Tuesday, June 24, 2008

अगा "कवतिक' जाहले!!

अगा "कवतिक' जाहले!!
आज आम्हाला भारी कवतिक वाटतंय.... मराठीचं, आणि आमच्या पठ्ठ्या ‘मऱ्हाटी’ बाण्याचं... मागं कधीतरी राघोबादादानं मराठीचा झेंडा अटकेपार नेऊन फडकावला, त्याचा अजूनही आम्ही उदोउदो करतोय. पंचवीस वर्षांपूर्वी एकदा जिंकलेल्या वल्डकपसारखा... कारण सरळ आहे. असा योग वारंवार येत नसतो. अशा काही हळुवार स्मृती मनाच्या आणि जनाच्या मनाच्या कप्प्यात जपूनच ठेवाव्या लागतात. अस्मितेचा प्रश्‍न समोर आला, की त्या हळूच बाहेर काढायच्या, त्यावर हलकीशी फुंकर मारून त्यावरली धूळ झटकायची, आणि त्या स्मृती कुरवाळत आपल्या पराक्रमाचे पोवाडे रचायचे... इतकी वर्ष आम्ही हेच करत राहिलो. आज मात्र, मराठीला नवे दिवस आल्याची आमची खात्री पटली आहे. ‘एकमेकांचे पाय खेचू म्हण झाली जुनी’, असं सांगत शाहरुख खान बदललेल्या मराठी बाण्याचं कौतुक करत असला, तरी एकमेकांचे पाय खेचणे हे तर मराठीपणाचे गुणसूत्र- म्हणजे- डीएनए आहे. कधीतरी ते असे उफाळून वर येते, आणि आपला मराठीपणा सिद्ध करते. आज मराठी साता समुद्रापार चाललीये... आम्हाला केवढा आनंद झालाय... ज्ञानेश्‍वरांची आठवण होतेय. "बोलू कवतिके' अशी आमची स्थिती झालीये. "कवतिका'साठी शब्द सुचेनासे झालेत, आणि मराठीचं पाऊल पुढे पडत असताना त्यात खोडा घालून आपला बाणा सिद्ध करण्यासाठी सरसावलेल्या मराठमोळ्या साहित्यिकांची कीव वाटतेय. मराठीनं अनेकांची साहित्यं- पक्षी साहित्यकृती- पचवली. त्याच्याच जिवावर कितीतरी साहित्यिक मातब्बर झाले. परकी साहित्य बेमालूमपणे मराठीपणात मिसळण्याची कला अनेकांना साधली. इतकी, की परकी साहित्याचा गंधदेखील या साहित्याला येणार नाही, इतका सराईतपणा मराठी साहित्यविश्‍वानं सहजपणे साधला. आता मात्र, मराठीला महाराष्ट्राबाहेर जायची संधी आली असताना, महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषांमध्ये बांधून घेतलेल्या मराठी साहित्य"विश्‍वा'त खळबळ माजून राहिली आहे. उलट, साता समुद्रापारच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आमच्या मराठीची अवीट गोडी अमेरिकनांना चाखविण्याचा चंग आम्ही बांधला असताना, हा अंगचोरपणा का केला जातोय, हेच आम्हाला समजेनासं झालंय. यासाठी विचार करता, आम्हाला एकच कारण समोर दिसते. ते म्हणजे, काही मोजक्‍याच लोकांना या निमित्ताने अमेरिकावारी घडणार, या विचारानं काही माथी पोखरली असतील, किंवा इतकी वर्षं साहित्यसेवा करूनसुद्धा अमेरिकावारीचे कवतिक आपल्या वाटणीस नाही, याचे वैषम्य वाटत असेल. आम्ही म्हणतो, इथल्या संमेलनात समजा अडीच कोटींची पुस्तकं विकली गेली असतील. इथली वाचनसंस्कृती संमेलनाच्या निमित्तानं समृद्ध झाली असेल, असंही समजू या. म्हणूनच आता मधल्या वर्षभरात निघालेल्या पुस्तकांना संमेलन हाच वाली असावा, असं कुणा प्रकाशकांना वाटू लागलं असेल. म्हणजे, संमेलनं भरली नाहीत, तर पुस्तकं कशी खपणार, ही इथली स्थिती! म्हणून, पुस्तकं खपण्यासाठी तरी संमेलनं इथल्याइथे भरवा, असा आग्रह? अमेरिकेतले आमचे मराठी बांधव, मराठीच्या संवर्धनासाठी कधीपासून आसुसलेत... मराठीची इथे होणारी प्रगती त्यांना आपल्या दोनचार आठवड्यांच्या भारतभेटीत अनुभवता येत नसेल, आणि संमेलनाच्या निमित्तानं त्यांचं भावविश्‍व, अनुभवविश्‍व आणि मराठमोळ मन समृद्ध होणार असेल, तर स्वस्ताततल्या पाहुणचारात तेवढं त्यांना द्यायला काय हरकत असावी? जाऊ द्यात पाचपन्नास लेखक तिकडे. आजकाल, परदेशवारीसाठी स्वतःच्या खिशातले पैसे घालावेत, आणि आपल्या रटाळ साहित्यकृती "रसिकां'च्या माथी मारायच्या हे समीकरण जुळणारे नाहीच... (कणेकरांना विचारा... ते बऱ्याचदा त्याच त्याच कार्यक्रमांची निमंत्रणं मिळवून जाऊनसुद्धा आलेत. तिथे त्यांना साहित्यिक म्हणूनही ओळखतात.) दुसरं म्हणजे, कधीतरी अमेरिकेची सफर करायचीच, अशी कुणा साहित्यिकांची इच्छा या निमित्ताने पूर्ण होत असेल, तर त्याला बाकीच्यांची हरकत का असावी? उलट, अर्धा खिसाच रिता करून पूर्ण वारी करायची आगळी संधी मिळत असेल, तर आपल्या संस्कृतीला ते साजेसेच नाही का? मग सर्वांनी मिळून त्याचं स्वागतच करायला हवं, असं आम्हाला वाटतं... आणि या अजब आयडियाबाजांचे "कवतिक'च करायला हवं. कारण, मराठीचा झेंडा सातासमुद्रापार जाणार आहे. पुस्तकाच्या खपासाठी रत्नांग्रीत समांतर संमेलन भरवायलाही आमची काहीच हरकत नाही म्हणा... वर्षभरात बरेच गठ्ठे प्रकाशकांच्या गोदामात साठले असतील!!

Monday, June 9, 2008

भूतकाळाला मुक्ती!

भूतकाळाला मुक्ती!
यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठंतरी बाहेर फिरायला जायचं, म्हणून मुलींनी लावलेला घोशा संपवण्यासाठी मी कॉंप्युटर उघडला आणि कोकणाचं समग्र दर्शन घडवणारी एक वेबसाईट ओपन केली. कुठेतरी "बाहेर' फिरायला जायचा प्रस्ताव मला फारसा पसंत पडलेला नाही, हे मुलींनी ओळखलं होतं. त्या काहीही न बोलता माझ्याकडे पाहात होत्या. बेवसाईट ओपन होताच, नाईलाजानं त्या पुढे आल्या, आणि पडद्यावरचं कोकण न्याहाळू लागल्या... कोकणातला एक समुद्रकिनारा पाहाताच त्या एकमेकींकडे बघून अर्थपूर्ण हसल्या... मी कोकणात जायचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवणार, हे त्यांनी ओळखलं होतं. मी त्यांचे चेहरे निरखत होतो, पण त्यांच्या चेहऱ्यावरली रेषादेखील हलत नव्हती...
"बाबा, व्हर्जिन समुद्रकिनारा म्हणजे काय हो?' अचानक कर्सर एका जागी स्थिर करत लहान मुलीनं मला विचारलं, आणि ही संधी गमवायची नाही, असं ठरवून मी कोकणपुराण सुरू केलं..
पाखरांच्या किलबिलीनं तिथं उजाडतं, आणि खाडीकाठचं गाव जागं होऊन कामाला लागतं... गोठ्यातल्या गायीगुरांचं हंबरण गावाचं जागेपण जगावर ठसवत असतं... पलीकडच्या पडव्यांमधून पाडसांचा पडसाद त्यात खर्जाचा सूर पेरतो... स्वयंपाकघरातल्या धुरकटलेल्या कपाटातल्या ट्रान्झिन्टरमधून "मंगलप्रभात'चे सूर घरभर पाझरत असतात... मागल्या दारीच्या पाणचुलीवर उकळणाऱ्या गरम पाण्याचा खमंग वास धुराच्या वेटोळ्यांबरोबर परसावात परमळत जातो... आणि त्या धुरातूनच सूर्याची सोनेरी किरणं कौलारू घरांवर विसावतात... गावाची लगबग आणखीनच वाढते, आणि तालुक्‍याला जाण्यासाठी खाडीकिनारी गावकऱ्यांची गर्दी गोळा होऊ लागते.... तरीतून पलीकडं गेलेल्या गर्दीनं एस्टी भरली, की लालभडक धुरळ्याचा एक लोट हवेत झेपावतो, आणि तर त्याच किनाऱ्यावर विसावते... इकडच्या काठावर पुन्हा गर्दी जमली, की तर दुसरा फेरा मारते... दोनचार फेऱ्यांनंतर गर्दी ओसरते, आणि खाडीचं पाणी संथ होऊन विश्रांती घ्यायला लागतं. ताडामाडांची आणि आंब्याफणसांची झाडं खाडीच्या संथ पाण्यात स्वतःला निरखत वाऱ्याबरोबर झोके घेऊ लागतात.... तोवर उन्हं डोक्‍यावर आलेली असतात... गाव थोडासा सुस्तावतो... जेवणं आटोपून थोडीशी निजानीज होते... आणि संध्याकाळची उतरती किरण गावावरून मागं जायला लागताच, गोठ्याकडं परतणाऱ्या गुरांच्या गळ्यातल्या घंटांचा गजर गावात घुमू लागतो... पाठोपाठ देवघरातल्या धूपचंदनाचा सुवास आणि आरत्यांचा गजर गावात तिन्हिसांजेचं पवित्र वातावरण पेरतो, आणि कुठेतरी एखाद्या मंदिरात भजनाचे सूर आळवत गावकरी आपला शीण घालवतात.... अंधार पडताच गाव शांत पहुडतो... आकाशातल्या चांदण्या आपला गारवा गावावर उधळायला लागतात...
...घराच्या कुठल्यातरी भिंतीकडे पाहात मी कोकणपुराण लावले होते, आणि मुली एकटक माझ्याकडे पाहत होत्या. नकळत मी कोकणात जाऊनही पोहोचलो होतो... त्यांच्याही डोळ्यात कोकणातलं ते गाव तरळतंय, असा भास मला झाला, आणि मी "जागा' झालो...
"काय मग यंदा कुठे जायचं?'... मी अपेक्षित उत्तराच्या विश्‍वासानं विचारलं, आणि दोघींनी एका सुरात तेच उत्तर दिलं...
भलताच खुलून मी उठलो, आणि स्वयंपाकघरात पोळ्या लाटणाऱ्या बायकोला हे सांगितलं...
क्षणभर माझ्याकडे एक विचित्र कटाक्ष टाकून, काहीही न बोलता तिनं पोळ्या लाटायचा वेग वाढवला, तेव्हा हा विचार तिला फारसा मानवलेला नाही हे ओळखून मी निमूटपणे बाहेर आलो...
"आई म्हणत असेल, तर यंदा कोकणात जायचं..' मी मुलींसमोर माझ्या प्रस्तावात दुरुस्ती सुचवली, आणि एकमेकींकडे पाहात त्या आत पळाल्या...


पाचदहा मिनिटांत त्या बाहेर आल्या, तेव्हा त्यांचे चेहेरे खुलले होते.
आता काही दिवसांतच आपण कोकणात जाणार, या विचारानं मी सुखावलो...
पण पुढच्याच क्षणाला काहीसा धास्तावलोपण...
एवढं छान वर्णन मी मुलींसमोर केलं होतं, पण "तसं' कोकण खरंच तिथं आपल्याला पाहायला मिळेल?... ते गायीगुरांचं हंबरण, तो संथ खाडीकिनारा, ते आरत्यांचे सूर, ते पाणचुलीवरच्या पाण्याचं खमंग दरवळणं... खरंच आता अनुभवायला मिळेल?...
अशा असंख्य प्रश्‍नांचा एक घट्ट विळखा माझ्या मनाभोवती आवळला गेला, आणि मी आवंढा गिळला...
आता माघार नाही... जे तिथे दिसेल, त्यातच आपल्या मनातलं कोकण शोधायचं, आणि दाखवायचं.... मी ठरवलं, आणि थोडासा सैलावलो...
--------- ------------------
काही दिवसांनंतर आम्ही सहकुटुंब कोकणात दाखल झालो होतो...
कोंडुस्करांच्या शाही गाडीतून पहाटेपहाटे उतरताच मी आजूबाजूला पाहिले...
याच जागेवर, दिवस अगदी डोक्‍यावर आला होता, तेव्हा मी लहानपणी आईचं बोट धरून एस्टीतून उतरलो होतो, तेव्हा दुपार असूनही सारं काही शांतशांत होतं...
आज पहाट असतानाही समोरच्या पानवाल्याच्या गादीवरल्या गुटख्याच्या पुड्या बघताबघता संपल्या होत्या...
पाचदहा रिक्षा स्वतःभोवती घिरट्या घालत गाडीभोवती घुटमळत होत्या...
माझ्या आठवणीतलं ते गाव जागं झालं, आणि मला भूतकाळ दिसू लागला...
तेव्हा एस्टीतून उतरलेले बायाबपये गाठोड्याचे बोजे डोईवर घेऊन घराच्या वाटेनं चालू पडत...
आज रिक्षावाल्यांच्या भोवती गर्दी झाली होती, आणि भाड्यावरनं घासाघीस सुरू होती...
"एवढ्याश्‍या झ्या*** अंतरावर जायला शंबर रुप्पय्य?... लय झालं... चला रं बावानू...' म्हणत एकानं बिस्तरा डोईवर घेतला, तेव्हा मी सुखावलो... ती आठवण पुन्हा समोर जिवंत झाली होती... पण अखेर रिक्षावाल्यानं तोड केली, आणि बोजेबिस्तरा रिक्षात टोऽून त्यावर कोंबून बसत रिक्षा फुरफुरत निघून गेली...
लाल धुरळाही कुठेच उडालेला दिसत नव्हता...
आम्ही सामान घेऊन गावातल्याच मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झालो, तोवर सकाळचतांगलीच तापली होती... मी ती स्वप्नातली पहाटच शोधायचा प्रयत्न सोडूून दिला होता...
बॅगा कोपऱ्यात ठेवून आम्ही ओटीवरच्या "सोफ्या'वर विसावलो, तेव्हा मुली एकमेकींकडे पाहात होत्या.... बायको तर गप्पच होती. मी त्यांच्याकडे पाहायचेच टाळले...
चहापाणी झाल्यावर आम्ही आंघोळीच्या तयारीला लागलो...
बाथरूनमध्ये गीझर तयार होता...
पाणचुलीचा खमंग वास मुलींना मिळणारच नव्हता, हे मी ओळखले, आणि ओशाळलो... आठवणींचा तो कप्पाच मी बंद करून टाकला...
आंघोळी आटोपल्या, आणि माजघरातल्या डायनिंग टेबलावर आम्ही न्याहारीसाठी एकत्र आलो...
लहानपणी या घरात आम्ही न्याहारीच्या वेळी गरमगरम वाफाळलेल्या भातावर, कुळदाचं खमंग पिठलं, आणि लसणाची लालभडक चटणी घेऊन ताव मारायचो...
आज समोरच्या "प्लेट'मध्ये वाफाळलेल्या इडल्या आमच्याकडे बघून हसत होत्या...
भुकेलेपणामुळं आणि सवयीनं, भराभरा इडल्या संपवून मी शांत बसलो होतो, तेवढ्यात ओटीवर कुणाचीतरी चाहूला लागली, म्हणून बाहेर आलो...
"साब है क्‍या?'.... कुणीतरी विचारलं आणि मी आत पाहिलं...
घरधनी तोवर बाहेर आलेलेच होते...
"अरे भय्या, जल्दी करो... आज माल भरके टेम्पो जानाच चाहिये... पचास-सो पेटी आज मार्केटमे उतरना चाहिये...' घरधनी सांगत होते, आणि "भैय्या' मान डोलावत होता...
जाताना त्यानं गेट कडी लावून बंद करून घेतलं...
लहानपणी त्याच जागी, बांबूच्या "बेड्या'तून वाकून मी आतबाहेर करायचो...
"काय रे, यंदा आंबेफणस आहेत की नाही?'... कोकणात गेलेल्या कोणत्याही चाकरमान्यासारखा पहिला प्रश्‍न मी घरधन्याला विचारला, आणि तो ओशाळल्यासारखं हसला...
"छे रे... परवाच्या पावसान्‌ पार वाट लावलान आंब्यांची...' तो माझ्याकडं पाहायचं टाळत म्हणाला...
मुलींनी पुन्हा एकमेकींकडे पाहिलं... मी गप्प झालो...
पण कुठेतरी दुखल्यासारखं वाटत होतं... ते, मुलींना वर्णन करून सांगितलेलं कोकण शोधून काढून मुलींना दाखवायचंच, असं मनाशी ठरवलं...
... संध्याकाळी आम्ही सगळे डोंगरावरल्या बागेत फिरायला गेलो.. तिथं कलमांना लगडलेले आंबे न्याहाळताना, मुलींच्या डोळ्यात, त्यांनी "ऐकलेलं' ते कोकण तरळतंय असा मला भास झाला आणि मी सुखावलो... काटेरी जाळ्यांमधली करवंद ओरबाडत मुली शहरीपण विसरल्या होत्या... मला खूप बरं वाटलं... एकंदरीत मुलींच्या मनात खुशी साठत होती...
...दुसऱ्या दिवशी पहाटेच त्या उठल्या, आणि बाहेर पडल्या.... पलीकडच्या गोठ्यात कुणीतरी गायीचं दूध काढत होता, आणि दुसरीकडे एक गोंडस पाडस धसमुसळेपणा करीत लुचत होतं... तो मातृसोहळा पाहताना त्या हरखून गेल्या... अचानक, गोठ्याबाहेरच्या बांबूच्या बेटात सळसळ सुरू झाली, आणि एक वेगळीच शीळ हवेत वेटोळी घालू लागली.... त्या गोठ्याबाहेर धावून भान विसरल्या होत्या...
माझ्या मनातही म्तपैकी शीळ वाजू लागली... "ते' कोकण कुठेतरी "उमटत' होतं....
'इडली, भैय्या आणि मी' याच्यापलीकडचं काहीतरी अनुभवायला मिळणार, या समाधानानं मीही हरखून गेलो होतो...
"... गावात रेल्वे आली ना, तर मी हितं ऱ्हाणार नाय... पलीकडच्या डोंगरावरल्या डागेत घर बांधून तिथं ऱ्हायला जाणार'... काही वर्षांपूर्वी याच घरधन्यानं काढलेले हे उद्‌गार आज माझ्या कानात पुन्हा घुमले... मी हळूच त्याच्याकडं बघितलं...
आपण कधीकाळी असे बोललो असू, हे आज त्याला सांगितल्यानंतरही पटलं नसतं, याची मला खात्री होती.. मी गप्पच होतो.
कोकणाच्या नव्या बदलांशी तो पुरता सामावून गेला होता.... पण तो जुना ताजेपणा आजही तितकाच टवटवीतपणे कुठेकुठे दिसत होता...
...."उद्या आपण समुद्रावर जायचं'.. मी न्याहारी करताकरताच जाहीर करून टाकलं.
"व्हर्जिन समुद्रकिनारा' मुलींना दाखवता येईल, अशी माझी खात्री झाली होती.
दुसऱ्या दिवशी, दिवसभर गावाबाहेरच्या डोंगरावरल्या आमराईत घालवून आम्ही संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर पोचलो... सोनेरी किरणांनी समुद्र नुसता चमकत होता...
नुकत्या ओसरलेल्या भरतीनं ओल्या झालेल्या वाळूत आख्खं आकाश आपलं रंगीबेरंगी रूप न्याहाळत होतं...
आणि वावभर अंतरावर स्थिरावलेल्या दमल्याशीणल्या होड्या, वाऱ्याबरोबर हेलकांडत डुलत होत्या...
ते सुंदर रूप डोळ्यात साठवताना, मुली भान हरून स्तब्ध झाल्या होत्या... आकाशातला संधिप्रकाश संपून अंधाराची चाहूल सुरू झाली, तेव्हा भानावर यूेन मी त्यांना उठवलं, आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलो...
सहज त्यांची नजर आकाशाकडे गेली, आणि एक आनंदाचा हुंकार सहज उमटून गेला...
असंख्य चांदण्यांच्या रुपेरी छटांनी आकाश न्हाऊन निघालं होतं...
सोनेरी किरणांपाठोपाठ निसर्गानं केलेली ती रुपेरी उधळण भान हरपवून टाकणारी होती...
... माझी छाती उगीचच अभिमानानं फुलून गेली... आपणंच हे सगळे चमत्कार घडवतोय, असं मला वाटू लागलं, आणि या विचारानं मी स्वतःशीच हसलो...
... लहानपणी, याच घरातल्या एका खोलीत आंब्याच्या अढ्यांनी घरात घमघमाट सुटलेला असायचा... आम्ही सकाळसंध्याकाळ आंब्यांवर ताव मारायचो... आजही एका कोपऱ्यात तोच वास दरवळत होता... एका न्याहारीसोबत अस्सल हापूसच्या चारदोन फोडी चाखून मुलींनीही कोकणातला "आंबा महोत्सव' साजरा केला होता....
ओटीवरच्या पडवीत, पेट्या भरायची लगबग सुरू होती...
त्या रात्री जेवणं उरकली, आणि आम्ही गप्पा मारायला ओटीवर बसलो...
समोरच्या, आसपासच्या घरांतले सगळेजण कोण पाव्हणे आलेत, म्हणून बघायला जमले, आणि जुन्या ओळखी पटताच, गप्पांना मस्त रंग भरत गेला...
"काही म्हणा, पण कोकणात आता पहिल्यासारखी मजा नाही राहिली बुवा...' मी खडा टाकला.
मिनिटभर सगळे शांत झाले...
"खरंय तू म्हणतोयस ते..' एकानं सुरुवात केली, आणि नव्या अर्थशास्त्रानं कोकणाचा कायापालट कसा घडवून आणलाय, याची एकामागून एक उदाहरण तो देऊ लागला...
"...पूर्वी, गावात रेल्वे नव्हती, तेव्हा आंब्याला गिऱ्हाईकच नव्हतं... रेल्वे आली, आणि हापूस आंब्यात पैसा आहे, हे आम्हाला दिसलं... तुम्ही शहरातली माणसं, पैशामागं धावता... आमी तेव्हा धावत नव्हतो.. म्हणून इथलं वेगळेपण तुम्हाला जाणवायचं... आमचं कौतुक व्हायचं... आमची कौलारू घरं, नारळापोफलीच्या बागा बघायला लोकं यायची, आणि हरवंगार कोकण बघून हरखून जायची... पण इथल्या, आंब्यात, फणसात, कोकमात, काजूत आणि जांभळा-करवंदातही कोकणाला समृद्ध करायची ताकद आहे, हे रेल्वेनं आमाला पटवून दिलं, आणि आम्ही बदललो... पूर्वी आमाला चाकरमानंकडून मनिऑर्डर यायची... आता आम्ही शहरात शिकणाऱ्या आमच्या मुलांना इथून पैसे पाठवतो... आता ओघ उलटा झालाय...' तो बोलत असताना, त्याच्या शब्दाशब्दांतला अभिमान मला स्पष्ट दिसत होता...
... मला उगीचच अपराधी वाटायला लागलं...
केवळ ते हिरवेगार डोंगर, ती गर्द रानं, सोनेरी किरणांनी न्हालेली सकाळ, पाणचुलीचा खमंग वास, कौलारू घरं, आरत्या भजनांचे सूर आणि गायीगुरांचं हंबरणं... हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळावं, म्हणून कोकणानं बदलायचंच नाही?... हा आपला अप्पलपोटेपणा आहे, असं मला वाटायला लागलं, आणि मी नकळत मान डोलावली...
"... उद्या इथे मोठ्ठा वीज प्रकल्प होणाराय... मग गावात उद्योगधंदे सुरू होतील... आमची शिकलीसवरलेली मुलं, मुंबई पुण्यातल्याच नव्हे, तर इंग्लंड अमेरिकेतल्या नोकऱ्या सोडून गावाला परत येतील.... आमच्या आंब्या काजूरोबरच, इथे कॅनिंग-टॅनिंगचे कारखाने सुरू होतील... आमचा माल परदेशात एक्‍स्पोर्ट होईल... कोकणात पाऊस भरपूर पडतो.. पण पाणी टिकत नाही... आता इथे कालवे होतील, धरणं उभी राहातील... अडलेलं हे पाणी आमच्या परसातल्या विहिरींतून फुटेल, आणि आमच्या बागा बहरतील... नवी हिरवाई इथे तुम्हाला दिसेल. तिला थओडासा व्यापारी स्पर्श असेल, पण ते घडणार आहे... तुम्हाला, शहरातून चार दिवस येणाऱ्यांना ते कदाचित मानवणार नाही, पण ते अटळ आहे...' भविष्याकडे बघत तो बोलकत होता, आणि मी भान विसरून ऐकत होतो...
कोकणाचं ते मनात साठवलेलं रूप हळूहळू धूसर होत जात होतं, आणि नवं, भविष्यातलं कोकण मनाच्या पडद्यावर आकाराला येत होतं...
मी चटकन भानावर आलो... काहीही झालं तरी ते कोकण मनाच्या पडद्यावरून पुसायचं नाही, असं ठरवलं...
तरीही, कोकणातला माणूस, धावपळ करतोय असं दृश्‍य माझ्या डोळ्यासमोर तरळत होतं... भावनांच्या बंधनात जखडलेलं कोकणातलं भूतकाळातलं ते रूप मुक्त होताना मी अनुभवत होतो... आणि भविष्याच्या एका स्वप्नात मी डोकावत होतो.
ते कोकण बघायला, आणि अनुभवायला, यापुढेही कोकणात येतच राहायचं, असं मी मनाशी ठरवून टाकलं....
-------