Thursday, August 2, 2007

भक्तीची शक्ती...

भक्तीची शक्ती...
मुंबईच्या लोकल ट्रेनमधून सकाळ्च्या वेळी प्रवास करायचे मी टाळतो. पण त्या दिवशी नाईलाजच होता. सकाळी दहा वाजता नरीमन पॉईंटला पोहोचायचंच होतं. मी नाखुषीनंच स्टेशनवर आलो आणि गर्दीचा अंदाज घेण्यासाठी पाचदहा मिनिटं ब्रीजवरच उभा राहिलो. चर्चगेटकडे जाणारी एखादी गाडी येताना दिसली, की जिन्यावरच्या गर्दीची पळापळ व्हायची. हे मी अगोदरपण बघितलेलं होतं. पण माझ्यावर तशी वेळ येणार नाही, असं मला नेहमी वाटायचं.
त्या दिवशी मात्र मी पराभूतासारखी शरणागती पत्करली. मुंबईत राहून ट्रेनची गर्दी टाळणं म्हणजे पाण्यात राहून कोरडं राहण्याच्या गमजा मारणं होतं, हे मला त्या दिवशी उमगलं. माझी देवावर गाढ श्रद्धा वगैरे नाही. पण समोर देऊळ वगैरे दिसलंच, तर हात नकळत जोडले जातात. म्हणजे, त्या वेळी मनात अगदी भक्तीचा महापूर वगैरे असतो असंही नाही. एकदा असाच एका देवळासमोरून जाताना हात जोडले, आणि लक्ष गाभाऱ्याकडे गेलं, तर जीन्स पहेनलेल्या चारपाचजणांनी देवापुढे गुडघे टेकलेले. भक्तीच्या त्या अफाट पुरात गटांगळ्या खातानाच माझ्या मनात विचारांचं चक्र फिरायला लागलं. आजकाल मुंबईत कानाकोपर्यावर देवाचं अस्तित्व दिसतं. रस्त्याकडेला झाडाच्या एखाद्या फांदीला लटकणाऱ्या देव्हाऱ्यात साईबाबाची जुनाट मूर्ती हमखास आढळते. कुठे झाडाला ठोकलेल्या खिळ्यात गणपतीचा नाहीतर मारूतीचा फोटो लटकताना दिसतो, आणि त्याच्या शेजारीच दानपेटी नक्कीच असते. रेल्वे स्टेशनांच्या जिन्याजवळची झाडं म्हण्जे या देवांचं हमखास वस्तीस्थान. सकाळच्या गर्दीच्या वेळी या मळकटलेल्या, उदबत्तीच्या धुरानं काळवंडलेल्या देवांच्या तसबिरींसमोर फुलांचे आणि हारांचे ढीग साचतात.
पंधरा वर्षांपूर्वी मुंबईत दंगली झाल्या. बाँबस्फोटांनी मुंबईच्या धीराच्या काळजावर कायमच्या जखमा उमटवल्या. नंतर बाँबस्फोट नित्याचेच झाले. अतिवृष्टी, महापूर हेपण पाठोपाठ आले. बुजुर्गांच्या भाषेत, मरण सोपे झाले. सकाळी घराबाहेर पडणारा माणूस संध्याकाळी घरी परत आला, की दिवस साजरा झाला असं मानायचं. प्रवासात मस्तपैकी पत्ते खेळतानाच, मोबाईलवरून घरच्यांशी गप्पा मारताना अचानक बाँबस्फोट झाले, तर? अशी भीती प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलीये.
म्हणून इथे देव जागोजागी येऊन बसले.
रेल्वे स्टेशनात फलाटावर पाय ठेवायच्या आधी, जिन्याच्या पहिल्या पायरीच्या शेजारी देवांनी जागा पटकावलीये.
आपणसुद्धा, प्रवास सुरू करायच्या आधी, क्षणभर या काळवंडलेल्या तसबिरीतल्या देवांच्या समोर डोळे मिटून क्षणभर झुकतो.
या भक्तीचा कुणीतरी धंदा करीत असेल, हे माहीत असतानादेखील.
खिशातल्ल्या चिल्लरला हात घालून हाताला येईल ते नाणे दानपेटीत टाकतो,
आणि निर्धास्त होऊन फलाटावर येणाऱ्या ट्रेनकडे जिवाच्या आकांतानं झेपावतो.
चवथी जागा मिळवण्याकरीता, नाहीतर
किमान वरच्या दांडीचा हूक हाताशी येईल अशी जागा मिळावी म्हणून.
एवढं जमलं, की आपण त्या देवाचे आभार मानतो.
गाडीत चढण्याआधी केलेल्या नमस्कारामुळेच आपण सुरक्षितपणे चढलो, आणि उभं राहायला जागा मिळाली, अशी आपली खात्री झालेली असते.
दुसऱ्या दिवशी आपण घराबाहेर पडतो, पुन्हा जिन्याजवळच्या त्या कळकट तसबिरीतल्या देवापुढे हात जोडतो, आणि अंगात गर्दीचा सामना करायचं बळ घेऊन फलाटावर झेपावतो.
इथे एक लयबद्ध गती आहे. ती अशीच तयार झालीये.
आपण इथे निर्मम झालोत.
असुरक्षिततेच्या भावनेनं पछाडल्यानंतर देवापुढे नाक घासायला,
देवापुढं खिसा ओतायलापण आपल्याला काहीच वाटत नाही.
या मजबूरीनं माणसाला माणुसकी तरी शिकवलीये.
याच मजबूरीच्या भांडवलावर करीत असेल कुणी कसला धंदा.
कमावत असेल दानपेटीतली चिल्लर आणि ओतत असेल कुणा आंटीच्या गल्ल्यात संध्याकाळी
आपल्या घशाची जळजळती चटक भागवण्यासाठी..
जाड घोंगड्याआड बसून सिगारेटच्या चांदीवरच्या पावडरीचे झुरके मारण्यासाठी,
नाहीतर एखाद्या दवाखान्याबाहेर फेकून दिलेल्या सिरींजमधून मनगटावरच्या शिरेत नशा भिनवण्यासाठी.
आपण मात्र, न चुकता देवापुढे पैसे टाकून नतमस्तक होणारच असतो.
या भक्तीचा धंदा करणारे तो करोत, पण या भक्तीनंच माणसामाणसाला जवळ आणलंय.--
----- ----
...तर, त्या दिवशी जिन्यावरून धावतच मी ट्रेनच्या दरवाजाजवळची मोकळी जागा हेरली आणि गाडी फलाटावर यायच्या आत गाठायची असा निर्धार करून खाली धाव घेतली.
ठरवल्यासारखा तोच डबा, तोच दरवाजा आणि तीच जागा मिळवून मी हुश्श झालो.
बांद्रा गेल्यावर मीठीच्या पुलावरून जाताना माझ्यासकट सगळ्यांनी ब्यागा पिशव्या सावरत नमस्कारासाठी हात जोडले.
गाडी सुरक्षितपणे पार झाली.
दादरच्या फलाटावर गाडी थांबली, तेव्हा आतल्यापेक्षाही जास्त गर्दी बाहेर उभी होती. जमेल तेवढ्यांना पोटात घेऊन गाडी सुटली आणि मुंबई सेन्ट्रलनंतर हळूहळू रिती होत गेली.
चर्चगेटच्या आधीच्या स्टेशनवर समोरच्या सीटवरचा एक माणूस उठला आणि वरची बॅग खांद्याला लावून गाडी थांबायच्या आतच उडी मारून त्यानं जिना गाठला.
चर्चगेट स्टेशन समोर दिसत होतं, आणि माझ्या शेजारच्याला जाग आली.
उठून त्यानं वरची बॅग काढली आणि तो चपापला. ती त्याची नव्हती. पण अगदी त्याच्या बॅगेसारखीच होती.
आधीच्या स्टेशनावर उतरलेल्यानं त्याची बॅग नेली होती.
आता ती मिळणं जवळपास मुश्कील आहे, हे त्यालाही कळून चुकलं होतं. तरीही डब्यातल्या लोकांची सल्लामसलत सुरु झालीच.
`काही होतं का तुमच्या बैगेत?', कुणीतरी विचारलं आणि यानं पैसे, पाकीट, सर्टिफिकेटस, विमा पॉलिसी, असा सगळा तपशील सांगून टाकला.
`या बॅगेत बघा जरा, त्या माणसाचा काही पत्ता, फोन नंबर मिळतोय का?', कुणीतरी सुचवलं म्हणून त्यानं ती बॅग उपसली.
पण पैसे तर नव्हतेच, हाती आली ती कुणा बापूंची एक जीर्ण पोथी, एक तसबीर, एक कॅसेट आणि साखरफुटाण्याची एक पुडी.
`आता एवढ्यावरनं त्या माणसाचा माग कसा काढणार, गेलंच ते सगळं आता..’ निराश होत तो म्हणाला.
पलीकडच्या बाकावरून हे सगळं पाहाणारा एकजण अचानक पुढे आला आणि त्यानं त्या बॅगला हात लावून नमस्कार केला.
सगळे अचंबित होऊन बघत होते.
‘घाबरू नका. तुमच्या त्या बॅगेत तुमचा पत्ता, फोन नंबर आहे ना?' त्यानं विचारलं, आणि त्या निराश माणसानं होकारार्थी मान हलवली.
‘मग उद्या तुम्हाला तुमची बॅग परत मिळेल. फक्त ही बॅग जशीच्या तशी जपून घरी न्या.’ तो म्हणाला.
सगळेजण अविश्वासानं त्याच्याकडे बघत असतानाच तो बोलत होता.
‘हे बघा, तुमच्या त्या बॅगेत कदाचित हजारो रुपये असतील. पण त्या माणसाची बॅग मागं राहिल्यानं त्यानं जे गमावलंय, ते त्याला त्या पैशापेक्षा मोलाचं आहे. ही पोथी, ही तसबीर आणि ही कॅसेट त्याला तुमच्या पैशापेक्षा मौल्यवान आहे. तो उद्याच तुम्हाला फोन करील आणि तुमची बॅग देऊन ही बॅग घेऊन जाईल. विश्वास ठेवा माझ्यावर’ तो माणूस प्रचंड आत्मविश्वासानं बोलत होता.
चर्चगेटला गाडी थांबली, तेव्हा मी पुढं होऊन माझं कार्ड त्या बॅग हरवलेल्या माणसाच्या हातावर ठेवलं.
`उद्या खरंच असं झालं, तर मला प्लीज कळवा’ मी त्याला म्हणालो.
त्यानंही मान डोलावली.
आम्ही दोघंही एका भक्तीची कसोटी घेणार होतो.
--- --- ----

दिवशी रात्री माझा फोन वाजला.
डब्यातल्या त्या तिऱ्हाईताचा विश्वास खरा ठरला होता.
मी त्या भक्तीला नमस्कार केला.
त्या भक्तीचं भांडवल करून कुणी धंदा का करेना, माणसाला त्या भक्तीनं सन्मार्ग दाखवलाय, माणुसकी शिकवलीये, हा माझा मुद्दा मलाच पटला होता.
-----------------

2 comments:

Anonymous said...

zakaas!!!

वेदश्री said...

वाह दिनेशकाका! खुपच आवडले तुमचे हे अनुभवकथन! भक्तीची शक्ती अशीही अनुभवास येऊ शकते हे वाचून अगदी सुखद धक्काच बसला. पुलेशु (पुढील लेखनास शुभेच्छा)!