Wednesday, August 29, 2007

करूणा!!

‘संभवामि युगेयुगे’... लाख वर्षांपूर्वी कधीतरी, अर्जुनाला दिलेला हा ‘कानमंत्र’ अठरा अक्षौहिणी़मधल्या कुणीतरी ऐकला आणि केवळ ‘कानोकानी’ होऊनच आजवर घुमत राहिला. द्वापार युगापासून आजपर्यंत आम्ही निर्धास्त आहोत, ते तुझ्या या आश्वस्त ग्वाहीमुळेच! खरं तर, ‘पब्लिक मेमरी इज शॊर्ट’ हा आमच्या युगाचा मंत्र आहे. म्हणून तर आमचे आजचे मायबाप वारेमाप आश्वासने देत सुटतात, आणि जनांच्या कानापर्यंत पोहोचायच्या आधीच, ती हवेत विरूनपण जातात. जे लक्षात ठेवायला हवे, ते आम्ही विसरतो, आणि जे विसरायला हवे, ते आम्ही युगानुयुगे लक्षात ठेवून बसतो... तू कधीकाळी सांगून ठेवलंस, म्हणूनच, ‘विनाशाय च दुष्कुताम’ तू इथे अवतरणार, अशी आमची खात्री असते. म्हणूनच, जेव्हाजेव्हा, आमच्यावर ‘धर्मसंकट’ येतं, तेव्हातेव्हा आम्ही तुझ्या आगमनाकडे डोळे लावून बसतो. तूच आम्हाला संकटातून तारशील, या खात्रीनं आम्ही पामरं, तुझी पूजा बांधतो, देवळादेवळात जपजाप्य करतो, यद्न्ययाग करतो... परवा आमची निरागस मुलं हसताखेळता कुणाच्या तरी ‘दुष्क्रुता’मुळे तुझ्या दारी आली. तेव्हा त्यांच्यापैकी कुणकुणाच्या घरात, तुझी बासरीधारी तसबीर, पुराणकथांमधला तुझा तो निरागसतेचा भाव चेहेयावर घेऊनच आश्वस्त हसत होती...

कघीकाळी तू अर्जुनाला सुनावलेले ते खडे बोल, हजारो वर्षापूर्वीच कधीतरी ‘व्यासांचं उष्टं’ चिवडताना आमच्या हाती लागले, आणि आम्हीही ते कपाळी लावून ‘धर्मवाक्य’ मानले. तुझ्या त्या आश्वासनामुळेच आम्ही ते सगळंच्या सगळं ‘व्यासोच्छिष्ट’ उचलून ‘देवघरा’त दडवलं... तेव्हापासूनच आम्ही तुझ्या त्या आश्वासनाच्या भरवशावर भविष्याकडे पावलं टाकतो आहोत. ‘धर्मसंस्थापना’आधी ‘विनाशाय च दुष्क्रुताम’ अवतरणार, असंही तू त्या अर्जुनाला सांगितलं होतस. आमची स्मरणशक्ती ‘तोकडी’ असेल, तरीही ते आम्ही आज, लाखो वर्षांनंतरही विसरलेलो नाही. कारण, त्या आश्वासनामुळेच तर तू आमचा ‘देव’ झाला आहेस. नाही तर, घराघरातल्या तुझ्या त्या हसया, बासरीधारी तसबिरी आता खूप वर्षांच्या झाल्यात. उदबत्त्यांच्या धुरानं त्या काळवंडल्या पण आहेत. तुझ्या त्या ‘भगवद्गीते’ला कधीपासून गुंडाळलेलं लाल, रेशमी वस्त्रंपण आता जुनाट झालंय.

पण, तीच तुझी गीता मात्र, आमच्या युगात दिमाखानं मिरवतेय एका जागी... कारण, तिच्यावर हात ठेवून आम्ही काहीही बोललो, तरी ते ‘सत्य’ असतं. म्हणूच्नच या गीतेचा महिमा आम्हाला पटला आहे, म्हणूनच तुझ्या ‘किमये’वरचा आमचा विश्वास आणखी घट्ट झाला आहे. कधीकाळी, शिशुपालाचे ‘शंभर अपराध’ होईपर्यंत तू त्याला मोकट सोडलं होतस. आता युग बदललंय, ते आम्हाला मान्य आहे. महागाईपण वाढली आहे. ‘शंभरा’ला आजकाल फार किंमतही राहिली नाहीये. पण आता नवं काहीतरी परिमाण तू ठरवलं असशीलच. दुष्क्रुतांच्या घड्यात नव्या ‘शिशुपाला’ची किती पापं भरली पाहिजेत?

गेल्या आठवड्यात, म्हणजे, तुझ्या जगातल्या, क्शणभरापूर्वी आमची मुलं तुझ्याकडे गेली आहेत. तुझ्या छायेत तिथेतरी ती सुखरूप असावीत, असं आम्ही मानतो... आमच्या जगातल्या ‘दुष्क्रुतां’चे पुरावे अशा असंख्य निरपराध, निरगसांच्या रूपानं तुला रोजच्या रोज घरबसल्याच मिळत असतील. तुझ्या नारदाला त्यासाठी आमच्या जगात फेरफटके मारायची आता गरज राहिलेली नाही. शभराच्या जागी आता, करोडोचा हिशेब केलास, तरी, आमच्या ‘शिशुपालां’चे ‘घडे’ भरलेत, असं तुला अजूनही वाटत नाही?... तुझ्या हिशेबांचा थांग आम्हा पामरांना लागत नाही. तू येशील, तोवर आमच्या ‘मायबाप’ सरकारनं, अशा ‘शिशुपालां’साठी, ‘निषेधाचे खलिते’ लिहून तयार ठेवलेलेच आहेत...
----

Tuesday, August 28, 2007

एक दिवस...

पूर्व लाजरी
सोनेरी पहाट
फुलला दिवस
निळा प्रकाश...

भारवले ढग
विजांच्या रेषा
काळे पक्षी
जग भकास...

कुंद हवा
सरला साज
निजला दिवस
सांज उदास...

हसरा चंद्र
लखलख चांदण्या
चमचम तारे
धुंद आकाश...

Wednesday, August 22, 2007

मराठी माणूस

`मराठी माणूस', `मराठीची अस्मिता' असे शब्द आजकाल हरेक मराठी माणसाच्या तोंडावर आहेत. मराठीच्या भवितव्याची चिंता तर राज्यकर्त्यांपासून सामान्य मराठी माणसाला छळते आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेत मराठी जपण्यासाठी ५० लाखांचे (अनु)दानही दिले. मराठी जपण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा हव्यात, इ़ग्रजीचे आक्रमण थोपवावे, वगैरे चिंताग्रस्त विचारही उमटत असतात. पण मराठी माणसाचं पहिलं लक्षण कोणतं?

घरात एक मूल जन्माला आलं की थोरामोठ्यांच्या गर्दीनं भरलेलं घर खऱ्या अर्थानं भरून जातं.. प्रत्येक घरात मुलाच्या आगमनाचा आनंद अवर्णनीयच असतो... वाढतावाढता मूल आपल्या घराचे संस्कार उचलत असतं.

... घरातलं मूल खाणाखुणा ओळखून प्रतिसाद द्यायला लागतं, तेव्हा अवघ्या घराला आनंदाचं भरतं येतं. बाळाच्या प्रत्येक ‘पहिल्या कृती'चं कौतुक कसं करू, अन काय, असं प्रत्येकाला होऊन जातं... बाळ पहिल्यांदा हासलं, बाळानं खेळणं उचललं, बाळ टाळ्या वाजवायला लागलं... सगळ्याचा एक आगळा आनंद घराच्या भिंती ओलांडून ओसंडत असतो... बाळ टाळ्या वाजवायला लागलं, की घरातल्या आजी-आजोबांपासून, ते बाळाच्या मोठ्या भावंडापर्यंत सगळेच नकळत विठूनामाचा गजर सुरू करतात.... ज्या घरात हे अजूनही सहजपणे होतं, ते मराठी माणसाचं घर... तिथली माणसं इंग्लिश मिडीयममधून शिकलेली असली तरी...

खूप वर्षं झाली... आमच्या कोकणातल्या गावात आमच्या वर्गात मुंबईच्या इंग्लिश शाळेत शिकलेला एक मुलगा दाखल झाला. तेव्हा आम्हाला इंग्लिशची भीती वाटायची. लहानश्या त्या गावात, इंग्लिश जाणणारा एखाददुसराच कुणीतरी असायचा. अशा गावात, मुंबईच्या शाळेत, इंग्लिश शिकलेला मुलगा वर्गात आल्यामुळे आम्हा मुलांमध्ये त्याचा भाव एकदम वधारलेला होत. त्याच्याशी दोस्ती करण्यासाठी आमची स्पर्धा असायची... तोही, मुंबैच्या शाळेतल्या गमती सांगायचा, तेव्हा आम्ही भारावल्यासारखे कान देत असू...

आमचे गणिताचे सर त्यांच्या तासाला फळ्यावर एक गणित लिहीत, आणि वर्गातल्या एखाद्या मुलाला बोलावून ते सोडवायला सांगत. बकासुराच्या भोजनासाठी जाण्याची पाळी असलेल्या माणसासारखी आम्हा प्रत्येकाची अवस्था असायची त्या तासाला... तर, एका दिवशी सरांनी फळ्यावर गणित लिहिलं आणि या मुंबईकराला खूण केली... तो दिमाखात उठलाही... पण जागेवरून हलला नाही. सरांनी खुणेनच ‘काय’ म्हणून विचारलं, तेव्हा तो म्हणाला, ‘सर, मला हे गणित सोडवता येणार नाही. माझं इंग्लिश मीडियम होतं...’

सरांनी गणित पुसलं, आणि तो विजयी मुद्रेनं खाली बसला... आम्ही सगळेजण त्याच्याकडे पाहात होतो. सरांकडे आमचं लक्षच नव्हतं. काही वेळानं सरांनी त्याला पुन्हा उभं केलं, तेव्हा आम्ही भानावर आलो... फळ्यावर मघाच्याच गणिताचे आकडे आणि अक्शरं होती... फक्त रोमन लिपीत!... आता तो घामाघूम झाला होता. ‘नाही येत’... एवढच काहीतरी बोलून तो मटकन खाली बसला. आम्ही पुन्हा त्याच्याकडे पाहात होतो.. पण तोपर्यंत आम्हाला वाटणारी मराठीची लाज पळाली होती.

दुसरा किस्साहि असाच आठवणीत आहे. आमच्या गावात नव्यानच कॊलेज सुरु झालं होतं. कोकणात तेव्हा शिवाजी विद्यापीठ म्हणजे, ‘मराठमोळं’ विद्यापीठ होतं. आम्ही कॊलेज एन्जॊय करत होतो, अन अचानक सरकारी फतवा आला. आमचं कॊलेज मुबई विद्यापीठाला संलग्न झालं होतं. पुन्हा इंग्लिश मीडियमच्या भीतीनं आम्ही धास्तावलो. काही शिक्षकांचीही तीच अवस्था होती. पण आम्हाला चॊईस होता. ते एक बरं होतं. एका शिक्षकानं आम्हाला निवडीचा सल्ला दिला... ते म्हणाले, ‘ मी मराठी मीडियम घेऊन एम. कॊम झालोय. माझा एक मित्र इंग्लिश मीडियम घेऊन एम. कॊम झालाय. मी आज एका चांगल्या कॊलेजमध्ये लेक्चरर आहे, आणि तोही कुठेतरी लेक्चररच आहे.’... आम्हाला खूप बरं वाटलं, आणि सहाजिकच, आम्ही मराठी मीडियमचा पर्याय निवडला...

आता विचार करतो, तेव्हा वाटतं, आम्ही तेव्हा मराठी `जगवली'? का ती आमच्या पराभवच्या भीतीची प्रतिक्रिया होती? मराठी माणूस म्हणून मराठीच्या भविष्याची चिंता करताना, अशाच एखाद्या भीतीचं अनामिक ओझं तर आपण वागवत नसू ना? ते झुगारून देता येईल, असा विश्वास मराठी घरात रुजला, तर मराठमोळ्या घरांवरचं मोठ्ठं दडपण कमी होईल.

टाळ्या वाजवायला लागलेल्या बाळाच्या प्रत्येक टाळीसोबत विठूनामाचा गजर घुमायाला काय हरकत आहे?

Monday, August 20, 2007

"आई'

लोकल गाडी मिनिटभरासाठी त्या स्टेशनावर थांबली आणि ती दोघं लगबगीनं गाडीत चढली.
हातातल्या ऊबदार दुपट्यातलं तान्हुलं सांभाळत गर्दीतून वाट काढत ती आत आली आणि भराभरा सीटवरच्या प्रवाशांना सरकायला सांगत स्वतःसाठी जागा करून घेत हातातलं तान्हुलं तिनं अलगद मांडीवर ठेवलं...
पुढच्याच स्टेशनवर शेजारचीच एक जागा रिकामी होताच, दरवाजाशीच लोंबकळणाऱ्या नवऱ्यालाही तिनं बोलावलं, आणि स्थिरावल्याचं समाधान दोघांच्याही चेहेऱ्यावर उमटलं. हलक्‍या हातांनी तिनं बाळाच्या अंगावरची दुलई सारखी केली, आणि बाळाच्या गालावरून मऊशार हात फिरवून ती नवऱ्याकडं पाहात मंद हसली.
नवराही बाळाकडे कौतुकानं पाहात होता. नुकताच बहुधा डिस्चार्ज मिळाला होता तिला. हातातल्या पिशवीतलं दुपटी, थर्मास, आणि असंच काहीसं सामान सावरत नवरा तिच्याकडे पाहून हसला, आणि पुन्हा तिच्या चेहेऱ्यावर हासू फुटलं... त्या हसण्यातून फुलणारा मातृत्वाचा आनंद गाडीतल्या त्या एवढ्याश्‍या डब्यात मावत नव्हता. झोपलेल्या बाळाचा मुखडा न्याहाळणाऱ्या तिच्या मजरेत अपार मायेचा महापूर लोटला होता... हास्यातून मातृत्वाच्या कृतकृत्यतेचा आनंद भरभरून ओसंडत होता...आसपासच्या जगावरही आपला हा अवर्णनीय आनंद उधळून टाकावा, अशा हसऱ्या नजरेनं आजूबाजूला पाहाणारी तिची नजर पुन्हापुन्हा मांडीवरल्या तान्ह्यावर स्थिरावत होती... आपल्या या तान्ह्याला, "कुठे ठेवू अन कुठे नको',असं तिला झालं असावं, हे तिच्या देहबोलीतूनच जाणवत होतं.
..."गगनात न मावणारा आनंद' कसा असतो, त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण मी समोरच्या बाकावरून अनुभवत, न्याहाळत होतो, आणि या आनंदाच्या क्षणाला अवघ्या जगानं भागीदार व्हावं, असं तिला वाटत होतं... जन्माला आल्यानंतर पहिलाच लोकल प्रवास करणारं मांडीवरच ते इवलं तान्हंही, शांतपणे आईच्या कुशीत विसावलं होतं. त्या प्रवासात अगदी सहजतेने साजऱ्या होणाऱ्या एका स्वर्गीय मातृसोहळ्याचा मी साक्षादार झालो होतो...
पुढच्या एका स्टेशनवर पुन्हा मिनिटभरासाठी गाडी थांबली, आणि गर्दी थोडीशी ओसरून गेली. आता डबा काहीसा ऐसपैस झाला होता... नवऱ्याच्या आधारानं ती बाकावर सावरून बसली, आणि त्या चिमुकल्यासाठी हाताचा झोका करू लागली.
आईच्या आश्‍वस्त आधाराखेरीज कशाचीही जाणीव नसलेलं ते बाळ मात्र शांत झोपलेलंच होतं आणि एका अपार मातृत्वाला उधाण आलं होतं...
मातृत्वाची माया उधळण्यासाठी ती "आई' आतुर झाली होती...
गाडी पुन्हा सुरू झाली, तेवढ्यात केस अस्ताव्यस्त विस्कटलेल्या, मळकट कपड्यांतल्या दोन लहानग्यांनी पळतपळतच येऊन डबा पकडला, आणि खिडकीतनं सहज बाहेर नजर लावलेल्या त्या आईच्या उरात बहुधा कालवाकालव झाली.. नकळतच आपल्या बाळाला उराशी घट्ट पकडत तिनं क्षणभरासाठी डोळे मिटून घेतले आणि विपरीताच्या खुणा सभोवती नसल्याची खात्री होताच मंदपणे डोळे उघडून ती बाहेर बघू लागली.
त्या दोघीजणी एव्हाना डब्याच्या दरवाज्याशी उभ्या होत्या. ‘आई’च्या डोळ्यातली भीतीची छटा पुसली गेली होती, आणि पुन्हा तेच मायेचं हास्य चेहेऱ्यावर फुललं होतं...
त्या दोघींमधल्या "मोठी'नं हातातल्या दगडाच्या खापऱ्या सावरत कसलासा विचित्र "ताल' धरला, अनं हिच्या डोळ्यात पुन्हा कारुण्य उतरलं.
‘....बचपन के दिन ये, घडी खेलने की...' ती ‘मोठी' आपल्या हातातल्या खापऱ्या एकमेकांवर बडवत अर्ध्यामुर्ध्या शब्दांच्या साथीनं काहीतरी गुणगुणत होती, आणि ‘छोटी'नं डब्यातल्या एकाच्या पायावर लोटांगण घातलं होतं... भीक मागण्यासाठी लहानपणीच‘कमावलेल्या' केविलवाण्या नजरेनं, तोंडाकडे हात नेत आणि मधूनच पोटावर हात फिरवत ती करुणा भाकत होती.
काहीशा अवघडलेल्या त्या प्रवाशानं पटकन खिशात हात घालून रुपयाचं नाणं त्या "छोटी'च्या हातावर ठेवलं, आणि तिच्या चेहेऱ्यावर आनंदाच्या असंख्य छटा उमटल्या... हातातलं नाणं न्याहाळत बराच वेळ ती तशीच उभी होती, आणि समोरची ‘आई' स्वमग्न होऊन तिच्या चेहेऱ्यावरचा आनंद न्याहाळत होती...
अचानक ‘मोठी'च्या हातातल्या खापऱ्यांचा नाद थांबला, आणि एका हातानं ‘छोटी'च्या झिंज्या धरून तिनं छोटीला भानावर आणलं... हातातलं नाणं मोठीच्या हातात देत ‘छोटी'नं पुढच्या प्रवाशाचे पाय धरले... आता ही ‘आई' आणखीनच करुण झाली होती. चटकन तिनं पिशवीत हात घालून एक छोटीशी कापडी पर्स काढली, आणि हाताला येतील तितकी नाणी "छोटी'च्या हातात कोंबली. नवरा आपल्याकडे अचंब्यानं बघतोय, आणि त्याच्या नजरेत काहीसा रागही मिसळलाय, याचं तिला तिळाइतकंही भान नव्हतं... क्षणात त्या छोटीनं त्या आईचे पाय धरले, आणि पायावर डोकं ठेवून ती तशीच बसून राहिली. मघाशी रुपयाच्या नाण्याकडे पाहाताना भीक मागायचं विसरलेली ती छोटी, आता हातातल्या पैशांकडेही पाहात नव्हती... बाजूला उभ्या असलेल्या मोठीच्या हातातला ‘ताल'देखील काहीसा मंदावला होता, आणि बेसुऱ्या आवाजातलं ते गाणं संथसंथ झालं होतं...
मांडीवरल्या बाळाकडे भरभरून पाहात त्या ‘आई'नं एका हातानं छोटीला उठवलं, आणि आपलं हास्य तिच्या नजरेत मिसळून उधळू लागली... ती छोटीही, एव्हाना धीटावली होती... अचानक ती त्या बाळाच्या आईला बिलगली... हातातली चारपाच नाणी बाकड्यावर टाकून तिचे चिमुकले हात बाळाच्या अंगावरल्या मऊशार दुलईवरून फिरत होते. बराच वेळ भान विसरल्यागत ती बाळाच्या दुलईवरून हात फिरवत राहिली, आणि ‘आई' एकदम दचकली. बाळाला मांडीवरून उचलून तिनं खांद्याशी घट्ट धरलं. छोटीकडे पाहातानाच्या तिच्या नजरेतला आईचा ओलावा मात्र तिळाइतकाही कमी दिसत नव्हता... छोटीचा हात एकदम थबकला, आणि तिनं त्या आईकडे पाहिलं. तिच्या चेहेऱ्यावरलं हासू पाहून ती सावरली, आणि तिचा हात पुन्हा पुढं झाला... ही ‘आई' अजूनही स्वप्नाळू नजरेनं छोटीकडे पाहात होती. कापडी पिशवीतलं सामान सावरत नुकताच बाप झालेला तो पोरसवदा तरुण एकदा छोटीकडे आणि एकदा बायकोकडे पाहात आजूबाजूच्या प्रवाशांच्या नजरांचाही वेध घेत होता... कुठल्यातरी झोपडपट्टीतलं आपलं घर नव्याच्या स्वागतासाठी सजवण्याची हौस त्याच्या नजरेतही उमटली होती... ‘आई'च्या अंगावरचा नवा कोरा, रस्त्याकडेच्या फुटपाथवरल्या कुठल्याशा दुकानातून घेतलेल्या नव्या, रंगीबेरंगी टिकल्यांची ‘एम्ब्रॉयडरी' काढलेला लाल रंगाचा पंजाबी ड्रेस त्याच्या हौशीची साक्ष देत होता. ‘छोटी'चे चिमुकले हातही त्या ‘ड्रेस'वरून हळुवारपणे फिरत होते... आणि ती ‘आई', शांत नजरेनं छोटीकडे पाहात तिची नव्या कपड्यावरून हात फिरवायची इच्छा मनसोक्तपणे पूर्ण करीत होती... नजरेतली माया अव्यक्तपणे उधळत होती.
एकेक स्टेशन पार करत गाडी धावतच होती, आणि अचानक ‘तो' उठला. हातातली पिशवी सावरत त्यानं तिलाही उठण्याची खूण केली, आणि बाळाला खांद्याशी घट्ट पकडत जडपणे ती उठली... अंगावरल्या नव्या ड्रेसवरली एम्ब्रॉयडरी कुरवाळत भान विसरलेले छोटीचे हात तिनं हळुवारपणे बाजूला केले, आणि पुन्हा आपलं आईभरलं हास्य तिनं छोटीवर उधळलं....
स्टेशनवर गाडी थांबली, आणि ती मागंमागं पाहातच खाली उतरली.
फलाटावर उतरली, तेव्हा ती आपलाच ड्रेस कुरवाळत होती... ‘छोटी'च्या हाताचा हळुवारपणा मनात साठवत होती... सहजपणे घडलेल्या, एका ‘आई'च्या दर्शनानं माझं मन तृप्त झालं होतं.
गाडीत उधळल्या गेलेल्या मातृत्वाच्या मागी राहिलेल्या सुगंधानं मी भारावून गेलो होतो...
खिशात हात घालून मीही एक नाणं छोटीच्या चिमुकल्या हातावर ठेवलं, आणि पुढच्या स्टेशनावर उतरायच्या तयारीनं सावरून बसलो.
डब्यातली तुरळक गर्दी मात्र नेहेमीसारखीच ‘तटस्थ’ दिसत होती...

आमच्या "शहरी' श्रावणखुणा!!

आमच्या "शहरी' श्रावणखुणा!!

'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनि ऊन पडे'
..."श्रावणा'च्या कवितेतल्या या ओळी सहजपणे आठवाव्यात, असा श्रावण सध्या इथेही, आमच्या शहरातही बरसतोय. पहाटेच्या निळ्याशार आकाशातल्या पूर्वेला तांबडं फुटत असतानाच अचानक माथ्यावरच्या आकाशावरला एखादा काळा ढग हातपाय पसरायला लागतो आणि बघताबघता चारी दिशा कवेत घेतो. पूर्वेची लाली पार काळवंडून जाते, आणि पहाटस्वप्नातून जागे हाऊन किलबिल करणाऱ्या चिमण्यापाखरांची पळापळ सुरू होते. सिमेंटच्या जंगलातल्या एखाद्या कोपऱ्याला पत्र्याच्या आडोशाखाली काडीकाडी जमवून बांधलेल्या घरातून बाहेर पडून आताआत्ता घुमायला लागलेली जंगली कबुतरं भेदरल्यागत फडफड करत बसतात, आणि बिल्डिंगच्या आडोश्‍याला विसावून मिटल्या डोळ्यांनी आकाशाकडे माना लावून बसतात. पिवल्या फुलांचा बहर ओसरलेल्या बाहव्याच्या एखाद्या फांदीवरच्या एखाद्या विस्कटलेल्या, अस्ताव्यस्त दिसणाऱ्या घरट्यातली कावळ्याची पिल्लं उगीचच कलकलाट करायला लागतात, आणि चहूबाजूंनी कावळ्यांचा एकच कल्ला सुरू होतो. बिचाऱ्या चिमण्या त्या कलकलाटातच कुठेतरी हरवून गेल्यासारख्या चिडीचिप होऊन पाऊस झेलायच्या तयारीत पंख फुगवून बदामाच्या झाडावरल्या एखाद्या रुंद पानाखाली आसरा घेऊन दडी मारतात, आणि काळवंडलेलं आकाश एकदम ओथंबल्यागत होऊन सरसरा जमिनीवर बरसायला लागतं... एक सणसणीत सर मिनिटभरासाठी कोसळते आणि घराघरातला पंख्याचा वेग काहीसा मंदावतो... दमट, घामेजलेल्या हवेला एक थंडशी शिरशिरी येते आणि जराकुठे गारगार वाटायला लागतंय, तोवर ती सर गडप होऊन पुन्हा उन्हाचे कवडसे घराच्या खिडक्‍यांमधून आत दाखल होतात. पुन्हा तोच घामट उकाडा सुरू होतो, आणि पंख्यांच्या वेग वाढतो... श्रावणसरींचं सुख अनुभवू म्हणताम्हणता त्या सरीच गायब होऊन जातात, आणि झाडाच्या पानांआड, पत्र्याच्या आडोशाने आणि काटक्‍यांच्या घरट्यात घाबरून बसलेली तमाम पाखरं पुन्हा पंख पसरून बाहेर पडतात. क्षणभराच्या काळोखीनं केलेली फजिती लपविण्यासाठी, जणू काहीच झालंच नाही, अशा थाटात पुन्हा चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होतो. आपल्या कोवळ्या पिल्लांवर डाफरल्यागत आवाज काढत कावळीही पुन्हा पंख पसरते, आणि मानेभोवती चोची खुपसून उगीचच साफसफाई केल्याच्या ढोंगात कबुतरं बुडून जातात. एखादं कबुतर मस्तपैकी गिरकी मारून पुन्हा येऊन विसावतं आणि घुमतघुमत, सारंकाही "आलबेल' असल्याचा इशारा देतं... मग अवघी फौज आकाशात भरारी मारायला पंख पसरते... एक काळा ढगच जणू एखाद्या इमारतीच्या भिंतीआडून आकाशाकडे झेपावतो...

महिन्याभरापूर्वीच्या पावसानं गॅलरीतल्या कुंड्यांमधल्या रोपट्यांना चांगले कोंब फुटलेले असतात. त्यामुळे, सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा कुंड्यांना पाणी घालायचं घरधनीणीचं एक काम कमी झालेलं असतं. श्रावण सुरू झाल्यापासून कोसळणाऱ्या अशा अवचित सरी मात्र, कुंडीतल्या या रोपट्यांना हुलकावणी देऊनच गायब होतात, आणि पावसाचे चुकार तुषार अंगावर झेलण्यासाठी आतुर झालेली ती कुंडीतली रोपटी, हिरमुसली झाल्यागत कोमेजली होतात. त्यातच, उन्हाचे सपकारे आणखी भर घालतात, आणि पावसाळ्याच्या हिरवाईचा तजेला अंगावर असतानाही, बाथरूमच्या नळाचं, प्लास्टिकच्या "मगा'तून खिडकीबाहेर आलेल्या हातानं ओतलेलं पाणी पिऊन बिचाऱ्यांना पुन्हा तरारावं लागतं. दोनचार दिवसांपासून फुलूफुलू म्हणणारी एखादी कळीदेखील या तरतरीबरोबरच हळूच उमलून जाते, आणि "निसर्ग' बहरल्याच्या आनंदानं घरधन्याला उकळ्या फुटतात. श्रावण-श्रावण म्हणतात, तो हाच असला पाहिजे, असं समजत, चहाचा वाफाळलेला कप हातात धरून, सिगरेटचे मस्त झुरके मारत, आणि वर्तमानपत्राच्या बातम्यांचे मथळे न्याहाळत खिडकीच्या चौकटीतून फ्लॅटबाहेरच्या दहा बाय बाराच्या मोकळ्या जागेवर माळ्यानं केलेल्या बगीच्याचा तुकडा मनात साठवत तोही लहानपणीच्या आठवणीत दंग होऊन जातो. खिडकीच्या "फ्रेम'मधून दिसणारं हे हिरवाईभरलं रूपदेखील त्याला आपलंआपलंसंस वाटू लागतं, आणि "निसर्ग-निसर्ग' म्हणतात, तोही हाच असला पाहिजे, याची त्याला खात्री पटते. घरासमोरच्या बागेतल्या कृत्रिम हिरवळीतच तो "नैसर्गिक निसर्गा'चा अनुभव धुंडाळत राहातो, आणि बघताबघता त्यातच रमूनदेखील जातो...

शहरातल्या श्रावणछटांमध्येही निसर्ग शोधताना त्याच्या मनालाही अभिमानाचे धुमारे फुटू लागतात... आपल्या इथे बहरलेल्या या निसर्गालाही सौंदर्याची छटा आहेच, या अभिमानाने त्याचा ऊर भरून जातो, आणि त्यात रमणाऱ्या या निसर्गवेड्याला आपल्या घराभोवतीच्या हिरवाईचं प्रचंड अप्रूप वाटू लागतं... इथंही श्रावण सुरू झाला, की पक्षी किलबिल करतातच... "हॉल'च्या खिडकीबाहेर कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या दोऱ्यांवर पावसाचे थेंब पडून कपड्यांवर काळे डाग पडू नयेत, म्हणून वर तयार केलेल्या पत्र्याच्या टीचभर छपरावर पावसाचा तडतडाट होतो, तेव्हाही, पावसाचा "ताशा' वाजल्याचा अनुभव घेत सुखावूनही जातो... घराबाहेरच्या कुंडीतल्या सदाफुलीच्या एखाद्या रोपट्याची कळी खुलली, आणि तिच्या सदाबहार फुलावर या पावसाचे चारदोन चुकार थेंब विसावले, तरी त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. आणि घरासमोरच्या "कंपाऊंड वॉल'शी लगट करणाऱ्या गुलमोहर, बाहवा आणि बदामाच्या झाडांच्या वेगवेगळ्या हिरव्या छटांमधून याचा श्रावण खुणावू लागतो... हिरवाईच्या या वेगवेगळ्या छटा त्याचं मन तृप्ततृप्त करून सोडतात, आणि त्या धुंदीतच हातातला चहा कप रिता करून "शॉवर'खाली उभा राहून एखादं आवडतं गाणं गुणगुणत, तो "न्हाऊन' निघतो... आपल्या समोरच्या निसर्गाच्या सौंदर्याकडे पाठ फिरवून आपण उगीचच कधीकाळी अनुभवलेल्या श्रावणाच्या आठवणीत रमलो, या जाणीवेनं त्याचं मन खंतावतं, आणि शॉवरच्या धारांना भिजलेले डोक्‍यावरचे ओले केस खसाखसा पुसतानाच, त्या जुन्या आठवणीही मनाच्या कप्प्यात बंद करायला तो धडपडू लागतो. आपण आता "इथले' झालो आहोत, याचं त्याला भान येतं आणि तो घराबाहेर पडतो...

संध्याकाळी ऑफिसमधून घरी यायच्या आधी चार क्षण निवांतपणे घालवावेत, म्हणून त्याची पावलं जुहूच्या समुद्राकडे वळतात, आणि वाळूत पहिला पाय टाकताच, वाऱ्याबरोबर वाहात आलेल्या एका प्लास्टिकच्या पिशवीचा पायाला विळखा पडतो... अथांग पसरलेल्या गर्दीतून समुद्राची एखादी, कोवळी, अस्पर्श, अवखळ लाट आपल्यापर्यंत येईल आणि पायाशी लडिवाळपणे घोळवत जुन्या, लहानपणीच्या ओळखीचं हसेल, म्हणून उगीचच तो गर्दीतून वाट काढत लाटांपर्यंत पोहोचायचा एक प्रयत्न करूनही पाहातो. पण फेरीवाले, आणि चटयांवर बसून भेळपुरी चापणाऱ्यांच्या "पर्यटनाच्या आनंदा'वर आपले "विरजण' नको, असा साळसूद विचार करत रस्त्याकडेच्या सिमेंटच्या बांधावरच टेकतो. समुद्राची ती लहानपणी कधी ऐकलेली निवांत गाज कानात साठवण्यासाठी याचे कान पुन्हा एकदा त्या दिशेला लागतात, पण नंतर तो हट्ट सोडून पश्‍चिमेला मावळणाऱ्या सूर्यबिंबाकडे टक लावून बसून राहातो...

... समुद्ररेषा आकाशाला भिडते, तिथवर नजर लावून कितीतरी वेळ बसलेला तो आता फक्त वर्तमानातच जगत असतो... सवयीनंच कधीतरी त्याला सांजवेळेची चाहूल लागते, आणि रस्त्यावर उजळलेल्या दिव्यांमुळे, रात्र झाल्याची जाणीव होऊन तो उठू लागतो... मानेभोवतीचा घाम हातातल्या रुमालानं खसाखसा पुसत तो बससाठी स्टॉपकडे वळतो, तेव्हा पुन्हा एक अशीच श्रावणसर अंगावरून सरसरून पुढे सरकते आणि आळसावलेलं त्याचं मन ताजंतवानं होतं... आता अंधार पडला असेल, म्हणून तो लहानपणीच्या सवयीनं आकाशाकडे पाहातो. आकाशातलं चमचमतं तारकादळ न्याहाळावं, चारदोन तरी चांदण्या मोजाव्यात म्हणून तो आकाश शोधू लागतो, पण आपण आता "इथले' आहोत, याची जाणीव होऊन तो पुन्हा रस्त्याकडे पाहात चालू लागतो. रात्रीच्या वेळी कधीतरी इथली वीज गेली, म्हणजे इथेदेखील चांदण्या मोजता येतील आणि जमिनीवर ओसंडणारं चांदणंही अनुभवता येईल, अशी मनाची समजूत काढत तो घर गाठतो... सकाळी कपड्यावर मारलेल्या कुठल्यातरी "इम्पोर्टेड स्प्रे'मध्ये आता घामाचा दर्पही मिसळलेला असतो.

... इतका घाम येऊनही, "स्प्रे'च्या खाणाखुणा अजूनही आहेत, या समाधानातच तो कपडे हॅंगरला अडकवतो, आणि तडक शॉवरखाली जाऊन न्हाऊन निघत "ताजातवाना' होतो....

Thursday, August 16, 2007

अद्भुत ‘मातृसोहळा’!!


अंधार पडायच्या आधीच आसपास असंख्य पाखरांच्या किलबिलीचं संगीत सुरु होतं आणि एखाद्या कोंबड्याची बांग त्यात ‘र्‍हिदम’ पेरते... गोठ्यातल्या गायि-म्हशीचं लांबलचक हंबरणं आणि घराच्या पडवीतला पाडसाचा प्रतिसाद आतुरतेचे सूर आळवतात... रेडिओवरची ‘मंगलप्रभात’ पहाटेचं वातावरण पवित्र करते आणि या भारावलेपणातच आपण अंथरुणावरून उठून बाहेर पडतो.. जांभ्या दगडांच्या ओबडधोबड तुकड्यांनी बांधलेल्या ‘गडग्यां’च्या मधल्या रस्त्यावरून चालताना, बांबूच्या बेड्यापलीकडल्या एखाड्या दुपाखी कौलारू घरातली जागती चाहूल सकाळ झाल्याची जाणीव करून देत असते... ... आणि एका ‘जादू’चा अनुभव सुरू होतो... मागल्या दारीच्या अंगणात्ल्या ‘पाणचुली’वर उकळणार्‍या पाण्याचा खमंग वास परमळत असतो... दुधाच्या कासंड्या घेऊन ‘वाड्या’कडे ये-जा करणार्या घरधन्याच्या हालचाली टिपताना पडवीतल्या पाडसाची धडपड वाढत जाते... गोठ्याकडून येणार्‍या प्रत्येक हंबरण्याबरोबर कान टवकारणारी पाडसं टपोर्‍या डोळ्यांनी मालकाची लगबग टिपत अस्वस्थ होतात, आणि ‘दावं’ सुटताच, वाकड्यातिकड्या उड्या मारत आईच्या ओढीनं गोठ्याकडे धाव घेतात...

.... मग सुरु होतो, एक अद्भुत ‘मातृसोहळा’!!

... कोवळी, सोनेरी उन्हं कौलारू घरांवर आणि केंबळी वाड्यांवर पसरतात आणि कोकणातलं ते खेडं जागं होतं... रात्रीच्या ‘पसार्‍या'ला गेलेली जनावरं टम्म फुगल्या पोटांचा जडपणा सावरत समाधानानं गोठ्याकडं परतत असतात... कमरेच्या कोयंड्याला कोयता अडकवून हिरव्या चारीचा भारा रानातून आणण्यासाठी बापये गडी तयार होत असतात आणि वाफाळलेला भात अन कुळदाच्या पिठीची गरमगरम न्ह्यारी स्वैपाक्घरात रटरटायला लागते... मागल्या पडवीवर पत्रावळी लावल्या जातात आणि परसभरात सगळीकडे कुळदाचा खमंग वास दरवळतो... विहीरीवरच्या रहाटाचे एकसुरी फेरेही एव्हाना सुरू झालेले असतात. कामावरची ‘बायामाणसं’ ‘चा’ पिऊन, ‘कोप’ धुवून परड्यातल्या फोपळींना पाणी ‘दाखवाला’ दाखल होतात आणि न्याहरी आटपून एक जथ्था रानाकडे रवाना होतो... इकडे लख्ख सारवलेल्या अंगणाचे केरवारे सुरू होतात, कुठे घरतल्या सारवणाची तयारी सुरू होते, कुणी सारवण झालेल्या अंगणात रांगोळी घालू लागते. देवघरातल्या घंटेचा किणकिणाट सकाळची प्रसन्नता आणकीनच खुलवतो...

उन्हं चढत जातात... पहाटे संगीत पेरणारा पाखरांचा कलकलाट मंदमंद होत कानाआड जातो आणि कोकणातलं ते अवघं गाव कामाधंद्याला लागतं... खाडीकिनारी तालुक्याला जाणार्‍याची गर्दी सुरू होते आणि तरीतून पलिकडे जाण्यासाठी नंबर लागतात... पलीकडची एस्टी भरते आणि त्याच किनार्‍याला ‘तर’ विसावते. गर्दी ओसरते आणि खाडीचे मंद, संथ पाणी विश्रांती घ्यायला लागते... सकाळपासून ताजीतवानी झालेली काठावरची माडंझाडं एकएक करून खाडीच्या आरश्यात स्वत:चं रूप न्याहाळत वार्‍याबरोबर डुलायला लागतात... बाजूच्या वेळूच्या बनाची सळसळ सुरू होते आणि त्या ‘आनंदसणा’त आंब्ये-फणसपण सामील होतात... पहाटेची तीच टवटवी, उन्हं डोक्यावर आली, तरी तशीच ताजीताजी असते... दुपारी जेवणं आटपली, की सगळीकडे चारदोन तासांची निजानीज होते, आणि गाव थोडासा सुस्तावतो... संध्याकाळी, तिन्हिसांजेला पुन्हा पहाटेचे सूर गावात घुमायला लागतात... रात्री मिणमिणत्या विजेत कुठे भजनं रंगतात, घराघरात देवाधर्माचे विधी सुरू होतात, चंदन-धुपाचा गंध अवघा गाव व्यापून ताकतो, ... आणि, काही वेळात, निजानीजही होते... पुन्हा गाव शांतशांत होऊन पहुडतो...

कोकणातल्या कुठल्याही गावात आजही हेच चित्र दिसतं म्हणूनच, कोकण ही आजही एक ‘अपूर्वाई’ आहे... सकाळी दरवज्याला भैयानं लटकावलेल्या ‘पिशवीच्या दुधा’चा वाफाळलेला कप तोंडला लावताना ‘कार्टून नेट्वर्क’वरचा स्कूबी शो बघणर्‍या मुलांसाठी, कोकणातलं खेडं हा एक जिवंत चमत्कार आहे. चारदोन दिवसाची सुट्टी घ्यावी आणि कोकणातल्या कुठल्यातरी गावी मुक्काम ठोकावा... तरीतून खाडी पार करण्याचा आणि बैलगाडीच्या सफरीचा आनंद काय असतो, गायीची ‘पाडी’, ‘लुचते’ कशी, आपण पिशवीतून पाहातो, ते दूध कोण देतं, ते काढतात कसं, मार्केटातल्या भैय्याच्या टोपलीतली हिरवीकंच भाजी कुठल्या झाडांना लागते, झाडावर लटकताना ती कशी दिसते, आंब्या-फणसाची झाडं कशी असतात, काजू कसा भाजावा, कसा फोडावा आणि कसा खावा... फणसाचे गरे कसे ‘गट्टम’ करावेत आणि आख्खा हापूस कसा चोखावा, शेत कसं नांगरावं, अनवाणी पायांनी डोंगरकपारी कशा तुडवाव्यात... सगळंसगळं, ‘याचि देहि’ अनुभवण्यासाठी, कोकणाला पर्याय नाही.... कोकण हे सगळ्या अनोख्या, आणि अनेक अननभूत आनंदाचं उत्तर आहे...

टीव्हीवरच्या एखाद्या कार्यक्रमात पाहिलेली अन ऐक्लेली समुद्राची निवांत गाज अनुभवायची असेल, तर कोकणाचा किनाराच गाठायला हवा.. रात्रीच्या वेळी, झाडाझुडुपांच्या गर्दीतून वाट काढत जामिनीवर सांडणारं चांदणं पाहायचं असेल, तरीदेखील कोकणालाच पसंती द्यावी, आणि आकाशातला चांदण्याचा पसारा मोजायचा असेल, तरी, कोकणच खरं...

आजकाल कोकणाचा कायापालट होतोय... निसर्गानं भरभरून दिलेलं हे दान, जगानं अनुभवावं, आणि जागाच्या समाधानासोबत आपल्या गाठीशी थोडी ‘माया’ही गोळा व्हावी,असा ‘व्यवहारी’ विचार आजकाल कोकणात सुरू झालाय. आता पहिल्यासारखं कुणाच्याही घरातला गुळपाण्याचा पाहुणचार कदाचित आपल्या वाट्याला येणार नाही. बाहेरच्या, पडवीवरच्या दुकानातलीच एखादी ‘बिस्लेरी’ विकत घेऊन आपल्याला तहान भागवावी लागेल... पाहुणचारासाठी पैसे मोजावे लागतील... कारण आता पाहुणचाराला व्यवसायाची आणि व्यवहाराची जोड मिळाली आहे... कोकणाचा कॆलिफोर्निया करायचं एक स्वप्नं कित्येक व्र्षांपासून कोकणानं उराशी जपलं होतं... आता कॆलिफोर्नियाचा अर्थ कोकणाला उमगलाय... कोकणात नुस्ताच कॆलिफोर्नियाच नव्हे, नंदनवन फुलवण्याचं एक स्वप्न साकारतंय...

कोकण आपली वाट पाहातय... येवा... कोकण आपलंच आसा!

Wednesday, August 15, 2007

तुम्हाला काय वाटतं?

...‘डेथली हॆलोज’ला जगभरातून मिळालेल्या अपेक्षित अशाच अभूतपूर्व प्रतिसादानंतर जे. के. रोलिंग यांनी लेखणी खाली ठेवली असली तरी फॆन्ट्सीच्या अद्भुतरम्य जगात रममाण होणाया बालविश्वावर हॆरी पॊटरच्या सातही आवृत्त्यांचे गारुड यापुढेही अनेक वर्षे कायम राहणार आहे. ‘हॆरी पॊटर’ हा साहित्याविश्वातला एक चमत्कार आहेच, आणि आजचे गतिमान ग्लोबलायझेशन आणि मार्केटिंगची जादू यांमुळेच हा चमत्कार साध्य झाला आहे. जग चारपाच दशकांपूर्वी आजच्यासारखे जवळ आले असते, तर ?....

तर त्या वेळी मराठी बालविश्वाला आपल्या जादूई करामतींनी भारावून टाकणाया ‘बनेश फेणे’ नावाच्या फुरसुंगीच्या ‘फास्टर’नेही मराठीच्या सीमेपारचे बालविश्व झपाटून टाकले असते... भा. रा. भागवत नावाच्या लेखकाच्या भन्नाट मेंदूतून जन्माला आलेला हा बनेश फेणे, म्हणजे ‘फास्टर फेणे’ ऊर्फ ‘फा-फे’, पुढे मुलांबरोबरच त्यांच्या आईवडिलांचाही हिरो झाला. आज पॊटरच्या जादूने मुलांच्या जगाला वेड लावलंय, तसं वेड तेव्हा ‘फा-फे’नं मराठी घराघरात लावलं होतं. साहित्याच्या विश्वसंचाराचे आजचे दिवस साठाच्या दशकातच उजाडले असते, मराठमोळ्या घरांच्या सीमा ओलांडून बाहेर पडायचे मार्ग तेव्हा सापडले असते, तर, कदाचित फुरसुंगीचा हा फा-फे देशाच्या सीमेपलीकडेही पराक्रम गाजवून आला असता...

बालविश्वात ‘फॆण्टसी’ला असलेलं स्थान ओळखून जगभरातल्या करमणूक अणि साहित्यक्षेत्रानं गेल्या काही वर्षात या विश्वाला पोषक अशी निर्मिती करायला सुरुवात केली. पण अशा अदभूताच्या दुनियेला साहित्यविश्वात आपल्याकडेही अगदी पुराणकाळापासून मानाचं स्थान होतं. इंग्रजी भाषांमधल्या ‘कॊमिक्स’चा मराठमोळ्या घरातही सहज संचार सुरू झाला आणि या कल्पना चित्रमय रूपात मराठी बालकांसमोर साकारू लागल्या. भारतात ‘इंद्रजाल कॊमिक्स’, ‘अमर चित्रकथा’ यांच्या सोबतच ‘चांदोबा’ची वेगबेगळी रूपे घरोघर दिसू लागली. इसापच्या कथा आणि सिंदबादच्या सफरींनीही बालकांना वेड लावलं. पण, काळानं त्यांच्या भराऱ्यांना लगाम घातला. नंतर मात्र, अमेरिकेत जन्माला आलेला हॆरी जसा मराठी घराघरात ‘घरच्यासारखा’ झाला, तसा प्रयत्न ‘चित्रकथां’च्या नायकांनीही केला... भारताच्या बालविश्वाला रमवणाऱ्या ‘चित्रकथां’नी आपल्या परंपरागत भाषांचा उंबरठा ओलांडला आणि जगाच्या भाषेला आपलंसं केलं.


मराठी किंवा कोणत्याही भारतीय भाषांमधे अदभुतरम्य साहित्याची कधीच वानवा नव्हती. पण संस्कृतीच्या बंधनांनी या साहित्याला ‘पुराणकथां’मध्ये बांधून ठेवलं. आज हनुमान आणि गणेशाचे ऍनिमेशनपट तयार झाले, आणि पुराणकथांमध्ये ‘बंदिस्त’ झालेले हे बालनायक फॆन्टसीच्या दुनियेतही लोकप्रिय झाले. त्याना देवांच्या जगातून बाहेर आणून मुलांच्या विश्वात बसवलं असतं तर?...

तुम्हाला काय वाटतं?

`हरवलेला' श्रावण!...

`हरवलेला' श्रावण!...

बसमधून उतरून रेल्वे स्टेशनातल्या फलाटावर पोहोचण्यासाठी रस्ता क्रॉस करायची वाट पाहात असतानाच अचानक पावसाची एक सर अंगावरनं सरसरत पुढे सरकली, आणि "श्रावणा'च्या जाणीवेनं मन क्षणभरासाठी सुखावून गेलं... मुंबईतल्या श्रावणाची छटा मुंबईवर आजूबाजूला उमटत नाही. श्रावणाचा पहिला दिवस काही फारसं वेगळं रूप घेऊन येतो, असं इथल्या सिमेंटच्या जंगलात आजवर कधी जाणवलेलंच नाही. नेहमीचाच दिवस, कामाची गडबड, ट्रेनची गर्दी, बसच्या रांगा आणि डबे-पिशव्या सावरत गाडी पकडण्यासाठीची धावपळ... बारा महिन्यांच्या या कसरतींनी श्रावणाच्या या सरीचं अवघं अप्रूप खरं म्हणजे कधीचंच धुवून टाकलेलं. पण आजच्या या अवचित सरीनं मात्र मन कधीकाळच्या "श्रावणभरल्या' आठवणींनी भिजून गेलं, आणि ओथंबतच ते कोकणातल्या हिरव्याकंच गावात पोहोचलं...
धावातधावत गाडी पकडल्यानंतर गर्दीभरल्या गाडीत स्वतःला कसंबसं कोंबून टाकलं, आणि पावसाच्या सरीनं भिजलेल्या कपाळावर साचलेले घामाचे तेवढे थेंब रुमालाच्या टोकानं टिपत त्या आठवणींचा चित्रपट उलगडू लागलो...
गावाकडच्या श्रावणी सोमवारला तेव्हा दिसणारी सोनेरी उन्हापावसाची लोभस किनार आठवत मी लहानपणीच्या त्या दिवसांत पोहोचलो, आणि पहाटस्वप्नासारखा "तो' श्रावण मनात झिम्मा खेळायलापण लागला... कुठूनतरी रानातल्या गुराख्याच्या वेळूचे गिरक्‍या घेणारे स्वर कानात घुमायला लागले आणि मधूनच मोरा-राव्यांच्या कलकलाटाची साथ डोक्‍यात झिरपायला लागली... पावसाच्या शिडकाव्यासोबत पत्र्याच्या छपरावर वाजणाऱ्या ताशाच्या तडतडाटाचे आवाजही स्पष्ट झाले आणि एका उत्कट "सणा'चा साज मनावर आपोआपच चढायला लागला...
त्या वेळी वर्षभरातल्या शनिवारची सकाळची शाळा श्रावणानं मात्र हवीहवीशी करून टाकली होती. "संपत शनिवार'च्या प्रतीक्षेत वेळी शुक्रवारची रात्र पहाटेची वाट पाहातच संपायची आणि पहाटेच्या मंद उजेडात पसरलेला पाणचुलीचा खमंग धूर एका वेगळ्याच आनंदाचा भागीदार करून घ्यायचा. शेजारच्या काकूंकडे अभ्यंगस्नान करून नंतरचे वाटीभर दूध-गूळपोहे रिचवत दक्षिणेपोटी मिळालेली पावली खिशात मिरवताना, आपल्या कमाईचा आनंद मी शाळाभेर उधळायचो, आणि शेजारच्या वाडीतल्या गण्या संध्याकाळच्या चण्या-फुटाण्यासाठी दिवसभर मागेमागे करताना माझा जणू रक्षणकर्ता होत इतरांवर डाफरायचा... श्रावणाच्या त्या दिवसांतच बहुधा ऑगस्टही उजाडलेला असायचा... पंधरा ऑगस्टच्या प्रभातफेरीची आणि झेंडावंदनाची तयारी आणि प्रत्येक दिवसाच्या व्रतवैकल्यामुळे घरात साजरा होणारा श्रावणसण सगळ्या घरावरच उत्साहाचा गालीचा पसरायचा. सोमवारी गावाबाहेरच्या डोंगरशिखरावरच्या महादेवाच्या दर्शनाला गावातल्या लहानथोरांची रीघ लागायची आणि तो हिरवाकंच डोंगर लहानथोरांच्या कोऱ्याकोऱ्या कपड्यांच्या रंगीवेरंगी ठिपक्‍यांनी सजून, नटून गेलेला गावातून दिसायचा... संध्याकाळी दिवेलागणीच्या आधीच घराघरात शिजलेल्या जेवणाला त्या दिवशी फक्त "प्रसादा'चीच चव असायची. शिखरावरच्या महादेवाच्या "पुजारीपणाचा' मान फक्त श्रावणी सोमवारीच दिमाखानं मिरवणाऱ्या लिंगायत किंवा गोसावी गुरवाची त्या संध्याकाळी घराघरात प्रतीक्षा व्हायची, आणि त्याच्या टोपलीत प्रसादाचं पान पडलं, की मगच घराघरातल्या पंगती व्हायच्या...
मंगळवारचा दिवस म्हणजे अवघ्या गावाचा सण... उत्साहाचं भरतं घेऊन उजाडणारा मंगळवार त्या दिवशी मावळायचाच नाही... एखाद्या घराच्या उंबरठ्यावरचं माप ओलांडून गृहप्रवेश केलेल्या नवागत विवाहितेला गावातल्या अवघ्या महिलावर्गाची ओळख घडविणारा आणि त्यांच्यात समावून घेणारा हा मंगळवार, संध्याकाळी खऱ्या अर्थानं सळसळून जायचा... एखाद्या घरातल्या मंगळागौरीच्या पूजेची धांदल सगळ्या गावातल्या घराघरात सुरू व्हायची आणि रात्र सुरू होताच माजघरातल्या फुगड्या उखाण्यांच्या आवाजानं आख्खं गाव जागं राहायचं. घराबाहेरच्या पत्र्याच्या मांडवाखाली पेट्रोमॅक्‍सच्या बत्तीच्या झगमगाटात पुरुषांचं पत्ते कुटणं सुरू व्हायचं आणि फराळाच्या रिकाम्या होणाऱ्या ताटांसोबत रात्र सरकत राहायची... अंधारालाही मग जाग यायची. झोपलेला अंधार लपेटून सुस्तावलेले गावातले रस्तेही मध्यरात्रीनंतरची लहानमोठ्यांची वर्दळ न्याहाळत ताजेतवाने व्हायचे, आणि बुधवारचा दिवऽसभर पेंगुळल्यासारखे सुस्त पडून राहायचे. मंगळागौरीच्या जागरणानं त्या दिवशी गावातल्या घराघरातले डोळेही पेंगत राहायचे...
. नागपंचमीला नागाच्या मातीच्या मूर्ती घडवण्यासाठी घराघरातल्या तमाम बालकसृष्टीची नुसती चढाओढ व्हायची, वर्षभरातल्या एखाद्या दिवशी नुसत्या चाहुलीनंदेखील अवघ्या गावाला अस्वस्थ करणारा हा पाहुणा त्या दिवशी पूजेचा मान मिरवत देवघराजवळची जागा पटकावायचा... संध्याकाळी घरामागच्या परसदारातल्या अळूच्या बनात मग त्याचं समारंभपूर्वक प्रस्थान व्हायचं...
... त्या दिवसांत अवघ्या गावाला पावसाच्या नव्यानव्या लहरींची ओळख व्हायची... गावाबाहेरच्या रानालगतच्या शेतातली भाताची पिकं पावसानंतरच्या सोनेरी उन्हांसारखीच चमकदार छटा पांघरून वाऱ्याबरोबर लाटांसारखी झुलायची, आणि शेताच्या बांधावरच्या तिळाच्या पिवळ्या फुलांची रांग त्या झुल्याला गडद झालर लावून तो सजवायची. घराबाहेरच्या झेंडूंना आणि मखमलीच्या फुलांना पिवळा-सोनेरी बहर आलेला असायचा, आणि गावाबाहेरच्या शेतांमधल्या दूधभरल्या पोटरीतल्या भाताच्या दाण्यांचा खमंग वास घेऊन गावात गिरक्‍या मारणाऱ्या वाऱ्यानं अवघा गाव दरवळून, परमळून जायचा. झोडपून काढणाऱ्या पहिल्या पावसात संतापल्यासारख्या तांबड्यालाल रूपानं फणफणत वाहणाऱ्या झऱ्या-पऱ्ह्यांचे प्रवाह निळाईनं भरलेलं निळं रूप धारण करून शांतपणे वाहायचे, आणि गावाबाहेरच्या डोंगरावरच्या हिरव्याशार गवतांचे गालिचे गायीगुरांना तृप्त करून सोडायचे... रात्रीच्या चांदण्यात गाईगुरांना घेऊन गावाबाहेरच्या कुरणात "पसारा' घालण्याचा तरुणाईचा एक उद्योग तेव्हा भलतीच मजा आणायचा... आपल्या कुरणात रात्री भलताच कुणीतरी गायीगुरं घालतो, हे माहीत असूनसुद्धा कुणी कधी कुणाशी भांडायचा नाही...
श्रावणाआधीच्या दोन महिन्यांत धुवून चकचकीत झालेलं गाव, गावाबाहेरचे डोंगर, झाडंझुडपं आणि पक्षी-प्राणी श्रावणाच्या दिवसांत जणू नवी चमक घेऊन वावरायचे... गावाबाहेरच्या देवराईतल्या मोरांच्या आवाजातली एका नव्या आनंदाची, उत्साहाची झालर सहजपणे अनुभवायला मिळायची... पावसाच्या पहिल्या शिडकाव्यातच तरारलेले असंख्य कोंब एव्हाना वेलींच्या रूपानं झाडाझुडपांना विळखा घालत फुलाफळांनी लगडलेले असायचे, आणि काकड्या-पडवळांच्या मांडवांनी घराघरांची अंगणं सजून जायची. घराघरातल्या मुलामाणसांच्या बरोबरीनं, गावातला आणि गावाबाहेरचादेखील हिरवाकंच निसर्गदेखील श्रावणाचा प्रत्येक दिवस, "साजरा' करायचा...
------------- ----------------
गेले दोनतीन महिने मुंबईत पावसाच्या सरी कोसळतायत... एका पावसाळ्यानं मुंबईच्या काळजात भरवलेली धडकी अजूनही धडधडतेय. पावसाची एखादी सर जरा जास्त वेळ विसावली, की पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या होतात, आणि कधी एकदा ती सर थांबते, अशी अस्वस्थ, मनाला न पटणारी स्थिती मनात घर करते. गावाकडच्या लहानपणीच्या त्या पावसाच्या आठवणी अजूनही मनात सतत बसरत असताना, इथे मात्र, पाऊस थांबावा, असा विचित्र विचार मनाला पोखरत राहातो...
------ --------
...लहानपणी आईचं बोट धरून मी पहिल्यांदा आमच्या कोकणातल्या त्या नव्या गावात एस्टीतून उतरलो, तेव्हा असाच धुवांधार पाऊस कोसळत होता... देशावरच्या आमच्या गावातल्या पावसापेक्षा हे रूप खूपच वेगळं असल्यानं मी घाबरून गेलो होतो. हाताच्या पंज्यांनी डोक्‍यावर "छत्री' करून मी धावतच एस्टी स्टॅंडच्या बाजूला पत्र्याच्या शेडखाली उभा राहून हा नवखा पाऊस थांबायची वाट पाहात होतो, पण त्यानं आमच्या कंटाळल्या मनाला दादच दिली नाही, म्हणून तसाच चालत निघालो... तेवढ्या भिजण्यातच त्या पावसाशी माझी मैत्री झाली आणि नव्या घरात, सगळ स्थिरस्थावर होईपर्यंतच्या दिवसांत खिडकीच्या गजाबाहेर हात काढून तळव्यांवर पागोळ्यांच्या धारा झेलायच्या खेळानं मला वेड लावलं... दिवसदिवस चालणाऱ्या या खेळात, खेळकरपणे तळव्यांना गुदगुल्या करणाऱ्या पाऊसधारांनी मला इतकं आपलं केले, आणि तो पाऊस इतका "ओळखीचा' झाला, की घराबाहेर पडताना आकाशाकडे नुसतं बघूनच पावसाचा वेध घ्यायची खास कोकणी नजरदेखील मला सहज मिळून गेली...
त्या वेळी, पहिला पाऊस सुरू झाला की तो थांबेपर्यंतचा काळ, म्हणजे "पावसाळा' असायचा. कधी रिपरिप, कधी ठोंब, आणि कधी सरी अशा नव्यानव्या मुखड्यांना कोसळणाऱ्या त्या पावसात कधीतरी आपली "उघडीप' दिसली, तरी हवेत तरंगणारे भुरुभुरू कण अंगाशी लगट करीतच राहायचे. श्रावणात मात्र हा पाऊस जरासा खोडकर व्हायचा, आणि गावाबाहेरच्या माळावर उभं राहिल्यावर लांबवरनं येतानाच दिसायचा... अशी सळसळती सर धावतच अंगावर यायची आणि छत्री उघडूउघडू म्हणेपर्यंत अंगावरून सरसरत पुढेदेखील सरकायची... अंगावरच्या थेंबांचा ओलावा नंतरच्या उन्हात चमकत राहायचा... ओली माती आणि त्यावरची मोहोरलेली, फुलरंगांनी बहरलेली रोपटी, पुन्हा तरारून उठायची, आणि सहज चाळा म्हणून, एखाद्या काटकुळ्या काठीनं जमिनीत बोटभर उकरल्यानंतर एखादा लपलेला झरा हा हा म्हणता वर येऊन वाहायलादेखील लागायचा... सगळीकडे फक्त पावसाळ्याच्या, पावसाच्या जादूभरल्या करणीनं भारल्यासारखं वातावरण असायचं...
----- -------
.... आज बऱ्याच दिवसांनी, कोकणातल्या त्या गावातल्या श्रावणाच्या आठवणी, त्या मातीत लपलेल्या झऱ्यासारख्या वर आल्या आणि खळाळून वाहायला लागल्या...
....आता अवघा श्रावण मोहरलेलाच राहणार!

Saturday, August 4, 2007

वासूचे ‘वस्तु’शास्त्र...
सकाळपासून घर नुसतं धुमसत होतं. कशावरून तरी बायकोचं बिनसलं होतं. पण वासु शांत होता. घरात नेहमी धुसफूस व्हायला लागल्यावर, काही वास्तुदोष तर नाही ना, हे पाहण्यासाठी वासुनं संजूबाबांना वर्तमानपत्रात पत्र लिहिलं, आणि संजूबाबाचं उत्तर आल्यावर ती पिशवी समोरच्या खुंटीवर अडकवून ठेवली.घरातल्या कटकटींना वैतागलेल्यांना संजूबाबा त्यांच्या वास्तुशास्त्राच्या सदरातून सल्ला देतात आणि एकदम जालीम उपाय सुचवतात असं ऑफिसातल्या कुणीतरी त्याला सांगितलं होतं.घरातल्या भांडणापासून मुक्ती हवी असेल, तर दोघांची मिळतीजुळती आठवण असलेली एखादी वस्तू समोरच्या खुंटीवर टांगून ठेवा, असं संजूबाबांनी सुचवलं, तेव्हा पहिल्यांदा अशी कोणतीच वस्तू वासूला आठवेना.विचार करताकरता अचानक वासूचं लक्ष कोपऱ्यातल्या खुंटीकडे गेलं...एक मळकट, जुनाट पिशवी तिथे धूळ खात पडली होती. त्या पिशवीचा इतिहास आठवून वासुचे डोळे अचानक चमकले आणि पिशवीवरची धूळ झटकून त्यानं ती समोरच्या खुंटीवर अडकवली.वासूचा हा उद्योग सुरू असताना पुन्हा बायको बाहेर आली, आणि फणकाऱ्यानं खुंटीवरच्या पिशवीकडे पाहून एक जोरदार हुंकार देत ती आत वळली.वासूनं पुन्हा त्या पिशवीकडं पाहीलं. बायकोलाही ती पिशवी चांगलीच लक्षात राहिली होती, हे त्यानं ओळखलं.बायकोच्या चिडण्यामुळे आपण आता अजिबात अस्वस्थ नाही, असा अनुभव वासूला लगेचच आला. त्यानं मनात संजूबाबाचे आभारही मानले.तेवढ्यात वासूचा मुलगा समोर येउन बसला आणि ठरल्यासारखं त्यानं मुलाला लाकूड्तोड्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली...जंगलातनं लाकडं घेऊन येताना एका लाकूडतोड्याला तहान लागली, म्हणून वाटेवरच्या विहीरीतून पाणी काढण्यासाठी तो हातातली कुऱ्हाड बाजूला ठेऊन वाकला, तेवढ्यात कुऱ्हाड विहिरीत पडली. लाकूडतोड्या रडायला लागला. तेवढ्यात प्रत्यक्ष देव विहिरीतून वर आला.समोर खुंटीवर लटकणाऱ्या पिशवीकडे पाहात वासू गोष्ट सांगत होता...देवाच्या हातात सोन्याची कुहाड होती. त्यानं लाकूड्तोड्याला विचारलं, ‘हीच का तुझी कुऱ्हाड?’लाकूड्तोड्यानं रडतच मानेनंच नाही म्हणून सांगितलं आणि तो पुन्हा रडायला लागला...मग देवानं चांदीची कुऱ्हाड आणली. लाकुड्तोड्या पुन्हा नाही म्हणाला, म्हणून त्यानं लोखंडाची कुऱ्हाड आणली.लाकूडतोड्या लगेच म्हणाला, ‘हीच माझी कुऱ्हाड’... लाकूडतोड्याच्या प्रामाणिकपणावर देव खुश झाला, आणि त्याला सोन्याची आणि चांदीचीपण कुऱ्हाड बक्षीस देऊन अंतर्धान पावला.... गोष्ट सांगून संपली तरी वासूचं मन गोष्टीतच अडकलं होतं. मधेच त्याची नजर खुंटीला टांगलेल्या पिशवीकडे वळत होती... विचार करताकरता त्याचा डोळा लागला..----------संध्याकाळची वेळ होती. बायकोबरोबर वासू गावाबाहेर फिरायला गेला होता, बायकोही खुशीत दिसत होती, म्हणून वासूनं सहज तिच्या माहेरचा विषय काढला. आणि अचानक काहीतरी बिनसलं. बायको थबकून रस्त्याकडेच्या विहिरीच्या कठड्यावर बसली.
वासू तिच्याजवळ गेला आणि तिची समजूत काढू लागला. पण तिनं मान फिरवली... आणि... अचानक तोल जाऊन ती विहिरीत पडली...वासू प्रचंड घाबरला. त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. आकाशाकडे पाहात नकळत त्यानं हात जोडले...तेवढ्यात कडकडाट झाला. बायकोच वर आली, असे वाटून वासूनं विहिरीकडे पाहिलं.पण ती बायको नव्हती. प्रत्यक्ष देवच विहिरीतून वरती आला होता. वासू पुन्हा व्याकूळ झाला.ते पाहून देव पुन्हा विहिरीत गेला. वरती आला, तेव्हा त्याच्यासोबत एक रूपवान स्त्री होती. भारावल्यासारखा वासू तिच्याकडे पाहात राहिला.हीच का तुझी बायको?’ देवानं विचारलं आणि वासू भानावर आला. त्याला लाकूड्तोड्याची गोष्ट आठवली... बायकोचा रागानं फणफणलेला चेहेराही त्याच्या नजरेसमोर आला आणि क्षणभर त्याचा थरकाप झाला.त्यानं चटकन मान हलवून हो म्हटलं. आणी देवानं ती सुन्दरी त्याच्या हवाली केली...‘तू खोटं बोललास’.. अंतर्धान पावतापावता देव वासूला म्हणाला...‘देवा, मी जर हिला नाही म्हटलं असतं, तर तू अनेक सुंदऱ्यांची रांग लावली असतीस... त्यांना नाही म्हटलं असतं, तर माझ्या खऱ्या बायकोला वर आणलं असतस, आणि तिला हो म्हटल्याबरोबर, माझ्या बायकोसकट सगळ्या मला देऊन टाकल्या असत्यास.
देवा, खऱ्या बायकोसकट ही सगळी तुझी बक्षीसं मला पेलवली नसती रे...’ वासू काकुळतीनं म्हणाला आणि काहीच न बोलता देव अंतर्धान पावला......... त्या सुंदरीला घेऊन वासू घरी आला। त्यानं दरवाजा ठोठावला आणि तो मटकन खालीच बसला...बायको पदराला हात पुसत समोर उभी होती...उलट्या हातानं डोळे चोळत वासू भानावर आला, आणि ते स्वप्न होतं हे त्याच्या लक्षात आलं. तो सावरला... मानेभोवतीचा घाम पुसत त्यानं कसंबसं हसून बायकोकडे बघितलं॥ फणकारत तिनं मान फिरवली. वासूची नजर पुन्हा त्या पिशवीवर खिळली, आणि त्याला लग्नानंतरचे दिवस आठवले...------------------------म्युनिसीपाल्टीच्या लायसन खात्यात चिकटल्यावर लगेचच वासूचं लग्नं झालं. हळूहळू त्याचा नोकरीत जमपण बसला. अचानक येऊन भाज्यांची पोती उचलून नेणारी चोरगाडी रोखण्यासाठी गल्लीतल्या भाजीवाल्यांनी एकदा वासूचे हात दाबून त्याला साकडं घातलं आणि त्याना संरक्षण मिळालं. तेव्हापासून रोज संध्याकाळी घरी येताना तो भाजीबाजारात फेरी मारायचा. भाजीवाले वासुच्या पिशवीत निमूटपणे भाजी कोंबायचे. रोजचा भाजीचा खर्चही वाचला, म्हणून बायकोही खूष होती, ताज्या भाजीमुळे वासूच्या घरात सौख्य नांदत होतं....... त्या दिवशी वासु जरा लवकरच काम आटोपून घरी येतायेता बाजारात गेला. सगळे भाजीवाले जीव तोडून धंदा करत होते.

रोजची पिशवी भरून गेली, म्हणून एका फेरीवाल्याकडून वासूनं एक पिशवी विकत घेतली. आणि दोन पिशव्या भाजी घेऊन तो घरी आला.एवढी भाजी बघून बायको खुश होणार, अशा विचारानं वाटेवरच त्यानं स्वतच्या डोक्यावरून चंगला दोनचार वेळा हात फिरवला...झपझप चालत त्यानं घर गाठलं. भाजीच्या पिशव्या भिंतीजवळ ठेवुन तो खुर्चीत टेकला, तोच बायको बाहेर आली.
दोन पिशव्या बघून तिचे डोळे विस्फारले होते.‘ही दुसरी पिशवी कुणाची?’ तिच्या प्रश्नानं वासू चक्रावला.
‘अगं, भाजीच इतकी झाली, की दुसरी पिशवी विकत घ्यावी लागली.. कसंबसं तो म्हणाला, पण पिशवी विकत घेतल्यामुळे बायको चिडलीये, हे त्याच्या लक्षात आलं.
नंतर बरेच दिवस घरात धूसफूस सुरूच होती...
फुकटच्या भाजीमुळे घरात नांदणारं सौख्य विकतच्या एका पिशवीनं हिरावुन घेतलं होतं...
त्या रात्री जेवणं अबोल्यातच उरकली आणि वासु अंथरूणावर आडवा झाला...बायकोही स्वयंपाकघर आवरून आली, आणि पाठ करून झोपली
...वासूची बेचैनी वाढतच होती... त्याला राहवेना... बळेबळेच त्यानं बायकोला जवळ ओढलं, आणि चुकीची कबूली देऊन टाकली...
मग तीही त्याच्या कुशीत विसावली.
....... यथावकाश वासुला मुलगा झाला...
त्या विकतच्या पिशवीनं माजवलेल्या कुरुक्षेत्रामुळेच वासूचं घर भरलं होतं...
----- ------
अलीकडे वासूच्या घरात नेहमी दोघांची कडाक्याची भांडंणं होतात।
घरात काही दोष नाही ना, ते तपासून घे, असं त्याला सासूबाईंनीच सुचवलं होतं
॥घराला काहीतरी वेगळं नाव देऊन बघ, असंही कुणीतरी सुचवलं, पण त्यानं वास्तुशाराकडं वळायचं ठरवलं... आणि संजूबाबाचा सल्ला घेतला... दोघांनाही सुखद आठवणींनी बांधून ठेवणारी वस्तू म्हणजे ती एक पिशवीच होती॥तीच त्यानं समोरच्या खुंतीवर टांगून ठेवली आहे...गोष्ट सांगताना बाबा नेहमी त्या पिशवीकडं का पाहातात, असा प्रश्न मुलाच्या डोळ्यात वासूला नेहेमी दिसतो...घरात कितीही रणकंदन असलं, तरी मुलाला रोज गोष्ट सांगावीच लागते...त्याला एखदं भावंड हवं, असा विचार वासूच्या मनात आला, आणि तो चमकला...आज रात्री बायकोचा राग घालवायचा, असं त्यानं ठरवलं, आणि त्याला हलकंहलकं वाटलं... त्यानं हळूच पिशवीकडे बघितलं..
.पंख्याच्या वाऱ्यानं ती मस्तपैकी झुलत होती...

Thursday, August 2, 2007

भक्तीची शक्ती...

भक्तीची शक्ती...
मुंबईच्या लोकल ट्रेनमधून सकाळ्च्या वेळी प्रवास करायचे मी टाळतो. पण त्या दिवशी नाईलाजच होता. सकाळी दहा वाजता नरीमन पॉईंटला पोहोचायचंच होतं. मी नाखुषीनंच स्टेशनवर आलो आणि गर्दीचा अंदाज घेण्यासाठी पाचदहा मिनिटं ब्रीजवरच उभा राहिलो. चर्चगेटकडे जाणारी एखादी गाडी येताना दिसली, की जिन्यावरच्या गर्दीची पळापळ व्हायची. हे मी अगोदरपण बघितलेलं होतं. पण माझ्यावर तशी वेळ येणार नाही, असं मला नेहमी वाटायचं.
त्या दिवशी मात्र मी पराभूतासारखी शरणागती पत्करली. मुंबईत राहून ट्रेनची गर्दी टाळणं म्हणजे पाण्यात राहून कोरडं राहण्याच्या गमजा मारणं होतं, हे मला त्या दिवशी उमगलं. माझी देवावर गाढ श्रद्धा वगैरे नाही. पण समोर देऊळ वगैरे दिसलंच, तर हात नकळत जोडले जातात. म्हणजे, त्या वेळी मनात अगदी भक्तीचा महापूर वगैरे असतो असंही नाही. एकदा असाच एका देवळासमोरून जाताना हात जोडले, आणि लक्ष गाभाऱ्याकडे गेलं, तर जीन्स पहेनलेल्या चारपाचजणांनी देवापुढे गुडघे टेकलेले. भक्तीच्या त्या अफाट पुरात गटांगळ्या खातानाच माझ्या मनात विचारांचं चक्र फिरायला लागलं. आजकाल मुंबईत कानाकोपर्यावर देवाचं अस्तित्व दिसतं. रस्त्याकडेला झाडाच्या एखाद्या फांदीला लटकणाऱ्या देव्हाऱ्यात साईबाबाची जुनाट मूर्ती हमखास आढळते. कुठे झाडाला ठोकलेल्या खिळ्यात गणपतीचा नाहीतर मारूतीचा फोटो लटकताना दिसतो, आणि त्याच्या शेजारीच दानपेटी नक्कीच असते. रेल्वे स्टेशनांच्या जिन्याजवळची झाडं म्हण्जे या देवांचं हमखास वस्तीस्थान. सकाळच्या गर्दीच्या वेळी या मळकटलेल्या, उदबत्तीच्या धुरानं काळवंडलेल्या देवांच्या तसबिरींसमोर फुलांचे आणि हारांचे ढीग साचतात.
पंधरा वर्षांपूर्वी मुंबईत दंगली झाल्या. बाँबस्फोटांनी मुंबईच्या धीराच्या काळजावर कायमच्या जखमा उमटवल्या. नंतर बाँबस्फोट नित्याचेच झाले. अतिवृष्टी, महापूर हेपण पाठोपाठ आले. बुजुर्गांच्या भाषेत, मरण सोपे झाले. सकाळी घराबाहेर पडणारा माणूस संध्याकाळी घरी परत आला, की दिवस साजरा झाला असं मानायचं. प्रवासात मस्तपैकी पत्ते खेळतानाच, मोबाईलवरून घरच्यांशी गप्पा मारताना अचानक बाँबस्फोट झाले, तर? अशी भीती प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलीये.
म्हणून इथे देव जागोजागी येऊन बसले.
रेल्वे स्टेशनात फलाटावर पाय ठेवायच्या आधी, जिन्याच्या पहिल्या पायरीच्या शेजारी देवांनी जागा पटकावलीये.
आपणसुद्धा, प्रवास सुरू करायच्या आधी, क्षणभर या काळवंडलेल्या तसबिरीतल्या देवांच्या समोर डोळे मिटून क्षणभर झुकतो.
या भक्तीचा कुणीतरी धंदा करीत असेल, हे माहीत असतानादेखील.
खिशातल्ल्या चिल्लरला हात घालून हाताला येईल ते नाणे दानपेटीत टाकतो,
आणि निर्धास्त होऊन फलाटावर येणाऱ्या ट्रेनकडे जिवाच्या आकांतानं झेपावतो.
चवथी जागा मिळवण्याकरीता, नाहीतर
किमान वरच्या दांडीचा हूक हाताशी येईल अशी जागा मिळावी म्हणून.
एवढं जमलं, की आपण त्या देवाचे आभार मानतो.
गाडीत चढण्याआधी केलेल्या नमस्कारामुळेच आपण सुरक्षितपणे चढलो, आणि उभं राहायला जागा मिळाली, अशी आपली खात्री झालेली असते.
दुसऱ्या दिवशी आपण घराबाहेर पडतो, पुन्हा जिन्याजवळच्या त्या कळकट तसबिरीतल्या देवापुढे हात जोडतो, आणि अंगात गर्दीचा सामना करायचं बळ घेऊन फलाटावर झेपावतो.
इथे एक लयबद्ध गती आहे. ती अशीच तयार झालीये.
आपण इथे निर्मम झालोत.
असुरक्षिततेच्या भावनेनं पछाडल्यानंतर देवापुढे नाक घासायला,
देवापुढं खिसा ओतायलापण आपल्याला काहीच वाटत नाही.
या मजबूरीनं माणसाला माणुसकी तरी शिकवलीये.
याच मजबूरीच्या भांडवलावर करीत असेल कुणी कसला धंदा.
कमावत असेल दानपेटीतली चिल्लर आणि ओतत असेल कुणा आंटीच्या गल्ल्यात संध्याकाळी
आपल्या घशाची जळजळती चटक भागवण्यासाठी..
जाड घोंगड्याआड बसून सिगारेटच्या चांदीवरच्या पावडरीचे झुरके मारण्यासाठी,
नाहीतर एखाद्या दवाखान्याबाहेर फेकून दिलेल्या सिरींजमधून मनगटावरच्या शिरेत नशा भिनवण्यासाठी.
आपण मात्र, न चुकता देवापुढे पैसे टाकून नतमस्तक होणारच असतो.
या भक्तीचा धंदा करणारे तो करोत, पण या भक्तीनंच माणसामाणसाला जवळ आणलंय.--
----- ----
...तर, त्या दिवशी जिन्यावरून धावतच मी ट्रेनच्या दरवाजाजवळची मोकळी जागा हेरली आणि गाडी फलाटावर यायच्या आत गाठायची असा निर्धार करून खाली धाव घेतली.
ठरवल्यासारखा तोच डबा, तोच दरवाजा आणि तीच जागा मिळवून मी हुश्श झालो.
बांद्रा गेल्यावर मीठीच्या पुलावरून जाताना माझ्यासकट सगळ्यांनी ब्यागा पिशव्या सावरत नमस्कारासाठी हात जोडले.
गाडी सुरक्षितपणे पार झाली.
दादरच्या फलाटावर गाडी थांबली, तेव्हा आतल्यापेक्षाही जास्त गर्दी बाहेर उभी होती. जमेल तेवढ्यांना पोटात घेऊन गाडी सुटली आणि मुंबई सेन्ट्रलनंतर हळूहळू रिती होत गेली.
चर्चगेटच्या आधीच्या स्टेशनवर समोरच्या सीटवरचा एक माणूस उठला आणि वरची बॅग खांद्याला लावून गाडी थांबायच्या आतच उडी मारून त्यानं जिना गाठला.
चर्चगेट स्टेशन समोर दिसत होतं, आणि माझ्या शेजारच्याला जाग आली.
उठून त्यानं वरची बॅग काढली आणि तो चपापला. ती त्याची नव्हती. पण अगदी त्याच्या बॅगेसारखीच होती.
आधीच्या स्टेशनावर उतरलेल्यानं त्याची बॅग नेली होती.
आता ती मिळणं जवळपास मुश्कील आहे, हे त्यालाही कळून चुकलं होतं. तरीही डब्यातल्या लोकांची सल्लामसलत सुरु झालीच.
`काही होतं का तुमच्या बैगेत?', कुणीतरी विचारलं आणि यानं पैसे, पाकीट, सर्टिफिकेटस, विमा पॉलिसी, असा सगळा तपशील सांगून टाकला.
`या बॅगेत बघा जरा, त्या माणसाचा काही पत्ता, फोन नंबर मिळतोय का?', कुणीतरी सुचवलं म्हणून त्यानं ती बॅग उपसली.
पण पैसे तर नव्हतेच, हाती आली ती कुणा बापूंची एक जीर्ण पोथी, एक तसबीर, एक कॅसेट आणि साखरफुटाण्याची एक पुडी.
`आता एवढ्यावरनं त्या माणसाचा माग कसा काढणार, गेलंच ते सगळं आता..’ निराश होत तो म्हणाला.
पलीकडच्या बाकावरून हे सगळं पाहाणारा एकजण अचानक पुढे आला आणि त्यानं त्या बॅगला हात लावून नमस्कार केला.
सगळे अचंबित होऊन बघत होते.
‘घाबरू नका. तुमच्या त्या बॅगेत तुमचा पत्ता, फोन नंबर आहे ना?' त्यानं विचारलं, आणि त्या निराश माणसानं होकारार्थी मान हलवली.
‘मग उद्या तुम्हाला तुमची बॅग परत मिळेल. फक्त ही बॅग जशीच्या तशी जपून घरी न्या.’ तो म्हणाला.
सगळेजण अविश्वासानं त्याच्याकडे बघत असतानाच तो बोलत होता.
‘हे बघा, तुमच्या त्या बॅगेत कदाचित हजारो रुपये असतील. पण त्या माणसाची बॅग मागं राहिल्यानं त्यानं जे गमावलंय, ते त्याला त्या पैशापेक्षा मोलाचं आहे. ही पोथी, ही तसबीर आणि ही कॅसेट त्याला तुमच्या पैशापेक्षा मौल्यवान आहे. तो उद्याच तुम्हाला फोन करील आणि तुमची बॅग देऊन ही बॅग घेऊन जाईल. विश्वास ठेवा माझ्यावर’ तो माणूस प्रचंड आत्मविश्वासानं बोलत होता.
चर्चगेटला गाडी थांबली, तेव्हा मी पुढं होऊन माझं कार्ड त्या बॅग हरवलेल्या माणसाच्या हातावर ठेवलं.
`उद्या खरंच असं झालं, तर मला प्लीज कळवा’ मी त्याला म्हणालो.
त्यानंही मान डोलावली.
आम्ही दोघंही एका भक्तीची कसोटी घेणार होतो.
--- --- ----

दिवशी रात्री माझा फोन वाजला.
डब्यातल्या त्या तिऱ्हाईताचा विश्वास खरा ठरला होता.
मी त्या भक्तीला नमस्कार केला.
त्या भक्तीचं भांडवल करून कुणी धंदा का करेना, माणसाला त्या भक्तीनं सन्मार्ग दाखवलाय, माणुसकी शिकवलीये, हा माझा मुद्दा मलाच पटला होता.
-----------------