तर काहीतरी साहित्यिक कामगिरी नको का, असं तिनं विचारल्यावर जरासा हिरमुसलो, तोवर तिनच माझ्यापुढं मुलीची गेल्या वर्शीची वही धरली आणि डोळ्यांनीच, ‘वाचा’ म्हणून खुणावलं. तर मी वही हातात घेउन पहिलच पान उघडलं तर मुलीच्या टीचरांनी मारलेला लालभडक शेरा डोळ्यापुढे नाचायला लगल्यानं जराशी अंधारी आल्यासारखं होऊन मी आंगठा ओठाशी नेत खुणेनंच पाणी आणायला सांगितल्यांवर बायको फणकारत आतच गेली. मग मात्र मी ओर्डून पाणी मागितल, तेव्हा हसत पुढे येउन तिनं वहीचं शेवटचं पान उघडल, तर एकेक ओळ मोकळी सोडून चारचार ओळींवर काहीतरी लिहिलेलं दिसलं. मी खुणेनंच ‘काय’, म्हणून बायकोला विचारल, तर, तुमच्या अध्यक्शपदाची तयारी, असं सांगत ती खदाखदा हसायलाच लागली. या चारोळ्या आहेत असं तिनं सांगितल्यावर मी भलताच खुश झालो, आणि कवतिकानं तिच्याकडं बघितल्यावर ती लाजून स्वैपाकघरातच पळाली. पण संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी तुझ्या चारोळ्या चालतील का, असं विचारल्यावर, महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी चालतात ना बायकोच्या चारोळ्या, असा बिनतोड सवाल तिनंच मला केल्यावर मी गप्प बसलो, आणि व्हिसाच्या तयारीला लागलो. पण अजूनही, वाटतंय की, यंदा नकोच तसं. बायकोच्या चारोळ्यांच्या भांडवलावर आपण पुढच्या वर्शी महामंडळाच्या अध्यक्षपदाला उभं राहू, यंदा फक्त व्हिसा असला, तरी अध्यक्षपद मिळेल,..
सान्फ्रासिस्कोचं जमलं नाही, तर यंदा कुठल्या तरी संमेलनात आपली हजेरी लावायचीच असं मी पक्कं ठरवलंय. रत्नाग्रीत काय आपली डाळ शिजायची नाही. एवढ्या वादानंतर, बायकोच्या कवितांवर तिथे अढ्यक्षपद मिळेल, असं वाटत नसल्यामुळे, विद्वेषी संमेलनाचापण मी मागोवा घेतोय. यंदा मराठी साहित्य संमेलन बे एरियात होणार असल्यामुळे, विद्वेषींचं संमेलन मुंबईत्ल्या बॆक्बे एरियात होणार असं कानावर येतय. महामंडळाची पुढची संमेलनंपण आता जगाच्या पाठीवर कुठेही होणार, हे नक्की झालंय. विंदांच्या सूचनेचा आदर राखण्यासाठी, दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर संमेलन भरवता येईल किंवा कसे, याची पाहाणी करण्याकरता महामंडळाचा एक प्रतिनिधी तिकडे जाणार आहे, असंही कानावर आलंय.

पुढच्या वर्षीचं संमेलन नागासाकीला भरवा, असं तिथल्या मराठी बांधवांनी सुचवलंय... विद्वेषींचं पुढचं संमेलन, साकीनाक्यात भरणार आहे. अध्यक्शपदासाठी आतापासूनच फिल्डिंग लावणार आहे आपण. इथे, नाहीतर तिथे...