Wednesday, September 26, 2007

`मानव' आणि `माणूस'!

एका आईच्या कुशीत साकारला देह एक I
‘देई मजसी तो देवा’, म्हणे आत्मा एक नेक II

जाणुनिया संचिताला आत्मारामे रुकारिले I
देहामाजि येता आत्मा, तया सजीवत्व आले II

आले आत्म्याच्या मागोनि एक निरागस मन I
देहि आली संवेदना, मोहरले ते जीवन II

मानवाच्या जगी कधी जसा अंधार दाटला I
तळमळला तो आत्मा, झरा मनाचा आटला II

मन भुलले देहाला सुटे आत्म्याची संगत I
भौतिकाच्या जगातली, मना जडली रंगत II

मन देहापाशी जुळे आत्मा एकाकी पडला I
कोंडलेल्या देहामाजी, मग एकांती रडला II

शरमल्या आत्म्याने युद्ध छेडिले देहाशी I
मन गेले दूरदूर, स्वैर झुले मोहापाशी II

जर्जर तो देह अंती हात दोन्ही पसरूनी I
भीक मागतो मनाशी, घेई मज सावरूनि II

मन हासते मोकाट आत्मा जाहला उदास I
जाणुनिया देहस्थिति, म्हणे मग मानवास II

शेवटचा क्षण देहा तुझी संगत आत्म्याशी I
ठेवुनिया शस्त्र खाली, जाई शरण तयाशी II

मन आत्म्याशी सांधले आली देहाची कणव I
सारा प्रवास संपता, झाला `माणूस' मानव II

1 comment:

Anonymous said...

aha!