Saturday, March 22, 2008

मोगरा फुलला...

मोगरा फुलला...

आपल्या गावाच्या मातीशी असलेलं नातं जपण्यासाठी आणि त्या नात्याचं कृण फेडण्यासाठी मुंबईत कारकुनी आणि सफाईकाम करणार्‍या चाकरमान्यांनी बघितलेलं गावच्या विकासाचं स्वप्नं साकारतं आणि गावकुसाच्या कितीतरी बाहेर,मुंबैची जीवनरेषा असलेल्या रेल्वेलायनीलगत एका इमारतीबाहेरच्या मलूल मातीत रुजलेला एक वेल बघताबघता फोफावत जातो... तो विस्तारतो आणि त्याला कृतकृत्यतेचा बहरही येतो... त्या बहराचा सुगंध आसमंत भारून टाकतो आणि त्यानं झपाटलेल्यांची एक शोधयात्रा सुरू होते... आसपासच्या अनोळखी कोलाहलात, ओळखीचा, आपलासा वाटणारा सूर कानावर पडला, की पलेपणाच्या, जवळीकीच्या जाणीवा अशाच फुलतात... माणूस जागा होतो... आणि त्या सुरांशी ओळख असलेल्या अनेक दुव्यांची एक साखळी सहज तयार होते...

मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सजवळ नायर हॊस्पिटलच्या होस्टेलमध्ये त्या दिवशी अशीच एक साखळी गुंफली गेली होती... त्या साखळीचा प्रत्येक दुवा खरं तर एकमेकांशी फारसा परिचितही नव्हता. पण लाल मातीच्या प्रेमाच्या समान धाग्यानं त्यांना एकमेकांशी जोडलं होतं आणि त्या अपरिचित नात्याला कोकणच्या मातीत फुललेल्या आणि मुंबईच्या कलकलाटात फोफावलेल्या निरपेक्षभावाचा स्पर्श होता... जन्मदात्या मातीशी नातं जोडलेल्या चाकरमान्यांच्या कामातून आणि घामातून उमटलेला निरपेक्ष कर्तव्यभाव पाहून, आपणही त्या मातीशी नातं जोडावं, असा ध्यास घेतलेल्यांचं एक आगळं संमेलन तिथे साजरं होत होतं.... कुणाला कोकणच्या जादूभर्‍या हिरवाईची ओढ होती, तर कुणी त्या मातीच्या सेवेसाठी आसुसलेला होता... कुणाला त्या मातीशी नवं नातं जोडायचं होतं, तर कुणी बराच काळ दुरावलेलं नातं पुन्हा जोडणार होतं... कोकणातल्या अर्धशिक्षित, अविकसित आणि विकासाकडे डोळे लावून बसलेल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी करावं, अशी कुणाची इच्छा होती, तर कुणी त्यासाठी हातभार लावायच्या तयारीनिशीच दाखल झाला होता...

आपल्या अविकसित गावातल्या पुढच्या पिढीच्या डोळ्यातली स्वप्नं मुंबईतल्या नायर हॊस्पिटलात कारकुनी करणार्‍या चाकरमा्न्यांनी एकदा स्पष्टपणे वाचली आणि त्या वेळच्या अस्वस्थ जाणीवेच्या उद्रेकातून त्यातल्याच एकाच्या टेबलाभोवती दुपरच्या जेवणाच्या सुट्टीत लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ स्थापन झालं... ही गोष्ट जवळपास पंधरा वर्षांपूर्वीची... कोकणातल्या गावागावांची विकास मंडळं गिरण्गावात नाक्यानाक्यावर उभी आहेत. त्यात आण्खी एकाची भर पडली, असं त्या वेळी गावाकडच्यांना वाटलं... पण ह्या मंडळाचं रूपच वेगळं होतं... गावाच्या विकासासाठी स्वत:च्या खिशात हात घालणारी मोजकी मंडळी एकत्र आली होती... गावातल्या आणि गावोगावीच्या मुलांची शिक्षणाची भूक भागवण्यासाठी, त्यांच्या कपड्या-वह्यापुस्तकांच्या आणि शाळेच्या खर्चासाठी आपल्या तुटपुंज्या पगारातला काही हिस्सा न चुकता बाजूला काढणार्‍या आणि मुंबैतल्या आपल्या लहानश्या घरात रात्ररात्र जागून, गावाकडच्या अनोळखी पिढीसाठी स्वत:च्या हातांनी युनिफॊर्म शिवणार्‍या, वह्या-पुस्तकांचे गठ्ठे डोक्यावर घेऊन कोकणातल्या गावागावातल्या शाळेत स्वत:च्या हातांनी मुलांना वाटण्याकरिता स्वत:च्या खर्चानं कोकणात जाऊन पायपीट करणार्‍या, गरीब मुलांच्या अंगीचे गुण जाणून त्यांच्या भविष्याची हमी उचलणार्‍या आणि एवढे सारे करतानाही, स्वत:च्या नावाचा कुठेही गाजावाजादेखील होऊ नये, याची काळजी घेणार्‍या या मंडळाच्या कामाचा सुगंध आपोआपच कानाकोपर्‍यात पसरला...

कोकणातल्या संगमेश्वरजवळच्या कुरधुंड्याचे मुल्ला मास्तर, आपल्या पंचक्रोशीतल्या सगळ्याच मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जातवाल्यांचा विरोध झुगारून उर्दू शाळेऐवजी मराठी शाळा सुरू करतात, आणि त्या पंचक्रोशीतली मुलं मुल्ला मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली `श्रीगणेशा' शिकतात... राजापूरजवळच्या खेड्यातून बहिणीच्या पाठीवरून तीन मैलावरच्या शाळेत येऊन दहावीच्या परिक्शेत चमकणारा ईशेद फर्नांडिस मंडळाच्या मदतीनं आपलं शिक्षण पूर्ण करतो, आणि नोकरीच्या पहिल्या पगाराचा चेक मंडळाकडे सुपूर्द करून कर्तव्यभावाचा एक आगळा आदर्श उभा करतो... कळस म्हणजे, या कामासाठी आपल्या तुटपुंज्या पगारातून एक्रकमी तीनशे रुपये महिन्याला बाजूला काढणे अवघड असल्याने, वर्षाचे `हप्ते' बांधून नायर हॊस्पिटलातली काही सफाइ कामगारही या कामातला भार शिरावर घेताना सुखावतात... `स्वार्थासाठी वाट्टेल ते' असे अघोषित ब्रीदवाक्य असलेल्या असंख्य विकास मंडळांच्या बुजबुजाटात, आपल्या दुबळ्या हातांनी पर्वताएवढं काम करणार्‍या या मंडळाची ओळख घरात पटली, आणि असंख्यांनी या कामासाठी खारीचा वाटा उचलायची तयारी सुरु केली... एकमेकांशी संपर्क झाला. मंडळाचे कार्यवाह मधुकर पवार यांच्याशी चर्चा करून परस्परांनी मुंबैत या स्नेहमेळाव्याचं आयोजन केलं, आणि नायरच्या त्या सभागृहात हा सोहळा झाला... विकासासाठी भुकेलेल्या मातीनं मारलेली अनामिक हाक अनेक कानांपर्यंत पोहोचलेली होती...

या संमेलनात त्या दिवशी पुण्याच्या डॊ. रानडे होत्या, तळेगाव-दाभाड्याचे साने होते, नाशिकचे डॊ. गोयल होते, पालघरचे
जोशी होते, दिल्लीचे गणपुले वकील होते, आणि सोलापुरचे गवळी होते... चेंबुरचे पोतनीस होते, नाशिकच्या सुधा नाईक,
डॊ. महाशब्दे, अमरावतीचे सांडव, पुण्याच्या अरवंदेकर, रंजना नाइक, आणि असंख्यांनी या कामात भरभरून सहभागाची
तयारी दाखवली होती....

प्रत्यक्ष डोळ्यांनी न पाहाताही अनेकांना कोकणातल्या गावांच्या व्यथांची जाणीव झाली, आणि त्या पुसण्यासाठी हे हात सरसावले... डॊ. पोतनीसांच्या अमेरिकेतल्या मुलीनं तर कोकणातल्या अनेक अनोळखी गावांतल्या शाळांमधली स्वच्छतागृहांची गैरसोय ओळखून संडास बांधून द्यायची जबाबदारी उचलली... अशा १९ शाळांची यादी या सोहळ्यातच तयार झाली..

अंधेरीच्या कुलकर्णी बाई, रयत शिक्षण संस्थेतून शिक्षिका म्हणून रिटायर झाल्या आहेत. मेळाव्याच्या सुरुवातीलाच,स्वागत करणार्या मुलीनं, `कुंकू लावू का', असं विचारलं, तेव्हा क्षणभर त्या़चं वृद्ध मन भांबावलं... पण नंतर ठाम होकार देवून त्या पुढे झाल्या... या प्रश्नानं मला माझ्या स्त्री शक्तीची जाणीव करून दिली, असं सांगत त्यानी मेळाव्याला एक वेगळाच स्पर्श दिला, आणि, हातपाय हलताहेत तोवर आपण मंडळासाठी काहीतरी करत राहू, अशी ग्वाही देत, मुलांसाठी पुस्तकांच्या देणग्या गोळा करण्याचा संकल्पही त्यांनी सोडला... मंडळाचे कार्यवाह मधुकर पवार यांच्याशी संपर्क साधून देणग्या पाठवणारे अनेकजण त्या दिवशी हजर राहू शकले नव्हते. पण त्यांचा मदतीचा शब्द कामाची उभारी वाढवणारा होता... चेंबूरचे पोतनीस आणि व्हीलचेअरवरून आलेले त्यांचे वृद्ध मित्र धारप यांनी शाळांमध्ये वर्षभर पिण्याच्या स्वच्छ पाण्याची हमी घेतली... मंडळाने निवडलेल्या प्रत्येक शाळेत लिक्विड सोप आणि नळ देण्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. मुले आरोग्यसंपन्न होतील आणि विकासाची शक्ती आणखी वाढेल, एवढाच त्यामागचा निर्मळ हेतू...

मागच्या एका खेपेत, शाळांच्या बालवाड्यांमध्या काचेच्या कपाटात कुलुपाआड ठेवलेली खेळणी पाहून मधुकर पवार अस्वस्थ झाले होते... ही खेळणी जिल्हा परिषद वर्षातून एकदाच देते आणि लहान मुलं खेळताना ती मोडतात. मग पुन्हा मिळत नाहीत. म्हणून कपाटातली खेळणी काचेआडूनच आम्ही मुलांना दाखवतो, या शिक्षकांच्या उत्तरानं ते बेचैन झाले. खेळण्यांशी खेळणं हा तर चिमुकल्यांचा हक्क असतो. इथे तो हक्कच कुलुपबंद झाला होता... आम्ही मुलांसाठी खेळणी देऊ, पण पुढच्या वर्षी त्यातलं एकही खेळणं चांगलं राहता कामा नये... प्रत्येक खेळणं मोडलं, तरच पुढच्या वर्षी नवीन खेळणी मिळतील, अशी आगळी अट घालून मंडळ त्या बालवाड्यांना खेळणी पुरवणार, असं पवारांनी सांगितलं, तेव्हा टाळ्या वाजवणार्‍या प्रत्येक हाताला आपल्या चिमुकल्या हातांनी बालपणी हाताळलेल्या खेळण्यांच्या स्पर्शाची पुनराभूती होत असावी...

मंडळाच्या कामाला आता अनेक हात लाभले आहेत. आठ जोडप्यांनी या कामाला वाहून घ्यायचा संकल्प त्या मेळाव्यातच सोडला होता... मंडळाच्या कामाचा सुगंध आता आण्खी दूरवर पसरला असेल... त्याला मस्तीची मिजास चिकटू नये, याची काळजी घेत माणसं जोडायची, हा मंडळाचा नवा संकल्प आहे...

2 comments:

Anonymous said...

Farach changla upkram aahe. Jyanna pratyaksha yogdan karne shakya nahi, tyanchyasathi madat karnyacha kahi marg aahe ka? Donation karnyasathi website ahe ka?

Anonymous said...

स्फूर्तिदायक लेखन आणि उपक्रमही. अशा उपक्रमांतूनच जाग्या समाजमनाची खात्री पटते.