Saturday, September 8, 2007

सूर ( १ )

अष्टमीच्या अंधाऱ्या रात्री कारागृहात जन्मलेल्या बाळाला डोईवरल्या टोपलीत टाकून वसुदेवानं यमुना पार केली आणि गोकुळातल्या नंदाच्या राजवाड्यात यशोदेच्या झोळीत आपलं बाळ टाकून डोळे पुसत त्या बालिकेला घेऊन तो कारागृहात परतला.

...सारं काही ठरल्यासारखं पार पडताच काळोख मिटवून उगवलेल्या सूर्याच्या पहिल्या किरणांनी कारागृहाच्या झरोक्‍यातून कोठडीतल्या त्या ‘देवकीच्या बाळा’चं पहिलं दर्शन घेतलं, आणि ‘अवतारकार्य’ सुरू करण्याचा इशारा केला. त्या किरणांकडे पाहात त्या नवजात बालिकेनं पहिलं "ट्यॅऽहां' केलं... पहारेकऱ्यांना जाग आली. देवकीला बाळ झाल्याची खबर देऊन कंसाच्या गळ्यातील कंठहाराचे बक्षिस मिळविण्यासाठी राक्षस पहारेकऱ्यांची पळापळ सुरू झाली. प्रत्यक्ष आपला मृत्यूच कारागृहात अवतरल्याच्या भयावह बातमीवर मात करण्यासाठी आसुसलेल्या निर्दयी कंसाची कर्दनकाळ पावलं कारागृहाच्या दिशेनं पडू लागताच, सूर्याची ती कोवळी किरणंही स्तब्ध झाली. सगळं काही आधीच ठरलंय, आणि सगळं काही ठरल्याप्रमाणंच होणार आहे, याची खात्री असतानादेखील आकाशात दाटलेले ढग उगीचच गडगडून गेले, आणि उगवत्या सूर्यादेखत विजेची एक किनारदेखील पश्चिमेकडल्या काळ्या ढगांमधून लखलखून गेली... नुकत्याच ओसरलेल्या पावसाच्या सरींनी तरारलेला वारा शहारल्यासारखा सरसरला आणि चिडीचूप होऊन पडला... कारागृहाबाहेरच्या वाटिकेतल्या वेली थरारल्या. अंगावर नुकत्याच फुललेल्या कळ्यांवर साचलेल्या पहाटबिंदूंचा ओलावादेखील त्यांना घामेजल्यासारखा खुपू लागला... हिरवाईनं टवटवलेल्या झाडाझुडुपांची पानं पहाटवाऱ्यासोबत झोपाळ्याचा खेळ खेळताखेळताच स्तब्ध झाली आणि भेदरलेल्या पक्ष्यांचं सकाळसंगीतही थिजलं... आसपासचं जग पुढच्या क्षणाकडे डोळे लावून बसलं. मृत्यूभयानं भेदरलेल्या कंसानं लाथेनंच कारागृहाचा दरवाजा ढकलला आणि जणू याच क्षणाची वाट पाहात स्तब्ध सूर्यकिरणे न्याहाळत पहुडलेल्या त्या बालिकेला देवकीच्या कुशीतून हिसकावत विक्राळ गडगडाट केला. थिजलेलं जग पुन्हा एकदा भयचकित होऊन शहारलं आणि कंसानं त्या बालिकेला हवेत गरागरा फिरवून आपटलं... सगळं ठरल्यासारखंच होतंय, याची खात्री असतानाही, वारा पुन्हा शहारला... वेली पुन्हा थरथरल्या... पक्षी पुन्हा भाबावले आणि सोनकिरणंही फिकट झाली...

ठरल्याप्रमाणं आपलं अवतारकार्य संपवतानाच कंसाला मृत्यूभयानं हादरवणारी आकाशवाणी करीत ती नवजात बालिका अदृश्‍य झाली. वारा पुन्हा खेळू लागला... पक्षी पुन्हा गाऊ लागले आणि झाडं-वेली पुन्हा तरारल्या. अवखळ वाऱ्यानं कारागृहाबाहेरच्या वाटिकेतल्याच वेलींवरल्या फुलांचा सुगंध ओंजळीत घेत आसमंताला वाटून टाकला... रात्री अंधारात दुथडी भरून वाहणारी यमुनाही जबाबदारी पार पाडल्याच्या समाधानानं निळ्याशार संथपणे वाहू लागली. आकाशातल्या ढगांनी एक सर आनंदानं धरतीवर बरसली आणि एकमेकांवर आदळत लडिवाळ गडगडाटही केला. नवा दिवस उगवत असतानाच, एका राक्षसी युगाचा अस्त सुरू झाल्याच्या जाणीवेनं अवघं जग आश्‍वस्त झालं... याच वाऱ्यांनी हा सुगंध यमुनेपारच्या "नंदन'वनात यशोदेच्या पलंगावरल्या त्या बाळापर्यंत पोहोचवला, आणि अंगठा चोखत याच वार्तेची वाट पाहात पहुडलेल्या कान्ह्याला सूर फुटताच नंदनवन मोहरून गेलं... यशोदेला बाळ झाल्याच्या वार्तेनं अवघं गोकुळ आणखीनच बहरलं...

... कारागृहात देवकीच्या पोटी जन्मलेल्या बालिकेची क्रूर कंसानं हत्या केल्याच्या बातमीसोबतच, गोकुळात नंद यशोदेला गोजिरं बाळ झाल्याची वार्ताही गंधभरल्या वाऱ्यांनी चहूकडे पसरवली आणि आनंदसुरांचा सुंदर साज आसमंतावर सजला... ठरल्यासारखं सारं काही सुरळित पार पडल्याच्या आनंदात अवघी सृष्टी बहरून, मोहरून गेली... गोपिकांच्या गर्दीनं नंदगृह ओसंडून गेलं... आणि कृष्णजन्माच्या आनंदसुरांचा वर्षाव सुरू झाला...

... त्या दिवसापासून आजपर्यंत आपल्या जगात कृष्ण्जन्माचा सोहळा साजरा होतोय... रोज उगवणाया नव्या दिवसासोबत जगाचं रूपही नवंनवं होत गेलं. कृष्णजन्माच्या आनंदावर नव्या जगाच्या बदलत्या छटा उमटू लागल्या, आणि भक्तीच्या धसमुसळ्या, ‘प्रायोजित’ प्रदर्शनात, कृष्ण्जन्माच्या आनंदस्वप्नात बहरणारी सृष्टी कोमेजत गेली.

No comments: