Monday, March 20, 2017

बोधकथा...

बोधकथा?
महाराज, मलाही अजातशत्रू व्हायचंय. उपदेश करा.... नतमस्तक होऊन हात पुढे बांधून व किंचित झुकून, बोलावे की न बोलावे अशा संभ्रमावस्थेत मनाचा हिय्या करून त्याने महाराजांना नम्रपणे विनंती केली, आणि तो महाराजांच्या मुखाकडे एकटक पाहू लागला. शाही सोफ्याच्या डाव्या हातावरचा पांढराशुभ्र टर्किश नॅपकिन उचलून महाराजांनी एकवार तोंडावरून फिरवला आणि ते हसले. म्हणजे, त्याला तसा भासही झाला असावा. महाराज हसतात तेव्हा कदाचित त्यांना राग आलेला असतो, असं त्याने एेकलेलं होतं. खरं म्हणजे, संपूर्ण महाराजच त्याला नेहमी अनप्रेडिक्टेबल वाटायचे. अवतारी माणसे अशीच, अनप्रेडिक्टेबलच असतात, असेही त्याने एेकले होते. तसे त्याने ज्यांनाज्यांना खाजगीत सांगितले, त्यांनीही त्याला दुजोरा दिला होता. महाराज जेव्हा जे बोलतात, तेव्हा ते तसे नसते, एवढेच आता सगळ्यांना सवयीने आणि अनुभवाने माहीत झाले होते. ते ज्यांच्यावर जोरदार रागावतात ते त्यांच्या सगळ्यात जवळचे असतात, असेही काहीजणांना वाटू लागले होते, पण तसे ते खात्रीपूर्वक सांगू शकत नव्हते. महाराजांच्या टीकाशैलीविषयीदेखील अनेकांना शंका होत्या. ते सहज बोलतात असे वाटायचे तेव्हा ती नेमक्या कुणाला तरी आपल्यावरच केलेली बोचरी टीका आहे, असे वाटायचे, तर ते अगदी थेट रोख धरून टीका करतात तेव्हा त्यातही कौतुक दडलेले अाहे, असा समज व्हायचा. कात्रजचा घाट हे महाराजांचे सगळ्यात आवडते ठिकाण होते. अनेकांना त्यांनीच या घाटातून फिरवूनही आणले होते. त्या प्रवासामुळेच कितीतरी लोकांना महाराजांच्या शक्तीची प्रचीतीही आली होती. उंच आकाशातून हिंडताना, घारीचे लक्ष बरोब्बर जमिनीवरच्या सावजाकडे लागलेले असते. झाडाझुडुपात दडलेला जमिनीवरचा एखादा काळा ठिपकादेखील नेमका हेरून घार त्यावर झेपावते. महाराजांच्या बाबतीतही तसेच असावे असेही अनेकांना वाटायचे. विमानातून जमिनीवर पाहताना, खाली दिसणारे गाव कोणते, त्यातला झाडीने वेढलेला जमिनीचा तुकडा कुणाचा, इतकेच नव्हे तर त्याचा सर्वे नंबर काय हेदेखील ते सांगू शकायचे. जगाच्या पाठीवरच्या कितीतरी देशांत त्यांच्या ओळखी होत्या. त्यांचे शिष्यगण जगभर पसरलेले होते, तरीही त्यांनी कधीही स्वतः महान असल्याचा आव आणला नव्हता. भारतात तर त्यांच्या कृपेने अनेकांची आयुष्ये भराभराटून गेली होती. एखाद्यावर त्यांची मर्जी बसली की त्याच्या आयुष्याचे सोने होऊन जायचे, हेही अनेकांना माहीत होते. खरे म्हणजे, महाराज कुणा एकाचे नव्हतेच. सगळीकडे त्यांचे चाहते होते. त्यांचे शिष्यत्व मिळावे म्हणून अनेकांनी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांनी चतुराईने कामाच्या माणसांनाच जवळ केले होते. कोणता माणूस कोणत्या कामाचा आहे, हे ओळखण्याची अतींद्रिय शक्ती त्यांना लाभली आहे, असे त्यांना ओळखतो असे मानणाऱ्यांपैकी काहींना वाटायचे. काहीजण तर स्वतःलाच महाराजांचे शिष्य म्हणवून घ्यायचे, कधीकधी महाराजांनाच हे माहीतही नसायचे. तरीही महाराजांच्या स्थिर चेहऱ्यावरची रेषादेखील हलत नसे, हे त्याने प्रत्यक्ष बघितले होते. अनेकजणांनी महाराजांची एकलव्याप्रमाणे उपासना करून त्यांच्या अंगीचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी अपार कष्टही केले होते. ज्यांना त्यातले काही साधले, त्यांनी अचनाक महाराजांना अनपेक्षित गुरुदक्षिणा अर्पण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती... महाराजांनी कधीही कुणालाही नाराज केले नव्हते. भक्तिभावाने उतराई झालेल्या प्रत्येकाने जे जे दिले, त्याच्या त्यांनी निर्विकारपणे स्वीकारही केला होता...
***
... शाही सोफ्यावर बसलेले महाराज बराच वेळ काहीच बोलले नाहीत, तोवर त्यांच्यासमोर मान झुकवून उभ्या असलेल्या त्या पामराला हे सारे आठवत गेले, आणि ज्या प्रश्नाचे उत्तर महाराजांनी आपल्याला द्यावे म्हणून आपण ताटकळत होतो, ती उत्तरे आपल्याला आत्ताच मिळत गेली, असा साक्षात्कारी विचार त्याच्या मनात चमकून गेला. तो धन्य झाला होता.
***
महाराजांनी पुन्हा सोफ्याच्या हातावरचा शुभ्र नॅपकीन उचलला, तोंडावरून फिरवला, आणि ते मंद हसले.
महाराजांच्या हास्यातून कृपेचे चांदणे आपल्यावर बरसत आहे, अशा भावनेने महाराजांना हात जोडून तो त्यांच्या पायाशी बसला...

माझ्या आईच्या कविता

ध्यास

इट्ट्ल इट्टल म्हनता, मन पार येडं झालं
ध्यास लागला नामाचा, मन खुळावून ग्येलं
हितं तितं सारीकडं, दिसे इट्टल सावळा
झाडा पाना फुलामंदी मज भासाया लागला

वाटे साजिरी फुलांनी, करू पूजा या द्येवाची
परीे गोंधळ्ले मन, हितंतिथं दिसे तोचि
त्येच्या आंघुळीला वाटे, आणू वाईच गं पानी
पान्यातच उभा व्हता, सावळा गं चक्रपाणि

गंध उगाळाया हाती, घेतली ग मी सहाण
तिच्यामंदी श्रीखंड्याचे, देखिले गं म्या ध्यान
निवदासी आणाया, दूध ग्येले मी घरात
सोता गोकुळीचा कान्हा, उबा माज्या गोकुळात

कशी करू याची पूजा, मज इच्यार पडला
असा द्येव हा इट्टल, आसंल संतांनी पूजिला
नको आंगुळीला पानी, नको त्याला पानं फुलं
ध्यान निरखता निसते, मन भक्तिसंगं झुलं

काय करू रे इट्टला, डोकं झालं सैरभैर
सुचला उपाय मनात, करू सदा नमस्कार
द्येव भावाचा भुकेला, नको उपचार तयाला
माजा सगळाचि भाव, तया चरणी अर्पियला

Friday, October 23, 2015

दसरा


 आम्हा घरी धन 
शब्दांची कोठारे 
शब्दांची हत्यारे 
धारदार... 

शब्द हे संचित 
शब्द व्यवहार 
शब्दांचा संभार 
मनामाजि... 

शब्द न केवळ 
बापुडा तो वारा  
जीवन पैलतीरा
लावितसे... 

जयासि न सीमा 
नसे उल्लंघन 
शब्दांचे कुंपण 
जगण्यासि... 

दसऱ्याच्या शुभेच्छा! 
- दिनेश

Saturday, September 12, 2015

नावातच सारे आहे...


नावात काय आहे, असं शेक्सपियर एकदा म्हणाला आणि आपण त्याचं ते वाक्य मागचेपुढचे सारे संदर्भ विसरून उगाळायला सुरुवात केली.
 का म्हणाला असेल तो असं?..  काहीतरी असं घडलं असेल की ज्यामुळे त्याला नावही निरर्थक वाटू लागलं असेल..
म्हणजे, असा विचार मनात येण्याआधी, निराश वाटावं असा एखादा प्रसंग घडला असेल, ज्यामुळे आपण 'शेक्सपियर' असूनही आपल्या नावाला काही अर्थ नाही असं त्याला त्या क्षणी वाटून गेलं असेल.
म्हणजे बघा, कदाचित, एखाद्या बड्या हॉटेलात एखाद्या ग्रँड पार्टीसाठी त्याला रीतसर निमंत्रण पत्र वगैरे पाठवून बोलावलं असेल.
'येताना हे निमंत्रण सोबत आणावे' अशी तळटीप त्याच्या नजरेतून निसटली असेल आणि तो तसाच हॉटेलवर गेला असेल.
... प्रवेशद्वारावरच रखवालदारानं त्याला अडवलं असेल. मग,'आपण पार्टीसाठी आलोय, आपल्याला निमंत्रण आहे ', वगैरे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला असेल.
पण रखवालदाराला काहीच फरक पडला नसेल.
'ते ठीक आहे, तुमचं निमंत्रण पत्र दाखवा आणि मगच आत जा' असं रखवालदारानं ठणकावलं असेल.
त्याला कसं समजावावं, हे शेक्सपियरला कळेनासं झालं असेल.
'अहो, असं काय करता?... मी शेक्सपियर आहे '... ओळख पटवण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून त्यानं नावाचा वापर केला असेल.
तरीही रखवालदार ढिम्म राहिला असेल.
'तुम्ही कुणीही असा हो... आमचं कायबी म्हननं नाय. फकस्त, कार्ड दावा आन मगच आत जावा '... असं निर्विकारपणे म्हणत रखवालदारानं पुडीतली तंबाकू तळव्यावर घेत लांब नजर लावली असेल...
....अशा क्षणी, कदाचित,  'नावात काय आहे' असा निराश विचार शेक्सपियरच्या डोक्यात आला असेल.
होतं असं कधीकधी!!

पण लगेच, असं वाक्य म्हणजे त्रिकालाबाधित सत्य मानायचं नसतं.
नावात खूप काही आहे.
म्हणजे, नाव ही माणसाची पहिली ओळख आहे.

आज, अचानक एखादा अनोळखी माणूस तुमच्यासमोर उभा राहिला, आणि ओळखीचं हसला, तर?...
तुम्ही गोंधळून जाल.
मग तो म्हणेल, 'ओळखलंस मला? '
तुम्ही तसेच..  गोंधळलेले.
मग तो म्हणेल, 'अरे मी गिरीश'...
तरीही तुम्ही गोंधळलेलेच.
'अरे, गिरीश...  बापट...  मी गिरीश बापट... ' असं तो म्हणेल.
... आणि कुणा गिरीश बापट नावाच्या माणसाशी तुमची कधीही ओळख नसेल, तरीही तुम्हाला ओळख पटून जाईल.
आख्खं व्यक्तिमत्व तुमच्या मनासमोर तरळून जाईल!
आहे की नाही नावात सारं काही??

Friday, August 7, 2015

मला गुरू भेटला...


मला गुरू भेटला!...
गुरुचे कोणत्याही रूपात दर्शन होते. म्हणजे, जटाभस्मांकित किंवा मस्तकामागे तेजोवलयांकित, गळाभर माळा, भाळी चंदनाचा टिळा, असेच गुरूचे रूप असले पाहिजे असे नाही...
जगातली, आसपासची चल वा अचल, सजीव वा निर्जीव वस्तूदेखील आपल्याला गुरुमंत्र देऊन जाते.
फक्त त्याच्या आकलनाची शक्ती हवी! 
***-****-****
आज मी प्रयोगादाखल गुरुशोध सुरू केला, आणि माझ्याच मनातले हे माझे विचार मला तंतोतंत पटले.
.... मी विचार करत बसलो होतो. नजर निरुद्देशपणे जमिनीवर स्थिर होती.
तितक्यात एक मुंगी समोर आली. मला माझा विचार आठवला.
मुंगीच्या रूपाने गुरूच तर समोर आला नसेल?
मी मनाशी हसलो. विचार झटकून टाकला.
... आणि चाळा म्हणून, मुंगीची वाट बोटाने अडविली.
क्षणभर मुंगी बावरली. एका जागी थांबली. मग तिने वाट बदलून पुढे जायचा प्रयत्न सुरू केला.
... मी पुन्हा बोट आडवे घालून तिचा तो रस्ताही अडवला.
ती पुन्हा बाजूला वळली. मी पुन्हा तिचा रस्ता रोखला.
असं खूपदा झालं. आता मला मुंगीची गंमत वाटू लागली होती. आमचा रस्ता रोकोचा खेळही रंगात आला होता.
तेवढ्यात मला एक गोष्ट मनात चमकली.
... या एवढ्या अडथळ्यांनंतरही, मुंगी पुढे जाण्यासाठीच धडपडत होती!
ती माघारी फिरली नव्हती.
... मग पुन्हा मी तिचा रस्ता अडवला.
आता मुंगीने तिची सारी ताकद पणाला लावून माझ्या बोटाला चावा घेतला होता...
तरीही मी बोट बाजूला केले नाही.
... अखेर तिचा नाईलाज झाला. ती चक्क बोटावर चढली, आणि बोटाचा अडथळा पार करून, ओलांडून पलीकडे गेली.
शांतपणे तिने तिचा मार्ग पकडला होता!
***-****-***
असा, कोणत्याही रूपात भेटणारा गुरूदेखील आपल्या वागण्यातून, कृतीतून, दृष्टान्त देत असावा, असा आणखी एक विचार माझ्या मनात आला!
गुरुमुंगीच्या भेटीतून मला माझेच विचार मनोमन पटले!
मी क्षणभर डोळे मिटले.मुंगीला मनोमन नमस्कार केला.
ती मुंगी हसते आहे, असा मला मिटल्या डोळ्यापुढे भासही झाला.
मी डोळे उघडले. समोर, आसपास, कुठेच ती मुंगी दिसत नव्हती!
****-***
तिने दिलेला दृष्टान्त मात्र, मनावर ठसला!
... आपल्या वाटेवर कितीही अडथळे आले, तरी माघार घ्यायची नाही.आधी सामोपचाराने घ्यायचे, नाहीच, तर, इंगाही दाखवायचा, त्यानेही जमले नाही, तर सरळ अडथळे ओलांडून पुढे जायचे!
... गुरुमुंगीला प्रणाम!
आता पुढचा गुरू कोणत्या रूपात भेटतो, याची उत्सुकता आहे!