Wednesday, December 31, 2008

आपत्तींचा उत्तररंग

अनेक वर्षांपूर्वी देशाच्या दोन दिशांना, अस्वस्थ पंजाबात आणि धगधगत्या आसामात दाटलेले अंतर्गत दहशतवादाचे सावट दूर होत असतानाच आंतरराष्ट्रीय दहशतवादाने भारतात घर केले. पंजाबातील "ऑपरेशन ब्लू स्टार'नंतरची पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली, तेव्हापासून दहशतवादाच्या अमानवी सावलीने देश काळवंडत गेला. नंतरच्या गेल्या सुमारे पंचवीस वर्षांत देशात दहशतवादी कारवायांनी धुमाकूळ घातला आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई दहशतवादी कारवायांची लक्ष्य बनली. 1992-93 च्या जातीय दंगली आणि नंतरच्या बॉम्बस्फोटांमुळे मुंबईचा चेहरा आणि मानसिकता यांमध्ये एक संथ बदल होत चालला आहे. दहशतवादाची चाहूल लागताच चिडीचूप होणारी दहापंधरा वर्षांपूर्वीची मुंबई आज दहशतवादी कारवाया पाहण्यासाठी उत्सुकतेने रस्त्यावर उतरून अलोट गर्दी करते...
शेकडो बळी घेणाऱ्या जातीय दंगली आणि बॉम्बस्फोटासारख्या मानवनिर्मिती आपत्तींपाठोपाठ महापूर, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींचे गंडांतर गेल्या काही वर्षांत मुंबईने झेलले. या आपत्तींनी मुंबईच्या समाजमनाच्या एखाद्या कोपऱ्यात माणुसकीचे अनोखे दर्शनदेखील घडले, पण या घटनांचा मुंबईच्या मानसिक आरोग्यावर एक परिणाम नकळतपणे होत गेल्याचे अनेक सामान्यांनाही वाटते. नैसर्गिक आपत्तींनंतर रोगराई, साथीचे आजार फैलावतात, आणि त्या आपत्तींमधून बचावलेले असंख्य जीव नंतर त्यांचे बळी ठरतात. निर्घृणपणे शेकडो बळी घेणाऱ्या मानवनिर्मित आपत्तींनंतर सामाजिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा मात्र अशा दृष्टिकोनातून फारसा विचार केला जात नाही. 1993 मधील भीषण बॉम्बस्फोट मालिकांनंतर लगेचच मुंबईचे जनजीवन पूर्ववत झाल्याचे अभिमानाने सांगितले जात होते. कठीण प्रसंगातही न डगमगण्याच्या वृत्तीमुळेच मुंबई सावरली आणि पुन्हा पूर्वीच्याच उत्साहाने कामाला लागली, असे सांगितले जात असले, तरी सामाजिक अभ्यासकांना मात्र हा मुंबईकरांच्या मानसिकतेमधील हा बदल अस्वस्थ करीत होता. नैसर्गिक आपत्तींनंतर येणाऱ्या साथीच्या आजारांप्रमाणेच, मानवनिर्मित आपत्तींतून बचावल्यानंतर "आपण वाचलो' या भावनेच्या पगड्यामुळे सामाजिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचीच ही चाहूल असू शकते, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली होती. नोव्हेंबरातल्या दहशतवाद्यांच्या धुमाकुळाच्या दोन दिवसांतील घटनाक्रमानंतरची मानसिकता पाहता, ही भीती खरी ठरते आहे का?
मुंबईत दहशतवाद्यांनी धुमाकूळ सुरू केला आणि मुंबईचे जनजीवन खिळखिळे झाले. देशात यापूर्वी कधीही, कोठेही दहशतवाद्यांनी एवढा भीषण हल्ला चढविलेला नाही. काश्‍मीर खोऱ्यातील सततच्या पाक पुरस्कृत दहशतवादी कारवायांमुळे तेथील जनजीवन विकलांग झाले. हतबलतेच्या भावनेने पछाडलेल्या समाजाचे मानसिक आरोग्य सुदृढ राहू शकत नाही. भीतीच्या सावटाखाली वावरणारा समाज उभारी धरू शकत नाही आणि मानसिक शक्ती हरवलेल्या समाजाला वेठीस धरणे सोपे होते, हा दहशतवादी कारवायांमागील गेल्या चार दशकांचा सिद्धांत आहे. मुंबईतदेखील, दहशतवादी कारवायांमधून याचाच प्रयोग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असावा. दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईकर जनता तत्परतेने संकटग्रस्तांच्या मदतीला धावून येते. रक्तदानासाठी रांगा लागतात,जखमींना इस्पितळांमध्ये नेण्यासाठी अनेक हात पुढे होतात. सामाजिक संवेदना जाग्या करणारा हा एक पैलू जिवंत असला, तरी संकटाची सावली दूर होताच संशयाचे वातावरण पसरते आणि प्रत्येकजण स्वतःला एकटा समजू लागतो. समोरच्या प्रत्येकाविषयी संशयाचे भूत मनावर स्वार होते आणि आपुलकीची भावना थंडावत जाते. याचा अनुभव गेल्या काही वर्षांपासून अनेकांनी घेतला आहे. समोरच्या कोणत्याही व्यक्तीवर लगेचच विश्‍वास ठेवायचा नाही, हा मुंबईच्या स्वभावाचा अगोदरपासूनचा व्यावहारिक स्थायीभाव मानला जातो. व्यापारी शहर असलेल्या मुंबईची सामाजिक मानसिकतादेखील "बनिया' वृत्तीकडेच झुकणारी असल्याचे बोलले जाते. दहशतवादी कारवायांमध्ये पोळल्यामुळे मुंबईकरांच्या या मूळच्या मानसिकतेत संशयी वृत्तीची भर पडत गेली. समोरच्या व्यक्तीवर विश्‍वास ठेवायचा नाही, आणि ठेवला तर कदाचित फसविलेच जाऊ, असा विचारदेखील मुंबईत जागोजागी रुजलेला दिसतो. घड्याळाच्या काट्यामागे धावताना होणारी दमछाक आणि त्यात या भावनेची भर, त्यामुळेच, "मला काय त्याचे' ही वृत्तीदेखील वाढत असल्याचे दिसते.
मुळात, मुंबई हे गतिमान शहर आहे. इथे प्रत्येक व्यक्ती ही पोटापाण्यासाठी वेळेशी स्पर्धा करीत धावताना दिसते. त्यासाठी करावी लागणाऱ्या कष्टांमुळे प्रत्येकाच्या मानसिकतेला आत्मकेंद्रित प्रवृत्तीचाही पदर तयार झाला आहे. बहुसंख्य मुंबईकरांना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पायपीट करण्यासाठी दिवसाचा वेळदेखील कमी पडत असल्यामुळे हे शहर झोपी जात नाही, हे वास्तव आहे, आणि ते खरे तर चटका देणारे आहे. मात्र, या वास्तवाच्या दाहकतेऐवजी तो मुंबईचा एक अभिमानास्पद गुण असल्याचे सांगत "न झोपणारे शहर' किंवा "गतिमान शहर' अशी बिरूदे मुंबईला लावली जातात. "सूज' आणि "गुटगुटीत आरोग्य' यांतील फरक वेळीच न ओळखता आल्यास कालांतराने दुष्परिणामांना तोंड द्यावे लागू शकते. मुंबईच्या बाबतीत नेमकी तीच परिस्थिती आजवर अस्तित्वात होती. मुंबईचे अभिमानास्पद पैलू म्हणून ज्याकडे बोटे दाखविली गेली, त्यामागील सामाजिक मानसिकतेचा विचार करण्याची नेमकी गरज आता निर्माण झाली आहे. 1993 च्या दहशतवादी हल्ल्यांनी अनेक धडे मिळाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर मुंबईने अनेक आपत्ती झेलल्या. त्या प्रत्येक आपत्तीतूनही अनेक धडे मिळाले. पण त्यातून शिकावयास काय मिळाले, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच आहे. म्हणूनच, काही दिवसांपुरत्या सावधानतेनंतर पुन्हा एक शिथिलता पसरते, आणि गतिमान मुंबई मानसिकदृष्ट्या शिथिल होते. मुंबईत जागोजागी दिसणाऱ्या कडेकोट सुरक्षेच्या चौकटी सहजपणे भेदता येतील, इतक्‍या तकलादू असल्याचा धडा या नव्या संकटाने मिळाला आहे. आजवरच्या अनेक संकटांमुळे अशा संकटांचा आता सरावच झाला आहे, अशी मानसिकता त्या दोनतीन दिवसांतील सामान्य मुंबईकरांच्या प्रतिक्रियांमधून स्पष्ट झाली. दहशतवादी कारवाया पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मुंबईच्या सामाजिक आरोग्यातील हे सूक्ष्म बदल व्यक्तिगतरीत्या प्रत्येक मुंबईकरास अस्वस्थदेखील करतात. "मॉब सायकॉलॉजी', म्हणजेच सामाजिक मानसिकतेपुढे व्यक्तिगत मानसिकता नेहमीच पराभूत होत असते. त्यामुळे अशी व्यक्तिगत अस्वस्थता हे बदल थोपवू शकणार नाही. सामाजिक आरोग्यात होणारा बदल हा "गुटगुटीतपणा', की "सूज' याचा विचार करून योग्य वेळी सामाजिक स्तरांवर योग्य उपचार झाले नाहीत, तर आज कुठेकुठे दिसणारे संवेदनशील कोपरे उद्या गुळगुळीत होतील, याची जाणीव जबाबदारांनी ठेवावयास हवी.

Sunday, November 23, 2008

चिंतू - २

...ती बातमी वाचली आणि मला धक्का बसला.
कुणा शास्त्रज्ञानं उभी हयात घालवून तयार केलेल्या एका `मायक्रोक्लोन'चा फॉर्म्युला गायब झाला होता.
हा मायक्रोक्लोन हवेत विरघळून एखाद्याच्या श्वासावाटे शरीरात गेला, तर त्या मानवी शरीरातच दुसरा जीव तयार होणार होता...
सगळ्या जगाला धोक्याचा इशारा देणारी ती बातमी, माझ्या हातातल्या वर्तमानपत्राच्या डाव्या बाजूच्या पानावर, अगदी तळाला कुठल्यातरी कोपर्‍यात होती.
...ती वाचली, आणि माझा थरकाप झाला.
कोणता मायक्रोक्लोन असेल तो?...
त्याचा हवेत विरघळून माणसाच्या शरीरात प्रवेश करणारा हिस्सा जर माणसाच्या शरीरातच `घर' करणार असेल, तर असे किती जीव या मायक्रोक्लोनच्या हवेतल्या तरंगणार्‍या मायक्रोकणांच्या जाळ्यात सापडले असतील?...
समजा, त्या कणांनी माणसाच्या शरीरात प्रवेश करून नवा जीव माणसाच्या आत तयार झालाच, तर काय होईल?...
तो जीव काय करील?...
ज्या शरीरात तो तयार होईल, त्या शरीराचा ताबा घेण्याइतका तो शक्तिमान असेल?...
त्या मायक्रोक्लोनचे काय `गुण' असतील?
वेगवेगळ्या प्रश्नांनी घेरल्यामुळे मी आणखीनच चिंतातुर झालो.
अशीच बातमी जगाच्या मीडियाजालावर कुठे सापडते का ते शोधण्यासाठी मी `नेट' लावला...
सर्च इंजिनातून फिरताफिरता मला `क्लू' सापडला...
आणि मी `क्लिक' केलं...
आपण आपल्या घरे येणार्‍या वर्तमानपत्रात एका कोपर्‍यात वाचलेल्या त्या भयंकर बातमीनं, जगभर हलकल्लोळ माजवला होता, हे मला तेव्हा समजलं.
हा मायक्रोक्लोन हवेतून एखाद्याच्या शरीरात घुसला, तर तो मानवी देहाचा ताबा घेतो, आणि मग,...
तो माणूस `तो, त्याचा' राहात नाही...
असं काहीतरी त्या बातमीत होतं!
मग, हा बदललेला माणूस कसा असतो?
मी आणखी उत्सुकतेनं पुढे वाचू लागलो...
...आणि त्या दिवशी, चिंतूशी शेकहँड केल्यानंतर शरीरभर पसरलेलं, ते, लिबलिबीत, हिरवंकाळं, पुन्हा आतल्याआत घुसळतंय, असं मला व्हायला लागलं.
मी माऊस सोडून डोकं घट्ट पकडून बसलो...
नंतर हाताचं एक बोट नकळत नाकातही गेलं.
आणि, काळजीचं, चिंतेचं सावट माझ्या मनावर घट्ट दाटलं...
काय असेल हा मायक्रोक्लोनचा प्रकार?...
आपल्याला तर, सायन्सचं काडीचंही ज्ञान नाही...
मग आपण यात कशाला खोलात शिरतोय?
कुणी का असेना तो मायक्रोक्लोन, आपल्याला काय त्याचं?
... तरीही, माझे डोळे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरून झरझर सरकत होते.
हा मायक्रोक्लोन कुठल्यातरी एक सूक्श्म जंतूचा असल्याचं पटकन कुठेतरी दिसलं, आणि माझी नजर तिथं खिळली...
... या जंतूच्या संसर्गानं, मन पोखरायला लागतं.
आपल्याशी काडीचंही देणंघेणं नसलेल्या विचारांचे जंतू डोक्यात पिंगा घालायला लागतात.
माझ्या मनात एकदम काहीतरी लक्कन चमकलं...
म्हणजे, हा `चिंतातुर जंतू'... मी मराठीत त्याचं नामकरणही करून टाकलम, आणि `युरेक्का'च्या थाटात पुन्हा स्क्रीनकडे बघितलं...
... पुढच्या ओळी, वेड्यावाकड्या होऊन माझ्या डोळ्यासमोर नाचतायत, असं मला वाटायला लागलं...
डोक्यात तेच नाव पिंगा घालायला लागलं.
चिंतातुर जंतू...
मी हादरलो होतो.
आता शरीरातलं ते हिरवंकाळं, लिबलिबीत जोरजोरात घुसळायला लागलं होतं...
चिंतातुर जंतू... चिंतू?...
मला एकदम चिंतूची आठवण झाली, आणि मी शहारलो...
मी डोळे मिटून घेतले.
आता आपली यतून सुटका नाही...
मी भानावर आलो, तेव्हा खूप दमल्यासारखं वाटत होतं...
पण ते हिरवंकाळं, लिबलिबीत, घुसळायचं थांबलं होतं.
म्हणजे, माझा पुन्हा चिंतू होऊन गेला होता...
... त्या दिवशी बागेत, चिंतूनं शेकहँड केला, तेव्हा ते हिरवंकाळं शरीरात गेल्यासारखं मला वाटलं होतं.
तो `चिंतूसंसर्ग' असला पाहिजे...
...चिंतातुर जंतूंचा संसर्ग!
मी काँप्युटर बंद केला.

त्याच दिवशी संध्याकाळी मी पुन्हा बागेत गेलो.
बर्‍याच दिवसांनंतर... चिंतूला शोधायला...
वेड्यासारखा कोपराकोपरा भटकलो... पण तो कुठेच दिसत नव्हता.
दमून मी एका सिंगल बाकड्यावर बसलो...
आसपासची गर्दी आपल्या गतीनं ट्रॅकवर चकरा मारत होती.
माझं तिकडे लक्ष नव्हतं.
केसात बोट घालून मी नाकाच्या शेंड्याकडे टक लावली होती...
तेव्हढ्यात, समोरच्या बाकड्यावर बसलेला माणूस माझ्याकडे बघून हसतोय, असं मला वाटलं.
मी त्याच्याकडे बघितलं, त्याचं हसणं थांबलं होतं.
थंडपणानं मी उठलो, आणि त्याच्यासमोर उभा राहून शेकहॅंडसाठी हात पुढे केला...
त्यानंही काही न बोलता हात पुढे केला.
मला आतल्याआत काहीतरी घुसळल्यासारखं झालं, आणि मी त्याचा हात सोडला...
तोही उठला, आणि निमूटपणे बागेबाहेर पडला...
मी त्या सिंगल बाकड्यावर बसून त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहात होतो.
काय होणार आता त्याचं? मला काळजी वाटू लागली.
कोण असेल तो बिचारा?... कशाला केला आपण त्याला शेकहँड?... आता त्याचाही चिंतू होणार?...
चितातूर जंतू त्याच्याही शरीरात घुसळणार?...
मी जाम भेदरलो होतो.
काळजीनं, चिंतेनं माझं मन पोखरून चाललं होतं...
मी गदागदा मान हलवली, आणि उठलो...
घरी आलो.
दुसर्‍या दिवशी पुन्हा बागेत जायचं ठरवलं.

ठरल्याप्रमाणं दुसर्‍या दिवशी संध्याकाळी बागेत गेलो.
कालचा तो माणूस आधीच त्या सिंगल बाकड्यावर येऊन बसला होता.
..हातात एक वर्तमानपत्र होतं.
कुठल्यातरी एका बातमीवर त्याची नजर खिळली होती.
मी समोर येताच, त्यानं माझ्याकडे बघितलं...
पुन्हा आतल्याआत `ते' घुसळलं...
`कसं होणार या देशाचं?'... एका बातमीवर बोट ठेवत चिंतातुर स्वरात तो बोलला, आणि मी मान हलवून काळजीत बुडालो...
समोरच्या बाकड्यावर एकजण आमच्याकडे बघून चेष्टेनं हसत होता...
सिंगल बाकड्यावर बसलेल्या त्यानं हातातलं वर्तमानपत्र माझ्या हातात दिलं, आणि तो उठला...
शांतपणे चालत त्या माणसासमोर उभा राहिला.
त्या माणसाचं हसणं थांबलं होतं.
मी वर्तमानपत्र वाचत होतो...
खरंच, कसं होणार देशाचं?... मी काळजीत पडलो.
सहज वर बघितलं.
समोरच्या बाकड्यावर बसलेल्याशी `तो' शेकहॅंड' करत होता...
मी हसलो.
काय होणार आता त्याचं.
एक नवा जंतुसंसर्ग... चिंतूच्या जंतूंचं हे मायक्रोक्लोन आणखी किती जणांना ग्रासणार?...
मी चिंतातुर झालो होतो...

----

Saturday, November 15, 2008

हॅप्पी चिल्ड्रेन्स डे...

दुपारची वेळ. रिक्षा पकडून मी स्टेशनवर आलो, आणि गाडीची वाट पाहात फलाटावर थांबलो.
पुढची हकीकत, मी जसं पाहात गेलो, तशीच्या तशी तुम्हाला सांगणार आहे...
अंधेरीच्या गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवरचा सहा नंबरचा प्लॅटफॉर्म नेहमीसारखाच गर्दीनं खचाखच भरलेला. लांबून ट्रेन येताना दिसली, आणि मी मोबाईलवरचं मुलीशी बोलणं आटोपतं घेतलं. आज तिच्या शाळेत "चिल्ड्रेन्स डे' साजरा झाला होता. खूप मजा केली होती मुलींनी. आज शाळेतल्या सगळ्या शिक्षिकांनी मुलींसाठी करमणुकीचे कार्यक्रम केले. मुलींच्या टाळ्यांनी आणि "चिअर्स'नी आज शिक्षिका मोहरून गेल्या होत्या.
ट्रेन फलाटावर पोहोचली, आणि मी बोलणं अर्धवट तोडून खटाक्कन फोन बंद केला. गाडी पकडायच्या तयारीत "पोझिशन' घेतली. मुंबईतल्या बऱ्याच वर्षांच्या "अनुभवा'मुळे फलाटावर येऊन थांबण्याआधीच गाडी पकडायच्या "कले'त मी माहीर झालो होतो.
आजही, गाडी पुरती थांबण्याआधी मी विंडो पकडून "निवांत'ही झालो होतो...
गाडी थांबली, आणि फलाटावरचा गर्दीचा लोंढा दरवाजाशी जमा झाला. धावपळ करीत एकेकजण मिळेल त्या जागेवर बसत होता. गाडी भरली.
गाडी सुटायची काही मिनिटांची प्रतीक्षा सुरू झाली होती.
अचानक फलाटावर कलकलाट झाला.
सातआठ बायका आणि दोनचार पुरुषांचा एक घोळका सातआठ लहान मुलांना पुढे रेटत फलाटावरून सरकत होता. दहाबारा बायका धाय मोकलून रडत त्यांच्या मागून धावत होत्या... गाडीच्या डब्यात त्या मुलांना कोंबलं गेलं, आणि त्या बायका आणि पुरुषांनी दरवाजाशी भिंत तयार केली. रडत मागून आलेल्या बायकांनी डब्याच्या खिडकीशी गर्दी केली होती.
फलाटावर शिल्लक असलेली गर्दी पळापळ करून गाडी पकडायचं विसरली.
हा काय प्रकार असेल, त्याचे तर्क करीत फलाटावरची माणसं एकमेकांशी कुजबुजत होती.
बाहेरच्या गर्दीतल्या बायकांचं रडणं ऐकत गोंधळलेल्या त्या सातआठ लहान मुलांचाही एव्हाना बांध फुटला होता.
सगळा डबा रडण्याच्या भेसूर सुरांनी केविलवाणा झाला होता.
आतल्या बायका त्या मुलांना गप्प बसण्यासाठी दटावतानाच, खिडकीतल्या बायकांवरही दामटत होत्या.
"अभी चूप बैठो, नही तो तुम लोगोंकोही अंदर ले लेंगे'... एकीनं आपल्या "ठेवणीतल्या' आवाजात खिडकीतून बाहेर पाहात "दम' दिला, आणि खिडकीशी जमलेली बायकांची गर्दी धास्तावल्यासारखी दोन पावलं मागं सरकली.
डब्यातली हंबरडा फोडून रडणारी मुलंही, आतल्या आत मुसमुसू लागली.
त्या बायकांतल्याच एकीच्या मांडीवर बसलेली दोनतीन वर्षांची एक मुलगी पलीकडच्या खिडकीतून पलीकडून धावणाऱ्या गाडीकडे पाहात "टाटा' करीत होती...
आपण कुठे चाललोय, हे तिला माहीतच नव्हते.
आपल्याला आज रात्री आईबाप भेटणार नाहीयेत, याचीही तिला जाणीव नव्हती. कुणाच्या तरी मांडीवरून, गाडीच्या सीटवर बसून प्रवास करण्याच्या वेगळ्या अनुभवाचा आनंद तिच्या मासूम चोहऱ्यावरून ओसंडत होता.
रडणाऱ्या मुलांकडे पाहातही ती हसतच होती.
बाहेरच्या बायकांचं रडणं मात्र आता सगळ्यांनाच अस्वस्थ करीत होतं.
हा काय प्रकार आहे, तेच कळत नव्हतं...
कोण आहेत ही मुलं?
कोण होत्या त्यांना गाडीत कोंबणाऱ्या बायका आणि ते पुरुष?
बाहेर फलाटावर धाय मोकलून रडणाऱ्या बायका?
असे प्रश्‍न गर्दीच्या चेहऱ्यावर उमटवूनच गाडी सुटली, आणि पुन्हा फलाटावर एका सुरात हंबरडा फुटला...
मुलांनीही डब्यात गलका केला...
कुणी अविचारानं उडीबिडी मारू नये, म्हणून त्या पुरुषांनी दरवाजाशी घट्ट गर्दी केली.
मुलं नाईलाजानं जाग्यावर बसली होती.
डोळ्यातल्या पाण्याचे ओघळ त्यांच्या मळलेल्या गालांवर सुकले होते.
नाकातूनही धारा वाहात होत्या...
... गाडीनं वेग घेतला, आणि अचानक माझा फोन पुन्हा वाजला.
मुलीचाच फोन होता.
शाळेत साजऱ्या केलेल्या "चिल्ड्रेन्स डे'ची मजा सांगून संपली नव्हती.
मी फोन कानाला लावून हलकासाच रिस्पॉन्स देत तिचं बोलणं ऐकत होतो... काहीच बोलत नव्हतो.
कदाचित ते तिला समजलं असावं.
"जाऊ दे बाबा... संध्याकाळी तुम्ही घरी आल्यावर सांगेन...' असं म्हणत तिनंच फोन बंद केला, आणि मी पुन्हा त्या मुलांना न्याहाळू लागलो...
... दोनतीन स्टेशनं गेल्यावर, त्यांच्यातला एकजण माझ्याच शेजारी रिकाम्या झालेल्या सीटवर बसला.
हा काय प्रकार आहे, हे आता कळेल, अशी माझी खात्री झाली होती.
त्यांच्या गप्पा सुरू असताना मी उगीचच त्यावर रिऍक्‍ट होत होतो.
हे त्यांच्याही लक्षात आलं होतं.
मग कुणीही काहीही बोलला, तरी प्रतिक्रियेच्या अपेक्षेनं तो माझ्याकडं पाहातो, हे माझ्या लक्षात आलं.
मी कधी हसून, कधी मान डोलावून त्यांच्या बोलण्यावर माफक प्रतिक्रिया देत होतो.
त्याचा उपयोग झाला.
त्या हसण्यातून तयार झालेल्या ओळखीचा फायदा घेत मी एकाशी बोलणं सुरू केलं...
"कोण आहेत ही मुलं?' मी अनभिज्ञ चेहऱ्यानं त्याला विचारलं, आणि ती रेल्वे स्टेशनांवर भीक मागणारी, चोऱ्या करणारी, बूट पॉलिश करणारी मुलं आहेत, एवढं मला त्याच्या उत्तरावरून समजलं.
पुढच्या प्रश्‍नाचं उत्तर मी तर्कानं लढवलं होतं.
सरकारच्या बालसुधारगृहानं अशा मुलांना पकडून सुधारगृहात ठेवण्यासाठी फतवा जारी केला असणार, हे मी माझ्या पत्रकारितेच्या पेशातील अनुभवावरून ताडलं होतं.
"त्यांना मानखुर्दला नेणार?' मी थेट विचारलं, आणि "तो' चमकला.
"किती मुलांना पकडलंत आज?' माझ्या प्रश्‍नावर काय उत्तर द्यावं, या शंकेनं तो भांबावलेला स्पष्ट दिसत होता.
"आठ जणांना...' त्याच्या शेजारी बसलेला त्याचा सहकारीच माझ्या प्रश्‍नावर उत्तरला.
"फक्त अंधेरी, जोगेश्‍वरी आणि गोरेगावच्या फलाटांवरच आज "रेड' केली...' मी न विचारताच त्यानं मला पुढची माहिती पुरवली होती...
"मग त्या खिडकीबाहेर जमलेल्या बायका?...' माझा प्रश्‍न त्याला बहुधा अपेक्षितच होता.
"त्या या मुलांच्या आया... मुलांना भिका मागायला लावतात, चोऱ्या करायला लावतात... बूट पॉलिशच्या धंद्यात घुसवतात, आणि त्यांच्या कमाईवर दारू पितात...' तो कडवट तोंडानं बोलला.
आता या मुलांना बाल-गुन्हेगार म्हणून सुधारगृहात ठेवणार... पण खरे गुन्हेगार कोण?... ते, की त्यांना यात ढकलणारे... त्यांचे जन्मदाते... ते आता खिडकीतून पाहात रडतायत. मायेपोटी, की कमावणारे हात गेले म्हणून?... मी सुन्न झालो होतो.
`अरे पण आज कशाला पकडलंत त्यांना?... आज चिल्ड्रेन्स डे'... माझं बोलणं अर्धवटच राहिलं.
आजच काम करायची "ऑर्डर' होती...
"चिल्ड्रेन्स डे' वगैरे प्रकाराशी काही देणंघेणं नसल्याच्या चेहऱ्यानं तो उत्तरला.
"अजून कुठे केलीत कारवाई?' मी विचारलं.
"नाही. आज फक्त तीन स्टेशनांवर...' तो म्हणाला.
बाजूचा एक प्रवासी हे ऐकून हैराण चेहऱ्यानं आळीपाळीनं आमच्याकडे पाहात होता.
उद्विग्नपणे त्यानं मान हलवली.
तेवढ्यात, आमच्याच डब्यात एक लहान मुलगी हात पसरत पुढे आली.
तिच्या चेहऱ्यावर भिकाऱ्याच्या "धंद्या'ला आवश्‍यक असलेला "केविलवाणेपणा' पुरेपूर मुरला होता.
माझ्याशी बोलताबोलता त्यानं खिशात हात घातला, आणि रुपयाचं नाणं तिच्या पसरलेल्या हातावर ठेवलं.
"तिला पण घेऊन चल मानखुर्दला'... त्याचा सहकारी खदाखदा हसत तिच्याकडे पाहात बोलला, आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावर अचानक वेगळेच बाव उमटले. केविलवाणा "केलेल्या' तिच्या चेहऱ्यावर अचानक भयाचं सावट दाटलं, आणि तिनं धूम ठोकली.
पण गाडी बरीच पुढे आली होती...
ती अंधेरीला असती तर?.. एक प्रश्‍न सहज मनाला चाटून गेला, आणि मी त्या मुलीकडं बघितलं.
त्याच डब्यात, पलीकडच्या कंपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये थांबून ती भयभरल्या नजरेनं आमच्या डब्याकडे पाहात होती...
ती सुटल्याचा आनंद, आमच्या डब्यातल्या पोरांच्या रडवेल्या चेहऱ्यांवर उमटलेला मला स्पष्ट दिसला.
वीसपंचवीस मिनिटांच्या प्रवासातलं हे चित्र. जसंच्या तसं.
... गाडी वडाळ्याला आली, आणि पुन्हा सगळ्यांनी त्या पोरांना उठवून एकत्र केलं.
पुन्हा "डोकी' मोजली गेली.
मला "छशिट'ला जायचं होतं.
तरीही मीदेखील त्यांच्याबरोबर उठलो.
फलाटावर उतरलो, आणि खिशातला मोबाईल काढून घाईघाईनं फोटो काढायचा प्रयत्न करू लागलो. समोरून मानखुर्दकडे जाणारी गाडी येऊनही थांबली होती.
मुलांचा घोळका गर्दीत कोंबायच्या प्रयत्नातही त्यांच्यातले एकदोघंजण मला "पोज' देत होते.
मी "प्रेसवाला' आहे, हे त्यांनी ओळखलं होतं...
एकदोन निसटते फोटो माझ्या हाताला लागले, आणि ती गर्दी मानखुर्दला जाण्यासाठी गाडीत चढली...
मघाची ती छोटी मुलगी आता मला "टाटा' करत होती. मी कॅमेरा सरसावला, पण तोवर गाडी सुटली होती.
तिचा फोटो मला मिळालाच नाही.
मी "छशिट'कडे जाणाऱ्या गाडीसाठी फलाटावर उभा राहिलो.
मिनिटभरात गाडी आली, आणि मी चढून दरवाज्याशीच थांबलो.
"हॅप्पी चिल्ड्रेन्स डे बेटा'... प्रेमळ सुरात बाजूचा एक प्रवासी पलीकडच्या बहुधा आपल्या मुलाला म्हणाला, आणि त्यानं फोन बंद केला.
मीही विचार करत होतो.
मघाशी माझ्या मुलीनं, मला "चिल्ड्रेन्स डे'च्या गमती मोठ्या उत्साहानं सांगितल्या होत्या.
... पण, तिला "विश' करायचं राहूनच गेलं होतं...
---------------------

Monday, November 10, 2008

"चिंतू' -1

... अलीकडे तो मला बर्‍याचदा भेटतोय.
त्या दिवशीसुद्धा, मी त्याला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा तो कोण आहे, हे मला माहीत नव्हतं.
म्हणजे, त्याची आणि माझी आधी साधी ओळखपण नव्हती.
नेहेमीप्रमाणे त्या रविवारी संध्याकाळी मी चक्कर मारायला बाहेर पडलो, तेव्हा गार्डनच्या एका कोपऱ्यातल्या सिंगल बाकड्यावर तो बसलेला होता.
तिथं आणखीही माणसं बसलेली होती. म्हणून मी काही वेगळ्या नजरेनं त्याच्याकडं मुद्दाम बघितलं नव्हतं.
ट्रॅकवरून दुसरी फेरी मारताना, पुन्हा तो मला दिसला.
डोक्‍यावरचे केस बोटाभोवती गुंडाळत आणि दोन्ही डोळ्यांनी केसांची ती बोटाभोवतीची एकट बट बघण्याच्या प्रयत्नांत तो पुरता गढून गेला होता.
मला थोडसं हसू आलं... पुढची फेरी येईपर्यंत तो माझ्या डोळ्यासमोर होता.
दुसऱ्यांदा मी तिथं आलो, तेव्हा त्याचं उजव्या हाताचं आगठ्याशेजारचं बोट नाकात होतं.
दोन्ही डोळे नाकाच्या शेंड्याकडे लावून तो नाकातलं बोट फिरवत होता.
थोडंसं किळसवाणं होत मी त्याच्याकडं बघितलं.
त्याला त्याचा पत्ताच नव्हता. त्याचं बोट फिरतच होतं.
पुढच्या फेरीच्या वेळी, तो दोन बोटांनी काहीतरी गुंडाळत, लांब कुठेतरी पाहात होता.
...एकदम त्यानं हातातलं "ते' जोरात आपटल्यासारखा हावभाव केला, आणि मान जोरजोरात हलवली... अचानक दोन्ही हातांनी डोकं गच्च धरून ते गदागदा हलवायला सुरुवात केली.
माझा वेग मंदावला.
त्याच्याकडं पाहात मी बाजूच्या बाकड्यावर जाऊन बसलो.
... आणि त्यानं झटक्‍यात मान वळवून माझ्याकडं बघितलं.
मी त्याच्याकडेच पाहात होतो. त्याची नजर माझ्या डोळ्यात स्थिरावताच मी उगीचच त्याच्याकडे बघून हासलो.
त्या हसण्यात ओळख नव्हती. असलाच, तर थोडासा गंमतीचाच मूड होता...
त्याचे डोळे चमकतायत, असं मला उगीचच वाटलं. आणि माझे पसरलेले ओठ एकदम तिथंच थांबले. पण नजर एकदम बाजूला हटवणं शक्‍य नव्हतं. माझ्या नजरेतच त्यानं डोळे खुपसून ठेवले होते.
मी कावराबावरा झालो.
आता माझ्या हसण्यातला गंमतीचा मूड गेला होता. मी कसनुसं हसत त्याच्याकडं बघितलं.
...आणि माझ्याकडे पाहात तो हसला. मी भयानक कावराबावरा झालो होतो.
तो डोळे रोखून माझ्याकडे पाहात होता.
पुन्हा त्यानं हात झटकला, आणि तो जागेवरून उठला... माझ्याच दिशेनं त्यानं चालायला सुरुवात केली..
गार्डनमधली गर्दी एका लयीत आपापल्या ट्रॅकवरून पुढे सरकतच होती.
कुणाचच आमच्याकडे लक्ष नव्हतं.
त्या क्षणी, आपण अगदी एकटेएकटे आहोत, असं मला वाटलं.
ट्रॅकवरून वेगानं चालतानासुद्धा मला घाम आला नव्हता.
तो संथपणे चालत माझ्याकडे येत होता, आणि आपण घामाघूम होतोय, ते मला जाणवत होतं.
माझ्या बाकड्यावरच्या शेजारच्या जागेजवळ येऊन तो थांबला, आणि त्यानं आपली नजर पुरती माझ्या डोळ्यात खुपसली. मी हडबडलो होतो.
आता माझ्यावरची नजर न हटवता तो शेजारी बसला होता.
कुणीतरी रोखून धरल्यासारखा मी स्तब्ध झालो होतो... आसपास एवढी गर्दी असतानाही, ते एकटेएकटेपण मला अस्वस्थ करत होतं.
मी आता पुरता त्याच्या "ताब्यात' गेलो होतो.
डोक्‍यावरचे विस्कटलेले केस मानेच्या वाकड्यातिकड्या झटक्‍यानं मागे करून तो पुन्हा सगळं तोंड उघडून विचित्र हसला, आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पुन्हा बदलले. मघाशी, पहिल्या फेरीत मला दिसला, तसाच तो पुन्हा दिसत होता.
त्याचा चेहेरा, मान, नजर माझ्याकडे होती, पण तो आता माझ्या डोळ्यात पाहात नव्हता... तो कुठे पाहातोय, तेच मला कळत नव्हतं. तरीही, मी मात्र त्याच्याकडेच पाहात होतो.
एकदम आमची पुन्हा नजरानजर झाली, आणि काहीतरी विचित्र होतंय, असं मला वाटायला लागलं...
अचानक मला कुठल्यातरी भीतीनं घेरलं होतं.
माझ्याकडे पाहातच तो उठला, आणि विचित्र हासत त्यानं हात पुढे केला...
माझा नाईलाज झाला होता.
"मी चिंतू'... घोगऱ्या आवाजानं तो बोलला.
मी नाईलाजानं हात पुढे करून त्याच्याशी शेकहॅंड केला, आणि लिबलिबित, हिरवंकाळं, काहीतरी तळव्यातून शरीरभर पसरल्यासारखं मला वाटलं.
चिंतूनं माझ्या हातात हात घट्ट गुंफून ठेवला होता...
पुन्हा एकदा आमची नजरानजर झाली. आता माझी नजर थंड झाली होती...
मी हात तसाच ठेवून चिंतूच्या डोळ्यात पाहिलं...
आणि हात सोडवून चिंतू लांब झाला... माझ्याकडे पाहातच तो हळूहळू चालू लागला... आणि दिसेनासा झाला.
मी भयानक अस्वस्थ झालो होतो...
कोण असेल हा चिंतू?...
कशासाठी त्यानं माझ्याशी हात मिळवला असेल?...
तो माझ्याकडे बघून तो असा विचित्र हसत का होता?... काय करत असेल तो?...
तिथं अगोदर कधी दिसला होता का आपल्याला?...
त्याच्यासोबत आणखी कुणी होतं का त्यावेळी?...
काय करतो तो?...
आणखी कुणी ओळखत असेल का त्याला?...
चिंतू दिसेनासा झाला, तरी माझ्या मनात तो घर करून बसला होता...
नंतर रात्री मला झोपच लागली नाही. सारखा तो चिंतूच डोक्‍यातून डोकावत होता...
... सकाळी कधीतरी मला जाग आली, तेव्हा माझं डोकं भयंकर जडावलं होतं.
काही मिन्टं मी तसाच बेडवर बसून राहिलो.
आधी कधीच असं झालं नव्हतं... मी गदागदा डोकं हलवलं, आणि पुन्हा मला एकदम चिंतूची आठवण झाली...
काल त्याच्या स्वतःशीच डोकं हलवण्याच्या कृतीचं मला हसू आलं होतं. त्यामुळेच मी त्याची खिल्ली उडवत त्याच्याकडे बघून हसलो होतो.
आज मात्र...
घाबरून मी दोन्ही हातांनी घट्ट डोकं धरलं...
... आणि विचार करू लागलो...
नकळत माझी बोटं डोक्‍यावरच्या केसांमध्ये खुपसली गेली होती. एक बट धरून मी बोटाभोवती फिरवत होतो...
मनात विचारांचं काहूर माजलं होतं...
फक्त तो चिंतूच डोळ्यासमोर दिसत होता...
हवेतच हात हलवून आपण काहीतरी फेकल्यासारखं केलं, ते मला नंतर लक्षात आलं.
माझा पुरता "चिंतू' झाला होता...
काल त्याच्याशी शेकहॅंड करताना शरीरातून सरसरलेलं ते हिरवंकाळं लिबलिबीत, पुन्हा एकदा आतल्याआत घुसळतंय, असं मला वाटलं...
मी स्वतःशीच विचित्र हसलो, आणि उठलो...
यंत्रासारखा बेसीनवर जाऊन ब्रश करून मी टेबलवर बसलो... पेपर उघडला, आणि समोरची बातमी वाचून मला धक्का बसला...
माझी नजर त्या बातमीवर खिळली होती. पण एक अक्षरही डोळ्यातून आरपार जात नव्हतं...
मी विचारात गढलो होतो...
अस्वस्थ झालो होतो... मनात चिंतेचं काहूर माजलं होतं...
काय होणार पुढे?...

Saturday, November 1, 2008

गुरुपूजन!

गुरुपूजन!
आतमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि शाळेचं कॅन्टीन चालवणारा महाराज खांद्यावरच्या कळकट टॉवेलला हात पुसत धावतच हॉलच्या दरवाज्याशी आला.
हॉलमध्ये टाळ्या वाजतच होत्या, आणि स्टेजवर राणे सरांच्या पायावर डोकं ठेवून तो बराच वेळ तसाच बसला होता...
महाराजला हेच दृश्‍य अपेक्षित होतं.
काही वेळानं टाळ्या थांबल्या. खचाखच भरलेल्या हॉलमध्ये केवळ शांतता पसरली होती.
... आणि सगळ्यांचे डोळे पाण्यानं भरले होते.
राणे सरांच्या पायावर डोकं ठेवून त्यानं सरांची पावले हातांनी गच्च धरली होती, आणि तोही मुसमुसून रडत होता.
पण त्या रडण्याला दुःखाची जराशीदेखील छटा नव्हती.
राणे सरांनी त्या अवघडलेल्या स्थितीतच डोळ्यांवरचा चष्मा काढून कोटाच्या खिशातल्या रुमालानं आपले डबडबलेले डोळे पुसले, आणि अगोदरच वयोमानानं वाकलेलं आपलं शरीर आणखी वाकवून पायावर झुकलेल्या त्याला थरथरत्या हातांनी त्यांनी उठवलं...
आता तोही सावरला होता. उठून त्यानं राणे सरांना घट्ट मिठी मारली, आणि तोवर फक्त गहिवरलेल्या सभागृहातल्या सर्वांचाच बांध फुटला.
राणे सरांच्या गळ्याला घट्ट मिठी मारून तो उभा होता.
स्टेजवरच्या खुर्च्यांवर बसलेले सगळेच स्तब्ध, स्तब्ध झाले होते.
कोपऱ्यावरच्या खुर्चीत बसलेल्या श्रोत्री बाईंनी हलकेच आपली खुर्ची मागे सरकवली, आणि थकल्या पावलांनी चालत त्या या दोघांच्या जवळ आल्या. हलक्‍या हातांनी राणे सरांभोवतीची त्याची मिठी त्यांनी सोडवली, आणि डोळे पुसत त्या पुन्हा आपल्या खुर्चीवर येऊन बसल्या.
आणि इतका वेळ केवळ गहिवर भरलेल्या त्या सभागृहाचा बांध फुटला.
फक्त अश्रूंचीच सोबत असलेल्या त्या स्तब्धतेत आता हलकेसे हुंदकेही ऐकू येत होते...
जराशानं जड पावलांनी राणे सर आपल्या खुर्चीवर बसले, आणि सभागृहाकडे पाहून मान झुकवत विनयशील नमस्कार करून तोही स्टेजवरून खाली उतरला. सभागृहातल्या मागच्या एका रांगेतल्या आपल्या खुर्चीवर जाण्यासाठी खुर्च्यांच्या गर्दीतून वाट काढत असताना, सगळ्यांच्या माना त्याच्या गतीने मागेमागे होत होत्या...
दरवाज्यातच उभ्या असलेल्या महाराजनं आपले पाणावलेले डोळे खांद्यावरच्या टॉवेलनं टिपले, आणि स्वतःशीच जोरजोरात मान हलवत तो कॅंन्टीनमध्ये परतला.
कॅन्टीनमध्ये फारशी गर्दी नसली, की महाराज कोपऱ्यातल्या एका बाकड्यावर जाऊन एकटाच बसायचा.
त्या वेळी त्याचं कुणाकुणाकडे लक्ष नसायचं...कुठल्यातरी आठवणीत हरवून गेल्यासारखं, शून्यात नजर लावून बसलेल्या महाराजाचे डोळे तेव्हा मध्येच चमकायचे, कधी तो स्वतःशीच खुदकन हसायचा, आणि अचानक त्याच्या रापलेल्या चेहऱ्यावर दुःखाची एखादी सुरकुतीही उमटायची...
कॅन्टीनच्या त्या कळकट कोपऱ्यातल्या त्या बाकड्यानं गेली कितीतरी वर्षं महाराजाला त्या एकटेपणात जिवाभावाची साथ दिली होती.
त्याच्या मनात उमटणाऱ्या आठवणींच्या लहरी अगदी जवळून पाहिल्या होत्या...
ओठावर नुकती मिसरूड फुटलेली असताना कधीतरी गावाकडून आलेल्या या पोराच्या ओठावरच्या मिशा आता पांढऱ्याफटक झाल्या होत्या.
तेव्हा शेगडीखालच्या विस्तवाला पंख्यानं वारा घालत आग फुलविताना त्याच्या डोळ्यात उमटणारी चमक आता इतक्‍या वर्षांनंतर काहीशी विझत चालली होती...
आज मात्र महाराज काहीतरी वेगळाच वाटत होता.
बऱ्याच दिवसांनी त्याच्या डोळ्यांतली ती चमक जागी झाली होती...
हॉलमधून येऊन त्या नेहमीच्या बाकड्यावर बसल्यावर एकदाच त्यानं डोळे पुसले, आणि तो स्वतःशीच हसला...
ेत्याची नजर नेहमीसारखीच पलीकडच्या कोपऱ्यात खिळली...
भूतकाळाच्या पट त्याच्या डोळ्यासमोरून स्पष्टपणे सरकत होता...
आजचा दिवस त्याच्यासाठी काहीतरी वेगळाच आनंद घेऊन आला होता...
-------- ----------- -----------
तो इथं आला, तेव्हापासून आजवर कितीतरी मुलं या शाळेत शिकून बाहेर पडली होती.
महाराजच्या हातचा चहा हा त्यातल्या अनेकांचा आजही "वीक पॉईंट' होता.
अजूनही कधीकधी कुणी माजी विद्यार्थी शाळेत आले, की आवर्जून महाराजला भेटत. त्याच्या त्या चहाच्या चवीचा पुन्हा अनुभव घेताना सुखावलेल्या त्यांच्या चेहऱ्याकडे पाहाताना महाराजही आतून कुठंतरी सुखावून जायचा..
... आजही, हॉलमधला तो कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर महाराजच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, आणि महाराज सुखावला.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यामुळे आज महाराजला त्याच्या जिव्हाळ्याचे अनेकजण कितीतरी वर्षांनी पुन्हा भेटले होते...
मेळाव्याला आलेल्या सगळ्यांचीच पावलं सभागृहाआधी कॅंन्टीनकडे वळली होती.
या सुखाच्या क्षणांनी महाराजच्या आठवणींच्या कप्प्यात आनंदाचा नवा शिडकावा केला होता.
आस्थेनं त्याची विचारपूस करणाऱ्यांमध्ये कुणी महाराजच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांतल्या आठवणींना उजाळा देत होते, तर कुणी अगदी अलीकडच्या गमती आठवत महाराजशी हास्यविनोद करीत होते.
कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी कितीतरी जण महाराजला भेटून गेले होते... कित्येक वर्षांनंतरच्या भेटीनंतरही, अनेकांशी ओळख पटल्यानं महाराज आनंदून गेला होता.
कार्यक्रम सुरू होत असल्याचं सांगत एक शिपाई कॅंन्टीमध्ये आला, आणि कॅंन्टीनमधली गर्दी पांगली.
महाराजनंही सगळ्यांना हसतमुखानं निरोप दिला, आणि कोपऱ्यातल्या आपल्या नेहमीच्या बाकड्याकडे त्याची पावलं वळली...
.... आणि बाकड्यापाशी येताच तो थबकला!
त्याच्या त्या बाकड्यावर कुणीतरी अगोदरच एकटाच, महाराजसारखीच, कोपऱ्यात कुठेतरी नजर खिळवून बसलेला होता.
त्याच्या कपड्यांवरून, आणि व्यक्तिमत्वावरून, सुखाची सारी शिखरं त्याच्या पायाशी असावीत, हे चटकन लक्षात येत होतं.
महाराज पुढं झाला, आणि त्यानं त्या व्यक्तीला आदबीनं नमस्कार केला.
आपल्याच विचारत गढलेल्या त्या व्यक्तीनं महाराजकडे बघितलं, आणि बाकड्यावरच बाजूला सरकून महाराजला बसायची खूण केली.
क्षणभरासाठीच महाराज अवघडला.
आणि त्यानं त्या व्यक्तीच्या डोळ्यात खोलवर बघितलं... कुठेतरी ओळखीची खूण पटली. नक्की आठवत नव्हतं, पण या सुखवस्तू चेहऱ्यातल्या बालपणीच्या खुणा आपल्या नात्याच्या आहेत, असं महाराजला वाटत होतं.
थोडासा धीटाईनंच महाराज हलकेच त्याच्या बाजूला बाकड्यावर बसला आणि त्या व्यक्तीकडे बघून त्यानं अविश्‍वासानं, पण ओळखीच स्मित केलं...
कपाळावरची भरदार रुपेरी झुलपं मानेच्या झटक्‍यानंच मागं करत त्या व्यक्तीनं महाराजच्या पाठीवर जोरदार थाप मारली, आणि एकदम ओळख पटली...
महाराज नुकताच कॅंन्टीनमध्ये कामाला लागला होता...
त्याच दिवसांत, शाळेतला एक मुलगा, नेहमी जेवणाच्या सुट्टीत कॅंन्टीनमध्ये यायचा.
गल्ल्यावरच्या मालकानं खूण केली, की महाराजच त्याच्यासमोर उसळपावची प्लेट ठेवायचा...
काही न बोलता हा मुलगा ती प्लेट संपवायचा, आणि उठून निघून जायचा...
काऊंटरवरच्या मालकानं कधीही त्याच्याकडे पैसे मागितले नव्हते.
महाराजला याच गोष्टीचं नेहमी आश्‍चर्य वाटायचं, आणि उसळपाव संपवून बाहेर पडणाऱ्या त्या गरीब, केविलवाण्या मुलाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो दिसेनासा होईपर्यंत पाहात महाराज तसाच उभा असायचा.
गल्ल्यावरचा मालक ओरडला, की महाराजचे हात कामाला लागायचे...
असे कितीतरी दिवस गेले.
तो मुलगा वर्षागणिक मोठा होत होता.
त्याची भूक वाढत होती.
एकादी उसळपावची प्लेट त्याची वाढती भूक भागविण्यासाठी पुरेशी नाही, हे ओळखून गल्ल्यावरच्या मालकाने त्याच्यासाठी दुपारच्या वेळी "थाळी'ची सोय केली होती.
तो आला, की महाराज थाळी भरून त्याच्यासमोर ठेवत असे.
नेहमीसारख्याच निमूटपणाने जेवण करून तो तसाच बाहेर पडत असे.
त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात स्तब्धव्हायची महाराजची सवय तेव्हाही तशीच होती. मालक ओरडला, की महाराजचे हात कामाला लागत...
...अकरावी पास झाल्यानंतर एकदा हा मुलगा मुद्दाम कॅंन्टीनमध्ये आला होता, तेही आज महाराजला आठवलं...
त्या वेळी आपल्या हातानं महाराजच्या तोंडात पेढा भरवताना, त्याच्या डोळ्यात दाटलेलं पाणी पाहून महाराज उगीचच गलबलून गेला होता.
इतक्‍या वर्षांत कधीही एकमेकांशी संभाषण झालं नव्हतं, तरीही आपलं काहीतरी नातं परस्परांशी जुळलंय, याची त्या क्षणानं त्या दोघांना जणू खात्रीच पटली होती.
आज पाठीवर थाप पडताच, महाराजला पेढा भरवतानाचा तो आठवला, आणि आणखी जवळ सरकत त्यानं त्या व्यक्तीला "सलाम' केला...
आज प्रथमच ते दोघं एकमेकांशी बोलणार होते.
... हॉलमधला कार्यक्रम बहुधा सुरूही झाला होता.
"महाराज, आज मी तुला काहीतरी विचारणार आहे. काहीही लपवून न ठेवता तू मला ते सांगितलं पाहिजेस'... महाराजच्या डोळ्यात आपली धारदार नजर मिसळत ती व्यक्ती महाराजला म्हणाली, आणि महाराजनंही, सहजपणे, नकळत होकारार्थी मान हलविली.
"तुला आठवतंय? मला तू रोज उसळपाव, थाळी द्यायचास... मालकानं कधीही पैसे मागितले नव्हते... कोण देत होतं ते पैसे?'..
त्याच्या त्या थेट, अनपेक्षित प्रश्‍नानं महाराज एकदम चमकला. त्याची मान खाली गेली.
बोलावं की नाही, हा संभ्रम त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटला होता.
त्यानं पुन्हा महाराजच्या पाठीवर हात फिरवला, आणि त्याचा पेढा भरवतानाचा चेहरा महाराजच्या डोळ्यासमोर आला.
ते जुनं नातं पुन्हा जागं झालं होतं.
"राणे सर...' कसंबसं महाराज बोलला, आणि त्यानं मान फिरवली.
त्या व्यक्तीनंही झटक्‍यात महाराज पाठीवरचा हात मागं घेतला.
कॅंन्टीनमध्ये त्या क्षणाला ते दोघंच होते.
दोघांच्याही डोळ्यातून अचानक धारा वाहू लागल्या होत्या..
पुन्हा शब्दांचा संवाद खुंटला... ते दोघं केवळ एकमेकांचा हात हातात पकडून स्तब्ध बसले होते...
काही वेळानंतर तो भानावर आला... महाराजचा हात सोडवून घेत त्यानं एकवार हलकंसं हसून महाराजच्या खांद्यावर प्रेमानं थोपटलं, आणि झपाट्यानं तो बाहेर पडला...
--------- ----------- ---------
तो हॉलमध्ये आला, तेव्हा भाषणं सुरू होती.
माजी विद्यार्थी शाळेसोबतचं आपलं नातं हळुवारपणे जागं करत होते...
मधूनच हास्याचे फवारे उमटत होते, मध्येच कधी कुणाच्या हळव्या जाणीवा जाग्या होत होत्या...
टाळ्यांचा कडकडाट होत होता...
संथपणे चालत तो हॉलमध्ये आला, आणि मागच्या रांगेतल्या एका रिकाम्या खुर्चीत त्यानं जागा पकडली.
मिनिटभर बसल्यानंतर तो आणखीनच अस्वस्थ झाला होता.
त्यानं आजूबाजूला पाहिलं. कुणाचीच ओळख पटत नव्हती...
एक भाषण संपलं, आणि टाळ्या संथ होताच तो जागेवरच उठून उभा राहिला.
शाळेतल्याच सवयीनं त्यानं जागेवरूनच हात उंचावला.
स्टेजवरून कुणीतरी त्याचा उंचावलेला हात बघितला, आणि सगळे स्तब्ध झाले...
"सर, मला बोलायचंय'... भारावल्या आवाजात तो बोलला.
आणि स्टेजवर मधोमध बसलेल्या व्यक्तीनं- तोही शाळेचा माजी विद्यार्थीच होता- त्याला परवानगीही दिली.
दमदार पावलं टाकत तो स्टेजपर्यंत आला, आणि पायऱ्या चढण्यूार्वी त्यानं पहिल्या पायरीवर मस्तक टेकवलं.
सारं सभागृह शांत, स्तब्ध होतं.
तो माईकसमोर आला. त्याच्या भरीव व्यक्तिमत्वाची छाप सभागृहावर पडल्याचं जाणवत होतं.
स्टेजवर बसलेल्या सर्वांकडे पाहात मंद हास्य करून त्यानं नमस्कार केला, आणि बोलायला सुरुवात केली.
"...मराठवाड्यातल्या एका खेड्यातून मी मुंबईला मामाकडे शिकण्यासाठी आलो, तेव्हा मी जेमतेम बारा वर्षांचा होतो. हातावरचं पोट असलेल्या मामाच्या घरात डोईवरचं छप्पर मिळालं, हेच तेव्हा माझ्यासाठी खूप काही होतं... मी खूप सुदैवी होतो. कारण मला मुंबईत येताच या शाळेत ऍडमिशन मिळाली होती...'
बोलताबोलता तो क्षणभर थांबला. बहुधा पुढचे शब्द जोडण्यासाठी तो मन घट्ट करत असावा.
सभागृह स्तब्ध होतं.
"शाळेत, मधल्या सुट्टीत सगळी मुलं घरून आणलेले डबे खायची, तेव्हा मी कुठल्यातरी कोपऱ्यात लपून राहायचो... त्यांचे डबे बघितल्यावर उगीचच भूक जागी व्हायला नको, असं सारखं वाटायचं... पण ते व्हायचंच... मग तिथंच रडत बसायचो... एकदा मला आपल्या कॅंन्टीनच्या मालकानं बोलावलं, आणि उसळपाव दिला...'
आता हॉलमधल्या हास्यविनोदाच्या वातावणाला ेक वेगळीच किनार मिळाली होती.
तो बोलत होता...
"त्या दिवशी मी अक्षरशः आधाशासारखा तो उसळपाव संपवला... मुंबईत पहिल्यांदाच, उपाशी, भुकेल्यापोटी मिळालेल्या त्या उसळपावच्या प्लेटनं मला भरभरून समाधान दिलं होतं... मी ती प्लेट संपवली, आणि उलट्या मनगटानं तोंड पुसत तसाच बाहेर पडलो...
त्या दिवसानंतर रोज कॅंन्टीनमध्ये मला उसळपाव मिळत होता.
मी मोठा होत गेलो, तशी माझी भूकही वाढत गेली... तेव्हा मला थाळी मिळत होती...
त्या थाळातलं अन्न खाऊन मी या शाळेतून बाहेर पडलोय... आज मी जिथे आहे, तिथून रोज मागे वळून पाहातो... शाळेतल्या त्या दिवसांचं ऋण आजही त्यामुळे जिवंत आहे. त्यामुळेच, मी वर्षानुवर्षं अस्वस्थ आहे...'
तो बोलत होता, आणि समोरच्या गर्दीतून त्याच्याशी ओळख पटल्याचे काही सूर सभागृहात घुमले...
"आज माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आहे, असं समजलं, आणि त्या अस्वस्थतेनं मला या कार्यक्रमात ओढून आणलं...'
आणि त्यामुळेच, माझी वर्षानुवर्षांची अस्वस्थताही संपली...
ती उसळपावची प्लेट आणि ती थाळी, यांमुळे मी आज इथवरचा, माझ्या आयुष्यातला यशाचा पल्ला गाठलाय...
पण मला घास भरवणारा तो अज्ञात कोण होता, याच्या शोधात मी स्वतःशीच जळत होतो...
राणे सर, तुम्ही थोडं पुढं यावं, अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे...'
त्याचं हे वाक्‍य संपलं, आणि सभागृह पुन्हा आणखी स्तब्ध झालं...
राणे सरांच्या डोळ्यातून एव्हाना अश्रुधारा सुरू झाल्या होत्या...
थरथरत्या शरीरानं राणे सर खुर्चीतून उठून पुढे आले.
पुढचा क्षण केवळ अवर्णनीय होता...
काही मिनिटे तशीच गेली...
सारे काही स्तब्ध, स्तब्ध होते...
तिथं भाषणं नव्हती, टाळ्याही नव्हत्या...
राणे सर आणि "तो' एकमेकांना आसुसल्यासारखे कुरवाळत होते...
समोर अवघे सभागृह अक्षरशः "पाझरत' होते...
श्रोत्री बाईंनी उठून मोठ्या कष्टानं, जडपणे तो क्षण संपवला...
दरवाज्यातून तो क्षण पाहणाऱ्या "महाराज'नं आपल्या खांद्यावरच्या कळकट टॉवेलनं डोळे पुसले आणि तो मागं वळून त्या बाकड्यावर बसला.
एकटाच!
...........

Friday, October 24, 2008

सहज सुचलं म्हणून...!

"...या उद्यानात उन्मळून पडलेल्या, वठलेल्या वृक्षांचे पुनर्वसन होईल. इथे ते नव्या पालवीने बहरतील'...
मुंबई महापालिकेच्या महापौर दालनात पत्रकारांशी बोलताना "राजकीय भाष्यकारा'च्या मिश्‍किल शैलीत, चेहऱ्यावरची मिश्‍किल हास्यरेषा न लपविता छगन भुजबळ पत्रकारांशी बोलत होते... शिवसेनेची "मुलुखमैदान तोफ' असलेल्या छगन भुजबळ यांना महापौरपदी असताना अंधेरीच्या डी. एन. नगरमध्ये एका पडीक भूखंडावर एक अनोखे उद्यान उभारण्याचा ध्यास लागला होता. त्यासाठी ते अहोरात्र झटत होते. या उद्यानात बहरलेली झाडे, वेली असतील, संधिप्रकाशाला संगीताची साथ असेल, आणि मुख्य म्हणजे, मुंबईतील ज्या कलावंतांना महागड्या कलादालनांमध्ये प्रदर्शने भरविणे परवडत नाही, त्यांच्यासाठी एक खुले कलादालनही असेल, असा ध्यास त्यांनी घेतला होता... उद्यानाच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी ते जातीने दिवसागणिक तेथे जात होते. उद्यानातीलच एका कृत्रिम टेकडीवर खास मागवून घेतलेले एक विशाल स्वयंभू "पाषाणशिल्प' त्यांनी उभे केले होते. अमिताभ बच्चनही ते शिल्प पाहून भारावला, असे भुजबळ तेव्हा प्रत्येकाला कौतुकाने सांगत असत...

सुमारे 18 वर्षांपूर्वीची ही हकीकत! छगन भुजबळ यांची 1989-90 मध्ये दुसऱ्यांदा मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होती. या कालावधीत हे "कला प्रदर्शनी उद्यान' उभारण्याचे त्यांनी ठरविले. या उद्यानामुळे भुजबळांची महापौरपदाची कारकिर्द त्यांच्या रसिकतेचा पुरावा देत अधोरेखित होणार होती. सर्वत्र कला प्रदर्शनी उद्यानाचा बोलबाला होता. सारे काही गोड गोड होते.
... आणि याच गोडीमध्ये उद्यानातील टेकडीवरच्या त्या "पाषाणशिल्पा'ने मिठाचा खडा टाकला. "दर्शनी जागी बसविलेले दगडदेखील प्रेक्षणीय होतात', असा कडवट सूर सेनेतूनच उमटू लागला आणि उद्यानाच्या उद्‌घाटन समारंभात बाळासाहेबांच्या तशाच आशयाच्या वक्तव्यानंतर सारे वातावरण "कडवट' झाले. शिवसेनेतील भुजबळांचे वजन कमी झाल्याचे संकेत मिळू लागले. कला प्रदर्शनी उद्यानात जुन्या वृक्षांचे पुनर्वसन करण्याचे स्वप्न पूर्ण झालेच नाहीष उलट नंतर ते उद्यानच करपून गेले. राजकारणाबाहेर गेलेल्या एखाद्या जुन्या नेत्यासारखे दुर्लक्षित, एकाकी झाले. संगीताचे सूर तिथे घुमलेच नाहीत, आणि कलाकारांची कलाही तेथे फुललीच नाही.
त्यानंतर काही दिवसांतच नाट्यमय "जय महाराष्ट्र' करून भुजबळांनी शिवसेनेलाच दणका दिला आणि ते "कॉंग्रेसवासी' झाले. त्या काळात शिवसेनेशी "गद्दारी' करणे हे सामान्य शिवसैनिकाचे काम नव्हते. भुजबळांच्या या अचाट धाडसामुळे राज्याच्या सत्ताकारणातही छगन भुजबळ हे नाव आघाडीवर आले. त्या वेळी शिवसेनेत भुजबळांविषयी प्रचंड असंतोष माजलेला होता. "लखोबा लोखंडे' या नावाचा शिक्का भुजबळांच्या माथी बसला. पण त्याला प्रतिआव्हान देत, शिवसेनाप्रमुखांवरच राजकीय प्रत्याघात करण्याची हिमत दाखवून, खुद्द बाळासाहेबांचा "टी. बाळू' असा उल्लेख करीत सेनेच्याच मुशीत तयार झालेल्या भुजबळांनी सेनेचे आक्रमण परतवून लावले.
सेनेतील कटुता अशी शिगेला पोहोचलेली असतानाच, भुजबळांच्या मनात "सेनाप्रेमा'चा एक हळवा कोपरा सतत जपलेला होता. राज्यात प्रथमच शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली, तेव्हा भुजबळ विरोधी पक्षात होते. "वर्षा'वरच्या एका चहापानास हजेरी लावताना, काही आवडीचे पदार्थ दिसताच, "हवा हवाई' हा "परवली'चा शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडला, आणि तो हळवा कोपरा आणखी नाजूक झाला... राज्यातील आणि देशातीलही मानाचे पद भूषविलेला शिवसेनेचा एक नेता नंतर कितीतरी वेळा त्या आठवणीने हळवा झालेला अनेकांनी पाहिला होता. भुजबळांविषयीच्या कटुतेतही, शिवसेनेमध्ये कुठेतरी एक "गोडवा' जपला जात होता. राजकीय अपरिहार्यतेपोटी त्यांनी बाळासाहेबांवर कारवाई करण्याचेही धाडस दाखविले. बाळासाहेबांवर टीका करतानादेखील, त्यांच्याविषयीचा भुजबळांचा आदर अनेक प्रसंगांतून व्यक्त झाला होता. सत्ताधारी पक्षाचे वजनदार नेते असताना, तेलगी प्रकरणात त्यांना मनस्ताप सोसावा लागला. डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या विटंबना प्रकरणातही त्यांना लक्ष्य केले गेले. उपमुख्यमंत्रीपदाची कारकिर्द संपल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून भुजबळ नाराज असल्याची चर्चा सातत्याने राजकीय क्षेत्रात होत होती. गेल्या विधानसभा निवडणुकीआधीही, भुजबळ पक्षबाहेर पडणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहूनच महाराष्ट्रातील आणि देशभरातील "ओबीसी' ताकद एकत्र आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.
बरोब्बर एक वर्षापूर्वी, भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे येथे एका समारंभात गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, सुरूपसिंग नाईक आदी नेते एका व्यासपीठावर आले आणि राजकारणाला वेगळी दिशा मिळण्याचे संकेत गडद झाले. ओबीसी नेत्यांची एक आघाडी आकार घेणार असे आडाखे बांधले जाऊ लागले. अलीकडेच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बंडाच्या पवित्र्यानंतर पुन्हा भुजबळ, मुंडे आणि काही असंतुष्ट नेते एकत्र आले. राष्ट्रवादीच्या तंबूत आपण समाधानी नाही, हे दाखविण्याची संधी त्यांनी कधी सोडली नाही. भुजबळ नव्या पक्षाची स्थापना करणार, की एखाद्या प्रस्थापित पक्षाला बळ देणार, एवढाच मुद्दा सातत्याने चर्चेत राहिला आहे. राजकारणात उपेक्षा सहन करतानाही, आपण "बाप माणूस' आहोत, हे दाखविण्याची संधी मात्र वेगवेगळ्या शक्तिप्रदर्शनांतून ते साधत राहिले.
मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मुद्‌द्‌यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा भुजबळांच्या राजकारणाने "नाट्यमय वळण' घेतले आहे. बरोब्बर एक वर्षापूर्वी, ऑक्‍टोबर महिन्यातच, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून भुजबळांना दिलासा दिला होता. भुजबळांना आकाशापर्यंत उचलून धरणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये आता मात्र त्यांची गरज संपली असून त्यांची उपेक्षा होत असल्याचे ठाकरे यांनी संपादकीय लिखाणात म्हटले होते. राजकारण गाजविणारी शिवसेनेची "मुलुखमैदान तोफ' अशी प्रशंसाही ठाकरे यांनी केली होती. भुजबळ सेनेत असते, तर त्यांची अशी उपेक्षा झाली नसती, असा "दिलासा'ही त्यांनी दिला होता...
...पुन्हा "हवा हवाई'चा परवलीचा शब्द सेनेच्या पहिल्या फळीत घुमेल?

Saturday, October 4, 2008

बाकडं...

लोकसभेत नोट फॊर व्होट’ प्रकरण झालं, तेव्हापासून बाकडं माझं डोकं पोखरतंय...
म्हणजे, प्रत्येक माणसाचा एकएक स्वभाव असतो. पण, तो त्याचा मूळचा स्वभाव नसतो. तो कुठे बसतो, त्यावर त्याचा स्वभाव अवलंबून असतो, असं त्या दिवशीपासून माझं ठाम मत झालंय.
कारण, त्या प्रकरणानंतरचा लालकृष्ण अडवाणींचा चेहेरा मला आजही जसाच्या तसा आठवतोय.
बाकड्याचा परिणाम. दुसरं काय?
लोकसभेत विरोधी बाकांवर बसलं, की आपोआपच व्यक्तिमत्वावर पराभूतपणाचा ओशाळा अंमल चढतो, अशी त्या दिवशीच्या त्यांच्या चेहे-यावरून माझी खात्री झालीय.
सत्ताधारी बाजूच्या, शेवटच्या रांगेतला, कधी सभागृहात तोंडही न उघडलेला, तो अनोळखी खासदार मात्र, त्या दिवशी कसा खुशीत दिसत होता?
बाकड्याचाच परिणाम!
तर, तेव्हापासून हे बाकडं माझ्या डोक्यात घर करून बसलंय.
आज त्यानं डोकं वर काढलं...
...‘मी जर वर्गात समोर बसलो, तर, मीपण पोरांसारखाच वागेन, अशी मला भीती वाटते’... पत्रकारितेच्या वर्गाला शिकवणाया माझ्या एका सहकार्यानं वैतागलेल्या सुरात मला सांगितलं, आणि मला राहवेना. काय झालं, ते कळल्याशिवाय मला चैन पडणार नव्हतं.
‘अरे, काय कलकलाट करतात ती मुलं... एवढी मोठी झाली, तरी, सारखं ‘गप्प बसा’ म्हणून दामटावं लागतं रे... त्यातली एकदोघं तर शिक्षक आहेत. नोकरी करतात. पण इथे आल्यावर, समोरच्या बाकांवर बसली, की मुलांसारखीच कलकल करतात. त्या बाकड्यांचाच गुण असला पाहिजे हा... ’ तो आणखीनच वैतागल्या सुरात बोलला, आणि विरोधी बाकावर सुन्न, पराभूत चेहेरा करून बसलेले अडवाणी माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागले.
आणखी काही दिवस मागे गेलो, तर देशाचे उपपंतप्रधान, खिल्ली उडवणा-या सुरात बोलणारे अडवाणी आठवले.
आणि, बाकडे हा माणसाच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणारा महत्वाचा घटक आहे, ह्याबद्दल माझी खात्री झाली...
मागे एकदा चर्चगेटच्या एका कॊलेजात एका कार्यक्र्माला गेलो होतो, तेव्हा गर्दीमुळे खुर्ची मिळाली नाही म्हणून बाजूच्या रिकाम्या वर्गात एका बाकड्यावर बसून भाषणं ऐकत होतो. बसल्याबसल्या बाकड्याच्या पुस्तकं ठेवायच्या कप्प्यात हात फिरवला, आणि हाताला एक टाचणी लागली.
माझे कान बाजूच्या हॊलमधल्या भाषणाकडेच होते.
खूपच चांगलं बोलत होता तो वक्ता. मी तल्लीन होऊन ऐकत होतो...
भाषण संपलं, आणि टाळ्या वाजवण्यासाठी मी हात वर घेतला, तेव्हा हातातली ती टाचणी नकळत बाजूला ठेवली गेली.
हे सगळं अगदी सहजपणे घडत होतं...
टाळ्या वाजवून मी उठायच्या तयारीत होतो, तेव्हढ्यात माझं लक्ष त्या बाकड्याकडे गेलं.
भाषण ऐकताऐकता जुन्या सवयीनं आपलं काम केलं होतं.
हातातली टाचणी बाकड्यावर ‘चालली’ होती.
माझ्या थोड्याश्या वेळाच्या तिथं बसण्याच्या खाणाखुणा नकळतपणे बाकड्यावर नावानिशी उतरल्या होत्या.
शाळाकॊलेजात असताना मला बाकड्यावर नाव कोरायची सवय होती.
पण त्याला आता खूप वर्षं झालीत.
तरीही, त्या दिवशी कॊलेजचं बाकडं आयतं समोर आलं, आणि आपोआप नाव कोरलं गेलं.
माझ्या नकळत मी पुन्हा विद्यार्थी झालो होतो.
... बाकड्याचाच परिणाम!
हे आठवलं, आणि, ‘शाळेच्या बाकावर बसलो, तर आपण पुन्हा मूल होऊ’, ही त्याची भीती खरी ठरेल, अशी भीती मला वाटली.
त्याचे ते शब्द काही केल्या कानातून जात नव्हते.
तशातच मी स्टेशनवर आलो.
फलाटावर नेहेमीसारखीच तोबा गर्दी होती.
लांबूनच गाडी येताना दिसली आणि सगळी गर्दी सावज पकडायला शिकारी जसा सज्ज होतो, तशी झाली.
गाडी पुरते थांबायच्या आतच सगळ्या खिडक्या भरल्या होत्या...
गाडीच्या बाकावर खिडकीशी बसलेला प्रत्येकजण, पराक्रम गाजवल्याच्या विजयी मुद्रेनं थांबलेल्या गाडीत चढणा-या प्रत्येकाकडे पाहात होता.
मला बाकड्यावरची खिडकीची जागा पकडता आल्याने, मीही तेच करत होतो...
काही सेकंदातच गाडी ब-यापैकी भरली.
कुठेकुठे एखाददुसरी चौथी सीट शिल्लक होती.
जरा वेळात एक सुटाबुटातला माणूस डब्यात शिरला.
पॆसेजमधूनच त्यानं कुठे जागा आहे का, याचा अंदाज घेतला.
एक चौथी सीट रिकामी दिसताच त्याचा चेहेराही उजळला.
आणि बाकड्यावरच्या तिघांना सरकायला सांगून, जमा झालेल्या कोप-यावर तो कसाबसा टेकला.
गर्दी वाढतच होती.
गाडीनं शिट्टी दिली, आणि ती थोडीशी हलली, तेवढ्यात दोनचार जणांनी धावत येऊन गाडी पकडली, आणि सुटकेचा सुस्कारा टाकत तेही आत आले.
गर्दीतच तेही जागेचा अंदाज घेत होते.
अचानक त्यांचं लक्षं चौथ्या सीटवरच्या त्या सुटाबुटातल्या माणसाकडे गेले, आणि ते निमूटपणे मागे वळून पॆसेजमध्ये उभे राहिले.
त्या माणसानंही त्यांना पाहिलं होतं बहुधा.
त्याच्या ऒफिसातले, त्याच्या हाताखालचे लोक असावेत ते.
इतका वेळ चौथ्या सीटवरल्या कोप-यातही आनंदात बसलेल्या त्याचा चेहेरा एकदम उतरल्यासारखा झाला.
मिनिटभारानं तो तिथून उठला, आणि सरळ उभाच राहिला.
बाकड्यावरच्या कोप-याच्या जागेचा परिणाम.
मी बाकड्याचाच विचार करत होतो...
नुसतं बाकडंच नाही, तर त्यावर बसायला मिळालेली जागादेखील, माणसाचं व्यक्तिमत्व बदलून टाकते, याचा पुरावाच मला मिळाला.
...माझं स्टेशन येताच मी गाडीतून उतरलो आणि स्टेशनाबाहेर येउन बसच्या रांगेत उभा राहिलो...
एक बस सोडल्यावर नंतरच्या बसमध्ये बसायला जागा मिळाली.
बस भरली, तेव्हा उभ्यानं प्रवास करणारी, अगोदरच थकलीभागली माणसं मला आणखीनच केविलवाणी वाटत होती.
मी आजूबाजूच्या बसलेल्या लोकांवर सहज नजर फिरवली.
खिडकीत बसलेले, बाजूच्या प्रवाशापेक्षा जास्तं फ्रेश आहेत, असं मला उगीचच वाटलं.
बाकड्याचा परिणाम....!
मग बस चालत असताना मी वेगवेगळ्या ठिकाणची बाकडी आठवू लागलो.
मंत्रालयात मंत्र्याच्या दालनाबाहेच्या बाकड्यावर बसून, मंत्र्याच्या भेटीसाठी ताटकळणारी माणसं मला आठवली.
डॊक्टरच्या दवाखान्यात, आपला नंबर येण्याची वाट पाहात बाकड्यावर बसलेले पेशंट माझ्या डोळ्यासमोर दिसू लागले.
कोर्टातल्या बाकड्यांवर बसलेल्या माणसांच्या मनावरचं दडपण त्याच्या चेहे-यावर उमटलंय, असं मला उगीचच दिसू लागलं.
...आणि, मंत्रालयातून, दवाखान्यातून, कोर्टातून आपापली कामं आटोपून घरी परतून, घरातल्या बाकड्यांवर बिन्धास्तपणे ऐसपैसपणे बसलेली माणसंही माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागली.
त्याच्या चेहे-यांअर ‘घरच्या बाकड्या’चा आत्मविश्वास झळकताना मला दिसत होता...
‘एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है’... असा एक नाना पाटेकरचा डायलॊग असल्याचं कधीतरी ऐकलं होतं.
एक बाकडंसुद्धा भल्याभल्यांचा नक्षा उतरवतं... खरं की नाही?

Monday, August 4, 2008

ते राहूनच गेलं...

एक वाईट बातमी आहे.
अरूण गेला.
मागं मी अरूणनं सांगितलेली, त्या लेलेंची- सिद्धिविनायकाच्या शेजा-याची- गोष्ट तुम्हाला सांगितली, त्या लेल्यांना भेटायचं आमचं ठरलं होतं.
नेहेमी आम्ही भेटलो, की त्या लेलेंची आठवण यायची, आणि, कधीतरी नक्की त्यांच्याकडे जाऊ असं अरुण म्हणायचा...
गेल्या आठवड्यात, तो अचानक, अगदी अकल्पितपणे, निघून गेला...
गुजरातेतल्या गावी वृद्ध आईला भेटायला गेला होता, तिथेच त्याला हार्ट ऎटॆक आला...
...त्या दिवशी सकाळीसकाळी, माझ्या एका सहका-याचा फोन आला, आणि माझ्या मनात कसलीतरी पाल चुकचुकली... आमच्या माहितीतल्या कुणाकडेही, काहीही झालं, की आम्हा सर्वांना हा सहकारी ते जाणीवपूर्वक कळवतो...
अगदी सकाळी त्याचा फोन म्हणजे काहीतरी गडबड असणार, असा विचार करतच मी हॆलो म्हटलं, आणि त्यानं ही बातमी सांगितली.
मी क्षणभरासाठी अक्षरश: बधीर झालो.
अरूण राहायचा त्या सोसायटीतल्या त्याच्या शेजा-याला फोन केला.
बातमी खरी होती.
.... आम्हा पत्रकारांचं खाजगी जग खूप छोटं आहे.
गेल्या वर्ष-दोन वर्षांत मुंबईतल्या आमच्या या जगानं असे खूप आघात सोसले.
अरूणच्या जाण्याच्या आणखी एका आघातामुळे त्या दिवशी आमचं छोटंसं खाजगी जग पार कोलमडून गेलं...
त्या दिवशी प्रत्येकजण अरूणच्या आठवणींनी हळहळत होता.
माझी व्यथा वेगळी होती...
अनेक आनंदाचे, गंमतीचे क्षण आम्ही शेअर केले होते.
तो माझ्या क्षेत्रातला, अनुभवी, ज्येष्ठ सहकारी होताच, आणि कधीकाळचा माझा सख्खा शेजारीही होता.
माणुसकीला हात घालणा-या अनेक उदाहरणांचा खजिना अरूणच्या अनुभवांच्या पोतडीत होता...
कितीतरी लेले त्याला भेटले होते...
कितीतरी लेल्यांना त्यानं प्रोत्साहन दिलं होतं...
... त्या दिवशी सिद्धिविनायकाच्या शेजा-याची, त्या लेलेंची हकीकत मी तुम्हाला सांगितली, त्यानंतर पुन्हा आम्ही लेलेंना भेटायचं पक्कं ठरवण्यासाठी एकमेकांशी बोललो.
... आणि एका नव्या ‘लेले’ची माहिती मिळाली.
*** *** ***
मुम्बईतल्या टाटा होस्पिटलच्या आसपास दिवसादेखील अकल्पिताची एक भयाण सावली वावरत अस्ल्याचा भास होतो. अनेक हतबल जीव, उपचाराच्या आशेनं आजूबाजूच्या कट्ट्यांवर, फूटपाथवर आसरा घेऊन दिवस ढकलत असतात... कितीकांनां मुम्बईची ओळखदेखील नसते... कुठल्याश्या कोप-यातल्या आपल्या एवढ्याश्या खेडेगावातून, गाठीची सारी पुंजी कनवटीला बांधून कुणीतरी आशेनं एखादा मरणासन्न जीव घेऊन इथे येतो, आणि रुग्णाबरोबरच, स्वत:ही इथल्या जगण्यामरण्याच्या लढाईत उतरतो...
कधीतरी कनवटीची पुंजी रिती होते, आणि त्या रुग्णाला वाचवण्याच्या लढाईबरोबरच, जगण्याचीही लढाई सुरू होते...
कधी कल्पनेतही विचार केला नसेल, अशी जगासमोर मदतीसाठी हात पसरायचीही वेळ येऊन ठेपते, आणि जगणंही केविलवाणं होतं...
*** *** ***
.... घाटकोपर किंवा तिथल्याच आसपासच्या एका गार्डनमधे एका संध्याकाळी फेरफटका मारणा-या दोनचार मित्रांसमोर
एकदा असाच एक दीनवाणा, हतबल हात पसरला गेला.
‘माझी बायको कॆन्सरनं आजारी आहे... मला मदत करा’ कसंबसं एवढंच वाक्य उच्चारताना त्या माणसाच्या दु:खानं
करपलेल्या चेहे-यावरच्या दीनवाण्या रेषा आणखीनच गडद झाल्या आणि हे मित्र चालताचालता थबकले.
... मुम्बईत एखादा माणूस पैसे उकळण्यासाठी प्रसंगी मरणाच्या कहाण्याही रंगवितो, ह्याचा अनुभव असलेल्या त्या मित्रांनी ह्या केविलवाण्या देहाकडे अगोदर तशाच नजरेनं पाहिलं...
त्याचा चेहेरा खोटं बोलत नाही, हे त्यांना पटलं.
पण बागेत फिरायला येताना एखाद्याजवळ असतील, तेव्हढेच पैसे त्यांच्याकडे होते.
तरीही सगळ्यांनी आपले खिसे त्याच्या पसरलेल्या ओंजळीत रिकामे केले.
पण ते अपुरं दान त्यांना समाधान देऊ शकलं नाही.
बायकोच्या आजाराच्या चिंतेनं खंगलेल्या त्या माणसाला त्यांनी हॊस्पिटलाचा पत्ता, वॊर्ड नंबर विचारला, आणि
दुस-याच दिवशी हे मित्रमंडळ हॊस्पिटलमध्ये पोहोचले...
तो खंगलेला, श्रमलेला दीनवाणा माणूस आण्खीनच थकल्या शरीरानं रुग्णशय्येवरल्या बायकोच्या पायाशी बसलेलाच होता...
त्याच्या हाती नोटांचं एक बंडल सोपवून, त्याच्या पाठीवर थोपटून, काहीही न बोलता हे मित्र तिथून बाहेर पडले.
... पण तो केविलवाणा माणूस आणि त्याची मरणपंथाला लागलेली बायको त्यांच्या नजरेसमोरून हलत नव्हती.
दुस-या दिवशी कामधंद्याला निघताना ट्रेनमध्ये पत्ते खेळताखेळता त्यांच्यतल्याच एकानं ग्रूपमधल्या आपल्या इतर दोस्तांना ही हकीकत सांगितली,
आणि पत्ते खेळणारे हात थबकले....
पुढच्या क्षणाला ते हात खिशात गेले होते...
माणुसकीच्या एका झ-याचा उगम झाला होता...
पुन्हा त्या संध्याकाळी हॊस्पिटलमध्ये जाऊन ते जमलेले पैसे त्यांनी त्या माणसाच्या स्वाधीन केले...
एका आगळ्या समाधानाचा अनुभव त्या दिवशी सगळ्या ग्रुपनं घेतला होता...
दुसर्या दिवशी तो ग्रूप ट्रेनमधून प्रवास करताना पत्ते खेळत नव्हता...
... ब-याच चर्चेनंतर, अशा गरजूंसाठी आपल्या खिशाचा एक कोपरा राखून ठेवायचा निर्णय त्या तसाभराच्या प्रवासात
झाला होता.
... आता ह्या ग्रूपमध्ये आणखी कितीतरी हातांची भर पडलीये.
... एक ट्रस्ट उभा राहिलाय.
... पैशाअभावी उपचार घेऊ न शकणा-या रुग्णांसाठी हे हात सैल होतात...
आजवर कितीतरी रुग्णांना ह्या ट्र्स्ट्नं जीवदान दिलंय...
ट्रेनमधला, पत्ते कुटणारा, एक गट, एका अपघातानं घडलेल्या साक्षात्कारातून, माणुसकीचं आगळं रूप घेऊन नव्या
जाणीवांनी ‘जबाबदार’ झालाय.
*** *** ***
लेलेंच्या निमित्तानं गप्पा मारतामारता त्या दिवशी अरूणकडून मिळालेल्या या नव्या माहितीमुळे, त्या ग्रुपला भेटायची माझी इच्छा तीव्र झाली आहे.
पण आता त्यांना भेटायला घेऊन जायला अरूण सोबत असणार नाही.
... ‘कोणत्याही मदतीसाठी सदैव तत्पर’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ पत्रकार, ‘हिंदू’ या दैनिकाचे महाराष्ट्र ब्यूरोचे उपप्रमुख अरूण भट यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले’अशी बातमी गेल्या आठवड्यात मुम्बईतल्या सगळ्या मराठी वर्तमानपत्रांत आपण वाचली असेल...
...लेलेंच्या निमितानं तुमची मी अरूणशीही ओळख करून दिली होती.
त्यानंतर अशा ‘आणखी काही लेलें’ची माझ्याशी ओळख करून दिली, आणि अरूण गेला!

Saturday, July 26, 2008

प्रेरणादायक

प्रेरणादायक

काकांनी केलेल्या एका आवाहनाचा परिणाम होऊन अमेरिकेत असलेल्या एका तरुणाचे हृदय हेलावले. त्याच्या वडिलांचा आजार आणि आईने खाल्लेल्या खस्ता त्याच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. त्यानंतर सुरू झाला भारतातील गरीब रुग्णांसाठी मदतीचा ओघ.

"ज्या देशात तू जन्मलास, त्या देशातील हजारो गरजूंना तुमच्या मदतीची गरज आहे. या देशात अनेक रुग्ण केवळ औषधोपचाराचा खर्च पेलवू शकत नसल्यामुळे मृत्यूला सामोरे जातात. "तुमच्या मदतीतून या देशातील अशा असंख्य गरिबांना नवे जीवन मिळेल,' या एका आवाहनानंतर अमेरिकेतल्या त्या तरुणाचा अवघा जीवनक्रमच बदलून गेला. 1960 च्या दरम्यान मुंबईचे महापौर असलेल्या विष्णुप्रसाद देसाई यांनी अमेरिकेत स्थिरावलेल्या आपल्या पुतण्यास, जयदेव देसाई यांना 1975 मध्ये एक पत्र लिहून मुंबईतल्या गरीब रुग्णांना आर्थिक मदत पाठविण्याचे कळकळीचे आवाहन केले. ते पत्र वाचत असतानाच जयदेव देसाई यांच्या डोळ्यासमोरून आपल्या बालपणीचे, गुजरातेतील अहमदाबादेतले दिवस चित्रपटासारखे सरकत होते. नऊ वर्षांचा असताना वडिलांवर ओढवलेला जीवघेणा आजार, केवळ "चमत्कारा'ने बऱ्या झालेल्या वडिलांना नंतर आलेल्या अंधत्व व बहिरेपणामुळे आईने कष्टाने ओढलेला संसाराचा गाडा, शिक्षणासाठीची आर्थिक ओढाताण आणि त्याही परिस्थितीत इतरांच्यासाठी आईने काडी काडी जमवून केलेली मदत... सारे जयदेवभाईंच्या नजरेसमोर उभे राहिले. विष्णुप्रसादांची गरिबांविषयीची प्रामाणिक तळमळ ओळखून आपल्या कमाईतून त्यांनी मुंबईतील सांताक्रूजच्या "बीसीजे हॉस्पिटल'च्या (आजकाल या हॉस्पिटलला "आशा पारेख हॉस्पिटल' म्हणूनही ओळखतात) मदतीसाठी पहिला, तीनशे डॉलरचा चेक पाठविला.
तेव्हापासून आपल्या जन्मभूमीतील गरिबांचे दुःख `वाटून घेण्याची' कळकळ सुरू झाली आणि एका अनोख्या पद्धतीने अमेरिकेतून भारतातील असंख्य संस्था, व्यक्तींकडे मदतीचा ओघ सुरू झाला. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ हा ओघ सातत्याने वाहतो आहे. जयदेव देसाई नावाच्या या "कटिबद्ध' भारतीयाने आजवर भारतातील 200 हून अधिक संस्थांना, अमेरिकेतील "इंडिया अब्रॉड फाउंडेशन'मार्फत लाखो डॉलरची आगळी आर्थिक मदत रवाना केली आहे. त्यातून खेडोपाड्यांतील हजारो गरीब, गरजूंना नवे जीवन मिळाले आहे. जयदेवभाईंच्या जन्मगावातील, अहमदाबादेतील शाळा- इस्पितळांबरोबरच मुंबईतील आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील दोनशेहून अधिक इस्पितळे आणि संस्थांच्या कामाला या मदतीमुळे नवी उभारी मिळाली आहे.
गुजरातेतील अनेक संस्था, शाळा, इस्पितळे, मुंबईतील कूपर रुग्णालय, भगवती हॉस्पिटल, भाभा हॉस्पिटल, शिशुकल्याण केंद्र, मिरजेतील सिद्धिविनायक गणपती हॉस्पिटल, पुण्यातील रुबी एज्युकेशन अकादमी, सोलापुरातील मतिमंदांसाठीची "जिव्हाळा' संस्था, यांसारख्या अनेक संस्था आणि पंजाब, पश्‍चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तमिळनाडूतील अनेक शैक्षणिक-सामाजिक संस्थांना गेल्या चार दशकांमध्ये लाखो डॉलरची मदत करणाऱ्या जयदेव देसाईंना आता मदत गोळा करण्याचे "व्यसन' लागले आहे. "वर्षातील प्रत्येक दिवशी या कामासाठी वेळ काढून आम्ही एका आगळ्या समाधानाचा आनंद उपभोगतो आहोत,' असे जयदेवभाई म्हणतात. प्रत्येक वर्षी ऑक्‍टोबर ते जानेवारी या काळात जयदेवभाईंच्या निधिसंकलन मोहिमेला वेग येतो आणि त्या चार महिन्यांत त्यांचे अवघे कुटुंब या कामात स्वतःला वाहून घेते. 1975 मध्ये सुरू झालेली मदत निधिसंकलनाची ही आगळी संकल्पना आज अमेरिकेतील अनेक भारतीयांनी अक्षरशः उचलून धरली असून, भारताच्या मातीशी नाते असलेल्या- आणि नसलेल्याही- हजारो हातांचा आणि माणुसकीने भारलेल्या मनांचा आधार या मोहिमेला लागला आहे.
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणे हे सामान्य घरांचे "स्वप्नरंजन' असायचे, त्या काळात- 1964 च्या सुमारास- गुजरातमध्ये इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या जयदेव देसाईंनी मोठ्या जिद्दीने अमेरिका गाठली आणि मेक्‍सिको स्टेट युनिव्हर्सिटीतून इंजिनिअरिंगची पदव्युत्तर पदवी संपादन केली. ते अमेरिकेत स्थिरावले. मानवतेच्या जाणिवांना देश-विदेशांच्या भौगोलिक सीमा नसतात, तरीही आपल्या देशातील गरिबांसाठी अमेरिकेसारख्या देशात मदतीकरिता हात पसरले किंवा अगदी हक्काने, मित्रांच्या खिशात वारंवार हात घालत राहिलो, तर कालांतराने मित्रही आपल्याला टाळतील, या शंकेतून काही वर्षांनी- 2001 च्या सुमारास- "गिफ्ट सर्टिफिकेटस्‌'ची आगळी "आयडिया' जन्माला आली. 10, 20 आणि 50 डॉलर किमतीची "गिफ्ट सर्टिफिकेट्‌स' विकून त्यातून मिळणाऱ्या कमिशनची रक्कम मदतीच्या रूपाने भारतात पाठविण्यास सुरवात झाली. अमेरिकेतील काही बड्या व्यापाऱ्यांकडून माणुसकीचा प्रतिसाद मिळाला, आणि त्यांनी गिऱ्हाइकांकडून रोकड किंवा क्रेडिट कार्डांऐवजी जयदेवभाईंची सर्टिफिकेट्‌स स्वीकारण्याची तयारी दर्शविली. सर्टिफिकेट्‌सची ही योजना जयदेवभाईंनी अमेरिकेतील आपल्या मित्रांना सांगितली आणि कानोकानी होत अनेक जणांनी त्यांच्याकडून ही सर्टिफिकेट्‌स खरेदी केली. या सर्टिफिकेट्‌सवर त्यांनी केलेल्या प्रत्येक खरेदीच्या किमतीतील पाच टक्के रक्कम दुकानदारांकडून थेट जयदेवभाईंना मिळणार होती. "दात्या'च्या "खिशा'त हात न घालताही, दात्याला "मदतीचे समाधान' मिळवून देणारा आगळा मार्ग जयदेवभाईंच्या तळमळीतून जन्माला आला आणि कमिशनच्या रूपाने गोळा होत गेलेल्या लाखो डॉलरचा ओघ भारताकडे सुरू झाला. ""आजवर 50 हजार डॉलरहून अधिक किमतीची कुपन्स मी विकली आहेत. त्यातून मदतीच्या या प्रवाहातील सातत्यपूर्ण सहभागाचा आनंद अनेकांना सहजपणे मिळत गेला आहे,'' असे जयदेवभाई सांगतात. ""जोपर्यंत शक्‍य आहे आणि जगातली माणुसकी "जिवंत' असल्याची आपली खात्री आहे, तोपर्यंत आपण याच योजनेतून मदत गोळा करत राहणार आहोत. भारतातल्या आपल्या बांधवांचे दुःख वाटून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण करतो आहोत. "दुःख वाटून घेण्यात'ही एक आगळा आनंद आपण अनुभवत आहोत,'' असेही ते उत्कटपणे नमूद करतात. आता भारतातील आणि विशेषतः मुंबईतील इस्पितळांमध्ये काम करणाऱ्या "वॉर्डबॉय' आणि "वॉर्डगर्ल'ना रुग्णशुश्रूषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेत घेऊन जाण्याचा जयदेवभाईंचा मानस आहे.

Sunday, July 20, 2008

माझ्या आईच्या कविता

ध्यास

इट्ट्ल इट्टल म्हनता, मन पार येडं झालं
ध्यास लागला नामाचा, मन खुळावून ग्येलं
हितं तितं सारीकडं, दिसे इट्टल सावळा
झाडा पाना फुलामंदी मज भासाया लागला

वाटे साजिरी फुलांनी, करू पूजा या द्येवाची
परीे गोंधळ्ले मन, हितंतिथं दिसे तोचि
त्येच्या आंघुळीला वाटे, आणू वाईच गं पानी
पान्यातच उभा व्हता, सावळा गं चक्रपाणि

गंध उगाळाया हाती, घेतली ग मी सहाण
तिच्यामंदी श्रीखंड्याचे, देखिले गं म्या ध्यान
निवदासी आणाया, दूध ग्येले मी घरात
सोता गोकुळीचा कान्हा, उबा माज्या गोकुळात

कशी करू याची पूजा, मज इच्यार पडला
असा द्येव हा इट्टल, आसंल संतांनी पूजिला
नको आंगुळीला पानी, नको त्याला पानं फुलं
ध्यान निरखता निसते, मन भक्तिसंगं झुलं

काय करू रे इट्टला, डोकं झालं सैरभैर
सुचला उपाय मनात, करू सदा नमस्कार
द्येव भावाचा भुकेला, नको उपचार तयाला
माजा सगळाचि भाव, तया चरणी अर्पियला

Tuesday, July 15, 2008

प्रासंगिक!

बातमीदारीच्या स्पर्धेमुळे बातमीमागे पळताना बातमीच्या विश्‍वासार्हतेला प्रश्‍नचिन्ह लागते आणि नवनव्या चॅनेल्समधील चढाओढीमुळे मीडियाचीच विश्‍वासार्हता संपुष्टात आल्याची भावना समाजात व्यक्त होते, हे खरे असले, तरी काहीसे खेदजनक आहे. वृत्तपत्रे किंवा प्रसारमाध्यमे हा समाजमनाचा आरसा आहे. साहजिकच, समाजातील घडामोडींचेच प्रतिबिंब त्यात अपरिहार्य आहे. असे असले तरी, फक्त चांगलेचांगले तेवढे त्यामध्ये उमटत राहावे, आणि "विदारक' मात्र समाजासमोर येऊ नये, अशी सर्वसाधारण धारणा दिसते. पण समाजातील अशा घटनांना प्रसारमाध्यमांत स्थान मिळणे ही एक गरज आहे, म्हणून एक स्वानुभव मुद्दाम नमूद करावासा वाटतो.
"चॉकलेटचे आमीष दाखवून बालिकेवर बलात्कार' अशी बातमी एकदा प्रसिद्ध झाली, आणि नेहमी आपल्या सांस्कृतिक उपक्रमांना प्रसिद्धी मिळावी यासाठी प्रामाणिक धडपड करणारे एक मित्र तातडीने त्या वृत्तपत्राच्या कार्यालयातील माझ्या टेबलसमोर येऊन थडकले. त्या अंकाची त्या बातमीचे पान सहज दिसेल अशी घडी माझ्यासमोर आदळून काही न बोलता ते माझ्याकडे पाहात होते. त्यांच्या डोळ्यात उमटलेली रागाची छटा स्पष्ट दिसत होती.
मिनिटभर काहीच न बोलता मी त्यांना स्वस्थ होऊ दिले, आणि बाजूचीच एक खुर्ची ओढून त्यांना बसावयास सांगत "काय झाले' असे विचारले.
"हे काय आहे?'... आपल्या आवाजातला राग अजिबात न आवरता बातमीवर जोरजोरात बोट आदळत त्यांनी मला विचारलं. मी शांतच.
'अशा बातम्या छापायला तुमच्याकडे जागा असते. आणि आमच्या, विधायक, समाजाला काही विचार देणाऱ्या, समाजात चांगुलपणा पेरणाऱ्या बातम्या छापायला तुमच्याकडे जागा नसते. त्यांच्याकडे बघायलाही वेळ नसतो...' रागारागाने ते बोलत होते.
त्यांचं बोलणं संपलं, आणि मी त्यांच्यासाठी चहा मागवला. त्यांचा राग रास्त होता, हे मलाही पटलं होतं. वेगवेगळ्या विषयांवर विचार व्यक्त करण्यासाठी "हाईड पार्क'च्या धर्तीवर मुंबईत ठिकठिकाणी "कट्टा' सुरू करणाऱ्या या "साहित्यिक चळवळ्या'विषयी आम्हाला कौतुक होतं. त्याच्या उपक्रमांमधला तोचतोचपणा लक्षात घेऊनही, ती चळवळ सर्वत्र पसरावी यासाठी आम्ही सहकार्यही करत होतो. पण आजच्या "त्या' बातमीएवढी जागा आपल्या उपक्रमाला कधीच मिळाली नाही, अशी त्याची तक्रार मात्र मला पटली नाही.
या एका बातमीमुळे, आपल्या लहानग्यांना अनोळखी माणसाबरोबर घराबाहेर पाठवू नये, अशा एखाद्या व्यक्तीने दिलेला खाऊ घेऊ नये, हा "धडा' आईबापांना मिळाला असेल. अंगावर शहारे आणणाऱ्या गुन्हेगारीच्या असंख्य बातम्या वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांना जागा मिळाली नाही, आणि फक्त विधायक बातम्यांना प्रसिद्धी मिळाली, तर अशा घटनांविषयी समाज अनभिज्ञच राहील, आणि ‘सारे काही छान आहे’, अशीच समजूत समाजात फोफावेल, असे सांगून मी त्याला त्या भडक बातमीमागची वृत्तपत्रीय भावना समजावण्याचा प्रयत्न करत होतो.
चहा संपवून तो ऊठला, तेव्हा त्याने हातातल्या घडीवरची ती बातमी पुन्हा वाचून काढली होती. माझ्याकडे बघून त्यानं मान डोलावली, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या...
त्या चळवळ्या मित्राचा राग केव्हाच निवळला होता.
या बातम्या लोकजागृतीच करतात, आणि ही जागृतीच आजच्या काळात आवश्‍यक आहे, यावर आमचे एकमत झाले होते.

Monday, July 14, 2008

‘यू टर्न’

‘यू टर्न’

काल मला एक माणूस भेटला... ह्यात सांगण्यासारखं काहीच नाही. पण त्याच्यामुळे, मी ‘समाधानाची चव’ चाखलेल्या एका सुखी माणसाला पाहिलं. कदाचित, हे त्याला स्वत:लापण माहीत नसेल, पण तो समाधानी आहे. त्याच्या मनाच्या कोप-यातला समाधानाचा कप्पा आजही, इतक्या वर्षांनंतर्ही, तितकाच भरलेला आहे. त्या कप्प्यात मी डोकावून आलोय...
समाधानाचं शिखर गाठलेली माणसं आजूबाजूला चिकार आहेत. मी ज्याच्याबद्दल सांगतोय, हा माणूस मात्र फाटकाच आहे. त्या माणसाचं नाव विचारावं, असंदेखील मला त्याच्याबरोबरच्या त्या पाचसात मिनिटांच्या भेटीत वाटलं नाही... कदाचित, आज मी त्याला विसरूनसुद्धा गेलो असतो.. पण, सहज घरात इकडच्यातिकडच्या गप्पा मारताना आज मी सहज म्हणून त्याची हकीकत सांगायला लागलो, आणि, त्या माणसाच्या वेगळेपणाची जाणीव मला स्पर्श करून गेली.... हा माणूस समाधानाच्या शिखरावर पोहोचलेला नाही, पण त्या शिखरापर्यंत जाऊन आलाय, त्या शिखराला नकळत स्पर्श करून आलाय, असं मला वाटलं. आणि, माझ्यासाठी, हेच त्याचं त्याचं वेगळेपण ठरलं. त्याच्या समाधानाचं ते शिखरही, अगदी खडतर वाटचालीचं नाही. अनपेक्षितपणानंच कधीतरी एकदा ते शिखर त्याला सापडलं, आणि तो तिथं पोहोचला. आपण तिथवर पोहोचून आलोय, हे त्याला माहीतही नाही. त्याच्या दृष्टीनं ती फक्तं एक आठवण आहे. मलाच त्यात काहीतरी वेगळं वाटतंय... कारण, तिथं जाऊन तो परत त्याच्या आधीच्या जगात परत आलाय....

‘मुम्बईवरनं आलात?’ लॊन्ड्रीवाला लगेच ईस्त्री करून देतो म्हणाला, म्हणून मी उभा होतो, तेव्हा टपरीतच कडेला एका स्टुलावर बसलेल्या त्या माणसानं माझ्याकडे थेट पहात विचारलं. साठीच्या आसपास झुकलेला तो माणूस, कामधंदा नसल्यानं वेळ घालवायला तिथं बसला होता, हे त्याच्याकडं पाहाताच लक्षात येत होतं. मी त्याचा प्रश्न ऐकल्या न ऐकल्यासारखं केलं आणि रस्त्याकडं बघत उभा राहिलो.
‘नेने वकिलांकडं आलायत?’ पुन्हा त्यानं विचारलं.
मी त्याच्याकडं न पाहाता नकारार्थी मान हलवली.
‘मग, काळ्यांकडं?’ त्यानं पुढचा खडा टाकला, आणि पुन्हा मी मान हलवून नाही म्हटलं.
‘तुम्ही ब्यांकेत काम करता?’ त्याच्या चौकशा सुरूच होत्या, आणि मी फक्त मान हलवत नाही म्हणून खुणेच्याच भाषेत बोलत होतो.
‘आम्च्या रत्नांग्रीसारखी म्हागाई जगात कुठे सापडायची नाय...’ माझी माहिती काढायचा नाद अखेर सोडून देऊन त्यानं नवा मुद्दा घेतला.
कदाचित, नुस्तं बसल्यावर येणारा कंटाळा घालवण्यासाठी कुणाशीतरी, किवा कुणीतरी, आपल्याशी चार शब्द बोलावं, एवढीच त्याची माफक अपेक्षा असावी.
मी रस्त्यावरची नजर हटवून त्याच्याकडे पाहिलं.
जोरजोरात मान हलवत आणि खाली सोडलेले पाय एवढ्याशा स्टुलावर ओढून गुडघे छातीशी घेत पुन्हा त्यानं तेच वाक्य उच्चारलं.
‘आता तुमीच बगा, एका कपड्याच्या इस्तरीला तीन रुप्पय घेतात... साकर, ईस रुपय किलो... भाजी तं चालीस नि पन्नास रुप्पय किलो... छ्या., लय म्हाग रत्नांग्री’ तो पुट्पुटला.
‘अहो, सगळीकडंच, आमच्या मंबईतपण अशीच महागाई आहे’ त्याच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरासकट मी त्याच्याशी बोललो.
‘तरीपन, हितल्यासारकी म्हागाई कुटंच न्हाई’ तो हेका सोडायला तयार नव्हता.
‘हल्लीच वाडली इतकी... पयले न्हवती’...
वय झालेली माणसं जुन्या आठवणीत रमतात. श्रोता मिळाला, की त्या आठवणींचे कप्पे उघडतात. आता तो असंच काहीतरी सांगायला सुरुवात करणार, हे मी ओळखलं...

‘तुमाला सांगतो, मागं, मी आसंन पंचविशीचा... आमच्या परड्यातली चार कलमं त्या साली चांगली धरली व्हती. ह्या असलं येकेक फळ व्हतं...’ हाताची पाचही बोटं ताणून पंजा ताठ करत त्यानं मला दाखवला.
‘पाच पेट्या भरल्या, नि त्या घेऊन मी मुम्बईला गेलो... पन नेमका त्याच दिवशी न्हेरू वारले... सगळीकडं शुकशुकाट.. खेप फुकट जानार, आसं वाटलं... नशीबच न्हाई, आसं म्हनत मी धक्क्यावर बसलो व्हतो. बाजारात पेट्या घेऊन जान्यात अर्थ न्हाई, आता वापस रत्नांग्रीला जायाचं, आसा ईचार करत व्हतो... ईतक्यात, दोनचार फॊरिनर तितं आले..’
...त्याच्या बोलण्याकडे माझं फारसं लक्षं नव्हतं, पण मी ऐकत होतो.
‘खुणेनंच त्यांनी विच्यारल्यानी, काय हाय म्हणून... मी सांगितलं, हाप्पूस... अस्सल आंबा... लगेच एक आंबा काडला, नि कापून त्यांच्या हातावर ठेवला... आनि माजं नशीब पालटलं’
... आता मी फक्त त्याचंच बोलणं ऐकत होतो.
‘त्यांनी आंबा खाल्ला, आनि विचारलं, कसा दिला म्हणून... मला इंग्लिश आकडे म्हाईत नव्हतं, म्हणून, तीन बोटं दाखवली...आनि, दीड हज्जार रुपय माज्या हातावर देवून पेट्या उचलल्या..’
त्या क्षणाला तेव्हा त्याला काय वाटलं असेल, हे त्याच्या सुरावरून सहज समजत होतं...
‘तीस रुपयांची माझी पेटी, तीनशे रुपयाला गेली व्हती... येवडा पैसा मी कदीच बघितला न्हवता... मी घाबरलो. एवडं पैसं घेऊन जायाची भीती वाटायला लागली. आनि गिरगावातल्या आमच्या गाववाल्या बामनाची मला आटवन झाली. मी सीधा त्याच्याकडं गेलो, नि सगळी हकीगत सांगून टाकली...’
त्याचा स्वर उत्साही झाला होता, आणि मीही कान देऊन ऐकत होतो.
‘बामनानं त्यातले दीडशे रुपये माज्याकडं दिलेन, आनि ‘चल’ म्हनाला... मी आपला त्याच्या पाटोपाठ गेलो.. एका सराफाच्या पेढीवर... वीस तोळ्याचे दागिने घेऊन बामनानं माज्या हातात दिलेन, आनि ते घेवन मी लगेच हितं आलो... त्यो एकच दिवस, माजं नशीब बदलून ग्येलं... पुन्हा मी हाये तितंच हाये... पन त्या आंब्याच्या पाच पेट्यांनी माज्या बायकोला सोन्यान मढवलानी....’

बोलायचं थांबून तो माझ्याकडं पाहात होता... प्रतिक्रियेच्या अपेक्षेनं!
नुसती मान हलवून मी हलकसं हसून त्याला माफक प्रतिसाद दिला, आणि कपडे घेऊन तिथून निघालो.
तेव्हा मला काहीच विशेष वाटलं नव्हतं.
पण आज, बोलताबोलता, त्याचं ते वाक्य मला आठवलं... ‘त्यो एकच दिवस, माजं नशीब बदलून ग्येलं... पुन्हा मी हाये तितंच हाये...’
आणि मी विचार करायला लागलो.
आयुष्याच्या एका ‘टर्निंग पॊईंट’ला हात लावून तो परतला होता...
पण तो फक्त ‘यू टर्न’ होता...
तो क्षण त्यानं अजूनही, जिवापाड जपून ठेवलाय.
तो क्षण अनपेक्षित होता, हे त्याला आजही माहीत आहे...
नंतर आजवर तसा क्षण पुन्हा त्याला सापडला नव्हता... कदाचित म्हणूनच, तो क्षण त्यानं घट्ट पकडून ठेवलाय.
त्याच्या कल्पनेतल्या ‘समाधाना’च्या शिखराला हात लावून तो परत आलाय. त्या समाधानाच्या सुखाची चव त्यानं चाखलीये... ती चव हरवू नये, म्हणून तो धडपडतोय.
माझ्याशी पाच मिन्टं बोलल्यामुळे त्याला ती चव पुन्हा अनुभवता आली, ह्या जाणीवेनं मी एका आगळ्या समाधानात डुंबतोय...
ते ‘शेअर’ करावं, म्हणून तुम्हाला सांगितलं!

Wednesday, July 9, 2008

क्या पांचवी पास `इतने' तेज है?

हा काथ्याकूट नाही... कथा, ललित, किंवा त्यातलं काहीच नाही... पण योग्य पर्याय न सापडल्यानं, `ललित'चा टिळा लावलाय... एक अचानकपणे ठुसठुसणारं, जनातलं, आणि मनातलं, काहीतरी सांगण्याचा एक घाईघाईचा प्रयत्न...

काही लिहावं असं आज खरं तर अजिबात मनात नव्हतं. टीव्हीवर बराच वेळ सर्फिंग केल्यावर झी वर निरागस सुरांचं सारेगमप पाहिल. ईश्वरानं गळ्यात मध ओतून जन्माला घातलेल्या त्या मुलांचं सुरांवरचं प्रेम मनात पाझरत असतानाच कार्यक्रम संपला. सुरेशच्या `सुरमयी श्याम'चे सूर मंचावर घुमत असतानाच चुकून रिमोट दाबला गेला, आणि डोकं भणभणून गेलं... सुन्न झालं... बालपण हे निरगसतेचं दुसरं नाव असल्याची साक्ष देणारे हे गोड, मधाळ सूर कानात घुमत असतानाच, अवधूतचं एक वाक्यही मनावर कोरलं जात होतं... त्या वाक्यात काव्य नव्हतं, पण कवितेचा गोडवा होता. हे गोड सूर कानात घुमतच राहाणार, असा विचार करत असतानाच अवधूत त्या `लिटल चाम्प’ला म्हणाला, `आता घरी गेल्यावर झोपण्याआधी जर कान धुतले नाहीत, तर कानांना मुंग्या येतील'...या एका वाक्याला दाद देत मी चॅनेल बदललं, आणि सगळा मूड किर्किरा झाला...

त्या दुसर्‍या चॅनेलनं माझ्या मनातल्या बालपणाच्या निरगसतेचं वास्तवात विसर्जन केलंय. बालपणाची जगभरातली असंख्य रूपं टेलिव्हिजनमुळे आजकाल आपल्याला अवतीभवती दिसतात. परवा एका रिऍलिटी शोच्या निमित्तानं एक रूप आपल्याला अस्वस्थ करून गेलं. शाहरूखच्या `क्या आप पांचवी पास से तेज है?' शो मधून निरगस बालपणाचं दुसरं रूप डोकावत असावं... झी वरच्या `सारेगमप'मधले कोवळे, निष्पाप सूर कानात घुमत असतानाच इंडिया टीव्हीवर एक सनसनीखेज रिपोर्ट पेश होत होता, आणि या रिपोर्टनं निरागसतेचं बालपणाशी जोडलेलं नातं ताडकन तोडलं. `पाचवी पास प्रेग्नंट' असा काहीतरी मथळा असलेला हा `स्पेशल रिपोर्ट' इंडिया टीव्हीच्या ख्यातीला साजेसाच असेल असं आधी वाटलं, पण जोडीला काही मुलाखतीही दिसत होत्या... तेरा ते अठरा वरषाच्या मुलींमध्ये `प्रेग्नन्सी'चं प्रमाण वाढतंय, आणि, या `टीनएजर्स्'मध्ये गर्भपाताचं प्रमाण्ही वाधतंय, असा निष्कर्ष काढणारा हा रिपोर्ट काही वेळापूर्वी इंडिया टीव्हीवर अनेकांनी पाहिला असेल... या वयोगटातल्या मुली, आपल्या बॊयफ्रेंड्च्या बरोबर बिन्दिक्कत डोक्टरकडे जाऊन आपली `समस्या' सहजपणे माडतात, आणि त्यातून सोडवणूक करून घेतात, असं हा रिपोर्ट सांगतो. मुम्बई, लखनऊ आणि काही मोठ्या शहरांत केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणाचा हवाला या रिपोर्टमध्ये दिला जात होता... लक्ष्मिपुत्रांच्या घरांत हे प्रमाण मोठं असल्याचा या सर्वेक्षणाचा दुसर निष्कर्श आहे, असं या रेपोर्टवरून वाटलं, आणि सुन्नसुन्न व्हायला झालं.

आपल्या देशातल्या `बालपणा'च्या अल्लड, लडिवाळ छटा आता `टीनएजर' पिढीमुळे अस्ताला चालल्यात... गर्भपातांचं प्रमाण अशा पिढीत वाढत असेल, तर त्याची नुसती चिंता करत बसणे पुरेसे आहे का, हे ठरवलं पाहिजे...स्त्री भ्रूणहत्या हा देशातला एक चिंतेचा विषय आहे. विवाहाचं कायदेशीर वय कमी करायला न्यायालयं अनुकूल असल्याच्या बातम्यांमुळे एक देशात मध्यंतरी एक वैचारिक मंथन झालं. आजही, मुलगी `वयात'- म्हणजे कायद्याच्या द्रुर्ष्टीनं विवाहयोग्य व्हायच्या आधीच,- आली, की लग्नं करून एका मोठ्ठ्या जबाबदारीतून मोकळं होण्याची मानसिकता अनेक आईबापांमध्ये दिसते. मात्र, समाजातल्या `कायद्याच्या बबतीत जागरूक असलेल्या' शहरी संस्क्रुतीतल्या धुमाकुळाचा नक्शा या सर्वेक्षणानं पार उतरवून टाकलाय...

समाजात काही चांगुलपणाची चिन्हं दिसताहेत, तोवर अशा समस्यांवर तोडगा निघू शकेल, असं मला वाटतं... या लेखनावर त्याच्या साहित्यिक गुणावगुणांची चर्चा होऊ नये. उलट, कदाचित, घाईघाईनं, एक `सणकी'मुळे लिहायला घेतल्यानं या समस्येचं भीषण रूप मांडण्यात मी कमीच पडलो असेन, असं मला वाटतय... महाजालाच्या रूपानं आपल्यासमोर आज वैश्विक व्यासपीठ तयार झालंय... थोडा वेळ अशा समस्या जगासमोर आणण्यासाठीही द्यावा, या भावनेतून हा प्रपंच!

Monday, July 7, 2008

मी लेलेंना शोधतोय....

त्यांचं आडनाव लेले नाही. म्हणजे, लेलेच आहे, की नाही, ते मला नक्की माहीत नाही. त्यांचा नक्की पत्ता मला माहीत नाही. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ कुठेतरी ते राहातात. एवढंच मला माहीत आहे. म्हणजे, माझ्या सहकार्‍यानं मला त्यांच्याबद्दल सांगितलं, तेव्हा ते तिथं कुठतरी राहातात, एव्हढच मला कळलं होतं. तेव्हापासून, सिद्धिविनायकासमोरून येताजाताना मी त्या दिशेनं भक्तिभावानं हात जोडतो. अर्धा सिद्धिविनायकाला, आणि अर्धा त्या लेले, की कुणी, त्यांना... सिद्धिविनायकाच्या शेजार्‍याला...
... त्या लेलेंची- आपण त्यांना लेले म्हणू- गोष्ट मला अरूणनं - माझ्या सहकार्‍यानं - सांगितली, त्याला आता पाचसहा वर्षं उल्टून गेलीत... पण तेव्हापासून ते माझ्या मनात घर करून राहिलेत... मला त्यांना भेटायचंय... सिद्धिविनायकाचा हा शेजारी, मलाही बघायचायचाय...
मी लेलेंना शोधतोय...
मी आणि अरूण- माझा समव्यवसायी- आणि शेजारी- नेहेमीप्रमाणे ट्रेनमधे खिडक्या पकडून समोरासमोर बसलो, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या... नेहेमीप्रमाणेच... आज कुणाची प्रेस कॊन्फरन्स, मंत्रालयात कुठे काय, राजकारण कुठे चाललंय, जगात कुठे काय आणि अरूणचा अभ्यासाचा विषय... संरक्षण खातं- त्यावर त्यानं नुकतीच डॉक्टरेट मिळवलेली... मी त्याचा हक्काचा आणि मन लावून ऐकणारा श्रोता... जॊर्ज फर्नांडिस तेव्हा संरक्षणमंत्री होते, आणि शवपेट्यांचा वाद देशभर गाजत होता... बोलताबोलता गप्पांचा ओघ `माणुसकी'वर येऊन थांबला, नेमके तेव्हाच आमच्यासमोर एक दीनवाणा भिकारी, पाठीवरचं ओझं सांभाळत उभा होता... त्याच्या पाठीवर एक जर्जर, खंगलेला, म्हातारा अर्धमेल्या डोळ्यांची क्षीण उघडझाप करत केविलवाणेपणानं गाडीतल्या गर्दीकडे पाहात होता. कुणाचाही हात खिशात जावा, असंच द्रुश्य होतं... मी आणि अरूणनंही तेच केलं, आणि गप्पा लेलेंच्यापर्यंत आल्या...
असंच कधीतरी अरूण त्या लेलेंना प्रत्यक्ष भेटलेला... त्यांची कथा त्यानं ज्याच्याकडून ऐकली, त्याला घेऊनच अरूण लेलेंकडे गेलेला.
--------- -------------- -------------
सकाळचे साडेआठ-नऊ वाजलेले... अरूण आणि तो- दोघं सिद्धिविनायकाच्या शेजारच्या इमारतीतल्या एका फ्लटसमोर उभे राहिले, आणि त्यानं अरूणला खूण केली... अरूणनं दरवाज्यावरची बेल वाजवली, तेव्हा त्याचा ताणून धरलेला सगळा अधीरपणा त्या बेलच्या बटणातून आतल्या घरात घुमला होता... दरवाजा उघडण्यासाठी लागलेला मिनिटभराचा वेळदेखील अरूणला सोसवत नव्हता. म्हणजे, मला ते सांगतानाचा अरूणचा सूरच तसा होता... मी तेव्हाची त्याची मानसिकता समजू शकत होतो... अरूण बोलत होता, आणि तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर जिवंत होत होता...
- दरवाजा उघडला, तेव्हा, बाहेर जायच्या तयारीत असलेला एक मध्यमवयीन माणूस आत उभा होता... बाहेरच्या दोघाही अनोळखींना पाहून त्यानं नमस्कार केला, आणि कोण, कुठले, वगैरे कोणतीही चौकशी न करता त्यांना आत यायची खूण केली... हातातली पिशवी बाजूच्या टेबलावर ठेवून तेही टेबलजवळ्च्या खुर्चीत बसले, आणि अरूणनं व्हिजिटिग कार्ड त्यांच्यासमोर धरलं...
‘प्रेसवाल्यांशी बोलण्यासारखं माझ्याकडं काही नाही... काही काम असलं, तर सांगा...’ झटकून आणि काहीसं फटकूनच बोलत लांबूनच ते कार्ड त्यांनी पाहिलं, आणि अरुण अवघडला...
`मला तुमच्यावर लिहायचंय'... अडखळत तो म्हणाला, आणि त्या माणसानं- लेलेंनी- टेबलावरची पिशवी उचलून उठत नमस्कार करून पायात चपला अडकवल्या...
`जाऊ दे... नाही लिहित... पण आपण गप्पा तर मारू या'... आगांतुकासारखा त्यांच्या घरात घुसूनही, अरूण त्यांना सोडायला तयार नव्हता...
`ठीक आहे.. पण मला जास्त वेळ नाही’- मनगटावरल्या घड्याळाकडे पाहात ते पुन्हा खुर्चीत बसले.
`नाही, सहज इकडे आलो होतो सिद्धिविनायकाला, तर तुम्हाला भेटावसं वाटलं, आणि न विचारताच आलो'... अरूण त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करत होता. आणि ते -लेले- निर्विकारपणे अरूणकडे पाहत होते.
‘मला समजलं, तुम्ही व्हीआरएस घेतली म्हणून...’ अरूणनं आणखी एक खडा टाकला.
‘हो.. अलीकडेच...’ लेले तुटकपणानं का होईना, बोलले.
`हे बघा, मी काहीही छापणार नाही. फक्त मला ऐकायचंय... तुमचा टर्निंग पॉईंट’... अरूणनं पुन्हा दामटलं.
`नाही हो, कुणी काही छापावं, माझं कौतुक करावं, असं मी काही करत नाही... मी जे करतो, ते माझ्या समाधानासाठी... मला रात्री घरी आल्यावर शांत झोप लागते... बस्स... मी खूप समाधानी आहे'... लेले म्हणाले...
‘पण कधीपासून?'- अरूण म्हणाला, आणि लेलेही जरासे सैलावले.
अरूणशी बोलायला, गप्पा मरायला काही हरकत नाही, असा त्यांना विश्वास वाटला असावा...

‘त्या दिवशी शनिवार होता... बैंक अर्धा दिवस होती, म्हणून मी आणि माझा सहकारी दुपारीच बाहेर पडलो... कोपर्‍यावरच्या टपरीवर चहा घेताना माझा तो सहकारी मला म्हणाला, लेल्या, येतोस माझ्याबरोबर? वाटेतच जरा हॊस्पिटलमध्ये जाऊन येऊ... आमचे शेजारचे काका, त्यांना अडमिट केलंय.. जरा भेटून येऊ’
`हॉस्पिटलचा वाससुद्धा मला सहन होत नव्हता तेव्हा... पण ‘लगेच निघायचं' असं ठरवून आम्ही ट्क्सीत बसलो, आणि केईएमला पोहोचलो...
त्या वॊर्डात माझा सहकारी काकांशी बोलत होता, तेव्हा मी सहज आजूबाजूला पाहत होतो... सरकारी हॊस्पिटलात मी तोपर्यंत कधी गेलोच नव्हतो’... लेले सांगत होते... ‘बाजूच्याच बेडवर एक काकांसारखाच म्हातारा, एकटाच भिंतीकडे नजर लावून बसला होता... काकांशी बोलणाया माझ्या सहकार्‍याकडे कौतुकानं पाहात होता... अचानक त्यानं एक लांब सुस्कार सोडला, आणि पुन्हा त्याची नजर छताकडे वळली... मी त्याच्याकडेच पाहात होतो... त्याचे, म्हातारे, खोलगट डोळे पाण्यानं भरलेले मला दिसले... एकदम त्यानं माझ्याकडं बघितलं, आणि मान फिरवून त्यानं डोळे पुसले... मला कसंतरीच वाटत होतं...’
लेले बोलत होते.
‘न राहवून मी त्याच्या जवळ गेलो, आणि नकळत त्याचा बेडवर बसलो... पाण्यानं भरलेले म्हातारे डोळे न पुसता तो माझ्याकडे बघत होता.... अविश्वासाच्या नजरेनं... मी त्याच्या पायांवर थोपटल्यासारखं केलं, आणि तुम्हाला सांगतो, त्याचा बांध फुटला... ’
.... बोलताबोलता लेलेंच्या डोळ्यातही पाणी जमा झालं होतं...
‘त्याच्या मुलानं ते आजारी पडताच इथे आणून अडमिट केलं होतं, आणि मग घरच्या सगळ्यांनीच जणू पाठच फिरवली होती... तेव्हापासून, शेजारच्या बेडवरच्या एखाद्या पेशंटला पाहायला कुणी आलं, प्रेमानं कुणी पेशंटची विचारपूस करताना दिसलं, की त्यांचा भावनावेग अनावर व्हायचा...
‘कधीपासून डॊक्टरांनी औषधं लिहून दिली होती, पण आणायला सांगायलाच कुणी नाही’, तो म्हतारा थरथरत म्हणाला, आणि मी पुढे झालो... माझा सहकारी निघायच्या तयारीत होता.
`तू पुढे हो, मी आलोच, असं सांगून मी प्रिस्क्रिप्शन्चा कागद घेतला, आणि खाली उतरलो... ’
`तुम्हाला सांगतो, खालचं ते द्रुष्य मी केधीच पाहीलं नव्हतं... माणसाची इतकी केविलवाणी अवस्था होते, यावर माझा त्याआधी विश्वासच नव्हता’... लेले म्हणाले.
‘मी औषधं घेतली, आणि वर येउन त्या म्हातार्‍या पेशंटच्या उशाशी ठेवून कशी घ्यायची ते सांगून तिथून निघालो... पण त्या रात्री मला झोप लागली नाही... ’
‘मधे एक आठवडा गेला, आणि पुन्हा शनिवारी ऒफिसातून सुटल्यावर मी अगदी नकळत तिथे पोहोचलो... मला पाहाताच त्या म्हातार्‍या रुग्णानं अंथरुणातूनच हात उंचावला, आणि त्याच्या सुरकुतलेल्या चेहेर्‍यावर हलकंसं हासू उमटलं... तो क्षण माझं आयुष्य बदलणारा होता...’ बोलताबोलता लेलेंच्या नजरेत वेगळीच चमक दिसत होती.
‘त्यांच्याजवळ थोडा वेळ बसून मी निघालो, तेव्हा माझ्या मनात वेगळेच विचार सुरू होते... असे कितीजण वेगवेगळ्या इस्पितळांमधे असतील, त्यांना मदतीची, मायेची गरज असेल... कदाचीत त्यांच्या मायेची माणसं असतीलही, पण वेळ नसेल... कुणी असाच एकाकीपणे आजारपणाच्या यातना सोसत असेल''
... `आणि मी ठरवलं...’ लेले म्हणाले, ‘ यापुढं शनिवार-रविवारच्या सुट्टीत, जमेल तशी, अशा लोकांना मदत करायची... मग सगळे शनिवार-रविवार वेगवेगळ्या हॉस्पिटलांत चकरा सुरु केल्या... तेव्हा जाणवलं, एकाच हॊस्पिटलात तो एकच म्हातारा नाही... असे अनेक उपेक्षित, दुर्लक्षित रुग्ण मायेचा हात पाठीवरून फिरावा, म्हणून आसुसलेले आहेत.. कुणाला विचारपूस करणारंच कुणी नसतं, तर कुणाचं विचारपूस करायला कुणी फिरकतच नसतं... उपचाराचा खर्च परवडत नाही, म्हणून कुणी नंतर रुग्णाकडे फिरकत नाहीत, तर कुणी घरात ब्याद नको, म्हणून इथे आणून टाकलेला असतो'...
अशा सगळ्यांना भेटण सुरू झालं... कधी कुणाला औषधं आणून दे, कधी कुणाशी गप्पा मार, कुणाशी चेस खेळ, असं करत रविवारचा दिवस पुरेनासा झाला... मग घेतली व्हीआरएस...’

...लेले सहजपणे बोलून गेले, आणि घद्याळाकडे पाहात उठलेदेखील...
--------- -------- ------------
‘तुमचं नाव सांगा ना... भारावल्या अवस्थेत मी लेलेंना म्हणालो, आणि लेलेंनी धारदार डोळ्यांनी माझ्याकडे बघितलं...’
...अरूण बोलत होता, तेव्हा आपण लेलेंच्या समोरच उभे आहोत, आणि स्वत: लेलेंना ‘अनुभवतो आहोत, असं मला वाटत होतं...
मी पटकन सावरलो, आणि अरूणकडे बघितलं...
सह्जपणे तो बोलतच होता, तरी त्याचा आवाजही मला भारावल्यासारखा वाटला.
‘हे छापण्यासाठी नाही, हे आपलं आधीच ठरलंय’ लेलेंनी आठवण करून दिली, आणि ते उठलेच.
`मीदेखील जोरजोरात मान हलवून हो म्हटलं, आणि पाठोपाठ उठलो'... अरूण म्हणाला.
‘सिद्धिविनायकाचा शेजारी म्हणा मला हवं तर’... लेलेंनी बाहेर पडतापडता मागे न बघताच सांगितलं, आणि ते झपाझप चालू लागले...
`त्यांचं नाव लेलेच असावं’ अरूण म्हणाला.
`आपण जाऊ या एकदा त्यांच्याकडे'... न राहवून मी अरूणला म्हणालो, आणि त्यानं होकारर्थी मान हलवली....
काही दिवसांनी मी दुसरीकडे रहायला गेलो... माझा आणि अरूणचा सोबतचा प्रवास संपला...
ते लेले मात्र तेव्हापासून मनात घर करून र्‍हायलेत...
कधी एखाद्या प्रेस कॊन्फरन्सला अरूण भेटला, की मी त्याला आठवण करतो, लेलेंना भेटायची...
तोही हो म्हणतो, पण अजून जमलं नाहीये...
म्हणून सिद्धिविनायकाजवळून जाताना, मी फक्त नमस्कार करतो...
--------------------------

Friday, July 4, 2008

अनुदिनी अनुतापे...

माय मराठीच्या जगभर उमटलेल्या पाऊलखुणा संगणकाच्या पडद्यावर पाहाताना येणाया आनंदाच्या भरात मीही एकदा मराठीच्या जागतिकीकरणात आपलाही हातभार लावावा, म्हणून ‘अनुदिनी’ सुरु केली. आनंदाचं ते भरतं ओसरायच्या आत दोनचार लेखही पाडून अनुदिनीवर डकवले. तेव्हापासून रोज त्यावरच्या हिट्स मोजल्याशिवाय मला झोप येईनाशी झाली. दिवसातून दहापंधरा वेळा तरी आपली अनुदिनी उघडावी, आणि जगभरातल्या किती मराठीप्रेमींनी आपल्या ‘वैश्विक साहित्या’चा आस्वाद घेतला, ते पाहात आनंदून जावे, हा छंद मला जडला. प्रत्येक वेळी उघडलेल्या अनुदिनीच्या ‘हिट काऊंटर’वर एकएका आकड्याची भर पडताना पाहून माझ्या आनंदाला अक्षरश: उधाण यायचे, आणि साहित्यनिर्मितीच्या उर्मी उरात उचंबळायला लागायच्या. रात्ररात्र जागून मग मी साहित्याच्या लगडी उलगडून अनुदिनीवर पसरायचो,आणि लगेचच, हिट्स मोजायाची सुरुवात व्हायची...
... दिवसामागून दिवस जात राहिले. माझ्या अनुदिनीवर्ल्या हिट्स कितीने वाढल्या, ते मी न चुकता, दिवसातून जमेल तितक्यांदा पाहात होतो. प्रत्येक वेळी वाढणारा आकडा पाहून येणार्या त्या आनंदाच्या उधाणात डुंबत असताना, कॊमेंटसच्या रिकाम्या रकान्याकडे माझं लक्षच जात नव्हतं.
... आणि एका दिवशी, माझ्या मित्राला अनुदिनी उघडून दाखवली. संगणकाच्या पडद्यावरल्या माझ्या अक्षर साहित्याचे शब्द ताठ मानेनं जग पाहातायत, या जाणीवेनं मी मोहरून गेलो, आणि अनुदिनी बंद केली. पण त्यानं मला ती पुन्हा उघडायला लावली, आणि मी हिट काऊंटरकडे पाहिलं... एका क्षणात तिथला आकडा एकाने पुढे सरकला होता... आपल्या साहित्यावर जग फिदा झालंय अशी माझी खात्रीच झाली. आता एखाद्या ऒनलाईन अंकाचं संपादक वगैरे होण्यासाठी चाचपणी वगैरे करायला काहीच हरकत नाही, असा एक विचारही मनात विजेसारखा चमकून गेला, आणि क्षणाचाही विलंब न लावता तो तोंडातून बाहेरही पडला... शून्यात पाहाताना, जगाच्या कुठल्यातरी कोपर्यातला, मायभूमीच्या ओढीने अस्वस्थ झालेला आणि मराठीला मुकलेला, मराठीसाठी भुकेला माझा मराठी बांधव आपल्या अनुदिनीचा आस्वाद घेत आपली भूक भागवतोय, असं चित्र माझ्या डोळ्यांसमोर तरळत होतं. माझा तो मित्र, माझ्या अनुदिनीची उघडझाप करत होता, आणि ...हिटस वाढतच होत्या... आणि माझ्या डोक्यात लक्कन वीज चमकली. हिट्सचा आकडा आपल्या क्लिकबरोबरच वाढत नसेल ना, या शंकेनं मी कावराबावरा झालो, आणि पुन्हा ती शंका तोंडातून बाहेर पडली. वास्तवाला सामोरं जायचा क्षण जवळ आला होता, हे मी ओळखलं, आणि ओशाळून अनुदिनी बंद केली...
... आता कधीमधी मी ती उघडतो, तेव्हा हिट्स काऊंटर एका आकड्याची भर घालून शून्याएवढे डोळे वटारून माझ्याकडे पहात हसताहसता जिवंतपणाची साक्ष देत असतो... प्रतिक्रीयांचा रकाना मात्र एकलकोंड्यासारखा तळाशी कुठेतरी लपलेला असतो...

Wednesday, July 2, 2008

अध्यक्षपदाची फिल्डिंग!

मराठी साहित्य संमेलन सान फ्रान्सिस्कोमधे होणार की नाही, हे अजून नक्की होत नसल्यानं भल्याभल्या कवी-साहित्यिकांच्या डोळ्याला डोळा नाही. महामंडळाचे पदाधिकारी- म्हण्जे कौतिकराव- गेल्या काही दिवसांपास्नं सदस्यांची यादी खिशात घेऊनच फिरतायत. ५१ जणांची नावं फायनल करून निमंत्रणाचा कागद त्यांच्याकडे पोहोचेपर्यंत कौतिकराव कुणालाच भेटणार नाहीत, असं महामंडळाचे भालदार-चोपदार सांगत सुटल्यानं साहित्यिक वर्तुळात खळबळ उडालीय. एक बरे झालेय. आम्च्या रत्नांग्रीकरांनी हा विशय लावून धरला, हे आम्हाला एकदम आवडले.

संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी मंडळी नकोत, असा मातब्बर साहित्यिकांचा जुना आग्रह होता. सान्फ्रान्सिस्कोत संमेलन भरले, तर कदाचित आता त्यांना बरे वाटेल. पण हे विषयांतर झाले. संमेलनाच्या निमित्ताने आपली बाजू कुठेतरी झुकती हवी, म्हणून आम्ही आतापासूनच कानोसा घ्यायला सुरुवात केलीये. सान्फ्रान्सिस्को संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कुणीच उभे राहू नये, असाही एक नवा सूर ऐकू येतोय. परवा, अमेरीकन एम्बसीच्या बाहेरच्या रांगेत पहाटेपहाटेपास्नं थांबलेल्यांकडे मी संशयानं पाहात होतो. काहीजण अगदी साळसूद्पणानं हातातल्या प्लास्टिकच्या पिशव्या सांभाळत आपल्याला कुणी पाहात तर नाही ना, अशा भीतीनं माना वळवून ताटकळत उभे होते. एका अनिरुद्धबापूंसारख्या मिश्या असलेल्या कवीनं मला बघून मान फिरवली, तेव्हा सान्फ्रान्सिस्कोला जाण्यासाठीची पूर्वतयारी का,असं मी ओरडून विचारल्यावर कसचंकसचं म्हणत त्यानं विषय बदलला आणि तुम्ही इकडं कुठं म्हणत मलाच गुगली टाकल्यावर मलाही काही सुचेच ना. कुणीच अध्यक्षपदाला उभं राहात नसेल, तर आपला फॊर्म भरून टाकायला काय हरकत आहे, असा विचार आल्यावर मी पण आधी व्हिसाची तयारी करू या म्हणून धावाधाव सुरु केली होती. हो, नाहीतर, अध्यक्षपदावर बीनविरोध निवड झाली, तरी व्हिसा नाकारला गेला, तर खाली मान घालून रत्नांग्रीला जायची पाळी यायची. तसे नको म्हणून, आधी व्हिसाची तयारी करा, असं बायकोनं सांगितल्यावर मी तिच्यावर भलाताच खूश झालो होतो. पण अध्यक्ष व्हायचं तर काहीतरी साहित्यिक कामगिरी नको का, असं तिनं विचारल्यावर जरासा हिरमुसलो, तोवर तिनच माझ्यापुढं मुलीची गेल्या वर्शीची वही धरली आणि डोळ्यांनीच, ‘वाचा’ म्हणून खुणावलं. तर मी वही हातात घेउन पहिलच पान उघडलं तर मुलीच्या टीचरांनी मारलेला लालभडक शेरा डोळ्यापुढे नाचायला लगल्यानं जराशी अंधारी आल्यासारखं होऊन मी आंगठा ओठाशी नेत खुणेनंच पाणी आणायला सांगितल्यांवर बायको फणकारत आतच गेली. मग मात्र मी ओर्डून पाणी मागितल, तेव्हा हसत पुढे येउन तिनं वहीचं शेवटचं पान उघडल, तर एकेक ओळ मोकळी सोडून चारचार ओळींवर काहीतरी लिहिलेलं दिसलं. मी खुणेनंच ‘काय’, म्हणून बायकोला विचारल, तर, तुमच्या अध्यक्शपदाची तयारी, असं सांगत ती खदाखदा हसायलाच लागली. या चारोळ्या आहेत असं तिनं सांगितल्यावर मी भलताच खुश झालो, आणि कवतिकानं तिच्याकडं बघितल्यावर ती लाजून स्वैपाकघरातच पळाली. पण संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी तुझ्या चारोळ्या चालतील का, असं विचारल्यावर, महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी चालतात ना बायकोच्या चारोळ्या, असा बिनतोड सवाल तिनंच मला केल्यावर मी गप्प बसलो, आणि व्हिसाच्या तयारीला लागलो. पण अजूनही, वाटतंय की, यंदा नकोच तसं. बायकोच्या चारोळ्यांच्या भांडवलावर आपण पुढच्या वर्शी महामंडळाच्या अध्यक्षपदाला उभं राहू, यंदा फक्त व्हिसा असला, तरी अध्यक्षपद मिळेल,..
सान्फ्रासिस्कोचं जमलं नाही, तर यंदा कुठल्या तरी संमेलनात आपली हजेरी लावायचीच असं मी पक्कं ठरवलंय. रत्नाग्रीत काय आपली डाळ शिजायची नाही. एवढ्या वादानंतर, बायकोच्या कवितांवर तिथे अढ्यक्षपद मिळेल, असं वाटत नसल्यामुळे, विद्वेषी संमेलनाचापण मी मागोवा घेतोय. यंदा मराठी साहित्य संमेलन बे एरियात होणार असल्यामुळे, विद्वेषींचं संमेलन मुंबईत्ल्या बॆक्बे एरियात होणार असं कानावर येतय. महामंडळाची पुढची संमेलनंपण आता जगाच्या पाठीवर कुठेही होणार, हे नक्की झालंय. विंदांच्या सूचनेचा आदर राखण्यासाठी, दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर संमेलन भरवता येईल किंवा कसे, याची पाहाणी करण्याकरता महामंडळाचा एक प्रतिनिधी तिकडे जाणार आहे, असंही कानावर आलंय.

पुढच्या वर्षीचं संमेलन नागासाकीला भरवा, असं तिथल्या मराठी बांधवांनी सुचवलंय... विद्वेषींचं पुढचं संमेलन, साकीनाक्यात भरणार आहे. अध्यक्शपदासाठी आतापासूनच फिल्डिंग लावणार आहे आपण. इथे, नाहीतर तिथे...

Tuesday, June 24, 2008

अगा "कवतिक' जाहले!!

अगा "कवतिक' जाहले!!
आज आम्हाला भारी कवतिक वाटतंय.... मराठीचं, आणि आमच्या पठ्ठ्या ‘मऱ्हाटी’ बाण्याचं... मागं कधीतरी राघोबादादानं मराठीचा झेंडा अटकेपार नेऊन फडकावला, त्याचा अजूनही आम्ही उदोउदो करतोय. पंचवीस वर्षांपूर्वी एकदा जिंकलेल्या वल्डकपसारखा... कारण सरळ आहे. असा योग वारंवार येत नसतो. अशा काही हळुवार स्मृती मनाच्या आणि जनाच्या मनाच्या कप्प्यात जपूनच ठेवाव्या लागतात. अस्मितेचा प्रश्‍न समोर आला, की त्या हळूच बाहेर काढायच्या, त्यावर हलकीशी फुंकर मारून त्यावरली धूळ झटकायची, आणि त्या स्मृती कुरवाळत आपल्या पराक्रमाचे पोवाडे रचायचे... इतकी वर्ष आम्ही हेच करत राहिलो. आज मात्र, मराठीला नवे दिवस आल्याची आमची खात्री पटली आहे. ‘एकमेकांचे पाय खेचू म्हण झाली जुनी’, असं सांगत शाहरुख खान बदललेल्या मराठी बाण्याचं कौतुक करत असला, तरी एकमेकांचे पाय खेचणे हे तर मराठीपणाचे गुणसूत्र- म्हणजे- डीएनए आहे. कधीतरी ते असे उफाळून वर येते, आणि आपला मराठीपणा सिद्ध करते. आज मराठी साता समुद्रापार चाललीये... आम्हाला केवढा आनंद झालाय... ज्ञानेश्‍वरांची आठवण होतेय. "बोलू कवतिके' अशी आमची स्थिती झालीये. "कवतिका'साठी शब्द सुचेनासे झालेत, आणि मराठीचं पाऊल पुढे पडत असताना त्यात खोडा घालून आपला बाणा सिद्ध करण्यासाठी सरसावलेल्या मराठमोळ्या साहित्यिकांची कीव वाटतेय. मराठीनं अनेकांची साहित्यं- पक्षी साहित्यकृती- पचवली. त्याच्याच जिवावर कितीतरी साहित्यिक मातब्बर झाले. परकी साहित्य बेमालूमपणे मराठीपणात मिसळण्याची कला अनेकांना साधली. इतकी, की परकी साहित्याचा गंधदेखील या साहित्याला येणार नाही, इतका सराईतपणा मराठी साहित्यविश्‍वानं सहजपणे साधला. आता मात्र, मराठीला महाराष्ट्राबाहेर जायची संधी आली असताना, महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषांमध्ये बांधून घेतलेल्या मराठी साहित्य"विश्‍वा'त खळबळ माजून राहिली आहे. उलट, साता समुद्रापारच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आमच्या मराठीची अवीट गोडी अमेरिकनांना चाखविण्याचा चंग आम्ही बांधला असताना, हा अंगचोरपणा का केला जातोय, हेच आम्हाला समजेनासं झालंय. यासाठी विचार करता, आम्हाला एकच कारण समोर दिसते. ते म्हणजे, काही मोजक्‍याच लोकांना या निमित्ताने अमेरिकावारी घडणार, या विचारानं काही माथी पोखरली असतील, किंवा इतकी वर्षं साहित्यसेवा करूनसुद्धा अमेरिकावारीचे कवतिक आपल्या वाटणीस नाही, याचे वैषम्य वाटत असेल. आम्ही म्हणतो, इथल्या संमेलनात समजा अडीच कोटींची पुस्तकं विकली गेली असतील. इथली वाचनसंस्कृती संमेलनाच्या निमित्तानं समृद्ध झाली असेल, असंही समजू या. म्हणूनच आता मधल्या वर्षभरात निघालेल्या पुस्तकांना संमेलन हाच वाली असावा, असं कुणा प्रकाशकांना वाटू लागलं असेल. म्हणजे, संमेलनं भरली नाहीत, तर पुस्तकं कशी खपणार, ही इथली स्थिती! म्हणून, पुस्तकं खपण्यासाठी तरी संमेलनं इथल्याइथे भरवा, असा आग्रह? अमेरिकेतले आमचे मराठी बांधव, मराठीच्या संवर्धनासाठी कधीपासून आसुसलेत... मराठीची इथे होणारी प्रगती त्यांना आपल्या दोनचार आठवड्यांच्या भारतभेटीत अनुभवता येत नसेल, आणि संमेलनाच्या निमित्तानं त्यांचं भावविश्‍व, अनुभवविश्‍व आणि मराठमोळ मन समृद्ध होणार असेल, तर स्वस्ताततल्या पाहुणचारात तेवढं त्यांना द्यायला काय हरकत असावी? जाऊ द्यात पाचपन्नास लेखक तिकडे. आजकाल, परदेशवारीसाठी स्वतःच्या खिशातले पैसे घालावेत, आणि आपल्या रटाळ साहित्यकृती "रसिकां'च्या माथी मारायच्या हे समीकरण जुळणारे नाहीच... (कणेकरांना विचारा... ते बऱ्याचदा त्याच त्याच कार्यक्रमांची निमंत्रणं मिळवून जाऊनसुद्धा आलेत. तिथे त्यांना साहित्यिक म्हणूनही ओळखतात.) दुसरं म्हणजे, कधीतरी अमेरिकेची सफर करायचीच, अशी कुणा साहित्यिकांची इच्छा या निमित्ताने पूर्ण होत असेल, तर त्याला बाकीच्यांची हरकत का असावी? उलट, अर्धा खिसाच रिता करून पूर्ण वारी करायची आगळी संधी मिळत असेल, तर आपल्या संस्कृतीला ते साजेसेच नाही का? मग सर्वांनी मिळून त्याचं स्वागतच करायला हवं, असं आम्हाला वाटतं... आणि या अजब आयडियाबाजांचे "कवतिक'च करायला हवं. कारण, मराठीचा झेंडा सातासमुद्रापार जाणार आहे. पुस्तकाच्या खपासाठी रत्नांग्रीत समांतर संमेलन भरवायलाही आमची काहीच हरकत नाही म्हणा... वर्षभरात बरेच गठ्ठे प्रकाशकांच्या गोदामात साठले असतील!!

Monday, June 9, 2008

भूतकाळाला मुक्ती!

भूतकाळाला मुक्ती!
यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठंतरी बाहेर फिरायला जायचं, म्हणून मुलींनी लावलेला घोशा संपवण्यासाठी मी कॉंप्युटर उघडला आणि कोकणाचं समग्र दर्शन घडवणारी एक वेबसाईट ओपन केली. कुठेतरी "बाहेर' फिरायला जायचा प्रस्ताव मला फारसा पसंत पडलेला नाही, हे मुलींनी ओळखलं होतं. त्या काहीही न बोलता माझ्याकडे पाहात होत्या. बेवसाईट ओपन होताच, नाईलाजानं त्या पुढे आल्या, आणि पडद्यावरचं कोकण न्याहाळू लागल्या... कोकणातला एक समुद्रकिनारा पाहाताच त्या एकमेकींकडे बघून अर्थपूर्ण हसल्या... मी कोकणात जायचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवणार, हे त्यांनी ओळखलं होतं. मी त्यांचे चेहरे निरखत होतो, पण त्यांच्या चेहऱ्यावरली रेषादेखील हलत नव्हती...
"बाबा, व्हर्जिन समुद्रकिनारा म्हणजे काय हो?' अचानक कर्सर एका जागी स्थिर करत लहान मुलीनं मला विचारलं, आणि ही संधी गमवायची नाही, असं ठरवून मी कोकणपुराण सुरू केलं..
पाखरांच्या किलबिलीनं तिथं उजाडतं, आणि खाडीकाठचं गाव जागं होऊन कामाला लागतं... गोठ्यातल्या गायीगुरांचं हंबरण गावाचं जागेपण जगावर ठसवत असतं... पलीकडच्या पडव्यांमधून पाडसांचा पडसाद त्यात खर्जाचा सूर पेरतो... स्वयंपाकघरातल्या धुरकटलेल्या कपाटातल्या ट्रान्झिन्टरमधून "मंगलप्रभात'चे सूर घरभर पाझरत असतात... मागल्या दारीच्या पाणचुलीवर उकळणाऱ्या गरम पाण्याचा खमंग वास धुराच्या वेटोळ्यांबरोबर परसावात परमळत जातो... आणि त्या धुरातूनच सूर्याची सोनेरी किरणं कौलारू घरांवर विसावतात... गावाची लगबग आणखीनच वाढते, आणि तालुक्‍याला जाण्यासाठी खाडीकिनारी गावकऱ्यांची गर्दी गोळा होऊ लागते.... तरीतून पलीकडं गेलेल्या गर्दीनं एस्टी भरली, की लालभडक धुरळ्याचा एक लोट हवेत झेपावतो, आणि तर त्याच किनाऱ्यावर विसावते... इकडच्या काठावर पुन्हा गर्दी जमली, की तर दुसरा फेरा मारते... दोनचार फेऱ्यांनंतर गर्दी ओसरते, आणि खाडीचं पाणी संथ होऊन विश्रांती घ्यायला लागतं. ताडामाडांची आणि आंब्याफणसांची झाडं खाडीच्या संथ पाण्यात स्वतःला निरखत वाऱ्याबरोबर झोके घेऊ लागतात.... तोवर उन्हं डोक्‍यावर आलेली असतात... गाव थोडासा सुस्तावतो... जेवणं आटोपून थोडीशी निजानीज होते... आणि संध्याकाळची उतरती किरण गावावरून मागं जायला लागताच, गोठ्याकडं परतणाऱ्या गुरांच्या गळ्यातल्या घंटांचा गजर गावात घुमू लागतो... पाठोपाठ देवघरातल्या धूपचंदनाचा सुवास आणि आरत्यांचा गजर गावात तिन्हिसांजेचं पवित्र वातावरण पेरतो, आणि कुठेतरी एखाद्या मंदिरात भजनाचे सूर आळवत गावकरी आपला शीण घालवतात.... अंधार पडताच गाव शांत पहुडतो... आकाशातल्या चांदण्या आपला गारवा गावावर उधळायला लागतात...
...घराच्या कुठल्यातरी भिंतीकडे पाहात मी कोकणपुराण लावले होते, आणि मुली एकटक माझ्याकडे पाहत होत्या. नकळत मी कोकणात जाऊनही पोहोचलो होतो... त्यांच्याही डोळ्यात कोकणातलं ते गाव तरळतंय, असा भास मला झाला, आणि मी "जागा' झालो...
"काय मग यंदा कुठे जायचं?'... मी अपेक्षित उत्तराच्या विश्‍वासानं विचारलं, आणि दोघींनी एका सुरात तेच उत्तर दिलं...
भलताच खुलून मी उठलो, आणि स्वयंपाकघरात पोळ्या लाटणाऱ्या बायकोला हे सांगितलं...
क्षणभर माझ्याकडे एक विचित्र कटाक्ष टाकून, काहीही न बोलता तिनं पोळ्या लाटायचा वेग वाढवला, तेव्हा हा विचार तिला फारसा मानवलेला नाही हे ओळखून मी निमूटपणे बाहेर आलो...
"आई म्हणत असेल, तर यंदा कोकणात जायचं..' मी मुलींसमोर माझ्या प्रस्तावात दुरुस्ती सुचवली, आणि एकमेकींकडे पाहात त्या आत पळाल्या...


पाचदहा मिनिटांत त्या बाहेर आल्या, तेव्हा त्यांचे चेहेरे खुलले होते.
आता काही दिवसांतच आपण कोकणात जाणार, या विचारानं मी सुखावलो...
पण पुढच्याच क्षणाला काहीसा धास्तावलोपण...
एवढं छान वर्णन मी मुलींसमोर केलं होतं, पण "तसं' कोकण खरंच तिथं आपल्याला पाहायला मिळेल?... ते गायीगुरांचं हंबरण, तो संथ खाडीकिनारा, ते आरत्यांचे सूर, ते पाणचुलीवरच्या पाण्याचं खमंग दरवळणं... खरंच आता अनुभवायला मिळेल?...
अशा असंख्य प्रश्‍नांचा एक घट्ट विळखा माझ्या मनाभोवती आवळला गेला, आणि मी आवंढा गिळला...
आता माघार नाही... जे तिथे दिसेल, त्यातच आपल्या मनातलं कोकण शोधायचं, आणि दाखवायचं.... मी ठरवलं, आणि थोडासा सैलावलो...
--------- ------------------
काही दिवसांनंतर आम्ही सहकुटुंब कोकणात दाखल झालो होतो...
कोंडुस्करांच्या शाही गाडीतून पहाटेपहाटे उतरताच मी आजूबाजूला पाहिले...
याच जागेवर, दिवस अगदी डोक्‍यावर आला होता, तेव्हा मी लहानपणी आईचं बोट धरून एस्टीतून उतरलो होतो, तेव्हा दुपार असूनही सारं काही शांतशांत होतं...
आज पहाट असतानाही समोरच्या पानवाल्याच्या गादीवरल्या गुटख्याच्या पुड्या बघताबघता संपल्या होत्या...
पाचदहा रिक्षा स्वतःभोवती घिरट्या घालत गाडीभोवती घुटमळत होत्या...
माझ्या आठवणीतलं ते गाव जागं झालं, आणि मला भूतकाळ दिसू लागला...
तेव्हा एस्टीतून उतरलेले बायाबपये गाठोड्याचे बोजे डोईवर घेऊन घराच्या वाटेनं चालू पडत...
आज रिक्षावाल्यांच्या भोवती गर्दी झाली होती, आणि भाड्यावरनं घासाघीस सुरू होती...
"एवढ्याश्‍या झ्या*** अंतरावर जायला शंबर रुप्पय्य?... लय झालं... चला रं बावानू...' म्हणत एकानं बिस्तरा डोईवर घेतला, तेव्हा मी सुखावलो... ती आठवण पुन्हा समोर जिवंत झाली होती... पण अखेर रिक्षावाल्यानं तोड केली, आणि बोजेबिस्तरा रिक्षात टोऽून त्यावर कोंबून बसत रिक्षा फुरफुरत निघून गेली...
लाल धुरळाही कुठेच उडालेला दिसत नव्हता...
आम्ही सामान घेऊन गावातल्याच मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झालो, तोवर सकाळचतांगलीच तापली होती... मी ती स्वप्नातली पहाटच शोधायचा प्रयत्न सोडूून दिला होता...
बॅगा कोपऱ्यात ठेवून आम्ही ओटीवरच्या "सोफ्या'वर विसावलो, तेव्हा मुली एकमेकींकडे पाहात होत्या.... बायको तर गप्पच होती. मी त्यांच्याकडे पाहायचेच टाळले...
चहापाणी झाल्यावर आम्ही आंघोळीच्या तयारीला लागलो...
बाथरूनमध्ये गीझर तयार होता...
पाणचुलीचा खमंग वास मुलींना मिळणारच नव्हता, हे मी ओळखले, आणि ओशाळलो... आठवणींचा तो कप्पाच मी बंद करून टाकला...
आंघोळी आटोपल्या, आणि माजघरातल्या डायनिंग टेबलावर आम्ही न्याहारीसाठी एकत्र आलो...
लहानपणी या घरात आम्ही न्याहारीच्या वेळी गरमगरम वाफाळलेल्या भातावर, कुळदाचं खमंग पिठलं, आणि लसणाची लालभडक चटणी घेऊन ताव मारायचो...
आज समोरच्या "प्लेट'मध्ये वाफाळलेल्या इडल्या आमच्याकडे बघून हसत होत्या...
भुकेलेपणामुळं आणि सवयीनं, भराभरा इडल्या संपवून मी शांत बसलो होतो, तेवढ्यात ओटीवर कुणाचीतरी चाहूला लागली, म्हणून बाहेर आलो...
"साब है क्‍या?'.... कुणीतरी विचारलं आणि मी आत पाहिलं...
घरधनी तोवर बाहेर आलेलेच होते...
"अरे भय्या, जल्दी करो... आज माल भरके टेम्पो जानाच चाहिये... पचास-सो पेटी आज मार्केटमे उतरना चाहिये...' घरधनी सांगत होते, आणि "भैय्या' मान डोलावत होता...
जाताना त्यानं गेट कडी लावून बंद करून घेतलं...
लहानपणी त्याच जागी, बांबूच्या "बेड्या'तून वाकून मी आतबाहेर करायचो...
"काय रे, यंदा आंबेफणस आहेत की नाही?'... कोकणात गेलेल्या कोणत्याही चाकरमान्यासारखा पहिला प्रश्‍न मी घरधन्याला विचारला, आणि तो ओशाळल्यासारखं हसला...
"छे रे... परवाच्या पावसान्‌ पार वाट लावलान आंब्यांची...' तो माझ्याकडं पाहायचं टाळत म्हणाला...
मुलींनी पुन्हा एकमेकींकडे पाहिलं... मी गप्प झालो...
पण कुठेतरी दुखल्यासारखं वाटत होतं... ते, मुलींना वर्णन करून सांगितलेलं कोकण शोधून काढून मुलींना दाखवायचंच, असं मनाशी ठरवलं...
... संध्याकाळी आम्ही सगळे डोंगरावरल्या बागेत फिरायला गेलो.. तिथं कलमांना लगडलेले आंबे न्याहाळताना, मुलींच्या डोळ्यात, त्यांनी "ऐकलेलं' ते कोकण तरळतंय असा मला भास झाला आणि मी सुखावलो... काटेरी जाळ्यांमधली करवंद ओरबाडत मुली शहरीपण विसरल्या होत्या... मला खूप बरं वाटलं... एकंदरीत मुलींच्या मनात खुशी साठत होती...
...दुसऱ्या दिवशी पहाटेच त्या उठल्या, आणि बाहेर पडल्या.... पलीकडच्या गोठ्यात कुणीतरी गायीचं दूध काढत होता, आणि दुसरीकडे एक गोंडस पाडस धसमुसळेपणा करीत लुचत होतं... तो मातृसोहळा पाहताना त्या हरखून गेल्या... अचानक, गोठ्याबाहेरच्या बांबूच्या बेटात सळसळ सुरू झाली, आणि एक वेगळीच शीळ हवेत वेटोळी घालू लागली.... त्या गोठ्याबाहेर धावून भान विसरल्या होत्या...
माझ्या मनातही म्तपैकी शीळ वाजू लागली... "ते' कोकण कुठेतरी "उमटत' होतं....
'इडली, भैय्या आणि मी' याच्यापलीकडचं काहीतरी अनुभवायला मिळणार, या समाधानानं मीही हरखून गेलो होतो...
"... गावात रेल्वे आली ना, तर मी हितं ऱ्हाणार नाय... पलीकडच्या डोंगरावरल्या डागेत घर बांधून तिथं ऱ्हायला जाणार'... काही वर्षांपूर्वी याच घरधन्यानं काढलेले हे उद्‌गार आज माझ्या कानात पुन्हा घुमले... मी हळूच त्याच्याकडं बघितलं...
आपण कधीकाळी असे बोललो असू, हे आज त्याला सांगितल्यानंतरही पटलं नसतं, याची मला खात्री होती.. मी गप्पच होतो.
कोकणाच्या नव्या बदलांशी तो पुरता सामावून गेला होता.... पण तो जुना ताजेपणा आजही तितकाच टवटवीतपणे कुठेकुठे दिसत होता...
...."उद्या आपण समुद्रावर जायचं'.. मी न्याहारी करताकरताच जाहीर करून टाकलं.
"व्हर्जिन समुद्रकिनारा' मुलींना दाखवता येईल, अशी माझी खात्री झाली होती.
दुसऱ्या दिवशी, दिवसभर गावाबाहेरच्या डोंगरावरल्या आमराईत घालवून आम्ही संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर पोचलो... सोनेरी किरणांनी समुद्र नुसता चमकत होता...
नुकत्या ओसरलेल्या भरतीनं ओल्या झालेल्या वाळूत आख्खं आकाश आपलं रंगीबेरंगी रूप न्याहाळत होतं...
आणि वावभर अंतरावर स्थिरावलेल्या दमल्याशीणल्या होड्या, वाऱ्याबरोबर हेलकांडत डुलत होत्या...
ते सुंदर रूप डोळ्यात साठवताना, मुली भान हरून स्तब्ध झाल्या होत्या... आकाशातला संधिप्रकाश संपून अंधाराची चाहूल सुरू झाली, तेव्हा भानावर यूेन मी त्यांना उठवलं, आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलो...
सहज त्यांची नजर आकाशाकडे गेली, आणि एक आनंदाचा हुंकार सहज उमटून गेला...
असंख्य चांदण्यांच्या रुपेरी छटांनी आकाश न्हाऊन निघालं होतं...
सोनेरी किरणांपाठोपाठ निसर्गानं केलेली ती रुपेरी उधळण भान हरपवून टाकणारी होती...
... माझी छाती उगीचच अभिमानानं फुलून गेली... आपणंच हे सगळे चमत्कार घडवतोय, असं मला वाटू लागलं, आणि या विचारानं मी स्वतःशीच हसलो...
... लहानपणी, याच घरातल्या एका खोलीत आंब्याच्या अढ्यांनी घरात घमघमाट सुटलेला असायचा... आम्ही सकाळसंध्याकाळ आंब्यांवर ताव मारायचो... आजही एका कोपऱ्यात तोच वास दरवळत होता... एका न्याहारीसोबत अस्सल हापूसच्या चारदोन फोडी चाखून मुलींनीही कोकणातला "आंबा महोत्सव' साजरा केला होता....
ओटीवरच्या पडवीत, पेट्या भरायची लगबग सुरू होती...
त्या रात्री जेवणं उरकली, आणि आम्ही गप्पा मारायला ओटीवर बसलो...
समोरच्या, आसपासच्या घरांतले सगळेजण कोण पाव्हणे आलेत, म्हणून बघायला जमले, आणि जुन्या ओळखी पटताच, गप्पांना मस्त रंग भरत गेला...
"काही म्हणा, पण कोकणात आता पहिल्यासारखी मजा नाही राहिली बुवा...' मी खडा टाकला.
मिनिटभर सगळे शांत झाले...
"खरंय तू म्हणतोयस ते..' एकानं सुरुवात केली, आणि नव्या अर्थशास्त्रानं कोकणाचा कायापालट कसा घडवून आणलाय, याची एकामागून एक उदाहरण तो देऊ लागला...
"...पूर्वी, गावात रेल्वे नव्हती, तेव्हा आंब्याला गिऱ्हाईकच नव्हतं... रेल्वे आली, आणि हापूस आंब्यात पैसा आहे, हे आम्हाला दिसलं... तुम्ही शहरातली माणसं, पैशामागं धावता... आमी तेव्हा धावत नव्हतो.. म्हणून इथलं वेगळेपण तुम्हाला जाणवायचं... आमचं कौतुक व्हायचं... आमची कौलारू घरं, नारळापोफलीच्या बागा बघायला लोकं यायची, आणि हरवंगार कोकण बघून हरखून जायची... पण इथल्या, आंब्यात, फणसात, कोकमात, काजूत आणि जांभळा-करवंदातही कोकणाला समृद्ध करायची ताकद आहे, हे रेल्वेनं आमाला पटवून दिलं, आणि आम्ही बदललो... पूर्वी आमाला चाकरमानंकडून मनिऑर्डर यायची... आता आम्ही शहरात शिकणाऱ्या आमच्या मुलांना इथून पैसे पाठवतो... आता ओघ उलटा झालाय...' तो बोलत असताना, त्याच्या शब्दाशब्दांतला अभिमान मला स्पष्ट दिसत होता...
... मला उगीचच अपराधी वाटायला लागलं...
केवळ ते हिरवेगार डोंगर, ती गर्द रानं, सोनेरी किरणांनी न्हालेली सकाळ, पाणचुलीचा खमंग वास, कौलारू घरं, आरत्या भजनांचे सूर आणि गायीगुरांचं हंबरणं... हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळावं, म्हणून कोकणानं बदलायचंच नाही?... हा आपला अप्पलपोटेपणा आहे, असं मला वाटायला लागलं, आणि मी नकळत मान डोलावली...
"... उद्या इथे मोठ्ठा वीज प्रकल्प होणाराय... मग गावात उद्योगधंदे सुरू होतील... आमची शिकलीसवरलेली मुलं, मुंबई पुण्यातल्याच नव्हे, तर इंग्लंड अमेरिकेतल्या नोकऱ्या सोडून गावाला परत येतील.... आमच्या आंब्या काजूरोबरच, इथे कॅनिंग-टॅनिंगचे कारखाने सुरू होतील... आमचा माल परदेशात एक्‍स्पोर्ट होईल... कोकणात पाऊस भरपूर पडतो.. पण पाणी टिकत नाही... आता इथे कालवे होतील, धरणं उभी राहातील... अडलेलं हे पाणी आमच्या परसातल्या विहिरींतून फुटेल, आणि आमच्या बागा बहरतील... नवी हिरवाई इथे तुम्हाला दिसेल. तिला थओडासा व्यापारी स्पर्श असेल, पण ते घडणार आहे... तुम्हाला, शहरातून चार दिवस येणाऱ्यांना ते कदाचित मानवणार नाही, पण ते अटळ आहे...' भविष्याकडे बघत तो बोलकत होता, आणि मी भान विसरून ऐकत होतो...
कोकणाचं ते मनात साठवलेलं रूप हळूहळू धूसर होत जात होतं, आणि नवं, भविष्यातलं कोकण मनाच्या पडद्यावर आकाराला येत होतं...
मी चटकन भानावर आलो... काहीही झालं तरी ते कोकण मनाच्या पडद्यावरून पुसायचं नाही, असं ठरवलं...
तरीही, कोकणातला माणूस, धावपळ करतोय असं दृश्‍य माझ्या डोळ्यासमोर तरळत होतं... भावनांच्या बंधनात जखडलेलं कोकणातलं भूतकाळातलं ते रूप मुक्त होताना मी अनुभवत होतो... आणि भविष्याच्या एका स्वप्नात मी डोकावत होतो.
ते कोकण बघायला, आणि अनुभवायला, यापुढेही कोकणात येतच राहायचं, असं मी मनाशी ठरवून टाकलं....
-------